तस्मात् जाग्रत जाग्रत ।
कुणी एक रक्षक नगराच्या गल्लीबोळातून रात्रीच्यावेळी
राखण करण्यासाठी हिंडत असताना “सावधान जागे रहा ! ” असं ओरडत व मार्गातील भूमीवर आपल्या
हातातील दंड आपटत चालत असे.
एका रात्री काही कामानिमित्त त्याला परगावी
जायचं होतं म्हणून त्याच्या मुलानं ते काम हाती घेतलं. त्या मुलाला देववशात् आपल्या
पूर्वजन्मातील काही स्मृतिज्ञान असल्याने तो मार्गाने जाताना खालील श्लोक मोठ्या आवाजात
म्हणत जाऊ लागला. त्यात वारंवार ‘‘जागे रहा---सावध व्हा! ’’ असे शब्द येत होते.
दुसर्या दिवशी सकाळीच तेथील राजा राखणदाराची
वाट पहात असलेला पाहून राखणदार अस्वस्थ झाला. आपल्या मुलाने काहीतरी कुचराई केलेली
असणार आणि त्याचं फळ पुर्या परिवाराला भोगायला लागणार, राजाच्या महा क्रोधाला सामोरं
जावं लागणार ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला. थरथर कापू लागला.
पण तसं तर घडलं नाहीच उलट त्या राजाने बहुमू्ल्य
भेटवस्तू देऊन त्याच्या परिवाराला सन्मानित तर केलचं अजून वर राजाने त्याच्या मुलाची
प्रशंसा करून त्याची मोठ्या वेतनावर राजप्रासादाच्या रक्षणार्थ नेमणूकही केली.
त्या मुलाने म्हटलेले ते श्लोक खाली देत आहे. हे श्लोक अतिशय अर्थपूर्ण व जीवनविषयक बहुमोल मार्गदर्शन करणारे आहेत. हे स्तोत्र श्री आद्य शंकराचार्यांचे आहे असेही काहींचे सांगणे आहे
तस्मात् जाग्रत जाग्रत ।
माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धुः सहोदरः ।
अर्थो नास्ति गृहं नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 1 ।।
नसे आई नसे बाबा । भाऊ सख्खा न गोत्रज
नसे पैसा नसे धाम । होई सावध सावध ।। 1
जन्मदुःखं जरादुःखं जायादुःखं पुनःपुनः ।
संसारसागरे दुःखं तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 2 ।।
दुःखदायी असे जन्म । रोग व्याधीच दुःसह
पत्नी, संसारदुःखे ही । राही जागृत जागृत ।। 2 ।।
कामः क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठति तस्कराः ।
ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 3 ।।
षड्रिपू कामक्रोधादि । देहात लपले ठग ।
ज्ञान रत्नचि चोराया । होई सावध सावध ।। 3 ।।
आशया बद्ध्यते जन्तुः कर्मणा बहु चिन्तया ।
आयुः क्षीणं न जानाति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 4 ।।
आशा कर्तव्य चिंतेच्या । पाशात गुंतती जन
सरे आयुष्य वेगाने । होई सावध सावध ।। 4 ।।
सम्पदः स्वप्नसंकाशा यौवनं कुसुमोपमम् ।
विद्युच्चञ्चलमायुष्यं तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 5 ।।
सम्पत्ती स्वप्नवत् सारी । कुसुमासम यौवन
दामिनीसम आयुष्य । राही जागृत जागृत ।। 5 ।।
क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं जीवितमावयोः
यमस्य करुणा नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 6 ।।
निमिषार्ध टिके ना हे । वित्त चित्त नि जीवित
यमा ठावे न कारुण्य । होई जागृत सावध ।। 6 ।।
यावत् कालं भवेत् कर्म तावत् तिष्ठन्ति जन्तवः ।
तस्मिन् क्षीणे विनश्यन्ति तत्र का परिदेवना? ।। 7 ।।
काळ अपेक्षितो कर्म । जीव राहेच तोवर
संपता वेळ ये मृत्यू । तरी खेद कशास्तव? ।। 7 ।।
------------------------------------------
क्रौधी नाम संवत्सरे अश्विन शु. पञ्चमी, 8 ऑक्टोबर 2024