।। भगवन्मानसपूजा ।।
(वृत्त – शिखरिणी, अक्षरे- 17, गण – य म न स भ ल ग, यति- 6,11 )
हृदम्भोजे कृष्णः सजल-जलद-श्यामलतनुः
सरोजाक्षः स्रग्वी मुकुटकटकाद्याभरणवान् ।
शरद्राकानाथप्रतिमवदनः श्रीमुरलिकां
वहन् ध्येयो गोपीगणपरिवृतः कुङ्कुमचितः ।। 1 ।।
( कटक – मेखला, हातातील कडी, कंकण आदि ; राका – पौर्णिमेची रात्र ; चित – संचित किंवा कशाने तरी झाकलेला, येथे कुङ्कुमचितः - कुंकुमादि
उटीचा लेप लावलेला )
नभातूनी खाली सजल उतरावा घन निळा
करोनी वर्षावा भिजवि धरणी चिंब सकला
तसा यावा माझ्या हृदयकमळी श्यामल सखा
कृपावर्षावे तो हरि नित करो चिंब मजला ।। 1.1
( सरोजाक्ष – कमळाप्रमाणे डोळे असलेला. स्रग्वी
– माळ. ध्येयो – ध्यान करावे )
कळेना ही जादू कमल नयनांचीच हरिच्या
गमे माझ्या चित्ता कमल कलिका ह्या उमलल्या
।
रुळे कृष्णाकंठी वन-कुसुम-माला सुबकशी
सुवर्णा-रत्नांचा मुकुट झळके हा हरि-शिरी ।। 1.2
अलंकारे शोभे हरि-तनुच ही श्यामल कशी
तया बाजूबंदे कनकमय ते कंकण करी
मुकुंदाची मूर्ती हृदय मम मोहीच सुखवी
सदा दे आह्लादा शरद-पुनवेचा जणु शशी ।। 1.3
हरी अंगी शोभे परिमलयुता केशर-उटी
विसावे ओठी जी मधुर मुरली कृष्ण करिची
हृदीचे कृष्णाच्या गुज मधुर गाते मधुर का?
सभोती गोपी ह्या हरिमयचि झाल्याच अवघ्या ।। 1.4
असो हृत्कोशी ही हरि-छवि सुरम्या सुखदशी
प्रभो प्रेमे केले हृदयकमळी स्थापित तुशी
हरी मुर्तीचे ह्या बहु करितसे चिंतन हृदी
असो चित्ती माझ्या हरि हरि हरी नित्यचि हरी
।। 1.5 ।।
पयोऽम्भोधेर्द्वीपान्मम हृदयमायाहि भगवन्
मणिव्रातभ्राजत्कनकवर-पीठं भज हरे ।
सुचिह्नौ ते पादौ यदुकुलज नेनेज्मि सुजलैः
गृहाणेदं दूर्वाफलजलवदर्घ्यं मुररिपो ।। 2 ।।
( पयोम्भोधि – क्षीर सागर , द्वीप - बेट )
प्रभो क्षीराब्धी तो त्यजुनि तिथले द्वीप तुमचे
करावे वास्तव्या मम हृदय-पद्मातचि सुखे ।
तिथे आरूढावे मम हृदय-सिंहासनि सुखे
सुवर्णा-रत्नांनी जरि मढविले ते मृदु असे ।। 2.1
सुचिह्नांची दाटी चरणयुगुली कोमल तुझ्या
ध्वजा पद्मा वज्रासह दिसतसे अंकुश मला
तुझी प्रक्षाळी मी चरणकमळे निर्मळ जळे
दिले अर्घ्यासी मी सुमन फल दूर्वायुत जले ।। 2.2
मनोभावे देई तुजसि जल-अर्घ्या यदुवरा
मुरारे स्वीकारा विनति मम पायीच तुमच्या ।। 2.3।।
त्वमाचामोपेन्द्र त्रिदशसरिदम्भोऽतिशिशिरं
भजस्वेमं पञ्चामृतफलरसाप्लावमघहन्
द्युनद्याः कालिन्द्या अपि कनककुम्भस्थितमिदं
जलं तेन स्नानं कुरु कुरु कुरुष्वाचमनकम् ।। 3 ।।
(अघहा किवा अघहन् – अघासुराला मारणारा. किंवा अघ म्हणजे पाप. पापाचा
नाश करणारा. उपेन्द्र – इंद्राचा धाकटा भाऊ. त्रिदशसरित् – स्वर्गातील नदी म्हणजेच गंगा. द्यु – स्वर्ग, द्युनदी –स्वर्गातील नदी. )
बळीला जिंकीले बनुनि बटु तो वामन तुम्ही
दिले देवा सारे गत विभव त्यांचे मिळवुनी
तयासाठी जन्मे जननि अदितीच्या कुशित जो
असे देवेन्द्राचा अनुजचि महावीरवर तो ।। 3.1
(अदिती मातेच्या पोटची मुले इंद्र आणि बटु वामन. देवेंद्राचा /इंद्राचा
अनुज म्हणजे धाकटा भाऊ म्हणुन विष्णुला उपेन्द्र असे नाव मिळाले.)
