मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायु-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥1
मनाहून आहे
सदा वेगळा मी । नसे चित्त मी वा न बुद्धी कधीही
मना-बुद्धिला
चालना जेच देई । असे विश्वव्यापीच चैतन्य ते मी॥ 1.1
अहंता ममत्वासवे जोचि नांदे । वसे नित्य जो दंभ
अज्ञानसंगे
नसे मी अहंकार
ना दंभ तोची । असे जोचि जीवा महाक्लेशकारी॥ 1.2
नसे श्रोत्र
मी वा नसे नेत्र दोन्ही । नसे नासिका मी न जिह्वा कधीही
न पृथ्वी
न वायू न आकाश पाणी । न मी तेज वा पंचभूतेच कोणी॥ 1.3
कळे इंद्रियांसी
न अस्तित्त्व माझे । मुनींच्याच बुद्धीमधे मी प्रकाशे
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 1.3
(जे चिंतन
मनन करतात, ज्यांना आत्म प्रचिती आली आहे त्यांना मुनी म्हणतात)
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्
न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोष: ।
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।।2
( प्राण- प्राणवायू अथवा प्राण, अपान, व्यान,
उदान आणि समान हे पंचप्राण ; सप्तधातु - रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा
आणि शुक्र (शरीराची धारणा करतात ते धातु)
; पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ( आत्म्याला झाकतात म्हणून
त्यांना कोष म्हणतात.) ; पाच कर्मेंद्रिये
- हात, पाय,
तोंड गुद आणि उपस्थ (उपस्थ- जननेंद्रिये )
नसे प्राण
वा मी नसे पंच वायू । नसे कोष पाची न वा सप्त धातू
नसे हात,पायादि
कर्मेंद्रिये मी । न जिह्वा न वाचा न वाणीस्वरूपी॥ 2.1
कळेना कधी
मीच बाह्येंद्रियांसी । हृदी प्रत्यया येतसे बुद्धिने मी
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 2.2
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥3
नसे द्वेष
आसक्ति वा लोभ काही । न स्पर्शे मला गर्व वा मत्सरादि
मला आस ना
धर्म वा अर्थ याची । नसे अंतरी काम नाना विकारी ॥ 3.1
नको मोक्ष-मुक्ती
अपेक्षा न त्याची । असे मुक्त मी मोक्षबंधातुनीही
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 3.2
(धर्म, अर्थ,
काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांच्या बंधनातून आत्मा हा मुक्त असतो. तो आत्मा हे
माझे खरे स्वरूप आहे.)
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥4
मला कोठले
पाप वा पुण्य आता । मला सौख्य वा दुःख हे वेगळे ना
असे मन्त्रशक्तीच
मी सर्व थोर । मला मंत्र आता कशाला हवेत ॥ 4.1
पवित्रास
या तीर्थयात्रा कशास । समाविष्ट तीर्थेच माझ्यात
देख
मला व्यापकाला
न जाणेचि वेद । नसे वेद मी चारही ते समस्त।।
4.2
नसे यज्ञ
वा यज्ञकर्ताच मीची । न यज्ञातुनी जी फळे प्राप्त होती
नसे अन्न
मी वा न भोक्ता तयाचा । नसे वस्तु ती भोग ज्याचाच घ्यावा ॥ 4.3
घडाया क्रिया
प्रेरणा एक मीची । जसा सूर्य साक्षी समस्ता क्रियांसी
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 4.4
न मे मृत्युशङ्का
न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥ 5
नसे जन्म
त्या मृत्युची काय भीती । असे शुद्ध मी त्या मला जात नाही
पिता कोठला
माय ही ना कुणीही । न जन्मे तया संभवे नाचि नाती ॥5.1
नसे आप्त
कोणी न भाऊ बहीणी । गुरू ना मला शिष्यही ना कुणीही
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 5.2
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥6
नसे कोणता
भेद माझ्या ठिकाणी । असे मीच भेदाचिया पार जाणी
भरोनी सदा
सर्व विश्वात राहे । मला विश्वरूपास आकार नोहे॥
जगी चालते
सर्व सत्ताच माझी । सदा सर्व स्वाधीन ही इंद्रियेही
सदा प्रत्यया
एकरूपात ये मी । मला बंधने मुक्ति ना लागु होती॥
असे शुद्ध
चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥
----------------------------------------
शके 1937 मन्मथ नाम संवत्सरे अश्विन कृ. नवमी. 4 नोव्हेंबर 2015
अतिशय चपखल व गेय मराठी स्तोत्र अनुवाद !
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete