वात्सल्यरसायनम्

।।  श्री ।।

(प्रज्ञाभारती श्री. भा. वर्णेकर.)
(विस्तृत भावानुवाद - सौ. अरुंधती दीक्षित.)
रसिक वाचक हो!
 कै. प्रज्ञाभारती वर्णेकर यांनी रचलेले एकशेचार श्लोकांचे  हे अप्रतिम खण्डकाव्य आपल्याला भावानुवादासहित देतांना मलाही आनंद होत आहे. 
            हया स्तोत्राच्या संदर्भातील एक आश्चर्यकारक घटना प्रत्यक्ष कै. वर्णेकरांनीच लिहून ठेवली आहे.
                रोज पूजा करतांना अनेक उत्तम स्तोत्रे सुस्वर गात पूजा करण्याचा त्यांचा नेम होता. एकदा सर्व स्तोत्रे म्हणून झाल्यावर योगीश्वरैर्यदवलोकितमन्तरङ्गे आणि उल्लासनं परम-सज्जन-भावुकानां हे दोन सुंदर श्लोक त्यांच्या मुखातुन सहज बाहेर पडले. (श्लोक 3 व 4) हे चालीत गायलेले श्लोक आपल्या रोजच्या पाठातले नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी ते लिहून ठेवले. सहज म्हणून पंचाग उघडले तर टिळक पंचांगाप्रमाणे ती जन्माष्टमी होती. आपल्या तोंडून असे सुरेख श्लोक अकस्मात् निघाले याचा त्यांना  परम हर्ष झाला. त्या हर्षभरात रोज पूजा आटोपल्यावर त्याच वसंततिलका या वृत्तात  कृष्णस्तुतिपर श्लोक ते लिहीत गेले. थोड्याच दिवसात त्यांचे हे खण्डकाव्य पूर्ण झाले.
                आपले हे काव्य एखाद्या संस्कृततज्ञ सत्पुरुषाला वाचून दाखवावे अशी आंतरीक ओढ त्यांना लागली. त्याचवेळी जगन्नाथपुरीच्या शांकर मठाचे आचार्य श्री. भारतीकृष्णतीर्थ प्रवचने देत होते.  रोज त्यांची प्रवचने ऐकायला जाणार्‍या कै. वर्णेकरांनी एक दिवस त्यांची खंडकाव्य लिहिलेली वही  त्यांच्या हातात ठेवली. त्यातील सुंदर श्लोक वाचून आचार्यांच्या मुखावरही प्रसन्न सात्विक भाव पसरले. त्यांनी आशीर्वाद देत त्यांना म्हटले, `` पुढच्या आठवड्यात जन्माष्टमी (प्रचलित पंचांगानुसार) आहे. त्या दिवशी या काव्याच्या गायनाचा कार्यक्रम आश्रमात आयोजित होईल! ''
               प्रचंड श्रोत्यांच्या उपस्थितीत वात्सल्यरसायनम् च्या गायन प्रसंगी श्री शंकराचार्य आणि लोकनायक बापूजी आणे या दोन्ही संस्कृत तज्ञाच्या डोळ्यातून वारंवार आनंदाश्रू ओघळत होते. `` माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता.'' असा उल्लेख स्वतः प्रज्ञाभारतींनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
           तोच  आनंद आपल्या सर्वांना मराठीतून घेता यावा, भाषेची अडचण राहू नये यासाठी माझी ही धडपड आहे. 

  वात्सल्यरसायनम्


(अनुष्टुभ् छंद)

तदान्तरतमःस्तोम-प्रलयंकरमुज्ज्वलम्।
मन्महे मानसे नित्यं महः सारस्वतं महत्।।1 

काळोख दाटुनी राहे । अविद्येचाच अंतरी
तेज सारस्वतू त्यासी। नाशितेचि परोपरी ।।1.1 
तेज जेचि असे श्रेष्ठ । अविनाशीच उज्ज्वल
वारंवार नमस्कार। नम्रभावे करी तया।। 1.2


यत्तदन्तरतरं परात्परं सर्वसारवदखण्डभास्वरम्।
आविरस्तु जगदेकसुन्दरं वस्तु मन्मनसि तन्निरन्तरम्।।2

अंतराचे अंतरंग । परा-विद्येच्याही पार
सारांचेही असे सार । तेजस्वी जे सदोदित।।2.1
जगी वस्तू अशी एक । नित्य राहेचि सुंदर
प्रकटो हृदयी तेच । आत्मतत्त्वचि उज्ज्वल ।। 2.2
(पराविद्या - ब्रह्मविद्या )(वृत्त- वसंततिलका, अक्षरे 14, गण-त भ ज ज ग ग, यति- पा.)
योगीश्वरैर्यदवलोकितमन्तरङ्गे
यत्पण्डितैर्विदितमन्तिम-तत्त्वसारम्
यद् वन्दितं स्तुतमुपासितमार्तभक्तैः
तन्मङ्गलं स्फुरतु मे हृदि कृष्णधाम।।3

जे रूप चित्ति स्मरती अवघेची संत
विद्वान जे वदति अंतिम एक तत्त्व
ज्याची स्तुती करुनि वंदिति आर्त भक्त
ते तत्त्व चित्ति प्रकटो नित कृष्णधाम।।3उल्लासनं परम-सज्जन-भावुकानां
उत्तेजनं सकल-मङ्गल-कामुकानाम्।
उन्नायनं च परमात्म-पदोत्सुकानाम्
उन्मादनं भवतु तन्मम कृष्णनाम।।4
( उन्मादन çÆJçkçÀçÆmçlç करणे )
उत्साह वाढवि हृदी नित सज्जनांचा
प्रोत्साहिता करित मंगल इच्छुकांना
उत्कर्ष जे घडविते परमात्ममार्गी
ते कृष्ण नाम फुलवो मम जीवनासी।।4श्रीदेवकी-नयननीर-परिप्लुताङ्गः
आलिङ्गितश्च वसुदेवहृदम्बुजेन।
कारागृहात् कथमपि ह्यपनीयमानः
हृत्पङ्कजे मम सदाऽस्तु नवार्भकोऽसौ ।।5

अश्रूत चिंब भिजला सति देवकीच्या
प्रेमेचि ज्या कवटळे वसुदेव वक्षा
कारागृहातुन करी सुटका कशी ती
चित्ति वसोचि नवजात सखा मुरारी।।5मातुः पयोधरपुटे स्थितवत्रबिम्बः
राधापयोधरभरे स्थिरनेत्रपातः।
वर्षापयोधररवेऽपि हि दत्तकर्णः
चित्ताम्बरेऽस्तु मम कृष्णपयोधरोऽसौ ।।6

मातेस जो बिलगुनी स्तनि ओठ टेकी
राधा घटावरि असे स्थिर दृष्टी ज्याची
ऐकेच जो गडगडाट नभी ढगांचा
तो कृष्ण मेघ बरसो हृदयीच माझ्या।।6


पुण्ये च नामकरणाहनि मीलिताभिः
यस्याङ्गनाभिरुदितं हि नवार्भकस्य ।
कर्णद्वये प्रथित-नामसहस्रमुच्चैः
चित्ते स मे वसतु कोऽपि सहस्रनामा ।।7

ज्याच्याच नामकरणा जमल्याचि गोपी
नावे हजार वदती शिशुच्याच कानी
कान्हा, मुकुंद, हरि, केशव नाम देती
तो लाघवी मनि वसोचि सहस्रनामी।।7सुस्निग्ध-कज्जल-कलान्वित-पक्ष्मरेखं
सद्रत्नकुण्डलविभा-स्फुटगण्डरागम्
सिन्दूरबिन्दुरुचिरं मृदुकुन्तलाढ्यं
तच्चिन्तये हृदि मुकुन्दमुखारविन्दम्।।8

रेखीव रेघ नयनी मृदु काजळाची
माणिक्य, मौक्तिक, हिरे; हरि कुंडलांसी
रत्नप्रकाश पसरे हरिच्याच गाली
ती कुंडलेचि हलता हळुवार दोन्ही।।8.1

रेखीव तो तिलक लावियलाच भाली
शोभे मुकुंदमुख ते मृदु जावळानी
तो गोड बाळ कमलासम भासतोची
राहोचि तो कमलसुंदर अंतरंगी।। 8.2गण्डद्वयेऽपि जनकेन तथा जनन्या
सम्मीलिताक्षियुगलं परिपीयमानम्।
उद्रञ्जितं विहसितं चलितं प्रफुल्लम्
तच्चिन्तये हृदि मुकुन्दमुखारविन्दम्।।9

घेती मुके मटमटा किति नंद, आई
आकंठ पान करि नेत्र मिटून दोन्ही
गेलेचि रंगुन, प्रफुल्लित, हासतीही
चुंबून गाल हरिचे नच तृप्त होती।।9.1

जैसे जळी कमळ हे फुलले सुरेख
तैसेची गे वदन हे हरिचे प्रफुल्ल
ते रूप सुंदर अती मम चित्ति राहो
हा बाळकृष्ण हृदयी मम नित्य राहो।।9.2अव्यक्तवाकमतिलोल-कराङ्गुलीभिः
एकावली-मणिगणान् क्रमशः स्वमातुः ।
कर्षन् निमीलित-विलोचनमङ्कशायी
चित्तं विकर्षतु स बालजपी ममाऽपि ।।10

अंकावरी जननिच्या पहुडेचि कान्हा
लोटेच झोप नयनी तरि राही जागा
कंठातली जननिच्या धरुनीच माळा
एकेक ओढत मणी करितोचि चाळा।।10.1

अर्धोन्मिलीत नयने जपतो कुणाला
एकेक ओढुन मणी स्मरतो कुणाला
चित्तास तो धरुनिया ममची रहावा
वेधून घेत मन बालजपी रहावा।। 10.2


``मृद्भक्षिता कितव ! किं न गुडो गृहे नः ?''
सन्तर्जितोऽतिपरुषं हि यशोदयैवम्।
तां ``नेति नेति'' निगदन् ननु वेदवाक्यं
चित्ते सदा वसतु  बालजगद्गुरुर्मे।।11

``ए थांब थांब छकुल्या !!''- - भरितेचि रागे
``माती नको भरु मुखी, मुठिने त्वरेने -
कारे लबाडचि घरी गुळ नाहि कारे?''
प्रेमे दटावित म्हणेचि यशोमती हे।।11.1
`‘ना- - ना ’' म्हणून हलवे कशि मान कान्हा
का ``नेति नेति '' वदतो जणु वेदवाक्या
‘ते आत्मतत्त्व’ कळले सहजीच ज्याला
चित्ती वसो सतत बाल-जगद्गुरू हा।।11.2

