शिवानन्दलहरी भाग 1

         
Image result for free download images of Lord Shiv  and Parvati


                         शिवानन्दलहरी हे श्री आद्यशंकराचार्यांचे एक अद्वितीय स्तोत्र आहे. साहित्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तरी ते एक अद्वितीय काव्य आहे. आचार्यांचा  कल्पना विलास बघतांना मति कुंठीत होते. हे स्तोत्र अर्थ उमजून वाचतांना मनात कल्याणकारी अशा आनंदाच्या लाटांवर लाटा उठत राहतात. मन आनंदाने भरून आणि भारून गेल्याशिवाय राहत नाही.  दक्षिणेत हे स्तोत्र प्रचलित असले तरी आपल्याकडे हे स्तोत्र आणि अशी अनेक सुंदर सुंदर स्तोत्रे मराठी मनातून कधीच लुप्त झाली आहेत. ही सुंदर स्तोत्रे आपल्यापर्यंत पोचवता आली तर मी माझे भाग्य समजेन. ह्या स्तोत्राविषयी मी जास्त काही बोलणार नाही कारण माझ्या वेड्यावाकड्या अक्षरांचा मळ त्याला लागायला नको.

शंभर श्लोकांचे हे प्रदीर्घ स्तोत्र शिवचरणांवर अर्पण करतांना स्वतः आचार्य काय म्हणतात ( श्लोक 98 )  तेवढेच मी आपल्याला सांगते.

                            आचार्य म्हणतात - `` देवा शंकरा माझी ही कविता रूपी कन्या उपवर झाली आहे. तिला योग्य वर तूच आहेस. तुला मी तिचे सालंकृत कन्यादान करत आहे. सर्व अलंकार मी तिच्यावर घातले आहे.(उपमा, उत्प्रेक्षा ,रूपक, अर्थांतरन्यास इ. अलंकारांनी युक्त आहे) ती मधुरभाषिणी आहे. साधुवृत्तीची म्हणजे चांगल्या स्वभावाची आहे (अनेक वृत्तांनी सजली आहे. एकंदर 11 वृत्ते यात वापरली गेली आहेत) सुवर्णासारखी सतेज, कांतीमान आहे ( उत्तम शब्दरचना केलेली आहे.) सरस आणि गुणी आहे. (माधुर्य, प्रसाद, वात्सल्य, ओज, कारुण्य अशा नवरसांनी युक्त आहे.) सज्जनांनी तिची प्रशंसाच केली आहे. ती सर्वलक्षण सम्पन्न आहे. सहज न दिसून येणा र्‍या विशेष गुणांनी ती सम्पन्न आहे. जात्याच विनयशील आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या हातावरील अर्थरेषा ही उठावदार आहे.  (विविध मनोहर अर्थांची मालिकाच असलेली ही कविता आहे.) आपण तिचा स्वीकार करावा.

 

                   त्रिपुरारी भगवान सदाशिव आणि त्रिपुरसुंदरी श्री पार्वतीमातेला वंदन करून ह्या स्तोत्राची सुरवात होते.



शिवानन्दलहरी

Image result for free download images of Lord Shiv And Parvati

(वृत्त- शिखरिणी, अक्षरे-17, गण - य म न स भ ल ग, यति -6,11 )

कलाभ्यां चूडालङ्कृत-शशि-कलाभ्यां निजतपः -

फलाभ्यां भक्तेषु प्रकटित-फलाभ्यां भवतु मे ।

शिवाभ्यामस्तोक-त्रिभुवन-शिवाभ्यां हृदि पुन-

र्भवाभ्यामानन्द-स्फुरदनुभवाभ्यां नतिरयम् ।।1


(कला आत्मतत्त्व,चंद्राची कोर। चूडा - मस्तकी बांधलेले केस। अस्तोक चिरंतन, अखंड, पुष्कळ । नति -  झुकुन अभिवादन करणे )

रुपेरी चंद्राचा मुकुट नित ज्यांच्या शिरि असे

उभ्या कैवल्याचे मुकुटमणि शोभे उभय जे

जयांच्या मूर्ती ह्या जणु तप तयांचे अवतरे

गमे भक्तांनाही फळ निज तपाचे प्रकटले।।1.1

 

असे मांगल्याचे स्वरुप जणु जे मंगलमयी

स्रवे आनंदाची हृदयि नित निस्यंदिनिच जी

 महा ब्रह्माण्डाचे जनक जननी जे शिवमयी

भवानी रुद्रासी नमन करितो त्या प्रथम मी।।1.2



गलन्ती शंभो त्वच्चरित-सरितः किल्बिष-रजो

दलन्ती धी-कुल्या-सरणिषु पतन्ती विजयताम् ।

दिशन्ती संसार-भ्रमण-परितापोपशमनं

वसन्ती मच्चेतो-ह्रद-भुवि शिवानन्दलहरी ।।2


  ( गल्- पाझरणे,निर्माण होणे , दल् विकसित होणे,  धी – बुद्धी, कुल्या - सत्कुलोद्भव किंवा छोटी नदी, धीकुल्या - वेदविषयक बुद्धी,  सरणि - पथ, मार्ग, अविरत, अखंड प्रवाह )

तुझी पुण्यात्मा रे चरित-सरिता ओघवति ही

प्रवाहातूनी त्या उठति लहरी अमृतमयी

 सदा आह्लादाच्या अनुपम सुखाच्या प्रिय अती

मनाच्या डोही त्या लहरति शिवानंदलहरी ।। 2.1

 

भवाच्या चक्राते अडकुनि फिरे जीव दुबळा

तयाच्या कष्टाचे निरसन करी शांतवुनि त्या

करी दूरी धूली सकल दुरितांचीच सहजी

सदा उर्जा देती हटवुन निराशाच मनिची ।। 2.2

 

करी विस्तीर्णा ही अखिल मतिधारा पुनितची

मिळोनी बुद्धीसी विमल पथ दावी शिवमयी

ध्वजा राहे ज्यांची फडकत सदा या त्रिभुवनी

हृदी राहो त्याची शिव शिव सदानंद लहरी ।।2.3



त्रयीवेद्यं हृद्यं त्रिपुर-हरमाद्यं त्रिनयनं

जटाभारोदारं चलदुरग-हारं मृगधरम् ।

महादेवं देवं मयि सदयभावं पशुपतिं

चिदालम्बं साम्बं शिवमतिविडम्बं हृदि भजे ।।3

( त्रयीवेद्यम्  वेंदांच्या सहाय्याने ज्याचे यथार्थ ज्ञान होते । अतिविडम्ब- बहुरूपाने नटणारा। उरग- नाग,साप,   मानवी मुखाचा साप। निगम – वेद। चिदालम्ब- ज्ञानाचे आश्रयस्थान, कैवल्याचे विश्रांतीस्थान। )

तुला जाणायासी निगमपथ सोपान बरवा

तुझी मूर्ती रम्या सुखवि त्रिपुरारी  मम मना

शिवा सर्वश्रेष्ठा अनल शशि आदित्य नयना

शिरी शोभे शंभो विपुलचि जटाभार तुझिया।।3.1

 

तुझ्या कंठी हारासम सळसळे सर्प गहिरा

असे देवांचा तू अधिपति महेशा सुरवरा

धरी हाती शंभो अति चपळ का चंचल मृगा

जणू लीलेने तू करिसि  वश त्या चंचल मना।।3.2

 

दया माझ्यासाठी हृदयि तव ओथंबुनि भरे

 असे कैवल्याचा सगुण पुतळा तू पशुपते

नटे विश्वाकारे नमन तुजला हे नटवरा

तुझी भक्ती राहो सतत हृदयी तेवत शिवा।।3.3

 

सहस्रं वर्तन्ते जगति विबुधाः क्षुद्र-फलदा

न मन्ये स्वप्ने वा तदनुसरणं तत्कृतफलम् ।

हरि-ब्रह्मादीनामपि निकट-भाजामसुलभं

चिरं याचे शम्भो शिव तव पदाम्भोजभजनम् ।।4

( विबुधाः - देव,देवता । निकटभाजाम् -  निकटवर्ती )

 

अती छोटी छोटी पुरविति अभीष्टे मनिचि जे

अशा या देवांची गणतिहि हजारावर असे

महा पुण्याईने मजसिच मिळे भक्ति तयिची '

असे ना येई रे मम मनसि वा स्वप्निहि कधी।।4.1

 

तुझी प्राप्ती व्हाया तळमळति ब्रह्मा नित हरी

परी ना लाभे तू अति निकटवर्ती असुनही

विनंती माझी ही इतुकिच तुझ्या  वंद्य चरणी

सदा चित्ती राहो चरणकमले कोमल तुझी।।4.2

 

