अद्वैताचा
ठाम पुरस्कार करत श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र परत परत सांगते की, सद्गुरूच्या कृपेने एकदा का शिष्याला `ब्रह्म सत्यं
जगत् मिथ्या।' हे ज्ञान झाले की तो स्वतःच विश्वरूप होतो. त्याची सर्व नाती संपून जातात. सर्व जन, प्राणी त्याला सारखेच जवळचे वाटतात. जसे चिखलाच्या डबक्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले तरी त्याला चिखल लागत नाही तसे कुठलेच
कर्म केले तरी तो त्यातून पूर्ण मुक्तच असतो.
आरशात दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब आरशाच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या की प्रत्येक तुकड्यात
स्वतंत्रपणे दृष्टीस पडते. अशावेळी एका सूर्याचे अनेक सूर्य झाले असे म्हणता येत नाही.
त्याप्रमाणेच प्रत्येक जीवमात्रात दिसून येणारे चैतन्य हे एकच असून त्याचे अनेक भाग
झाले किंवा प्रत्येक जीवमात्र वेगळा आहे असे म्हणता येणार नाही. चैतन्य अभेद आहे. एकच आहे. विश्वव्यापी
आहे. आणि ते विश्वव्यापी चैतन्य मीच आहे. असे ज्ञान झाल्यावर तो शिष्य आनंदाचा गाभाच
होऊन जातो. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा अग्नीला पोळत नाहीत, खूप उंचीवरून पाण्यातच कोसळणारा प्रपात पाण्याला इजा करत नाही, स्वतःच्याच धगीने सूर्य होरपळत नाही त्याप्रमाणे मी, तू, तो असा भेदच नाहीसा झाल्यावर भय उरतच नाही. दुजाभावच लयाला गेला की त्रास कोण देणार आणि त्रास होणार तरी कोणाला? असा विरक्त आत्मा कल्याणाचा सिंधूच असतो. शिवरूप असतो. `शिवः अहम्।' ह्या प्रत्ययाने पूर्ण
असतो.
( वृत्त - शालिनी. अक्षरे- 11, गण - म त त ग ग , यति- 4, 7 )
नाहं देहो नेन्द्रियाण्यन्तरङ्गो
नाहंकारः प्राणवर्गो न बुद्धिः ।
दारापत्यक्षेत्रवित्तादिदूरः
साक्षी नित्यः प्रत्यगात्मा शिवोऽहम् ॥1
ना मी काया,
इंद्रिये, अंतरंग
नाही नाही
मी अहंकाररूप
बुद्धी वायू
प्राण ना मी अपान
पैसा शेती
कामिनी संतती न ।।1.1
सर्वांहूनी
वेगळा मी असेच
साक्षी राहे
सर्व कृत्यांस नित्य
जैसी कर्मे
होत दीप-प्रकाशी
कर्मे ना
तो आचरे दीप काही ।। 1.2
द्रष्टा तैसा
सर्वदा मीच एक
कर्मांनी
ना लिप्त होतो कधीच
आनंदाची नित्य
निस्यंदिनी मी
कल्याणाचा
पूर्ण गाभा असे मी ।। 1.3
आत्मा मी
तो ज्यास नाही विनाश
विश्वामध्ये
राहिला जो भरून
आहे मीची
सर्वदा सर्वकाळ
सर्वार्न्तर्यामी
शिवोऽहं शिवोऽहम् ।। 1.4
रज्ज्वज्ञानाद्भाति रज्जौ यथाहिः
स्वात्माज्ञानादात्मनो जीवभावः ।
आत्मोक्त्याहिभ्रान्तिनाशे च रज्जुः
जीवो नाहं देशिकोक्त्या शिवोऽहम् ।। 2
रज्जू भासे
सर्प मन्द-प्रकाशी
येते ध्यानी
चूक स्वच्छ-प्रकाशी
तैसा आत्मा
भासतो जीवरूपी
अज्ञानाने
भास होती मनासी ।। 2.1
जेंव्हा सांगे
सद्गुरू हेचि ज्ञान
जेंव्हा होते अंतरी आत्मज्ञान
तेंव्हा होतो
दूर तो भास सर्व
बोले तोची
