श्रीलक्ष्मीनृसिंहकरावलम्बनस्तोत्रम्


                  श्री आद्य शंकराचार्य-रचित हे एक अप्रतिम स्तोत्र आहे. भाषेवरील प्रभुत्व असाधारण आहे. स्तोत्रातील भाषाशैली आणि समर्पण भाव मनाला स्पर्शून जाणारा आहे. आचार्यांच्या प्रत्येकच स्तोत्रातील ध्रुवपद हे इतकं चपखल आणि मनाचा ठाव घेणारं असतं की त्याचा अर्थ कळो वा न कळो पहिल्या वाचण्यातच ते प्रत्येकच्या मुखात घोळत राहते. जिभेवर नर्तन करत राहते . अर्थाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा माझा प्रयत्न आहे.
                श्रीलक्ष्मीनृसिंहकरावलम्बनस्तोत्रम् हे संकटांचा नाश करणारं स्तोत्र आहे. हे स्तोत्र म्हणण्याचा एक विधी आहे. हे स्तोत्र शुचिर्भूत होऊन सूर्योदयापूर्वी म्हणतात. ह्याचे 1 ते 16 श्लोक सलग म्हटल्यावर परत 16, 15, --अशा उलट्या क्रमाने हे स्तोत्र पहिल्या श्लोकापर्यंत म्हटले जाते. पहिला श्लोक म्हणून झाला की मग  सतरावा श्लोक म्हणतात. असा ह्याचा पाठ पूर्ण होतो.

श्रीलक्ष्मीनृसिंहकरावलम्बनस्तोत्रम्

( वृत्त- वसंततिलका, अक्षरे 14, गण - त भ ज ज ग ग )

श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे
भोगीन्द्रभोगमणिराजितपुण्यमूर्ते।
योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।1

( शाश्वत - –नित्य,सनातन,चिरस्थायी,नित्य,निरंतर। शरण्य -– आश्रय, रक्षक )

सम्पन्न सिंधुसदनातचि  चक्रधारी 
 शेषावरी पहुडली तव दिव्यमूर्ति
 हे पावना गुणघना भवसिंधुतारू 
 योगीश्वरा असशि नित्य निरंतरा तू ।।1.1 

विश्रामधाम असशी तव सेवकांसी 
 त्राताचि या सकल  भक्तगणांस तूची
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।1.2 ब्रह्मेंद्र-रुद्र-मरुदर्क-किरीट-कोटि- 
सङ्घट्टिताङ्घ्रिकमलामल-कान्ति-कान्त
लक्ष्मीलसत्कुच-सरोरुह-राजहंस
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।2

ही पाऊले विमल कोमल पद्म जैसी 
 इंद्रादि देवगण हे नित वंदिताती
आले तुला शरण वायु महेश ब्रह्मा 
 पायी तुझ्याच नतमस्तक देव होता - -।।2.1

कोटी किरीट पदि घासति रत्नमाला 
 रत्नप्रभा उजळवी तव पावलांना
देदिप्यमान तव रूप मनास मोहे
 तेजोनिधी विमलकांति सुदर्शना रे।।2.2

हे सुंदरा विचरसी कमला हृदीच्या
 अत्यंत निर्मल सरोवरि राजहंसा
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।2.3संसारदावदहनाकुल-भीकरोरु-
ज्वालावलीभिरतिदग्धतनूरुहस्य।
त्वत्पादपद्मसरसीं शरणागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।3

दावानलू भडकला भवसागरी या 
 ज्वाला कराल उठल्या मज जाळिती या
झाला असह्य मजला प्रभु दाह त्याचा
 आलो तुझ्या कमल कोमल पायि देवा।।3.1

दाहास या शमविण्या दिसतो उतारा
 ही पावले जणु जलाशय शांत मोठा
आधार ना दिसतसे तुजवीण कोणी
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।3.2संसारजालपतितस्य जगन्निवास
सर्वेन्द्रियार्थबडिशाग्रझषोपमस्य।
प्रोत्कम्पित-प्रचुर-तालुक-मस्तकस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।। 4

जाळ्यात मी गवसलो भवसागरीच्या 
 नाही तिथून सुटका करु काय देवा
संसाररूप गळ हा मम कंठ छेदी
 घायाळ मी तडफडे बहु वेदनांनी।।4.1

प्राणांतिका कळ उठे मम मस्तकी ही
 फाटून जाय मुख हे मम प्राण कंठी
धावून या झडकरी बहु त्रस्त हा मी
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।4.2संसारकूपअतिघोरमगाधमूलं
सप्राप्य दुःख-शत-सर्प-समाकुलस्य।
दीनस्य देव कृपया पदमागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।5

