।।आदित्यहृदयस्तोत्रम् ।।

                          

#ShriRamBhajan
Image result for sunrise images
                          



                आदित्यहृदयस्तोत्रम विश्लेषण-

युद्धात शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या पक्षाचा विजय होईल हे सांगता येत नाही. कुठल्याही पक्षाचा विजय संदिग्धच असतो. निश्चित नसतो. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्या क्षणी पारडे कसे फिरेल, कुठे झुकेल हे सांगता येत नाही.

लंका अभेद्य आहे हा रावणाचा विश्वास होता. लंकेची रचनाही तशीच भरभक्कम होती. लंकानगरी अनेक यंत्रांनी, अस्त्र शस्त्रांनी सुसज्ज होती. शिवाय रावणाकडे एकसे एक खंदे अजेय वीर होते. मिळालेल्या अनेक वरांमुळे हे वीर जणु काही अमरच होते. रावणही अनेक वरांमुळे जणु काही अवध्य झाला होता. त्याला देवांकडून वा दैत्यांकडून मरण येणार नाही असा वर त्याने मिळवला होता. कितीही पराक्रमी माणसं त्याच्या पराक्रमापुढे त्याला कस्पटासमान वाटत होती.

ज्याप्रमाणे जमिनीवर असणार्‍या मगरीपेक्षा पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीची ताकद दसपटीने वाढते त्याप्रमाणे स्वतःच्या बालेकिल्ल्यात ज्याचा त्याचा जोर प्रचंड असतो. तो आपल्या जागेशी परिचित असतो. त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी कुमक मिळत राहते. ह्या सर्व विचाराने लंकापती रावण निश्चिंत होता. ‘‘अयोध्येहून परागंदा झालेला, वनवासी अननुभवी तरूण राम माझ्याएवढा तुल्यबळ कसा असेल? तो माझ्यापुढे टिकू शकणार नाही.’’ हा त्याचा विचार अगदीच खोटा नव्हता. कुठे आयोध्या कुठे लंका! अयोध्येच्या मदतीशिवाय एकट्याच श्रीरामाने लंकेवर चढाई केली. त्यांच्याकडे ना स्वतःची सेना होती ना आयुधे. ना लढण्यासाठी शस्त्रसज्ज रथ ना चतुरंगदळे.

पण!  राघवाचे संघटन कौशल्य विलक्षण होते. सर्व वानरसेनेचे मन त्यांच्या सत्यनिष्ठेनी इतके मोहून गेले होते की सारी वानरसेना प्रभुरामचंद्रांसाठी कोठलेही दिव्य करायला तयार होती. सुग्रीवाची सारी सेना त्याचप्रमाणे वालीपुत्र अंगदाची सेना प्रभु रामांच्या नेतृत्वाखाली लढायला सज्ज होती. सर्वांचा आपल्या नेत्यावर दृढ विश्वास होता. सर्वांचे मनोबल अत्युच्च होते. अत्यंत आत्मविश्वासाने ते रणांगणावर उतरले होते. रोज रणांगणावर नव्या दमाने उतरणार्‍या रावणाच्या सैन्याच्या तुकड्यांशी लढत होते. रामाचे सैन्य पर्याप्त होते. सीमीत होते. पण रामाचे युद्ध कौशल्य, व्यूहरचना कौशल्य अद्वितीय असेच होते. मेघनादाची शक्ती लागून मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला हनुमंताने महत्प्रयासाने मिळवलेल्या संजीवनीने जीवनदान लाभले होते.

त्याउलट रावणाचे भाऊ, मुले सर्वांचा खातमा झाला होता. असे असले तरी रावण अजून जिवंत होता. आपल्या भावांच्या, मुलांच्या, नातेवाईकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सूडाच्या भावनेने पेटून उठला होता. एखाद्या प्रलयाग्नी सारखा धुमसत होता. त्याची ताकद जणू दसपटीने वाढली होती. श्रीरामांना ललकारत होता. रणांगणावर मोठ्या ताकदीने, स्फूर्तीने उतरलेल्या रावणाला प्रथमच पाहून धीरोदात्त श्रीरामही क्षणभर विचलित झाले. चिंतित झाले. प्रभुरामचंद्राची चिंता ही कुठल्याही प्रकारे भयातून वा रावणाच्या रणांगणावरच्या प्रभावी प्रवेशातून निर्माण झालेली नव्हती तर अत्यंत जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून, सर्व सैन्याच्या, प्रजाजनांच्या काळजीतून निर्माण झालेली होती. रावणाच्या बेजबाबदार अहंकाराने तो तर मरणार होताच पण त्याच्यासोबत असंख्य आप्तजनांच्या पुरवासीयांच्या, वानरसैन्याच्या होणार्‍या कायमच्या नुकसानाची त्याला यत्किंचितही खंत वाटत नव्हती ‘माझ्यासाठी सर्व काही’ ह्या उद्दामपणातून त्याची वाढलेली बेफिकिरी त्याच्या आक्रस्ताळ्या ललकारण्यातून दिसत होती. ह्या युद्धात तो धर्म – अधर्म, नीती - अनीती ह्या सर्व सीमा ओलांडून लढणार होता.

