द्वादशपञ्जरिकास्तोत्रम्

                चर्पटपञ्जरिका स्तोत्राच्या चालीवरच द्वादशपञ्जरिका हे स्तोत्र आहे. धनामध्ये गुंतून पडलेल्या माणसाला आचार्यांनी `अर्थमनर्थं भावय नित्यम् । ' `पैसाच विनाशाकडे घेऊन जाणारा असतो.' असा सावध करणारा सल्लाही दिला आहे. ह्याचा अर्थ पैसा मिळवू नये असा नाही. योग्य मार्गाने कितीही पैसा मिळवावा. पण धन- मानाबरोबर येणारे मोह, अहंकार, लोभ, मत्सर हे दोषही माणासला घेरून ऊभेच असतात. चंदनाच्या झाडाला सर्पांच्या विळख्यात राहूनही सुवासाला जपावं लागतं. त्याचप्रमाणे धनात राहूनही विवेकी माणसाला बुद्धी धनापासून अलिप्त ठेवणेच उचित आहे. एकदा का तो त्यात गुंतला तर त्याची फरपट सुरू झालीच म्हणून समजा; असे आचार्य आपल्याला पोटतिडकीने सांगत आहेत.

मूढ जहीहि धनागमतृष्णां
कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम्।
यल्लभसे निजकर्मोपात्तं
वित्तं तेन विनोदय चित्तम्।।1

नको नको हव्यास धनाचा । वेड्या साठवि ना तू पैसा
सद्बुद्धिची आस धरी तू । वैराग्याच्या धरि कासेला।।1.1
परिश्रमाचे मोल मिळे जे । दैवामध्ये आहे लिहिले
त्यातचि सुख तू मानी अपुले । रिझवी मन तू त्याच्यायोगे।।1.2अर्थमनर्थं भावय नित्यं
नास्ति ततः सुखलेशः सत्यम्।
पुत्रादपि धनभाजां भीतिः
सर्वत्रैषा विहिता रीतिः।।2

अर्थचि ये घेऊन अनर्था । सौख्याची मग कुठली वार्ता
या पैशाने टिपुस मिळेना । सुखशांतीचा जगि कोणाला।।2.1
धनवानाला वाटे भीती । लुबाडेल का पुत्रही मजसि 
न्याय सत्य हा एकच जगती । जगी रीत ही चालत आली।।2.2
(अर्थ - धन, पैसा )


का ते कान्ता कस्ते पुत्रः
संसारोऽयमतीव विचित्रः।
कस्य त्वं कः कुत आयातस्
तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रातः।।3

कसली पत्नी, कुठला मुलगा। अजब असे संसारचि मोठा
तू कोणाचा, कोठुन आला । बाबा कोण असे तू ऐसा
प्रश्न विचारी तूचि मनाला । रहस्य घेई जाणुन चित्ता।।3मा कुरु धनजनयौवनगर्वं
हरति निमेषात्कालः सर्वम्।
मायामयमिदमखिलं हित्वा
ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा।।4

गर्व धरी ना सौंदर्याचा । तारुण्याचा आप्त जनांचा
संपत्तीच्या गर्वाने वा । ताठुन जाई ना तू बाबा।।4.1
लवे पापणी काळ पुरेसा । घेउन जाई काळचि सकला
मायेच्या मोहात न फसता । ब्रह्मपदी तू ठेवी चित्ता।।4.2कामं क्रोधं लोभं मोहं
त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् ।
आत्मज्ञानविहीना मूढास्
ते पच्यन्ते नरकनिगूढाः।।5

सोडुनि दे तू लोभ मनीचा । काम मोह जो उपजवि क्रोधा
रहस्य जाणुन घेई तू बा । कोण असे मी ह्याचे चित्ता।।5.1
आत्मज्ञान हे मिळता तुजला । संसाराची उरे न चिंता
मिळे न ज्यासी आत्मज्ञान हे  । भोगे तोची नरकयातना।।5.2सुरमन्दिरतरुमूलनिवासः
शय्या भूतलमजिनं वासः।
सर्वपरिग्रहभोगत्यागः
कस्य सुखं न करोति विरागः।।6

देवालय विश्रामचि घेण्या। वास्तव्यासी तरुतल बरवा
शय्येसी ही धरणीमाता । मृगजिन, वल्कल वस्त्र तनूला।।6.1
धन, वस्तुंचा संग्रह सगळा । भोगही त्याचा सोडुनी देता
सुखमय होते जीवनधारा । देता आलिंगन वैराग्या।।6.2शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ
माकुरु यत्नं विग्रहसन्धौ।
भव समचित्तः सर्वत्रं त्वं
वाञ्छस्यचिराद्यदि विष्णुत्वम्।।7

शत्रु असो वा मित्र कुणीही । पुत्र असो अथवा कुणि स्नेही
कलह नको तो त्यांच्या संगे । मैत्रीसाठी नकोच झुरणे।।7.1
सर्वव्यापि त्या विष्णुपदाची । ओढ जरी तुज अर्तयामी
समभावाने वर्तन करणे । प्रशांत मन तरि तुझे ठेवणे।।7.2


