।। लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम् ।।
मित्रांनो, सर्वांनाच
आपण सुंदर दिसावं असं वाटतं. आपल्या परीने प्रत्येकजण आपण सुंदर दिसावं असा प्रयत्न करतोही. जाता जाता आरसा दिसला तर त्यात माणूस डोकावतोच. इतरवेळी
नेहमी कपाळवर आठी असणारी कोणी व्यक्ती आरशात पाहतांना मात्र लवंगिकेसारखी हसुन
मुरुडुन ह्या कोनातून त्या कोनातून आपल्यालाच निरखते आणि खूश होते; तर कोणी नार्सिसही आरशात बघतांना उगीचच छाती पुढे काढून रुबाबदार
दिसण्याचा प्रयत्न करतो. आरशात पाहून नथ सावरत, गळ्यात तन्मणी घालणारी ललना स्वतःला सजवत प्रतिबिंब पाहत असते. हातच्या काकणाला आरसा कशाला असं कितीही म्हटलं तरी आरशात पाहून हातात
तोडे, पाटल्या, बांगड्या चढवतांना
आपल्याला आपल्या संपूर्ण रूपाचं दर्शन होण्यामुळे स्त्री प्रसन्न होते. आरशातलं स्वतःच रुपडं सुंदर
दिसायचं असलं तर, स्वतःला म्हणजेच बिंबाला सजवायला लागतं.
आरशातल्या प्रतिबिंबाला नाही.
हेच श्री आद्य शंकराचार्य सांगत आहेत.
प्रत्येक जीव हा त्या विश्वरूप चैतन्याचे,
त्या ब्रह्म्याचे, आत्म्याचे आपल्या अंतःकरणात
पडलेले प्रतिबिंब आहे. अन्तःकरण म्हणजे
ह्या, जीव आणि शिवामधला आरसा! प्रतिबिंब स्वच्छ
दिसण्यासाठी आरसा आपण स्वच्छ पुसतो त्याप्रमाणे आपलं अंतःकरण स्वच्छ
असेल तर त्यात आत्म्याचं प्रतिबिंबही
स्पष्ट दिसेल. हे प्रतिबिंब सुंदर दिसण्यासाठी त्या बिंबरूप
नरसिंहाला आपल्या भक्तिपुष्पांनी सुंदर सजवायला पाहिजे.
म्हणजेच, त्याचं आपल्या अंतःकरणात उमटणारं प्रतिबिंब सुंदर
दिसेल.
श्लोक 1
पाच अमूल्य रत्नांप्रमाणे
पाच अमोघ श्लोक असलेले
हे स्तोत्र
फारच सुंदर आहे.
श्री रामदासस्वामींनी
मनाला जसा उपदेश केला तसाच श्री आद्यशंकराचार्यांनी
केलेला
हा मनोबोधच
आहे.
ज्या प्रमाणे
अनंतफंदीच्या `बिकट वाट वहिवाट नसावी ' ह्या
फटक्यामधे (वृत्ताचे नाव फटका किंवा हरिभगिनी) प्रत्येक
ओळीत 30 मात्रा असतात त्याप्रमाणे ह्याही
स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत 30 मात्रा आहेत. यति म्हणजे स्तोत्र चालीवर म्हणतांनाचा थांबा
8,16,
24 मात्रांवर आहे. पण फटक्यामधे काही चरणांच्या जोड्यांनंतर 14 मात्रांच्या
ओळींचा अंतरा असतो तसा ह्यात नाही.
श्री आद्य शंकराचार्य
म्हणतात,
हे मना,
हे मनमिलिंदा,
भुंग्याप्रमाणे
सुख रूपी
मध मिळविण्यासाठी
तुझी चाललेली
खटपट स्तुत्य
आहे.
पण जिथे तुला मध मिळेल तिथे तू पोचणं आवश्यक आहे. हा संसार बरड मरुभूमीसारखा
आहे.
इथे तुला काही मिळणार
नाही.
ह्या संसाराच्या
वाळवंटात
कुठली फुलं?
आणि कुठला मध? जिथे आशेची फुलंसुद्धा
सुकून जातात तिथे तुला खरा मध कोठून मिळणार?
तुला मधच पाहिजे
असेल तर जेथे दुर्विचारांचा,
पापाचा
लवलेशही
नाही अशा लक्ष्मी
नरसिंहाच्या
अत्यंत
पावन चरणकमलांचा
आश्रय घे. तिथेच तुला आनंदरूप
मकरंद मिळेल.
