श्रीजगन्नाथाष्टकम् (विश्लेषणासहित ) -
पुरीचा
जगन्नाथ आणि जगन्नाथाची पुरी हे समीकरणच होऊन गेलं आहे. द्वारका ते पुरी अशा
संपूर्ण पूर्व-पश्चिम दिशांना जोडणार्या परिसरात कृष्णाचे श्वास अजूनही घनदाट
भरून राहिले आहेत. तर मथुरा ते मदुरा ह्या दक्षिणोत्तर जोडणार्या भूमीवर
श्रीकृष्णाच्या पावलांच्या खुणा आणि पैंजणाची रुणझुण अजूनही ऐकू येत आहे. सारा
भारतच कृष्णलीलांमधे आजही विरघळून गेला आहे.
जगन्नाथपुरीला
असलेला कृष्ण पूर्ण वेगळ्या रूपात आहे. ना सोबत राधा आहे ना रमा. कृष्ण आणि बलराम
आणि मधे लाडकी बहीण सुभद्रा.
बाकी
तीर्थस्थळांना भेटी देतांना पतीपत्नी बरोबर असण्याला महत्त्व असलं तरी
भावंडांच्या विशुद्ध प्रेमाचं प्रतीक असलेल्या ह्या तीर्थस्थळाला भेट द्यायची असेल तर बहीणभावांनी बरोबर जावं म्हणतात. बाकी तीर्थस्थानांपेक्षा म्हणूनच ह्या स्थानाचं अप्रूप वाटतं मला. भावाबहिणींनी मंदिराच्या पायर्यांवर बसून बालपण परत एकदा समरसून जगावे, एकमेकांना कोपरखळ्या देत दुसर्याक्षणी गळ्यात गळे घालून बहिणीने बांधून आणलेला खाऊ चाखावा; समुद्राच्या वाळूत फिरतांना परत एकदा मागच्या आठवणींच्या पाऊलखुणा न्याहाळत फिरावे ----- सर्वच संकल्पना किती गोड! बहीण भावाच्या प्रेमालाही तीर्थरूप करणारी!!!
म्हणे एकादशीचा उपवासही करत नाहीत येथे. गोविंदासोबत गोपाळकाला अनुभवतांना एकादशीचीही दीपावली होत असावी. एकादशीच्या प्रतिकात्मक बाहुलीला म्हणे उलट टांगून ठेवलय इथे. ह्या समुद्र किनार्यावरच्या देवळाभोवती अनेक अनेक प्रसंग, अनेक कथा विणल्या गेल्या आहेत.
`प्रत्यक्षाहुन
प्रतिमा उत्कट'चा अनुभव घ्यायचा असेल तर श्री
आद्यशंकराचार्यांनी वर्णन केलेला श्रीकृष्ण जगन्नाथ वाचायला पाहिजे. शब्दातून
व्यक्त होणारा हा श्रीकृष्ण-जगन्नाथ डोळ्यासमोर उभा नाही राहिला तरच विशेष!
``जगन्नाथ
स्वामी नयनपथगामी भवतु मे । '' म्हणत, जगाच्या
नाथालाही सतत डोळ्यासमोर बांधून ठेवण्याचं वाणीचं कौशल्य ह्या महात्म्याचच!
ज्या प्रमाणे रत्नाचं तेज फाकावं त्याप्रमाणे अंगच्या सद्गुणांमधून प्रभेप्रमाणे फाकणारा ह्या मुकुंदाचा स्वतःचा मोहकपणा, स्वभावात आरपार मुरलेलं माधुर्य त्याच्या प्रत्येक कृतीतून उमलून येत असतं. बासरीने नुसता ओठाला स्पर्श जरी केला तरी ह्या माधवाचं अपरंपार माधुर्य बासरीच्या सूरासूरातून समरस होऊन वाहू लागतं.
कधी
कालिंदीच्या तिरावर बसून, डोळे
मिटून बासरी वाजवण्यात तल्लीन झालेला मनमोहन; तर
कधी आपल्या सुरेल आवाजात यमुनेच्या वनातून हिंडणारा मेघःश्याम; तर
कधी मुकुदांच्याच सूरांमधेच देहभान विसरलेल्या हरिमय झालेल्या गोपींच्या चेहर्यावरील
भाव टिपणारा खट्याळ डोळ्यांचा कमलमनोहर कृष्णचंद्र-----------!!!
कृष्णाची
ही विविध रूपे माझ्या डोळ्यांसमोर सतत तरळत राहोत. माझ्या नेत्रात कृष्णाच्या मोहक
लीलांचे विविध आविष्कार प्रतिक्षण साकार होवोत. माझी नजर जेथे जाईल तेथे तेथे
कृष्ण माझ्या नजरेच्या समोर असो.
ज्या
कृष्णाचं प्रसन्न मुख पाहून स्वतः ऐश्वर्याची मूर्ती लक्ष्मीही शरण आली आहे, ज्याच्या
निर्व्याज स्वभावाने कल्याणाचेही कल्याणस्वरूप शिव नतमस्तक झाले आहेत, ज्याच्या
सुंदर मुखापुढे सृष्टीकर्ता ब्रह्मदेवही मोहित होतात, ज्याच्या
सद्गुणांनी देवाचे अधिपती इंद्राचेही हृदय जिंकले आहे, ज्याच्या
बाललीलांनी सुखावलेले गजाननही
स्वतःच्या सोंडेने त्याला मोदक भरवत आाहेत ---- अशा असंख्य असंख्य मोहक
कृष्णछबी माझ्या डोळ्याच्या पुतळ्यांमधेच निवास करोत.
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 1
(वृत्त
- शिखरिणी, अक्षरे-17,गण
-य म न स भ ल ग, यति –
6,11)
{ कदाचित्कालिन्दी-तटविपिन-सङ्गीतकवरो
मुदा
गोपीनारीवदनकमलास्वादमधुप।
रमा-शंभु-ब्रह्माऽमरपति-गणेशार्जितपदो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।1}
( संगीतकवर – संगीतात
रममाण झालेला,गाण्याचा छंद लागलेला)
कधी
कालिंदीच्या तटि विहरतो श्याम हरि हा
सुरांमध्ये
जाई हरवुनि कधी गीत म्हणता
तरंगे
कालिंदी मधुर-सुर-स्वप्नात हरिच्या
हरी-नादब्रह्मा अनुसरति गोपी प्रमुदिता।।1.1
सुरांच्या
हिंदोळ्यावर झुलति गोपी भुलुनिया
उरे
ना गोपींसी घर समय हे भान मनि वा
घडे
अद्वैताचे अनुपमचि ते दर्शन जगा
सुरांनी होई हा परिसर अती धुंद अवघा।।1.2
अशा
जीवे भावे हरिमयचि होता गवळणी
मुखांना
शोभा ये कुमुदवनिची लोभस कशी
हरीच्या
नेत्रांचे मधुकर रसास्वाद करण्या
कधी
येती जाती फिरति मुखपद्मांवरिच त्या।।1.3
विधाता
वा गंगाधर गणपती इंद्र कमला
तुझ्या
पायी येती शरण भगवंता सुरवरा
पुरी
स्थानाचा तू अधिपति जगन्नाथ असशी
दिसो
माझ्या नेत्री सतत तव मूर्ती सुखमयी।।1.4
-----------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 2
एखाद्या वक्त्याचा वा प्रमुख पाहुण्याचा परिचय करून द्यायचा असेल तर
त्याने केलेली काही महत्त्वाची कामगिरी ही
त्याचा परिचय म्हणून सांगितला जातो. त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात
साकार होतं. येथे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, ह्या
श्रीरंगाच्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा खरा परिचय पाहिजे
असेल तर तो म्हणजे त्याच्या गोकुळातल्या मन मोहवून टाकणार्या लीला होत. त्या
लीलांमधूनच सर्वांच्या मनाला आकर्षून घेणारी खरी कृष्णमूर्ती मनात साकार होत जाते.