श्रीराम अनेक दिवसांच्या युद्धाने थकलेले होते.  रामाची सेना अथक लढत होती. असे असतांना, महापराक्रमी, नव्या दमाचा रावण मोठ्या त्वेशाने लढण्यासाठी आज रणांगणावर उतरला होता. समोर उभा होता.  आपलं असं हे दमलेलं सैन्य! ना आपल्या सैन्यात रथ आहेत ना घोडे. ना हत्ती आहेत ना अद्ययावत शस्त्रास्त्रे! चिंतेचं मळभ रामचंद्रांच्या मनाला व्यापून गेलं. `काय होईल?’ ही धाकधुक अस्वस्थ करत होती.

त्याच वेळी युद्ध पाहण्यासाठी अनेक ऋषीमुनींना घेऊन अगस्ति ऋषी तेथे आले. आज ज्या प्रमाणे मोठे देश सार्या मानवकल्याणाच्या हेतूने विश्वाला असलेला धोका ओळखून दोन देशांच्या युद्धात हस्तक्षेप करतात; त्याप्रमाणे व त्याच हेतूने ऋषी अगस्ती आपल्यासोबत देव, देवता, ज्ञानी, विद्वान ऋषी मुनींना घेऊन युद्धभूमीवर आले होते. रामाच्या मनात चाललेला सर्व विचारांचा, शंकांचा , चिंतेचा त्यांना पुरेपूर अंदाज आला. सर्व परिस्थिती त्यांच्या ध्यानात आली. ते पुढे आले. रामाच्या पाठीवर आपला वत्सल हात ठेवत ते म्हणाले, ``वत्साश्रीरामाहे महाबाहोअरेतू शूर वीर गुणी आहेस. लोकांच्या मनात तुझ्याबद्दल अपार प्रेम आहे. तुझ्या मनातील ही चिंता क्षणैक आहे. सूर्यावर एखादा छोटासा ढग यावा तशी विरून जाणारी आहे. असा चिंताक्रांत होऊ नकोस.’’

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांची बाजू सत्याची होती. सत्याचा प्रहार मोठा प्रखर असतो. सत्याची धार मोठी विलक्षण असते. सत्याच्या मागे उभी असलेली अदृश्य लोकशक्ती, जनसामान्यांचा मूक पाठिंबा, ज्ञानी, विद्वान आणि नीतीमान अशा ऋषी मुनींची संघटित शक्ती, रावणाने जाणली नाही. त्याचा त्याच्या बाहुबलावर विश्वास असल्याने त्याने त्यांची उपेक्षाच केली. राम रावणाचं युद्ध म्हणजे सत्य विरुद्ध असत्याचं असं धर्मयुद्ध असल्याने धर्माचा विजय व्हावा ही मनीषा बाळगून अनेक ऋषीमुनी हे युद्ध पाहण्यासाठी प्रत्यक्ष तेथे जमले होते. ह्या मुनीवरांची ज्ञानशक्ती, आत्मशक्ती, अनुभवाचे ज्ञान श्रीरामाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे ह्याचा रावणाला अंदाज आला नाही.

रामाच्या पाठीवर आश्वासक हात ठेवत अगस्ती म्हणाले, ‘‘ मी तुला ह्या दैदिप्यमान सूर्याचे स्तोत्र सांगतो. एकाग्र चित्ताने तू  ते तीनदा म्हण. त्याने तुझी चिंता दूर होईल.’’

