चिरंजीव


अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः।
कृपःपरशुरामश्च सप्तै ते चिरजीविनः।।
                   अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सातही महाभाग चिरंजीव मानले जातात. चिर म्हणजे दीर्घकाल. चिरंजीव म्हणजे खूप मोठं आयुष्य असलेले.----- अगदी कलीयुग संपेपर्यंत! असे हे दीर्घायु!  - - पण अमर नाहीत. रोज उठल्यापासून आपल्याला त्याची आठवण ह्या ना त्या कारणाने येतच राहते.  अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम ह्या सात जणांना हे चिरंजीवित्व  का बरं लाभलं असेल?
1 पश्चात्ताप-दग्ध अश्वत्थामा
                          वरील श्लोकातील पहिल्याच नावाचा म्हणजे अश्वत्थाम्याचा  विचार केला तर, चिरंजीवीत्व त्याने मागून ही घेतलेलं नाही किंवा त्याला ते वर स्वरूपातही मिळालेलं नाही. अश्वत्थाम्याच्या चिंरजीवीत्वाचा विचार करण्यापूर्वी द्रोणाचार्यांचीही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे.
                   द्रोणाचार्यांवर हस्तिनापुरच्या साम्राज्याने केलेले उपकार स्मरून द्रोणाचार्य हस्तिनापूरच्या बाजूने पर्यायाने कौरवांच्या म्हणजेच अधर्माच्या बाजूने लढण्यास उभे राहिले. जेंव्हा हस्तनापूरच्या राजवंशांचे आचार्य म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणांची नेमणूक केली तेंव्हा खरं तर विशाल हस्तिनापूर एक अखंड साम्राज्य होतं. पुढे पांडव आणि कौरव ह्यांच्यात त्याची वाटणी झाली तेंव्हा पांडवांच्या वाट्याला आलेलं इंद्रप्रस्थ हे त्या विशाल हस्तिनापूर साम्राज्याचाच भाग होता हे विसरून चालणार नाही. म्हणजे द्रोणांवर झालेले उपकार हे काही प्रमाणात  इंद्रप्रस्थाचेही होतेच पण असं त्यांना मात्र वाटलं नाही. दुर्दैवाने तसं भीष्मादि प्रमुखांनाही वाटलं नाही हे विशेष! इंद्रप्रस्थ आणि पांडव ह्यांच्या बाजूने सर्वजण असे वारंवार हात झटकूनच मोकळे झाले.
             युद्धप्रसंगी कौरवांचे अनेक वीर धराशायी झाले. तेंव्हा दुर्योधनाने प्रत्यक्ष आपल्या गुरूंवर हवे तसे तोंडसुख घेतले. तेंव्हा संतापून `पांडवांपैकी एकाला तरी आज लोळवीनच' असा निर्धार करून त्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. त्यांना साथ देणार्‍या कर्ण जयद्रथादि रथी महारथींनी लहानग्या निःशस्त्र अभिमन्यूला एकत्रित हल्ला करून ठार मारावे ह्याची थोडीही लाज लज्जा, खंत अश्वत्थाम्याला किंवा त्याच्या पित्याला म्हणजे द्रोणाचार्यांनाही वाटली नाही.  दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही ह्या उक्तीप्रमाणे आपल्या निःशस्त्र पित्याची युद्धात हत्या झाल्यावर मात्र  त्याला युद्धाचे सारे नियम आठवले आणि अश्वत्थाम्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. दरवेळेस पांडवांशी अधर्माने वागणार्‍या  त्याच्या प्रिय मित्राचा म्हणजे दुर्योधनाचा अधर्म त्याला कधी दिसला नाही. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी भीमाने भर राज्य सभेत सर्वांसमक्ष दुर्योधनाची मांडी फोडीन अशी प्रतिज्ञा केली होती. त्याचं कारणही तितकच घृणास्पद होता. द्रौपदीच्या केलेल्या विटंबनेचा सूड भीमाने घेतला नसता तर आजही  भारतीय स्त्री लज्जितच राहिली असती. बाकी कारणे पुष्कळ असली तरी ह्या एकमेव कारणासाठी जरी भीमाने दुयोर्योधनाची मांडी फोडली तरी त्याने  काही असभ्य वर्तन केलं असं मानायचं काहीही कारण नाही.  पण आगीत तेल ओतल्याप्रमाणे अश्वत्थामा भडकला. ज्याप्रमाणे अग्नीला त्याज्य अत्याज्य, पवित्र अपवित्र, भक्ष्य अभक्ष्य असं काही नसतं त्याप्रमाणे अश्वत्थामा भडकला. स्वतः क्रोधाने जळणारा अश्वत्थामा एखाद्या वणव्यासारखा पांडवांचा समूळ नाश करायला निघला. अधर्माने वागणार्‍या दुर्योधनाच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी तो कुठच्याही टोकाला जायला तयार होता. स्वतःला तो दुर्योधनाचा पाईक मानत होता. खरी गोष्ट ही होती की पांडवांच्या अंगी असलेले गुण आपल्या अंगात नाहीत ह्या एका समान मत्सर आणि हेवायुक्त वैचारीक पायावर दुर्योधन, दुःशासन, कर्ण, अश्वत्थामा यांची मैत्री मजबूत झाली होती. अर्जुनाचा सुस्वभावीपणा थोरांची मन जिंकून घेत होता आणि त्याचवेळी या चौकडीच्या दुष्टाव्याची सारे निंदा करत होते. पांडवांविषयी क्रोध आणि मत्सराची बीजं फार लहानपणापासून त्यांच्या मनात होतीच.
