।। उमामहेश्वरस्तोत्रम् ।।

 

।। उमामहेश्वरस्तोत्रम् ।।


( वृत्त- उपेंद्रवज्रा, अक्षरे- 11, गण - , यति- 5,11 )


नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां

परस्परश्लिष्ट-वपुर्धराभ्याम्

नगेन्द्रकन्या-वृषकेतनाभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 1

( शिवाभ्याम् – शिव आणि शक्ती दोघे एकरूप असल्याने दोघांना मिळून शिवाभ्यां म्हणजे कल्याणकारी असा शब्द वापरला आहे. वृषकेतन – केतन म्हणजे झेंडा किंवा चिह्न. ज्याच्या ध्वजावर नंदीचे चिह्न आहे असा शंकर )

वसंत भासे नवयौवनाचा सदा जयांच्या कमनीय काया

कल्याणमूर्ती शिव-शक्तिरूपी प्रणाम माझा शिवपार्वतीसी ।। 1.1

 

तरंग नाचे जलपृष्ठभागी परी तरंगी जल तेच राही

देहार्ध तैसे शिवपार्वतीचे आलिंगिती नित्य परस्परांशी ।। 1.2

 

हिमालयाची पवित्र कन्या तिच्यासवे नंदिवरी शिवाला

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा प्रणाम माझा शिवपार्वतीला ।। 1.3

 

नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां

नमस्कृताभीष्ट-वरप्रदाभ्याम्

नारायणेनार्चित-पादुकाभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 2

(सरस घनदाट. उत्सवआनंद. सरसोत्सवआनंदघन )

 

संपृक्त आनंदरसेची  दोघे । कृपाळु मेघासम सौख्यदाते

करीति भक्तांवर सौख्यवृष्टी । उमा महेशास प्रणाम त्याची ।। 2.1

 

भक्ता मनीचे गुज ओळखोनीतयास देती वर योग्य तोची

मुकुंद ज्यांचे पद वंदितोची । उमामहेशा नमितोच त्या मी ।। 2.2

 

नमः शिवाभ्यां वृषवाहनाभ्यां

विरिञ्चि-विष्ण्विन्द्र-सुपूजिताभ्याम्

विभूति-पाटीर-विलेपनाभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 3

 (विरिंची – ब्रह्मदेव. विभूति – भस्म / चिताभस्म. पाटीर –चंदनाची उटी)


तनूवरी चंदन कस्तुरीची उटी सुगंधी गिरिजाच लावी ।

परी चिताभस्मचि लेप शोभे । महेश अंगावर गौरकांती ।। 3.1

 

नंदीवरी स्वार उमा-महेशा । सुपूजिती इंद्र हरी विधाता

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा प्रणाम माझा शिवपार्वतीला ।। 3.2


 


नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां

जगत्पतिभ्यां जयविग्रहाभ्याम् ।

जम्भारिमुख्यैरभिवन्दिताभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 4

(जम्भारि – जम्भासुराचा इंद्राने वध केला म्हणून इंद्राला जम्भारि म्हणतात.  विग्रह - शरीर)


असेच स्वामी तिनही जगाचा । महेश विश्वेश जगत्पती हा

 तिन्ही जगाचा प्रभु एक शौरी । करे जगाचा प्रतिपाळ गौरी ।। 4.1

 

वधेच जम्भासुर राक्षसा जो । सुरेंद्र तो सर्व सुरांसवेची

कुबेर अग्नी वरुणासवेची । पदी जयांच्या करि वंदनासी ।। 4.2

 

तनू जयांच्या जयदायिनी ह्या । सदैव देती जय सर्व कामी

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा प्रणाम त्याची शिवपार्वतीला ।। 4.3



नमः शिवाभ्यां परमौषधाभ्यां

पञ्चाक्षरी-पञ्जर-रञ्जिताभ्याम् ।

प्रपञ्च-सृष्टी-स्थिति-संहृताभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 5