ध्यानावलग्ननयनां जननीमवेक्ष्य
पूजावसान-समये निभृतं प्रसर्पन्।
नैवेद्यदुग्धमभिपीय निन्तान्ततृप्तः
चित्ते स सञ्चरतु गोरसतस्करो मे।।12

एकाग्र चित्त करुनीच यशोमती ही
देवार्चना नित करीच प्रभातकाली
पूजा करीत असता नयने मिटोनी
नैवेद्य अर्पण करी जननी बघोनी।।12.1
येईच रांगत हरी करण्यास खोडी
नैवेद्य-दूध पिउनी मनि तृप्त होई
तो दूधचोर इवला, इवला हरी हा
संचार चित्ति करु देत सुखे सदा हा।।12.2

स्तन्यं पयश्च गरलं बत निर्विकारं
तुल्यं निपीय सहसैव हि पूतनायाः।
साम्यं दिशन्नभिमतं सुखदुःखयोस्तत्
हृत्पङ्कजे मम सदाऽस्तु स बालयोगी ।।13

जो स्तन्यपान करिता खल पूतनेचे
पीतोचि दूध, विषही जणु एकभावे
नाहीच अंतर म्हणे जणु सौख्य-दुःखे
योगीच तो चिमुकला मम चित्ति राहे।।13

`दध्योदनस्य कवलं तव रे गृहाण
नो चेत् झगित्य हरेत् कलविङ्क एष'।
मातुर्हि चाटुवचनैरिति भोक्तुकामः
चित्ते स मे वसतु कोऽपिमनस्विबाल ।।14

``घे घास तू लवकरी दहिभात आता
येईल भुर्रचि चिऊ पळवेल घासा''
माता वदे मधुर; आ करितोचि कान्हा
तो गोड गोड छकुला हृदयी रहावा।।14

गोपीजनं मधुपुरीं प्रति गन्तुकामं
हैयंगवीन-दधि-दुग्धलवं प्रसह्य।
मार्गे प्रसारितकरं प्रतियाचमानः
प्रीतिभिक्षुक उपेतु मदन्तरङ्गे।।15

( हैयंगवीन - कालच्या दुधाच्या दह्यापासून केलेले ताजे तूप )

ह्या गौळणी लगबगे मथुरेसि जाती
घेऊन दूध, दहि, साजुक तूप, लोणी
पाहूनिया कटिवरी घट वा शिरी ही
हे बालसैन्यचि अचानक येत मार्गी ।।15.1

दोन्ही भुजा पसरुनी अडवून त्यांसी
मागे लबाड हरि हा दहि, दूध, लोणी
तो प्रेमभिक्षु इवला उपमा न ज्यासी
राहो सदैव हृदयी मज आस मोठी।।15.2

गोपीजनेन बहुशः परिभर्त्स्यमानः
क्रुद्धाम्बयोद्धृतकरं प्रतितर्जमानः।
तातं भियेव शरणं हि गवेषमाणः
हृद्गह्वरे वसतु गोरसतस्करो मे ।।16

तक्रार गोपि करिती ``करु काय सांगे- -
आहेचि द्वाड बघ बाळ तुझा यशोदे''
``कारे खट्याळ छळितो ''  म्हणुनी यशोदा
ज्याच्या वरीच लटका कर हा उगारे।।16.1

येताचि संकट असे हरि धाव घेई
तातांकडेच शरणागति नित्य याची
तो दूधचोर गवळी छकुला मुरारी
माझ्या मनात बसुदे लपुनी सदाची।।16.2


``गौरोऽहमस्मि जननी तव चापि गौरी
त्वं काकतुल्य '' इति जल्पति नन्दताते।
पिष्टं पयश्च सरुषं स्वतनौ विलिम्पन्
चित्तेऽस्तु मे कृतकगौरशिशुः सदैव ।।17

कृष्णास तात म्हणती, - ``तव माय गोरी,
मी ही असे बघ कसा बहु गौरवर्णी-
काळाच तू छि छि! दिसे; जणु कावळाची''
ऐकून गाल फुगवे हरि रागवोनी।।17.1
फासेचि दूध तनुला वर पीठ चोळी
माखून जाई पुरता तरि ध्यान मोही
जो गौरकाय बनला हरि सावळाची
तो सावळा उजळवो मम चित्तवृत्ती।।17.2


दामोदरे दृढनिबद्धमवेत्य मात्रा
बन्धव्यथाभिनयमीषदिव प्रदर्श्य ।
कुर्वन् प्रयत्न-शतमात्मविमुक्ति-हेतोः
मन्मानसे शिशुमुमुक्षुरसौ सदाऽस्तु।।18

रज्जूच बांधुनि जया उदरास पक्की
बांधून ठेवि उखळास यशोमती ही
आहेचि मुक्त हरि; बंधन ना जयासी
प्रेमात तो अडकला न च मुक्ति त्यासी।।18.1

``होतोचि त्रास मजला कुणि सोडवा ना''
ऐशा करे अभिनया शतवेळ कान्हा
जो प्रार्थनाचि लटकी करि मुक्तिसाठी
तोची मुमुक्षु इवला वसु देत चित्ती।।18.2पूर्णेन्दुमेचक-कलङ्कमनोज्ञवर्णं
हैयंगवीन-धवलीकृतमात्मवक्त्रम्।
आदर्शबिम्बितमवेक्ष्य भृशं प्रसन्नः
मच्चित्तबिम्बकलितोऽस्तु मुग्धबालः ।।19

 डौलात घालि भर डागचि चंद्रम्याचा
तैसाचि श्यामल हरी मन मोहवी हा
घेईच फासुन मुखा नवनीत सारे
तो दर्पणी बघतसे मुख शुभ्र त्याचे।।19.1

हासेचि जो खुदुखुदू बघुनीच बिंबा
जो, तोषला मनि बहू बनुनीच गोरा
तो शुभ्र कृष्ण प्रतिबिंबित नित्य व्हावा
माझ्याच ह्या हृदयदर्पणि सावळासा।।19.2


सान्द्रेन्द्रनीलमणिरोचिषि नैजदेहे
तक्राभिमन्थन-समुच्छलदच्छ-बिन्दून्।
श्रीरोदफेनकणवत् परिधर्तुकामः
मन्मानसे वसतु कोऽपि स बालविष्णुः ।।20

ताकास त्या घुसळता उडतीच थेंब
अंगावरीच हरिच्या दिसती सुरेख
नीलार्द्र नीलमणिच्या सम कांती ज्याची
त्याच्यावरी उमटली अति रम्य नक्षी।।20.1

जैशा समुद्रलहरी उठता अनेक
विष्णूवरी उडतसे अति शुभ्र फेन
तैसाचि जो सजविला दधिबिंदुनेची
तो बालविष्णु असु दे मम अंतरंगी।।20.2ऊधःप्रसक्त-नववत्समवेक्ष्य लोल:
क्रीडारतोऽपि जननीमिव धेनुमेत्य।
कुर्वन् स्तनंधरयतिं सह तर्णकेन
धारोष्णदुग्धरसिकोऽस्तु समे हृदन्तः ।।21

पाहूनियाचि नवजात पिलु धेनुचे ते
जे आचळास लुचते जननीस प्रेमे
सोडून खेळ हरि ये हळु धेनुपाशी
वत्सासवे पिउनि दूध चि तृप्त होई।। 21.1

जो वासरासह करी स्तनपान मोदे
धारोष्ण दूध बहु ते प्रिय ज्या मुकुंदे
तोची मुकुंद अति चंचल बाळ मोहे
माझ्याच ह्या हृदयमंदिरि नित्य राहे।।21.2


उत्तुङ्ग-पिप्पल-विलम्बिनि चाल्यमाने
हिन्दोलके त्वरितरिङ्गण-सौख्यमाप्य ।
सम्भावयन् गरुडसञ्चरणं तदुच्चैः
चित्ते सदा मम स रिङ्गतु बालकृष्णः ।। 22

अश्वत्थ वृक्ष बघुनी अति भव्य मोठा
फांदीस त्या तरुचिया हरि बांधि झोका
आकाश स्पर्श करण्या जणु झेपवे हा
झेपावतो गरुड वा गगनी जसा का।।22.1

जो कल्पना करितसे गरुडावरी मी
होऊन स्वार फिरतो गगनी कुठेही
कान्हाचि जो बघतसे अति भव्य स्वप्ना
आंदोळु दे हृदयवेलिवरीच नित्या।।22.2
(अश्वत्थ वृक्ष - पिंपळाचे झाड )


नेत्रोत्सवो जलदलोलुप-बर्हिणानाम्
कर्णोत्सवो मुरलिनादभुजां मृगाणाम्।
दीपोत्सवो निखिल-गोपकुटुम्बकानां
चित्तोत्सवो भवतु मे स निधिः सुखानाम् ।।23

संपृक्त नील घन ज्या सुखवी मयूरां
गोविंद भासत असे नयनोत्सवो त्यां
माधुर्य ते मुरलिचे रिझवी मृगां ज्यां
वाटे मुकुंद जणु कर्णमहोत्सवो त्यां।।23.1

वैराग्य ज्ञान मिळुनी उजळून गेले
संपूर्ण जीवन सुखे व्रजवासियांचे
त्यांसी गमेच हरि दीपमहोत्सवोची
चितोत्सवोचि करुदे सुखमेघ तोची।।23.2

राधादि-गोपवनिताभिरसंख्यवारं
स्वप्नेषु जागृतिसुषुप्तिषु चिन्त्यमानः।
वात्सल्यतः प्रणयतो दृढभक्तितश्च
हिक्काकुलः शिशुरसौ स्मरणे ममाऽस्तु ।।24

राधा असो गवळणी व्रजवासि नारी
स्वप्नात, जागृतित वा स्मरती हरीसी
झोपेत ही ` हरि हरी ' म्हणती मुखानी
वात्सल्य, प्रेम, दृढ भक्ति असे तयांची।।24.1

त्यानेच लागुनचि का उचक्या किती या
बेजार केशवचि तो शिशु गोड कान्हा
आकंठ प्रेमजलधीत निमग्न झाला
राहो सदा मम मनी वसुदेवतान्हा ।।24.2


आलिन्दके निजगृहस्य सुखोपविष्टः
एह्येहि मातरिति गृष्टिमुपाह्वयंश्च।
वात्सल्यतो बत तया परिलिह्यमानः
धेनुप्रियः शिशुरसौ मम मानसेऽस्तु ।।25