              विद्यार्थ्यांच्या हातून विद्येचा दुरुपयोग होऊ नये या साठी  पूर्वी विद्या देण्यापूर्वीच विद्यार्थ्याची नितीमत्ता, सद्गुण, नम्रपणा आणि योग्यतेची पारख करून त्याला विद्या दिली जात असे. शिष्य अहंकारी, अविवेकी असेल तर तो हुशार असूनही त्यला विद्या दिली जात नसे. सर्व अस्त्रविद्यांमधे सर्वश्रेष्ठ असलेले ब्रह्मास्त्र आणि पाशुपतास्त्र हे अर्जुनानी अतीशय कष्टाने, चिकाटीने प्राप्त केले होते. अर्जुन विवेकी, नम्र आणि पराक्रमी होता. कर्ण अहंकारी असल्याने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला द्रोणाचार्यांनी नकार दिला होता. पण आपल्या अविवेकी मुलासाठीमात्र त्यांच्या पितृप्रेमाने त्याच्यातल्या सर्वश्रेष्ठ गुरूचा पराभव केला. अश्वत्थामा अस्त्र, शस्त्र विद्या पारंगत झाला. ज्या मोजक्याच योध्यांना ब्रह्मास्त्राचं ज्ञान होतं त्यात अश्वत्थामाही होता. ब्रह्मास्त्र परत घेण्याची कुवत मात्र त्याच्याकडे नव्हती. जगाच्या नाशासाठी ही अस्त्र वापरत नाहीत हे ठाऊक असतांनाही त्याने क्रोधाच्या भरात ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. स्वतःच्या क्रोधावरच नियंत्रण नसणारा अश्वत्थामा ब्रह्मास्त्रावरील नियत्रणही गमावून बसला. त्याला व्यासांनी सांगूनही ब्रह्मास्त्र परत घेता येईना. व्यासांनी त्याला ते ब्रह्मास्त्र परत घेता येत नसेल तर पृथ्वीच्या वाळवंटी वैराण जागेवर सोडायचा उपदेश केला. पण व्यासांचा उपदेशही न मानणार्‍या अश्वत्थाम्याने  युद्धनीतीला सोडून पांडवांचा निर्वंश व्हावा यासाठी उत्तरेच्या गर्भातील जन्मालाही न आलेल्या बाळावर ब्रह्मास्त्राचा  रोख वळवला. डोळेही न उघडलेल्या त्या जीवाचाही नाश करतांना तो जराही कचरला नाही. त्याचीच  शिक्षा म्हणून कृष्णानी त्याला बहाल केलेलं असं हे भयंकर चिरंजीवीत्व आहे. त्याच्यासाठी कोणालाही कणव वाटावी असं हे चिरंजीवीत्व नाही. अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील अमृतमय मणी भीमाने कापून काढला त्याचवेळी खरतर अश्वत्थामा संपायला हवा होता. कर्णाला `राधासुता तेंव्हा कोठे गेला होता तुझा धर्म' असं विचारणार्‍या कृष्णानी अश्वत्थाम्याला त्याच्या सर्व पापांचं प्रायश्चित्त म्हणून सुखाचं मरणही नाकारलं. डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन दारोदारी तेल मागत अश्वत्थामा फिरू लागला. कदाचित ही वरवरची जखम नव्हतीच मुळी. हृदयात खोल सलणारी जखम होती. सर्वनाश झाल्यावर होणारी उपरती होती. त्याला बाह्य उपचाराचा उतारा लागू पडणारच नव्हता. पांडवांचा नाश करीनच ह्या आपल्या व्यर्थ वल्गनेचा बळी ठरलेल्या अश्वत्थामा अविवेकानी अंध होऊन त्यानी केलेल्या सर्व अधम कृत्यांचा पाढा स्वतःच्या मनाशीच वाचत पश्चात्तापाच्या अग्नित जळत राहिला.
              ह्या उलट ज्या द्रौपदीला पाच पतींपासून पाच पुत्र होऊनही निपुत्रिक रहायची वेळ आली; त्या माऊलीनी आयुष्यभर इतकी दुःखच दुःख भोगली की तिच्या दुःखाची सीमाही तिनी ओलांडली आणि दुःखाच्या पलिकडे असलेल्या एका चिर शांती आणि अपार करुणेने तिचं मन भरून गेलं. तिथे सगळेच, हेवे, दावे, राग,सूड संपून गेले. अपल्यावर घोर अन्याय करणार्‍यावरही तिचा तिळमात्र राग उरला नाही. अश्वत्थाम्याचं भळभळणारं दुःख पाहून “ये पुत्रा” म्हणून तिनं अश्वत्थाम्याला बोलावलं. त्याच्या भळभळत्या जखमेवर तेल ओतलं. कदाचित तेवढ्याच एका गोष्टीनी अश्वत्थाम्याच्या दुःखानी भळभळणार्‍या, पितृछाया हरवलेल्या मनाला क्षणभर शांती मिळाली.
                 जीवनाच्या अंतापर्यंत अशी पश्चात्तापाची भळभळणारी जखम घेऊन जगणा र्‍या अनेक जणांचं प्रतिनिधित्त्व करीत आज सुद्धा अश्वत्थामा  मानव समाजात जिवंतच आहे. 
महाभारताला कितीक काळ लोटला. इतिहासाची अनेक पानं पुढे उलटली गेली, अनेक पर्व संपली. नवविचांरांच्या पिढ्यानु पिढ्या पुढे सरकत चालल्या पण पश्चात्तापानी जळणार्‍या मनाचं प्रतिक असलेला चिरंजीव अश्वत्थामा आजही समाजात अस्वस्थ मनानी मनःशांतीचं, स्नेहाचं तेल मागत फिरतांना दिसतो.
2 अत्यंत महत्त्वाकांक्षी महाबळी -
                         निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या केरळ ह्या राज्यात महाबळीच्या पुनरागमनाप्रित्यर्थ मल्याळी लोक आजही ‘ओणम’ सण साजरा करतात. पंपा नदीच्या पात्रात नौकानयनाचा नेत्रदीपक उत्सव साजरा केला जातो.  ‘तुलुनाडु’ म्हणजे  तटीय कर्नाटकाचा काही भाग आणि केरळचा उत्तर भाग येथे आजही लोक महाबळीची पूजा करतात. लोकनृत्य, लोकसंगीत यांच्या माध्यमातून बळीच्या थोर कामगिरीचा उल्लेख केला जातो. दिवाळीच्या दिवशी लोक शेतात जाऊन चक्रवर्ती बळीची प्रार्थना करतात. काही गोष्टींची पूर्तता झाली तर बळी परत राज्य करेल असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. पण कलियुगात तरी हे शक्य नाही असं मानलं जातं. कोचीन पासून दहा कि.मी. वर असलेली त्रिक्कारा (Thrikkakara)  ही  महाबलाढ्य अशा बळीची राजधानी. आजही त्रिक्काराला वामनमूर्ति विष्णूचं देऊळ आहे. आणि विष्णू तिथे वामनस्वरूपात राहतो असं मानलं जातं.
                  राजा बळीच्या काळात केरळच्या उन्नतीने यशाचं शिखर गाठलं . बळीचा राज्यकाळ म्हणजे केरळचा सुवर्णकाळ मानला जातो. असुर कुळात जन्मलेला बळी- -प्रह्लादाचा नातू, - -विरोचनाचा पुत्र, – भगवान विष्णुंचा परम भक्त, - - न्यायीपणासाठी सर्वश्रुत,- - सर्व प्रजाजनांच्या प्रचंड आदरास पात्र असलेला बळी! बळीची प्रजा अत्यंत सुखी होती. न्याय देतांना बळीनी जातपात, धर्म असा भेदभावही कधी केला नाही. तो अतिशय उदार होता. त्याच्या राज्यात लोकं त्यांच्या घराला कुलुपही घालत नव्हते आणि गुन्हेही घडत नव्हते. भ्रष्टाचार नावालाही नव्हता. गरीबीही नव्हती. आणि दुःखही नव्हतं. सर्व प्रजा सुखी समाधानी होती. 
                 बळीचा एकुलता एक मुलगा बाणासूर मात्र इतर राक्षसांप्रमाणे दुष्ट आणि प्रजेला छळणारा होता. कन्याकुमारी तालुक्यात असलेल्या सुचिन्द्रम् देवालयात बळीची गोष्ट फार सुंदर रीतीने दाखविली आहे. आणि बाणासुराला शिवानी ठार मारलं हा प्रसंगही दाखवला आहे.
