श्री शंकराचार्य-रचित-श्रीरामस्तोत्रम्
श्री
रामप्रभुंचे सारे जीवन लोकहितासाठीच समर्पित होते. मर्यादापुरुषोत्तम ह्या एका
शब्दाबरोबर डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते ती प्रभु रामचंद्रांचीच! अशा ह्या निर्मळ
प्रभुरामचद्रांच्या जीवनधारेत आपलेही जीवन मिसळून गेले तर तेही पवित्रच नाही का
होणार? रस्त्यावरचा ओहोळ जरी गंगेला मिळाला तरी तो गंगाच बनून जातो तसं आपल जीवनही
प्रभुरामचरणी अर्पण केलं तर पवित्रच होईल ह्यात शंका नाही . जगद्गुरू श्री आद्य
शंकराचार्यांनी प्रभुरामचंद्रांचे केलेले
हे विलोभनीय वर्णन भावानुवाद करतांना प्रसंगानुरूप विस्तृत करण्याचा मोह मलाही
आवरला नाही.
(वृत्त
– भुजंगप्रयात, अक्षरे 12, गण- य य य य)
विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपं । गुणाधारमाधारहीनं वरेण्यम्।
महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं । सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये।।1
(परं- श्रेष्ठ)
असे शुद्ध चारित्र्य आदर्श ज्याचे । असे
पूर्ण जो सच्चिदानंदरूपे
गुणांना प्रतिष्ठा जया आश्रयाने। स्वयंसिद्ध कर्तृत्व ज्याचे विराजे।।1.1
महत्ता जिथे राहते सर्वभावे । जिथे स्तब्ध लावण्य अद्वैतरूपे
जिथे गुह्यही मौन होऊनि राहे। गुणांनाहि लाभेच पूर्णत्व जेथे।।1.2
सुखा सापडे जो किनाराच येथे। असे
मोक्षदायी सदा नाम ज्याचे
जयासी सदा चित्तभावे वरावे। अशा राघवा वंदितो प्रेमभावे।।1.3
शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं । सुखाकारमाकारशून्यं सुमान्यम्।
महेशं कलेशं सुरेशं परेशं । नरेशं निरीशं महीशं प्रपद्ये।।2
( विभु - प्रमुख, योग्य, वीर, आत्मसंयमी, जितेंद्रिय, शासक, सर्वव्यापी, स्वामी
)
हितासी जनांच्या जपे दक्षतेने। करी नित्य कल्याण सार्या प्रजेचे
असे राज्यकर्ता असामान्य स्वामी। असे न्यायनिष्ठूर राजा विरागी।।2.1
तयासारिखा अन्य कोणी नसे रे । जगी राम तो एकची राम आहे
असे मान्य लोकांत सद्वर्तनाने ।
विराजे सदा चित्ति जो प्रेमभावे।।2.2
जणू सौख्य सारेचि आकार घेई । स्वये रामरूपे दिसे लोचनांसी
निराकार जे ब्रह्म ते रामरूपी । तया ‘तारकब्रह्म’ संबोधिताती।।2.3
असे इंद्रियांच्यावरी थोर ताबा। नसे अंत वा पार या राघवाचा
असे शक्तिशाली कलांचाहि स्वामी । जया आदरे देवही वंदिताती।।2.4
असे श्रेष्ठ सम्राट प्रख्यात लोकी। नसे यावरी अन्य सत्ता कुणाची
असे जानकीनाथ जो श्रेष्ठ लोकी । तया वंदितो प्रेमभावे सदा मी।।2.5
यदावर्णयत्कर्णमूलेऽन्तकाले । शिवो राम रामेति रामेति काश्याम्।
तदेकं परं तारकब्रह्मरूपं । भजेऽहं भजेऽहं भजेऽहं भजेऽहम् ।।3