आहेच जी प्रसवली पहिल्याच वेळा
धेनूस बोलवि हरी अति स्नेहपूर्णा
ओटीवरी बसुनिया निज मंदिरी च्या
``ये धेनु माय जवळी मजपाशि हम्मा''।।25.1

येऊनि धेनु जवळी अति प्रेमभावे
चाटे मुकुंद-मुख, अंगही ते जिभेने
तो गोपबाळ लडिवाळचि धेनुप्रेमी
आनंदमूर्ति वसु दे मम अंतरंगी।।25.2


नन्दाङ्कपीठमुपविश्य दृढं कराभ्यां
संधारयन् शकटपाशमतिप्रसन्नः।
याहीति मञ्जुपरुषं वृषभौ ब्रुवाणः
चित्ते स सञ्चरतु गोकुलसारथिर्मे ।।26

तातांचिया सुखद मांडिवरी बसोनी
हाती लगाम धरि; चालवि बैलगाडी
घालीच हाक वृषभांसि खडी, सुरीली
राहोचि तो हृदयि गोकुळसारथीही।।26


तत् कुञ्जपञ्जर-शुकैरतिजञ्जपूकैः
उक्तं निशम्य स हि मञ्जुलरामनाम।
सीतावियोगज-शुचोद्गत-नेत्रनीरः
जातिस्मरः शिशुरसौ स्मरणं ममेतु ।।27

पाळीव कुंज वनिचा शुक पिंजर्‍यात
‘श्रीराम राम’ वदता मधु बोल नित्य
सीता वियोग स्मरतो गतजन्म जन्म
पाणावती नयन जानकि आठवून।।27.1

ज्यासी स्मरेचि अवघे गत जन्म पूर्ण
ज्याची विलक्षण स्मृती करितेचि दंग
तो नंदनंदन हरी वसुदेवपुत्र
माझ्याच या हृदयमंदिरि राहु देत।।27.2


मात्रा समं नगर-देवकुले कदाचित्
श्रुण्वन् पुराणरसिको रघुवीरगाथाम् ।
र्‍हीणः कराम्बुजपुटेन मुखं हि वृण्वन्
स्वस्तोत्रविद्विडनिशं स ममास्तु चित्ते ।।28

आईसवे कधि कधी हरि राउळी ये
ऐकेचि कीर्तन तिथे अति आवडीने
ऐकून अद्भुत अशी रघुवीर गाथा
लाजून जाइ हरि ऐकुनि स्वप्रशंसा।।28.1

झाकून घेइ मुख तो करसंपुटाने
ते आपुलेचि गुणवर्णन ऐकता गे
 ज्यासी रुची मुळि नसे स्तुति ऐकण्याची
तो देवकीसुत सदा वसु देत चित्ती।।28.2


मात्रातिभावुकतया परिगीयमानं
प्रस्वापने प्रतिनिशं प्रियरामगीतम्।
आकर्ण्य कर्णविवरे पिदधत् कराभ्यां
स्वस्तोत्रविद्विडनिशं स ममास्तु चित्ते ।।29

कृष्णास थोपटुनि झोपविते यशोदा
अंगाइ गीत म्हणुनी लडिवाळ जेंव्हा
गुंफून त्यात रघुवीर कथा सुरम्या
सांगे पराक्रमचि उज्ज्वल राघवाचा।।29.1

कानांवरीच कर ठेवि मुरारि तेंव्हा
मातामुखातुनचि ऐकुनि स्वप्रशंसा
ऐकोनिया स्वगुण लाजुन चूर होई

 तो वासुदेव हृदयी नित राहु देई ।।29.2प्रबोधनम् (भूपाळी )

कृष्ण! त्वदङ्गसम-वर्णवती निशेयं
दूरप्रवास-गमनाय समुद्यतेव।
त्वां शीतलानिल-करेण परामृशन्ती
नूनं निवेदयति निर्गमनं स्वकीयम्।।30

‘ही शर्वरी तुजसमा घननीलकांती
जाते कुठे नच कळे अति दूर देशी’
सांगे हळू झुळुक ही तुज स्पर्शुनीया
घेई निरोप रजनी तव कृष्णबाळा।।30

त्वन्नेत्रसुन्दर-सरोरुह-सम्भवानि
निर्बद्धमन्तरनिशं हि पिबन्मधूनि।
निर्यास्यति त्वदलकाभमिलिन्दवृन्दं
राजीवलोचन! विलोकय चित्रमेतत्।।31

जैसेचि लोचन तुझे सुखवी मनास
तैसीच ही उमलली कमळे जलात
जैसे तुझे कुरळकुंतल नीलवर्ण
कृष्णा तसे भ्रमर हे बघ कृष्णवर्ण।।31.1

झालेच गुंग मधुपान करीत धुंद
गेलेच ते विसरुनी बघ देहभान
होताच सांज मिटली कमळे जलात
बंदीच भृंग बनले कमलादलात।।31.2

होता पहाट उमले दल एक एक
मुक्ती मिळे मधुकरा उडती पुन्हाच
हे दृष्य सुंदर असेचि विलोभनीय
पाही सख्या लवकरी भ्रमरादलास।।31.3


दन्तावलीव तव हीरकणावदाता
तारावलीयमतिभाति हि दिङ्मुखेषु ।
आह्वाय तां निजकरैरवचेतुकामः
बालारुणस्तव सखा स्पृशतीव मन्दम् ।।32

वाटे जणू हिरकण्या तव दंतपंक्ती
तैशाच ह्या चमकती नभि तारकाही
वाटे दिशामुखचि हे सजले तयांनी
झाले प्रसन्न नभ का मुख हे तुझेची।।32.1

आला सखा अरुण पूर्वदिशेस पाही
वेचावया चमकत्या नभि चांदण्याची
लावून बोट तुजला हळुवार तोही
‘बाळा उठी’ म्हणतसे छकुल्या प्रभाती।।32.2


शेफालिका-बकुल-कुंद-सरोरुहाणां
ईषत् समुच्छ्वसित-कुड्मल-मन्दगन्धाः।
सम्मिश्रितास्तव समुच्छ्वसितेन नूनं
स्पर्धालवो दिशि दिशि द्रुतमुत्सरन्ति ।।33

प्राजक्त, कुंद, कमळे, बकुळी फुलांचे
आमोद ते विहरती पवनासवे रे
संमिश्र तो परिमलू करितोचि स्पर्धा
श्वासासवेच तुझिया; पसरे दिशांना।।33

त्वादृङ्मनोहर-कलङ्क-विशेषशोभी
ह्यस्ताचलं जिगमिषत्यमृताकरोऽयम् ।
चन्द्राननं तव शुचिस्मितमीक्षमाणाः
दिव्यां तृषं प्रशमयन्तु पुनश्चकोराः ।।34

घेऊनि अमृतमयी बघ चांदण्याला
अस्ताचलास झुकला बघ चंद्रमा हा
रूपा कलंक खुलवी अजुनीच त्याच्या
त्याच्या समान मुख हे तव कृष्णबाळा।।34.1

आहे निरागस अती तव हास्य बाळा
वर्षाव ते करितसे जणु अमृताचा
आता चकोर सगळे शमवी तृषेला
आल्हाददायि तव हे मुख पाहुनीया।।34.2


आरौति चैष पिहितः कृकवाकुरुच्चैः
अभ्याह्वयन्निव चिरास्तगतं हि मित्रम्।
ध्रुन्वन्ति पक्षयुगलान्यपि मन्दमन्दम्
अम्भोजपत्रशयिताः प्रियचक्रवाकाः ।।35

तो झाकला कुकुटही करि कूकुचुकू
‘ये सूर्य ये लवकरी किति वाट पाहू’
मित्रास बोलवि नभी किति आरवूनी
ऐकी मुकुंद सखया उठि बाळ तूची।।35.1

हे चक्रवाक निजले बघ पद्मपत्री
झाली चुकामुक तयांचिच सांजवेळी
येताचि जागृति पहा मिळतीच दोन्ही
दोन्हीही पंख हलवून करीत गोष्टी।। 35.2


प्राचीयमुद्यदरुण-प्रभया प्रसन्ना
खिन्ना रजपटलवन्मलिना प्रतीची।
प्रम्लायते कुमुदषण्डमथैकतो यत्
तत् पुण्डरीकवनमन्यत उच्चकास्ति ।।36

झाली प्रसन्न, सजली बघ हीच प्राची
झाली मलीन अति खिन्नचि पश्चिमा ही
ह्या झोपल्या कुमुदिनी मिटुनी दलांसी
उत्फुल्ल रक्तकमळे बघ डोलती ही।। 36


दूरे गदद्गद नदो यमुनाजलानां
कुञ्जे च मञ्जुलरवो द्विज-शावकानाम् ।
वेदध्वनिर्गुरुकुले द्विजबालकानां
सन्मत्रजागरमिवोद्गिरति त्वदर्थम् ।।37

झंकारतीच लहरी यमुनाजळाच्या
पक्षी-पिलू किलबिले अति गोड बाळा
ते वेदमंत्र गुरुकुलातुन शिष्य गाता
हा मंत्रजागर गमे तुजसाठी बाळा।।37


ग्रामीणगीति-मधुरस्वरमिश्रितोऽयं
भ्राम्यद्घरट्ट-निपतन्मुसल-ध्वनिर्हि।
देवालयाहत-मृदङ्ग-निनादतुङ्गः
उद्बोधयत्यखिल-गोकुलमस्मदीयम् ।।38

होता पहाट किति हे ध्वनि गुंजताती
भूपाळि, ओवि, घुमतो मधु काकडाही
वाजे मृंग धिमऽधीं सह एकतारी
देवालयीच झडतो नित चौघडाही।।38.1

तालावरी मुसळ कांडि धमंऽऽधमं ते
जाते करी घरघराट दळे पिठाते
एकत्र नाद घुमती अरुणोदयासी
या गोकुळा उठविती दररोज पाही ।। 38.2


``गोविन्द! केशव! मुकुन्द! हरे! मुरारे!
गोपाल! माधव! जनार्दन! पद्मनाभ! ।
पीताम्बर! व्रजकिशोर! विमुञ्च निद्रां
हे कृष्ण! जागृहि झगित्यवबोधयामि''।।39

कान्हा! मुकुंद! उठि रे वनमाळि तूची
गोपाळ! बाळ उठि रे अनघाच तूची
गोविंद! केशव! हरी! पुरुषोत्तमाची
बाळा उठी झडकरी सरली निशा ही।। 39