                   बळीचा एकच दोष होता - - उत्तुंग अहंकार आणि त्यातून जन्माला आलेली त्याची प्रचंड महत्वाकांक्षा! त्यानी  सर्व राजांना जिंकून त्यांची राज्ये आपल्या राज्यात विलीन केली. इतकच नव्हे तर  देवांचा स्वर्ग लोक आणि पाताळही जिंकून घेतला. दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या सांगण्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ करून, ही त्रैलोक्याची सत्ता कायम आपल्या हाती ठेवायचा त्याचा मनसुबा मात्र त्याला भोवला. ह्या यज्ञात बटु वामनाचं रूप घेऊन आलेल्या विष्णुला उदार अंतकरणाच्या बळीनी तीन पावलं भूमी दान दिली. शुक्राचार्य वारंवार त्याला हे दुःसाहस करू नकोस असं सांगत असतांना सुद्धा! ज्याप्रमाणे अमृताबरोबर कालकूट सेवन केल्याने मृत्यूच ओढवतो त्याप्रमाणे अनेक गुणांच्या सोबतीने आलेल्या अहंकाराने बळीचा घात केला.
                     आजही `मी सर्वश्रेष्ठ आहे' ह्या अहंकारातून सार्‍या जगावर सत्ता गाजविण्याची प्रचंड महत्वाकांक्षा ‘महाबळीच्या’ रूपानी जगात तशीच आहे. सर्व देशांना अंकित करून तिथे आपला मनमानीपणा चालविण्याचा दुराग्रह तोच आहे. आणि आजही लोकांच्या हृदया हृदयात जागृत असलेली स्वातंत्र्याची ओढ बटु वामनासारखी छोटी वाटली तरी गगनाला भिडणारं महारूप घेऊन महा सत्तांनाही कधी तीन पावलात पाताळ दाखवेल हे सांगता येणार नाही.
3 अस्वस्थ ज्ञानी व्यास
                      यमुनेच्या किनारी एका द्वीपावर जन्म झाल्यामुळे कृष्ण द्वैपायन ह्या नावानी व्यास ओळखले जातात. तर बदरी म्हणजे बोरींच्या वनात त्यांनी तपस्या केली म्हणून त्यांना बादरायण ही संबोधतात. `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्' ही व्यासांची खरी ओळख! सर्व इतिहास शब्दबद्ध करणारे व्यास हे पहिले इतिहासकार म्हटले पाहिजेत. व्यासांनी निर्माण केलेल्या महाभारताच्या पासंगाला पुरेल अशा ग्रंथाची आजही निर्मिती झाली नाही. महाभारताला पाचवा वेदच म्हणतात. व्यासांची कलाकृती अजरामर झाली. एक अलिप्त -- विरक्त आयुष्य जगून सुद्धा जगाचा बारकाईने अभ्यास केला. वेदांमधील विस्कळीत असलेल्या ज्ञानाला सुसूत्रता आणून त्याचे चार वेदांमधे विभाजन केले. उपनिषदे, अठरा पुराणे, अशा प्रचंड साहित्याची निर्मिती केली. ब्रह्मसूत्र ह्या ग्रंथाच्या रूपाने संपूर्ण तत्वज्ञानाचा अनुपम चिंतामणीच आपल्याला प्रदान केला. हिंदू धर्माचे आद्य संस्थापक म्हणावे इतके व्यासांचे काम विशाल आहे. योगसूत्रावरील पतंजलीचे योगभाष्य व्यासांनाच अर्पण केले आहे. श्री आद्य शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रभाष्यही भगवान बादरायणांचरणी समर्पण केले आहे. बुद्धाच्या जातककथांमधेही व्यासांचा Kanha-dipayana असा त्याचा उल्लेख आहे. गुरु गोविंदसिंहाच्या दशमग्रंथात व्यासांचा उल्लेख ब्रह्माचा प्रत्यक्ष अवतार म्हणून आला आहे. तर अर्थशास्त्राच्या सहाव्या प्रकरणातही `ज्याची स्पर्शेंद्रिये त्याच्या ताब्यात नाही तो लवकरच नाश पावतो'- या व्यासोक्ती चा उल्लेख आहे. वृष्णींनी  द्वैपायन व्यासांवर हल्ला केला आणि स्वतचाच नाश करून घेतला. त्याचप्रमाणे भोज दंडाक्य नावाने ओळखल्या जाणार्‍या राजाने त्याच्याकडील ब्राह्मण स्त्रीचा विनयभंग केल्याने त्याचे प्रचंड साम्राज्य त्याच्या कुळासहीत धुळीला मिळाले. त्याच प्रमाणे कराल - -वैदेह - -वातापीनी अगस्ती ऋषींची खोडी काढली आणि त्याचा सर्वनाश झाला. असे उल्लेख आढळतात.असो!
                           इतक्या प्रचंड साहित्याची निर्मिती करूनही व्यासांच्या मनाला शांतता लाभत नव्हती. अशा ह्या अस्वस्थ मुनीराजांना एकदिवस नारदमुनी भेटले. व्यासमहर्षिंनी न राहवून आपल्या अस्वस्थतेचं कारण त्यांना विचारलं. त्यावर नारदमुनी म्हणाले, ``महर्षि आपण खूप काम केलं ह्या कर्तृत्वाच्या ओझ्याखाली आपला आनंद दबून गेला आहे. आता आपण भगवान बाळकृष्णाच्या लीला सांगणारा भागवत लिहा. बाळ कृष्णाच्या बालपणात रंगून गेलेल्या व्यासांचं विद्वत्तेचं ओझं गळून परत एकदा ते आनंदसागरात आनंदाचा तरंग झाले. स्वतःच्या विद्वत्तेच्या ओझ्याखाली दबलेले, स्वतःच्याच ज्ञानसागरात गोते खाणारे, स्वतःच्याच पांडित्याच्या गुंत्यात गुंतत जाणारे महापंडित आजही कमी नाहीत. पण त्या गुंत्यांतून बाहेर काढणारे नारदमुनी प्रत्येकाला भेटतातच असं मात्र नव्हे.
4 स्वबळाचा विसर पडलेला हनुमान- 
हनुमान ह्या नावाचं नुसत स्मरण जरी झालं तरी आठवते ती त्याची स्वामीभक्ती.
शरद स्पर्श तो होता । सजल जलद त्यजती जसे गगना
रामसखा हृदि येता । विषय तसे त्यजतीच हनुमंता
             माणसाची पारख असणं हा फार अवघड आणि मोठा गुण आहे. राम हनुमानाची भेट झाली आणि दोघांनाही एकमेकांच्या गुणांची पारख पहिल्या भेटितच झाली. रामाकडे आकृष्ट झालेला हनुमान रामाचा कायमचा दास बनून राहिला.
               अशा ह्या वीरवराकडे वैराग्य, स्वामीभक्ती, अशक्याला शक्य करणारा पराक्रम, अखंड ब्रह्मचर्य असे सर्व उत्तमोत्तम गुणांसोबत एका राजदूताकडे आवश्यक असलेलेही सर्व गुण होते.