संसाररूप अति खोलचि दुःखदायी 
 गर्तेत घोर पडलो; भय घेरतेची
हे दुःखसर्प बघुनी अति भीतिदायी
 झालोचि व्याकुळ; सुटे मम धीर तोही।।5.1

आलो अनन्य शरणा तव पादपद्मी
 मी हीन दीन प्रभु रे मज एक तूची
आधार सर्व सुटला असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।5.2संसार-भीकर-करीन्द्र-कराभिघात-
निष्पीड्यमान-वपुषः सकलार्तिनाश।
प्राणप्रयाण-भव-भीति-समाकुलस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।6

संसाररूप गज  हा मदमस्त भारी 
 धावूनि ये मजवरी करुनी चढाई
सोंडेत घट्ट धरुनी मज आदळीता 
 गेलीच शुद्ध  मम प्राणही जाय आता।।6.1

चित्तास व्यापुनि उरे भय मृत्यचे हे 
 नाशीच तू सकल दुःखचि दुःखितांचे
सोडू नको मजसि संकटि एकटाची 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।6.2संसार-सर्प-विष-दिग्ध-महोग्र-तीव्र-
दंष्ट्राग्र-कोटि-परिदष्ट-विनष्ट-मूर्तेः।
नागारि-वाहन सुधाब्धिनिवास शौरे
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।7

संसारसर्प डसला मजला विषारी
 रोवून दात अति खोल महा विषारी
देही न त्राण उरले नच प्राण ते ही
 झालोच मी गलितगात्र  कळे न काही।।7.1

आहेस तू गरुडवाहन शूर वीरा
 वास्तव्य अमृतमयी उदधीत राया
देई मला अभय तू असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।। 7.2संसारवृक्षमघबीजमनन्तकर्म-
 शाखायुतं करण-पत्रमनङ्गपुष्पम्।
आरुह्य दुःखफलिनं पततो दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।8

बीजातुनी अतिविनाशक दोषधारी 
 संसाररूप फुलला तरु हा विषारी
फांद्या अनंत फुटल्या निजकर्मरूपी
 पाने तया विषयसक्तचि इंद्रिये ही।।8.1

पुष्पे अनंत फुलली नित वासनांची 
 आली तयावरि फळे अति दुःखरूपी
पस्तावलो चढुन मी  तरु ऊंच हाची
 जो वाटला सुखद रे दुरुनी बघोनी।।8.2

आहे परी जटिल हा उतरू कसा मी 
  माझाचि तोल ढळला पडतोचि खाली
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।8.3संसार-सागर-विशाल-कराल-काल-
नक्र-ग्रह-ग्रसित-निग्रह-विग्रहस्य।
व्यग्रस्य राग-निचयोर्मि-निपीडितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।9

( कराल- भयानक भीषण, जांभई देण्यासाठी पूर्ण उघडलेला,ज्याच्यात झटके अथवा हेलकावे बसत आहेत. )

संसार सागर महा भय दावि जीवा
 ह्या काळरूप मगरी टपल्या गिळाया
त्या तोडितीच लचके मम निग्रहाचे
 केली विदीर्ण तनु ही मज धीर ना रे।।9.1

लाटा  भयाण उठती मनि वासनांच्या
 घायाळ त्या करिति रे मजला नृसिंहा
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।9.2संसार-सागर-निमज्जन-मुह्यमानं
दीनं विलोकय विभो करुणानिधे माम्।
प्रह्लाद-खेद-परिहार-कृतावतार
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।10

हेलावती खवळल्या भवसिंधु लाटा
 गोतेच खाइ प्रभु मी बुडलोचि धावा
सांगा अनाथ मज या बघुनी तुम्हाला
 कैसा न पाझर फुटे; बुडतो दयाळा।।10.1

माहीत एक मजला तव नाम सोपे
 प्रह्लादबाळ तरला अपुल्याचि नामे
आधार ना मज दिसे भयभीत चित्ती 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।10.2संसार-घोर-गहने चरतो मुरारे
मारोग्र-भीकर-मृग-प्रचुरार्दितस्य।
आर्तस्य मत्सर-निदाघ-सु-दुःखितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।11

संसार हा निबिड घोर अरण्य जैसा 
 मी एकटाचि फिरतो पथ सापडेना
हा क्रूर सिंह मनिच्या खल वासनांचा 
 मागावरी मम फिरे; करि पाठलागा।।11.1

द्वेषादि मत्सर उन्हे  मज पोळताती
 व्याकूळ आर्त दयनीयचि जाहलो मी
शंका विषाद भय हे मज घेरतेची 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।11.2बद्ध्वा गले यमघटा बहु तर्जयन्तः
कर्षन्ति यत्र भवपाशशतैर्युतं माम्।
एकाकिनं परवशं चकितं दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।12