पर्यङ्किका-निकटसंस्थितया प्रगीतं
श्रुत्वा प्रबोधनमिदं हि यशोदयैवम् ।
उन्मीलयन् कमललोचनयुग्ममीषद्

जागर्तु मन्मनसि नित्यमसौ किशोरः ।।40
(पर्यङ्क - पलंग)
पर्यंकि कृष्ण जवळीच यशोमती ही
गाऊनि गोड उठवी निज बालकासी
 कृष्णास त्या हलविता हळुवार हाती
कान्हाचि नेत्र उघडे कमलासमाची।। 40.1
जागाचि जो कमललोचन हो प्रभाती
राहोचि जागृत सदा मम मानसी ही।।40.2``ध्वान्तं विशीर्णमरुणप्रभया प्रभातं
गच्छाम्यहं झटिति जागृत जागृतेति''।
उद्बोधयन् सकल-गोपकुलं प्रभाते
जागर्तु मन्मनसि कोऽपि स जागरूकः ।।41

``अंधार तो सरुनिया गगनी उषा ये
रंग प्रकाश पसरे नभि हे अनोखे
हो झुंजुमुंजु; उठले जग हेचि सारे
मी चाललो झडकरीच उठा उठा रे''।।41.1

गोपांस त्या सकलची ललकारुनीया
जो वासुदेव उठवी व्रजभूमिला या
घालून साद मज तो चिमणा कन्हैया
राहो सदैव मनि जागृत माझिया ह्या।।41.2


सन्मानस-प्रकट-भावतरङ्ग -गाही
सुक्षीरमात्ररसिकः शुभदर्शनश्च ।
अम्भोजिनी-वनविहार-विलासलोलः
मन्मानसे वसतु गोकुलराजहंसः ।।42

त्या संत मानस सरोवरि भक्तिचे जे
वात्सल्यपूर्ण उठतीच तरंग त्याते
जो राजहंस विहरे मनमुक्ततेने
तोची प्रसन्न सुकुमार मुकुंद मोहे।। 42.1

जो क्षीर-नीरचि विवेक करी स्वभावे
ज्या क्षीरची रुचिर हे रुचते मनाते
सार्‍या सरोजवनिचा व्रजराजहंस
तोची मनात विहरो व्रजबालहंस।।42.2


उद्भिद्यमान-नवनीरज-कोरकान्तर्
-लीनं मिलिन्दयुगलं व्यपनीय मन्दम् ।
तत्पीतशेष-मधुबिन्दुरस-प्रसक्तो
हृत्कोरकं स्पृशतु मे स हि कृष्णभृङ्गः ।।43

ती मंद मुग्ध फुलता कमळे जलात
पाहूनि त्यात लपल्या भ्रमरद्वयास
लावीतसे उडवुनी हळुवार हाती
तो थेंब एक उरला मधु चाखण्यासी ।। 43.1

स्पर्शूनि चित्त-कलिकेसचि माझिया ह्या
तोची मिलिंद करु दे मधु गुंजनाला
चित्ती वसो सतत भृंग मधुव्रता हा
तो कृष्ण माधव हरी लडिवाळ कान्हा।।43.2


देवालये द्विजकुल-श्रुतिमत्रपाठं
तारस्वरं निजविनिश्वसितेन सार्धम् ।
शान्तं समाहितमनास्तुलयन् प्रसन्नः
चित्ते सदाऽस्तु स हि वैदिकबालको मे ।।44

देवालयी म्हणति हे द्विज वेद सारे
निश्वास जे असति त्या परमेश्वराचे
हा आसमंत अवघा भरुनीच राहे
 गंभीर तो ध्वनि घुमे व्रजभूमिमध्ये।। 44.1

एकाग्रचित्त करुनी हरि शांतभावे
तारस्वरात घनगंभिर घोष ऐके
होई प्रसन्न; तुलना करि श्वास संगे
तो बाल वैदिक असो हृदयामधे रे।।44.2

सञ्चालयन् करुणया प्रियधेनुवृन्दं
सम्मोहयन् जगदिदं मुरलीरवेण ।
संहासयन् पटुगिरा युवतीकदम्बं
मन्मानसे स्फुरतु गोकुलबालराजः ।।45

घेऊनि धेनुकळपास अति आवडीने
चारावयास वनि जो नित नेई प्रेमे
मोहून टाकि जग हे मुरलीरवाने
बोलूनि गोड हसवी युवतीजनाते।।45

तो बाळराज मनमोहन कृष्ण कान्हा
माझ्या मनात प्रकटो व्रजबाळराजा।।45.2


नीरन्ध्र-पल्लवित-तुङ्ग -तमालवृक्ष-
च्छायां नवाम्बुदनिभामवगाहमानः।
सम्भावितस्तु मुरलीरव-कूजितेन
हृत्कुञ्जके चरतु बालपिको ममासौ।।46

पाने जिथे अडविती किरणांसही त्या
भेदून पर्ण-कवचा नच जाई वारा
जेथेचि ऊंच घनदाटचि वृक्षमाला
रानात तालतरुच्या विहरे हरी त्या।।46.1

नीलार्द्र नीलघन हा करितो प्रवासा
वेणूरवेचि कळतो विहरे कुठे हा
जो बाल कोकिळ मना भुलवी सुरांनी
राहोचि गुंजत मनी करुणारसानी।।46.2


वक्त्रं च नेत्रयुगलं नवनीरजाभं
मोहात्परिभ्रमति हन्त मिलिन्दवृन्दे।
व्यर्थं कराम्बुजपुटेन हि निह्नुवानः
हृत्सम्पुटे वसतु मे कमलालयोऽसौ ।।47

होता पहाट उमलेचि सरोज तैसे
उत्फुल्ल नेत्र, मुखही बघुनी हरीचे
येतीच भृंग किति हे मधु चाखण्या ते
गुंजारवा करुनिया फिरती मधार्थे ।। 47.1

जो वारितो हलवुनी करसंपुटाने
भुंग्यांस व्यर्थ जमल्या मधु प्राशिण्याते
कल्याणमूर्ति कमलालय मुग्ध कान्हा
माझ्याच ह्या हृदयसंपुटि तो रहावा।।47.2भास्वद्विचित्र -शिखिबर्ह-किरीटधारी
प्रत्यग्र-वन्यसुमनोभर-माल्यशाली
कूजत्कपोत-कलहंस-रवानुकारी
हृत्कुञ्जकेऽस्तु मम कोऽपि स बालमायी ।।48

माथ्यावरी मुकुट मोरपिसापिसांचा
रंगीत तो चमकदार सुरेखसा हा
रानातल्या बहु सुवासिक त्या फुलांचा
कंठात हार रुळतोचि फुलाफुलांचा।।48.1

घालेचि साद हरि हंस कपोत यांना
 काढून नादचि हुबेहुब त्या खगांचा
हंसांसवे कलकलाटचि जो करी हा
मायावि बालकचि तो हृदयी रहावा।। 48.2


गोपीजनस्य हरिभक्ति-सरित्प्रवाहे
मग्नस्य मोहित-मनोवसनानि हृत्वा ।
पश्यंतटस्थ इव विह्वल-चेष्टितानि
कर्षत्वसौ मम मनोवसनं स कृष्णः ।।49

मोहूनिया हरिवरी व्रजभूमिबाला
ह्या ‘कृष्णभक्ति-सरितेत’चि नाहताना
ना देहभान उरले कसलेच त्यांना
पाहून ये हळु हरी ‘सरिता-तिरी’ या।।49.1

घेऊन जाइ मन-वस्त्रचि एकले ते
व्याकूळ त्या विनविती वसने हरी दे
राही तटस्थ हरि जो बघुनी तयांते
माझे मनोवसन ओढुनि तो हरी ने।।49.2


उन्मत्त-कोकिलकुल-प्रतिगीयमानं
आकर्ण्य दीर्घतर-पञ्चमराग-तानम् ।
कुर्वन् प्रतिध्वनिमिवास्य सरिन्निकुञ्जे
हृत्कुञ्जगो भवतु मे शिशुकोकिलोऽसौ ।। 50

गर्धव पृथ्विवरचा जणु गानराजा
कोकीळ-मत्त, सुर पंचम लावितो हा
ती दीर्घ तान घुमता यमुना तिरी या
घालीच साद अनुनाद करोनि कान्हा।।50.1

जो कुंजरानि फिरतो यमुना तिरीच्या
जो बालकोकिल करी प्रतिनाद साचा
तो बालकोकिल वसो हृदयात माझ्या
राहो सदैव मम मानस-मंडपी या।।50.2


ऋतुविहार

सुश्यामल-च्छविरुदीर्ण-सुपीतवासाः
स्वेदाम्बुबिन्दुभरितो नयनाभिरामः ।
हिण्डन् निदाघदिवसे पुलिनं सुतप्तं
चित्ताम्बरेऽस्तु मम बालबलाहकोऽसौ ।।51

येताचि ग्रीष्म ऋतु हा सविताचि कोपे
ओकेचि आग; जन हे अति त्रस्त झाले
हिंडे उन्हात पुळणीवर तापलेल्या
मेघासमान हरि श्यामल कोमला हा।।51.1

हे भूषवी वसन सोनसळी हरीला
हे घर्मबिंदु सजवी हरिच्या तनूला
नेत्रास जो सुखवितो अती ग्रीष्मकाली
तो नीलमेघ विहरो मन-अंबरी ही।।51.2वर्षाविहार

वर्षासु नूतनपयःकणवर्षकाले
गेहाङ्गणे स्वभुज-पक्षयुगं प्रसार्य ।
चक्रभ्रमिं स्वपरितो बहुशो वितन्वन्
कोप्यस्तु बालविहगः स हृदम्बरे मे ।।52

येताचि धावुन नवी सर अंगणी ही
पंखांसमान पसरे हरि हात दोन्ही
नाचेचि गोल फिरुनी गिरक्याहि घेई
पक्षीच तो चिमुकला मम चित्ति राही।।52


कादम्बिनीसहचरीं गुरुशङ्खगौरीं
चन्द्रावलीमिव विभाव्य बलाकपङ्क्तिम् ।
आश्चर्यवद् विनिमिषं चिरमीक्षमाणः
हृत्पञ्जरेऽस्तु मम बालचकोरकोऽसौ ।।53

शंखासमान अतिशुभ्र बलाकमाला
संपृक्त नील जलदांवरि पाहुनीया
आश्चर्य वाटुनि करी हरि कल्पनेला
हा चंद्रहार न कळे कुणि गुंफियेला।।53.1