 (  पञ्चाक्षरी – नमः शिवाय हा मंत्र. पञ्जर – पिंजरा /येथे कवचाप्रमाणे रंजित – आनंद देणारा,  )


करी निरोगी भवरोग नाशी । शरीर-दोषा करितीच दूरी

अशीच ख्याती शिव पार्वतीची । अमोघ शक्ती वसतेच नामी ।। 5.1

 

जगा असे औषधरूप दोघे । करेचि रक्षा कवचासमा ते

सुखी करी भक्तजनांस दोघे । सदैव भक्ता रमवीति दोघे ।। 5. 2

 

असेचि पंचाक्षर मंत्र त्यांचा । मुखी जयांच्याच नमः शिवाय

उमा- शिवासी सुखवी विशेष । मनास आनंद नितांत देय ।। 5.3

 

घडेचि उत्पत्ति स्थिती लयादि । असे तया कारण शंभु-शक्ती

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा प्रणाम त्याची शिवपार्वतीला ।। 5.4

 

 

नमः शिवाभ्यामतिसुन्दराभ्यां

अत्यन्तमासक्त-हृदम्बुजाभ्याम् ।

अशेषलोकैक-हितं-कराभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 6


असे जयांची रमणीय मूर्ती । जया पदी मी अनुरक्त होई

कृती असे विश्वहितार्थ  ज्यांची । प्रणाम त्याची शिवपार्वतीसी ।। 6

 



नमः शिवाभ्यां कलिनाशनाभ्यां

कङ्काल-कल्याण-वपुर्धराभ्याम्।

कैलास-शैलस्थित-देवताभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 7

( कंकाल – मानवाच्या अस्थि, नररुंडमाला/नरमुंडमाला. रुंडम्हणजे धड तर मुंड म्हणजे मुंडके )

करेचि दूरी कलिकल्मषासी । प्रणाम त्याची शिव-पार्वतीसी

नटे उमा कांचन भूषणांनी । त्या रुंडमाळा सजवी शिवासी ।।7.1

 

कैलास-शैलावर जे रहाती । साक्षात जे देव महान दोन्ही

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा प्रणाम त्याची शिवपार्वतीला ।।7.2

 

नमः शुभाभ्यामशुभापहाभ्या-

मशेषलोकैकविशेषिताभ्याम्

अकुण्ठिताभ्यां स्मृतिसम्भृताभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 8


मूर्ती जयांच्या शुभ ह्या असेची । हरीति सार्या अशुभा त्वरेनी

असे त्रिखण्डातचि वास ज्यांचा । मूर्ती तयांच्या हृदि साठवील्या ।। 8.1

 

सदा स्फुरे रूपचि नित्य चित्ती । प्रणाम त्याची शिवपार्वतीसी ।। 8.2

 


नमः शिवाभ्यांरथवाहनाभ्यां

रवीन्दु-वैश्वानर-लोचनाभ्याम् ।

राकाशशाङ्काभ-मुखाम्बुजाभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 9


रथातुनी जे करिती विहारा । शशी, रवी अग्नि असे त्रिनेत्रा

मनोज्ञ भारी मुखचंद्रमा हा । अतीव आह्लादक सुंदरांचा ।। 9.1

 

रवीच प्राचीवर का उदेला । वा पूर्णचंद्रासम पौर्णिमेच्या

नीलाम्बुजाच्या सम चेहरा हा । गमेचि दोघांसचि पाहतांना ।। 9.2

 

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा । प्रणाम त्याची शिवपार्वतीला ।। 9.3

 


नमः शिवाभ्यां जटिलंधराभ्यां

जरा-मृतिभ्यां च विवर्जिताभ्याम् ।

जनार्दनाब्जोद्भव-पूजिताभ्याम्

नमोनमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 10

( जटिल – केसांच्या जटा, गुंतागुंत झालेला वा बांधलेला तर दुसरा अर्थ सिंह आहे. पार्वतीचे वाहन सिंह असल्याने तिलाही जटिलंधर हे विशेषण लागू पडते. )