साकारो निस्पृहो वाग्मी नानाशस्त्रविचक्षण।
परचित्तावगन्ता च राज्ञो दूत स इष्यते
सुरूप, निस्पृह, वाक्पटु, विविध शास्त्रांचा जाणकार, लक्षण बुद्धिसम्पन्न आणि दुसर्‍यांचं मनोगत आणि भाव जाणून घेण्यात निष्णात असलेल्यालाच राजदूत बनविणे हितकर असते.  ह्या वीराचे वर्णन करतांना रामदास म्हणतात ‘चपळांग पाहता मोठे महा विद्युल्लतेपरी’ असे केले आहे.
            ह्या हनुमानाला एक शाप होता. त्याला जोपर्यंत कोणी त्याच्या शक्तीची जाणीव करून देत नसे तोपर्यंत त्याला आपण हे काम करू शकू असा आत्मविश्वास येत नसे. समुद्र ओलांडून लंकेर्पंत आपण पोचू शकू असं हनुमानाला वाटत नव्हतं. तो आत्मविश्वास जांबुवंतानी आणि श्रीरामप्रभुंनी त्याला दिला. आणि समुद्र ओलांडून हनुमान लंकेला पोचला. त्याची कामगिरी फत्ते करून आला. सीतामाईला रामाची खूणेची अंगठी देऊन आला. श्रीराम सीतामाईंना घेऊन जाण्यासाठी आले आहेत हा निरोप सीतामाईला देऊन आला. बिभीषणाला भेटून त्याला रामाच्या बाजूने वळवून रावणाच्या अभेद्य लंकेला खिंडार पाडूनच आला. आणि येतांना सुवर्णाची लंका जाळून लंकेचे उरलेसुरले वैभवही धुळीला मिळवून आला. हनुमानानी निम्मी लढाई इथेच जिंकली. राम-रावणाच्या युद्धात लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर संजीवनी बुटी घेऊन येण्याचा त्याचा पराक्रम थोर होता. आपल्या सर्व इंद्रियांवर पूर्ण संयम असलेला हा पवनपुत्र साक्षात रामाइतकाच प्रभावी होता. श्री रामप्रभु म्हणतात, ``हे हनुमन्ता! तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझे प्राण देऊन जरी मी ते उपकार फेडण्याचे  ठरविले तरी माझ्या पंचप्राणाने तू माझ्यावर केलेले फक्त पाचच उपकार फिटतील. बाकीच्या उपकारांचे काय?'' श्री रामप्रभु हनुमंताचे प्रेरणास्थान होते. जन हृदया हृदयात प्रभुरामचंद्र अमर झाले. आणि त्याचबरोबर हनुमानाची स्वामीभक्तीही. अलौकीक अशा स्वशक्तीचा परिचय मात्र तो आपणहून घेऊ शकत नव्हता
                  बदकांच्या ताफ्यात कुरूप पिल्लू म्हणून हिणवला जाणारा राजहंस असो किंवा वाट चुकून मेंढ्यांच्या कळपात वाढलेला सिंहाचा बछडा असो. त्यांना वेळ येताच कोणीतरी सांगायला लागत की, ``बाबा रे तू बदक नाही तू राजहंस आहेस; तू मेंढा नाहीस तर शक्तिशाली वनराज आहेस.'' स्वतःच्या तेजाची जाणीव लोपलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा हनुमान आजही त्याच्या तेजाची ठिणगी पेटवणा र्‍या श्री रामा सारख्या स्वामीच्या प्रतिक्षेत समाजात दिसून येतो.
5 लंकाधीश बिभीषण
       राक्षसकुळात जन्मलेला  बिभीषण हा दैत्यराज रावणाचा सर्वात धाकटा भाऊ. सीताहरणानंतर एकट्या बिभीषणानेच रावणाच्या आसुरी वृत्तीचा धिक्कार केला. सीतामाईला सन्मानाने रामाकडे पाठविण्याचा सल्ला रावणाला दिला. रावणाला तो पटला नाही; तेंव्हा धार्मिक वृत्तीच्या बिभीषणाला त्याची आई कैकेशीने रामाला मदत करण्याचा सल्ला दिला. बिभीषणाला रावणाच्या सैन्याचे गुप्त भेद माहीत होते. ते त्याने रामाला सांगितले. त्यामुळेच रामाला लंकेवर विजय मिळविणे सोपे झाले. विजयश्री मिळविण्यासाठी रावण पुलस्य-कुळदेवता माता निकुम्भाच्या मंदिरात यज्ञ करत होता. हा यज्ञ पूर्ण झाला असता तर रावण अजेय योद्धा झाला असता पण ह्या मंदिराचा एक गुप्तमार्ग श्रीरामांना दाखवून बिभीषणाने हा यज्ञ उधळून लावला. बिभीषणाच्या ह्या कृत्यामुळे त्याच्यावर फितुरीचा शिक्का मात्र कायमचा बसला.
             जेंव्हा हनुमान रामाचे दूत बनून प्रथम लंकेत आले. तेंव्हा त्याने बिभीषणाची भेट घेतली. दोघांमधे जी चर्चा झाली तेंव्हा लंकेतील परिस्थितीची माहिती देतांना तुलसीदासांनी बिभीषणाच्या तोंडी फार सुंदर वाक्य घातलं आहे, बिभीषण म्हणतो- `` सुनहु पवनसुत रहनि हमारी, जिमि दसनन्हि मुंह जीभ बिचारी।'' `` हे पवनसुत हनुमान!, बत्तीस दातांच्या पहार्‍यात जीभ जशी राहते, तसे जीवन येथे मी जगत आहे.'' हनुमानाला समजले की बिभीषणाला धर्माचे राज्य पाहिजे पण त्याच्या संकल्पाला पुरेसे पाठबळ नाही.
हनुमानाने त्याला मानसिक बळ देण्यासाठी सुंदर काव्यपंक्तींत उत्तर दिले आहे. 
``सुनहु बिभीषण प्रभु कै रीती, करहिं सदा सेवक पर प्रीति।''
हनुमानाने म्हटले : ऐक हे बिभीषणा,  रामचंद्रांची गोष्टच वेगळी आहे. ते सेवकांवर नेहमीच प्रेम करतात. कृपा किंवा दयेची भीक घालत नाहीत. ते सेवकाला त्यांच्या हृदयातच स्थान देतात. बिभीषणला हीन भावनेतून काढण्यासाठी हनुमानाचा हा प्रयत्न होता.
रामाच्या लंकाविजयानंतर रामप्रभुंनी युद्धात मदत करणा र्‍या सर्वांना हवं ते मागून घेण्याची विनंती केली. त्यावेळेस बिभीषणाने रामाबरोबर केलेल्या तहानुसार लंकेचे राज्य मागून घेतले. हनुमानाने प्रभुचरणसेवेशिवाय काहीही मागितले नाही. बिभीषण परमसौख्यापासून एक पायरी खालीच राहून गेला.