ब्रह्म ते मीच सत्य ।। 2.2
आभातीदं विश्वमात्मन्यसत्यं
सत्यज्ञानानन्दरूपे विमोहात् ।
निद्रामोहात्स्वप्नवत्तन्न सत्यं
शुद्धः पूर्णो नित्य एकः शिवोऽहं ।। 3
निद्रेमध्ये
स्वप्नमालाचि खोट्या
जैशा येती
सत्यची प्रत्ययाला
अज्ञानाची
गाढ निद्रा तशी ही
आत्मज्ञानाची
घडे विस्मृती ही ।। 3.1
सत् चित्
आनंदा मुके जीव कोणी
मिथ्या संसारा
म्हणे सत्य हाची
जैसी येता
जागृती स्वप्न भंगे
तैसे होता
ज्ञान; अज्ञान संपे ।। 3.2
आहे आत्मा
मीच तो अद्वितीय
ज्यासी नाही
कोणतेही विकार
आनंदाचा सिंधु मी नित्य शुद्ध
बोले तोची
ज्ञान होता शिवोऽहं ।। 3.3
मत्तो नान्यत्किंचिदत्रास्ति विश्वं
सत्यं बाह्यं वस्तु मायोपक्ऌप्तम् ।
आदर्शान्तर्भासमानस्य
तुल्यं
मय्यद्वैते भाति तस्माच्छिवोऽहम् ।। 4
जेंव्हा शिष्या
आकळे आत्मरूप
बोले तोची मीच विश्वस्वरूप ।
विश्वामध्ये
मीच सर्वत्र आहे
माझ्यावाचोनी न काहीच येथे ।। 4.1
बाहेरी जे
विश्व येते दिसोनी
माया सारी
मूळ अज्ञान तेची
वाटे आला
चंद्र पाण्यात कैसा
राहूनीही
तो नभी नित्य ऐसा ।। 4.2
जैसे कोणी
दर्पणी पाहतांना
येतो जन्मा का दुजा दर्पणी त्या ।
तैसे सारे
विश्व हे रूप माझे
जे जे पाहे सर्व ते मीच आहे ।। 4.3
आहे मिथ्या
द्वैत जे ये दिसोनी
आत्म्याठायी जे अनेकत्व दावी ।
ऐसे जाता
द्वैत सारे विरोनी
राहे तोची पूर्ण आत्मस्वरूपी ।। 4.4
तैसा मिथ्या
सर्वदा द्वैतभाव
थेंबोथेंबी
नीरची एकमात्र
चैतन्याने
भाररिले विश्व पूर्ण
सर्वज्ञानी
बोलतोची शिवोऽहम् ।। 4.5
नाहं जातो न प्रवृद्धो न नष्टो
देहस्योक्ताः
प्राकृताः सर्वधर्माः ।
कर्तृत्वादिश्चिन्मयस्यास्ति नाहं
कारस्येव ह्यात्मनो मे शिवोऽहम् ।। 5
जन्मा येणे,
वाढणे, मृत्यु होणे
माझ्या ठायी
ना कधी संभवे हे
देहाठायी
राहती देहधर्म
काया वागे
ती निसर्गानुसार।। 5.1
कल्याणाचा
मीच गाभा सुरेख
आनंदाचा मीच
आनंद थोर
आहे मीची
शुद्धता शुद्धतेची
चैतन्याचे थोर चैतन्य मीची ।। 5.2
कर्तृत्वाने
लिप्त मी होत नाही
सर्वस्वाने
ते अहंकाररूपी
त्याचा माझा
नाचि संबंध काही
आत्मा मी
तो निर्विकारी शिवोऽहम् ।। 5.3
नाहं जातो जन्ममृत्यू कुतो मे
नाहं प्राणः क्षुत्पिपासा कुतो मे ।
नाहं चित्तं शोकमोहौ कुतो मे
नाहं कर्ता बन्धमोक्षौ कुतो मे ।। 6
अस्तित्वाला
आदि ना अंत माझ्या
कैसा यावा
जन्म मृत्यू मला या
नाही नाही
मीच प्राणस्वरूप
लागावी ती
भूक कैसी तहान ।। 6.1
नाही नाही
मीच चित्तस्वरूप
कैसा व्हावा
ह्या मला शोकमोह
ना मी कर्ता
लिप्त कैसा असेन
कैसे कैसे
या मला बन्ध-मोक्ष ।। 6.2
अद्वैताचा
थोर सिद्धांत ज्यात
त्या स्तोत्राचे
श्लोक रत्नासमान
त्यांसी केली
मंजुषा ही मराठी
अर्पे प्रेमे
ही अरूता तुम्हासी
(अरूता - अरुंधती )
----------------------------------------------------

विलंम्बीनाम संवत्सर, चैत्र कृ. एकादशी / वरुथिनी एकादशी / वल्लभाचार्य जयंती . 12 एप्रिल, 2018