अरुंधती प्रवीण दीक्षित यांचे समग्र लेखन खालील कुठल्याही साहित्यप्रकारावर क्लिक करा आणि उघडा. | |
संस्कृत स्तोत्रे, मराठी भावानुवाद, विश्लेषण
| |
|
|
३ |
|
४ |
|
|
बाल साहित्य |
६ | |
७ |
|
Translations by Arundhati Dixit.
Designed by Sumukh Barve.
Visit my website : www.arundhatipraveendixit.com
अरुंधती प्रवीण दीक्षित यांचे समग्र लेखन खालील कुठल्याही साहित्यप्रकारावर क्लिक करा आणि उघडा. | |
संस्कृत स्तोत्रे, मराठी भावानुवाद, विश्लेषण
| |
|
|
३ |
|
४ |
|
|
बाल साहित्य |
६ | |
७ |
|
शिवमानसपूजा
प्रस्तावना-
अंतःकरणात भक्तिभाव दाटून आला की आपल्या
आराध्य देवतेची पूजा करण्यास साधनांचीही आवश्यकता भासत नाही. तेथे कुठल्याही दिखाऊ
बडेजावाची जरुरी पडत नाही. लोकांना दिसावं, लोकांनी वाखाणावं म्हणून कुठलं अवडंबर
असायची आवश्यकता नाही. खूप काळाने आई दिसली की मूल ज्या आसोशीने आईकडे धावत जाऊन आईला बिलगते; ती आसोशी
मानसपूजेत भक्ताच्या मनात आहे. कल्पनेनेच केलेली ही पूजा! कोणी म्हणेल, सर्व
कल्पनेने देवाला अर्पण करायचं म्हणजे, प्रत्यक्षात काही द्यायला लागू नये म्हणून
केलेली कंजुशी आहे. पण !!! मित्रांनो, मनात पूर्ण समर्पणाची भावना असेल तरच माझ्या
देवाला काय देऊ अन् काय नको असं होऊन जातं. तेव्हाच अत्यंत सुंदर कल्पना सुचू
शकतात. नाहीतर भोजराजाकडे ‘श्लोक रचा आणि पैसे मिळवा’ ह्या योजनेअन्तर्गत अनेकजण
येत रहायचे. ‘‘भोजा मला भात दे. भोजा मला वरण दे , भोजा मला तूप दे .....’’ इथपर्यंतच
अनेकांची मजल असे. त्या गृहस्थाला चवथा चरण काही जमेना तेव्हा कालिदासाने त्याला ‘भोजा
मला शरद पौर्णिेच्या चंद्रासारखं शुभ्र दही दे’ हा चवथा चरण सांगितलां. गुणग्राही
भोजानेही फक्त चवथ्या चरणासाठी पैसे दिले. मित्रांनो जेव्हा अपेक्षा येते तेव्हा
मनातला कल्पना विलास सुकून जातो. आद्य शंकराचार्यांचा उत्तुंग कल्पनाविलास मनाला
मोहित करणारा आहे.
ही पूजा अंतःकरणापासून केलेली असल्याने पूजेच्या
बाह्योपचारापेक्षा देवाच्या जास्त समीप नेणारी, आनंद देणारी अशी आहे. शिवानंदलहरींमधे आचार्य म्हणतात `` देवा तुझ्या पूजेसाठी कमळं खुडण्यासाठी कोणी तलावात
जातो तर कोणी बिल्वपत्रांसाठी डोंगर, कडे चढून जातो. इतके सायास करणा र्या ह्या
लोकांना तुला फक्त `सुमनधन' म्हणजे निर्व्याज मनाने केलेली भक्ती आवडते, अनन्य
भावाने तुझ्या चरणी चित्त अर्पण केलेलं आवडतं हे कसं कळत नाही?''
सुपुष्पे अर्पावी तुजसि म्हणुनी मूढमति हे
कुणी पाण्यामध्ये कमळ खुडण्यासी धडपडे
कुणी रानामध्ये निबिड अति एकाकि भटके
फुले पत्री नानाविध मिळविण्या दुर्मिळ फळे।।9.1
कडे पायी पायी चढुन कुणि जाई गिरिवरे
मिळाया बेलाचे त्रिदल हिरवे पान इवले
कळेना कोणासी मन-सुमन हेची तुज रुचे
तुझ्या पायी अर्पी सुमन-धन तो सौख्य मिळवे।।9.2
( शिवानन्दलहरीच्या श्लोकाचा
भावार्थ )
आपल्या गुरूची, निवृत्तीनाथांची मानसपूजा करण्यासाठी ज्ञानदेवांची उतावीळ
मनस्थिती, आपल्या आराध्याची सर्व सेवा आपणच करायची अनन्य वृत्ती अभूतपूर्वच
म्हणावी लागेल. ज्ञानदेव म्हणतात, ``मी माझ्या गुरूची पूजा करीन. मीच पाय धुवीन.
पाणीही मीच होईन. पायही मीच पुसेन पाय पुसण्यासाठी शेलाही मीच होईन. जी जी
पूजासामग्री असेल ती मीच होईन. गुरूचे सर्वस्व मीच होईन. मी माझ्या गुरूचा एकुलता
होईन. हा पराकोटीचा स्वार्थ परमार्थ देणारा असतो.
आचार्यांनी मांडलेली शिवमानसपूजा, यथासांग देवपूजेचे समाधान देऊन जाते आणि
त्याचबरोबर चितःप्रसादही देऊन जाते. प्रसाद म्हणजे मनातील सर्व भाव हृदयाच्या
तळाशी बसून निर्माण झालेली शांत मनस्थिती. गढूळ पाण्यात निवळी फिरवली की पाण्यातील
सर्व अशुद्धता खाली बसून पाण्याला जशी नितळता प्राप्त होते तसा मनाचा नितळपणा हाच
पूजेनंतर प्राप्त होणारा खरोखरचा प्रसाद.
