कल्याणवृष्टिस्तोत्रम्

Image result for श्री त्रिपुरसुंदरी Images
                   

            सर्व भक्तबांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! श्री आद्य शंकराचार्य आपल्या कल्याणवृष्टि स्तोत्रात श्री त्रिपुरांबिकेच्या पायी असलेल्या अनन्य श्रद्धेसंदर्भात असं म्हणतात की, ही अनन्य श्रद्धा फार अलौकिक असते. ती भक्तावर कल्याणाचा वर्षाव करते.  भक्ताचे सर्व मनोरथ सिद्धीस नेते. हीच श्रद्धा भक्ताच्या हृदयात असं काही परिवर्तन घडवून आणते की तो भक्त सामान्य रहातच नाही. मग त्याच्या हृदयात तेवणारी ती श्रद्धेची दिवटी वा मशाल पाहून स्वतः रमाच त्याच्यापाशी चालत येते.
               ही त्रिपुरेश्वरी म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून भक्ताच्या हृदयात निवास करणार्‍या सत्व, रज आणि तम ह्या तिनही पुरांची विवेकरूपी मालकीण ! जागृति, स्वप्न, सुषुप्ति ह्या तिनही अवस्थांमधे जीवाला सांभाळणारी अधिष्ठात्री. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहांची अधिष्ठात्री. त्रिपुरा, त्रिपुरेश्वरी, त्रिपुरसुंदरी! माते तुला शरण येताच भय पळून जाते. अज्ञान विरुन जाते. ज्ञानाचा उदय होतो.  सर्व ऐश्वर्य भक्तचरणी हात जोडून उभे राहते. 

( वृत्त - वसन्ततिलका, अक्षरे- 14, गण - त भ ज ज ग ग , यति - पाद )
कल्याण-वृष्टिभिरिवामृत-पूरिताभि-
र्लक्ष्मी-स्वयंवरण-मङ्गल-दीपिकाभिः ।
सेवाभिरम्ब तव पाद-सरोज-मूले
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ।।1

माते तुझ्या कमलकोमल पादपद्मी
श्रद्धा अनन्य धरुनी करिताच भक्ती
होई महान परिवर्तन भक्त-चित्ती
श्रद्धेस का जगति याचि अशक्य काही? ।। 1.1

भाग्यास पारचि नसे तव सेवकाच्या
वर्षाव त्यावर घडे जणु अमृताचा
कल्याण भाग्य सुख शोधत त्यास येई
श्रद्धा अलौकिकच ती नच काय देई ।। 1.2

येई स्वतःहुन रमा निज पावलांनी
श्रद्धा सुदीप  हृदि तेवतसे बघोनी
सेवा तुझी त्रिपुरसुंदरि जो करी गे
त्यासी अशक्य जगती सुख काय आहे ।। 1.3
 Image result for श्रीयंत्र Image

एतावदेव जननि स्पृहणीयमास्ते

त्वद्वन्दनेषु सलिल-स्थगिते च नेत्रे ।

सान्निध्यमुद्यदरुणायुत-सोदरस्य

त्वद्विग्रहस्य परया सुधयाऽऽप्लुतस्य  ।। 2


मी नित्य वंदन करो तव पावलांसी
यावेच नेत्र भरुनी तव दर्शनानी
यावे असंख्य सविता उदयाचलासी
तैसीच देहलतिका तव उज्ज्वला ही ।। 2.1

सख्खाचि बंधु तव सूर्य  सहस्र-रश्मी
तेजोमयी अरुण वर्ण तुझा तसाची
काया तुझी निथळते जणु अमृताने
तेजोमयी अरुण-वर्ण-सुधेत माते ।। 2.2

ओथंबली अरुणवर्ण-सुधारसाने
ऐसीच मंगलमयी तव मूर्ति माते
सानिध्य नित्यचि घडो मज मूर्तिचे ह्या
ही कामना मम हृदी जननी असे गा ।। 2.3
 Image result for श्रीयंत्र Image
ईशत्व-नाम-कलुषाः कति वा न सन्ति
ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
एकः स  एव जननि स्थिरसिद्धिरास्ते
यः पादयोस्तव सकृत् प्रणतिं करोति ।। 3