अत्यंत क्रूर यमदूत मला दटावी
 हा ! फेकिला मम गळा यमपाश त्यांनी
ओढून नेति मजला असहाय्य रे मी
 हा ! एकटाचि भयभीत सवे न कोणी।।12.1

आधीच रे मम गळा भवपाशगुंता
 हा फास त्यातुन अती मम जीवघेणा
धावून ये पतितपावन शांतमूर्ती
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।12.2लक्ष्मीपते! कमलनाभ! सुरेश! विष्णो!
यज्ञेश! यज्ञ मधुसूदन विश्वरूप!
 ब्रह्मण्य ! केशव जनार्दन! वासुदेव!
लक्ष्मीनृसिंह! मम देहि करावलम्बम्।।13

हे श्रीपते कमलनाभ सुरेश विष्णू 
 हे यज्ञदेव नित यज्ञ स्वरूप रे तू
हे विश्वनाथ नटलासचि विश्वरूपे
 राहे भरून प्रभु तूच चराचरी रे।।13.1

तू क्रूर दैत्य वधिले मधुसूदना रे
 हे वंद्य वेदप्रतिपालक तू मुरारे
वेदज्ञ सात्विक निरालस ब्राह्मणांचा 
 आहेस तूचि हितचिंतक पाठिराखा।।13.2

श्रीरंग श्रीधर जनार्दन केशवा रे 
 हे वासुदेवचि रमारमणा हरी रे
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।13.3एकेन चक्रमपरेण करेण शङ्ख-
 मन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन्।
वामेतरेण वरदाभय-पद्म-चिह्नं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।14

शोभेचि दक्षिण करी अति दिव्य चक्र
 हाती दुज्याच धरि तू प्रभु पांचजंन्य
देण्या वरास उजवा उचलोनि हात 
 भक्तांस देसि अभया प्रभु तू नृसिंह।।14.1

हातावरीच शुभसूचक पद्मचिह्न
 मांगल्यदायि सुखदायक तेचि नित्य
तू घेतले उचलुनी कमलेस अंकी
 आधार देउनि तिला अपुल्या करानी ।।14.2

आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।14.3अन्धस्य मे हृत-विवेक-महाधनस्य
चौरैर्महाबलिभिरिन्द्रिय-नामधेयैः।
मोहान्धकार-कुहरे विनिपातितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।15

ह्या आंधळ्यास लुटले ठग इंद्रियांनी 
 नेला लुटून बहुमूल्य विवेक त्यांनी
गर्तेत या ढकलिले अति खोल  त्यांनी 
 मोहांधकार घनदाट दिसे न काही।।15.1

येथेचि चाचपडतो दिसते न ज्योती 
 आलो अनन्य शरणा तव पादपद्मी
धावून ये पतितपावन एक तूची 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।15.2प्रह्लाद-नारद-पराशर-पुण्डरीक-
व्यासादि-भागवत-पुङ्गवहृन्निवास।
भक्तानुरक्त –परिपालन-पारिजात
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्।।16

प्रह्लाद-नारद-पराशर-पुण्डरीक 
ते थोर व्यासमुनि रे तव भक्तश्रेष्ठ
 प्रेमे तुझ्याच चरणी  अनुरक्त नित्य 
 राही तयां हृदयमंदिरि तू सदैव।।16.1

जे पुण्यशील अतिपावन भक्तवृंद
 त्यांचाच तू सुखमयी नित कल्पवृक्ष
आधार ना मज दिसे असहाय्य रे मी 
 लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती।।16.2लक्ष्मीनृसिंह-चरणाब्ज-मधुव्रतेन
स्तोत्रं कृतं शुभकरं भुवि शङ्करेण।
ये तत्पठन्ति मनुजा हरिभक्तियुक्ता-
स्ते यान्ति तत्पद-सरोजमखण्डरूपम्।।17

हे पादपद्म तवची `मधु-मोक्ष' युक्त 
 मीची तयावर अति अनुरक्त भृंग
जाईन ना त्यजुनि हे चरणारविंद 
 सेवीन अमृतमयी मकरंद गंध।।17.1

हा जीवलोक करण्या शुभ,पुण्ययुक्त 
 या शंकरेचि रचिले अति हृद्य स्तोत्र
हे भक्तियुक्त हृदये म्हणताचि कोणी
 राहे निरंतरचि तो प्रभुपादपद्मी।।17.2

लक्ष्मी-मुकंद-चरणी अति आर्ततेने
केलीच जी विनवणी गुरु शंकराने
ती भावगर्भ रचना करुनी मराठी

झालीच धन्य अति धन्य अरुंधती ही
---------------------------------------------------------

( नंदन नाम संवत्सर, अधिक भाद्रपद कृ. एकादशी, कमला एकादशी , 12 सप्टेंबर 2012)


No comments:

Post a Comment