----------------------------

कोणाला वाटेल, नुसत्या पाठीवर हात फिरवण्याने काय होणार? नुसत्या स्तोत्र पठणाने काय फरक पडणार? दिव्यात तेल असते वात असते पण त्या जोडीला तथे अग्नी चेतवणे अपेक्षित असते. त्यामुळेच दिवा उजळून निघतो. ते काम साधे वाटले तरी साधे नसते. अगस्ती ऋषींच्या शब्दांमुळे रामातल्या धगधगीत चैतन्यावर जमलेली दमलेपणाची राख क्षणार्धात दूर झाली. काम आपण सर्वजणच करतो. पण ते विशेष चांगल्या रीतीने केले की ते विकर्म (विशेष कर्म होते.) कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला म्हणजे ते कर्म निराळेच होते. हे म्हणजेच विकर्म. तेल वात ह्यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडतो. कर्माच्या जोडीला विकर्मता आली की प्रकाश पडतो. एखादा लाकडाचा ओंडका पेटवला की तो धगधगीत निखारा होतो. लाकूड आणि अग्नी ह्यात केवढा फरक. लाकडात अग्नि गुप्त असतो त्याप्रमाणे स्वधर्माचरणातील असीम सामर्थ्य असेच गुप्त असते. कर्मात विकर्म ओतले की कर्म दिव्य दिसू लागते. आई मुलाच्या पाठीवरून हात फिरवते. एक पाठ आणि त्यावरून वेडावाकडा एक हात फिरला. एक साधी क्रिया. परंतु त्या साध्या कर्माने त्या मायलेकरांच्या मनात ज्या भावना उचंबळल्या त्याचे कोण वर्णन करु शकेलइतक्या लांबीरुंदीच्या पाठीवरून अशा इतक्या वजनाचा एक गुळगुळीत हात फिरवताच आनंद निर्माण होतो असे समीकरण कोणी करु लागला तर ती थट्टा होईल. हात फिरवण्याची क्रिया जरी क्षुद्र असली तरी त्यात आईचे हृदय ओतलेले असते. ते विकर्म ओतलेले असते म्हणून तो अपूर्व आनंदउत्साह निर्माण होतो. अगस्तिंच्या प्रेमपूर्वक पाठीवर ठेवलेल्या हाताने तेच साध्य झाले. विनोबा म्हणतात कर्मात विकर्म ओतले की अकर्म तयार होते. म्हणजे निर्माण होणार्‍या प्रचंड उत्साहामुळे आपण काही काम करत आहोत ही जाणीवही नाहिशी होते. माणूस दमत नाही. कंटाळत नाही. श्रीरामाचे तसेच झाले. मनात एक अपूर्व उमेद तयार झाली. त्यांचा सर्व शीण नाहिसा झाला. रामाच्या पाठीवर ठेवलेल्या हातामुळे रामामधे अशी काही प्रेरक शक्ती तयार झाली की रामाकडे पाहताच दमलेली वानरसेनाही अपूर्व उत्साहाने परत एकदा लढायला तयार झाली.

 

सूर्य रात्रंदिवस काम करतच असतो. आपल्याला वाटते तो रात्री नसतो तरी पृथ्वीच्या दुसर्‍या गोलार्धाला प्रकाश देतच राहतो. पण त्याला विचारले तर तो म्हणेल की मी काहीच करत नाही. तो जरी काही कर्म करत नसला तरी त्याच्यात एक प्रचंड प्रेरक शक्ती भरून राहिलेली असते. तो दुनियेला सारी कामे करायला लावतो. त्याला पहाताच कोंबडा आरवतो. पाखरे किलबिल करायला लागतात. उडतात. माणसे आपापली कामे करतात. ज्याला असे अकर्म साधले तो लोकांना प्रचंड प्रेरणा देतो. अगस्तींच्या दमदार तपामधे स्वतःच्या कर्माला अकर्म करायची आणि सत्याला प्रेरणा द्यायची महान ताकद होती.

 

            ऋषी अगस्तींनी सांगितलेले हे प्रेरणादायी सूर्य स्तोत्र आजही तेवढेच प्रेरक आहेह्या सूर्यस्तोत्रात सूर्याची नावे म्हणजेच त्याचे अनेक गुण सांगणारी गुण विशेषणे आहेत. ते गुण आपल्यात बाणावेत असे प्रत्येकालाच वाटेल. रामाने श्रध्दायुक्त अंतःकरणाने ते स्तोत्र तिनदा म्हटले. जणु दीप पेटला होता. लाकूड अग्निरूप झाले होते. रामाने प्रचंड आत्मविश्वासाने रावणाच्या डोळ्यात बघत रावणाला ललकारले.