प्रणाम माझाच जटाधरासी । आरूढ सिंहावर त्या उमेसी

आभूषणे केतककेवडा ही । जी केशभूषेत सदैव माळी ।।10.1

 

न रोग-मृत्यू भय ज्यांस काही । जयांपुढे नम्र विधी हरीही

उमामहेशा जगपालकासी । प्रणाम त्याची शिव-पार्वतीसी ।।10.2

 

 

नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां

बिल्वच्छदा-मल्लिकदाम-भृद्भ्याम्

शोभावती-शान्तवतीश्वराभ्यां

नमोनमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 11

 

त्रिनेत्रधारी शिव-पार्वतीसी प्रणाम माझा अति आदरेची

वेणी सुगंधी बटमोगर्याची । वेणीवरी पार्वतिच्या रुळे ती ।। 11.1

 

कंठी शिवाच्या बहु बिल्वमाला । असे सदा भूषण त्या शिवाला

शांतवती हीच स्मशानभूमी  । निवास तेथे करि चंद्रमौळी ।। 11.2

 

महेश्वरासीच महास्मशान । काशीपुरी हे प्रिय नित्य जाण

असे अधिष्ठानचि ते शिवाचे । ती अन्नपूर्णाहि तिथे रहाते ।। 11.3

 

 वा थोर साधू वसतीच जेथे । त्या शांत जागाच हिमालयात

तेथेचि कैलासपती रहात । गिरीश गौरी सदनीच शांत ।। 11.4

 

ऐश्वर्य सौंदर्यचि अद्वितीय । कांचीपुरी ती नगरी सुरेख

शोभावती ती प्रिय पार्वतीस । तिचे अधिष्ठान असे तिथेच ।। 11.5

 

शोभावती शांतवतीत ऐशा  । निवास आहे शिव पार्वतीचा

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा । प्रणाम ऐशा शिवपार्वतीला ।। 11.6

 

नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां

जगत्त्रयी-रक्षण-बद्ध-हृद्भ्याम् ।  

समस्तदेवासुरपूजिताभ्यां

                  नमोनमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 12

 

सिंहास नंदीसचि पाळताती प्रणाम त्याची पशुपालकांसी

अज्ञान जे लोक  पशू दुजेची सांभाळती त्यांसहि हे विशेषी ।। 12.1

 

जगत्त्रयाची करि देखभाल प्रेमे अती हेचि दयार्द्रचित्त

प्रेमे जगाचा प्रतिपाळ हाच । उद्देश त्यांचा सहजस्वभाव ।। 12.2

 

 पूजी तयांसी सुर सर्व दैत्य । गंधर्व ते किन्नर आणि यक्ष

उमा-महेशा गिरिजा-गिरीश । प्रणाम त्याची शिवपार्वतीस ।। 12.3

 

स्तोत्रं त्रिसन्ध्यं शिवपार्वतीभ्यां

भक्त्या पठेद् द्वादशकं नरो यः

सर्वसौभाग्यफलानि भुङ्क्ते

शतायुरन्ते शिवलोकमेति ।। 13

 

जो स्तोत्र बोले शिवपार्वतीचे

तिन्ही त्रिकाळी अति भक्तिभावे

तयास दीर्घायु सुभाग्य लाभे

देहान्त होता शिवलोक पावे ।।13


उमा महेशापदि अर्पिले मी सुयोग्य भाषांतर हे मराठी

अरुंधती ही कृतकृत्य होई करून भाषांतर हे मराठी ।।

फलश्रुती आणिक श्लोक बारा एकाहुनी एक रसाळ देखा

येवो पसंतीसचि वाचकांना आनंद लाभो नित वाचताना ।।

----------------------------------------------------------------------

पौष शुद्ध प्रतिपदा,  14  जानेवारी 2021

 

 

 

No comments:

Post a Comment