
संस्कृतमधे `शिवम्' चा अर्थ समृद्धी, कल्याण, मंगल, आनंद, परमानंद,
सौभाग्य, मोक्ष असा आहे. कल्याण, सौभाग्य, आनंद, मोक्ष हे प्रत्यक्षात कुठल्या वस्तुरूपात
दाखवता येत नाहीत. पण समजा ह्या परमानंदाची, कल्याणाची मूर्ती घडवायची ठरवली तर ही
कल्याणरूप मूर्ती, ही मोक्षाची प्रतिमा म्हणजेच शिव.
विश्वाच्या कल्याणाचा नुसता विचार करून अथवा कामना करून विश्व कल्याण
साधत नाही. दरिद्री माणसांची मनोरथे तडीस जात नाही. `उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां
मनोरथाः ।' त्याला प्रखर तपस्या, अमोघ शक्ती, अपरिमित साहस, दुर्दम्य आत्मविश्वास, अजेय ठरवणारी सहनशक्ती आणि अफाट समृद्धी ह्यांची
जोड मिळायला लागते. मगच शिवरूप होण्याची योग्यता प्राप्त होते. जेंव्हा कल्याणकारी
विचार प्रचंड ताकदीने उभे राहतात तेंव्हाच शिव आणि शक्तीची अभेद मूर्ती साकारते. जी कल्याणकारी असते. म्हणूनच
शिवाला `साम्ब' असे संबोधतात. `अम्बया सहितः साम्बः ' अशी साम्ब शब्दाची फोड आहे जो
कायम शक्तीसहित आहे तो साम्ब कल्याणकारी असतो.
असा `अम्बया सहितः साम्बः ' म्हणजेच पार्वती आणि परमेश्वर ह्यांचं
विश्वात्मक एकरूपत्व दाखवणार्या शिवाची /साम्बाची स्तुती श्री आद्य शंकराचार्यांनी
साम्बस्तुतीच्या दहा श्लोकांमधे अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.
( वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे- 19, गण - म स ज स त त ग, यति
- 12. 7 )
साम्बो नः कुलदैवतं पशुपते साम्ब
त्वदीया वयं
साम्बं स्तौमि सुरासुरोरगगणाः साम्बेन
संतारिताः ।
साम्बायास्तु नमो मया विरचितं साम्बात्परं
नो भजे
साम्बस्यानुचरोऽस्म्यहं ममरतिः साम्बे
परब्रह्मणि ।। 1
( सुरासुरोरगगणाः - सुर, असुर आणि
उरग गण / सर्प, नाग गण )
सांबा तू कुलदेवताच अमुची आम्ही तुझी लेकरे
तूची पालक होउनीच जगवी ही जीवसृष्टी बरे
तारीसी असुरा सुरा पशुपते नागादिकांची कुळे
झालो दास तुझा न माहित मला सांबा दुजी दैवते ।।1.1
गेलो मी रमुनी तुझ्याच चरणी गातो स्तुती मी मुखे
प्रेमे वंदन मी तुला करितसे साम्बा परब्रह्म हे ।। 1.2
विष्ण्वाद्याश्च पुरत्रयं सुरगणा
जेतुं न शक्ताः स्वयं
यं शम्भुं भगवन्वयं तु पशवोऽस्माकं
त्वमेवेश्वरः ।
स्वस्वस्थाननियोजिताः सुमनसः स्वस्था
बभूवुस्ततः
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 2
(सुमनसः - देव)
जिंकाया त्रिपुरासुरा नच जमे विष्णू सुरेंद्रा जिथे
तेथे त्या त्रिपुरासुरास वधिले शंभू स्वरूपी स्वये ।
जे जे स्थान दिलेच नेमुन सुरा कर्तव्य जे साधण्या
स्वस्थानी अति ठाम राहुनचि ते नेती तडीसी तया ।। 2.1
भेदोनी तिनही पुरे जिथं तुम्ही देवांसही रक्षिले
तेथे मी अति तुच्छ एक पशु तो स्वामी तुम्ही एकले ।
जावे चित्त रमून हे तव पदी तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 2.2
क्षोणी यस्य रथो रथांङ्गयुगलं चन्द्रार्कबिम्बद्वयं
कोदण्डः कनकाचलो हरिरभूद्बाणो विधिः
सारथिः ।