आत्मविश्वास प्रथम डोळ्यातून व्यक्त होतो. जिंकण्याची जिद्द नजरेतून प्रत्ययाला येते. सत्याच्या नजरेसमोर असत्याची नजर टिकू शकत नाही. तेथेच जय पराजयाचं पहिलं भाकित नक्की होतं. आणि घडतंही तसच!

 आणि मग प्रत्यक्ष सूर्यनारायणानीच सांगितलं, ``रामा, रावणाचा काळ जवळ आला आहे. आता त्वरा कर. ‘’ पुढच्याच क्षणी रामाचा बाण रावणाच्या शिराचा वेध घेऊन  गेला.

---------------------------------------------

श्लोक 1, 2 -


Image result for picture of lord Shri Ram and Agasti


ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्।

रावणं चाग्रतो दृष्ट्वा। युद्धाय समुपस्थितम्।।1

दैवतैश्च समागम्य । द्रष्टुमभ्यागतो रणम्

उपगम्यब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा।।2

 

सज्ज होऊन युद्धासी । लंकाधीश महाबळी

ललकारत युद्धाला । पातला तो रणांगणी ।।

नव्या ताज्या दमाच्या त्या । रावणा पाहुनी रणी

चिंताक्रांत बहू झाला । राम दाशरथी मनी ।।

अविश्रांत लढूनी तो । थकलेला उभा रणी

सैन्यही थकले आहे । पाहुनी काळजी करी ।।

त्याचवेळी तिथे आले । भगवान् अगस्ती ऋषी

घेऊनी आपुल्या संगे । देव आणि ऋषी मुनी ।।

पाहण्या राघवाचा त्या । पराक्रम रणांगणी

शस्त्रकौशल्यचि रामाचे । अस्त्रावरी प्रभुत्वही ।।

हाय काय परंतू तो । चिंतेने घेरला अती

थकलेला दिसे त्यांना । संग्रामी जानकीपती।।

पाहुनी दृश्य ते सारे। राघवा धीर देण्यासी

आले जवळ रामाच्या । मुनिश्रेष्ठ अगस्ती ही।।।1,2


राम राम महाबाहो श्रुणु गुह्यं सनातनम्।

येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे।।3

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्।

जयावहं जपेन्नित्यमक्षयं परमं शिवम्।।4

सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम्

चिन्ताशोकप्रशमनमायुर्वधनमुत्तमम्।।5

“शूर वीर गुणी रामा”। अगस्ती बोलले तया

“ तुझ्यासाठीच लोकांच्या। हृदि स्नेह अपार हा।।

बाळा मी सांगतो आता । स्तोत्र एकचि हे तुला

‘आदित्यहृदयम्’ नामे । गोपनीय असे पहा।।

स्तोत्र कल्याणकारी हे । सत्य शाश्वत नित्य हे

जपशील जरी त्यासी । विजयश्री तुझी असे।।

सर्व शत्रूगणांसी तू । चारशील रणी खडे

अभद्र शोक चिंता ना । अपमृत्यू कधी घडे।।

मांगल्य मंगलाचे  हे । पापराशी सदा मिटे

आयुष्य वाढवी वत्सा। स्तोत्र उत्तम हे असे” ।। 3,4,5

 Image result for free download photographs of sunrise

रश्मिमन्तं1 समुद्यन्तं2 देवासुरनमस्कृतम्3

पूजयस्व विवस्वन्तं4 भास्करं5 भुवनेश्वरम्6।।6

विवस्वत् (विशेषेण वस्ते आच्छादयति।) आपल्या प्रभेने आच्छादणारा

“सोनेरी किरणांची ज्या। प्रभा लाभे मनोहरी1

घेऊन भाग्य पृथ्वीचे । रोज ये उदयाचली2।।

पूजनीय असे जोची । देव दैत्यांस सर्वही3

तेजोमय प्रभेने हा । आच्छादे जग सर्वही4 ।।

तेजःपुंज असे5 स्वामी । सत्ता त्रिभुवनी करी6

अस्तित्त्व जगताचे ह्या । टिके ह्या सवित्यावरी ।।

“रश्मिमान1 समुद्यन्2 जो । देवासुर-नमस्कृता3

पूजी त्या भास्करा4 रामा। विवस्वान्5 भुवनेश्वरा6  ।।6