पाही तयास अनिमेषचि लोचनांनी
गेला किती समय हा तरि भान नाही
छोटा चकोर जणु हा हरि चंद्रप्रेमी
राहो सदैव मम बालचकोर चित्ती।।53.2


वेल्लद्बलाक-ततये नभसा चरन्त्यै
‘सन्देहि देहि पय’ इत्यभियाचमानः।
पश्यन् नखेषु धवलानि पृषन्ति भूयः
मन्मानसेऽस्तुबलाकसखः सदैव ।।54

पाहूनिया धवल शुभ्र बलाक-माला
जाई हरी हरखुनी नभि पाहतांना
`दे दूध दूध बगळ्या'' म्हणतोचि कान्हा
पाही नखांवरिल पांडुर वर्ण कान्हा।।54.1

 गोपाल बालक, बलाक-सखाचि तो हा
माझ्या मनात मनमोहन तो दिसावा ।। 54.2शरद्विहार

 तं मेचकाम्बरचरं शरदम्बुवाहं
नीलाम्बरं ननु पलायितमेव मत्वा।
चिन्तातुरस्तदवरोहणमीक्षमाणः
मामीक्षतां दयितबन्धुरसौ किशोरः।।55

येता अचानक नभी शरदात मेघ
काळे-कुळे बघुनि चिंतित जो मनात
तो ‘नीलअंबर’ कुठे बलराम माझा
गेला पळूनि म्हणतो मज दाखवा ना।।55.1

नीलांबरा हुडकितो अति काळजीने
पाहीच वाट; दिसतो कधि लोचनाते
होई अधीर बघण्या निजबंधुसी जो
पाहो जरा मजकडे करुणाघनू तो।। 55.2नक्तं नभश्चरसुधाकर-बिम्बलोलः
राधामुखामृतकर-प्रसितो दिनेषु ।
ज्योत्स्ना-करम्भ-रसिकोऽनिशमेवमुच्चैः
हृत्कोटरेऽस्तु मम बालचकोरकोऽसौ ।।56

येता निशा प्रकटतो नभि शुभ्रभानू
वर्षाव अमृतमयी करि तो सुधांशु
पाहून दृश्य रमतो हरि अंतरंगी
राधा-मुखा निरखिता दिवसा तसेची।।56.1

आस्वाद घेइ दहिभातसमाचि जो हा
त्या स्निग्ध शांत धवला नभि कौमुदी वा
राधामुखामृतरुपी किरणावलीचा
राहो हृदी रसिक बाल-चकोर तो हा।। 56.2


रासे रसानुभव-कुञ्चित-लोचनानां
मध्ये त्रिभङ्गिसुतनुर्व्रजसुन्दरीणाम् ।
पर्यस्त-लोचनमितस्तत ईक्षमाण
चित्तेरासरसिको मम नित्यमस्तु ।।57

रासक्रिडानुभव घेऊनि गोपिका त्या
अर्धोन्मिलीत नयने मनि तृप्तकामा
हातात हात धरुनी करि नर्तनाला
राहे उभा हरि मधे अति देखणा हा।।57.1

देहास त्या लववुनी बघ तीन स्थाना
चौफेर तो बघतसे व्रजगोपिकांना
रासक्रिडारसिक मानसहंस कान्हा
माझ्या करो हृदयमंदिरि रासलीला।।57.2


वेणुध्वनि-श्रवण-लोलदृशो मृगस्य
दृक्कान्तिमात्मनयनप्रतिमां विधातुम् ।
स्नेहेन कज्जलकलाकुतुकं वितन्वन्
चित्ते स मे हरिणवत्सलकः सदाऽस्तु ।। 58

ऐकून वेणु हरिची मृग लुब्ध होती
होती उताविळचि चंचल लोचने ही
शोधीत येति हरिसी मृगशावकेही
घेई तयांस जवळी हरि दो करांनी।।58.1

रेखी तया नयनि काजळ आपुलेची
देण्यास का चमक ती, निज लोचनांची
ज्यासीच आवड असे मृग-शावकांची
राहो मनी हरिणवत्सल तो मुरारी।।58.2 कुञ्जे पवित्र-तुलसीदल-मञ्जरीणां
संकृन्तने व्यवसितामवलोक्य राधाम्।
सान्द्र-व्यथाकुलमनाः सहसा प्रकुप्यन्
चित्ते ममास्तु तुलसीप्रणयी सदाऽसौ ।।59

बागेत कृष्ण-तुलसी-दल, मंजरीसी
राधा प्रभात-समयी खुडता बघोनी
होई मनी व्यथित कृष्ण हरी मुरारी
येई अभावित तया बहु क्रोध चित्ती ।। 59.1

आहे प्रगाढ तुलसीवर प्रेम ज्याचे
राहो मनात तुलसीदलप्रेमि तो गे।। 59.2


गोपादधूलि-जनितोत्तम-भस्मरागः
रज्जूरगं कटितटे च गले दधानः ।
गोवत्सपृष्ठमधिरुह्य चरन् वनान्ते
चेतश्चरो भवतु मे स हि बालशम्भुः ।। 60

ती गो-धुली बसतसे हरिच्याच अंगी
गाई गुरे चरविता उडते खुरांनी
भासेचि बालशिव भस्मविभूषिताची
कान्हा वसो शिवमयी मम अंतरंगी।। 60.1

रज्जू कसे कटिसि वा कधि ठेवि स्कंधी
वाटेचि सर्प सगळे रुळतीच देही
खोंडावरी बसुनि जो फिरतोच रानी

तो बालशंकर वसो मम अंतरंगी।।60.2क्षेत्रे कृषीवल-किशोर-समूढमम्भः -
-पूर्णावसिक्त-घटकं जलयत्र -चक्रम् ।
उच्चावचस्थिति-विबोधकृते प्रशंसन्
सत्तत्त्वबोधकशिशुः स ममाऽस्तु चित्ते ।।61

हे भूमिपुत्र जल सिंचति या पिकांना
चाले रहाट जणु चक्र फिरे तसा हा
येती भरोनि घट हे वर ते जलाने
जातीच रिक्त घट खालति हेचि वेगे।।61.1

आहेचि जीवन असे जणु दर्शवीते
आलेचि संकट तरी सुख ये क्रमाने
पाहूनि दृश्य हरि जो करितो प्रशंसा
 सत्तत्त्वबोधक चि तो हृदयी रहावा।।61.2

मृत्कुम्भमम्बुभृतमुद्धतलेष्टुकाभिः
निर्भिद्य मस्तकगतं व्रजबालिकायाः ।
शङ्खाभिषेक-सुखमध्वनि भूरि विन्दन्
मन्मानसेऽस्तु स हि चञ्चलबालराजः ।।62

माथ्यावरील जलकुंभचि सावरोनी
येता बघोनि सकला वृजवासि नारी
मारी खडा धरुनि नेम घटांवरी हा
माथ्यावरीच घट होत असे रिकामा।।62.1

त्याची जलात भिजतो पुरता कन्हैया
राज्याभिषेक गमतो सुखसोहळा हा
शंखाभिषेकचि जया पथिची जहाला

तो बाळराज करुदे हृदयीच सत्ता।।62.2


दशावतारलीला

कल्लोल-संकुल-कलिन्दसुताप्रवाहं
मीनावगाहमवगाह्य मुदातिवेलाम् ।
आद्यावतारसदृशीं प्रथयन् सुलीलां
मन्मानसे विहरतां स हि बालमीनः ।।63

कालिंदिच्या जळि किती उठतीच लाटा
मासोळि च्या सम तयी विहरेच कान्हा
मत्स्यावतार स्मरतो बघुनी तयाला
तो बालमत्स्य विहरो मनसागरी या।।63तं तोयकेलिषु महीध्र-नरावतारं
पृष्ठेऽवधृत्य बलिनं हलिनं सहेलम् ।
भ्राम्यन् जवेन सलिले ननु कूर्ममानी
मन्मानसे भ्रमतु कोऽपि स बालकूर्मः ।।64

डोहात खोल यमुनाजळि पोहतांना
घेऊन पाठिवरती बलराम दादा
हा कासवासम तया करि पार कान्हा
तो बालकूर्म नित या हृदयी रहावा।।64


स्तम्भप्रभेद-समयोर्गुरुतालतर्वोः
अभ्यन्तरे कुपित-केसरि-राव-रौद्रम् ।
गर्जन् घुरूर्घुरुरिति व्रजबालभीत्यै
हृत्कुञ्जके वसतु मे स नृसिंहबालः ।।65

स्तंभासमान तरु दोन उभे बघोनी
कान्हा लपे हळुच ताल-तरूत दोन्ही
आवाज काढि घुरघुर्र जणु सिंह येई
मित्रांस घाबरवि तो करुनीच मस्ती।।65.1

तोची नृसिंह इवला बसुदे लपोनी
माझ्याच ह्या गहन चित्त-वनी सदाची।।65.2भूदान-केलि-समये चरणं स्वमेकं
क्रीडानृपस्य सुहृदः प्रणिधाय मूर्ध्नि ।
अन्यं स्वराक्रमितुमूर्ध्वमिवोद्दधानः
हृद्देशमाक्रमतु मे शिशुवामनोऽसौ ।।66

गोपांसवे लुटुपुटीतचि खेळतांना
सारेचि खेळ करिती बलि- वामनाचा
खेळात जो बळि बने तयि मस्तकी हा
ठेऊनि पाउल म्हणे ``बळिराज सांगा!--।।66.1

पाऊल हे उचलले नच त्यासी जागा
ठेऊ कुठेच तिसरे पद हेचि सांगा ''
तेजोनिधीच जणु वामनबाळ ऐसा
राहोचि व्यापुनि पदे मम हृद्प्रदेशा।।66.2त्रिःसप्तवारमखिला विनिपातितास्ते
प्राग्भूभृतस्तमपहन्तुमिव स्वदोषम्।
गोवर्धनं कमपि भुभृतमुद्दधानः
चित्तेऽस्तु मे परशुरामनवावतारः ।।67
(भूभृत -  राजा, पर्वत)
क्षत्रीयहीन अवघी धरणी करोनी
ही एकवीस समया निजशक्तिनेची
बाहूबली परशुराम पराक्रमी हा
निःपात तो करुनिया बहु भूभृतांचा।। 67.1

गोवर्धना उचलुनी जणु दोष त्याचा
प्रक्षालितोचि क्रमुनी पथ हा अनोखा
राहो मनी परशुरामचि आगळा हा
घेईच जो उचलुनी करि भूभृताला।। 67.2भूगोलभार-वहनक्षममात्मबन्धुं
दृष्ट्वा बलं स्वबलमप्यवगन्तुकामः।
गोवर्धनं निजकनिष्ठिकया ह्युदस्यन्
चित्ते ममाऽस्तु निजबन्धुविडम्बकोऽसौ ।।68