स्वये येउनी आजही चंद्रमौली । महातीर्थक्षेत्रीच काशीपुरीसी
जपे ‘राम श्रीराम श्रीराम’ कानी ।
तपस्वी जनांच्या सदा अंतकाळी।।3.1
अशी थोरवी त्या असे राघवाची । भवाब्धी महा पार नेई करोनी
असे ‘तारकब्रह्म’ जे रामरूपी । तया वंदितो वंदितो वंदितो मी।।3.2
महारत्नपीठे शुभे कल्पमूले । सुखासीनमादित्यकोटिप्रकाशम्।
सदा जानकीलक्ष्मणोपेतमेकं । सदा रामचन्द्रं भजेऽहं भजेऽहम्॥4
सुखे बैसला स्वर्णसिंहासनीही । जया लावले रत्न माणिक्य मोती
धरे सावली मस्तकी कल्पवल्ली । असे मंगला नित्य कल्याणकारी।।4.1
उदेले जणू कोटि भानू नभीचे ।
विलासे असे तेज रामप्रभूचे
सदा सज्ज सौमित्र आज्ञापरा गे। सवे जानकी सावली सारखी गे।।4.2
विलासे मुखी मंद हे हास्य मोहे । अशा राघवा वंदितो वंदितो हे।।4.3
क्वणद्रत्नमञ्जीरपादारविन्दं । लसन्मेखलाचारुपीताम्बराढ्यम्।
महारत्नहारोल्लसत्कौस्तुभाङ्गं । नदच्चञ्चरीमञ्जरीलोलमालम्।।5
( नदत् – गुणगुणणारा. चञ्चरी – भुंगा . लोल – थरथरणार्या, हालणार्या )
सरोजासमा पावली पैंजणे ही। करी गोड हा नाद मोही मनासी
कटी मेखला उज्ज्वला राघवाच्या । जरीकाठ पीतांबरा भूषवी हा ।।5.1
महारत्नमाला सवे कौस्तुभाच्या । रुळे मंजिरी हार कंठी च रम्या
करी भृंग हे त्यावरी गुंजनाला । करी वंदना मी अशा राघवाला।।5.2
लसच्चन्द्रिकास्मेरशोणाधराभं । समुद्यत्पतङ्गेन्दुकोटिप्रकाशम्।
नमद्ब्रह्मरुद्रादिकोटीररत्नस्फुरत्कान्तिनीराजनाराधिताङ्घ्रिम्।।6
( स्मेर – स्मित हास्य करणारा। शोण- रक्त)
नभी चंद्र कोजागिरी पौर्णिमेचा । तसा राम आल्हाददायी असे हा
जणू पाकळ्या ओठ हे रक्तवर्णी। खुले हास्य हे मंद आनंददायी।।6.1
प्रकाशे नभी कोटि चंद्रादि भानू। असा शोभतो राम ज्ञानप्रकाशू
तया कांतिचे तेज हे काय वर्णू । शशी सूर्य कोटी नभी हे प्रकाशू।।6.2
अती आदरे पादपद्मी लवोनी। हरी, रुद्र, ब्रह्मा करी आरतीही
तयांच्या किरीटी असे रत्नमोती। जणू काय नीरांजनीच्याच ज्योती।।6.3
पुरः प्राञ्जलीनाञ्जनेयादिभक्तान् । स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयन्तम्।
भजेऽहं भजेऽहं सदा रामचन्द्रं । त्वदन्यं न मन्ये न मन्ये न मन्ये।।7
उभा मारुती भक्त सुग्रीव आदी । अती आदरे हात जोडून दोन्ही
तयांना करे बोध कल्याणकारी । स्वये राम श्रीराम ब्रह्मस्वरूपी।।7.1
अशा भक्तभोळ्या रघूनायकासी। करी वंदना वंदना वंदना मी
जगी रामराया विना अन्य कोणी । मला मान्य नाही मला मान्य नाही।।7.2
यदा मत्समीपं कृतान्तः समेत्य । प्रचण्डप्रकोपैर्भटैर्भीषयेन्माम् ।
तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपं । सदापत्प्रणाशं सकोदण्डबाणम् ।।8