स्मृतौ शास्त्रे वैद्ये शकुन-कविता-गान-फणितौ

पुराणे मन्त्रे वा स्तुति-नटन-हास्येष्वचतुरः।

कथं राज्ञां प्रीतिर्भवति मयि कोऽहं पशुपते

पशुं मां सर्वज्ञ प्रथित-कृपया पालय विभो।।5

 

स्मृती शास्त्रांमध्ये गति मज दयाळा लव नसे

पुराणाची गोडी खुलवुनि कथा ना जमतसे

न मंत्रोच्चारांचे पठणचि यथायोग्य जमते

कथा गाणी काव्ये स्तुति शकुन  हेही नच कळे।।5.1

 

चिकित्सा रोगाची नच मज कळे औषधि तया

विनोदाची नाही चुरचुरित भाषा अवगता

रुचे राजा ऐसा अभिनय कराया जमत ना

कृपा भूपाची ती मजवर कशी होइल शिवा।।5.2

 

दयाळा सर्वज्ञा पशुच अति मी क्षुद्र कुणि हा

मला सांभाळी तू मजवर करोनी तव कृपा

कृपेची गाथा ही तव दुमदुमे रे दशदिशा

समर्था स्वामी तू करि न मजसी दूर सखया।।5.3

 

घटो वा मृत्पिण्डोऽप्यणुरपि च धूमोऽग्निरचलः

पटो वा तन्तुर्वा परिहरति किं घोर-शमनम्।

वृथा कण्ठक्षोभं वहसि तरसा तर्क-वचसा

पदाम्भोजं शम्भोर्भज परम-सौख्यं व्रज सुधीः।।6

  ( तरस्- चाल,वेग,शक्ति,उर्जा )

असे माती सारी घटचि नुसता बाह्य स्वरुपी

असे तंतू मुख्या वरवर दिसे वस्त्र नयनी 

अणू रेणू हेची घटक जगती मूळ असती

लपे अग्नी तेथे जिथुनि निघतो धूर भवती॥6.1

 

वृथा ऐसी चर्चा नच शमवि प्रक्षोभ मनिचा

अशा या तर्कांनी नच सुकवि कंठास मनुजा

असे सौख्याचा जो परम अविनाशीच सुखधी

अशा विश्वेशाची चरणकमळे आठव मनी ।।6.2

 

मनस्ते पादाब्जे निवसतु वचः स्तोत्र-फणितौ

करौ चाभ्यर्चायां श्रुतिरपि कथाकर्णन-विधौ।

तव ध्याने बुद्धिर्नयन-युगलं मूर्तिविभवे

परग्रन्थान्कैर्वा परमशिव जाने परमतः।।7

 

सदा राहो चित्ती चरणकमले कोमल तुझी

मुखी राहो माझ्या तवचि स्तुति स्तोत्रे मधुर ही

घडो हाती माझ्या तव चरणसेवा अविरता

  सदा कानांनी मी सुखमयचि ऐको तव कथा।।7.1

 

सदा बुद्धि व्हावी तव चरणि एकाग्र सदया

तुझी मूर्ती रम्या मम नयनि राहो प्रभुवरा

प्रभो सांगा आता तव गहन त्या ग्रंथविभवा 

कसे अभ्यासावे जवळि नुरले साधन शिवा।।7.2

यथा बुद्धिः शुक्तौ रजतमिति काचाश्मनि मणि-

र्जले पैष्टे क्षीरं भवति मृगतृष्णासु सलिलम्।

तथा देवभ्रान्त्या भजति भवदन्यं जडजनो

महादेवेशं त्वां मनसि च न मत्वा पशुपते।।8

( शुक्ति  शिंपला। रजत - चांदी )

 

बघोनी शिंपेसी उचलि जव त्याला जडमती

 मिळाली चांदी ही मनि म्हणतसे हर्षित अती

हिरा काचेलाही समजुनि तया धारण करी

 पिठाच्या पाण्यासी मधुर म्हणतो दूध म्हणुनी।।8.1

 

तहानेला धावे जवं मृगजळासीच बघुनी

तसे अज्ञानी हे भटकति उपेक्षूनी तुजसी

दिसे त्या देवासी नमुन म्हणती जागृत अती

कळे ना त्यांना हे स्वरुप तव विश्वात्मक मुळी।।8.2

 

गभीरे कासारे विशति विजने घोरविपिने

विशाले शैले च भ्रमति कुसुमार्थं जडमतिः।

समर्प्यैकं चेतःसरसिजमुमानाथ भवते

सुखेनावस्थातुं जन इह न जानाति किमहो।।9

 

सुपुष्पे अर्पावी तुजसि म्हणुनी मूढमति हे

कुणी पाण्यामध्ये कमळ खुडण्यासी धडपडे

कुणी रानामध्ये निबिड अति एकाकि भटके

फुले पत्री नानाविध मिळविण्या दुर्मिळ फळे।।9.1

 

कडे पायी पायी चढुन कुणि जाई गिरिवरे

मिळाया बेलाचे त्रिदल हिरवे पान इवले

कळेना कोणासी मन-सुमन हेची तुज रुचे

तुझ्या पायी अर्पी सुमन-धन तो सौख्य मिळवे ।।9.2


नरत्वं देवत्वं नग-वन-मृगत्वं मशकता

पशुत्वं कीटत्वं भवतु विहगत्वादि-जननम्।

सदा त्वत्पादाब्ज-स्मरण-परमान्दलहरी-

विहारासक्तं चेद्हृदयमिह किं तेन वपुषा।।10

 

मला लाभो काया सुर नर पशूचीहि कितिदा

किडा मुंगी पक्षी म्हणुनि मिळु दे जन्म शतदा

शरीरासी नाही लघुतमहि कर्तव्य मजला

हृदी राहो माझ्या इतुकिच मनीषा परि शिवा॥10.1

 

 स्मरे जेंव्हा मी हे तव चरण रे पंकजसमा

उठो आनंदाच्या विमल लहरी चित्ति सुखदा

मनाला माझ्या या नित विहरु दे त्यातचि सदा

मनी आसक्ती ही तव पद सरोजीच असु द्या ।।10.2

 

बटुर्वा गेही वा यतिरपि जटी वा तदितरो

नरो वा यः कश्चिद्भवतु भव किं तेन भवति।

यदीयं हृत्पद्मं यदि भवदधीनं पशुपते

तदीयस्त्वं शम्भो भवसि भव-भारं च वहसि।।11

 

गृहस्थी संसारी बटु यति जटाधारि असुदे

असो कोणीही तो नर कुणि तयाने न बिघडे

तुझ्या पायी वाहे हृदयकमला जो  पुरुष रे

तयाच्या वाहे तू परम भवभारासी शिव हे ।।11

 

 गुहायां गेहे वा बहिरपि वने वाद्रि-शिखरे

जले वा वह्नौ वा वसतु वसतेः किं वद फलम्।

सदा यस्यैवान्तःकरणमपि शम्भो तव पदे

स्थितं चेद्योगोऽसौ स च परम-योगी स च सुखी।।12

 

तुझ्या प्राप्तीसाठी नर विजनवासीच बनुनी

गुहे मध्ये राही गिरिवर फिरे दुर्गम अती

तुला शोधायाला कुणि फिरतसे निर्जन वनी

करी वा पूजार्चा सदनिच यथासांग तव ही।।12.1

 

बसोनी एकांती कुणि करितसे ध्यान तपची

उभा पाण्यामध्ये कितिक घटका देह शिणवी

निखा र्‍यांच्या रस्त्यावरुन कुणि चाले जडमती

अशाने का होते सुखद तव प्राप्ती कधितरी?।।12.2

 

सदा चित्ती ज्याच्या चरणयुगुले  पावन तुझी

तयाच्या सौख्यासी नच उरतसे पार कधिही

तुझे राही अंतःकरणि पद तो धन्य नर ची

असे योग्यांमध्ये नरवरचि तो श्रेष्ठ जगती।।12.3

  

असारे संसारे निज-भजन-दूरे जड-धिया

भ्रमन्तं मामन्धं परम-कृपया पातुमुचितम्।

मदन्यः को दीनस्तव कृपण-रक्षातिनिपुण-

स्त्वदन्यः को वा मे त्रिजगति शरण्यः पशुपते।।13

( असार- निरस, सारहीन,रसहीन,निरर्थक,व्यर्थ,क्षणभंगुर, जडधी  मंदबुद्धी,विवेकशून्य,अज्ञानी )