श्रेष्ठत्व ते मिरविण्या बहु देववृंद
घेतीच `ईश' पदवी परि ती असार
ईशत्व जे डळमळे प्रलयापुढे गे
आहेच लांछन महा पदवीस त्या हे ।। 3.1

जो एकवेळचि स्मरे तुजला शुभांगी
श्रद्धा धरून हृदयी तव पावलांसी
सिद्धी तयास वरती अति आदराने
वस्ती तयांचिच निरंतर भक्तसंगे ।। 3.2
 Image result for श्रीयंत्र Image
लब्धा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनं
कारुण्य-कन्दलित-कान्ति-भरं कटाक्षम् ।
कन्दर्प-कोटि-सुभगास्त्वयि भक्तिभाजः
सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयेऽपि ।। 4
(सकृत् - एकवेळा ; कन्दलः - नवीन अंकुर)

दृष्टी तुझीच जननी अति कोमला ही
कारुण्य कोंब अति कोमल त्यास येती
प्रेमार्द्र एक तव हाचि कृपाकटाक्ष
ज्याच्यावरी पडतसे नर तोचि धन्य ।। 4.1

ते भक्त कोटि मदनांसहि लाजवीती
गे व्यक्तिमत्व अति लोभस प्राप्त त्यांसी
भाळे तयांवर नितांत युवापिढी ही
त्यांनाच ती अनुसरे जगती कुठेही ।। 4.2

दृष्टिप्रभाव तव हा अति रम्य माते
भक्तास दे मिळवुनी नित भाग्य मोठे ।। 4.3
 Image result for श्रीयंत्र Image
ह्रींकारमेव तव नाम गृणन्ति वेदा
मातस्त्रिकोण-निलय त्रिपुरे त्रिनेत्रे ।
त्वत्संस्मृतौ यम-भटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दन-वने सह लोकपालैः ।।5
( त्रिपुरा - स्थूल, सूक्ष्म आणि कारण ह्या तीन प्रकारच्या देहांची अधिष्ठात्री किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थांची अथवा सत्त्व,रज, तम या तीन गुणांची देवता.किंवा स्वर्ग, मृत्यूव पाताळ लोकांची अधिष्ठात्री देवता. )
ह्रीं  हेचि अक्षर असे तव रूप माते
 जे ज्ञानबीज  म्हणुनी कथिलेचि वेदे
`ॐ ह्रीं' म्हणून तुजला स्तवितीच वेद
ह्रींकाररूप तव हे प्रिय गे तुलाच ।। 5.1

                                              
श्रीचक्रमध्यगत जोचि त्रिकोण राहे
तेथे त्रिकोणनिलया नित तूचि राहे
तू स्वामिनीच असशी तिनही पुरांची
ख्याती म्हणून तव गे त्रिपुरेश्वरी ही ।। 5.2

अत्यंत अद्भुत त्रिनेत्र तुझेचि माते
सा र्‍या जगा निरखिती अति दक्षतेने
हे माय जो स्मरतसे तव नाम चित्ती
कापे तयास बघुनी यमदूत स्वर्गी ।। 5.3

त्यांचा असह्य छळ तो नच सोसताही
तो पुण्यवान नर स्वर्गपुरीस जाई
तो लोकपाल समवेतचि सौख्य भोगी
स्वर्गीय नंदनवनी करि क्रीडनासी ।। 5.4

 Image result for श्रीयंत्र Image
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानः
क्रूरः कथं न भविता गरलस्य वेगः ।
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुत-शीतलस्य ।। 6

माते वधेचि शिव जो त्रिपुरासुरासी
हालाहला घटघटा पिऊनीच टाकी
आवेग तो किति महा विष-प्राशण्याचा
कैसा सुसह्य घडला  शिव नीलकंठा ।। 6.1