(आविष्करोषि – प्रकट करणे,व्यक्त करणे,प्रत्यक्ष दृश्यमान । प्रणाश – विनाश,
संपूर्ण उन्मूलन, उच्चाटन)
मला न्यावया मृत्यु तो क्रूर येता । भयाने अती प्राण कंठी च येता
यमाचे महा क्रुद्ध हे दूत जेंव्हा । छळाया मला सज्ज होतील तेंव्हा।।8.1
‘अनिष्टासि संहारुनी तोषवीसी । सदा सेवकांसीच कोदंडधारी’
असे हे तुझे रूप माझ्या समोरी। कसे सांग साकार होई त्वरेनी।।8.2
निजे मानसे मन्दिरे संनिधेहि । प्रसीद प्रसीद प्रभो रामचन्द्र।
ससौमित्रिणा कैकयीनन्दनेन । स्वशक्त्याऽनु भक्त्या च संसेव्यमान।।9
पदी लीन हा कैकयीपुत्र झाला । सदा
सज्ज सौमित्र सेवेसी रामा
तुला पूजिते भक्तिभावेच सीता । तुझी सर्व शक्ती असे जी अनंता ।।9.1
असे हे तुझे रूप राहो च माझ्या । मनोमंदिरी नित्य हे रामचंद्रा
कृपावंत व्हा हो दयाळा कृपाळा । करा आस माझी पुरी रामराया।।9.2
स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महीशैरनीकैरनेकैश्च राम प्रसीद ।
नमस्ते नमोऽस्त्वीश राम प्रसीद । प्रशाधि प्रशाधि प्रकाशं प्रभो माम् ।।10
( अनीक- सैन्य )
तुला वंदिती वानराध्यक्ष थोर । करी भूपतींसी सदा तू सनाथ
किती एक आले तुझ्या आश्रयास । असे नित्य आज्ञेत सेना विशाल।।10.1
अशा रामराया मला हो प्रसन्न । करी बोध; अज्ञान ने दूर दूर
तमातून तेजाकडे सत्वरीच । मला ने मला ने प्रभूराम राय।।10.2
त्वमेवासि दैवं परं मे यदेकं । सुचैतन्यमेतत्त्वदन्यन्न मन्ये
यतोऽभूदमेयं वियद्वायुतेजोजलोर्व्यादिकार्यं चरं चाचरं च।।11
( दैव- दैवत । वियत्- आकाश )
मनी माझिया रे वसे एक राम । प्रभो तूच चैतन्य हे एकमात्र
धरा व्योम पाणी सवे वायु तेज । तयांच्याच कार्या नसे मोजदाद ।11.1
तयांची असे निर्मिती सृष्टि पूर्ण । सजीवांसवे निर्जिवा व्यापितात
धनी तू तयांचा असे अद्वितीय । तुझ्यातून उत्पन्न हे विश्व पूर्ण।।11.2
नमः सच्चिदानन्दरूपाय तस्मै । नमो देवदेवाय रामाय तुभ्यम्
नमो जानकीजीवितेशाय तुभ्यं । नमः पुण्डरीकायताक्षाय तुभ्यम्।।12
नमस्कार माझा परब्रह्मरूपा । नमस्कार तुम्हास देवाधिदेवा
अहो जानकीजीवना वंदनीया । तुम्ही
जानकी जीवनाचीच आशा।।12.1
असे मोहवीती तुझे नेत्र जीवा । फुले पद्म हा भास होतो मनाला
तुम्हा पाहता सौख्य लाभे जिवाला । नमस्ते सदा पुंडरीकाक्ष रामा ।।12.2
नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यं । नमः पुण्यपुञ्जैकलभ्याय तुभ्यम्
नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे । नमः सुन्दरायेन्दिरावल्लभाय।।13
जिथे भेटते भक्ति ही निष्कलंक । जडे जीव तेथे प्रभो रे तुझाच