उगा संसारी या भरकटत राहे सतत मी

विवेकाची दृष्टी हरवुनि बसे मी जडमती

कळेना अंधा या तव चरण सेवा सुखकरी

मला उद्धाराया मजवरि कृपा शाश्वत करी।।13.1

असे शंभो हेची उचित तुजसी वर्तन खरे

अभागी नाही या जगति मजऐसा पुरुष रे

नसे त्रैलोक्यी या तुजसम दयावंत कुणिही

तुझ्या पायी आलो सदयहृदया घेचि जवळी।।13.2

 

प्रभुस्त्वं दीनानां खलु परमबन्धुः पशुपते

प्रमुख्योऽहं तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः।

त्वयैव क्षन्तव्याः शिव मदपराधाश्च सकलाः

प्रयत्नात्कर्तव्यं मदवनमियं बन्धुसरणिः।।14 

( किमुत-कैमुतिक न्याय - अजू किती अधिक या न्यायाने ; म्हणजेच मी जेवढा जेवढा जास्त दीन तेवढा तेवढा तू जास्त दयाळू , जे अती दीन आहेत त्यांच्या बद्दल तुझ्या मनात अजुन अजुन जास्त करुणा उत्पन्न होते. )

अनाथांच्या नाथा व्यथित पतिताच्याहि सुहृदा

असे रंकांमध्ये अधम अति मी रंक अवघा

बघोनी दीनांसी तुजसि बहु येई कळवळा

तयांच्या उद्धारा बहु श्रमतसे तूचि सदया।।14.1

 

असे या न्यायाने मम सुहृद तू रे जिवलगा

करी या दीनाच्या सकल अपराधांसिच क्षमा

प्रयत्ने रक्षावे मजसिच दयाळा नित भुवी

असे मैत्रीची ही अवगत मला रीत जगती ।।14.2

 

उपेक्षा नो चेत्किं न हरसि भवध्यान-विमुखां

दुराशाभूयिष्ठां विधि-लिपिमशक्तो यदि भवान्।

शिरस्तद्वैधात्रं न न खलु सुवृत्तं पशुपते

कथं वा निर्यत्नं कर-नख-मुखेनैव लुलितम्।।15

 

असे दुर्दैवी मी स्मरण तव होई न हृदयी

दिसेना आशेचा किरण मज या दाट तिमिरी

ललाटी माझ्या हे विधिलिखित का तू न पुससी

उपेक्षा माझी का करिसि मज दुर्लक्षुनि अती।।15.1

 

`ललाटीच्या लेखा पुसुनि लिहिण्यासी नविन त्या-

नसे शक्ती माझी ' वचन तव ऐसे उचित ना

विधात्याच्या तू रे नखलुनि शिरा दंड दिधला
महा सामर्थ्याचा परिचय जगासी घडविला।।15.2

 

विरिञ्चिर्दीघायुर्भवतु भवता तत्परशिर-

श्चतुष्कं संरक्ष्यं स खलु भुवि दैन्यं लिखितवान्।

विचारः को वा मां विशद कृपया पाति शिव मे

कटाक्ष-व्यापारः स्वयमपि च दीनावन-परः।।16

( विरिंचि-  ब्रह्मदेव )

विधाता होवो तो सहजिच चिरंजीव जगती

शिरे त्याची चारी जपुन अति ठेवा सकल ती

परी त्याने भाळी मम लिहुनि दुर्दैवलहरी

मला केले दुःखी हर हर शिवा घे समजुनी।।16.1

 

कटाक्षाने एका शिवमय कृपेनेच तुझिया

मला पाही शंभो; मजसि भय कैसे मग जिवा

जगी दुःखी कष्टी पतित पिचलेले जन अती

तयांना रक्षाया तव मनि दया पाझरत ही।।16.2

 

फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो

प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमल-पादाब्ज-युगलम्।

कथं पश्येयं मां स्थगयति नमःसम्भ्रम-जुषां

निलिम्पानां श्रेणिर्निज-कनक-माणिक्य-मुकुटैः।।17

(निलिम्पदेव. श्रेणिसमुह. जुष्- आनंद घेणारे. सम्भ्रम उतावीळ झालेले. थोडक्यात शिवाच्या पायावर नमस्कार करण्यासाठी अत्यानंदाने उतावीळ झालेल्या देवांच्या समुहाची गर्दी. प्रत्येकदेवाने नमस्कारासाठी पले मस्तक वाकवतांना  शिवाच्या पायावर जणु रत्नमाणिकहिर्‍यांच्या मुकुटांचीच गर्दी झाली आहेही सर्व धांदल  मला थांबवते म्हनजे स्थगयति. कशापासून तर शिवाचे चरण दिसण्यापासून )

फळे पुण्याई ही जणुच गतजन्मातिल अजी

तुला येवोनी वा अतिव करुणा सांग हृदयी

कृपा केली मोठी हर हर दयाळा मजवरी

तरी माझ्या नेत्री तव चरण शंभो न दिसती।।17.1

 

तुझ्या पायी माथा सकल सुर भावे नमविति

किरीटांचे त्याच्या चमकति हिरे माणिक अती

तुझ्या पायी गर्दी बहु उसळली स्वर्णमय ही
दिसू ना देती ते चरणयुगुले कोमल तुझी।।17.2

 

त्वमेको लोकानां परम-फलदो दिव्य-पदवीं

वहन्तस्त्वन्मूलां पुनरपि भजन्ते हरिमुखाः।

कियद्वा दाक्षिण्यं तव शिव मदाशा च कियती

कदा वा मद्रक्षां वहसि करुणा-पूरित-दृशा।।18

 

तुझ्या औदार्याची महति बहु लोकोत्तर असे

करे जो भक्तीसी फळ मिळतसे त्या तव कृपे

जगत्स्रष्टा किंवा त्रिभुवनपती हीच बिरुदे 

दिली देवांसी तू तरिहि तव गातीच स्तवने।।18.1

 

कृपेची ऐशी ही महति तव ऐकून जगती

 मनी माझ्या आशा सदयहृदया पालवलि ही

नका सोडू वा र्‍यावर मजसि रक्षा नित तुम्ही

कृपापूर्णादृष्टी मजवरिच टाका क्षणभरी।।18.2

 

दुराशा-भूयिष्ठे दुरधिप-गृह-द्वार-घटके

दुरन्ते संसारे दुरित-निलये दुःख-जनके।

मदायासं किं न व्यपनयसि कस्यापकृतये

वदेयं प्रीतिश्चेत्तव शिव कृतार्थाः खलु वयम्।।19

 

क्षुधार्ता पोटाची सतत भरण्या क्षुद्र खळगी

धनी उन्मत्तांची झिजवतचि दारे फिरत मी

निराशा आशेचा धरि मुखवटा; लोक फसती

चुराडा आशांचा हर हरचि होतो प्रतिदिनी।।19.1

 

सदा नाना दुःखे हतबलचि जीवांस करिती

दिसेना कष्टांचा शिव शिव शिवा अंत मजसी

कशी येईना रे तुजसी करुणा सांग मजसी

प्रभो पाहोनीया ममचि दयनीया स्थिति अशी।।19.2

 

जरी माझी दुःखे तवचि हृदयासी सुखविती

कृपा वा आहे ही शिव शिव दुज्याच्यावर तुझी

जरी माझी चिंता व्यथित करते ना तुज मनी

समाधानी आम्ही मनि न कुठली आस उरली।।19.3

 

सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ

नटत्याशा-शाखास्वटति झटिति स्वैरमभितः।

कपालिन् भिक्षो मे हृदयकपिमत्यन्त चपलम्

दृढं भक्त्या बद्ध्वा शिव भवदधीनं कुरु विभो।।20

 

कपाली शंभो! मी, अचपळ मना आवरु कसे

फिरे मोहाच्या या गहन वनि स्वच्छंद कपि हे

चढे संकल्पाच्या तरुवरचि हे मर्कट बळे

डहाळ्या आशेच्या धरुनि लटके त्यास उलटे।।20.1

 

उड्या मारी तेथे कधि धडपडे चंचल अती

असे त्याची वस्ती रुचिर-युवती-वक्ष शिखरी

तुझ्या भक्तीची बा दृढ अतुट रज्जूच करुनी

तया बांधी शंभो करुनि वश त्या ठेव जवळी।।20.2

 

धृति-स्तम्भाधारां दृढ-गुण-निबद्धां सगमनां

विचित्रां पद्माढ्यां प्रतिदिवस-सन्मार्ग-घटिताम्।

स्मरारे मच्चेत्तः-स्फुट-पट-कुटीं प्राप्य विशदां

जय स्वामिन् शक्त्या सह शिवगणैः सेवित विभो।।21

( स्फुट- श्वेत,उज्ज्वल,शुभ्र। विशद- स्वच्छ,पवित्र,निर्मल,विमल, विशुद्ध शांत निश्चिन्त आरामदायी )

 