         तरीही प्रभुरामचंद्राने जेंव्हा राज्यत्याग आणि देहत्यागाचा निर्णय घेतला तेंव्हा बिभीषणाला पृथ्वीवर राहून न्याय्य रितीने राज्य करून लोकांना धर्माचा मार्ग दाखविण्याचा आदेश दिला. सूर्यवंशी रामप्रभुंच्या कुलदेवतेची सूर्याची उपासना करण्याचा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग दाखविला.
आजही अधर्माचं राज्य जावं न्यायाचं राज्य असावं असे वाटणारे हजारो बिभीषण आपल्यामधे आहेत. वेळ आली की ते मतदानाच्या अधिकाराचा वापर करून रावणाचं अन्यायी सरकार झुगारून देतांनाही दिसतात. पण स्वतः अन्यायाच्या विरुद्ध उभे ठाकून संपूर्ण व्यवस्था बदलवून दाखविण्याची ताकद त्यांच्यात नसते. त्यांचा संकल्प कुठे तरी कमी पडतो. त्यांना हा बदल घडवून आणण्यासाठी एखाद्या दृढनिश्चयी रामाच्या मदतीची जरूर भासते. प्रस्थापितांकडून ते कदाचित दलबदलू, संधिसाधू म्हणूनही हिणवले जातात. पण अधिकार हाती येता ते न्याय्य मार्गाने लोकांना पुढे नेण्यात यशस्वीही होतात. त्यांच्याच रूपाने बिभीषण आजही जनसामान्यांमधे सहज दृष्टीस पडतो.

6 उपकारांच्या ओझ्याखाली दबलेला कृप  
              गौतम ऋषिंचा नातू शरद्वान् हा जन्मजात धर्नुधर होता. त्याचा धनुर्विद्येचा अभ्यास आणि तपश्चर्या बघून प्रत्यक्ष इंद्रालाही काळजी वाटायला लागली. पण इंद्राच्या जनपदी नावाच्या सुंदर अप्सरेनी त्याच्या तपश्चर्येचा भंग केला. जन्माला आलेल्या दोन जुळ्या मुलांना सोडून शरद्वान आणि जनपदी दोघंही आपल्या आपल्या मार्गांनी निघून गेले; ते मागे एक सुंदरसा मुलगा आणि मुलगी ठेऊनच! ते ही जुळे. महाराज शंतनूने दोघांचा चांगला सांभाळ केला. त्यांना उत्तम विद्या शिकविली. पण जगाच्या दृष्टीने शंतनू महाराजांच्या सतत कृपाछत्राखाली राहिल्याने त्यांना स्वतःच्या नावाचेसुद्धा स्वतंत्र अस्तित्व मिळाले नाही. राजाच्या कृपेखाली राहिलेला तो कृप आणि बहिण कृपी. आपल्या पित्याप्रमाणे कृप हे उत्तम धनुर्धर होते. जणु साक्षात धनुर्वेदच! आचार्य ही सर्वश्रेष्ठ पदवी देऊन त्यांना कौरव पांडवांच्या शिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलं. उपकारांच्या ओझ्याखाली दबून हस्तिनापूरच्या साम्राज्याशिवाय ते वेगळा विचारच करू शकले नाही. धर्म अधर्म ह्यांची चांगली पारख असूनही, कौरव पांडवांवर निरंतर अन्याय करत आहेत हे धडधडीत दिसत असूनही, अंध धृतराष्ट्र पुत्रप्रेमानेही अंध झाला आहे हे दिसत असूनही, ते कौरवांची बाजू सोडू शकले नाही. त्यात कृपी आणि द्रोणाचार्यांच्या विवाहामुळे, आणि द्रोणाचार्यांच्या निष्ठाही हस्तिनापुराच्या सिंहासनाला वाहिलेल्या असल्याने अश्वत्थाम्यासकट ह्या सर्वच कुटुंबाच्या निष्ठा   अधर्माच्या पायी वाहिल्या गेल्या. कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराजय झाला. दुर्योधन पूर्णपणे मेला नव्हता. भीमाने त्याच्या दोन्ही मांड्या फोडून त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली होती. कौरवांच्या बाजूचे कृपाचार्य, कृतवर्मा आणि कृपाचार्यांच्या बहिणीचा कृपीचा मुलगा अश्वत्थामा असे तिघंच वाचले होते. कसेबसे जीव वाचवून रात्री जंगलात एका झाडाखाली बसले असतांना अंधारात बाहेरून आलेल्या घुबडांनी त्याच झाडावरील कावळ्यांवर हल्ला केला. आणि सर्व कावळ्यांना फस्त केलेलं पाहून अश्वत्थाम्याच्या डोक्यात एक भयंकर योजना शिजली. युद्ध निकालात निघाल्यानंतरही रात्री बेरात्री पांडवांच्या  शिबीरात घुसून झोपलेल्या पांडवांना ठार मारायची. कृपाचार्यांना ही योजना पटली नाही.  त्यांनी पांडवांवर शस्त्र चालवायला नकार दिला. पण अश्वत्थाम्यावरील प्रेमाने आणि कौरवांच्या खालेल्या मीठाला जागायच्या खुळचट वेडाने त्यांनी एक कातडी बचाऊ निर्णय घेतला; शिबीराच्या दरवाजातून कोणाही पांडवाला किंवा त्यांच्या सैन्यातील योद्ध्याला पळून जाऊ देणार नाही असं अश्वासन त्यांनी अश्वत्थाम्याला दिलं. स्वतः नामानिराळं राहून दुसर्‍यांच्या अधर्माला पाठीशी घालून प्रोत्साहन देणारे आचार्य त्याचवेळी चिरंजीव झाले. अशा कृपाचार्यांना मरण नाही. पण अमरपणाच्या यादीत न जाता चिरंजीवींच्या यादीत समाविष्ट होणंच त्याच्या नशीबी राहिलं.

7 आपल्याच प्रतिज्ञेच्या चक्रात अडकलेला परशुराम –
परशुराम  हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.  जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म झाला. धारिणीशी विवाह केला.ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात.