----------------
शिवमानसपूजा
श्लोक 1
बाळाचं कौतुक करायला मातेने त्याला
कितीही गोष्टी दिल्या तरी बाळामधे गुंतलेल्या मनामुळे, बाळाच्या प्रेमामुळे तिला
त्या अपुर्या वाटतात. बाळासाठी सर्व खेळ सोन्याचा करून ठेवावा असं तिला वाटत
असतं. तर आईकडे कशाचाही हट्ट करायला बाळाला दुजेपण वाटत नाही. हा अनन्य भाव आहे.
देणार्या मातेला वा घेणार्या मुलाला आजं दुजं नसतं. ‘देणार्यानी देत जावे आणि
घेणार्यानी घेत जावे.’ पण! बाळाला जरा
समज आली की, आईवडिलांनी आपल्यासाठी किती केलं हा विचार मनात येतो. देणार्यााने
आपल्याला किती दिलं हा विचार जेव्हा मनाला स्पर्श करतो तेव्हा माणूस हिशोब
मांडायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं, देणार्याने कसलीच कसर न ठेवता उदार
हस्ते आपल्याला अनंत अनंत गोष्टी दिल्या आहेत. न मागताही दिल्या आहेत. त्यावेळी
देणार्याविषयी घेणाार्याच्या मनात असीम कृतज्ञता निर्माण होते. आपण देणार्याचे
ऋण तर फेडू शकत नाही पण देणार्याचे मनापासून आभार मानू शकतो. देणार्याच्या असीम
ऐश्वर्यामधे आपल्याकडचा एक छोटासा मणी घालून आपली भावना तरी त्याला सांगू शकतो,
कळवू शकतो. ही अत्यंत प्रेमातून अंकुरीत झालेली भावना असते. काडवातीने सूर्याला
ओवाळणं असो, समु्द्राच्या अपार जलात त्याच्याच जलानी त्याला अर्घ्य देणं असो, वा वडिलांच्याच
ताटातला घास बाळाने वडिलांना भरवणं असो! ह्या कृती वरवर हास्यास्पद वाटल्या तरी
ह्या छोट्या वाटणार्या घटनांमधून त्या बाळाच्या/भक्ताच्या गोड भावना सर्वोच्च
प्रेम व्यक्त करणार्या असतात. बाळासोबत पित्यालाही परमोच्च आनंद देणार्या असतात.
‘घेता घेता घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे.’ ते कसे?---- ते असे! हे विषद
करणार्या असतात. जर त्यानी इतकसच दिलं असेल तर मी त्याला इतकं दिलं तरी बास हा
असा व्यवहार त्यात नसतो.
परमेश्वराने दिलेल्या अनंत गोष्टींचे
उतराई होणे शक्य नसते. पण मनातील अलोट प्रेम व्यक्त करणारी, कृतज्ञतेनी भरलेली
त्याची मानसपूजा देवालही तितकीच प्रिय असते. भक्ताची ही पूजा स्वीकारण्यासाठी तो
प्रत्यक्ष भक्ताच्या हृदयाच्या गाभार्यात येऊन उभा राहतो.
सर्व प्रणीमात्रांचे आत्मीयतेने, अत्यंत
प्रेमाने पालन करणार्या, आपल्या मनाच्या द्वारी उभ्या असलेल्या, आपल्याला भेटायला
आलेल्या पशुपतीला आद्य शंकराचार्य मनातील कल्पनेच्या जगातल्या सर्वोच्च सुंदर,
कलात्मक गोष्टी अर्पण करतात. ते म्हणतात, -----
हे पशुपते, मी मनानीच कल्पना करून एक सुंदर आसन
निर्माण केलं आहे. ह्या सुवर्ण आसनाला मनमोहक कलाकुसर करून त्यावर अत्यंत मौल्यवान
हिरे, माणिक, मोती, पाचू, नीलम अशी विविध रत्ने जडविली आहेत. ह्या आसनाचा आपण
स्वीकार करावा; आपण त्याच्यावर विराजमान व्हावे हे पशुपते!
आपण माझ्यासाठी इतक्या दुरून माझ्या
हृदयात दाखल झाला आहात. आपला शीण दूर व्हावा म्हणून आपल्या स्नानासाठी गंगा, यमुना,
सिंधु, ब्रह्मपुत्रा, ---- अशा नद्यांच्या उगमस्थानाचं निर्मल, पवित्र, शीतल हिमजल
आणलं आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. ह्या निर्मळ, शीतल जलाने मी आपल्याला
प्रेमाने स्नान घालतो. स्नानानंतर आपण परिधान करण्यासाठी साठी विविध उत्तमोत्तम
रत्नांचा कशिदा असलेलं अलौकिक सुंदर (दिव्याम्बरम्) असं
वस्त्र आणलं आहे. मित्रांनो, दिव्यम् चा अर्थ आकाश असाही होतो. दाही दिशाचं वस्त्र
अंगावर ओढून घेणार्या शिवाला दिगम्बर म्हणतात. त्यामुळे सूर्य, चंद्र, तारे रूपी विविध रत्नांचा कशिदा
असलेलं निळ्या नभाचं, उषेच्या मृदुल रंगांचं, संध्येच्या संधिप्रकाशाचं,
सूर्यचंद्राच्या किरणांच्या धाग्यांनी गुंफलेलं, इंद्रधनुषी काठांचं अत्यंत तलम
पोताचं. ज्याला वसुंधरेच्या सर्व सुगंधांचा सुवास आहे असं वस्त्र हे पशुपते मी आपल्याला
अर्पण करत आहे. त्याचा स्वीकार करावा.