जगज्जेता ऐसी महति जगती ज्याचिच असे

अनंगासी त्या तू सहज करसी राख हर हे

गणांचा स्वामी तू गण असति हे अंकित तुझे

तुझ्या सेवेसाठी झटत जगदंबा नित असे।।21.1

 

तुला विश्रांतीसी विमल कुटि ही मी बनविली

तया स्वीकारी तू तुजसि उपयोगी नित रणी

उभा धैर्याचा हा  अविचल असा खांबचि मधे

वरी चित्ताचा हा विमल पट आच्छादित असे।।21.2

 

गुणांच्या रज्जूने चहुकडुनि ताणून तयि रे

उभारी ज्ञानाचे सुभटचि महाद्वार प्रभु हे

उठावासी रेखी धवलपटि उत्फुल्ल कमळे

किती नाना रंगी हरखुनिच जाईल मन हे।।21.3

 

सदा सन्मार्गी या झटुनि श्रमलो मी प्रतिदिनी

उभाराया ऐसी अनुपम कुटी मंगलमयी

प्रवेशावे शंभो जय जय तुझे स्वागत करी

रहावे विश्रामा कुटित मम शंभो नित तुम्ही।।21.4

  

प्रलोभाद्यैरर्थाहरण-परतन्त्रो धनिगृहे

प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते।

इमं चेतश्चोरं कथमिह सहे शंकर विभो

तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपाम्।।22

 

करी सर्वस्वाचे हरण नित तू रे पशुपती

म्हणोनी संबोधी निगम तुजला तस्करपती

असे चोरीची रे चटक मम चित्तास भलती

मदालोभादिंची अनुचित तया मैत्र नडली।।22.1

 

कुसंगाने त्यांच्या विषय करण्या प्राप्त सगळे

दिसे त्यासी जेथे विषयसुख तेथे शिरतसे

अती पीडादायी मज निरपराधा छळितसे

तया बांधोनी तू तुजजवळ ठेवी सतत रे ।।22.2


करोमि त्वत्पूजां सपदि सुखदो मे भव विभो

विधित्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति।

पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षि-मृगता-

मदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शंकर विभो।।23

 

तुझ्या भक्ता देई सहजचि शिवा विष्णुपद ही

तुझ्या सेवेचे वा फळ मिळतसे ब्रह्म-पद ही

दिले सेवेचे तू फळ मजसि ते उत्तम अती

दिसेना मूर्ती रे मजसि परि विश्वात्मक तुझी।।23.1

 

वराहाच्या रूपे किति समय पाताळ फिरलो

तुझे नाही शंभो पदकमल मी शोधु शकलो

पुन्हा हंसाचे मी स्वरुप करुनी धारण शिवा

उडालो आकाशी परि नच शिरोदर्शन मला।।23.2

 

कसे सोसावे मी अपरिमित दुःखास असल्या

तुझ्या भेटीसाठी मम तळमळे जीव बहु हा

नको मोठी मोठी मजसिच पदे विश्वविजया
तुझ्या रूपाचे रे मजसि घडु दे दर्शन शिवा।।23.3

 

कदा वा कैलासे कनक-मणि-सौधे-सह गणै-

र्वसन् शम्भोरग्रे स्फुट-घटित-मूर्धाञ्जलिपुटः।

विभो साम्ब स्वामिन् परम-शिव पाहीति निगद-

न्विधातृणां कल्पान्  क्षणमिव विनेष्यामि सुखतः।।24 

( विधातृणां मधल्या तृला डबल वाटी पाहिजे )


सुवर्णा-रत्नांच्या भवनि तव कैलासशिखरी

गणांच्या संगे मी तुज पुढति ध्यानस्थ बसुनी

कपाळा लावोनी सविनय सुखे अंजुलि कधी

शिवा सांबा स्वामी म्हणत  तुजला पाहिन हृदी।।24.1

 

युगा मागे जाओ युग सुखद या नामस्मरणी

परी कल्पांचा तो समय मज भासो क्षणिकची

विधात्याच्या लेखी युग युगहि आहे क्षण जसे

तुझ्या सान्निध्याने युग मजसि भासो पळभरे।।24.2

 

स्तवैर्ब्रह्मादीना जयजय-वचोभिर्नियमिनां

गणानां केलीभिर्मद-कल-महोक्षस्य-ककुदि।

स्थितं नीलग्रीवं त्रिनयनमुमाश्लिष्ट-वपुषं

कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरशुम्।।25 

 ( केलि - खेळ,क्रीडा ; महोक्ष-नंदिबैल। ककुद् – वशिंड ; नीलग्रीव नीलकंठ म्हणजेच शंकर ; उमाश्लिष्ट-वपुषं – उमेनी आलिंगन दिलेला शंकराचा देह )

विधात्याच्या संगे सुरगण हि गाती स्तुति तुझी

निनादे योग्यांचा ` जय जय शिवा ' घोष गगनी

गणांच्या लीलांनी गजबजुन जाईच अवनी

घुमे नंदीचाही रव गभिर मोदे दश दिशी।।25.1

 

अशा थाटामध्ये अवतरत स्वारी स्मितमुखी

वशिंडा-आधारे बसुनि नित  नंदीवर तुझी

उमा वामांगी ही विलसत असे अर्ध शरिरी

शिवा नीलग्रीवा त्रिनयन तुझी मूर्ति बरवी।।25.2

 

धरी हाती एका चपळ मन वा चंचल पशु

दुजा हाती आहे तळपत तुझा खंडपरशु

तुझी मूर्ती ऐसी निववि हृदयाला कधि प्रभु

मला सांगा शंभो सुखविल कधी याचि नयनु।।25.3

 

कदा वा त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याङ्घ्रियुगलं

गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन्।

समाश्लिष्याघ्राय स्फुट-जलज-गन्धान् परिमला-

नलभ्यां ब्रह्माद्यैर्मुदमनुभविष्यामि हृदये।।26

( भव्य- मनोहर,प्रिय,सौम्य शांत,आनंददायी,भाग्यवान, शुभ । अङ्घ्रि - पाय। अङ्घ्रि युगलम् – दोन्ही पाय )

घडावे कैसे रे शुभद तव हे दर्शन मला

दिसावी कैसी ही चरणकमले लोचनि मला

महद्भाग्याने मी धरिन कधि हाती तव पदा

कृपाछत्रासी या धरिन कधि माथी पुलकिता।।26.1

 

कधी आलिंगोनी हृदयि जपुनी ठेविन तया

तुझ्या पायी वाही कमलकलिका अस्फुट अशा

भरूनी राहे हा परिमळ तयांचाचि अवघा

न ये ब्रह्मादींना अनुभवि अशा मी अनुभवा।।26.2

करस्थे हेमाद्रौ गिरिश निकटस्थे धनपतौ

गृहस्थे स्वर्भूजामर-सुरभि-चिन्तामणि-गणे।

शिरस्थे शीतांशौ चरणयुगलस्थेऽखिल-शुभे

कमर्थं दास्येऽहं भवतु भवदर्थं मम मनः।।27

( धनपति -  कुबेर । स्वर्भूज –- कल्पवृक्ष। अमरसुरभि - कामधेनु। चिन्तामणि –- सर्व इच्छा पूर्ण करणारे रत्न अथवा गणपती )

सुवर्णाचा मेरू तव करतळी तू उचलिला

स्विकारूनी दास्या धनपति तुझ्या पायि रमला

तुझ्या दारी शंभो नित बहरली कल्पलतिका

करी इच्छापूर्ती तवजवळि चिंतामणिच हा।।27.1


सुधा धारा वर्षे सुखदचि शशी मस्तकि तुझ्या

असे कल्याणाचे तव चरणि वास्तव्य शुभदा

तुला द्यावे ऐसे धनचि कुठले सांग उरते

असे माझ्यापाशी सुमनधन ते अर्पित असे।।27.2

 

वृत्त- शार्दूलविक्रीडित,  अक्षरे-19, गण- म स ज स त त ग )

सारूप्यं तव पूजने शिव महादेवेति सङ्कीर्तने

सामीप्यं शिव-भक्ति-धुर्य-जनता-सांगत्य-सम्भाषणे।

सालोक्यं च चराचरात्मक-तनु-ध्याने भवानीपते

सायुज्यं मम सिद्धमत्र भवति स्वामिन्कृतार्थोऽस्म्यहम्।।28

( सारूप्य- देवाच्या स्वरूपात लीन होणे, तदाकारता प्राप्त होणे, सामीप्य-निकटता , सालोक्य- (समानो लोकोऽस्य )-त्याच लोकात  स्वर्गात देवतांबरोबर राहणेसायुज्य - समरूपता तादात्म्य पावणे, अभिन्नता, समरूपता,एकता )