            भृगू ऋषिंचा नातू ऋचिका एकदा स्वतःसाठी योग्य पत्नी शोधत होते. त्यावेळी चंद्रवंशी राजा गाधी ह्याची सुंदर मुलगी सत्यवती त्यांच्या पहाण्यात आली. गाधीकडे त्यांनी तिचा हात मागितला. हा प्रस्ताव नाकारून ऋषिंचा शाप ओढवून घेण्यापेक्षा काही तरी अवघड अट घालावी असा गाधीने विचार केला. त्याने ऋचिकाला अट घातली. ऋचिकाने त्याला एकच कान काळा असलेले हजार पांढरेशुभ्र अश्व द्यायचे; आणि त्याच्या बदल्यात सत्यवती ऋचिकाची पत्नी होणार. ऋषिंनी ही अट मान्य केली. तपःसामर्थ्याने वरुणाची प्रार्थना करून त्यांनी हजार अश्व प्राप्त केले आणि गाधीला दिले. सत्यवती आणि ऋचिकाच्या विवाहानंतर बरेच दिवस सत्यवतीला आपत्य प्राप्ती झाली नाही. गाधी राजालाही राज्याला वारस पुत्र नव्हता. भृगूऋषिंनी  मंत्राने सिद्ध केलेली खीर द्रोणात दोघींनाही दिली. सत्यवतीचा आणि तिच्या आईचा वेगवेगळा द्रोण पाहून आईच्या मनात शंका उत्पन्न झाली आणि तिने सत्यवतीच्या न कळत द्रोणांची आदलाबदल केली. भृगूंच्यालक्षात ही गोष्ट आली . ते म्हणाले, ``अरेरे!, गाधीचा मुलगा आता मोठा महर्षि होईल तर सत्यवतीचा मुलगा एक उत्तम लढवैया !'' घाबरलेल्या सत्यवतीने ऋषिंना विनंती केली की तिचा मुलगा योद्धा होण्याऐवजी तिचा नातू योद्धा व्हावा. भृगूंनी तिची विनंती मान्य केली. आणि तिने एका मुलाला जन्म दिला. तो म्हणजे प्रसिद्ध सप्तर्षिंमधला जमदग्नी. भृगू ऋषिंनी सत्यवतीला दिलेल्या वचनानुसार जमदग्नी पुत्र परशुराम मात्र महान क्षत्रिय निपजला. लहानपणीच घराचा त्याग केलेल्या परशुरामाने श्रीशंकराला प्रसन्न करून पाशुपतास्त्रासारखी अनेक अस्त्रे मिळवली. युद्धात कायम विजयच देईल असा परशू शिवाने त्याला दिला. एकदा परशुरामाची परीक्षा बघण्यासाठी शिवाने त्याच्याशी युद्ध केले. एकवीस दिवस चाललेल्या या युद्धात परशुरामाचा परशू शिवाच्या डोक्याला लागून शिवाला जखम झाली. आपल्या शिष्याकडून झालेली ही जखम शिवाला एखाद्या मौल्यवान दागिन्याप्रमाणे वाटली. म्हणूनच शिवाला खंडपरशू हे नाव मिळाले. शिवाने त्याला धरणीमातेला जुलमी राजांच्या जोखडातून सोडविण्याचा आदेश दिला. विद्या मिळविण्याची जिद्द आणि जोडीला सर्व अस्त्र शस्त्र विद्यांमधील नैपुण्य ह्या दोन्हीच्या बळावर लोकांना उपद्रव देणार्‍या राजांचा त्याने बिमोड केला.
            परशुरामाचे पिता जमदग्नी यांच्या आश्रमात कामधेनू होती. परशुराम तपश्चर्येसाठी गेले असता कार्तर्वीयार्जुन नावाच्या राजाने अश्रमात येऊन ही कामधेनू चोरली. परशुराम परत आल्यावर त्यांने  कार्तवीर्यार्जुनासारख्या महा बलाढ्य राजाला युद्धात ठार मारून लोकांवरचा जुलूम थांबविला. कार्तवीर्याच्या मुलांनी त्याचा सूड उगविण्यासाठी परशुरामाच्या अनुपस्थितीत जमदग्नींची हत्या केली. त्यांचे शिर कापून घेऊन गेले. आपली आई पतीच्या धडाला मिठी मारून रडतांना एकवीस वेळेला छाती पिटतांना पाहून तब्बल एकवीस वेळा परशुरामाने सर्व पृथ्वी निःक्षत्रीय केली. सर्व जमीनी योग्य लोकांना वाटून दिल्या. आणि महेंद्र पर्वतावर तप करायला ते निघून गेले.
                  क्षत्रियांशी वैर असलेल्या या योध्याने भीष्मांचे गुण हेरून  मात्र त्यांना सगळ्या विद्या प्रदान केल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्धही  केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. तरीही त्यांना माफ केले.
               परशुराम भगिरथाच्या तोडीसतोड अभियांत्रिकीमधेही निपुण होते. त्याने भारताच्या किनार्‍याचा समुद्र मागे हटवून नवीन जमीन तयार केली. भारताची पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी ही परशुरामाच्या अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना आहे.  परशुरामाने 400 योजने समुद्र हटवला आणि सप्त कोकणाची निर्मिती केली. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. भारताच्या किनारपट्टीला राहणार्‍या लोकांमधे आजही परशुरामाची गोष्ट सांगितली जाते. संपूर्ण भारतभर समुद्रकिनारी परशुराम क्षेत्रे आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले.  
             अशा ह्या ज्ञानसंपन्न आणि पराक्रमी बाहुबलीला चिरंजीवीत्वाच्या पायरीवरच आसनस्थ होण्याची वेळ का बर यावी?
                     याचा थोडासा मागोवा घेतला तर सीता स्वयंवरात याचा उल्लेख आढळतो. सीता स्वयंवर-प्रसंगी जनकाला श्री परशुरामाने दिलेले शिवधनुष्य श्री रामाने मोडल्याची वार्ता परशुरामाला समजली. राम सीतेसह अयोध्येत येत असतांनाच परशुरामाने रामाला युद्धासाठी ललकारले. रामही सज्ज झाला. रामाच्या अमोघ बाणांसमोर परशुरामाचेही काही चालेना. युद्धप्रसंगीही आपला तोल ढळू न देता श्री राम परशुरामाला म्हणाला, ``आपण श्रेष्ठ ऋषिवर आहात. मी आपल्याला ठार मारणार नाही. पण धनुष्याला लावलेला बाण राम कधीही मागे घेत नाही. आज तुमच्या तपश्चर्येनी कमावलेल्या पुण्यसंचयावर मी हा बाण सोडतो.'' पुण्याचा नाश होण्यामुळे परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेले. जातांना रामाला आशीर्वादस्वरूप शिवाकडून मिळालेले शिवधनुष्यही देऊन गेले.
              कुठल्याही बिकट प्रसंगी आपल्या मनाचा समतोल ढळू न देणारा राम अजेय ठरला तर क्रोधाच्या भरात अकारण रामालाही युद्धाचे आव्हान देणार्‍या शिवशिष्य परशुरामालाही हार स्विकार करायला लागली. कधी कधी  प्रसंग पाहून आपली प्रतिज्ञासुद्धा बाजूस ठेवावी लागते. कृष्णाने हातात शस्त्र धरणार नाही ही युद्धप्रसंगी केलेली प्रतिज्ञा भीष्मांनी त्याला मोडायला लावली. त्याने कृष्णाची महती थोडीसुद्धा कमी झाली नाही. पृथ्वी निःक्षत्रीय करण्याच्या आपल्याच प्रतिज्ञेच्या जाळ्यात अडकलेल्या परशुरामाला  क्रोधाच्या भरात रामाशी केलेले युद्ध फारच महाग पडले. आजही सर्वगुणसंपन्न व्यक्ति जगात कितीतरी असतील पण क्रोधासारखा शत्रू त्यांच्या ह्रासास कारणीभूत होतो. परशुराम त्यांचेच प्रतिनिधित्व करतो.


