सत्यव्रतमुनिकृत 'श्री दामोदराष्टकम् '


 Image result for yashoda chasing krishna
श्री गणेशाय नमः ॥

                सिंधुदेशात सत्यव्रत नावाचा एक अत्यंत सत्शील, गुणी, विवेकी ब्राह्मण रहात होता. श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून गेल्याने त्याला इतके वैराग्य प्राप्त झाले की सर्वसंगपरित्याग करून तो वृंदावनमधेच येऊन राहिला. तेथेही अत्यंत निर्जन अशा जंगलामध्ये, जिथे नीरव शांतता असेल अशा ठिकाणी कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन तो राहू लागला. रात्रंदिवस कृष्णाच्या भक्तीत रंगून गेलेल्या सत्यव्रताला स्वतःच्या देहाचेही भान राहिले नाही. कार्तिक महिना सुरू होताच त्याने खडतर व्रताचा आरंभ केला. दिवसाच्या तिसर्‍या प्रहरी ( म्हणजे साधारण 11-12 च्या सुमारास) एकदाच मिळतील ती पाने, कंदमुळे, फळे तो खात असे. बाकी सर्व काळ  कृष्णाची स्तुती करत असे. 
                     कृष्णाला दामोदराच्या रूपात तो पहात असे. दाम म्हणजे गायीला बांधून ठेवतात ते दावे. खोड्या काढून पळून जाणार्‍या बाळ कृष्णाला यशोदेने पकडून उखळाला बांधून ठेवले. दाव्याने त्याच्या पोटाला बांधून ठेवले म्हणून तो दामोदर.  अशा दामोदराची मूर्ती सतत नजरेत साठवून ठेवणार्‍या सत्यव्रताला दामोदराशिवाय काहीच नको होते. सत्यव्रताविषयी बोलतांना महर्षी नारद सांगतात, वीजांचा चमचमाट व्हावा तसा चमत्कार घडला दामोदर रूपात हरी प्रकटला आणि हळु हळु सत्यव्रताच्या हृदयात विलीन झाला. सत्यव्रत दामोदरमयच झाला.


 सिंधुदेशोद्भवो विप्रो नाम्ना सत्यव्रतः सुधीः
विरक्त इन्द्रियार्थेभ्यस्त्यक्त्वा पुत्रगृहादिकम् ॥1
वृन्दावने स्थितःकृष्णमारराध दिवानिशम्
निः स्वः सत्यव्रतो विप्रो निर्जने व्यग्रमानसः ॥2
कार्तिके पूजयामास प्रीत्या दामोदरं नृप
तृतीयेऽह्नि सकृद्भुक्ते पत्रं मूलं फलं तथा ॥3
पूजयित्वा हरिं स्तौति प्रीत्या दामोदराभिधम् ॥4

सिंधु देशात झालासे सत्यव्रत मुनी महा
निःसंग होऊनी राहे साधु वैराग्यमूर्ति हा॥

वृंदावनीच तो राहे  निःशब्द निर्जनी वनी 
कृष्णभक्ती करे मोठी रात्रंदिनीच जागुनी॥

येताचि कार्तिकी मास व्रत केले तयी महा
एकभुक्त सदा राही सेवी आहार अल्पसा

तृतीय प्रहरी नेमे सेवी पाने फळे मुळे
दामोदर हरीचे त्या प्रेमे पूजन तो करे

आठवे बाळरूपासी हरीच्या गोजिर्या अती

रंगून त्यात तो जाई विसरे देहभानही


सत्यव्रत उवाच ॥
सत्यव्रत म्हणाला ।।
(वृत्त- भुजंगप्रयात,  अक्षरे- 12,  गण - य य य य, यति - पाद )
नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं
लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानम्
यशोदाभियोलूखले धावमानं
परामृष्टमत्यन्ततो द्रुत्य गोप्या
१॥
( लसत् - चमकदार ; भ्राजमान - देदिप्यमान, द्रुत्य - द्रुत गतिने पळत जाणार्‍या; गोप्या -  गोपीने म्हणजे यशोदेने   परामृष्ट - पकडला गेलेला; )
Image result for lord krishna tied to mortar 
पुढे धावतो सावळा; माय मागे
दटावीत त्याला म्हणे `थांब आले'
`किती व्रात्य हे लेकरू' माय बोले
`पहातेचि कान्हा कसा तू सतावे' ।।1.1

हरी धावता हालती कुंडलेही
हरीच्याच गाली कशी स्पर्शताती
प्रभा त्यातल्या दिव्य रत्नावलीची
खुलूनी दिसे सावळ्याच्या मुखासी ।। 1.2


जणू गोकुळीचा अलंकार कान्हा
व्रजाचा करी स्वर्ग त्या कृष्णलीला
जिथे नांदतो सावळा हा हरी हो
अहो भाग्य त्या गोकुळीचे असे हो

पहाता यशोदेस रागावलेली
मनी धाक वाटून धावेच वेगी
उडी मारुनी ऊखळाच्यावरोनी
हरी धाव घेता धरे माय त्यासी ।। 1.4