मनाने आणीले स्फटिकसम गंगाजलचि मी
उपेंद्रा स्वीकारा अमल विमला शीतल अती
प्रभो अर्पीयेले तुजसि करण्या आचमन बा
तुझ्या स्नानासाठी फलरस नि पंचामृत सुधा ।। 3.2
महा पापांचे तू सकल करिसी पर्वत दुरी
अघादैत्याला तू वधुन करि भूमी सुखमयी
प्रभो कालिंदिचे जल तुजसि अत्यंत प्रिय जे
इथे आणिले मी कनक कलशाते भरुन हे ।। 3.3
प्रसन्ना चित्ताने हरि प्रियतमा स्नान करि
रे
करावे श्रीकृष्णा सुविमल जले आचमन हे ।। 3.4 ।।
तडिद्वर्णे वस्त्रे भज विजय कान्ताधिहरणे
प्रलम्बारिभ्रातर्मृदुलमुपवीतं कुरु गले ।
ललाटे पाटीरं मृगमदयुतं धारय हरे
गृहाणेदं माल्यं शतदल-तुलस्यादिरचितम् ।। 4 ।।
(तडित् – वीज, कान्ताधिहरणः – रुक्मिणीचे
हरण करणारा ; विजय-कान्ता-अधि हरणः – विजय म्हणजे अर्जुन. अर्जुनाची कान्ता म्हणजे पत्नी ती द्रौपदी. तिचे दुःख हरण करणारा तो कृष्ण. विजय – सदा विजयी असलेला कृष्ण ; पाटीरः - चंदन)
जशी मेघामध्ये तळपत असे वीज धवला
तसा शेला खांद्यावर तुजसि घे उज्ज्वल पहा
कटी शोभे ऐसा झुळझुळित पीतांबर महा
मुकुंदा सप्रेमे तुजसि दिधला मी प्रभुवरा ।। 4.1
सदा कृष्णेपाठी अविचल उभा राहुन तिला
दिलासा देई तू मदत करुनी संकटि तिला
हृदीच्या प्रेमासी प्रकट करता जीवनसखी
तिला स्वीकारीसी हरण करुनी रुक्मिणिपती ।। 4.2
(कृष्णा – द्रौपदी, जीवनसखी – रुक्मणी, )
करी दुष्टांचे तू प्रभु सतत निर्दाळण भुवी
अधर्मी राज्यांसी बुडवुन करी धर्म विजयी ।
तुझा मोठा भाऊ हलधर प्रलंबासुर वधे
तुझ्या संकल्पासी बघुन विजयश्री तुज वरे ।। 4.3
तुला अर्पितो मी मृदु मृदुल यज्ञोपवित बा
करावे तुम्ही हो नउ पदर ते धारण गळा
उटी कस्तूरीची अति सुखद ही चंदनयुता
हरी लावा भाळी सुखद अति ही शीतल पहा ।। 4.4
मुकुंदा वेचोनी टवटवित ताजीच सुमने
खुडोनी ताजी ही शतदलचि उत्फुल्ल कमळे
करोनी गोळा ह्या तरुण तुलसी मंजिरियुता
असे केली माला करिच सखया धारण गळा ।। 4.5
दशाङ्गं धूपं सद्वरद चरणाग्रेऽर्पितमिदं
मुखं दीपेनेन्दुप्रभ-विरजसं देव कलये।
इमौ पाणी वाणीपतिनुत सकर्पूररजसा
विशोध्याग्रे दत्तं सलिलमिदमाचाम नृहरे ।। 5
( सद्वरदः - उत्तम वर देणारा वाणीपति – बृहस्पती. वाणीपतिनुत – बृहस्पतीने नमस्कार केलेला. पाणी – हात. )
सुगंधी द्रव्यांसी मिसळुनि प्रमाणात दशही
दशांगी धूपासी सुखद-वरदा अर्पि चरणी
असे श्रेयस्कारी जनहितचि साधेल नितची
असा देता तुम्ही वर सुलभतेने हितकरी ।। 5.1
सुखे ओवाळीतो धरुन करि नीरांजन तुला
तुझे चंद्राऐसे मुख उजळलेलेच बघण्या
सुखावे नेत्रांसी सुखमय नभोदीपचि शशी
तसे कृष्णाचे हो मुख उजळले हे सुखमयी ।। 5.2
ठसो माझ्या चित्ती तव मधुर हे रूप सखया
करी पायी ब्रह्मा सुरगुरुच वागीश नमना
सुगंधी कर्पूरे परिमलयुता पावन जले
धुवोनी हातांसी हरि करि करी आचमन रे ।। 5.3
सदातृप्तान्नं षड्रसवदखिलव्यञ्जनयुतं
सुवर्णामत्रे गोघृतचषकयुक्ते स्थितमिदम् ।
यशोदासूनो ! तत्परमदययाऽशान सखिभिः
प्रसादं वाञ्छाद्भिः सह तदनु नीरं पिब प्रभो
।। 6 ।।
( अमत्रम् – पात्र, वाटी)
सदा तृप्ता कृष्णा जरि असशि संतुष्ट मनसी
तरीही अर्पीतो अति रुचिर नैवेद्य तुजसी
कढी कोशिंबीरी रुचकरचि भाज्याच विविधा
स्वहस्ते रांधोनि तुजसि दिधल्या षड्रसयुता
।। 6.1
सुवर्णाच्या ताटी सजवुन पदार्थांस सगळ्या
तुपाची वाटी ही भरुन तुज देतो प्रभुवरा
असे गोदुग्धाचे खरपुसचि हे साजुक तुप
सुगंधी वाळ्याचे पिऊन बघ हे शीतल जल ।। 6.2
प्रसादाची इच्छा धरतिच सखे बालपणिचे
सुदामा श्रीदामा जिवलगचि पेंद्या सकल हे
तयांसी सांगाती मुरलिधर ये घेउन इथे
पदार्थांचा घ्यावा सुहृदसह आस्वादचि इथे ।। 6.3
सचूर्णं ताम्बूलं मुखशुचिकरं भक्षय हरे !
फलं स्वादु प्रीत्या परिमलवदास्वादय चिरम्
।
सपर्यापर्याप्त्यै कनकमणिजातं स्थितमिदं
प्रदीपैरारार्तिं जलधितनयाश्लिष्ट रचये ।। 7 ।।
फळे ताजी ताजी बहु गर रसानेच भरली
बघा चाखोनी ही मधु मधुर स्वादिष्ट सगळी
फळांचा घ्यावा हो हळु हळुच आस्वाद सखया
हरी घ्या तांबूला त्रयदशगुणी सात्विक अशा ।।7.1
सुगंधी द्रव्ये जी करिति मुखशुद्धी पचनही
तयांचा बांधीला अति सुबक तांबूलच गुणी
समाप्ती पूजेची हरि करितसे अर्पुन तुला
सुवर्णा रत्नांचे बहुविध अलंकार सखया ।। 7.2
तुला आलिंगे ही कमलनयना सागरसुता
असे ऐश्वर्याचे प्रतिकचि गुणांचेच तुझिया
अहो लक्ष्मीकांता शत शतचि ज्योती उजळुनी
तुला ओवाळीतो अति शुभ दिवे मंगलमयी ।। 7.3
विजातीयैः पुष्पैरतिसुरभिभिर्बिल्वतुलसी-
युतैश्चेमं पुष्पाञ्जलिमजित ते मूर्ध्नि
निदधे ।
तव प्रादक्षिण्यक्रमणमघविध्वंसि रचितं
चतुर्वारं विष्णो ! जनि-पथ-गतेश्चान्तविदुषा ।। 8 ।।
तुला जिंकायासी जगति नच सामर्थ्यचि कुणा
जगाच्या सम्राटा ! अजित म्हणती हे जग तुला
सुगंधी पुष्पे ही तुळस दवणा बेल मरवा
अशी वाहे पुष्पांजलि तव शिरी हेचि अजिता ।। 8.1
अहो संसारी ह्या भ्रमण करिता दुःख नशिबा
असे जाणोनी मी तुजभवति घाली परिक्रमा
लया जाती पापे पद पद पुढे चाल चलता
तुला मी चौवेळा हरि करितसे रे परिक्रमा ।। 8.2
प्रभो स्वीकारोनी सकल मम पूजा विधिवता
अहो संसाराच्या अथक चल चक्रातुन महा
करावे पूर्णत्वे यदुवर सदा मुक्त मजला