-------------------
                           आपल्या गुणांनी आणि आपल्या पराक्रमाने  ह्या सातही जणांपेक्षाही सरस असलेले राम, , कृष्ण, शिबी, हरिश्चंद्र, नळ तर स्त्रीयांमध्ये सीता, द्रौपदी, दमयंती, तारामती असे अनेक स्त्रीपुरुष आहेत. ह्या सद्गुणी जनांना चिरंजीव मानले जात नाहीत. आपण त्यांना अमर म्हणतो. सूर्य शिळा होत नाही. अग्नी कोवळा होत नाही. त्याप्रमाणे ह्यांचा तेजस्वीपणा मृत्यूही हिरावून घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नीला वाळवी लागू शकत नाही त्याप्रमाणे ह्या महापुरुषांच्या अमर गाथांना काळाची वाळवीही कुरतडू शकणार नाही. आजही त्यांची प्रत्येक कृती आदर्शाचं उत्तुंग परिमाण घालून देते. मर्यादापुरुषोत्तम म्हटलं की रामाचीच मूर्ति डोळ्यासमोर उभी राहते. योगीराज ह्या नावापुढे कृष्ण ह्या नावाशिवाय दुसरं नावच येत नाही. हरिश्चंद्राच्या आणि शिबीच्या त्यागासमोर बाकी कोणी टिकू शकणार नाहीत. नलाच्या सद्गुणांची आठवण आजही विसरता येत नाही. त्याचप्रमाणे सीता, द्रौपदी, तारामती, दमयंती ह्या स्त्रीयांनी आपल्या पतीला सत्यमार्गावर चालण्यासाठी जी साथ दिली त्यालाही तोडच नाही. ह्या सार्‍या स्त्रीयांच्या आयुष्याची जी परवड झाली ती कोणी सामान्य स्त्री सहन करणे शक्य नाही स्वतःच्या आयुष्याच्या झालेल्या होळीत जळून ह्या स्त्रीया बावन्नकशी सोन्यासारख्या आजही आमच्या मनात चमचमत आहेत. अमरत्व मिळवून मार्गदर्शक म्हणून आपल्या हृदयात ते कायमचे आपल्या सोबतच आहेत.
                   या उलट वरील सातही चिरंजीवांच्या चरित्राचं सूक्ष्म अवलोकन केलं तर असं दिसेल की ते थोर होते पण अमरत्वाच्या अत्युच्च पायरीपासून एक पायरी खालीच राहून गेले.  त्यांच्या सद्गुणांच्या संगतीने आलेल्या एखाद्या दोषाने त्यांच्या आयुष्याला अपूर्णतेची किनार लाभली. अथवा त्याच्या एखाद्या स्वार्थी कृतीने त्यांचं चारित्र्यसंपन्न आयुष्य झाकोळून टाकलं. ज्याप्रमाणे मीठाचा एक कण किंवा लिंबाच्या रसाचा एक थेंब दुधाला नासवतो त्याप्रमाणे ह्या महानायकांच्या एखाद्या दोषाने त्याच्या जीवनाला मोठी कलाटणी दिलेली दिसते. कधी त्यांच्या मनातील सूडाची भावना असेल, कधी महत्त्वाकांक्षा असेल, कधी विद्वत्तेसोबत आलेली अस्वस्थता असेल तर कधी स्वतच्या आत्मशक्तीचा परिचय स्वतलाच नसण्याचा दोष असेल. कधी धर्माची बाजू घेतांनाही मनात स्वार्थ राहून गेला असेल, कधी आपल्यावरील उपकाराच्या ओझ्याखाली दबून कोणी अनीतीचा मार्ग अवलंबलेला असेल, किंवा एखाद्या ध्येयाने प्रेरीत झाल्यावर धरलेल्या मार्गातील समयानुरूप बदलणारा योग्यायोग्यपणा वारंवार तपासून पाहिला नसेल.
असे असूनही अमरत्व लाभलेल्या महापुरुषांच्या जोडीने रोज आपण ह्या सात जणांची आठवण  करतो. का? कशासाठी? 
                       श्री ज्ञानेश्वरमहाराज गीतेच्या तेराव्या अध्यायामधे ज्ञानाची लक्षणे सांगून झाल्यावर म्हणतात ज्ञान ह्या शब्दाच्या उलट अर्थ केला की ते अज्ञान आहे हे समजावे. ज्याला ज्ञान झाले त्याला अज्ञान ही समजले हे निश्चित. जिथे दिवस मावळतो तिथे रात्र चालू होते. प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधाराचं अस्तित्व. असं असूनही ज्ञानदेव अज्ञानाचीही लक्षणं सांगतात. ते म्हणतात काही शब्द हे जोडी जोडीनेच येतात. एखाद्या नेत्रहीनाला आमत्रण दिलं की तो एका डोळसाचा हात धरून येतो, तसे हे शब्द येतात. म्हणूनच कशाचा स्वीकार करावा हे सांगतांना कशाचा स्विकार करू नये हे सांगणेही आवश्यक आहे.
                     दत्त महात्म्यात (46 अध्याय 83 ओवी) ह्याचा उल्लेख `हेयोपादेय लक्षणम्'  म्हणून केला आहे. हेय म्हणजे ज्याचा त्याग करावा, ज्याचा स्विकार करू नये अशा गोष्टी तर उपादेय म्हणजे स्विकार करावा अशा गोष्टी. जगामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कायम शोधत रहावे. घेणे परित्याग करणे। ऐसे जगी शोधणे । हेय ते टाकणे । अादरे घेणे उपादेय।॥83 व्यक्तिगत आणि सामाजिक स्वाथ्याच्या दृष्टीने असे करणे हे अत्यावश्यक आहे. अमरत्व लाभलेल्या पुरुषोत्तमांच्या जोडीने रोज ह्या चिरंजीवींची आठवण करणे म्हणूनच उचित आहे. त्यांचे दोष आपण घेऊ नये ह्यासाठी दिलेली ही धोक्याची सूचना आहे. आपले आवडते राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम म्हणाले होते. जे आयुष्यात यशस्वी झाले त्यांच्या यशोगाथा वाचण्याऐवजी अपयशी ठरलेल्या लोकांच्या गोष्टी वाचून त्यांच्या अपयशाची कारणे शोधा. ती कारणंच तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जातील.

                            चिरंजीवीत्व असो की अमरत्व! - - शरीराने कोणी अस्तित्वात राहू शकणार नाही हे सत्य स्विकारलेच पाहिजे. मग चिरंजीवपणात आणि अमरत्वात फरक तो काय?
                 गुणांसोबतच चिकटून येणारे जे दोष असतात ते समाजात कायमच दिसून येतात. माणसं कितीही थोर असली तरी! हे दोष चिरंजीव असतात. अश्वत्थामा, बळी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे त्यांच्या गुणांच्या सोबत असलेल्या दोषांच्या प्रतिकाच्या रूपाने आजही समाजात चिरंजीव आहेत.
