अर्धनारीश्वर स्तोत्रम्
लक्ष्मी-नारायण आणि शिव पार्वती ह्या आपल्या हिंदु परंपरेतील अत्यंत विलक्षण पतीपत्नीच्या जोड्या. दोन्हीही पूर्ण वेगळ्या. विष्णु म्हणजे सर्व सद्गुणांची मूर्ती आणि लक्ष्मी म्हणजे गुणांची प्रभा. जेथे सूर्य तेथे सूर्य किरणे. सूर्य कुठे सांभाळत बसतो त्याची किरणे! त्याच्या सोबतच तो प्रकाशाचा पिसारा येतो आणि जातो. त्याप्रमाणे जेथे सर्वगुणसम्पन्नता तेथेच लक्ष्मी राहणार. म्हणून ती विष्णूबरोबरच कायम राहणार. त्याच्या पायापाशी त्याच्या गुणांची प्रभा बनून.
तर शिव-पार्वती म्हणजे विनाश सृजनाचा खेळ. एकाच कृतीची दोन अभिन्न अंगे. दोघांच्या दिसण्यात, काम करण्यात जमिन अस्मानाचा फरक. देवाधिदेव महादेव निर्दयपणे विनाशाच्या मागे लागलेले तर तेवढ्याच आत्मीयतेने नवीन जग उत्पन्न करण्यासाठी उमा प्रयत्नशील ! एकमेकांच्या विरुद्ध काम करतांनाही केवढा ताळमेळ! परत कुठेही विसंवादाचा इवलासा सूरही नाही. कुठे चाफ्याच्या कळीसारखी कोमल पार्वती तर कुठे अंगाला राख फासलेला शिव. त्यांच्यामधला हा विरोधाभास श्री आद्य शंकराचार्यांनी इतका सुरेख टिपला आहे की पहिल्यांदा हे स्तोत्र वाचल्यावर मन मोहरून जायला झालं. मी हे स्तोत्र नाही तर एक सुंदर कविताच वाचत आहे असं मला वाटलं. स्तोत्र इतकं सुंदर काव्य असू शकतं हे पाहून ह्या स्तोत्राचा अनुवाद मुक्त छंदात कविता म्हणूनच करावा असं मला फार फार वाटत होतं. त्याप्रमाणे मी तो केला.
( वृत्त – इंद्रवज्रा
, अक्षरे - 11, गण – त त ज ग ग, यति – पाद )
चाम्पेय-गौरार्ध-शरीरकायै
कर्पूर-गौरार्ध-शरीरकाय।
धम्मिल्लकायै च
जटाधराय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।1
चाफ्यासम गौरीची कोमल गौरार्ध काया
कर्पूरगौर भूषवी उर्वरीत अर्ध काया
केशभूषा उमेची; जटा तांबारल्या शिवाच्या
नमस्कार माझा त्या पार्वती-परमेश्वराला ।।1
कस्तूरिका-कुङ्कुम-चर्चितायै
चितारजःपुञ्ज-विचर्चिताय।
कृतस्मरायै विकृतस्मराय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।2
कस्तुरी कुंकुम गंध उमा रेखिते ललाटी
शोभते मदनान्तकाच्या ते चिताभस्म भाळी
जाळी कृतान्त हा मदना तरी कृतज्ञ गौरी
नमस्कार माझा त्या गिरिजा-गरिजेश्वरासी ।।2
झणत्क्वणत्कङ्कण-नूपुरायै
पादाब्ज-राजत्फणिनूपुराय।
हेमाङ्गदायै भुजगाङ्गदाय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।3
रुणझुणती कंकणे नूपुरे उमा चालतांना
शिवाच्या चरणकमळी वेढिल्या सर्पमाळा
नटली उमा सुवर्णे सर्पभूषणे शिवाला
नमस्कार माझा त्या पार्वतीपरमेश्वराला ।।3
विशाल-नीलोत्पल-लोचनायै
विकासि-पङ्केरुह-लोचनाय।
समेक्षणायै विषमेक्षणाय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।4
नीलदलकमलापरी जिचे आकर्ण नेत्र
उत्फुल्ल रक्तकमलासम हा विशालनेत्र
समदृष्टी गिरिजा ही; विषमदृष्टी त्रिनेत्री
नमस्कार माझा त्या गिरिजा-गिरिजेश्वरासी।।4
मन्दारमालाकलितालकायै
कपालमालाङ्कित-कन्धराय ।
दिव्याम्बरायै च
दिगम्बराय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।5
सुकोमल पुष्पमाला वक्षावरी पार्वतीच्या
छातीवरी शिवाच्या भयद नरमुंडमाला
स्वर्गीय वस्त्र उमेचे; हा आकाश पांघरून
नमितो असा सदा मी पार्वती-परमेश्वर।।5
अम्भोधरश्यामल-कुन्तलायै
तडित्प्रभा-ताम्र-जटा-धराय।
निरीश्वरायै निखिलेश्वराय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।6
सजल जलदापरी कृष्णकुंतल उमेचे
ताम्रजटा शिवाच्या जशी वीज मेघात चमके
हा स्वामी तिन्ही जगाचा; ही स्वामिनी ईश्वराची
नमस्कार माझा त्या गिरिजा-गिरिजेश्वरासी।।6
प्रपञ्च-सृष्ट्युन्मुख-लास्यकायै
समस्त-संहारक-ताण्डवाय।
जगज्जनन्यै जगदेक-पित्रे
नमः शिवायै
च नमः शिवाय।।7
पदन्यासे पार्वतीच्या सृष्टी म्हणे जन्म घ्यावा
तांडवाने शंकराच्या प्रलयकाळ पातला
जी जगज्जननी शोभे; जो पिता साऱया जगाचा
नमस्कार माझा त्या पार्वती-परमेश्वराला।।7
प्रदीप्तरत्नोज्ज्वलकुण्डलायै
स्फुरन्महापन्नगभूषणाय।
शिवान्वितायै च
शिवान्विताय
नमः शिवायै
च नमः शिवाय।।8
रत्नजडित कुंडले झळाळती पार्वतीची
महासर्प फुत्कारिती भूषण हेची शिवासी
शिवमय उमा ती; उमामण्डित शूलपाणी
नमस्कार माझा त्या गिरिजा गिरिजेश्वरासी।।8
एतत्पठेदष्टकमिष्टदं यो
भक्त्या स
मान्यो भुवि दीर्घजीवी।
प्राप्नोति सौभाग्यमनन्तकालं
भूयात्सदा तस्य
समस्तसिद्धिः।।9
पठण करी भक्तिने जो ह्या शिवाष्टकाचे
होई शतायुषी तो जगी त्या बहुमान लाभे
सकल सिद्धी हात जोडोनी तया वंदिताती
सौभाग्य अनंत काल सेवते त्या नरपुंगवासी।।9
----------------------------------------