एखादया चांगल्या गोष्टीत होणारी वाढ आपण
दुधात साखर असं म्हणून व्यक्त करतो. श्री आद्य शकराचार्य म्हणतात, चंदनाचा शीतल
सुगंध आणि त्यात कस्तुरीचा मनाला वेडावणारा आमोद(सुगंध) अशा दोन सुगंधांच मिश्रण ( मृगमदामोदाङ्कितं चन्दनम्- मृगमद आमोद अङ्कितम् चंदनम्) मृगमद म्हणजे कस्तुरी. चंदन आणि कस्तुरी एकत्र केल्याने अत्यंत सुगंधित
असलेलं चंदन हे दयाघना मी तुला अर्पण करतो.
(आपली भारत भूमी जणु काही सुगंधांची खाण आहे. भारताच्या उत्तरेला
मकुटाप्रमाणे शोभणार्या हिमालयात कस्तुरीमृग असतात तर दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर
असलेल्या मलयगिरीच्या जंगलात चंदन आणि कापुर यांचे वृक्ष वाढतात. तर भारताच्या
पूर्वेला आगरताळा, इ. भाग आणि आता जो भाग म्यानमार म्हणून ओळखला जातो तो सुगंधी
आगरूच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. हे सर्व पूजेाठी मिळविण्यासाठी भारतयात्रा
आपोआपच घडून येते. )
हे दयाघना अत्यंत सुवासिक, ताजी जाई,
जुई,(जाति) चाफा(चम्पक), ह्यांची फुलं, तुला आवडणारं बेलपत्र ह्यांनी माझी ओंजळ
गच्च भरली आहे ती मी तुझ्या चरणी अर्पण करतो.
हे दयासागरा, मी अत्यंत भक्तियुक्त
अंतःकरणाने माझ्या मनातच कल्पना करून तुला धूप, दीप अर्पण करतो. आपण त्याचा
स्वीकार करावा.
मित्रांनो, देवाला यथासांग अंघोळ घालून,
चंदन लावून, फुलं वाहून धूप, दीप लावला की गाभारा किती प्रसन्न वाटतो. हृदयाच्या
गाभार्यात सुस्थापित केलेल्या ह्या दीनबंधु शिवाच्या ह्या पूजेने आपल्या मनाचा
गाभारा पवित्र, प्रसन्न झाल्याशिवाय कसा राहील?
(वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे - 19, गण -म स ज स त त
ग, यति -12,7)
रत्नैः
कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं
नानारत्नविभूषितं
मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् ।
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं
पुष्पं च धूपं तथा
दीपं
देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ।।1
माझ्या
मानसि कल्पना करुनि मी दिव्यासना निर्मिले
रत्नांनी
करुनी सुशोभित तया भावे तुला अर्पिले
स्नानासी
तुज आणिले सलिल मी मंदाकिनीचे भले
आहे
शीतल, शुद्धची, विमल हे प्रेमे तुला अर्पिले।।1.1
वस्त्रे
सुंदर आणिली भरजरी देवा तुला अर्पिण्या
रत्नांचा
कशिदा सुरेख विणला मी त्यावरी साजिरा
पाचू
, माणिक, पुष्कराजचि हिरे मी त्यावरी गुंफिले
मोती
, नीलचि कौस्तुभा जडविले गोमेध, वैडुर्य ते ।।1.2
शंभो
चंदन,कस्तुरी उटि तुला लावी सुगंधी अशी
जाई,
चंपक, बिल्वपत्र भरुनी मी अर्पितो अंजुली
प्रेमे
धूप, सुदीप अर्पण तुला देवा दयासागरा
माझ्या
मानसि कल्पुनीच सगळे मी पूजिले रे तुला।।1.3
-------------------------
शिवमानसपूजा
श्लोक 2
मानसपूजेचा दुसरा श्लोक अशा प्रकारे-
सौवर्णे
नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं
भक्ष्यं
पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् ।
शाकानामयुतंजलं
रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं
ताम्बूलं
मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरू ।।2
हे
पंचामृत अर्पितोच तुजसी ह्या स्वर्णपात्री प्रभो
रत्ने
ज्यावर मौल्यवान असती नानापरीची अहो
चाखूनी
बघ खीर ही रुचिर रे पक्वान्न स्वादिष्ट ही
केळी,तूप,
पदार्थ हे बहुविधा केला स्वयंपाक मी।।2.1
कोशिंबीर,
फळे, मुळे ,सरबते, भाज्याच ताज्या अती
घेई
हे स्फटिकासमान जल तू कर्पूरकांती जयी
प्रेमे
बांधियला त्रयोदशगुणी तांबूल मी मानसी
स्वीकारून
करा कृपा मजवरी विश्वेश्वरा हो तुम्ही।।2.2
आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीसाठी काय करू आणि काय नको असं होतं.
उत्तमातल्या उत्तम गोष्टी त्याला द्याव्याशा वाटत असतात. आद् शंकराचार्य शिवपूजनासाठी कल्पनेनेच अनमोल रत्ने जडविलेल्या
सोन्याच्या नक्षीदार पात्रातून शिवाला नैवेद्य अर्पण करतात.