प्रेमे पूजन रे तुझेच करिता सारूप्य मुक्ती मिळे

घेता नाम मुखे तुझे मधुर हे सामीप्य मुक्ती मिळे

संतांच्या बसुनी समीप करिता चर्चा अती आदरे

अज्ञानास करोनि दूर मिळते सालोक्य मुक्ति त्वरे।।28.1

 

चित्ती विश्वस्वरूप ध्यान करिता सायुज्य मुक्ती मिळे

चारी मुक्ति नरास ज्या मिळति त्या तादात्म्यता लाभते

चारी मुक्ति दिल्यास तू मज शिवा झालो तदाकार रे

झाला धन्य कृतार्थ जन्म मम हा शंभो भवानीपते।।28.2

  

त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहं

त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो।

वीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थितां

शम्भो लोकगुरो मदीय-मनसः सौख्योपदेशं कुरु।।29

 

शंभो मी करितोचि पूजन तुझ्या या पावलांचे सुखे

ओठी नाम; पदारविंद तव हे माझ्या हृदी राहते

आहे रे तुझिया पदी विनवणी मी प्रार्थितोची मुखे

द्यावी या शरणागतास मजला भिक्षा शिवा शंभु रे।।29.1

 

स्वर्गी देवही याचना करि तुझ्या देवा कृपादृष्टिची

तोची नेत्रकटाक्ष  लाभुनि मिळो साफल्य या जीवनी

हे विश्वेश जगद्गुरू मम मना बोधामृते तोषवा

चित्ता सौख्य मिळेल अक्षय अशा ज्ञानामृता दिव्य द्या।।29.2


Image result for free download images of Lord Shiv drinking poison

वस्त्रोद्धूत-विधौ सहस्र-करता पुष्पार्चने विष्णुता

गन्धे गन्धवहात्मताऽन्नपचने बर्हिर्मुखाध्यक्षता।

पात्रे काञ्चन-गर्भतास्ति मयि चेद्बालेन्दुचूडामणे

शूश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिंस्रिलोकीगुरो।।30

(सहस्रकरता- हजारो हातांची किंवा हजारो किरणे जे काम करू शकतील अशी क्षमता जी सहस्रार्जुन किंवा सूर्य याच्याकडे आहे । गंधवहात्मता – गंध सर्वत्र वाहून नेण्याची क्षमता. विश्वरूप शिवाला गंध किंवा उटी लावण्यासाठी सर्वत्र संचार करणारा वारा किंवा विश्वात कुठेही असणारा वासुदेवच या कामास योग्य आहे ।  बर्हिमुखाध्यक्षता – देवांचा अध्यक्ष असलेला बर्हि म्हणजे अग्निस्वरूपता । )

शंभो वस्रचि अंतरिक्ष तव हे कैसे करू स्वच्छ मी

नाही मी प्रभु कार्तवीर्य अथवा नाही सहस्रांशु मी।

विश्वा व्यापुनि तू उरे तुजसि मी वाहू सुपुष्पे कशी

ना मी विष्णुच सर्वव्यापक असा  व्यापे जगा सर्वही।।30.1

 

शंभो भव्यचि मस्तकी तव कशा गंधाक्षता लावु मी

हे गंगाधर! वासुदेव नच मी तो सर्वगामी हरी।

लावाया तुजसी उटी पवन ना तो गंधवाहीच मी

नाही अग्निच मी, कसा करु तुझ्यासाठी स्वयंपाकची।।30.2

 

आणू कोठुनि स्वर्णपात्र प्रभु मी नैवेद्य अर्पावया

हे विश्वेश! हिरण्यगर्भ नच मी; सामान्य मी दास हा

चंद्राची सुकुमार कोर विलसे शंभो तुझ्या मस्तकी

हे विश्वेश जगद्गुरू करु कशी सेवा तुझी अज्ञ मी।।30.3


Image result for free download images of Lord Shiv drinking poison

नालं वा परमोपकारकमिदं त्वेकं पशूनां पते

पश्यन्कुक्षि-गतांश्चराचरगणान्बाह्यस्थितान्रक्षितुम्।

सर्वामर्त्यपलायनौषधमतिज्वालाकरं भीकरं

निक्षिप्तं गरलं गले न गिलितं नोद्गीर्णमेव त्वया।।31

 

केली पुष्कळ मी कृपा तुजवरी आता न होणे कृपा! '

ऐसे  तू झिडकारि ना मज शिवा शंभो कृपासागरा

जेंव्हा सागरमंथनी गरल ते आले वरी भीषण

सारे दानव, देव ही पळुनि ते गेले भये सत्वर।।31.1

 

तेंव्हा प्राशुन ते असह्य विष तू,कंठी असे रोधिले

नाही तू गिळले,म्हणून उदरी ब्रह्मांड राही सुखे

ना यत्किंचित त्यास वा उगळिले बाहेर ओठातुनी

देवादि गण रक्षिले भयद त्या हालाहलापासुनी।।31.2

 

ऐसे प्रेम तुझे अलौकिक असे निःसीम सर्वांवरी

सारे हे जग जाणिते तव कृपा आधार तू एकची

सांगा हो  मग दीनबंधु मजला लोटाल दूरी कसे

गेले रंजुनि गांजुनी जन तया तूचि म्हणे आपुले।।31.3


ज्वालोग्रः सकलामराति-भयदः क्ष्वेलः कथं वा त्वया

दृष्टः किं च करे धृतः करतले किं पक्व-जम्बूफलम्।

जिह्वायां निहितश्च सिद्ध-घुटिका वा कण्ठदेशे भृतः

किं ते नीलमणिर्विभूषणमयं शम्भो महात्मन्वद।।32

 

पाहूनी जहरी भयाण विष ते वाफाळते दारुण

देवांना भरली उरीच धडकी त्यांची उडे गाळण

ज्वालांचे बघुनी तयावर महा थैमान ते भीषण

दृष्टिक्षेपहि टाकण्यासि नव्हते कोणाकडे धाडस।।32.1

 

त्याची उग्र हलाहला निरखिले ठेऊनि तुम्ही करी

होते जांभुळ का? रसाळ पिकले? सांगा मला हो तुम्ही

होते औषध का ?गुटीच कुठली?संजीवनी औषधी?

की ठेवी रसनेवरीच सहजी नाही द्विधा अंतरी।।32.2

 

कंठी धारण तू करी गरल ते शांती ढळे ना तुझी

कंठा नीलम-रत्नमंडित तुम्हा का वाटतो हारची?

सांगा हे कसलेचि धाडस प्रभो नाही कुणी पाहिले

देऊ काय तुला विशेषण शिवा? तू तारिले विश्व हे !।।32.3


नालं वा सकृदेव देव भवतः सेवा नतिर्वा नुतिः

पूजा वा स्मरणं कथा-श्रवणमप्यालोकनं मादृशाम्

स्वामिन्नस्थिर-देवतानुसरणायासेन किं लभ्यते

का वा मुक्तिरितः कुतो भवति चेत्किं प्रार्थनीयं तदा।।33

 

देवा सांग मला तुला शरण मी आलो जरी एकदा

केले पूजन वा प्रणाम स्तुति वा घेता मुखे नाम वा

केले एकचि वार दर्शन तुझे वा ऐकली मी कथा

व्हाया साध्य मनोरथा हृदयिच्या नाही पुरे हेचि का।।33.1

 

बाकी देवगणांस मी शरण का जावे उगी ना कळे

  सन्मार्गावर देव जो डळमळे देणार तो काय रे

शंभो तू म्हणशील मुक्ति मजसी देतील हे देव रे

सांगा हो मज मुक्ति मुक्ति म्हणजे आहे तरी काय ते।।33.2

 

दुःखाच्या भवसागरात तरणे व्याख्या जरी मुक्तिची

स्वस्थानावरुनीच जे ढळति ते देतील मुक्ती कशी

ऐसी मुक्ति इथे-तिथे जरि मिळे पैशास रे पायली

शंभो सांग मला कशास सगळे येती तुझ्या पावली।।33.3


किं ब्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भव-

द्धैर्यं चेदृशमात्मनः स्थितिरियं चान्यैः कथं लभ्यते।

भ्रश्यद्देवगणं त्रसन्मुनिगणं नश्यत्प्रपञ्चं लयं

पश्यन्निर्भय एक एव विहरत्यानन्दसान्द्रो भवान् ।।34

 

धैर्यासी तव काय वर्णु शिव हे थारा भया ना जरा

राहे आत्मस्थितीत तू सहजची नाही सुखा पार या

ऐसे धैर्यचि,निर्विकार स्थिति ही लाभे कुणाला कशी

आहे देवगणांसही पतन रे होतीच ते नष्ट ही ।।34.1

 