                               आता राहिलं अमरत्व! स्वतःच्या वय्यक्तिक जीवनाचा जराही विचार न करता स्वतच्या वचनाला जागणारा राम! - -राज्यापुढे आपल्या प्राणप्रिय पत्नीचाही त्याग करणारा राम !  -  -  कदाचित कोणाला पटणार नाही पण प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवल्याशिवाय राहत नाही. 
             धर्म हा सूक्ष्म असतो. धर्म आणि अधर्म काही वेळा दुधात पाणी मिसळल्याप्रमाणे समोर येतात. त्यांना वेगवेगळे जाणून घेणे सर्वसामान्यांना जमत नाही. म्हणून धर्माला दिलेला न्याय सर्वांच्याच लक्षात येतो असे नाही. न्यायच अन्याय समजला जातो.                
            सत्यवचनी आणि एकपत्नीत्व स्वीकारलेल्या `राजा रामाने ' वैयक्तिक जीवनात दुःखाचा सागर स्वीकारत जनापवादासाठी सीतात्याग केला. पण एकपत्नीत्व सोडलं नाही. त्यामुळेच त्याचा सीतात्यागही  थोर ठरला. पित्याने दिलेले वचन पुत्राने पाळावे ह्या नियमानुसार स्वतः ते वचन पूर्ण करतांना  पितृछत्रही गमवावे लागले. पण त्याने सत्यवचनही सोडले नाही. स्वार्थाचा यत्किंचितही स्पर्श न झालेला राजा राम कळायला अवघडच आहे.
                     असं म्हणतात जगाच्या कल्याणासाठी कालकूटासारखं विष पचवून अमर झालेला शिवही सतत रामनामाचा जप करत असतो. शिवाचा निवास असलेल्या काशीनगरीत जर कोणाला मृत्यू आला तर स्वतः महादेव शिव त्याच्या कानात ‘श्रीराम तारक मंत्रा’चा उपदेश करतात. ज्याने जीवाला ज्ञानप्राप्ती होऊन तो मोक्ष प्राप्त करतो.  असा हा वय्यक्तिक जीवनातील सुखाचा त्याग करणारा `राजा राम ' समाजात दिसून येत नाही तर समाजातील प्रत्येक माणसाच्या हृदयात डोकावून पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर अधिष्ठित झालेला दिसतो. अमर होऊनच! 
             
                         गीता सांगून धर्माचा सूक्ष्म अर्थ सांगणारा कृष्ण, गोपींना भक्तियोग, अर्जुनला कर्मयोग, व्यासांना ज्ञानयोग सांगणारा कृष्ण, आजही प्रत्येकाच्या हृदयाला व्यापून उरतो. म्हणूनच तो अमर आहे.  जीवनात लीलया वावरणारा कृष्ण, धर्म-अधर्माचा सूक्ष्म भेद उलगडणारा कृष्ण, जीवनाचे तत्वज्ञान उलगडून दाखविणारा कृष्ण, सर्व जीवनात समरस झालेला कृष्ण, पाण्यात राहून पाण्यात राहणार्‍या कमलपत्रासारखा अलिप्तच राहिला. चिखल भेदून वर येणार्‍या कमळासारखा निर्मळच राहिला. म्हणूनच अमर झाला हृदया हृदयात!
         
            गोकुळात साखरेप्रमाणे विरघळून गेलेला कृष्ण तेथेच न रेंगाळता फुलातल्या सुगंधासारखा उडून गेला. गोकुळात  त्याच्या अाठवणींचा कापरासारखा सुगंध ठेऊन गेला.  योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयास करूनही कर्णाने आपला हेकेखोरपणा सोडला नाही. लढाईत कर्णाचे चाक जमिनीत अडकल्यावर ` त्या सूतपुत्रावर आता दया नको बाण सोड ' असे अर्जुनाला सांगण्यास कृष्ण  डगमगला नाही. दुर्योधन वध असो, भीमाच्या पुत्राचा भीमाकरवीच केलेला वध असो, अश्वत्थामा मेला ही खोटी बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर पडावी अशी योजना करणारा कृष्ण, गांधारीकडे अभेद्य शरीर होण्यासाठी विवस्त्र चाललेल्या दुर्योधनास आपला शेला कमरेभोवती गुंडाळायला लावणारा कृष्ण,  -- - अशी अनेक कृष्णरूपे आठवतात. धर्माच्या जयासाठी योग्य वेळेला अधर्माचा कुशलतेने योग्य वापर कृष्णाइतका सहजपणे कोणाला साधला नसेल.                               
              ह्या सर्व प्रसंगांचे चिंतन करतांना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की `धर्माचा जय ' म्हणतांना त्यामागे कृष्णाचा कुठलाही छुपा अथवा प्रकट  वैय्यक्तिक स्वार्थ नाही.  आपल्याकडे सांगितलेल्या नियमानुसार वय्यक्तिक रित्या पाळायचे नियम आणि सामाजिक पातळीवर पाळायचे नियम ह्यात कुठेही गल्लत केलेली नाही. आणि म्हणूनच  वय्यक्तिकरित्या फळाची अपेक्षा ठेवू नये हे जितके खरे तितकेच सामाजिक पातळीवर, राष्ट्रासाठी विचार करतांना मात्र पुढे मिळणार्‍या फळाचा पूर्णपणे विचार करायलाच पाहिजे. भविष्यात जर एखादि चांगली, राष्ट्रहिताची गोष्ट घडावी असे वाटत असेल, पुढे मिळणारे फळ जर चांगले असेल तर राष्ट्रहितासाठी काही गोष्टी कायदे, नियम वाकवून करायला लागल्या तर योग्यच आहेत. तिथे थोडेही कचरण्याची गरज नाही. ज्ञान आणि वैराग्य अंगी बाणलेले असेल तरच हा न्याय करणे व समजणे शक्य आहे . त्यासाठी वैय्यक्तिक आणि सामाजिक पातळीवर वागण्याची परिमाणे वेगवेगळी तर प्रसंगी पूर्णपणे विरुद्ध आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. वैय्यक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीची गल्लत झाली की मनात नसते संदेह उत्पन्न होतात.
                असो! तर  चिरंजीव झालेल्यांची यादी कितीही मोठी होऊ शकते पण अमरपणाच्या यादीत झळकणारे राम  किंवा कृष्णासारखे एखादे दुसरेच असू शकतात. सूर्य, चंद्र, तारे नसलेल्या कोळाखी आकाशात लखलखीत शुक्रासारखे!

--------------------------------------------------


(रसिक वाचकहो ! 
माझ्या अल्पमतीस अनुसरून लिहिलेल्या ह्या लेखात आपल्याला  काही सुधारणा कराव्याश्या वाटल्या तर जरूर सांगा. आपण ज्ञानसम्पन्न आहात. आपले मार्गदर्शन आणि अभिप्राय माझ्यासाठी बहुमोलाचे आहेत.)



No comments:

Post a Comment