त्वत्प्रभुजीव-प्रियमिच्छसि
चेन्नरहरि-पूजां कुरु सततं
प्रतिबिम्बालंकृति-धृति-कुशलो
बिम्बालंकृतिमातनुते ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा
भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम्
।। 1
( प्रभु - स्वामी, अधिपती,शासक, )
मना मधुकरा भलेचि
व्हावे असे वाटते तुला जरी
मन-भृंगा हे ऐक ऐक रे गोष्ट
हिताची तुझ्याच ही
जीव असे तव मालक बाबा समजुन
घे हे सत्य उरी
जीव सुखी तर सुखीच तू रे विसरु
नको ही मेख खरी ।। 1.1
जीव असे तो परमात्म्याची चैतन्याची
एक छबी
उमटे अंतःकरणी जी रे प्रतिबिंबात्मक
रूप धरी
दर्पणि दिसण्या आकर्षक छबि मुखास
सजवी कुशल कुणी
घालुन नाना अलंकार ते देहावरती
योग्य रिती ।। 1.2
म्हणुनी भजता अनन्य भावे बिंबरूप
त्या नरसिंहा
ध्याता होतो ध्येयरूप रे ``सोऽहं’’
येते अनुभवता
मना माझिया कल्याणाची मनी
कामना तुला जरी
शरणचि जावे नरहरिसी त्या धावा
त्याचा नित्य करी
मना- मधुकरा
फुका फिरसि का निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे व्यर्थ
गुंजना तू न करी
लक्ष्मीनरसिंहाच्या
पावन पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त
करे जो जन्मभरी ।। 1.3
श्लोक 2
अरे बाबा, प्रत्येक
चमकणारी
गोष्ट सोनं वा चांदी नसते.
समुद्राच्या
वाळूत चमकणार्या
शिंपा/
शिंपले
पाहून तुला चांदीच्या
रुपयांचा
आभास होऊ शकतो.
पण त्या चमचमणार्या
शिंपल्यांच्या
बदल्यात
तुला कोणीही
खरे चांदीचे
रुपये सोडाच पण दिडकीही
देणार नाही.
संसार तसाच आहे रे बाबा!
सुख मिळेल म्हणून
तू ज्याच्या
मागे धावतोस,
तू जिथे फिरत राहतोस
तिथे ``सुख म्हणजे नक्की काय?’’ हेच तुला कळेनासं होतं. ह्याला सुख म्हणावं? का त्याला सुख म्हणावं ह्या संभ्रमात तुझ खरं सुख, खरा आनंद, हे दुःखमय जग हिरावून घेत असतं. माझ्या मनभृंगा,
हे जग म्हणजे
ओसाड वाळवंट
आहे.
तापलेल्या
वाळूवर
जसे पाण्याचे
आभास होऊन प्राणी
त्याच्यामागे
धावत सुटतात
पण अंती पाणी पाणी करत मरण पावतात
त्याप्रमाणे
हा संसार तुझ्या
समोर सुखाचे
भास निर्माण
करत राहील आणि त्या भासमान
सुखामागे
धावता धावता तुझी फक्त फरपट होईल.
कुत्तरओढ
होईल.
तुला खरा आनंद,
खरं सुख लाभावं
असं वाटत असेल तर त्या लक्ष्मीनरसिंहाच्या
पादपद्मांवर
शरण जा. तेथे तुला जो अनुपम आनंदरूपी
मकरंद मिळेल तो तुझ्याकडून
कोणीही
हिरावून
घेऊ शकणार नाही.
शुक्तौ रजत-प्रतिभा
जाता कटकाद्यर्थ-समर्था चेद्
दुःखमयी ते संसृतिरेषा निर्वृतिदाने
निपुणा स्यात् ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा
भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम्
।। 2
(शुक्ती
- शिंपला, रजत-प्रतिभा - चांदीचा/चांदीच्या रुपयांचा आभास, निर्वृति
- संतृप्ति, प्रसन्नता, सुख, आनंद )
पुळणीवरती दुरून दिसती शिंपा
चमचम चमचम रुप्यासमा
चांदीचे परि रुपये तेची देउन
सोने मिळेल का?