ते काय काय अर्पण करतात ते पाहू. आपल्याकडे खड्य, भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य, पेय असे भोजनाचे सहा प्रकार मानले
जातात. दाताने चावून खावे लागणारे कडक अक्रोड, जर्दाळू, खडीसाखर, सुकामेवा आदि कडक
पदार्थ खड्य म्हटले जातात तर पोळी, भाकरी भाजी हे चावून खायचे पदार्थ भक्ष्य मानले
जातात. दलिया, आ्मटी, सूप, आंबिल ह्या पदार्थांना भोज्य म्हणतात तर शेवग्याच्या
शेंगा इ. चोखून खायच्या पदार्थांना चोष्य म्हणतात. सरबते, संत्री, मोसंबी, कलिंगड
ह्यांचा रस ही पाण्याप्रमाणे प्यायली जाणारी पेये पेय किंवा पानकम् च्या यादीत
येतात.
आचार्य साजुक तुपात खमंग भाजलेल्या, दुधात शिजवलेल्या
खिरीचा(पायसम्) चा नैवेद्य शिवाला अर्पण करतात. दूध, दही, मध, तूप, साखर युक्त
पंचामृत, पिकलेल्या केळांचा ज्यात सामावेश आहे असे विविध रुचकर पदार्थ (भक्ष्य)
स्वतः बनवून, हृदयाच्या गाभार्यात सुवर्णासनावर स्थानापन्न झालेल्या शिवाला खाऊ
घालतात. विविध फळभाज्या,पालेभाज्या, कोशिंबरी, रायते, लोणची ते मनानेच कल्पना करून
बनवतात. आणि शिवाला प्रेमाने वाढतात. भारतात भाज्यांचे इतके अगणित प्रकार बनविले
जातात..... आणि ह्याच अगणित ह्या
शब्दासाठी येथे ‘अयुतम्’ हा शब्द
वापरला आहे. अयुतम् चा अर्थ हजार. हजारो भाज्या (शाकानाम्
अयुतम्) असं म्हणणार्या शंकराचार्यांच्या मनात देवाला किती पदार्थ,किती
भाज्या बनवू अशी आणि कोणकोणत्या बनवू अशी उत्कट प्रेमामुळे निर्माण झालेली किंचित
सम्भ्रमावस्था दिसते. ज्याचं उत्तर ज्ञानदेवांच्या वाणीत मिळतं. ते म्हणतात,
अत्यंतिक प्रेमाचा माणूस अचानक सामोरा आला तर समोरच्याला गोंधळून जायला होतं.विभ्रम/सम्भ्रम
निर्माण होतो. काय करू काय नको हे सुचत नाही. हे अत्यंतिक प्रेमाचं लक्षण आहे.
मित्रांनो, जेव्हा जरा जरा
हातात लाटणं धरता येणारी छकुली आईने भिजवलेल्या कणेकेची इवललिशी चानकी बनवून
वडिलांना खायला देते त्यावेळी ती न भाजली गेलेली वा भाजून कडक झालेली चानकीही
पित्याला केवढा आनंद देते! येथे तर दिनबंधू शिव आपल्या भक्ताचे कोडकौतुक करत आहे. अनुभवत
आहे. त्यालाही भक्तप्रेमाचा उमाळा नाही आला तरच नवल! अशा भक्ताच्या प्रेमापोटी विठ्ठलालाही
नाम्याच्या हातचा घास खायला लागला होता.
आचार्य शिवाला म्हणतात, ‘‘हे दयाघना विविध सरबतं, फळांचे रस
(पानकम्) मी तुला अर्पण करतो. आणि त्याच्या सोबत स्फटिकाप्रमाणे चमकदार असलेलं
अत्यंत स्वच्छ, शुद्ध पाणी आपल्याला अर्पण करतो. ह्या पाण्यात कापूर, वाळा, मोगर्याचं
फूल अशी सुगंधी द्रव्ये घातल्याने मूळचे स्फटिकाप्रमाणे चमकदार पाणी अजून रुचकर
झाले आहे.’’
सर्व खाण्याचे पदार्थ अर्पण केले तरी ताम्बूल देत नाही तोवर जेवण
पूर्ण होत नाही. दशगुणी, त्रयदशोगुणी असे ताम्बुलाचे प्रकार अत्यंत पाचक, आणि
समाधान देणारे असतात. ‘‘ हे प्रभो मी स्वतःहून आपल्यासाठी अत्यंत सुंदर कलात्मक
रीत्या हा गोविंद विडा बांधला आहे. तो आपण स्वीकारावा’’ असा प्रेमाने, भक्तीने
आद्य शंकराचार्य विश्वेश्वराला आग्रह करत आहेत.
आपल्याकडे दसर्याला वयाने लहान लोक आपल्या कर्तृत्वाचं प्रतिक,
विजयाचं प्रतिक म्हणून सोनं हे आपल्यापेक्षा मोठ्यांना देतात. मोठ्यांनी त्यांचं
कौतुक करावं ही त्यामागे अपेक्षा असते. तिळगुळ मात्र मोठ्यांकडून लहानांनी घ्यायचा
आणि गोड बोलण्याची ग्वाही द्यायची. विडा किंवा तांबूल पत्नी पतीला वा उत्कट समर्पण
भावनेने भक्त देवाला देतो.
--------------------------------
(मित्रांनो, ही पोस्ट शिवमानसपूजेची नसली तरी त्यातील आलेल्या
ताम्बूलाच्या उल्लेखाने लिहाविशी वाटली.)