होती हे भयग्रस्त त्रस्त ऋषिही जाता लया धैर्यची

जाई विश्वप्रपंच पूर्ण विलया उत्पात होती जगी
सारे विश्व विनष्ट होत बघुनी शांती न भंगे तुझी

आनंदात निमग्न तू विलसती आनंद उर्मी हृदी॥.34.2

  

योगक्षेम-धुरंधरस्य सकल-श्रेयः-प्रदोद्योगिनो

दृष्टादृष्ट-मतोपदेश-कृतिनो बाह्यान्तर-व्यापिन:।

सर्वज्ञस्य दयाकरस्य भवत: किं वेदितव्यं मया

शम्भो त्वं परमान्तरङ्ग इति मे चित्ते स्मराम्यन्वहम्।।35 


( योग – भक्तांना इष्ट गोष्टींचा लाभ करून देणे। क्षेम – प्राप्त वस्तूंचे रक्षण करणे। धुरंधर – समर्थ । दृष्टफळ – भुक्ति अदृष्ट फळ – मुक्ति। )

देसी भक्तगणांस इष्ट सगळे त्यांच्या करी रक्षणा

ऐसा एक समर्थ तू जगति या कल्याणकारी शिवा

भक्तांचे हित साधणेचि अवघे हा धर्म आहे तुझा

देसी भुक्ति तशीच मुक्ति सहजी सन्मार्ग सांगी सदा।।35.1

 

अंतर्बाह्यचि व्यापिले सकल या विश्वास शंभो तुम्ही

सांभाळी जगता तुझीच ममता शंभो कृपावारिधी

सांगावे तुजसीच काय प्रभु मी सर्वज्ञ तूची असे

आहे तू मम अंतरंग अवघे चित्ती तुला मी स्मरे।।35.2


भक्तो भक्तिगुणावृते मुदमृतापूर्णे प्रसन्ने मनः-

कुम्भे साम्ब तवाङ्घ्रि-पल्लवयुगं संस्थाप्य संवित्फलम्!

सत्त्वं मन्त्रमुदीरयन्निज-शरीरागार-शुद्धिं वहन्

 पुण्याहं प्रकटीकरोमि रुचिरं कल्याणमापादयन्।।36

 

वास्तव्यास करी निरंतर शिवा देहाचिया मंदिरी

केले हे बघ वास्तुपूजन शिवा प्रेमे यथासांग मी

आहे स्वच्छ प्रसन्न निर्मळ असा माझा मनोकुंभ हा

आहे भक्तिरसामृतेचि भरला शंभो शिवा शंकरा।।36.1

 

भक्ती सूत्र तयावरी सविनये गुंडाळिले  शंभु मी

हेची कोमल पादपल्लव तुझे मी स्थापिले त्यातची

शंभो श्रीफळ बुद्धिचे रुचिर हे मी ठेविले त्यावरी

 माझी सात्विकवृत्ति रूप म्हणतो ह्या पुण्यमंत्रास मी ।।36.2

आम्नायाम्बुधिमादरेण सुमन:संघाः समुद्यन्मनो

मन्थानं दृढभक्ति-रज्जु-सहितं कृत्वा मथित्वा तत:।

सोमं कल्पतरुं सुपर्ब-सुरभिं चिन्तामणिं धीमतां

नित्यानन्द-सुधां निरन्तर-रमासौभाग्यमातन्वते।।37

 ( आम्नाय - पुण्यपरंपरा,वेद। सुमनसंघाः -  देवांचे समुदाय,भक्तजनसमुदाय । सुपर्ब -  चांगल्या ग्रंथींनी युक्त )

देवांचे समुदाय सात्विक महा हे भक्त श्रेष्ठीच वा

उत्साहा करती रवी ; अविचला भक्तीस रज्जू पहा

त्याने मंथन घोर तेचि करिती वेदार्णवाचे शिवा

शंभो आपण वेदसिंधु अवघा केलाचि निर्माण हा ।।37.1

 

 त्यातूनी प्रकटे सुधाकर अहा जो शांतवी सज्जना

भक्तांचे पुरवी अभीष्ट सगळे ही कल्पवल्ली शिवा

ज्ञानाची शमवी तहान सुरभीदे ज्ञानदुग्धामृता

भक्तांची मनकामना पुरवितो चिंतामणी सर्वदा।।37.2

 

नित्यानंद तयातूनी प्रकटला आहे सुधेच्यासमा

देई सौख्य मना निरंतर अती या बुद्धिजीवीजना

ज्ञानाते रममाण नित्य करते सौभाग्यलक्ष्मी रमा 

वेदांचे करुनीच मंथन मिळे चित्ती सदानंद हा।।37.3


प्राक्पुण्याचल-मार्ग-दर्शित-सुधा-मूर्तिः प्रसन्न: शिव:

सोम: सद्गण-सेवितो मृगधर: पूर्णस्तमो-मोचक:।

चेत:पुष्कर-लक्षितो भवति चेदानन्द-पाथोनिधि:

प्रागल्भ्येन विजृम्भते सुमनसां वृत्तिस्तदा जायते।।38

( प्राक् -  पूर्वी । पुण्याचल -  पुण्याचा पर्वत। पुष्करम् - नीलकमल, शिवाचे विशेषण, शिवाच्या सात विशाल प्रभागांपैकी एक । पाथोनिधि समुद्र )

पुण्याई गतजन्मिची दृढ अती अत्युच्च मेरूसमा

दावी मार्ग प्रसन्न अमृतमयी ऐसा तुझ्या मूर्तिचा

पूर्वेच्या क्षितिजावरी उगवता पूर्णाकृती चंद्रमा

संगे घेउनि तारकागणचि हे हाती धरोनी मृगा।।- -

 

थारा ना उरतो तमास, किरणे ही स्पर्शिता पृथ्विला

प्रेमे सिंधु उचंबळे; कुमुदिनी उत्फुल्ल रात्रीस या

तैशी पाहुनि मूर्ति ही तव शिवा संगे गणांच्याच या

पाहोनी अतिरम्य कोर तुझिया माथ्यावरी उज्ज्वला।।- -

 

हाती चंचल तू मृगास धरिले हे रूप मोही मना

अज्ञाना हरुनी प्रकाशित करी या भक्तचित्तांस बा

मावेना हृदयीच मोद इतुका होई तुला पाहता

चित्ताच्या कमलात मूर्ति तव ही येता न तोटा सुखा।।38.3

धर्मो मे चतुरङ्घ्रिकः सुचरितः पापं विनाशं गतं

काम-क्रोध-मदादयो विगलिताः कालाः सुखाविष्कृतः।

ज्ञानानन्द-महौषधिः सुफलिता कैवल्य-नाथे सदा

मान्ये मानस-पुण्डरीक-नगरे राजावतंसे स्थिते।।39

( अवतंस – आभूषण )

माझ्या हृत्कमलारुपी नगरिच्या या दिव्य सिंहासनी

होता तूचि विराजमान प्रभु रे मी धन्य या जीवनी

आता वर्तन धर्मपूर्ण मम हे मी सांगतो निश्चये

गेले पाप लया, गळून पडले क्रोधादि शत्रू सवे ।।39.1

 

मोदाचा क्षण ना सरे क्षणभरी; आनंद ओसंडतो

ज्ञानानंद लता सदैव फुलता मी डोलतो डोलतो

अंगोपांग कशी सुखे डवरली ही औषधी वल्लरी

सौख्याची अनुभूति ये नित मला कैवल्यधामा हृदी।।39

 

धीयत्रेण वचो-घटेन कविता-कुल्योपकुल्या-क्रमै-

रानीतैश्च सदाशिवस्य चरिताम्भोराशि-दिव्यामृतैः।

हृत्केदारयुताश्च भक्तिकलमाः साफल्यमातन्वते

दुर्भिक्षान्मम सेवकस्य भगवन्विश्वेश भीतिः कुतः।।40

( कलम - मे जून मधे लावलेला तांदूळ जो डिसेंबर जानेवारीत तयार होतो। केदार -  पाण्याने भरलेले शेत । कुल्य- छोटी नदी ,पाट )

बुद्धिरूप रहाटयंत्र मम हे; मी त्यावरी बांधिले

शब्दांचे मम वाणिचे चिमुकले गंगाधरा पोहरे

शंभो दिव्य तुझ्या चरित्र-सरिते मध्येच ओथंबुनी

शब्दांचे घट सर्वथैव भरले दिव्यामृते पूर्णची।।40.1

 

त्याची दिव्य जलास स्तोत्र कविता ह्यांच्याच पाटातुनी

माझ्या चित्त मळ्यात मी फिरविता ही आर्द्र झाली भुई

वोळंबे करुनी सरी निगुतिने वाफ्यांस त्या सिंचता

भक्तीचा फुलला मळा मम हृदी ओंब्या डुलु लागल्या।।40.2

 