मिळे पुण्यराशी तुला भेटताच । असे पुण्य गाठी तया भेटतोस।।13.1
तुला जाणण्या वेद हाची उपाय । जगाचे असे आद्य हे तत्त्व तूच
अहो इंदिरावल्लभा रामराया । नमस्कार लावण्यमूर्ती तुम्हाला।।13.2
नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे । नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे
नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे । नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे ।।14
करी विश्व निर्माण तू विश्वकर्ता । करी विश्वसंहार तू विश्वहर्ता
सदा जीवमात्रात तू राहुनीया। जगा भोगिसी तूच हे विश्वभोक्ता
।।14.1
जगा व्यापिले सर्व या तूच रामा । असे विश्व सारे तुझे रूप रामा
करी ठेविले रत्न तैसे तुला बा।
दिसे विश्व सारेचि हे विश्वनेत्रा॥14.2
मला विश्व जाणावया दोन डोळे । असे तूच माझे प्रभो विश्वनेत्रा
तुझ्या सर्व हे विश्व आधीन रामा
। असे तूचि स्वामी जगाचा जगाचा।।14.3
जगा जिंकिले तू असे विश्वजेता । न चाले तुझ्यारे वरी अन्य सत्ता
असे विश्वव्यापी तुझे रूप रामा । पिता तू जगाचा नमस्कार रामा ।।14.4
नमस्ते नमस्ते समस्तप्रपञ्चप्रभोगप्रयोगप्रमाणप्रवीण।
मदीयं मनस्त्वत्पदद्वन्द्वसेवां विधातुं प्रवृत्तं सुचैतन्यसिध्यै।।15
प्रपंचास निर्माण करे तूचि रामा । तया तूचि सांभाळसी रामराया
असे जाणण्या विश्व निष्णात रामा । तया भोगण्या एक तूची समर्था ।।15.1
कराया तुझ्या पावलांचीच सेवा । अती लागली ओढ चित्तास माझ्या
तुझ्या दावुनी चित् स्वरूपा दयाळा । कृपा तू करी राघवा एकवेळा।।15.2
करी वंदना पादपद्मी तुझ्या या । नमस्कार माझा तुला रामराया।।15.3
शिलापि त्वदङ्घ्रिक्षमासङ्गिरेणुप्रसादाद्धि चैतन्यमाधत्त राम
नरस्त्वत्पदद्वन्द्वसेवाविधानात् सुचैतन्यमेतीति किं चित्रमत्र ।।16
तुझ्या पावलांच्या धुळीच्याहि स्पर्शे । शिळेलाहि चैतन्य ते प्राप्त होते
असामान्य ही थोरवी पावलांची । कसे नेइना मानवा चित्-स्वरूपी।।16.1
पवित्रं चरित्रं विचित्रं त्वदीयं । नरा ये स्मरन्त्यन्वहं रामचन्द्र।
भवन्तं भवान्तं भरन्तं भजन्तो । लभन्ते कृतान्तं न पश्यन्त्यतोऽन्ते।। 17
( पवित्र – पुनीत ,पावन, निष्पाप,शुद्ध,। विचित्र-
आश्चर्ययुक्त,रंगिबेरंगी,सुंदर,मनोहर नानाविध बहुआयामी व्यक्तिमत्व । चरित्र -
आत्मकथा,वृत्तांत,कर्तव्य । भर- भार। अन्वहं- रोज)
तुझ्या जीवनाची कथा काय सांगू । तुझ्या सद्गुणांचे किती त्यात पैलू
असे शुद्ध गंगाजलासारखी ती । करे दूर संसारदुःखास वेगी।।17.1
करे पाप भारास ती नष्ट ऐसी । बघावे न लागे यमा अंतकाळी
कथा गातसे रोज ही पुण्यदायी । तया मानवा भेटतो राम अंती।।17.2