ताम्बूल/विडा -
पूर्वी कोणी आपल्याकडे आलं वा आपण कोणाकडे गेलो तर काही तरी खाऊ
दिल्याशिवाय जाऊ देत नसत. किमान चहा, कॉफी नाहीतर दूध अगदीच काही नको म्हटलं तर
हातावर चमचाभर साखर तरी ठेवायची पद्धत होती. नागपूरला गेल्यावर ‘‘काही नको’’
म्हटलं तर ‘‘किमान पान तरी खाऊन जा’’ म्हणून आग्रह व्हायचा. लगेचच पानाचं तबक पुढे
येई. हे सजलेलं पानाचं तबक मला माझ्या बालपणात घेऊन जाई. घरी सणासुदीला सवाष्ण
ब्राह्मण वा कोणी जेवायला यायचं असेल तर विडे बनवायचं काम आम्हा मुलींकडे येई.
तबकात छान मोठी मोठी जरा हिरवट पिवळसर रंगाकडे झुकलेली,मऊ नागवेलीची पानं, कात,
चुना, वाट्यांमधे मसाला सुपारी (घरी बनवलेली), बारीक लखनवी बडिशेप, गुलकंद, ताजं
खोवलेलं ओलं खोबरं, वेलदोडा, लवंग, गुंजेचा पाला, अस्मन्तारा (पुदिन्याचा अर्क)
अशी बरीच सामग्री असायची. पानांच्या गठ्ठ्यातील वीडा बांधता येईल अशी सुबक पानं
वेगळी काढून, पुसून, येणार्या पाहुणे किती आहेत याचा हिशोब करत विडे एका पानाचे
लोडाचे का दोन पानाचे घडीचे का तीन वा पाच पानाचे गोवंद विडे --- का सशाच्या
कानाचे विडे हे ठरवत आम्ही विडे बांधत असू. पानं चांगली नाहीच मिळाली किंवा विसरली
तर कोपर्यावरून पानपट्टी आणायचं कामही करावं लागे. पानपट्टी, लोडाचे, घडीचे,
गोविंद वा कानाचे विडे हा चढत्या भांजणीने विड्याची श्रीमंती दाखवणारा सोपान आहे
असं मला वाटतं.
विडा बांधणं ह्या कारागिरी इतकच विड्याच्या आतील रसायन जसं हवं तसं
जमणं हे हेही कौशल्य असे. चुना कात जास्त नको. चुना जास्त झाला तर जीभ भाजते.
जास्त कात विडयाला कडवट चव देतो. पण विडा रंगायलाही हवा. फार गोड नको आणि कोरडा
रुक्षही नको. सर्व काही प्रमाणात हवं. असा तोल सांभाळत निगुतिने केलेला विडा खाऊन
पाहुण्यांनी कौतुक केलं की पानं नखलून दुखणारी बोटंही खूष होत.
आपल्याकडे काव्य प्रकारात विडा हा फार सुंदर काव्य प्रकार आहे. ‘‘विडा
घ्या हो नारायणा’’ म्हणत रुक्मिणी आपल्या रुक्मिणीकांताला विडा देऊ करते. पत्नी
आपल्या पतीला अथवा यथासांग पूजेनंतर भक्त आपल्या आराध्याला विडा/ तांबूल अर्पण
करतो. ह्या विड्यांची बांधणी मोठी सुंदर असते. हीच कल्पना मनात धरून उमेच्या मुखात
असलेल्या तांबुलाचं वर्णन शिखरिणीमधे करायचा अरुंधतीने प्रयत्न केला.
सदा शांतीच्या या हरित मनपर्णावर उमे
अशांती
रूपी या नखलसि शीरा देठ निगुते
उमे जाळोनीया सकल अवघे मीपण सुखे
चुना मोतीयाचा धवल हळु लावी तव करे ॥ 3.1
मनाचा बुद्धिचा करुनी अडकित्ता
कतरसी
मनीषांची
सार्या अवघड सुपारी कुरकुरी
सुबुद्धीची घाली रुचकर बरी वेलचि वरी
विवेकाचा लावी लव अरुण तो काथ वरती ॥ 3.2
सुगंधी कस्तूरी विविध तव अंगीकृत कला
विड्यामध्ये घाली हृदय जणु का केशर अहा
महा वैराग्याची परिमलयुता जायपतरी
महा
संकल्पाचे सबळ वर हे जायफळही॥ 3.3
तयी भावार्थाचा अति रुचिर कर्पूर सजवी
दयाबुद्धीरूपी सुमधुर खडीसाखर गुणी
विडा
बांधूनी हा त्रयदशगुणी सात्विक अती
क्षमारूपी
त्याच्यावर जणु लवंगा ठसविसी ॥ 3.4
असा घोळे जोची त्रयदशगुणी तांबुल मुखी
तुझ्या भक्तांना तो अनुपम सुखे दे मिळवुनी
उमेच्या मुखातला हा तांबूल साधासुधा नाही तो त्रयोदशगुणी ताम्बूल
आहे. तिच्या सर्व गुणांनी रंगला आहे. भक्त त्याचे दोष जाळून, सर्व गुण एकत्रित
करून बांधलेला ताम्बूल आपल्या आराध्याला अर्पण करतो. काही वेळेला मात्र वेगळा
प्रसंगही येतो.