ते क्लेश दारुण  कसे शिवशंभु साहे
त्याचेच कारण असे जननीच तू गे
होते न हे सहज शक्यचि नीलकंठा
होती न तू जरि तया जवळीच कांता ।। 6.2

सम्पृक्त देह तव हा जणु अमृताने
अत्यंत शीतल सुमंगल नित्य माते
अर्धांग तूच जननी असता शिवाचे
कैसे न दुःख वितळे सहजी शिवाचे ।। 6.3
Image result for श्रीयंत्र Image

सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूते
देवि त्वदङ्घ्रि-सरसीरुहयोः प्रणामः ।
किं च स्फुरन्मुकुटमुज्ज्वलमातपत्रं
द्वे चामरे च महतीं वसुधां ददाति ।। 7

माते तुझ्या कमल कोमल पावली या
भावे प्रणाम करिता तव सेवकाला
सर्वज्ञता मिळतसे अति सूक्ष्म बुद्धी
चातुर्य ज्ञान करि विस्मित गे जनांसी ।। 7.1

वाणी अमोघ स्फुरतेचि तया प्रभावी
सम्मेलने सकल जिंकितसे सभाही
भाषाप्रभुत्व तयिचे करि मंत्रमुग्ध
डोले सभा सकल ऐकुन इष्ट बोल ।। 7.2

जो छत्र चामर स्मरे चव र्‍या तुझ्या ह्या
ह्या दीप्तिमान मुकुटा जननी तुझ्या गा
पृथ्वीपती नरचि तो अति भाग्यशाली
सा र्‍याचि या अवनिचा प्रभु चक्रवर्ती ।। 7.3
Image result for श्रीयंत्र Image 
कल्पद्रुमैरभिमत-प्रतिपादनेषु
कारुण्य-वारिधिभिरम्ब भवत्कटाक्षैः ।
आलोकय त्रिपुरसुन्दरि मामनाथं
त्वय्येव भक्ति-भरितं त्वयि बद्धतृष्णम् ।।8
 ( अभिमत - अभीष्ट, प्रिय  ) 
हे माय गे पुरविसी मन वांछि ते ते
भक्तास कल्प-लतिके-सम तूच भासे
हे दृष्टिक्षेप तव गे जलधी कृपेचा
माझ्यावरी कधि कटाक्ष तुझा पडावा ।। 8.1

माते अनाथ अति बालक मी तुझे गे
आले भरून हृदयी तव प्रेम माते
ओथंबले हृदय गे मम भक्तिभावे
 आशा तुझीच मजला जगि ह्याचि राहे ।। 8.2

हे माय आस पुरवी मम मानसीची
उद्धार तू मम करी मज धीर नाही
हे माय भूक मजला तव दर्शनाची
तृष्णा सदैव नयनी तुज पाहण्याची ।। 8.3

हन्तेतरेष्वपि मनांसि निधाय चान्ये
भक्तिं वहन्ति किल पामर-दैवतेषु ।
त्वामेव देवि मनसा समनुस्मरामि
त्वामेव नौमि शरणं जननि त्वमेव ।। 9

सोडून माय तुजलाच कुणी अभागी
देवा अनेक भजती दुस र्‍याच कोणी
चित्ती कशी अवदसा उपजे अरेरे
देणार काय अति पामर देव त्यांते ।। 9.1

आडात ना जल  तरी बहु पोहर्‍यात
ऐसे घडेल कधि का मज तूच सांग
सामर्थ्य अल्प मिळता तुझिया कृपेने
कल्याणवृष्टि कधि का करतील ते गे ।।9.2

हे माय चिंतन निरंतर गे तुझेची
चित्ती अखंड करितो स्मरतो तुलाची
आलो तुला शरण मी तव पावली या
सांभाळ बाळ तव हा जननी  तुझा गा ।। 9.3
Image result for श्रीयंत्र Image 
लक्ष्येषु सत्स्वपि कटाक्ष-निरीक्षणाना-
मालोकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् ।
नूनं मया तु सदृशः करुणैक-पात्रं
जातो जनिष्यति जनो न च जायते वा ।। 10