कधी जो न येतोचि हाती कुणाच्या
धरे भक्तिप्रेमे तयासी यशोदा
हरी जो असा नित्य आनंदकंद
नमो ईश्वरा त्या चिदानंदरूप ।। 1.5
 Image result for lord krishna tied to mortar
रुदन्तं मुहुर्नेत्र-युग्मं मृजन्तं
कराम्भोज-युग्मेन सातङ्क-नेत्रम्।
मुहुः श्वास-कम्प-त्रिरेखाङ्क-कण्ठं
स्थितं नौमि दामोदरं भक्ति-बद्धम्
२॥
( मुहुः -पुन्हा पुन्हा, वारंवार ; नेत्रयुग्मम् - दोन्ही डोळे, मृजन्तम् - चोळणारा; कराम्भोज-युग्मेन - कमळाप्रमाणे आरक्त आणि कोमल असलेल्या हातांनी;  सातङ्क नेत्रम्- ज्याच्या डोळ्यात भीती भरली आहे; त्रिरेखाङ्क-कण्ठ - ज्याच्या गळ्यावर शंखासारख्या तीन रेघा  दिसत आहेत असा )
छडी पाहुनी माय-हातातली ती
भिऊनी रडे स्फुंदुनी तो मुरारी
हरी स्फुंदता देह कापे तयाचा
जणू वादळी केळ ही सापडे का ।। 2.1

हरीलोचनी दाटली भीति मोठी
झरे अश्रुमाला कशा कृष्ण गाली
पुन्हा हुंदके श्वासमाला सवेगी
पळोनी रडोनी धपापेच छाती ।। 2.2

हरी छोटुल्या पालथ्या त्या मुठींनी
पुसे सारखे अश्रु नेत्रातलेची
मुठी कोवळ्या सावळ्याच्याच दोन्ही
जणू मुग्ध पद्मेच  आरक्त वर्णी ।। 2.3

असे मान शंखासमा ऐटदार
तयी रेखिल्या तीन रेघा तशाच
गळा माळ मुक्तावलीची सुरेख
हले कापता भीतिने कृष्णबाळ ।। 2.4

यशोदेचिया प्रेमबंधात ऐसा
असा बांधला जाय जो कृष्ण काळा
वसो माझिया चित्ति तो कृष्ण भोळा
नमस्कार माझा तया सावळ्याला ।। 2.5

 Image result for yashoda chasing krishna
इतीदृक् स्व-लीलाभिरानन्द-कुण्डे
स्वघोषं निमज्जन्तमाख्यापयन्तम्।

तदीयेशिज्ञेषु  भक्तैर्जितत्वं

पुनः प्रेमतस्तं शतावृत्ति वन्दे
३॥

अशा बाललीला हरीच्या बघोनी
मनी हर्षती गोकुळी गोप गोपी
जणू डुंबती अमृताच्याच डोही
सखा लाभता कृष्ण कान्हा मुरारी ।। 3.1

महा ज्ञानसम्पन्न वैराग्यमूर्ती
अशा भक्तवृंदास तो चक्रपाणी
म्हणे गोकुळीच्या दरिद्री जनांनी
मला जिंकिले; दास त्यांचा असे मी ।।3.2

मला बांधिले प्रेमरज्जू करोनी
पुरा गुंतलो भक्तिबंधात त्या मी
सरोजात होई जसा बंदि भृंग
तसा भक्तचित्तीच मी बंदिवान ।। 3.3

अहो दीनबंधूच दामोदरा हे
तुम्हा कोटि कोटी नमस्कार माझे  ।। 3.4
 Image result for lord krishna tied to mortar
वरं देव! मोक्षं मोक्षावधिं वा
चान्यं वृणेऽहं वरेशादपीह।
इदं ते वपुर्नाथ! गोपाल-बालं
सदा मे मनस्याविरास्तां किमन्यैः ४॥

नको मोक्ष देवा न वैकुंठ आशा
नको अन्य काही मनी ना फळाशा
अनेकाविधा भक्तिने साध्य होई
असे दानही वांछितो ना हरी मी ।। 4.1

दवाच्याच थेंबात आकाश दाटे
जणू पूर्ण सामावले वाटतेसे
तसा ह्या हृदी कान्हुल्या तूचि राहे
बघावे तुझ्या बाळरूपास मी रे ।। 4.2

तुझी बालमूर्ती अती गोजिरी ही
सदा पाहु दे नेत्र माझेच दोन्ही
सुखाने अशा तृप्त आकंठ होता
हवे काय रे अन्य या पामराला ।। 4.3
 Image result for lord krishna tied to mortar
इदन्ते मुखाम्भोजमत्यन्त-नीलै-
र्वृतं कुन्तलैः स्निग्ध-वक्त्रैश्च  गोप्या।
मुहुश्चुम्बितं बिम्ब-रक्ताधरं मे
मनस्याविरास्तामलं लक्ष-लाभैः
५॥

तुझ्या गोडुल्या चेहर्‍याच्यावरी या
मऊ रेशमी जावळाच्या बटा  ह्या
रुळोनी करी चित्तवेधी मुखाला
हरे भान, वेडावुनी जाय माता ।। 5.1