(सौंदर्य लहरींमधे) राक्षसांसोबत युद्ध जिंकल्यावर आपण युद्ध
जिंकलं हे सांगण्यासाठी देवेंद्रासहित सर्व देव इतके उतावीळ होतात की, आपला
पराक्रम सांगण्यासाठी, कौतुक करवून घेण्यासाठी सारे देव आपले युद्धभूमीवरील
शिरस्त्राण, चिलखत/ कवच हा पोशाख न बदलताच प्रथम शिवाकडे न जाता मनापासून कौतुक
करणार्या आपल्या पार्वतीमातेचं दर्शन घ्यायला येतात. त्यावेळी पार्वती आपल्या
मुखातील त्रयदशोगुणी तांबुल त्यांना भरवून आपल्या सर्व पुत्रांचं/ सर्व देवांचं
कौतुक करते असं वर्णन आहे.(श्लोक 65)
मित्रांनो उमेच्या मुखातील
तांबूल आहे तरी कसा ह्याचं वर्णन म्हणूनच आधी वर दिलं आहे. आपण आत्मसात केलेल्या
सर्व विद्या, कला, गुण ह्यांच प्रतिक हा तांबूल आहे. हे सर्व गुण, कला विद्या जणु
काही तिच्या जिभेवरच ताम्बूल रूपात हजर आहेत. असा ताम्बूल आपल्या पुत्रांना सहज
आत्मसात करता येईल अशा प्रकारे ती प्रत्येक पुत्राला भरवत आहे.
रणी दैत्यांना त्या करुनिच पराभूत सहजी
रणातूनी येती सुरगण कराया नमनची
असे अंगी त्यांच्या चिलखत रणी जे
चढविले
सवे त्याच्या येती प्रथम करण्या
वंदन शिवे ।। 65.1
प्रसादाची माते धरुन मनि गे आस तुझिया
शिरीचे काढूनी मुकुट करती वंदन तुला
प्रसादा देऊनी सुखविसि सुरांसीच
सकला
तुझ्या तांबूलाने सकल म्हणती धन्य
क्षण हा ।। 65.2
अहो असा ताम्बूल मातेच्या मुखातून प्रत्यक्ष मिळाला तर निरस जीवन सर्व
रसांनी परिपूर्ण नाही झालं तरच नवल! रंगहीन आयुष्य रंगात न्हाऊन निघालं नाही तरच
आश्चर्य! निरुद्देश्य जीवनाला उद्दिष्ट सापडलं नाही तरच अपूर्वाई!
--------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
शिवमानसपूजा
श्लोक 3
छत्रं
चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं
वीणाभेरीमृदङ्गकाहलकला
गीतं च नृत्यं तथा।
साष्टांगं
प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया
संकल्पेन
समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ।।3
छत्रासी
धरितो शिरीच तुझिया; शंभो शिवा शंकरा
चौर्या
ढाळिन मस्तकीच तुझिया मी आवडीने शिवा
पंख्याने
हळुवार घालिन तुला वारा चि विश्वंभरा
भावे
निर्मळ दर्पणासि तुजला मी अर्पितो सुंदरा ।।3.1
वीणा,ढोल,मृदंग,काहल अशी वाद्येचि नानाविधा
सेवेसी
तुझियाच वाजविन मी हे विश्ववंद्या शिवा
झालो
धन्यचि गाऊनी तव स्तुती रंगी तुझ्या रंगलो
आनंदे
विसरून भान सगळे मी नाचतो नाचतो।।3.2
आले
चित्त उचंबळून मम हे नेत्री तुला पाहता
माझा
मी नच राहिलो तव पदी मी अर्पिला देह हा
हाची
रे प्रणिपात पावलि तुझ्या साष्टांग मी घातिला
संकल्पा
करुनी यथाविधि असे मी पूजिले रे तुला।।3.3
माझ्या
मानसपूजना अनुमती देऊन स्वीकार ती
सारे
अर्पण रे तुला पशुपते स्वीकार सेवा च ही
झालो
मी कृतकृत्य मोदलहरी आनंदसिंधुत या
जैसे
मीठ जळी तसेच सहजी मी रे मिळालो तुला।।3.4
आचार्य शिवाला संबोधून म्हणतात, हे विभो, तू अत्यंत शक्तिशाली
आहेस, धीर, वीर आत्मसंयमी आहेस. जितेंद्रिय आहेस. तूच काळ आहेस, सर्वव्यापी
अन्तरिक्ष तूच आहेस, सर्वव्यापी आत्मा तूच आहेस हे प्रभो, तू सर्वांचा स्वामी
आहेस. सर्वांवर शासन करणारा शासक तूच आहेस. (प्रभु आणि विभुचे इतके अर्थ आहेत.) हे
शिवा तू सर्व जगावर सत्ता गाजवणारा शासक, जगाचा सम्राट आहेस. म्हणून मी तुझ्या
मस्तकावर सम्राटाच्या मस्तकावर धरतात तसे श्वेत छत्र धरून उभा राहीन. तुझ्या
मस्तकावर मी अत्यंत प्रेमाने चौर्या ढाळीन (राजाच्या दोन्ही बाजूला दोन सेवक
रेशमी धाग्यांच्या/ केसाळ गुच्छाप्रमाणे चौर्या/चामर हलवत असतात.) व्यजनम् म्हणजे
पंखा. आचार्य म्हणतात, अहो सम्राटांच्या सम्राटा शिवा मी आपल्याला पंख्याने वारा
घालीन. आपली यथासांग पूजा झाल्यावर आपले प्रसन्न रूप पहाण्यासाठी हा अत्यंत स्वच्छ,
निर्दोष असा आरसा अर्पण करत आहे. आपल्याला मी माझ्या मनाप्रमाणे खूप छान सजवले
आहे. आपले हे उमदे, देखणे आरशात निरखून
बघावे. आपल्याला माझी पूजा पसंतीस उतरली का नाही हे मला कळू द्या. मित्रांनो, आरशात
आपणच आपल्याला पाहतो. आपलच प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळतं. येथे आचार्य मनाने
कल्पना केलेला मनाचाच आरसा शिवासमोर धरत आहेत. मनामधे ह्या विश्वरूप शिवाचं
प्रतिबिंब अनुभवणं म्हणजे जीव हा शिवाचं प्रतिबिंब आहे ह्याचा अनुभव घेणं आहे.
