मनोगत


                     स्तोत्रांचा अनुवाद ही माझ्या मनाची निकड होती; आणि एकदा एखादी गोष्ट माणसाची गरज झाली की ती मिळविल्याशिवाय तो स्वस्थही बसत नाही. यमक, अनुप्रास इत्यादि उत्तमोत्तम अलंकार घालून संस्कृतची अनेक सुंदर सुंदर स्तोत्र-शिल्पे  माझ्यासमोर मांडून ठेवलेली असत. पण माझं संस्कृतचं प्रगाढ अज्ञान ह्या अवगुंठनाने ती कायम झाकलेलीच राहत. कधी वार्‍याने थोडासा पडदा हलावा आणि त्या सुंदर मूर्तीची सुबक पावले दिसावीत तसा कधी तरी थोडासा अर्थ कळताच मी त्याच्या सौदर्याने  भारावून जात असे. त्याच वेळी कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांचे श्री शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे सटीक सविस्तर भाषांतर असलेले `सुबोध स्तोत्र संग्रहा'चे दोन भाग हाती आले. त्यांचा अध्यात्माचा गहन अभ्यास, संस्कृतवरील प्रभुत्व आणि मराठी भाषांतर वाचून, ही सर्व  स्तोत्रे वृत्तबद्ध होऊन  माझ्या माय मराठीतही आली पाहिजेत असे वाटले.  ही सुंदर स्तोत्रे मराठीत त्याच चालीत म्हणता यावीत असे वाटले.
       एखादी वाट चालावी असं वाटावं; पण तिथे दाट अंधार असावा तशी माझी अवस्था होती. अज्ञानाचा अंधार माझ्या सभोवती होताच.
            त्याचवेळेस श्री आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर दृढभावे आसनस्थ झालेली ज्ञानरायांची भावार्थदीपिका माझ्या प्रत्येक पुढे पडणार्‍या पावलासाठी भावार्थाचा दीप घेऊन उभी राहिली. तिच्या प्रकाशात एक एक पाऊल पुढे टाकत असतांनाच इतर संत साहित्य  मार्गात मशाली धरून उभं होतं. ज्ञानेश्वरीच्याच रसावर जोपासलेले, जणु काही ज्ञानेश्वरीलाच नव्याने पालवी फुटल्यासारखे अत्यंत टवटवीत संत-साहित्य पाहून मनाची मरगळही पळून गेली.  प्रवासात अडखळणार्‍या पावलांना आधाराच्या काठीसारखे ते हाती आले.  यामुळेच आचार्यांची स्तोत्रेही हळु हळु नव्याने उमगू लागली. ज्ञानेश्वरीतील हजारो दृष्टांत ऐकता ऐकता आद्य शंकराचार्यांच्या दृष्टांतांना अजून सबळ करणारे पूरक दृष्टांत दिसू लागले.
 ज्ञानेश्वरीची भाषा मात्र जुनी मराठी असल्याने श्री वरदानंदभारती (कै. अनंतराव आठवले ) ह्यांची ओवीबद्ध रसाळ ज्ञानेश्वरी मदतीला धावून आली. 
         नव्याने वृत्त शिकतांना नवनवीन वृत्तांचाही मनाला मोह पडत गेला. वृत्तबद्ध लिहीण्याचा प्रयोग हळु हळु जमू लागला.
                  एखादं चांगलं काम करायला घेतलं की अनेकजण मदतीचे हात पुढे करतात.  अत्यंत ज्ञानी लोकांनी अन्वय, टीका, हिंदी, इंग्रजी गद्य भाषांतर, यांच्या सहीत अनेक सुंदर स्तोत्रे, माझ्या झोळीत घातली. महिषासुरमर्दिनी ह्या स्तोत्रावरील अतिशय सुंदर टिका नागपूरच्या रामकृष्ण मठाचे आदरणीय श्री ब्रह्मस्थानंद स्वामीजी यांनी मला सहज दिली. रावणकृत शिवतांडव स्तोत्र नागपूरचे श्री चंद्रगुप्त वर्णेकर आणि ज्ञानसाधू चोरघडेकाका यांनी माझ्याबरोबर बसून उलगडून दाखवलं. माझ्या प्रत्येक स्तोत्राचे पहिले वाचक चोरघडेकाकाच आहेत. श्री. गणेश थिटे यांनी माझ्या प्रत्येक स्तोत्रातील अनेक चुका मोठ्या भावाच्या मायेने सतत सुधारून दिल्या. सुमुख बर्वे ह्या छोट्या मित्राने सर्वांगसुंदर anuvadparijat.blogspot.in हा ब्लॉग बनवून दिला. 