तुझ्या पायी कृष्णा विनति मम ही एक सखया ।।8.3 ।।
नमस्कारोऽष्टाङ्गः सकलदुरितध्वंसनपटुः
कृतं नृत्यं गीतं स्तुतिरपि रमाकान्त त इयम्
।
तव प्रीत्यै भुयादहमपि च दासस्तव विभो
कृतं छिद्रं पूर्णं कुरु कुरु नमस्तेऽस्तु
भगवन् ।। 9 ।।
मुकुंदा घाली मी चरणि तव साष्टांग नमना
हराया पापांसी तुजसमचि निष्णात कुणि ना
कला सार्या माझ्या तुज पुढति मी सादर करी
करोनी नृत्यासी स्तुतिस तव गाईन गजरी ।। 9.1
प्रभो स्वीकारीले तव चरण दास्यत्व सुख हे
कृपासिंधो दासावर नित कृपा सर्व असु दे
मनी कल्पूनी मी हरि-चरण पूजाच करिता
रमाकांता होवो तव हृदयी संतोष पुरता ।। 9.2
उणे राहे जे जे हरि करुन घ्या पूर्णचि तया
घडो माझी पूजा नित सफळ संपूर्ण सुखदा
पुन्हा भक्तीभावे नमन करितो मीचि तुजला
नमस्ते श्रीकृष्णा हरि हरि नमस्ते तुज पुन्हा
।। 9.3
सदा सेव्यः कृष्णः सजलघननीलः करतले
दधानो दध्यन्नं तदनु नवनीतं मुरलिकाम् ।
कदाचित्कान्तानां कुचकलशपत्रालिरचना-
समासक्तःस्निग्धैः सह शिशुविहारं विरचयन् ।। 10 ।।
(सेव्- सेवा करणे, सन्मान करणे, पूजा करणे, प्रेम करणे, आश्रय घेणे, अभ्यासकिंवा अनुष्ठान करणे, अनुसरण
करणे, त्याच्या जवळ जाणे)
करी गोपालाच्या मधुर मुरली शोभुन दिसे
दुजा हाती लोणी, रुचकर दहीभातचि असे
मुखी गोपाळांच्या मुरलिधर तो घास भरवी
अशा गोविंदाचा अविरत असो ध्यास हृदयी ।। 10.1
नभी ओथंबूनी घन भरुन यावा सुखदसा
तशा मेघश्यामा हृदि धरुन ठेवी नित मना
कधी कालिंदिच्या तटि विहरतो श्यामल हरी
तिथे खेळे मित्रांसह विविध ते खेळ नितची ।। 10.2
हरिप्रेमे होता हरिमयची सार्या गवळणी
हृदी त्यांच्या रेखे सकल हरिलीला पुनरपी
मुकुंदाची त्या रे छबि मधुर रेखीच हृदयी
तया विश्वेशाला अनुसर मना तू सततची ।। 10.3
मणिकर्णीच्छया जातमिदं मानसपूजनं ।
यः कुर्वीतोषसि प्राज्ञस्तस्य कृष्णः प्रसीदति
।। 11
इच्छेने मणिकर्णीच्या । कृष्ण मानसपूजन
लिहून पूर्ण झालेची । स्तोत्र हे मनभावन ।। 11.1
प्रभातीस करे जोची । हृदी मानसपूजन
प्रसन्न राहतो त्यासी । कृष्ण तो मधुसूदन ।। 11.2 ।।
अरुंधती मराठीत । सांगे भावार्थ सुंदर
स्तोत्रार्थ कळता भक्ता । आनंदा पूर येइल ।।
-------------------------------------------------------
चैत्र कृष्ण वरुथिनी एकादशी 18 एप्रिल 2020
वा!!वा!! खूपच सुंदर अनुवाद!!!!
ReplyDeleteखरंच वाचून आनंदाला पूर आला.
धन्यवाद !!!
खूप सुंदर स्तोत्राची ओळख सुंदर काव्यानुवादातून करून दिलीस... धन्यवाद अरुंधती
ReplyDeleteExcellent article. Felt spiritually at an elevated platform
ReplyDelete