त्याचं जरीकाठाचं रेशमी झुळुळीत पितांबर, मोरपंखी शेला, माथ्यावरच्या रत्नखचित मुकुटातील मोरपीस, उजव्या हातात धरलेला पावा आणि त्या जोडीला अत्यंत प्रसन्न, बोलका चेहरा आणि खट्याळ डोळे!
त्याच्या लीला पाहण्यासाठी देवनगरी ओस पडून सर्व देव वेगवेगळी रूपे घेऊन गोकुळात येऊन राहत असले तर धरेवर स्वर्ग साकारणारा, मनाला आह्लाद देणारा हा कान्हाच जणु काही व्रजभूमीचे भूषण आहे. गालातल्या गालात हसत आपल्या दोस्तांकडे हळुच तिरका कटाक्ष टाकणारा हा बालगोपाल माझ्या नेत्रपुतळ्यांमधेच वस्ती करून राहू दे. मला अजून काही नको. हे जगन्नाथा माझ्या डोळ्यासमोरून तुझी ही मनोहारी मूर्ती हलू देऊ नकोस.
{ भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे
दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते।
सदा श्रीमद्वृन्दावनवसतिलीलापरिचयो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।2 }
( दुकूल- विणलेले रेशमी
वस्त्र । विदधते – वि धा धातू 3रा गण धत्ते दघाते दधते हे बहुवचन आहे.
वेणू, मोरपीस, दुकूल धारण केले हे तर
सहचरांवर कटाक्ष ``टाकते आहे’’)
धरी प्रेमे वेणू सुरमधुर ती सव्यचि करी
सुवर्णा रत्नांचा किरिट बहु आकर्षक शिरी
किरीटी मोराचे खुलुन दिसते पीस तुजसी
जरीकाठाचे
हे झुळझुळित पीतांबर कटी।।2.1
कटाक्षासी
टाकी हळुच तिरक्या लोभस अती
सख्यांना पाही तू हळुच हसुनी खोडकरची
तुझ्या या लीलांनी जणु अवतरे स्वर्ग भुवनी
महद्भाग्याने ही झळकतचि वृंदावनपुरी।।2.2
व्रजाच्या लीला हा परिचय तुझा कौतुकमयी
उभा राहे नेत्री स्मरण तव होताचि हृदयी
तुझ्या या लीलांचा पट उलगडो दृष्टिपुढती
जगन्नाथः स्वामी नयनि मम राहो तव छबी।।2.3
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 3
हे यदुनाथा,
भारताच्या पूर्व किनार्यावर असलेल्या निळ्या
पर्वतरांगांच्या कुशीत ह्या महान गंगासागराच्या तीरावर तुझा हा कांचनी महाल उठून
दिसतोय. ढगांनी गर्दी केलेली ही गडद हिरवी निळी पर्वतशिखरं, त्यांच्या पायथ्याशी
येऊन फुटणार्या ह्या समुद्राच्या निळ्या लाटा आणि तुझ्या सुवर्णप्रासादाचे निळे
घुमट सगळं कसं एकमेकांसाठीच बनवलं आहे. हा महासागर तुझ्या दाराशी रोज वाळूत
तरंगनक्षीची नानाकारी रंगावली घालत आहे. अशा सुंदर राजभवनात तू स्वतः रमारमण बलराम
आणि सुभद्रेसह राहतोस. आहाहा!!! तीन भावंडांनी एकत्र राहण्याची तुझ्या मनातील ही कल्पनाच
किती गोड! सर्व बालपण आपण तिघंही एकमेकांपासून दुरावला होता. आता तुमच्या ह्या
सुखद वास्तव्यात तुमची जरा तरी सेवा करता यावी, तुमच्या सेवेचा एक
छोटासा का होईना अवसर / क्षण, लहानशी संधी प्राप्त व्हावी ही देवांच्या मनातील इच्छा आपण
पूर्ण करत आहात. हे नंदनंदना तुझ्या आणि बलरामाच्या मधे उभ्या असलेल्या
आपल्या लाडक्या धाकट्या बहिणीचा हात धरून एका बाजूला बलराम आणि एका बाजूला तू
स्वतः उभा आहेस हे अलौकिक दृश्य माझ्या डोळ्यांसमोर सतत साकारलेलंच राहू दे. एवढीच माझी तुला विनंती आहे. हेच माझं
तुझ्याचरणी मागणं आहे. त्याला नाही म्हणू नकोस.
जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे।।3
{ महाम्भोधेस्तीरे कनकरुचिरे नीलशिखरे
वसन्प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना।
सुभद्रा मध्यस्थः सकलसुरसेवाऽवसरदो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।3 }
असे नीलाद्रिच्या कुशित तव प्रासाद रमणा
समुद्राच्या तीरी तळपत असे स्वर्णमय हा
तयांचे तेजस्वी कळसचि निळे हे झळकती
निळ्या लाटांची ही अभिनव असे नक्षि पुढती।।3.1
तुझ्यासंगे आहे हलधर प्रभावी तुजसमा
सुभद्रा लाडाची बहिणहि मधे संगति तुझ्या
इथे देवांना तू तव चरण सेवा घडविली
जगन्नाथः स्वामी नयनि मम राहो तव छबी।।3.2
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 4
हे जनार्दना,
तू कृपेचा सागर आहेस. दयासिंधु आहेस. तो सिंधु खारट पाण्याने भरलेला असतो तसं तुझं नाही. तुझ्या आत्मीयतेत कुठेही खोट नाही. जलाने भरलेल्या मेघमालांसारखा तू सर्वांनाच हवाहवासा वाटतोस. पण काही दिवसातच ह्या मेघमाला रित्या होतात तसं तुझं नाही. तुझ्या हृदयात भरलेलं प्रेम, वात्सल्य, भक्तांविषयीची आत्मीयता, ओढ कधीही कमी होत नाही. म्हणूनच सार्या देवांनाही तू वंद्य आहेस. सर्व देव तुझ्यासमोर माना झुकवून उभे आहेत. माता सरस्वती असो, माता लक्ष्मी असो. चंद्र असो वा ब्रह्मा सारे सारे तुझ्या गुणांवर मोहित होऊन तुझ्यावर भाळले आहेत. अरे हे वेद सुद्धा तुझी स्तुती गातांना ना कंटाळतात ना थकतात. तुझी ही अशीच छबी माझ्या डोळ्यासमोर उमटलेली राहू दे.
{ कृपापारावारः सजल-जलद-श्रेणि-रुचिरो
रमा-वाणी-सोम-स्फुरदमल-पद्मोद्भवमुखैः।
सुरेन्द्रैराराध्यः श्रुति-गण-शिखा-गीतचरितो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।4 }
(पारावार – समुद्र
। श्रेणि – रेखा, श्रुंखला,
पंक्ती, ओळ, दल, संचय, समुह । रुचिर- उज्ज्वल, चमकदार,प्रकाशमान,
सुंदर, मनोहर, ललित,
स्वच्छंद । रमा- लक्ष्मी। वाणी – - सरस्वती । सोम - चंद्र।)
निळ्या आकाशी या सजल जलदांचे दल जसे
फिरे स्वच्छंदाने भुरळ हृदया घालित असे
मना मोही तैसा; बरसवि सुखाच्या नित सरी
दयावीरासी या हृदयि अनुकंपा अमित ही।।4.1
असो वाग्देवी वा कमलवदना कोमल रमा
असो ब्रह्मा पद्मोद्भवचि अथवा चंद्र नभिचा
असो
वा देवांचा अधिपतिच देवेन्द्रचि महा
तुझ्या सेवेसी हे सकल असती तत्पर पहा
जसे ताकामध्ये नवनित असे श्रेष्ठ अवघे
तसे वेदांमध्ये उपनिषद हे श्रेष्ठ गणते
सुखे तेही गाती नित गुण तुझे अद्भुत अती
जगन्नाथः स्वामी नयनि मम राहो तव छबी।।4.3
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 5
हे गरुडध्वजा,
लांबूनच तुझ्या रथावरचा कपिध्वज फडकतांना दिसला की
रस्त्याने जाणारे सर्व ऋषीमुनी अत्यंत हर्षित होउन ``अरे कृष्ण आला, अरे नंदनंदन आला,
अरे देवकी नंदन आला, अरे वसुदेवसुत आला’’ असं म्हणत तुला
भेटायला उतावीळ होतात. ``स्वस्ति अस्तु !
