#महागणेशपञ्चरत्न-स्तोत्रम्
जगद्गुरू
श्री आद्य शंकराचार्यांनी केलेले हे गणपति स्तोत्र अतिशय मधुर आहे. पंचचामर वृत्तात
असलेली ही रचना लयबद्ध, यमक, अनुप्रास अशा विविध अलंकारांनी नटलेली आहे.
जगद्गुरू
शंकराचार्यांनी केलेलं बाल गणशाचं वर्णन मोठं लोभस आहे. अत्यंत प्रसन्न रूप! माथ्यावर
अलंकारस्वरूप कमनीय चंद्रकोर शोभत आहे. सिंदुर
नावाच्या राक्षसाला ठार मारून लोकांना त्याच्या अत्याचारांमधून मुक्त केलं आहे. ज्या लोकांचा कोणी रक्षणकर्ताच नव्हता त्या लोकांचा तो
स्वतः रक्षक झाला आहे. अत्यंत
भक्तवत्सल अशा ह्या गजाननाने एका हातात मोदक धरला आहे. ज्ञानदेव ह्या मोदकाचं वर्णन करतांना म्हणतात की गणेशाच्या
हातात वेदांत रूपी मोदक आहे. जो आनंद , मोद निर्माण करतो तो मोदक. गणेशाच्या हातातील वेदांतरूपी मोदक त्याच्या भक्तांना कायम
मोक्षाचा आनंद मिळवून देतो.
( वृत्त – पंचचामर, अक्षरे 16, गण
- ज र ज र ज ग )
मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ।। 1
करी धरून मोदयुक्त मोदका महोदरा
सदैव साधकांस मोक्ष देतसे विनायका
शिरावरी तुझ्या सुरेख चंद्रकोर शीतला
सदैव दक्ष रक्षणास भक्ति-रंगि रंगता ।। 1.1 ।।
वधून दैत्य सिंदुरा अनाथनाथ जाहला
करे तुझी स्तुतीच जो अपाप होई सर्वथा
असेचि सज्ज रक्षणा सदैव भक्तवत्सला
अशा विनायकास मी करे प्रणाम सर्वदा ।। 1.2 ।।
सूर्योदयासमयी सूर्याचे रूप जसे आह्लादक असते तसा हा बाल गजानन भक्तांचे मन मोहून
घेतो. सूर्य अंधाराचा नाश करतो तसा गणेश दैत्यांचा नाश करून सर्व धरा जणु
आनंदकिरणांनी उजळून टाकतो.
दुष्टांना भयद तर सज्जनांना आश्वासक वाटणार्या गणेशाच्या चरणी विनम्र अभिवादन !
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं
नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ।। 2 ।।
सतेज
बालसूर्य अंधकार नाशितो जसा
तसा
तुझा असेचि धाक मत्त दुर्जना सदा
जशीच
कोवळी उन्हे प्रसन्न कांचनी अहा
तसेच रूप हे तुझे मनास मोहवी मला ।। 2.1 ।।
करीति
त्रस्त देवदेवतांस दैत्य जे महा
तयांस
दंडितोचि जो करून दूर संकटा
उपाधि
त्यास लाभते गणेश वा महेश ही
सुरेश्वरा, निधीश्वरा तयास लोक बोलती ।। 2.2 ।।
तयाहुनीच
श्रेष्ठ तू असे महेशनंदना
तुझेच
पाय वंदिताति देववृंद नित्यशा
उमा-महेश-बाळ
तूचि सूक्ष्मज्ञान दे जना
तुझ्याच
आश्रयास मीच येतसे गजानना ।। 2.3
हे गणेशा , दुष्ट दैत्यांचा निप्पात करून तू सर्वांचं कल्याण करतोस. तू
क्षमाशील आहेस. यशाच्या पथावर घेऊन जाणारा अत्यंत आनंद देणारा आहेस. तुला माझा
नमस्कार असो.
समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं
दरेतोदरं वरं वरेभवत्रमक्षरम् ।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ।। 3 ।।
समस्त
विश्व तारिसी निवारसी रिपू महा
विशाल
पोट हे तुझे अनश्वरा गजानना
कधी
न नाश पावतेचि तत्त्व एक अक्षरी
असेचि ब्रह्म तेच तू नितांत सौख्यअंबुधी ।।3.1 ।।
कृपा
करी क्षमा करी सुभाग्य सौख्य देइ जो
यशाचिया
पथावरी सदैव नेतसेचि जो
विचार
दे प्रगल्भ जो करी मनास सुंदरा
प्रणाम मी करी तया प्रकाशमान ईश्वरा।। 3.2 ।।
जो
गणेश आपल्या ज्ञानेंद्रिंयाच्या सहाय्याने जाणून घेता येत नाही, ज्या गजाननाचं
वेदांमधूनच आकलन होतं, जो त्याच्या भक्तांची, सकल जनांचीच पीडा दूर करतो, जो
दैत्यांचा गर्व चूर चूर करतो त्या गजवदनाला नमन. साक्षात महादेवांच्या कपाळावर
विराजमान असलेल्या धनंजय नामक अग्नीलाही गणेश हा त्याचे भूषण आहे असे वाटते, हा
गजानन माणसाच्या मनातील संसाररूपी बागुलबोवा दूर करून माणसाला धैर्यशील, उद्यमशील
भयरहित बनवतो. जणु काही ह्या धाडसी झालेल्या भक्ताच्या कपाळावर लिहीलेला
दुर्दैवाचा लेख बदलून तो भाग्यलेखच होऊन जातो. जुने जाऊ द्या मरणा लागून
म्हणत सर्व जुन्या गोष्टींचा नाश करणार्या गणेशाला सादर प्रणाम!
अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं
पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् ।
प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ।। 4
उरे
न लोभ ज्यांस त्या विदग्ध सेवकांसवे
जनासही
करी सुखी हरून दैन्य दुःख ते
यथार्थ
ज्ञान रे तुझे घडे श्रुतीस्मृतीतुनी
तुझे स्वरूप ‘नेति नेति’ वेद चार सांगती ।। 4.1 ।।
प्रपंच
घोर नाशसी सदाशिवात्मजा सदा
लयास
नेसि दैत्यगर्व तू उमा-सुता सदा
ललाटलेख
दुर्निवार्य टाकसी पुसोनिया
करीसि पावकासि तूच पावना गजानना ।। 4.2 ।।
जुने
करीच नित्य नष्ट आदितत्त्व तू सदा
सतेज
रूप हे तुझे, गमे नवीन सर्वदा
प्रणाम
मी करी तुला उमा-महेश-नंदना
गिरीश-गौरि जेष्ठ पुत्र, रे तुलाच वंदना ।। 4.3 ।।
सर्वांचा अंत करणार्या अंतकाचा, शिवाचा जो पुत्र आहे त्याला अंत कसला? मरणाच्या
पुत्राला मरणभय कसले? तो तर सतत त्याच्याच मांडीवर खेळत आहे. जो मरणाला सततच
इतक्या जवळून निरागसपणे, सहजपणे बघतो, मरणरूप शक्तीही त्याचा सांभाळ करते.
योगीजनांच्या हृदयात जो परमानंदाचा वसंत फुलल्याप्रमाणे निरंतर राहतो, ज्याचा
हस्तीदंती दात धवल कांतीने चमचमत आहे. त्या अनादि, अनंत, एकदंताचे मी हृदयात
निरंतर स्मरण करत आहे.
नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम्
अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकृन्तनम् ।
हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ।। 5 ।।
( कृन्तनम् – तोडून तुकडे तुकडे करून
फेकून देणे. )
तुझाचि
एकदंत हा सतेज भास्करापरी
तुझेच
तात मृत्युचाच काळ रे चिरंजिवी
कसा
असे, कसा दिसे, स्वरूप हे कसे तुझे
यथार्थ रूप रे तुझे कळे कसे असेल ते ।। 5.1 ।।
अनंत
तू अगम्य तू करीसि दूर संकटा
भयातुनी
करीच मुक्त हाक आर्त ऐकता
जसा
सदैव तू वसेचि योगिवृंदमानसी
तसाच एकदंत हे रहाच माझिया मनी ।। 5.2 ।।
पाच
अनमोल रत्नांप्रमाणे झळाळणारे पाच श्लोक मनाच्या धाग्यात गुंफुन श्री आद्य
शंकराचार्यांनी तयार केलेला `श्रीगणेशपञ्चरत्न' रुपी रत्नहार म्हणणार्याच्या
गळ्याला शोभा देईलच पण ऐकणार्यालाही तेच सुख प्राप्त करुन देईल. त्याची चालसुद्धा
डौलदार आहे. एखादा हत्ती आपल्याच तोर्यात जात असावा त्याप्रमाणे!
महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्वऽहं
प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन्गणेश्वरम् ।
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् ।।6
( अन्वहं – रोज, प्रतिदिन सुसाहिती – चांगल्या लाकांची ,मित्रांची,
सुहृदांची संगत वा साहचर्य. समाहित – ठरवलेलं, एकत्रित केलेलं,
समाधानकारक )
प्रभातकालि
ठेउनी मनी गजाननास या
महागणेशपंचरत्न-स्तोत्र
जो म्हणेचि त्या
मिळेच
दीर्घ आयु त्या अरोगता अदोषता
झणीच पुत्र मित्र ही नरास अष्टसिद्धि त्या ।। 6.1 ।।
महागणेश-पञ्चरत्न
हार हा लखाखता
असो
मराठिच्याच कंठि वाटले हृदी मला
अरुंधती तयास दे मराठमोळ रूप हे
नितांत भूषवेल कंठ मायबोलिचाच गे ।। 6.2 ।।
-----------------------------------------------
'महागणेशपञ्चरत्न'
हे स्तोत्र समाप्त झाले.
#MarathiBhavanuvad
#GneshStotam
#लेखणीअरुंधतीची-
No comments:
Post a Comment