शेषावतारसमयी बलरामदादा
घेई शिरावरचि भार वसुंधरेचा
पाही पराक्रम हरी अति भव्य ऐसा
दावीन साहस असे म्हणतोचि कान्हा।।68.1

गोवर्धनासि उचले अति लीलया हा
घेई करांगुलिवरी उचलोनी शैला
 कान्हाचि जो अनुसरे बलरामदादा
आनंदकंद हरि तो हृदयी रहावा।।68.2


आहूय हूतिभिरसंख्यकपीन् वनान्तात्
सन्तोषयन् सुचणकैः परितो विकीर्णैः।
आनृण्यमाप्तुमिव पूर्वकृतोपकारात्
चित्ते स मेऽस्तु सततं कपिमित्रबालः ।।69

जो चारण्यासिच गुरे वनि जाइ तेंव्हा
घालून साद वनराइत वानरांना
देई चणे चुरमुरे कधि खावयाला
का आठवूनि गतजन्मचि राघवाचा।।69.1

नाही कधी विसरतो उपकार काही
दे पारितोषिक तया स्मरुनीच चित्ती
सेनानि तो सकल वानर सैनिकांचा
राहोच चित्ति मम या कपिमित्र छोटा।।69.2


प्रक्षालितं ननु कदुष्णजलेन मन्दं
निष्कण्टकीकृतमुदश्रु नखग्रहेण।
संवाहितं घृतलवेन चिरं जनन्या
तच्चिन्तये हृदि मुकुन्दपदारविन्दम्।। 70

येताचि बाळ घरि तो नित सांजवेळी
आई धुवे चरण कोमटशा जलानी
काटेकुटेचि रुतले हळु काढिते ती
एकेक तो धरुनिया नखसंपुटानी।। 70.1

लावून तूप तळपायहि चोळुनी ते
अत्यंत कोमल असे निज बालकाचे
माताचि साश्रु नयने हळु चुंबिते जे

ते पादपद्म हरिचे हृदयी रहावे।। 70.2तन्मल्लकेलिषु वपुर्यमुनानिभं स्वं
गङ्गाभिराम-बलरामवपुः प्रसक्तम् ।
कृत्वा, प्रयागसुषमां पुलिने वितन्वन्
चित्ते ममास्तु सततं स हि तीर्थराजः ।। 71

हा सावळा हरि दिसे यमुना जशी का
गंगेसमान बलरामचि गौरकाया
कुस्तीत तेचि भिडती जव एकमेका
वाटे प्रयाग प्रकटे व्रजभूमिला या।। 71.1

भागीरथी मिळतसे यमुनाजली या
झालीच तीर्थ अवघी व्रजभूमि आता
जो तीर्थराज खुलुनी दिसतो हरी हा
चित्ती निरंतर वसो मम तोचि कान्हा।। 71.2रुद्धोऽपि कालियभुजङ्ग-भयेन गोपैः
आरुह्य तीरज-कदम्बतरुं प्रसह्य ।
आस्फालयन् हि निजमुरूयुगं कराभ्यां
चित्ते स विश्रमतु मेऽद्भुतबालमल्लः ।।72

कालिंदिच्या भयद खोल विशाल डोही
जाऊ नकोस कधिही म्हणतीच गोपी
तो कालियाचि बसला लपुनी विषारी
सांगुनि त्या अडविती हरिसीच गोपी।। 72.1

दुर्लक्षुनीच उपदेशचि गोपिकांचा
कालिंदिच्या तिरि कदंब-तरूवरी हा
राहीच निर्भय उभा करुनी पुकारा
``ये कालिया लपु नको बघतो तुला हां! '' ।। 72.2

आव्हान थोपटुनि दे, हरि दंड, मांड्या
खेळेचि कुस्ति समवेतचि कालियाच्या
जो बालमल्ल नमवी अति क्रूर नागा
घेओ चिरंतन मनी हरि तो विसावा।।72.3हा कालियाङ्ग -दृढरज्जु-निबन्धनेन
निस्पन्दनः सिमसिमायित-देहबन्धः।
आक्रन्दितोऽतिपरमार्तरवेण गोभिः
धेनुप्रियः शिशुरसौ मम मानसेऽस्तु ।।73

घालून सर्प विळखे हरिच्याच अंगा
वेढून रज्जुसम तो करि बद्ध कृष्णा
कंठात श्वास अडला हरि कापतो हा
पाहून हंबरति ह्या प्रिय धेनु सार्‍या।।73.1

गाई-गुरांसहि असे प्रिय जो कन्हैया
माझ्याच अंतरि वसो गुणिबाळ कान्हा।।73.2तं कालियोरगमुदीर्णविष-प्रमत्तं
वेगान्निपत्य सहसैव च सम्प्रमथ्य।
नृत्यन्मुदा तदुरुतुङ्ग -फणा-सुरङ्गे
नृत्यत्वसौ शिशुनटो मम चित्तरङ्गे ।।74

फूत्कारुनीच उसळे अति घोर सर्प
घेई तयावरि उडी चकवोनि त्यास
काढे तया घुसळुनी हरि अंग अंग
झालाचि तो गलितगात्र विशाल नाग।।74.1

विस्फारल्या विषभर्‍या अति भव्यची त्या -
नाचे फण्यावरि सुखे हरि कालियाच्या
रंगीत त्या चमकत्या खल कालियाचा
जो रंगमंच करितो करण्यासि नृत्या।।74.2

जो मोहवी जनमना नटराज छोटा
तो कृष्ण बाल-नटची हृदयी रहावा।।74.3जाते प्रदोषसमयेऽप्यनिवर्तमानः
कृष्णो वनादिति तमस्यभिसञ्चरन्त्याः।
मातुर्विलोचनपथं स्वरुचावतीर्णः
हृन्मन्दिरेऽस्तु मम कोऽपि स बालदीपः ।।75

झालीच सांज; उतरे तम हा सभोती
नाही कसा परतुनी हरि ये घरासी
व्याकूळ, चिंतित मनी जननी निघाली
शोधावयास हरिला घनदाट रानी।। 75.1

काळोख तो असुनही हरिच्या प्रभेनी
आईस तो दिसुन ये नयनांसमोरी
जो बालदीप पथ हा जननीस दावी
तो दीपची उजळवो मम चित्तवृत्ती।। 75.2


``वासः किमार्द्रम्, '' ``अयि घर्मजलैस्तदेवं ''
``हारः क्व मौक्तिकमयो? '' ``ह्यशितः स हंसैः''।
इत्यात्मनो जलविहारमपहन्वुवानः
वक्रोक्तिपण्डितशिशुः स ममाऽस्तु चित्ते ।।76


``ओली कशी तवचि ही वसने च बाळा?''
``घामात चिंब भिजलो'' वदतो हरी हा
``कंठी दिसे न तव मौक्तिक हार बाळा?''
``तो हंस पक्षि गिळुनी उडुनीच गेला ''।। 76.1

ऐसेचि जो लपवितो जलक्रीडनाला
बोलून ते चतुर बोलचि बाल कान्हा
जो वाक्पटू चतुर जो भुलवी समस्ता
 राहो सदैव हृदयी हरि तोच माझ्या।।76.2


गोभिः समं भ्रमसि गोसमबुद्धिरेवं
भूयास्त्वमित् पठ पठेति हि मातृबोधम् ।
श्रुत्वा दशोपनिषदः क्व ममेति पृच्छन्
वेदान्तपारगशिशुः स ममाऽस्तु चित्ते ।।77

``हुंदाडिता दिनभरी वृषभां सवेची
बुद्धी हि होईल तुझी वृषभा समाची
अभ्यास तू कर जरा''  जननी म्हणे ती
``कोठे दशोपनिषदे मम'' तो विचारी।। 77.1

वेद-प्रवीण शिशु तो मम अंतरंगी
राहो मुकुंद हरि केशव तो मुरारी ।। 77.2वर्णाक्षरं लिखसि कीदृशमत्र भित्तौ
द्रक्षाम्यहं लिख लिखेत्यवरुध्यमानः।
``सोऽहं'' च  ``तत्त्वमसि'' चेति लिखन् सलीलं
सत्तत्त्वबोधकशिशुः स ममाऽस्तु चित्ते ।। 78

``आलेचि थांब बघते तुजसीच कान्हा
भिंतीवरी लिहु नको बघ अक्षरे या''
दृष्टी जरा चुकवुनी नच ऐकुनीया
 ``सोऽहं'' असे लिहितसे हरि वेदवाक्या।। 78.1

किंवाचि ``तत्त्वमसि'' गूढचि वेदसारा
सुस्पष्ट त्या लिहितसे जणु मोतिमाला
‘मी ब्रह्म हेचि सगळे’ कळले जयाला
तो आत्मबोधि शिशुची हृदयी रहावा।। 78.2


किं प्रेरयस्यमुमये ह्यदये यशोदे
कृष्णं वृथागुरुकुलं सकलं स विन्ते।
बालाभिरेवमसकृत् प्रतिषिध्यमानः
चित्ते स मेऽस्तु चतुरः प्रियबालशिष्यः ।।79

``कैसी कठोर असशी अग तू यशोदे!
कृष्णास धाडिसि उगा गुरु-आश्रमाते
हा जाणितो सकल; त्या नच काय ठावे''
संभाषणेचि घडती दररोज तेथे।।79.1

दृष्टीसमोरुनि असे नच जाऊ देती
कृष्णास त्या गवळणी हरिरूप त्याही
गोविंद तो चतुर तो प्रिय शिष्य छोटा
माझ्याच अंतरि वसो जगदीश तो हा।। 79.2``किं मातरेवमहमेव कलङ्ककृष्णः
मत्सोदरोऽपि बल एव तु चन्द्रगौरः ''।
प्रश्नैरितीदृशविधैर्जननीं निरुन्धन्
चित्तं रुणद्धु स च मे शिशुवावदूकः ।।80

``आईच सांग मजला मम रंग काळा
गोरा परी दिसतसे बलरामदादा''
नाना विचारुनि असे बहु प्रश्न कान्हा
कैसा निरुत्तर करेचि यशोमतीला।। 80.1

चाले अखंड टकळी हतबुद्ध माता
झालीच कुंठित मती तिजसी कळेना
भंडावुनीच सकलांसिच सोडितो हा
रोधून चित्त हरि तो हृदयी रहावा।।80.2