                      शंकराचार्यांच्या स्तोत्रात सामावलेले तत्त्वज्ञान वाचतांना असं वाटलं की एक क्षण असा येतो की भाषेचा पडदा गळून पडतो. शब्दांची टरफलं उडून जातात. उरतं ते एक अक्षरब्रह्म! लेखक आणि वाचक यांच्यात उरते एक समान अनुभूती. लेखक आणि वाचक यांच्या मधलं काळाचं, वर्षांचं गणित त्या क्षणी शून्य होतं. एका सूरात लावलेले दोन तानपुरे समोरासमोर ठेवल्यासारखे लेखक आणि वाचक समोरासोर बसतात. एक छेडला की दुसरा आपोआप झंकारतो.
                      ह्या लेखकांच्या लेखणीत असं काही सामर्थ्य आहे की, रावणाने हिमालयात जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेला निसर्गरूप शिव तो सांगत राहतो आणि आपण प्रत्यक्ष बघत राहतो. श्री आद्य शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या कनकधारा स्तोत्रातील विष्णु आणि लक्ष्मी प्रत्यक्ष आपल्यासमोर प्रकट होतात. भगवान व्यास नवग्रह स्तोत्र म्हणता म्हणता हात धरून निसर्गभ्रमण घडवून आणतात. तर शंकराचार्य हळुच गणपतीच्या एखाद्या dance performance ला आपल्याला घेऊन जातात; जिथे महाळुंगाचं फळ सोंडेवर नाचवीत बाल गणेश नृत्य करीत असतो. श्री रामकृष्ण कविंबरोबर महिषासुरमर्दिनी एखाद्या अनोख्या रूपात भेटते. विश्रामकाळात रंणांगणावरच्याच सैनिक शिबिरात एखादा योध्दा मेंडोलिन, सरोद किंवा गिटाराची तार छेडतो.  त्या सुरात तल्लीन झालेली ही  रणरागिणी वा! वा! म्हणत हळुच मान हलवते. मान हलताच तिच्या कानातील रत्नकुंडले हलुन तिच्या गालाला परत परत स्पर्श करतात. युद्धभूमीच्याच कडेला उगवलेलं एखादं रानफूल खुडून   कोवळ्या लालसर पानांसहित  तिच्या कानावर खोचलेलं असतं. 
             चपखल अर्थान्तरन्यास, समर्पक दृष्टान्त, वक्रोक्ती, यमक, अनुप्रास असे अनेक शब्दालंकार घालून सजलेलं  हे तत्त्वज्ञान कधी आपल्या मनात उतरतं हे कळतच नाही. हा सर्व अनुभव त्याच वृत्तात तेवढ्याच टवटवीतपणे  मराठीतून आपल्या पर्यंत पोचविण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.

रसिक वाचकहो,  आपण अनेकजणं हा BLOG  वाचत आहात. आपला परिचय  आणि आपल्या प्रतिक्रियाही मला arundhati.dixit@gmail.com वर  कळवल्या तर खूप आनंद होईल.

--------------------------------------------

5 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. manogat shows that these translations are not just verses rendered in marathi, but the depth of experience of stotras is also felt and conveyed by the poetess, who is also namesake of the great rishika of vedic times .... great!!!

    ReplyDelete
  3. manogat shows that these translations are not just verses rendered in marathi, but the depth of experience of stotras is also felt and conveyed by the poetess, who is also namesake of the great rishika of vedic times .... great!!!

    ReplyDelete