प्रत्यक्ष बिंबाला सजवलं की हे प्रतिबिंब जास्त जास्त सुंदर होणार आहे. आपलं जीवन
सुंदर करायची ही कला आचार्य सांगत आहेत.
हृदयमंदिरात स्थानापन्न झालेल्या स्वामी शिवशंभो, आपल्या करमणुकी
साठी, आपल्याला आनंद वाटावा म्हणून मी वीणा, भेरी, मृदंग, काहल अशी असंख्य वाद्य
वाजवत आहे. संगीत, नृत्य, गायन, वादन , नर्तन अशा अनेक कला आपल्यासमोर सादर करत
आहे. मंत्र, स्तोत्रे ह्यांच्या सादरीकरणातून अनेक प्रकारे आपली स्तुतीस्तोत्रे
गात आहे. हे प्रभो, ही पूजा करताना माझं मन इतकं उचंबळून आलं आहे की, हातातील काठी
सुटताच ती जशी जमिनीवर आडवी पडते तसे मी आपल्याला सर्वभावे शरण आलो आहे. माझ्यातील
द्वैतभाव संपल्याने, शरीरभाव सुटल्याने काठीप्रमाने माझं शरीर तुझ्या समोर पडत
आहे. हाच माझा आपल्याला घातलेला साष्टांग प्रणिपात आहे. माझी ही विशुद्ध भावाने
अर्पण केलेली ही पूजा हे प्रभो आपण स्वीकार करावी
महादेवा!
शिवमानसपूजा
श्लोक 4
(शार्दूलविक्रिडित - म स ज स त त ग)
आत्मा
त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं
पूजा
ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः
सञ्चारः
पदयोर्प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो
यद्यत्कर्म
करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्।।4
आत्मा
तू स्वयमेव; बुद्धि मम ही साक्षात् उमा शांकरी
पंचप्राण
सवंगडी सहचरे; प्रासाद कायाच ही
घेण्यासी
विषयोपभोग सगळे केलीच जी मांडणी
तेची
पूजन रे तुझे पशुपते; निद्रा समाधी स्थिती ।।4.1
माझी चाल, परिक्रमा विधिवता आहे तुला घातली
जे
जे बोल मुखातुनी प्रकटती आहे स्तुती ती तुझी
जे
जे काम करीन मी, तवचि ती पूजा असे
निश्चिती
शंभो
हे मजला न वाचुन तुझ्या आराध्य ह्या जीवनी।।4.2
सुहृत् हो! पूजेचा हा सर्व खटाटोप कशासाठी? असं म्हणतात, शिव बनून
शिवाची पूजा करावी. भक्त हयाचा अर्थच जो देवाहून विभक्त, विभाजित आहे तो. पूजा
करता करता हे अंतर, हे द्वैत संपून जावं, भक्त आणि भगवंतात अंतर उरू नये भक्त
भगवंतमय होऊन जावा, भक्त, भक्ती आणि भगवंत ही त्रिपुटी एक व्हावी हीच भक्तीची,
पूजेची, उपासनेची, आराधनेची अत्युच्च पायरी आहे. आपल्या शिवस्वरूपी उपास्य
तत्त्वाला हा जीवनमुक्त महात्मा निर्गुण रूपात पाहो, विश्वरूपात पाहो वा सगुण
साकार रूपात पाहो तो अज्ञान रहित झाल्याने त्याच्या बुद्धीत कशाने गोंधळ निर्माण
होत नाही.
मग आचार्य म्हणतात, माझा आत्मा हाच शिव आहे. योग्य अयोग्याचं ज्ञान
देणारी माझी विवेकरूपी मति हीच गिरीजा आहे. ती ह्या गिरिजेश्वराला नित्य साथ देत
आहे. माझे पंचप्राण हेच माझे नित्याचे सोबती आहेत. अजून वेगळ्या सख्या सोबत्याची
मला आता जरूर राहिलेली नाही. मी माझी कर्मे करत असताना ज्या ज्या विषयांचा उपभोग
घेत आहे तीच अत्यंत सुबकपणे सजवलेली देवाची आरास, माझी पूजा आहे. मी झोपतो तीच
माझी समाधिस्थिती आहे. मी पायाने जेथे जेथ जाईन ती माझी शिवप्रदक्षिणा आहे. मी जे
काय बोलीन हे शंभो ते तुझे स्तुतीमंत्र आहेत. आणि जे जे काम करत आहे ते ते सर्व
तुझी आराधना, तुझी पूजा, तुझीच उपासना आहे.
मित्रांनो, हे शब्द, हे विचार एवढे सरळ सोपे नाहीत. संपूर्ण
समर्पणानंतर स्वतःचं काहीच उरत नाही. आपले विचार, आचार जीवन सर्व भगवंताचं होऊन
जातं. अशा स्थितीला पोचल्यावरच सहजपणे आद्य शंकराचार्यांच्या मुखातून ते सहजपणे
स्फुरले आहेत. सोन्यातील हीण निघून जाऊन शुद्ध सोनं मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे
सोन्याला मुशीत वारंवार तापवाव लागतं त्याप्रमाणे भक्ताचा भगवंत होण्यासाठी फार
मोठं अग्निदिव्य करावं लागतं.