भक्तीचे बघुनीच पीक हृदयी हा जीव आनंदला

झाला सर्व सुकाळ तो मम हृदी दुष्काळ तो संपला

हे विश्वंभर सेवकास तव या भीती कशाची मनी

झालो मी कृतकृत्य निर्भय हृदी साफल्य ये जीवनी।।40.3

 

पापोत्पात-विमोचनाय रुचिरैश्वर्याय मृत्युंजय

स्तोत्र-ध्यान-नति-प्रदक्षिण-सपर्या-लोकनाकर्णने।

जिह्वा-चित्त-शिरोऽङ्घ्रि-हस्त-नयन-श्रोत्रैरहं प्रार्थितो

मामाज्ञापय तन्निरूपय मुहुर्मामेव मा मेऽवचः।।41

 

आपत्तीतुन घोर याचि सुटण्या ऐश्वर्यप्राप्तीसही

द्या आदेश विनाविलंब मजला ही इंद्रिये सांगती

स्तोत्रे सुंदर गावयासि रसना आज्ञाचि मागे मला

द्या संकेत मला म्हणेचि मन हे ध्यानास शंभूचिया।।41.1

 

विश्वेशा-चरणी प्रणाम करण्या आदेश द्या मस्तका

द्यावा शंभु प्रदक्षिणाचि करण्या निर्देश या पावला

पूजाया गिरिजेश्वरा कर म्हणे द्यावी अनुज्ञा मला

दृष्टी ही म्हणते मलाचि बघु द्या त्या कंठनीळा सदा।।41.2

 

कानांनी मज प्रार्थिले शिवचरित्रा ऐकु द्या हो मला

सेवेसी तव लाविले अवयवा प्राप्ती तुझी व्हावया

पाही रे वरचेवरी मज शिवा प्रेमे सदा वत्सला

शंभो मौन बरे नव्हे मजसवे सोडी अबोला तुझा।।41.3


गाम्भीर्यं परिखापदं घनधृतिः प्राकार उद्यद्गुण-

स्तोमश्चाप्तबलं घनेन्द्रियचयो द्वाराणि देहे स्थितः ।

विद्यावस्तुसमृद्धिरित्यखिलसामग्रीसमेते सदा-

दुर्गातिप्रियदेव मामकमनो-दुर्गे निवासं कुरु।।42

 (गाम्भिर्यम्- अगाधता,खोली। परिखा – किल्याच्या चारी बाजूला बनविलेला खंदक। कमन- सुंदर, मनोहर )

  दुर्गातिप्रियदेव! सज्ज करुनी या चित्तदुर्गास मी

 देतो आाज निमंत्रणास प्रभु हो, येथे रहावे तुम्ही

चित्ताचीच अगाधता हृदयिची गंभीरता खोल ही

हेची खंदक रक्षिती प्रबळ ह्या माझ्या सुदुर्गाप्रति।।42.1

 

 धैर्याचा करुनी अभेद्य तट मी राखीच रात्रंदिनी

सारे सद्गुण मित्रसैन्य अवघे राहे उभे सज्जची

आहे भक्कम द्वार पुष्ट सबला या इंद्रियांचे अती

विद्या ही उपयुक्त वस्तु सगळ्या ' दुर्गास ज्या लागती।।42.2

 

यावे चित्तगडात वस्ति करण्या दुर्गाप्रिया आजची

या हो या गिरिजेश्वरा त्वरित या दुर्गात माझ्या तुम्ही।।42.3

  

 मा गच्छ त्वमितस्ततो गिरिश भो, मय्येव वासं कुरु

स्वामिन्नादिकिरात मामकमनःकान्तारसीमान्तरे।

वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्यमोहादय-

स्तान्हत्वा मृगया-विनोद-रुचिता-लाभं च सम्प्राप्यसि।।43 

( कमन -  मनोहर,सुंदर । अकमन -  भीषण, )

स्वामी आदिकिरात! आपण रहा वस्तीस देहामधे

साधाया मृगया तुम्ही न फिरणे येथे तिथे वा कुठे

देही या घनदाट जंगल असे माझ्या मनाचे उभे

येथे वावरतीच हिंस्त्र पशु हे मात्सर्य क्रोधादिचे।।43.1

 

आहे मोह महाभयंकरचि हा जो खातसे मानवा

मारूनी पशु हे भयंकर अती शंभो मला सोडवा

घ्यावा मोद इथे करून मृगया हे भिल्लराजा तुम्ही

ऐसे कानन ना मिळेल तुजसी हिंडून या भूवरी।।43.2

  

 (वृत्त – कालभारिणी/माल्यभारा/मालभारिणी अक्षरे -चरण1,3 – 11;   चरण 2,4-12

गण- चरण1,3 (स स ज ग ग ); चरण-2,4 (स भ र य))

करलग्नमृगः करीन्द्रभङ्गो-

घनशार्दूलविखण्डनोऽस्तजन्तुः।

गिरिशो विशदाकृतिश्च चेतः

कुहरे पञ्चमुखोऽस्ति मे कुतो भीः।।44

 ( करलग्नमृग -  ज्याच्या हातात मृग आहे असा शिव किंवा ज्याने मृग म्हणजे पशू पकडला आहे असा सिंह । करीन्द्रभङ्ग - हत्तीलाही ठार मारणारा अर्थात सिंह किंवा शिव । घनशार्दूलविखण्डन - बलिष्ठ वाघाला मारणारा अर्थात सिंह किंवा शिव । अस्तजन्तु -  ज्याच्या भीतीने जंगलात प्राणी वास्तव्य करीत नाही असा सिंह किंवा मनातील षड्रिपूंचा नाश करणारा शिव। गिरीश -  पर्वतावर वास्तव्य करणारा सिंह अथवा हिमालयाच्या पर्वतराजीवर राहणारा शिव। विशदाकृति - – उठावदार, पवित्र,िनर्मल ।  पंचमुख – सिंह किंवा शिव )

 

धारले सहजी मृगासि ज्याने

गज-गंडस्थल ज्या विदीर्ण केले

सहजी वधितो बलिष्ठ व्याघ्र

बलशाली पशु जो करी परास्त।।44.1

 

फिरतो गिरिकंदरीचि मुक्त

हृदयी निर्भय ना द्विधा कधीच

करि हिंस्रपशू-विहीन रान

प्रकटे मूर्ति मनोज्ञ शुद्ध स्पष्ट।।44.2

 

मम या हृदयाचिया गुहेत

शिव पंचास्यचि राहता सुखात

मजसी भय कोठुनी असेल

बनलो निर्भय शांतचित्त आज।।44.3

 

(वृत्त शार्दूलविक्रीडित, अक्षरे-19,गण म स ज स त त ग, यति -12,7 )

छन्दःशाखि-शिखान्वितैर्द्विज-वरैः संसेविते शाश्वते

सौख्यापादिनि खेदभेदिनि सुधासारैः फलैर्दीपिते।

चेतःपक्षिशिखामणे त्यज वृथासञ्चारमन्यैरलं

नित्यं शंकर-पादपद्म-युगली-नीडे विहारं कुरु।।45

 

वेदांच्या घनदाटवृक्षशिखरी फांद्यांवरी उंच या

आहे हे उबदार एक घरटे शंभू-पदांचेचि या

आले येथ किती किती द्विज पहा शाखांवरी आश्रया

येथे गोड फळे रसाळ मिळती ही अमृताच्यासमा।।45.1

 

सौख्याचे फलभार हे लगडले दुःखा न जागा जरा

येथे आश्रय नित्य तो मिळतसे सा र्‍या मुमुक्षू जना

हे माझ्या मन पाखरा फिरु नको येथे तिथे तू वृथा

घेई या घरट्यात आश्रय; करी स्वच्छन्द क्रीडा मना।।45.2

 

आकीर्णे नख-राजि-कान्ति-विभवैरुद्यत्सुधा-वैभवै-

राधौतेऽपि च पद्मराग-ललिते हंस-व्रजैराश्रिते।

नित्यं भक्तिवधू-गणैश्च रहसि स्वेच्छा-विहारं कुरु

स्थित्वा मानसराजहंस गिरिजानाथाङ्घ्रि-सौधान्तरे।।46

 

( आकीर्ण - पसरणे,परिपूर्ण असणे,भरून जाणे। राजि - मालिका,ओळ,पंक्ति। पद्मराग – माणिक। राध् – राजी करणे, प्रसन्न करणे, )

 

माझ्या मानसराजहंस विहरी स्वच्छंद तू सर्वदा

प्रासादी शिव-पाद-पंकजरुपी अत्यंत या निर्मला

वाटे माणिक हे जणू जडविले शंभू-पदी आगळे

लाली या नखपंक्तिची उजळवी सारीच ही दालने।।46.1

 