स्वस्ति अस्तु!’’ असे आशीर्वाद देत,
मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहतात. तू तर कृपेचा
पारावार! दयासिंधु! त्या ऋषीमुनींच्या तोंडुन निघणारे आशीर्वाद ऐकून तुझा कंठ
त्यांच्या प्रेमाने दाटून येतो. रथातून पायउतार होऊन, त्या सर्व
महात्म्यांना हृदयाशी धरून तू त्यांच्या मनोकामना पूर्ण करतोस. हे दयाघना, ऋषीमुनींना हृदयाशी
धरणारी तुझी ती वत्सल मूर्ती माझ्या नयनांपुढे कायम राहो. हे नारायणा, ही सागरकन्या रमा
तुझ्या सोबत आहे अशी ही तुझी छबी माझ्या नेत्रपुतळ्यांसमोरून किंचितही हलू देऊ
नकोस. तुझं हे रूप डोळ्यात साठवून ठेवतांना माझ्या नेत्रातून तुझ्याविषयीच्या
प्रेमाच्या अश्रुधारा वाहत असल्या तरी त्यांनी तुझी मूर्ती जास्तच रेखीव होईल.
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।5
{ रथारूढो गच्छन्पथि मिलित-भूदेवपटलैः
स्तुतिप्रादुर्भावं
प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः।
दयासिन्धुर्बन्धुः
सकलजगतां सिन्धुसुतया
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।5 }
( भूदेव - ब्राह्मण। पटल – समुच्चय,राशी। )
रथाची पाहोनी तव जय पताकाचि दुरुनी
पथी पाहोनीया अवचित रथारूढ तुजसी
दुतर्फा मार्गाच्या थबकति द्विजांचे गण किती
तुझे जागोजागी स्तवन करिती हे ऋषिमुनी।।5.1
तुझ्या कल्याणाची करिति मनि इच्छा सकलही
तयांच्या प्रेमाने तव गहिवरे चित्त सहजी
द्विजांचे सार्या त्या नित कुशल कल्याण
करिसी
करे दीनार्तांसी स्मित तवचि आश्वासित मनी।।5.2
गमे प्रत्येकाला जणु गवसला प्राण मजसी
मिळाला जन्माचा मजसिच सखा सर्व म्हणती
रमा रम्या नित्या करित तुजसी सोबत अशी
जगन्नाथः स्वामी नयनि मम राहो तव छबी।।5.3
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक 6
हे जगन्निवासा,
तू तर कैवल्याच्या शिरपेचात शोभशील असा मुकटमणी आहेस.
परब्रह्माचं परब्रह्म आहेस. निळ्या कमळकळीसारखा तुझ्या आकर्ण राजीवलोचनांचा सुंदर
आकार बघत रहावा असा आहे. तर पूर्ण फुललेल्या नीलकमलाप्रमाणे तुझे डोळे सतेज, उत्साहाने रसरसलेले
अत्यंत आह्लाददायक आहेत. हे नीलकमललोचना,
त्या निळ्या पर्वत शिखरांवर, नीलाद्रीवर तुझं
सुखद वास्तव्य असतं ते मला अनुभवु दे.