तूणीरो जलधिर्हयाः श्रुतिचयो मौर्वी
भुजंगाधिप-
स्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 3
(क्षोणी - पृथ्वी; कनकाचल - मेरू पर्वत; तूणीर - बाण ठेवायचा भाता; मौर्वी - धनुष्याची दोरी, प्रत्यञ्चा )
पृथ्वी हा रथ दिव्य ज्यास असती चाकेच भानू विधु
चारी वेदचि वेगवान उमदे घोडे तयाचे जणु
सारथ्यास तयावरी बसतसे ब्रह्मा स्वये आदरु
होई स्वार रथी अशा सहजची तो साम्ब गंगाधरु ।। 3.1
मेरु पर्वत हे धनुष्य धरिले तोलून ते लीलया
प्रत्यंच्या म्हणुनीच शेष सहजी
रज्जूसमा बांधला
लावी बाण तयावरी हरिरुपी तो साम्ब गंगाधरु
ठेवायाचि अमोघ बाण हरिचा भाता करी सागरु ।। 3.2
गेलो मी रमुनी तुझ्याच चरणी गातो स्तुती मी मुखे
प्रेमे वंदन मी तुला करितसे साम्बा परब्रह्म हे ।। 3.3
येनापादितमङ्गजाङ्गभसितं दिव्याङ्गरागैः
समं
येन स्वीकृतमब्जसम्भवशिरः सौवर्णपात्रैः
समम् ।
येनाङ्गीकृतमच्युतस्य नयनं पूजारविन्दैः
समं
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 4
जाळूनी मदनास राख तयिची लावे उटीच्यासमा
भिक्षापात्र म्हणोनी मुंड मिरवी जो स्वर्णपात्रासमा ।
स्वीकारी हरि-नेत्र पद्म म्हणुनी जो अच्युते अर्पिला
त्याची साम्बपदी मना रमुन जा
तोची परब्रह्म गा ।। 4
गोविन्दादधिकं न दैवतमिति प्रोच्चार्य
हस्तावुभा-
वुद्धृत्याथ शिवस्य सन्निधिगतो व्यासो
मुनीनां वरः ।
यस्य स्तम्भितपाणिरानतिकृता नन्दीश्वरेणाभव-
त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।।5
भेटायास शिवास व्यास मुनी ते गेलेचि जेंव्हा घरी
दोन्ही हात उभारुनीच वदले दावीत प्रौढी भली
गोविंदाहुन श्रेष्ठ दैवत भले ना पाहिले मी जगी
सामोरा अति नम्र नंदि बघता बाहू तसे राहती ।। 5.1
झाले स्तंभित पाहुनीच भलती ती नम्रता नंदिची
येती सांबशिवापदी शरण ते जाणून त्यांची चुकी
त्याची सांबपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 5.2
आकाशश्चिकुरायते दशदिशाभोगो दुकूलायते
शीतांशुः प्रसवायते स्थिरतरानन्दः
स्वरूपायते ।
वेदान्तो निलयायते सुविनयो यस्य
स्वभावायते
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 6
(चिकुर - जटा)
ह्या आकाश रुपी जटा पसरल्या झाल्या दिशा वस्त्र हे
चंद्राचे जणु पुष्प सान गमते साम्बाशिरी वाहिले
जो आनंदचि नित्य निश्चल असे जे रूप साम्बा तुझे
वेदांती नित घेत आश्रय असे जो नम्रमूर्ती सुखे
त्याची साम्बपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 6
विष्णुर्यस्य सहस्रनामनियमादम्भोरुहाण्यर्चय-
न्नेकोनोपचितेषु नेत्रकमलं नैजं
पदाब्जद्वये ।
सम्पूज्यासुरसंहतिं विदलयंस्त्रैलोक्यपालोऽभव
-
त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 7
घ्यावे नामसहस्र शंभुशिव हे ऐसे हरीचे व्रत
नामाच्या समवेत अर्पण करी शंभूपदी पंकज
आहे पद्म कमीच एक बघता तो पद्मनेत्री हरी
बाणानेच स्वनेत्र काढुन करी राशी सहस्रा पुरी ।। 7.1
झाला शंभु प्रसन्न तो हरिवरी केले सुनेत्री तया