येईल गे कणव माय तुला सदैव
ऐसेचि भक्तगण हे असती कितीक
त्यांच्याकडेच जननी नित लक्ष देता
देऊ नकोस मज अंतर माय आता ।। 10.1

ऐसी नको करुस गे मम तू उपेक्षा
तू एक वेळ निरखी मज ही अपेक्षा
हे माय गे त्रिपुरसुंदरि हीच आशा
लाभो कृपानजर गे मज या अभाग्या ।। 10.2

तू दीनवत्सल असे अति दीन मी गे
कारुण्यमूर्ति जगती नित तूच राहे
माझ्याच गे सम तुझ्या करुणेस पात्र
झाला न होइल कुणी न जगी असेल ।। 10.3
Image result for श्रीयंत्र Image 

ह्रीं ह्रीमिति प्रतिदिनं जपतां तवाख्यां
किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासे ।
माला-किरीट-मदवारण-माननीया
तान्सेवते वसुमती स्वयमेव लक्ष्मीः ।। 11

मंत्रात अक्षरचि अन्त्य असेच जे ह्रीं
तो बीजमंत्र अति अद्भुत क्षेमकारी
`ह्रीं ह्रीं' असे प्रतिदिनी जपतोचि नाम
त्यालाचि दुर्लभ असे जगतीच काय ।। 11.1

तू माय गे कणकणात भरून राहे
सार्‍या जगात भरुनी नित तूच राहे
 हे देह सर्व नगरी समजून माते
वास्तव्य तेथ करिसी त्रिपुराधिवासे ।। 11.2

माथी किरीट किति मौक्तिक हार कंठी
राहे सदैव दिमतीसच मत्त हत्ती
ऐश्वर्ययुक्तचि रमा वसुधा अशी ही
सेवेस तत्पर असे तव भक्त-पायी ।। 11.3
 Image result for श्रीयंत्र Image
सम्पत्कराणि सकलेन्द्रिय-नन्दनानि
साम्राज्य-दान-निरतानि सरोरुहाक्षि ।
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि
मामेव मातरनिशं कलयन्तु नान्यम् ।। 12

हे माय लोचन तुझे कमलाप्रमाणे
आहेत सुंदर विशाल कसे टपोरे
माते प्रणाम करिता तव पादपद्मी
भक्तांस सर्व मिळते नच मागताही ।। 12.1

ऐश्वर्य भाग्य सुख सर्वचि तोषवीते
जे इंद्रियांस रुचते मिळतेच ते ते
केले प्रणाम तुझिया चरणांवरी जे
ते पापमुक्त करती तव सेवका गे ।। 12.2

केले अहर्निशचि चिंतन पावलांचे
तेची करो मजसि पावन नित्य माते
ज्या भक्ति आस नच गे तव पावलांची
त्यांच्यावरी तव कृपा बरसेल कैसी ।। 12.3
 Image result for श्रीयंत्र Image
 कल्पोपसंहृतिषु कल्पित-ताण्डवस्य
देवस्य खण्डपरशोः परभैरवस्य
पाशाङ्कुशैक्षव-शरासन-पुष्पबाणा
सा साक्षिणा विजयते तव मूर्तिरेका ।। 13

तो काळभैरव महा शिव उग्रमूर्ती
संहार-तांडव करे प्रलया प्रसंगी
कल्पांत तो घडतसे लय जाय सृष्टी
 संहार भीषण घडे समयीच त्याची ।। 13.1

हातीच खंड परशू परभैरवाच्या
साहू शके नच कुणी शिव क्रोध  ऐसा
तेजात उग्र निथळे शिव उग्रमूर्ती
अत्यंत भीषण भयंकर त्या शिवाची ।। 13.2

तू एकमेव असशी जननीच साक्षी
ऐशा भयंकर महा शिव-तांडवाची
ही पाश, अंकुश, ध्वजा धनु सज्ज माते
लावून पुष्प शर  दक्ष उभीच तू गे ।। 13.3