संसारासी तसे समजसी आनंदाचा
खजिना हा
येती रोरावत आपत्ती माथी
दुःखाची छाया ।। 2.1
( पुळण- समुद्रकिनारा
किंवा त्यावरील रेती, वाळू )
मना- मधुकरा
फुका फिरसि का निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची
आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची
कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त
करे जो जन्मभरी ।। 2.2
श्लोक 3
अरे माझ्या मना!
सावध हो! संसारसागरातील प्रत्येक गोष्ट फसवी आहे.
शाल्मली
वृक्षाची
म्हणजेच
काटेसावरीची
लालचुटुक
मोठी मोठी फुलं इतकी आकर्षक
असतात की पाहणार्याला
वाटवं की जळातल्या
कमळांप्रमाणे
ही धरणीवर
फुलणारी
कमळच आहेत.
माझ्या
मनमिलिंदा,
कमळ समजून जर ह्या शाल्मलीच्या
फुलांच्या
प्रेमात
पडून तू तिथेही
मला मधच मिळेल ह्या आशेने जर गेलास तर तुझी घोर निराशा
झाल्याशिवाय
राहणार
नाही.
ना त्याला
सुगंध ना त्या फुलात कोठला मध! तुला काही काही मिळणार
नाही.
उन्हात
वणवण फिरणं फक्त तुझ्या
नशिबी येईल.
म्हणून
हे मनभृंगा
वेळीच सावध हो. ह्या वाळवंटात
आनंदरूपी
मध मिळविण्यासाठी
फक्त आणि फक्त त्या सद्गुणस्वरूप,
विवेकरूपी
नरहरीला
शरण जा. जेथे सर्व गुण एकवटलेले
असतात,
तेथेच ऐश्वर्यस्वरूप
लक्ष्मी
राहते.
अशा ह्या लक्ष्मीनरसिंहाच्या
पावन चरणकमलांमधेच
तू तुला गुंतवून
घे. तेथेच अपार मधु तुला मिळेल;
जो तुला जीवनभर
तृप्तीचा
अनुभव देईल.
आकृति-साम्याच्छाल्मलि-कुसुमे
स्थलनलिनत्व- भ्रममकरोः
गन्धरसाविह किमु विद्येते
विफलं भ्राम्यसि भृशविरसेऽस्मिन् ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा
भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम्
।।3
काटेसावर फुलता भासे कमळे
ही तर भूवरची
मनभृंगा त्या रंगरुपाला भुलुनी
जाशिल जर जवळी
सुवास कुठला, मधही
कुठला भ्रमनिरास होईल मनी
व्यर्थचि जाईल गुंजारव तव हिंपुटि
होशिल घे ध्यानी ।। 3.1
मना- मधुकरा
फुका फिरसि का निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची
आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची
कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त
करे जो जन्मभरी ।। 3.2
श्लोक 4
हे माझ्या मना, भुंग्यासारखा
तू कायम आनंदाचा
शोध घेत फिरतच असतोस.
नाना सुखोपभोग
देणार्या
गोष्टी
तुला आकर्षित
करत राहतात.
विविध अत्तरं,
शरीराला
सुख देणारे
चंदनादि
लेप,
स्त्रीसुख
ह्या सुखाच्या
भडक कल्पना
इतक्या
मोहित करतात की माणूस त्यामागे
धावतोच!
पण हाय रे हाय!
त्या चाफ्याच्या
जीवघेण्या
सुगंधाने
वेडावलेला
तो भुंगा त्याच्या वर झेपावतो
आणि त्या सुवासाने
मूर्छित
होऊन पडतो.
चाफ्याच्या
झाडाला
भृंगमोही
म्हणतात
ते उगीच नाही.
चाफ्याच्या
वासाने
भुंग्याची
शुद्ध हरपते.
किंवा नुसत्या
चाफ्याच्या
स्पर्शानेही
तो मरण पावतो.
हे मनभृंगा तशी ह्या संसारातली
सुखं कितीही
आकर्षक
वाटली तरी ती दारूण दुःख दिल्याशिवाय
राहत नाहीत.
त्यांच्या
नादी तू लागू नकोस.
तुला कधीही न संपणार्या
खर्या
सुखाचा,
परम आनंदाचा
अनुभव घ्यायचा
असेल तर त्या नरहरीच्या
पायी शरण जा. त्या लक्ष्मी
नरसिंहाच्या
चरणसरोजात
तू मग्न हो. तेथेच अपरिमित
अशा आनंदाचा
मकरंद तुला चाखायला
मिळेल.
