षट्पदीस्तोत्रम्
                                               कर्णमधुर अक्षरांची यमक घेत आर्यावृत्तात गोल गोल फिरणारं हे स्तोत्र  श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचले आहे.  सहा श्लोकांचं असल्याने त्याला षट्पदी  म्हटले आहे. षट्पद म्हणजे भुंगा.  भुंगा कमळाच्या सुगंधाने मुग्ध होऊन त्यावर गोल गोल आवर्तनं घेत राहतो. परमेश्वराच्या नामस्मरणाची माधुरी आणि सुवास माझ्या मुखात सतत असु द्यावा, माझ्या मुखकमलात षट्पदी सतत घोळत रहावी असे आचार्य म्हणतात.
समुद्र आणि तरंग यांचा दृष्टांत देऊन प्रभुची भक्ती, प्रेम आणि अद्वैत तत्वज्ञानाचा सुंदर मेळ तिसर्‍या श्लोकात आचार्यांनी साधला आहे. समुद्रात तरंग आहेत म्हणून त्याला कोणी तारंग तर म्हणत नाहीत ना? मी तुझा आहे हे जरी खरं असलं तरी मी तुला माझं कसं म्हणू? असा सुंदर विचार आचार्यांनी मांडला आहे. 
               ज्ञानेश्वरीतील सातव्या अध्यायात (12वा श्लोक) पाहू जाता ज्ञानदेवांनीही या तत्त्वज्ञानाचा विस्तार अनेक दृष्टांत देऊन केला आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, -  ``वृक्षाचे सार एकवटून बीज तयार होते. त्याच बीजातून  वृक्षाचे खोड तयार होते. जसा त्या काष्ठाठायी बीजपणा नसतो तसा ब्रह्मापासूनच तयार झालेल्या ह्या जगात मी नसतो. मेघ आकाशात तयार होतात पण त्यात आकाश नसते.पाणी मेघात राहते म्हणून  पाण्यात मेघ नसतो. किंवा ज्या जलाच्यायोगाने वीज चमकते त्या वीजेतही पाणी नसते. अग्नीतून धूर येतो हे मान्य असले तरी धूरात अग्नी नसतो. त्याप्रमाणे विकार म्हणजे मी नोहे. (विकार म्हणजे परिवतिर्तित अवस्था)
               एकनाथांनीही हाच विचार त्यांच्या अभंगात बोलून दाखविला आहे -
  संता अंकी देव वसे । देवा अंकी संत बैसे
ऐसी परस्परें मिळणी । समुद्र तरंग  तैसे दोन्ही

             संतशिरोमणी श्री नानकजी त्यांच्या एका `पउडी' मधेही अशाच आशयाचे तत्वज्ञान सांगतात. - `नदिआ अतै वाह, पवहि सामुंदि न जाणी अहि॥' एक लहान ओहोळ वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतो. समुद्राशी एकरूप होतो. त्याचे स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही. पण तरीही त्याला समुद्राच्या अथांगपणाचे पूर्ण ज्ञान होत नाही. 

( वृत्त- आर्या , मात्रा 57  )

अविनयमपनय विष्णो दमय मन: शमय विषयमृगतृष्णां।
भूतदयां विस्तारय तारय संसारसागरत: ।।1

अविनय सकलचि माझा। जा दूर दूर घेऊनी देवा
पवन चपल मन माझे । संयम त्यासीच शिकवाना।।1.1

तहानले मन माझे । त्या मृगजळ विषयांचे भुलवीते
मन व्यर्थ धावते हे। ही घोर तहान  शमवीजे।।1.2

वृत्ती गात्रांठायी। तिजला लीन करी आत्म्याठायी
शास्त्राच्या नियमांची। लावी शिस्त मम गात्रांसी।।1.3

करुणा भूतदया ही। बहरो हृदयी रे मम नित्य हरी
पार करी मज तूची। भवसागर खवळला भारी।।1.4दिव्यधुनीमकरन्दे परिमलपरिभोगसच्चिदानन्दे।
श्रीपतिपदारविन्दे भवभयखेदच्छिदे वन्दे ।।2

 चरण तुझे श्रीरंगा। फुलली कमले गोंडस गोविंदा
मकरंद त्यात दडला। मंदाकिनी सुरसरितेचा।।2.1