``नीलाम्बुदच्छविरियं यमुनानदी न
नूनं समुन्नत-पयोधर-सम्भवा स्यात् ''
राधापयोधरमवेक्ष्य शिशून् कुतर्कैर्
उच्चैर्दिशन् कपटतर्कपटुः प्रियो मे ।।81

``मेघासमान यमुना मज वाटते ही
ओथंबल्याचि जलदातुन ही निघाली ''
बोले सहेतुकचि हा सुहृदांसवेची
राधा पयोधर घटांवरि नेत्र रोखी।। 81.1

थट्टा करी सहजची लटिके वदोनी
मित्रांसवेच बनवा बनवी करोनी
ऐसे कुतर्क शिकवी हरि जो सख्यांसी
राहो सदैव हरि तो मम अंतरंगी।।81.2


``ज्ञातं मुकुन्द! सधनस्त्वमसीति रत्नैः
अस्मादृशैः किमधनैः सखिभिर्व्रजामः ? ''
श्रुत्वेति मित्रगिरमुज्झितरत्नहारः
हृन्मन्दिरे प्रियसुहृदन्मम सोऽस्तु बालः।।82

``श्रीमंत तूचि धनवान! कुठेचि आम्ही?
रत्ने अमूल्य तुजसीच! दरिद्रि आम्ही!
मैत्री जमेल असमान कुळात कैसी?
सामान्य गोप सगळे निघतोच आम्ही''।।82.1

जिव्हारि लागुनि अती वचने सख्यांची
होईच विद्ध हरि हा विरहा न सोसी
काढून फेकि हरि माळचि मौक्तिकांची
जिंकून घेइ हृदये सकला सख्यांची।।82.2

प्रेमेचि उत्कट, करी अपुले तयांसी
 कान्हा! प्रिया! जिवलगा! मम चित्ति राही।।82.3``संयुध्यसे यदसुरैर्नियतं त्वमेकः
बालोऽपि किं न हि भयं तव '' मातुरेवम् ।
वाक्यं निशम्य तदकिञ्चिदपि ब्रुवाणः
चित्ते ममास्तु सततं स हि बालमौनी ।।83

``कृष्णाचि तू चिमुकला छकुलाचि माझा
दैत्यासि धाडिसि कसे नरकापुरीला
भीती कशी लवभरी तुज वाटते ना
मायावि दैत्य बघुनी अति क्रूरकर्मा ''।।83.1

माता पुसे हरिसि ती हृदया धरोनी
नाही तयावरि करी हरि उत्तरासी
राहेचि मौन तरि जो; स्मित मंद ओठी
तो बालमौनी वसुदे मम अंतरंगी।।83.2मथुराभिक्रमणम् ( मथुरा - प्रयाण )

`गन्तासि कृष्ण ! किमरे व्रजतोऽन्यदेशम् ?
अस्मान् विहाय सकलांस्त्वदधीनजीवान्''।
संसान्त्वयन् विलपतीरिति गोपबालाः
चित्तं स सान्त्वयतु मे प्रियगोपबालः।। 84

``आहेस प्राण सखया व्रजभूमिचा तू
जाऊ नकोस मथुरानगरीस रे तू
आत्माच तू हरविता व्रजभूमिचा या
निष्प्राण देह सगळे बनतील कान्हा''।।84.1

``सोडूनि गोकुळजना विरहा मधे रे
जाऊ नकोस मधुरा, मथुरेस तू रे
ह्या जीवना गति नसे तुजवीण कान्हा''
गोपी विलाप करती अडवून त्याला।।84.2

त्यांचेच सांत्वन करी पुसुनीच डोळे
गोपाल तो मम मना नित सावरू दे।।84.3


``स्तेयापराधमपि केशव! तावकीनं
ब्रूयाम नैव जननीं किमितः प्रयासि?
गोपीगिरेति हतधीरिव मौनधारी
वाचंयमः शिशुरसौ हृदये ममाऽस्तु।।85

``तू चोरिले जरि दही अथवाचि लोणी
ना सांगणार कधिही जननीस आम्ही''
ऐकोनि गोपिवचना हरि मूक राही
तो संयमी शिशु वसो मम अंतरंगी।।85``भिन्धि त्वमस्मदुदकुम्भचयं प्रकामं
वासांसि नोपहर, चोरय गोरसं वा ''।
मा रे गमः परिमितस्त्विति याच्यमानः
गोपीप्रियः शिशुरसौ मम मानसेऽस्तु ।।86

``चालेल तू जलघटा जरि फोडिलेची
सारेचि दूध नवनीतहि घे लुटोनी
वस्त्रेही घेतलि तरी करु मान्य तेही
जाऊ नकोस सखया'' वदतीच गोपी।।86.1

ऐसे किती विनविती हरिच्याच पायी
गोपीच त्या पसरुनी पदरा हरीसी
तो लाडका मधुर बाळचि गोपिकांचा
राहो सदैव मम हृत्कमलात कान्हा।।86.2


``कृष्ण! त्वमेव यदि नो विजहासि भीरून्
तन्निर्भयं कथमरे विपिने भ्रमाम ?''।
आश्लेषितः शिशुभिराकुलवाग्भिरेवं
आश्लेषयत्वपि मनो मम माधवोऽसौ।।87

``जाशील सोडुनि जरी सखयाच तूही
जावे कसेचि घनदाट वनात आम्ही''
ते गोपबाळ सगळे विनवी हरीसी
घालोनियाचि कमरेस मिठी करांनी।।87.1

ते आर्त बोल घुमती हरीच्याच कानी
``सोडू नकोस व्रजभूमि मुकुंद तूची''
गेला मिठीत विरुनी जगदीश जोची
आलिंगुनीच हृदया मम राहु देची।।87.2``सम्भाषणेषु वनभोजनकौतुकेषु
ह्यज्ञानतस्तव कृता बहवोपराधाः ।
क्षम्यास्त'' इत्यवनतैः सखिभिः प्रपन्नः
मन्मानसेस्तु शरणागतवत्सलोऽसौ।।88

``गप्पा विनोद करिता वनभोजनाते
चेष्टाचि उद्धटपणे करिता तुझी रे
ना तारतम्य कुठले मनि ठेविले ते
सामान्य गोप म्हणुनी तुज वागवीले़''।।88.1

``केले अनंत अपराध तुझेचि कृष्णा
पोटीच घालि हरि रे अपराधमाला''
त्यांसी धरून हृदयी करि सांत्वना जो
चित्ती असोचि शरणागतवत्सलू तो।।88.2``त्वं चेदितो व्रजसि माधव ! राजधानीं
पश्यामि कं कमुपयामि कमालपामि ? ''
श्रुत्वेति नन्दवचनं गलदश्रुधारः
आर्तान्तरे स शिशुरस्तु ममार्द्रनेत्रः ।।89

``कान्हाच जाशिल जरी मथुरापुरीला
जाऊ कुणा जवळ मी; मन सांगु कोणा
कोणास पाहु; मज सांग; अधीर डोळा''
तो नंदही गहिवरे; सुटुनीच धीरा ।।89.1

पाहे हरी विकल तात हताश जेंव्हा
व्याकूळ दुःखमय बोलचि ऐकुनीया
तो कृष्णही गलबलेचि निरोप घेता
वाहे अखंड नयनातुन अश्रुधारा।।89.2

अश्रुंसी ना खळ जरा भिजवीच गाला
जो भक्त प्रेम बघुनी नच राही त्याचा
कान्हाचि तो विषय एक असोचि नेत्रा
पाणावल्या नयनि रे प्रभु तू रहावा।।89.3``गोविन्द एष मथुरां प्रति गन्तुकामः
हा स्यन्दनं समधिरोहति चेति वार्ताम् '' ।
श्रुत्वैव मूर्च्छिततमां जननीं स्पृशन् स्वां
मन्मानसं स्पृशतु कोऽपि स मातृभक्तः।। 90

``हा चालला हरि बघा मथुरापुरीला
झाला रथावरच आरुढ हा कन्हैया''
ऐकोनि मूर्छित पडे जननीच जेंव्हा
गालास स्पर्श करुनी तिज सावरी हा।।90.1

आईस जो मधुर बोलचि बोलुनीया
प्रेमेच स्पर्श करुनी समजावितो गा
तो स्पर्शु दे मम मना लडिवाळ कान्हा
तो मातृभक्त हृदयी नितची रहावा।।90.2``अम्ब! त्वमेव यदि रोदिषि मत्प्रयाणे
तन्मङ्गलाशिषमहं हि कुतो लभेय '' ?
इत्यञ्जलिं विरचयन् पुरतो जनन्याः
 स स्वीकरोतु नमनाञ्जलिमस्मदीयम् ।।91

``आई नकोस रडु मी निघताच आता
देई निरोप मजसी धरि धीर आता
देईल आशिष  तुझ्याविण कोण आम्हा''
जोडूनि हात विनवीच यशोमतीला।।91.1

प्रेमेच जो विनवितो जननीस ऐसा
देऊनि धीर तिजला करि सांत्वनाला
जो नंदनंदन हरी निववी जनाला
स्वीकारु दे ममचि या नमनांजलीला।।91.2


``कृष्ण! प्रसीद सदयो भव वल्लरीषु
त्वन्निर्गमश्रवण-मूर्च्छित-मञ्जरीषु''
वाणीमिमामभिनिशम्य कुतश्चिदार्तः
मन्मानसेस्तुलताप्रणयी सदैव ।।92

``झाल्याचि म्लानमुखि या बघ वल्लरींना
मानाहि टाकिती कशा बघ मंजिरी या
त्यांच्यावरी तरि दया करि रे कन्हैया''
ऐसे वदे कुणितरी अति आर्त बोला।।92.1

जो वाढवी तरु लता अति काळजीने
ऐकून बोल अति आर्तचि ते कुणाचे
बेचैन होइ हृदयी स्मरुनी लतांसी
तोची लतारसिक मोहवि अंतरंगी।।92.2श्रुत्वा प्रयाणसमये मृग-धेनु-शावैः
मूकैरुदीरितममुं रुदितार्तरावम्।
किं कर्म चेति न विदन् किमकर्म वापि
व्यामोहित शिशुरसौ मम मानसेऽस्तु ।।93

जातो हरी बघुनि ती मृग, धेनू बाळे
होती मुकी तरिहि हंबरलीच दुःखे
ऐकोनि मूक रुदना विचलीत होई
मोहात तो अडकुनी पुसतो स्वतःशी।।93.1

``मी काय ते करु नये, अथवा करावे
माझे हि ना कळतसे मजला कसे हे''
मोहात जो अडकला अति भक्तप्रेमे
तो कृष्ण कृष्ण हृदयी मम राहु दे रे।।93.2