स्त्रक्चन्दन-वनितादीन्विषयान्सुखदान्मत्वा तत्र
विहरसे
गन्धफली-सदृशा
ननु तेऽमी भोगानन्तरदुःखकृतः स्युः ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा
भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम्
।। 4
(गन्धफली - चाफा )
( चाफ्याला षट्पदातिथि किंवा भृङ्गमोही असे
म्हणतात म्हणजे भुंगे अतिथीप्रमाणे त्याच्याकडे धाव घेतात. पण त्याच्या गंधाच्या सेवनाने भुंग्यांना मोह
म्हणजे मूर्छा येते. किंवा नुसत्या त्याच्या स्पर्शानेही ते मरतात
असे म्हणतात.)
अत्तर परिमल, नाना
द्रव्ये चंदनलेप सुखावह ते
कमनीयचि त्या ललना सुंदर मना
मानुनी खरी सुखे
रमून जाशिल उपभोगातच घात
तुझा लिहिलाचि असे
चाफा असला सुंदर गंधित मूर्च्छा
भ्रमरासी येते ।। 4.1
मना- मधुकरा
फुका फिरसि का निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची
आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची
कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त
करे जो जन्मभरी ।। 4.2
श्लोक 5
माझ्या मनभृंगा रे,
बाबा रे, तुझ्या
हिताचे
दोन बोल सांगतो.
तू ते ऐकलेस तर तुझं कल्याण
होईल.
नाही ऐकलेस तर दुःखात
पिचत राहशील.
तुला जर खरोखरच
सुखाची
ओढ लागली असेल तर एक लक्षात
घे. स्वप्नात
दिसणारी
सुंदर बाग, स्वप्नात प्रत्ययाला येणारी
मधाने काठोकाठ
भरली फुलं----
सगळं सगळं जाग येताच हरवून जातात.
कुठची बाग आणि कुठची फुल?
स्वप्नात
पाहिलेलं
सगळं सगळं आभासी असतं.
काही क्षणांची
ती दुनिया!
आकाशात
ढगांनी
चित्र नगरी तयार करावी आणि वार्याने
ती पुसून टाकावी
त्याप्रमाणे
ह्या जगातील
सर्व सुखं क्षणभंगुर
आहेत.
तू त्यांच्यामागे
लागू नकोस.
तुझ्या
स्वप्नांना
तडा गेल्याशिवाय
राहणार
नाही.
ह्या संसाराच्या
मरुभूमीत
तू सुखाची
फुलं आणि परमानंदाच्या
मधाची अपेक्षा
ठेऊ नकोस.
अपेक्षाभंगाचं
मोठ दुःख तुला सहन करावं लागेल.
तू त्या लक्ष्मीनरसिंहाच्या
अत्यंत
मनोहर अत्यंत
कोमल अशा चरणकमलांवर
स्तुतिस्तोत्रांचा
गुंजारव
करत रहा.
त्या चरणकमलातून
मिळालेला
परमानंदरूप
मधु तुला आयुष्यभर
सुख,
आनंद देईल.
तव हितमेकं वचनं वक्ष्ये
शृणु सुखकामो यदि सततं
स्वप्ने दृष्टं सकलं हि
मृषा जाग्रति च स्मर तद्वदिति ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ
विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम्
।। 5
मना मधुकरा ऐकुन घे रे बोल
हिताचे दोन तुझ्या
जरी निरंतर सौख्य मिळावे असे
वाटते सतत तुला
जागे होता जसे संपते स्वप्नांचे
ते राज्य वृथा
तसे समज रे सुख वैभव हे स्वप्न
तुझे रे हो जागा ।। 5.1
मना- मधुकरा
फुका फिरसि का निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची
आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची
कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त
करे जो जन्मभरी ।। 5.2
प्रवीण-जाया अरुंधतीने रत्ने पाच अलौकिक
ही
मराठमोळ्या कनककोंदणी
जडवुन केला हार सही
रत्नहार हा असे
अलौकिक कंठी शोभे कुणासही
चोरुन नेता कुणी तयासी
नगास नग तैसा राही
------------------------------------------------------------------
लेखणी
अरुंधतीची -