देई चक्र सुदर्शना हरिस तो दुष्टांस नाशावया
केले मुक्तचि विश्व सर्व हरिने दैत्यांस त्या दंडुनी
झाला तो हरि लोकपाल जगती शंभूकृपा ही अशी ।। 7.2
त्याची साम्बपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 7.3
शौरिं सत्यगिरं वराहवपुषं पादाम्बुजादर्शने
चक्रे यो दयया समस्तजगतां नाथं शिरोदर्शने
।
मिथ्यावाचमपूज्यमेव सततं हंसस्वरूपं
विधिं
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 8
घेऊनीच वराहरूप हरि तो पाताळ शोधे प री
नाही सापडली हरीस परि त्या शंभूपदे तेथही
ब्रह्मा हंसरुपात स्वर्ग बघुनी बोलेच खोटे किती
आलो मी शिवमस्तका बघुनिया सांगे शिवासी विधी ।। 8.1
विश्वाचा करि लोकपाल हरिसी शंभू कृपावंतची
बोले सत्य हरी म्हणून पदवी
देई जगन्नाथ ही
ब्रह्म्याची परि ती असत्य वचने ऐकून क्रोधे वदे
कोणी ना करतील पूजन कधी खोटे जगी जो वदे ।। 8.2
त्याची सांबपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 8.3
यस्यासन्धरणीजलांग्निपवनव्योमार्कचन्द्रादयो
विख्यातास्तनवोऽष्टधा परिणता नान्यत्ततो
वर्तते ।
ओंकारार्थविवेचनी श्रुतिरियं चाचष्ट
तुर्यं शिवं
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 9
(मांडुक्य उपनिषदाने ॐ कार-स्वरूप
वा ब्रह्मरूप आत्म्याचे चार पाद वा चार अवस्था भेद आहेत असे वर्णन केले आहे. त्यातील
वैश्व, तैजस, प्राज्ञ हे पहिले तीन आणि चौथा ज्याला आपण ओळखण्यासाठी परंपरागत पद्धतीने
तुरीय असे म्हणू या ) (मांडुक्य उपनिषदातील मंत्र 7 पान 103 `श्री उपनिषदर्थ कौमुदीः
अनंत दामोदर आठवले )
अग्नी वायु सलील तेज धरणी आत्मा रवी चंद्र ह्या
अष्टांगातुन आकळे शिवप्रभू ना मार्ग काही दुजा
जोची स्वप्न सुषुप्ति जागृति अशा तीन्ही अवस्थांचिया
आहे पार पलीकडेच चवथी तुर्या अवस्थारता ।।
त्याची साम्बपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।।
विष्णु-ब्रह्म-सुराधिप-प्रभृतयः
सर्वेऽपि देवा यदा
सम्भूताज्जलधेर्विषात्परिभवं प्राप्तास्तदा
सत्वरम् ।
तानार्ताञ्शरणागतानिति सुरान्योऽरक्षदर्धक्षणा-
त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे
परब्रह्मणि ।। 10
व्हावे अमृत प्राप्त सिंधु मथुनी ऐसी मनीषा हृदी
ठेवोनी विधि इंद्र विष्णु सहिता झाले जमा दैत्यही
आले सागरमंथनी परि वरी हालाहलाचे भय
भीतीने शिवपावली शरण ते आले अती सत्वर ।। 10.1
देई शंकर तत्क्षणी अभय त्या देवास दैंत्यांसही
प्राशूनी विष त्यांस निर्भय करी ऐसी कृपा शंभुची
त्याची साम्बपदी मना रमून जा तेथे सुखांची सुखे
पाहो मी तव रूप विश्वमयची साम्बा परब्रह्म हे ।। 10.2
होती साम्बस्तुतीच संस्कृतमधे सर्वास जी ना कळे
त्याचा अर्थ अरुंधती वदतसे
सोप्या मराठीमधे ।
अर्थासी न उणीव येइल कुठे
वृत्तास सांभाळिले
भाषा बोजड ना असे सरळ ती,
जी वाचका आवडे ।।
---------------------------------------------------------------------------
1941, विकारीनामसंवत्सर, श्रावण शुक्ल दशमी 10 ऑगस्ट
2019