मोहक परिमल त्याचा। कल्याण, सत्य,सुख यांचा ठेवा
समूळ नाशी तो या। भवभय-वृक्षास दुःखाच्या।।2.2

शरण शरण मी देवा। पायी तव  ठेवीतो मम माथा
मज द्या आशीर्वादा । विसर न पडो तव चरणांचा।।2.3
सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं न मामकिनस्त्वम्।
सामुद्रो हि तरङ्गः क्वचन समुद्रो न तारङ्गः ।।3

आहे सत्यचि देवा। तू मी भेद नसे अद्वैती या
जरि तू पालक माझा। एकुलता मी न तव देवा।।3.1

तरंगमय हा सिंधू। त्या तारंग  कसेची  संबोधू
तैसा अंश तुझा मी । परि तू माझा कसे बोलू?।।3.2
उद्धृतनग नगभिदनुज दनुजकुलामित्र मित्रशशीदृष्टे।
दृष्टे भवति प्रभवति न भवति किं भवतिरस्कारः।।4

गोवर्धनगिरिधारी । तू गोकुळ तारिलेस हरि सहजी
वामन रूप धरोनी ।  दानव संहारिले तूची।।4.1

देवा नयन तुझे हे। तेजस्वी सूर्य चंद्रमा दोघे
निरखी जग हे सारे । ऐसे सामर्थ्य कोणाचे।।4.2

दर्शन तव जरि घडले। मज संसार भय मगचि कैसे ते
चित्ती माझ्या कोठे। जागा आसक्तिला लाभे।।4.3
मत्स्यादिभिरवतारैरवतारवताऽवतासदा वसुधाम्
परमेश्वर परिपाल्यो भवता भवतापभीतोऽहम् ।।5

धारण करुनी रूपे। तू मत्स्य,कच्छ,कूर्म, वराहाची
संकटि अवतरलासी । ताराया याचि वसुधेसी ।।5.1

भवभय घाली भीती । सुचते ना मजला काही काही
सांभाळावे मजला । स्वामी माझाचि तू असशी ।।5.2
दामोदर गुणमंदिर सुंदरवदनारविंद गोविंद ।
भवजलधिमथनमंदर परमं दरमपनयत्वं मे ।।6

बांधुन दोरी उदरी । तुज  बांधिते यशोदा उखळासी
 दामोदर सुंदर तू । गुणसागर मुरलिधर-मूर्ती।।6.1

वदन तुझे सुंदरसे। जणु नीलकमल डुलते अस्फुट हे
गोपालक! पालक तू । काया,वाचा, धरेचा रे।।6.2

मंथन करिसी भवधी। कणखर मंदार- गिरी होऊनी
थरथर कापे मी ज्या। ते  यम-भय टाक रे पुसुनी।।6.3
नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ।
इति षट्पदी मदीये वदनसरोजे सदा  वसतु ।।7

नारायण नारायण। करुणासागर हे जगताधारा
शरण शरण मी तुजला। चरण कमल वंदितो देवा।।7.1

स्तोत्र सहा श्लोकांचे। अति मधुर सुमधुर षट्पदी नामे
नित्य निरंतर राहो । सुखवीत मम मुखकमलाते।।7.2

------------------
प्रस्तावनेत दिलेली नानक रचना -गुरू नानक वाणी, ( जपुजी साहिब) मधून घेतली आहे. अनुवादक विनायक लिमये आणि तारासिंह गोरोवाडा.

सालाही सालाहि, एती सुरति न पाईआ
नदिआ अतै वाह, पवहि सामुंदि न जाणीअहि
समुंद साह सुलतान, गिरहा सेती मालु धनु
कीडी तुलि न होवनी, जे तिसु मनहु न विसरहि।॥


(सालाही - स्तुती करण्यायोग्य;  सालाहि- स्तुती करून; एती - इतकी; सुरति - ज्ञान, समज; न पाईया - प्राप्त होत नाही; अतै - जसे; समुंद साह सुलतान - समुद्रांचा सुलतान; गिरहा सेती - पर्वता एवढे; तुलि - तुलना; न होवनी - होणार नाही; तिसु मनहु- त्याच्या मनात; न विसरहि - जर तू नसशील;  वाह - ओहोळ; पवहि- जाऊन मिळतो; न जाणी अहि - कळत नाही. )

विजयनामसवंत्सर वैशाख शुद्ध पंचमी,शंकराचार्य जयंती/ 15 मे 2013


  

No comments:

Post a Comment