स पुण्यः स गण्यः शरण्यो ममाऽयं । नरो वेद यो देवचूडामणिं त्वाम्
सदाकारमेकं चिदानन्दरूपं । मनोवागगम्यं परं धाम राम ।।18
असे अग्रगण्यीच देवादिकांच्या । असे तूच चूडामणी देवतांचा
विसावा असे एक हा राम माझा । मला आश्रयाला असे राम माझा।।18.1
निवारा असे राम हा पूर्ण माझा । मनी संशयाला जराही न जागा
असा बोध ज्या जीवमात्रास झाला । असे वंदनीयाच तो पुण्यआत्मा।।18.2
जिथे थांबते कल्पनेची भरारी । जिथे होतसे मौन वाचा विचारी
असे सत्स्वरूपी तुझे रूप रामा । असे ब्रह्म हेची तुझे रूप रामा।।18.3
जिथे भेटतो जीव हा त्या शिवाला । असे धाम ते तूच रे रामराया
तुला वंदितो वंदितो रामराया । तुझ्यावीण नाही मला कोणि रामा।।18.4
प्रचण्डप्रतापप्रभावाभिभूतप्रभूतारिवीर प्रभो रामचन्द्र।
बलं ते कथं वर्ण्यतेऽतीव बाल्ये । यतोऽखण्डि चण्डीशकोदण्डदण्डः ।।19
तुझा ओज सामर्थ्य उत्तुंग रामा। खडे चारिले शत्रू सैन्यास तू बा
धराशायि केले किती शत्रु वीरा । तुझ्या साहसाला नभाचा किनारा।।19.1
अती कोवळा बाळ होता तरीही । किती आत्मविश्वास होताच चित्ती
शिवाच्या अती भव्य त्या रे धनूसी ।
अती लीलया पेलले तूच हाती।।19.2
तया वाकवी बांधण्या त्यास दोरी । सभा श्वास रोधूनिया स्तब्ध झाली
क्षणी भंगले; पांगले खंड खंड । धनुर्वेद झाला जणू पायी नम्र।।19.3
तुझी गावया शौर्यगाथाच रामा । नसे शब्द कोशात ही शब्द माझ्या
थिटे शब्द माझे तुला वर्णितांना। नमस्कार माझा तुझ्या पायी रामा।।19.4
प्रतापा नसे सान वा थोर भेद । गिरीच्या शिरी स्पर्शितो बालसूर्य
भरे आसमंती फुलाचा सुवास । तया का कुणी थोपवू ते शकेल? ।।19.5
दशग्रीवमुग्रं सपुत्रं समित्रं । सरिद्दुर्गमध्यस्थरक्षोगणेशम्।
भवन्तं विना रामवीरो नरो वाऽसुरो वाऽमरो वा जयेत्कस्रिलोक्याम् ।।20
‘मुखे ज्या दहा’ मारि त्या रावणाला । सवे पुत्र मित्रादि गेले लयाला
अती क्रूरकर्मा जरी दैत्यराजा । त्रिखंडात होता तयाचाच डंका।।20.1
तया दाविला तू तुझा धाक ऐसा । मिळाला धुळीलाच उद्दाम मोठा
तुझ्यावीण हे शौर्य अंगी कुणाच्या । वधे शत्रुसी राजधानीत त्याच्या।।20.2
जरी राज्य त्याचे समुद्रात होते । चहू बाजुनी वेढलेले जलाने
नसे दैत्य वा मर्त्य वा देव कोणी
। तुझ्या सारखा वीर नाही त्रिलोकी।।20.3
झळाळे यशाची पताका च ऐसी । तिन्ही लोक श्रीराम श्रीराम गाई
असे धन्य रे धन्य तू रामराया । तुला वंदितो वंदितो पूर्णरूपा।।20.4
सदा राम रामेति नामामृतं ते । सदा राममानन्दनिष्यन्दकन्दम् ।
पिबन्तं नमन्तं सुदन्तं हसन्तं । हनुमन्तमन्तर्भजे तं नितान्तम्।।21
( नितांत अत्यंत, अतिशय । सुदन्त – तीक्ष्ण बाण असलेला, सुंदर दात असलेला.)