जणू तोंडले पक्व झालेची लाल
असे ओठ ह्या राजसाचेहि लाल
खुळावे यशोदा मुके घेत राहे
तरीही मनी तृप्त ना होत आहे ।। 5.2

असे हे तुझे रूप चित्ती ठसावे
सदा बाळरूपा तुझ्या मी भजावे
हजारो हजारो मिळोनी वरांसी
करावे तयाचेच ते काय आम्ही ।। 5.3

नमो देव ! दामोदरानन्त विष्णो !
प्रसीद प्रभो ! दुःख-जालाब्धि-मग्नम् ।
कृपा-दृष्टि-वृष्ट्याऽति-दीनं च रक्ष
गृहाणेश मामज्ञमेवाक्षि-दृश्यम् ६॥

अनन्ता विभो विष्णु दामोदरा हो
प्रभो, दुःखसिंधूमधे मी बुडालो
अभागी असे दीन  मी रे अनाथ
कृपेची तुझ्या चित्ति माझ्याच आस ।। 6.1

जरी अज्ञ अत्यंत मी माधवा रे
करी तृप्त डोळे तुझ्या दर्शनाने
रहा माझिया नित्य दृष्टीसमोरी
नको अन्य माझ्याच दृष्टीसमोरी ।। 6.2

 Image result for yashoda chasing krishnaImage result for lord krishna tied to mortar

कुबेरात्मजौ बद्ध-मूर्त्यैव यद्व-
त्त्वया मोचितौ भक्ति-भाजौ कृतौ च।
तथा प्रेम-भक्तिं स्वकां मे प्रयच्छ
मोक्षे ग्रहो मेऽस्ति दामोदरेह ७॥


( शापामुळे कुबेराची दोन मुले नलकुँवर आणि मणिग्रीव वृक्ष बनले होते. कृष्णाला उखळाला बांधले तेंव्हा, ह्या शेजारी शेजारी असलेल्या दोन वृक्षांच्या मधून कृष्ण पलिकडे गेला असता, दोन्ही झाडांना अडकलेल्या उखळामुळे  दोन्ही झाडे मोडून खाली पडली आणि  त्यातून नलकुँवर आणि मणिग्रीव  बाहेर आले. कृष्णभक्तीमुळे ते शापातून मुक्त झाले. )

यशोदा तुला बांधिते घट्ट दावे
कुबेरात्मजांसी तरी मुक्त केले
तयांना जसे भक्तिचे दान देसी
तशी भक्ती देई प्रभो तू मलाही ।।7.1

नको रे नको अन्य इच्छाच नाही
नको मोक्ष-मुक्ती मला चक्रपाणी
विनंती तुझ्या पावली एक देवा
तुझी भक्ती लाभो मला जीवनी या ।। 7.2


नमस्तेऽस्तु दाम्ने स्फुरद्दीप्तिधाम्ने

त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने।
नमो राधिकायै त्वदीय-प्रियायै
नमोऽनन्त-लीलाय देवाय तुभ्यम् ८॥

हरीलाहि बांधू शके जेचि दावे
नमस्कार त्या भक्तिरज्जूस प्रेमे
घडा सर्व ब्रह्मांडिचा जेथ राहे
हरीच्याच पोटास त्या वंदितो रे ।। 8.1

मिळे दीप्ति तेजासही तेज ऐसे
मिळे आश्रयू ब्रह्मतेजास जेथे
नमो श्रीपतीच्याच पोटास ऐशा
असो भक्तिभावे नमस्कार माझा ।। 8.2
 Image result for lord krishna tied to mortarImage result for lord krishna tied to mortar
नमस्कार माझा सदा राधिकेला
जिने भोगली सर्व ती कृष्णलीला
नसे अंत ज्याच्याच लीलांस काही
नमोनन्तलीला नमो बाळकृष्णा ।। 8.3

 नारद उवाच -
सत्यव्रद्विजस्तोत्रं श्रुत्वा दामोदरो हरिः
विद्युल्लीलाचमत्कारो हृदये शनकैरभूत् ॥ 9
शनकैः – शनैः शनैः - हळुहळु


सत्यव्रत मुनी गाता । दामोदर स्तुती अशी
बहु तन्मय होऊनी । चमत्कार घडे क्षणी

दामिनी चमके जैशी । आकाशी क्षण एकशी
प्रकटला हृदी तैसा । दामोदर तया हृदी

तेजात तेज सामावे । जाहले ते तसे तिथे
एकरूपचि झाले ते । मुनी दामोदरासवे

दामोदराष्टकाचा ह्या अनुवाद यथामती

करे प्रवीण-जाया ती । मराठीत अरुंधती


इति श्रीसत्यव्रतकृतदामोदरस्तोत्रं सम्पूर्णम्


असे सत्यव्रताने केलेले दामोदर स्तोत्र पूर्ण झाले.

----------------------------------------------------------------------
ॐ तत् सत्
हेमलम्बी नाम संवत्सरे कार्तिक कृष्ण त्रयोदशी; 16 नोव्हेंबर 2017