तू नित्य नित्य विजयी असशीच माते
डंका असाच जगती तव नित्य वाजे
मूर्ती तुझीच विजयी बहु शोभते गे
सामर्थ्य थोर तव हे विजयोऽस्तु माते ।। 13.4

लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
तेजः परं बहुल-कुङ्कुम-पङ्क-शोणम् ।
भास्वत्किरीटममृताङ्कशु कलावतंसं
मध्ये त्रिकोण-निलयं परमामृतार्द्रम् ।। 14
ती कालवून उटि केशरचंदनाची
घालून तेज  जणु का सगळे शुभांगी
कायाचि कोमल घडे जणु गे तुझी ही
आरक्त पीत सवित्यासम दिव्य कांती ।। 14.1

सम्पृक्त देह तव जो निथळेच तेजे
कल्याण जो करितसे तव सेवकांचे
राहेच अर्ध शिव -देहचि व्यापुनी  जो
तो व्यापुनीच हृदयास सदैव राहो ।। 14.2

शोभे शिरी मुकुट रत्न सुवर्ण कांती
रत्नप्रभा झगमगे अति दिव्य त्याची
ही चंद्रकोर अति शीतल त्यावरी गे
त्यातून अमृत झरे जगतावरी गे ।। 14.3

श्रीयंत्र मध्यगत राहतसे त्रिकोण
तेथेच मूर्ति तव माय  विराजमान
जी अमृतात निथळे अति वंद्य माते
मूर्तिस त्याचि नमितो बहु  भक्तिभावे ।। 14.4
 Image result for श्री त्रिपुरसुंदरी Images
 हृींकारमेव तव नाम तदेव रूपं
तन्नाम दुर्लभमिह त्रिपुरे गृणन्ति ।
त्वत्तेजसा परिणतं वियदादि-भूतं
सौख्यं तनोति सरसीरुह-सम्भवादेः ।।15
(परिणतं - वाकलेला, झुकलेला, नम्र,परिपक्व ;  वियत् -  आकाश, अंतरिक्ष, निरभ्र व्योम )
हृीम् हेचि अक्षर असे तव नाम रूप
हृीम् एकमेवचि असे तव बीजमंत्र
माते असेल पदरी जरि पुण्य मोठे
येईल गे तरि मुखी तव नाम साचे ।।15.1

आकाश वायु जल अग्नि वसुंधरा ही
तेजातुनीच तुझिया उदयास येती
ब्रह्मादि देव सगळे तव नाम घेता
सारी सुखे मिळविती महिमा तुझा हा ।। 15.2

(वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे - 19, गण - म स ज स त त ग , यति - 12,7)
हृींकार-त्रय-सम्पुटेन महता मन्त्रेण सन्दीपितं
स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरो मातर्जपेन्मन्त्रवित् ।
तस्य क्षोणि-भुजो भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी
वाणी निर्मल-सूक्ति-भार-भरिता जागर्ति दीर्घं वयः ।।16
(संपुट -  आधार; सन्दीपितम् - तेजस्वी; क्षोणिभुजः -  राजा)
माते पंचदशाक्षरी तव स्तुती, हृीम् बीज आधार ज्या
येई ह्रीम् तयि तीनदा सकल ह्या  कूटत्रयाशेवटा
तेजस्वी  घडते महान स्तुति ही ह्रीम् बीजमंत्राक्षरे
आहे जो तव बीजमंत्र जननी मोठा प्रभावी बरे ।। 16.1

श्रीविद्या तव मंत्र जोचि जपतो मातेपुढे भक्तिने
होती त्या वश भूपती सकल हे ; लक्ष्मी सदा त्या वरे
त्याची निर्मल ती सुभाषितयुता वाणी प्रभावी ठरे
दीर्घायुष्य मिळे तयास जगती कल्याण होई भले ।। 16.2
-----------------------------------------------------------------
1939 हेमलम्बी नाम संवत्सरे , मार्गशीर्ष अमावास्या 17 डिसेंबर 2017

Image result for श्री त्रिपुरसुंदरी Images