भरे पूर्ण आनंद या रामनामी । जणू अमृताचाच वर्षाव होई
अशा रामनामात तल्लीन होई । तुझा
भक्त तो श्रेष्ठ रे मारुती ही।।21.1
मुखाने म्हणे राम श्रीराम राम । उरे
रामरूपी पहा अंजनेय
हसे तो स्वतशी बघे रामरूप । करे वंदना त्या विरे देहभाव।।21.2
कळ्या शुभ्र ऐसे दिसे दात त्याचे । मुखी रामनामास उच्चारता गे
विलासे मुखी हास्य ते तृप्ततेचे । पदी लीन झालाच रामा तुझ्या रे।।21.3
असे बाण ज्याचे अती तीक्ष्ण मोठे। असा मारुती चित्ति माझ्या असो रे
अती आदरे नित्यची भक्तिभावे । करी पूजना मी तयाचीच प्रेमे।।21.4
सदा राम रामेति नामामृतं ते । सदा राममानन्दनिष्यन्दकन्दम् ।
पिबन्नन्वहं नन्वहं नैव मृत्योर्बिभेमि प्रसादादसादात्तवैव।।22
( अन्वहं – प्रतिदिन । निस्यं – थेंब थेंब गळणे, टपकणे, झिरपणे )
जयातून आनंद ओसंडतो हा। असे अमृताचाच ज्याच्यात साठा
सदा आळवीतो अशा गोड नामा। तुझ्या राम श्रीराम श्रीराम ऐशा ।।22.1
पळे दूर भीती तुझे नाम घेता । मला ना मनी मृत्युची भीति आता
तुझे घेतसे नाम मी रोज रामा । विसंबे न आता तुझे नाम घेता ।।22.2
असीतासमेतैरकोदण्डभूपैरसौमित्रिवन्द्यैरचण्डप्रतापैः।
अलङ्केशकालैरसुग्रीवमित्रैररामाभिधेयैरलं दैवतैर्नः।।23
जयाच्या सवे नित्य नाहीच सीता । नसे हाति ‘कोदंड’ ज्या भूपतीच्या
नसे कीर्तिशाली नसे शौर्य मोठे । नसे साथ द्याया च सौमित्र संगे।।23.1
नसे काळ जो रावणाचाच मोठा । नसे सुग्रिवासारखा मित्र ज्याला
नसे राम संज्ञेस जो पात्र कोणी । नसे देव तो माझिया लेखि कोणी ।।23.2
अवीरासनस्थैरचिन्मुद्रिकाढ्यैरभक्ताञ्जनेयादितत्त्वप्रकाशैः।
अमन्दारमूलैरमन्दारमालैररामाभिधेयैरलं दैवतैर्नः।।24
नसे स्थीर वीरासनी वीर जोची । धरेनाचि जो ज्ञानमुद्रा विरागी
प्रकाशात तत्त्वामृताच्याच न्हाले। नसे मारुतीच्या समा भक्त ज्याचे।।24.1
धरे ना शिरी सावली कल्पवल्ली । नसे पुष्पमाला जयाचीच कंठी
नसे राम संज्ञेस जो पात्र कोणी । नसे देव तो माझिया लेखि कोणी ।।24.2
असिन्धुप्रकोपैरवन्द्यप्रतापैरबन्धुप्रयाणैरमन्दस्मिताढ्यैः ।
अदण्डप्रवासैरखण्डप्रबोधैररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ।।25
( अभिधेय – नाम )
दिली साथ त्या दुष्ट लंकापतीसी। तरीही न हो क्रुद्ध सिंधूवरीही
न बांधे तया सेतुने देव जोची । तया देव ऐसे कधी मी न मानी।।25.1
बघोनी प्रतापा जनासी न वाटे । पदी नम्र व्हावेच ह्याच्याच मी रे
नसे राम हे नामची युक्त ज्यासी । तयाला मनी माझिया स्थान नाही।।25.2
सदा लक्ष्मणाची नसे साथ ज्यासी । मना मोहवी ते नसे हास्य ओठी