तुझ्या हया कमल कोमल पावलांचे ठसे त्या जहरी कालियाच्या
फण्यांवर कायमचे उमटले. त्याने त्याचा अहंकार कायमचा ठेचला गेला. घुसखोरी करून
स्थानिक लोकांवरच दहशत माजवणार्या अत्याचारी कालियाला भारताची भूमी तू सोडायला
लावलीस आणि परत त्याचं रमणक द्वीप गाठायला लावलं. ते त्याला लागलेलं लांछन कधीही
पुसलं जाणार नाही. त्यासाठी तू दाखवलेले ते अचाट धाडस आम्ही आत्मसात
करायचा प्रयत्न करू. कालियामर्दनाच्या रूपाने शिकवलेला धडा आजही सर्वांच्या
मनामनात जागृत राहो.
तुझं रसाळ चरित्र पाहता तू आनंदाचा आनंद आहेस. सौख्यनिधान
आहेस. तुझ्या प्रेमरसात आकंठ बुडालेल्या राधेला तू हृदयाशी धरलं आहेस ही तुझी
राधामोहन लावण्यमूर्ती माझ्या नजरेत सामावलेली राहू दे. तिच्याशिवाय मला
अजून काहीही पाहण्याची कामना नाही. जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।6
{ परब्रह्मापीडः कुवलयदलोत्फुल्ल-नयनो
निवासी
नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि।
रसानन्दो
राधासरसवपुरालिङ्गनसुखो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।6 }
( आपीड- मुकुट । कुवलय – नीलकमल। रसानन्द – रसो वै स - तो आत्मा परमात्मा म्हणजे परब्रह्म रसस्वरूप आहे. । सरस – भक्तिने अनन्य प्रेमाने परिपूर्ण। अनन्त – अनन्ताच्या कुळात जन्मलेला कालियासर्प)
असे कैवल्याचा मुकुटमणि तू कृष्णसखया
सुखावे चित्तासी तव नयन नीलोत्पलसमा
करी वास्तव्यासी अनुपम अशा नीलशिखरी
शिरी कालीयाच्या तव उमटले दिव्य पद ही।।6.1
असे आनंदाचा निरतिशय आनंद हरि हा
सुखाचे आहे ते परमसुख तू अक्षयचि वा
तुझ्या प्रेमाने जी विसरलि जगासी सकल या
तुझ्या राधेला त्या हृदयि धरिले प्रेमभरिता।।6.2
तुझ्या
या रूपाचे मजसि घडु दे दर्शन हरी
जगन्नाथःस्वामी
नयनि मम राहो तव छबी।।6.3
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक
7
हे त्रिभुवनसुंदरा,
तुला सोडून मला दुसरं काहीही नको. अरे चिंतामणी सोडून कोणी रंगित काच
उचलेल का? कामधेनू सोडून कणी भाकड गाय घेईल का? लोकांच्या
ठराविक साचेबंद मागण्या असतात तशा, माझ्या तुझ्याकडे कुठल्याही मागण्या नाहीत. ना
मला राज्य पाहिजे, ना धनवैभव, ना नाना प्रकारचे श्रीमंतीचे भोग, ना लावण्यखणी पत्नी!
अरे घराचे वासे काढून कोणी कुंपण करेल का? तुझ्याविना हे सारं
सारं असार आहे. हे जगन्निवासा, हा गणपतीही नित्य तुझीच स्तुती आळवीत आहे. असा तुझा अलौकिक
महिमा असताना मी रत्न सोडून गारगोटी घेऊ इच्छित नाही. मला फक्त तू आणि तूच
पाहिजेस. माझ्या नेत्रीच्या पुतळ्यांमधे तुझं हे मनोहारी रूप नजरबंद होऊन राहू दे.