तेजाने उजळून त्या झळकतो प्रासाद हा साजिरा

येई वा उदयास वैभव पुन्हा या अमृताचेचि का

होती लुब्ध तयावरी परमहंसाचे थवे हे सदा

प्रासादी मनमुक्त ते विहरती सीमा न त्यांच्या सुखा।।46.2

 

कांता भक्तिरुपीच घेउनि सवे ये राजहंसा मना

गौरीवल्लभ-पादपद्म-भवनी चंद्रप्रकाशा समा

एकान्तात करी विहार सखया लाटांवरी सौख्यदा

सौख्याचा भरला तुडुंब जलधी या पाउली शंभुच्या।।46.3


शम्भुध्यान-वसंत-सङ्गिनि हृदारामेऽघ-जीर्ण-च्छदाः

स्रस्ता भक्ति-लता-च्छटा विलसिताः पुण्य-प्रवाल-श्रिताः।

दीप्यन्ते गुणकोरका जप-वचः-पुष्पाणि सद्वासना

ज्ञानानन्द-सुधा-मरन्द-लहरी संवित्फलाभ्युन्नतिः।।47 

( सङ्गिन् -– अनुरक्त, स्नेहशील,संयुक्त,मिसळून गेलेले।  आराम -  बाग हृदाराम -  हृदयरूपी बाग,

अघ -  पापकोरकः/कोरकम् - कळी )

चित्ती ध्यासचि लागता निशिदिनी या पावलांचा शिवा

शंभु-ध्यान-वसंत स्पर्श घडता माझ्या मनाला जरा

चित्ताचे फुलले प्रमोदवन हे आलीच शोभा नवी

पाने जीर्ण मलीन सर्व झडली ही वासनांची जुनी।।47.1

 

झाल्या भक्ति-लताचि अंकुरित या त्यांना फुटे पालवी

तेजस्वी शुभ पुण्यदायक अशा सद्भावनांची नवी  

अंगोपांग कशा कळ्या बहरल्या नाना गुणांच्या तया

नामाची फुलती फुले अगणिता शंभो उमावल्लभा।।47.2

 

`इच्छा उत्तम, ज्ञान, मोद' - मध ह्या पुष्पांतुनी पाझरे

माधुर्यासचि अमृतासम असे गोडी फिकी ना पडे

आत्मज्ञान फळे रसाळ तयिची बोधामृते पूर्ण ही

हेची वैभव अद्वितीय अवघे बागेस या भूषवी।।47.3


नित्यानन्द-रसालयं सुर-मुनि-स्वान्ताम्बुजाताश्रयं

स्वच्छं सद्विज-सेवितं कलुषहृत्सद्वासनाविष्कृतम्।

शम्भु-ध्यान-सरोवरं व्रज मनोहंसावतंस स्थिरं

किं क्षुद्राश्रय-पल्वल-भ्रमण-संजात-श्रमं प्राप्स्यसि।।48

 ( नित्यानंद-रसालयम् – अविनाशी आनंदाचा अनुभव हेच ज्यातील जल आहे ।  सद्विज -  सुंदर पक्षी किंवा सदाचार संपन्न तत्त्ववेत्ते ब्राह्मण । स्वान्त -  मन ।  पल्वल -  डबके । कलुष – मलीन )

शंभू चिंतन हे सरोवर असे आनंददायी महा

नित्यानंद रसे जलाशयचि हा राहे भरोनी पुरा

याची रम्य तळ्यात चित्तकमळे येती फुलोनी पहा

योग्यांची अति शुद्ध पावन अशी देवादिकांची सदा।।48.1

 

आहे हे स्फटिकासमा नितळची पाणी सुधेच्या समा

घेती आश्रय श्रेष्ठ हे द्विज इथे जाती कुठे अन्य ना

राही मानसराजहंस सखया येथेचि तू राजसा

शोधी ना डबकेचि क्षुद्र कुठले आराम तेथेचि ना।।48.2


आनन्दामृत-पूरिता हर-पदाम्भोजालवालोद्यता

स्थैर्योपघ्नमुपेत्य भक्ति-लतिका शाखोपशाखान्विता।

उच्चैर्मानसकायमानपटलीमाक्रम्य निष्कल्मषा

नित्याभीष्ट-फलप्रदा भवतु मे सत्कर्म-संवर्धिता।।49

 ( आलवालम् – आळे ।  मानसकायमानपटलीम् आक्रम्य – अतकरणरूपी मांडवावर चढून । निष्कल्मष – निर्दोष, निरोगी ।  अभीष्ट -  इच्छित ।  सत्कर्म-संवर्धिता-  सत्कर्माचे खत घालून वाढविलेली )

शंभो मी शिवभक्तिरूप लतिका प्रेमे हृदी लावली

केले मी `गिरिजापती- चरण ' हे आळे तिच्या भोवती

आनंदामृत शिंपिताचि तिजला आली नव्हाळी नवी

फांद्या या फुटल्या अनेक तिजला एकावरी एक ची।।49.1

 

स्थैर्याचा दृढ खांब जाय चढुनी ही भक्तिची वल्लरी

आच्छादे मन-मांडवास मम या फोफावली वेल ही

नाही कीड तिच्यावरीच कुठली दुर्वासनांची मुळी

मी सत्कर्म खतास घालुनि तिला जोपासिले पूर्णची।।49.2

 

ऐसी सुदृढ ही निरामय लता आली तरारून जी

देवो इच्छित नित्य सुंदर फळे शंभो तुझ्या प्राप्तिची।।49.3



Image result for Shri Shailya free download pictures
श्रीशैल्यम्

Image result for Arjun tree free imagesImage result for Arjun tree free imagesImage result for Arjun tree free images
अर्जुन वृक्ष

Image result for mallika flowersImage result for malati flowers free downloadImage result for malati flowers free download

सन्ध्यारम्भ-विजृम्भितं श्रुति-शिरः-स्थानान्तराधिष्ठितं

सप्रेम-भ्रमराभिराममसकृत्सद्वासना-शोभितम्।

भोगीन्द्राभरणं समस्त-सुमनः-पूज्यं गुणाविष्कृतं

सेवे श्रीगिरि-मल्लिकार्जुन-महालिङ्गं शिवालिङ्गितम्।।50

 ( विजृम्भितम् – विकसित, कळ्यांनी फुलून गेलेला किंवा तांडव करणारा । भोगिंद्र + आभरणम्  - सापांची भूषणे अंगावर असलेला । गुणाविष्कृतम् – आयुष्याला कृतार्थ करणाऱया अनेक गुणांचा, दैवी संपत्तीचा आविष्कार ज्यातून होत आहे असे (मल्लिकार्जुन महालिंग) । शिवा -  पार्वती  ) 

श्री शैल्यावर वृक्ष अर्जुन उभा हा श्वेत उंचापुरा

त्यालाची बिलगून वेल चढली ही मल्लिकेची पहा

होता सांज, कळ्या कळ्या उमलती ह्या वृक्ष-वेलींवरी

शोभा पाहुन वाटते मम मनी जोडी उमा शंभुची।।50.1

 

येथे शंभु-उमा निवास करती ऐसे म्हणे वेदही

श्री शैलावर मल्लिकार्जुन महा संबोधती देवही

येथे तांडव शंभु तो करितसे अस्तास जाता रवी

आलिंगे गिरिजेश्वरास गिरिजा हे रूप मी आठवी।।50.2

 

ह्याची मालति-अर्जुनावर करी गुंजारवा भृंगही

का वा साधु महंत देव करती पूजा उमा-शंभुची

प्रेमे भक्तिरसात गर्क स्तविती गौरी-महेशा मुखी

जाई भारुन आसमंत  तिथला त्या पुण्य मंत्रातुनी।।50.3

 

ऐशा सात्त्विक भावना चहुकडे आंदोलती  त्या नभी

त्याने ते शिवलिंग अद्भुत दिसे स्वर्गीय शोभाच ती

जैसे अर्जुन मालती गुणकरी आहे महा औषधी

तैसे हे गुणवंत शंकर उमा आधार विश्वाप्रति।।50.4

 

होई भूषण नागराज चि महा हे कांचनी कांतिचे

गौरीशंकर मल्लिकार्जुन दिसे हे त्यामुळे आगळे

पाहूनी शिवलिंग भक्ति जडली माझी तयाच्याप्रति  

हाची पावन मल्लिकार्जुन महा मी पूजितो मन्मनी।।50.5

-----------------------------------------

 

शिवानन्दलहरी भाग 2 साठी खालील लिंकवर क्लिक करा.

शिवानन्दलहरी भाग 2 लिंक



 

 

No comments:

Post a Comment