नसे राम संज्ञेस जो पात्र कोणी । नसे देव तो माझिया लेखि कोणी ।।25.3
कधी दंडकारण्य जो हिंडला ना । नसे हाति ‘कोदंड’ शत्रू वधाया
नको देव ऐसेच कोट्यानुकोटी । नसे राम हे नामची सार्थ ज्यासी ।।25.4
करेना कधी योग्य तो बोध भक्ता । न देईच भक्ता कधी ब्रह्मज्ञाना
अशा देवता देव मी जाणितो ना । न रामाहुनी अन्य चित्तीच माझ्या।।25.5
हरे राम सीतापते रावणारे । खरारे मुरारेऽसुरारे परेति ।
लपन्तं नयन्तं सदा कालमेवं । समालोकयालोकयाशेषबन्धो ।।26
रणी रावणा दुष्ट त्या मारिले तू । हरे राघवा जानकी नायका तू
खरासीच तू मारिले राघवा रे । मुरासीच त्या दुष्ट संहारिले रे ।।26.1
रघूनायका आठवितो तुझे हे । सदा श्रेष्ठची रूप माझ्या मनी रे
प्रभो कंठितो काळ हा सर्व मी रे ।
मुखी नाम माझ्या तुझे रे तुझे रे ।।26.2
असे श्रेष्ठ तू ; दैत्य संहार केला । पहा रे पहा तू मला रामराया
कृपादृष्टि लाभो मला एकवेळा । असे विश्वबंधू तुझी ख्याती लोकां।।26.3
नमस्ते सुमित्रासुपुत्राभिवन्द्य ।
नमस्ते सदा कैकयीनन्दनेड्य।
नमस्ते सदा वानराधीशवन्द्य। नमस्ते नमस्ते सदा रामचन्द्र ।।27
असे नम्र सौमित्र पायीच ज्याच्या । नमस्कार माझा तया राघवाला
सदा कैकयीपुत्र गाई प्रशंसा । नमस्कार माझा तया राघवाला।।27.1
करी वंदना वानराध्यक्ष ज्याला । नमस्कार माझा तया राघवाला
नमस्ते नमस्ते प्रभो रामचंद्रा । नमस्ते नमस्ते सदा रामचंद्रा ।।27.2
प्रसीद प्रसीद प्रचण्डप्रताप । प्रसीद प्रसीद प्रचण्डारिकाल
प्रसीद प्रसीद प्रपन्नानुकम्पिन् । प्रसीद प्रसीद प्रभो रामचन्द्र ।।28
( प्रपन्न – शरण आलेला, प्रार्थी, दीन, याचक )
प्रतापी महा राघवा रामचंद्रा । प्रसन्न प्रभो व्हा प्रसन्न प्रभो व्हा
‘महाकाळ’ ज्याची अनिर्बंध सत्ता । असे तोच तुम्ही प्रसन्न प्रभो व्हा।।28.1
कुणी गांजला भक्त पायीच येता । तयाला तुम्ही आसरा हो दयाळा
तुम्ही दीनबंधू कृपासागरा या । करी
याचना मी प्रसन्न प्रभो व्हा।।28.2
भुजङ्गप्रयातं परं वेदसारं । मुदा रामचन्द्रस्य भक्त्या च नित्यम् ।
पठन् सन्ततं चिन्तयन् स्वान्तरङ्गे । स एव स्वयं रामचन्द्र स धन्यः।।29
स्तुती राघवाची भुजंगप्रयाती। असे सार वेदातले पूर्णरूपी
धरोनी हृदि प्रेम त्या राघवाचे । म्हणे भक्तिने स्तोत्र रामप्रभूचे ।।29.1
निदिध्यास ज्या राघवाचाच चित्ती । जया लागला नित्य तो पुण्यदायी
असे धन्य तो जीवनी रामभक्त । नसे रामरायाहुनी तो विभक्त ।।29.2
--------------------
चैत्र शुद्ध प्रतिपदा 1933 खर नाम संवत्सर / एप्रिल 2011