माझ्या डोळ्यांसमोरून तुझी ही प्रसन्न मेघश्यामल मूर्ती कधीही पुसली जाऊ देऊ नको.
हेच दान तू मला दे. जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।7
{ न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकता भोगविभवे
न याचेऽहं रम्यां निखिलजनकाम्यां वरवधूम्।
सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।7 }
अपेक्षा ना चित्ती मज कनक राज्यादि कसली
नको ऐश्वर्याचे विविध कुठले भोग मजसी
नको कांता रम्या सकल जन जे इच्छिति मनी
दिसो माझ्या नेत्री सुखद तव मूर्ती शिवमयी।।7.1
गणांचा स्वामी हा प्रथमपति गाई तव स्तुती
जगन्नाथःस्वामी नयनि मम राहो तव छबी।।7.2
------------------------------------------
जगन्नाथाष्टकम्
श्लोक
8
हे द्वारकाधीशा,
हे यदुपती,
माशीने पंख हलवावेत वा मत्त गजाने त्याचे कान हलवावेत इतका
हा संसार क्षणभंगूर आहे. आज आत्ता आहे तर पुढच्याक्षणी काही नाही. अशा अशाश्वत संसाराला
मी व्यर्थ माझा माझा म्हणून धरून बसलो आहे. हे श्रीहरी ह्या संसाराच्या जटिल
गुंत्यातून तू मला सोडवं. ही एक का गोष्ट आहे? ह्या संसारासोबतच
दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मागे लागलेल्या पापांच्या अभूतपूर्व अशा झुंडीच. हे हरी
त्या पापमालिका तूच दूर करू शकतोस.
हे दीनबंधू, हे कृपासागरा,
मी माझं दुःख कोणाला सांगणार? दीन, दुःखी, दुबळे, शोकग्रस्त अशा सर्व
अभाग्यांविषयी तुझ्या मनात अपरंपार करुणा भरली आहे. त्या सर्वांचं रक्षण
करण्यासाठी तू कटिबद्ध आहेस. अनाथांचा नाथ , दीनांचा दयाळ अशी ही
तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्या पायीचा दगड होऊन राहिलो आहे. तुझ्या पायाशी मला स्थापित
करून घेतलं आहे. माझ्या दृष्टी समोरून आता तू जराही हलू नकोस. माझ्या नेत्रीच्या
पुतळ्यांमधे तुझी ही विलोभनीय छबी सतत मला दिसत राहू दे. बास!! अझुन मला काही काही
नको. जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।8
{ हर त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते
हर त्वं पापानां विततिमपरां यादवपते।
अहो दीनानाथं निहितमचलं पातुमनिशं
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।8 }
( असार – नीरस,व्यर्थ,क्षणभंगुर । विततिः – झुंडी, मालिका, विस्तार, प्रसार । अपरां- भिन्न भिन्न, दुसर्या, अभूतपूर्व । अनिशम् – सातत्याने, निरंतर, निहित – ठेवलेला, स्थापना केलेला । अचलम् – दृढ, स्थिर, खडक )
जसा नाचे पाण्यावर बुडबुडा तो क्षणभरी
तशा या संसारा धरुनि बसलो व्यर्थ परि मी
करा या दुःखाचे निरसन तुम्ही हो यदुपती
करावे पापांचे कमलनयना क्षालन तुम्ही।।8.1
अहो दीनोद्धारा! स्मरुनि तव लौकीक जगती
तुझ्या पायी राहे दगड बनुनी निश्चल अती
तुझ्या प्राप्तीची रे मम हृदयिची आस पुरवी
जगन्नाथःस्वामी
मम नयनि राहो तव छबी।।8.2
------------------------------------------
जरी असे संस्कृत थोर वाणी । भक्तां कळाया सहजी म्हणोनी
अहो जगन्नाथ अरुंधती ही । करे मराठी अनुवाद हाची
-----------------------------------------------------------