आपण द्वैत कुठे ठेवायचं आणि अद्वैत कुठे ठेवायचं ह्यासाठी
गीता/ज्ञानेश्वरीत एक छानशी क्षितिज रेखा दाखवली आहे. जोवर शरीर आहे तोवर शरीरधर्म
असतो. नित्य नैमित्तिकं ही प्रत्येकाला करायलाच लागतात. कर्माशिवाय तर कोणी राहू
शकत नाही. पण, ‘‘मी काम करतोय’’ हा अहंकार सुटला, ‘‘मी फक्त निमित्त आहे.’’ असं
आतपासून, हृदयापासून वाटलं तरच हे कर्तेपण सुटतं.
कर्मापासून मिळणारं फळ शिवाला अर्पण केलं की आपलं काम सफळ होवो वा निष्फळ!
सुखदुःखापासून मुक्ती मिळून एक चिरंतन आनंद मिळतो. अशी मनाची कायमस्थिती प्राप्त
झाली की मगच कुठलंही केलेलं काम शिवाची पूजा स्वरूप असतं. चालणं ही सुद्धा
शिवप्रदक्षिणाच होते. लोभ, मोह, मत्सर, क्रोध वा अज्ञानाचा, लेशही न उरल्याने हा
जीवनमुक्तात्मा जे जे बोलेले ते अमृताप्रमाणे रसाळ, जीवनदायी रंजल्या
गांजलेल्यांचेही दुःख दूर करणारी जणु शिवस्तुतीच असते. आत्माही शिवस्वरूप होतो आणि
त्याला नित्य साथ देणारी कायम धर्मपथावरून चालणारी बुद्धी गिरीशाची अर्धांगिनी
गिरीजा होते. सम्पूर्ण जीवन हीच शिवपूजा ठरते.
शिवमानसपूजा
श्लोक 5
(वृत्त-मालिनी, गण- न न म य य, यति-8,7)
करचरणकृतं
वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं
वा मानसं वाऽपराधम्।
विहितमविहितं
वा सर्वमेतत्क्षमस्व
जय
जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो।।5
(विहित - कलेले काम, क्रमबद्ध,
नियोजितपणे केलेले काम)
घडुनि
सहजि गेले पाप हातून माझ्या
अनुसरलि
पदे ही दुष्ट वाटा जगाच्या
नयन,श्रवण,वाचा
यांनि केल्या चुका ज्या
अनुचित
मनि आले त्रासदायीच माझ्या।।5.1
उचित
अनुचिताचे भान ना ठेविले म्या
भरकटतचि
गेलो मी चुकोनी पथाला
मजकडुनि
जहाले पाप वा पुण्य जे का
करि
मजसि क्षमा तू दीनबंधो कृपाळा।।5.2
हे दीनबंधो! माझ्याकडून कळत न कळत अनेक अपराध घडले आहेत. घडत आहेत.
माझ्या हातून अनेक अनुचित कृत्य घडत असतात. काही जाणीवपूर्वकही केली जातात काही
माझ्या न कळत होऊन जातात. ज्याची जाणीव मला नसते. माझे पाय अनेक वेळा जो नको तोच
मार्ग अनुसरतात. योग्य मार्गावरून माझं पाऊल घसरत आहे ह्याची जाणीव होऊनही त्या
वाईट, अधम मार्गाचा त्याग मी दर वेळेला करू शकतोच असं नाही. माझं शरीर मला नाना
मोहांकडे जायला उद्युक्त करत असतं. हे मोहाचे रस्ते हितकारक नाहीत हे माहित असूनही
त्या पापाचरणाची ओढ मला ते निंद्य कर्म करायला भाग पाडते. कधी माझ्या न कळत योग्य
मार्ग समजून मी अयोग्य मार्गाला कसा लागतो ते
मलाही कळत नाही. माझ्या बोलण्यामधून अनेक वेळा अनेकजण दुखावले जातात. दर
वेळी मला त्याची जाणीव होतेच असं नाही. माझे डोळे, माझे कान नको तेथे रुची
दाखवतात. आणि लोभवशात नीच गोष्टींचा स्वीकार करतात. माझ्या कर, चरण, वाचा, श्रवण
आणि नयनाद्वारा , माझ्या कर्मातून कळत न कळत अनेक अपराध घडत राहतात.
हे दयाघना, तुलाही माहित आहे की मूल बाहेर खेळायला गेलं की, त्याला
ओढून आत आणलं तरी ते घरात येत नाही उलट जास्तच कांगावा करतं; पण त्याचे इतर
मित्रांसोबत पटलं नाही वा भांडण झालं, भूक
लागली वा आईची आठवण आली की ते पळत घरात येतं. आईही आपल्या मातीने भरलेल्या
छकुल्याला उचलून घेते. त्याच्या डोळ्यातील पाणी पुसते. त्याला खाऊ देते. त्याचे
लाड पुरवते. त्याचे सर्व अपराध पोटात घालते. तसं तू मला जवळ घे. मी दीन आहे तर तू
दीनबंधू आहेस. माझ्याहून दीन कोणी नाही आणि तुझ्याहून अजून दयाळू कोणी नाही.
म्हणून मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
हे महादेवा! तू देवांचाही देव आहेस. तुझ्या असीम कर्तृत्त्वामुळेच
तुला सारे महादेव म्हणतात. तू करुणेचा सागर आहेस. (करुणाब्धि), तुझ्या
भक्ताचं तू कायम कल्याणच करतोस. माझे जाणता अजाणता झालेले सर्व अपराध तू पोटात
घाल. मला क्षमा कर. शं म्हणजे कल्याण तू शं कर म्हणजे
कल्याणकारी आहेस. तुझा मी जयजयकार करतो.
-----------------
महाशिवरात्र
26 फेब्रुवारी 2025