त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्
व्यर्थं कुप्यसि  मय्यसहिष्णुः।
सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं
सर्वत्रोत्सृज भेदज्ञानम्।।8

‘तू मी आणिक जगती सार्‍या । भरून राहे नित परमात्मा’
म्हणसी तूची भल्या माणसा। तरि का सोडी  सहनशीलता।।8.1
राग राग हा उगा कशाला । गोष्ट हिताची तुला सांगता 
सर्वांमध्ये एकचि आत्मा । भेदभाव मग उगा कशाला?।।8.2


प्राणायामं प्रत्याहारं
नित्यानित्यविवेकविचारम्।
जाप्यसमेतसमाधिविधानं
कुर्ववधानं महदवधानम्।।9

( प्राणायाम –- श्वासावर नियंत्रण  । प्रत्याहार –- इंद्रियदमन )
करुनी प्राणायामचि नेमे। इंद्रिय-निग्रह साध त्वरेने
शाश्वत आहे काय जगी या। काय अशाश्वत जाणुन घेना।।9.1
अंतर्मुख तू होऊन चित्ती  । विवेकधन ते जाणुन घेई
एकाग्र करी मन पूर्णपणानी। इष्टदेवतेच्या तू चरणी
नामस्मरणा करी प्रयासे । महत्प्रयासे ध्यान देऊनी।।9.3


नलिनीदलगतसलिलं तरलं
तद्वज्जीवितमतिशयचपलम्।
विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं
लोकं शोकहतं च समस्तम्।।10

कमलपत्रि ना राहति सुस्थिर ।  ओघळती जलबिंदुचि अस्थिर
तैसे जीवन आहे नश्वर। निसटुन जाई नकळत चंचल।।10.1
अभिमानाच्या व्याधीने हे । जीवन झाले शोकाकुल बघ
जाणुन घे हे सत्यचि सत्वर । हरिनामा घे मुखी निरंतर।।10.2


का ते कान्ताधनगत चिन्ता
वातुल तव किं नास्ति नियन्ता।
त्रिजगति सज्जनसंगतिरेका
भवति भवार्णवतरणे नौका।।11

परिवाराची करिसी चिंता । धनास जपसी प्राणाहुन का
वारा वाहे सर्व दिशांना । बांधुन ठेवी कोण तयाला।।11.1
भरकटसी का तैसा तूची। जैसा कोणी नाचि नियंता
भवसागार हा पार कराया । `सज्जन-संगत' एकचि नौका ।।11.2गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्तः
भव संसारादचिरान्मुक्तः।
सेन्द्रियमानसनियमादेवं
द्रक्षसि निजहृदयस्थं देवम्।।12

गुरुचरणांसी दृढ धरि भावे । संसारातुन मुक्तचि व्हावे
अंकुश ठेऊन देह मनावर। नियमांचे तू  करिता पालन
हृदयस्थानी भगवंतासी । पाहशील तू नित्यनिरंतर ।।12


द्वादशपञजरिकामय एषः
शिष्याणां कथितो ह्युपदेशः
येषां चित्ते नैव विवेकस्
ते पच्यन्ते नरकमनेकम्।।13

वत्सा द्वादशपञ्जरिका हा  । अमृतमय उपदेशचि सुंदर
केला आहे शिष्यांसी हा । स्वच्छ कराया मनोसरोवर।।13.1
परि नच उपजे विवेक हृदयी । ज्याच्या चित्ती एकचि क्षणभर
लाभे त्यासी कुठुनी हे सुख  । नर्कपुरीचा  त्यासचि आश्रय।।13.2


सत्सङ्गत्वे निःसङ्गत्वं
निःसङ्गत्वे निर्मोहत्वम्।
निर्मोहत्वे निश्चलितत्त्वं
निश्चलितत्त्वे जीवनमुक्तिः।।14

सत्संगाचा महिमा ऐसा । निःसंगचि नर होई पुरता
सोपान चढे जो निःसंगाचा । निर्मोहाचा लाभ तयाला।।14.1
मोहाचे ते वादळ शमता । निर्मोहासह ये निश्चलता
मनुजा होता निश्चल मन हे । जीवनमुक्ती-मौक्तिक लाभे।।14.2योगरतो वा भोगरतो वा
सङ्गरतो वा सङ्गविहीनः।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं
नन्दति नन्दति नन्दत्येव।।15

जीवनमुक्तचि नर हा होता। ब्रह्मस्वरूपी मन हे रमता
रमला जरि तो योगामध्ये । रुची घेतली भोगामध्ये।।15.1
गढुनी गेला विषयांतचि वा । विषयासक्ती विरहित झाला
आनंदासी पार न त्याच्या। आनंदातचि निमग्न झाला।। 15.2

द्वादशपञजरिका स्तोत्राचा । अनुवादचि हा अरुंधतीचा
मार्ग असे हा वैराग्याचा।  आचार्यांनी सोपा केला।।
---------------------------------------

फाल्गुन शुद्ध 1 / 2 मार्च 2014

No comments:

Post a Comment