``अक्रूर ! केन विहितं तव नामधेयं?
यत् क्रूरवन्नयसि कृष्णमिति'' ब्रुवाणाः ।
संसान्त्वयन् कथमपि व्रजगोपबालाः
चित्तं स सान्त्वयतु मे प्रियगोपबालः ।। 94

``अक्रूर नाव तव ना तुज शोभते हे
आहेस क्रूर खलनायक एक तू रे
कारे तुवा मनि नसे लवमात्र माया
नेसीच प्राण अमुचा प्रिय हा कन्हैया''।।94.1

ऐसा करी तळतळाटचि गोपिका त्या
देऊन दूषण समुच्चय अक्रुरा त्या
तेंव्हाच शांत करि जो व्रजगोपिकांना

देवोचि धीर हृदया मम तोचि कान्हा।।94.2


मथुराप्रवेश (मथुरेत प्रवेश)

दन्तावलं कुवलयं हृतदन्तकाण्डं
निर्मथ्य, दन्तमुसलं तदमुष्य धृत्वा।
पश्यन् मुहुर्मुसलिनं परिहासपूर्वं
चित्ते ममाऽस्तु निजबन्धुविडम्बकोऽसौ।। 95

प्रख्यात तो कुवलया अति पुष्ट देह
अंगावरीच गज चालुन ये मदांध
त्या धाडिले यमगृहा हरिनेच शीघ्र
घेई हरी उपसुनी गजदंत एक।।95.1

खांद्यावरी मुसळदंतचि पेलूनिया
हासे बघे ‘हलधरा’ करुनीच चेष्टा
कान्हाच जो चिडवितो बलरामदादां
तो कृष्ण खोडकरची हृदयी रहावा।।95.2


चाणूर-मुष्टिक-मदोद्धतकंसराज-
गन्धद्विप-प्रमथन-स्फुटविक्रमोऽसौ।
रक्तेक्षणः परिविकीर्ण-सटाकलापः
हृद्गह्वरे वसतु मेऽद्भुतबालसिंह।।96

चाणूर, मुष्टिक असे अति क्रूर मल्ल
केलेचि ठार हरिने अति ते बलाढ्य
हत्तीसमान मदमस्त वधोनि कंस
दावी पराक्रम हरी मथुराजनांस।।96.1

अंगार नेत्रि भरला कच अस्तव्यस्त
 तो बाळ अद्भुत दिसे वनराज श्रेष्ठ
तो बालवीर, बछडा, वनराज छावा
तो बालसिंह हृदयी ममची रहावा ।।96.2


संरक्षतोऽप्यखिल-सैनिकसंघकस्य
संपश्यतोऽपि वरमत्रिगणस्य चैकः।
कंसं नृपासनगतं पशुघातमाघ्नन्
चित्तासने वसतु मे स हि बालवीरः।।97

कंसास घेरुनि उभे जवळीच मंत्री
रक्षार्थ सैनिक दळे असुनी सभोती
त्यांच्या समक्ष हरिने वधिलेच कंसा
यज्ञी पशू चढविलाच बळी जसा वा।।97.1

कंसास शासन करी यमलोक दावी
अन्याय दूर करुनी रिझवी प्रजेसी
आश्वस्त जो करितसे नित सज्जनांसी
तो बालवीर हृदयासनि नित्य राही।।97.2


कृत्तं शिरश्च सकचग्रहणं तदुच्चैः
उत्क्षिप्य कंसनृपतेर्गगने सरोषम्।
नीचैः पतत् पुनरवेक्ष्य भृशाट्टहासः
चित्ते सदाऽस्तु मम सोद्भुतबालवीरः ।।98

छाटून मस्तक हरी, मथुरापतीचे
केसा धरून उडवी अति उंच क्रोधे
हासेचि तो खदखदा बघुनी शिराते
भूमीवरीच पडले जरि उंच फेके।।98.1

हासे बघोनि धरणीवर दुष्ट लोळे
ऐसा थरार बघता भयभीत सारे
तो बालवीर अति अद्भुत कृष्णनामे
माझ्याच ह्या हृदयमंदिरि राहु दे रे।।98.2कंसोष्णशोणित-शोण-वपुरुद्धूत-भासुरकेसरः
सानन्द-लोककदम्ब-गर्जित-सर्वमङ्गलघोषणः।
श्रीदेवकीवसुदेव-वन्दनलालसः कारालयं
धावन् जवेन मदन्तरं हरिरेतु स प्रेमालयम् ।।99

 (वृत्त- विबुधप्रिया, अक्षरे 18, गण-र स ज ज भ र, यति-3,5,5,5)

धाडिले यमलोकि त्या मथुरापतीसचि लीलया
रक्त माखुनि लाल लालचि देवकीसुत जाहला
केश विस्कटलेचि सुंदर गर्भ रेशिम ते मुखी
हर्ष होउनि लोक गर्जति घोष मंगल तो मुखी।।99.1
पाहण्या निज माय, तातचि धावला पवनासमा
कोंडुनी निज माय तातचि ठेविले जिथ तेथ हा
होत आतुर भेटण्या नच धीर ज्या लव राहिला
तो मुकुंदचि धावुनी मम येउ दे हृदयात ह्या।।99.2

 (वृत्त- मालिनी, अक्षरे -15, गण - न न म य य, यति-8,15)
सुचिर-पिहित-काराद्वारमुद्घाट्य वेगात्
प्रविशति निजपुत्रे विस्मिताभ्यां पितृभ्याम्।
``क इह विशति? कोऽसि? त्वं कुतः कस्य'' चेति
बहुविधमनुयुक्तः साश्रुपातं जगाद।।100

कितिक दिवस काराद्वार जे बंद होते
उघडुनि अति वेगे धाव घेता हरीने
बघुनि हरि समोरी विस्मयाने तयासी
जननि जनक दोघे प्रश्न नाना विचारी।।100.1

``असशि कवण तूची ? कोठुनी आत येसी?
असशि सुत कुणाचा ? काम येथेच कायी?''
जननि जनक दोघे पाहुनी ते समोरी
हृदय भरुनि आले लोचना पूर येई।।100.2

अपरिमित तयांनी सोसले कष्ट पाही
अविरत यमुना ही ओघळे कृष्ण गाली
प्रथमचि बघता त्या माय ताता समोरी
हळु हळु मग बोले कृष्ण कान्हा मुरारी।।100.3

(वृत्त- वसंततिलका)
``यः श्रावणे वदि पुराष्टमरात्रिकाले
पीत्वा पयस्तव लवं क्षणमेकमेव।
यातो बहिर्जननि! कोऽपि शिशुः कृतघ्नः
सोऽयं चिरेण चरणौ तव वन्दतेऽद्य'' ।।101

(वृत्त- मालिनी)
``बरसत घन होता श्रावणी अष्टमीला
गडद तमचि होता वद्य पक्षात काळा
पिउनि तवचि माते स्तन्य ते अल्प स्वल्प
निघुनि शिशु तुझा हा दूर गेला कृतघ्न''।।101.1

``परतुनि तुजपाशी आज आलो पुन्हा मी
कितिक दिवस गेले पाहिले ना तुला मी
तुजसिच बघण्याची लागली ओढ होती
चरण कमल दोन्ही वंदितो मी तुझेची''।।101.2

(वृत्त- वसंततिलका)
उद्वृत्त-यामुनजलेष्वपि सम्प्रविश्य
भारस्त्वया शिरसि यस्य पुरा विसोढः।
सोऽहं कदाप्यकृतवन्दन एष मूढः
हे तात! दैवत! चिरेण नमामि भूयः ।।102

(वृत्त- मालिनी)
करुनि नमन बोले ``तात माझेचि तुम्ही,
उचलुनि मज भारा वाहिले मस्तकीही
उतरुनि यमुनेच्या रौद्र पात्रीच रात्री
सहज भयद कालिंदी नदी पार केली ''।।102.1

``समज मजसि तेंव्हा थोडिशीही न होती
असुनि  पुढति माझ्या तात वात्सल्यमूर्ती
नमन कधि न केले आपुल्या पादपद्मी
चरणि शरण आलो आज बाबा तुम्हासी''।।102.2

 (वृत्त-मंदाक्रांता, अक्षरे 17, गण - म भ न त त ग ग  -यति -4,6,7)
आविर्भूतं प्रथमतनयस्पर्शतो गाढगूढम्
तद् वात्सल्यं किमपि च तयोर्दूनपित्रोस्तदानीम् ।
येनोद्गच्छन्नयनसलिलैः सम्परिप्लाव्यमानः
श्रीकृष्णोऽपरिमितसुखं प्राप मूर्धाभिषेकम् ।।103

पुत्रासंगे पहिलिवहिली भेट मातापित्यांची
होता ऐशी अवचित कशी, बाळ येता समोरी
वात्सल्याचा फुटुन हृदयी बांध ते मुक्त होई
नेत्रातूनी झरझर झरे नीररूपात गाली।।103.1

कृष्णासी ते हृदयि धरिती; चुंबिती गाल दोन्ही
स्पर्शाने त्या पुलकित अती जन्मदातेच होती
आनंदाश्रू सरिवर सरी कृष्णमाथी झरोनी
धारांमध्ये भिजुनि अवघा कृष्ण तो चिंब होई।।103.2

अश्रूंनी त्या गिरिधर शिरी हो अभीषेक पूर्ती
आनंदाचा विमल जणु हा सोहळा कृष्ण भोगी।।103.3 (वृत्त उपजाती, अक्षरे - 11, गण - ज त ज ग ग । त त ज ग ग)
पठन्ति गायन्ति विचिन्तयन्ति
शृण्वन्ति वात्सल्यरसायनं ये ।
वात्सल्यभक्ति-स्नपितान्तरङ्गा
भवन्ति गोविन्दकृपास्पदं ते ।।104

जे वाचती, सुस्वर आळवीती,
एकाग्र चित्ते बहु ऐकताती
या स्निग्ध ‘वात्सल्यरसायना’सी
करीत वा चिंतन काळ नेती।। 104.1

वात्सल्यभावात भिजोनि जाती
गोविंद-प्रेमात बुडोनि जाती
लाभे कृपा, भक्ति तयांस मोठी
गोविंद त्यांच्या नित अंतरंगी।।104.2
----------------------------------------------------------------------
ॐ तत् सत् 
खरनाम संवत्सर, अश्विन (कोजागिरी) पौर्णिमा /11 ऑक्टोबर 2011,No comments:

Post a Comment