 Image result for free download photographs of sunrise


सर्वदेवात्मको7 ह्येष तेजस्वी8 रश्मिभावनः9

एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभि10।।7

( गभस्ति तेजाचा किरण, गभस्तिभिःकिरणांनी

“सर्व देव असे ह्याची। भास्कराचे स्वरूपची7

तेजस्वी किरणांनी8 हा । चालना देतसे जगी9।।7.1

प्रकाश किरणांनी हा । देव दैत्यांस तोषवी

प्रतिपाळ करी त्यांचा। सूर्यदेव सदा भुवी10।।7.2


एष ब्रह्मा11 च विष्णुश्च12 शिवः13 स्कंदः14 प्रजापतिः15

महेन्द्रो16 धनदः17 कालो18 यमः19 सोमो20 ह्यपांपतिः21।।8

हाची ब्रह्मा11 असे विष्णू12शिव13 स्कंद14 प्रजापती15

इंद्रांच्या समुदायाचा । मुख्य हाची महेन्द्र16 ही ।।

कोषाध्यक्षचि देवांचा । हाची कुबेर17 तो धनी  

अव्याहत पुढे जाई । असे तो काळ हा रवी ।।

साक्षात नियमांचे हा । रूप प्रत्यक्ष मूर्तसे

जीवांस घेउनी जाई । यमधर्मचि हा असे ।।

चंद्रमा नित जो पोशी । सार्‍या वनस्पतींस जो

तोही रूप असे ह्याचे । सोम सौम्य नभीच जो ।।

जीवांस जीववी जेची। जल जीवनदायिनी

जलाचा त्या असे स्वामी । हाची वरुणराज21 ही।।8


पितरो22 वसवः23 साध्या24ह्यश्विनौ25 मरुतो26 मनुः27

वायुः28 वह्निः29 प्रजाः प्राण31 ऋतुकर्ता32 प्रभाकरः33।।9

असे पूर्वज सार्‍यांचा22 । वसू आठहि हा असे23

जीवनी प्राप्त व्हावे जे । साध्य24 आदित्य एक हे ।। 9.1

देवांचे वैद्य जे सार्‍या । ते अश्विनी-कुमार25 हा

लपेटे वायु पृथ्वीला । वाय28 तोची रवीच हा ।। 9.2

उष्णतेनेच जन्मे जो । तोची पवन28 हा असे

मरुत् नामेच राहे हा । हृदी अनाहतामधे ।। 9.3

दिशा सांगे हिताची जे। उपकार करे जनी

तेची द्रष्टे मनू27 चौदा । तेजस्वी सवितारुपी ।। 9.4

स्फुलिंग हाचि अग्नीचे । अग्निदेव29 पवित्र हा

अग्नितत्त्वस्वरूपाने। जीववे जीवसृष्टिला ।। 9.5

भूतमात्रे प्रजा सारी । स्वामी त्यांचा रवी असे31

प्राण हा सर्व भूतांचे । आहे जीवन सृष्टिचे31 ।। 9.6

ऋतुचक्र मनोहारी । जे फिरे वसुधेवरी

कर्ता त्याचा असे  हाची । ऋतुकर्ता32 असे रवी ।। 9.7

कित्येक योजने दूरी । प्रभा ही पसरे नभी

तेजःपुंज33 असे हाची। प्रभाकर34 महारथी ।। 9.8


 


आदित्यः35 सविता35 सूर्यः36 खगः37 पूषा38 गभस्तिमान्39

सुवर्णसदृशो भानुः40 स्वर्णरेता41 दिवाकरः42।।10

अदिती-पुत्र आदित्य35 विश्वकर्ता सवितृ35 हा

सर्वव्यापी असे सूर्य36 । ओलांडे खग37 हा नभा।।10.1

जगता अन्न देवोनी। पूषा38 पोषीतसे जगा

उजळून जगा टाकी । प्रकाशाने गभस्तिमान39।।10.2

सोनेरी अंगकांतीचा। सोन्यासम झळाळता

भानू40स्वयंप्रकाशी हा। प्रकाशवी जगास ह्या।।10.3

निर्मिते बीज ब्रह्मांडा। बीज तेची असेचि हा।

स्वर्णरेता41 म्हणोनी हा । साकारी जगतास ह्या।।10.4

काळोख दूर सारोनी। प्रकाशवी दिशा दिशा

दिवाकर42 नभी येता । उजाडे दिन हा नवा।।10.5


हरिदश्वः43 सहस्रार्चिः44सप्तसप्ति45 र्मरीचिमान्46

तिमिरोन्मथनः47 शम्भु48स्त्वष्टा49 मार्तण्डकों50ऽशुमान्51।।11

समृद्धी अन्न-धान्याची । देई हर्यश्व43 पृथ्विला

हजारो किरणांचा हा । सहस्रार्चि44 च आगळा ।। 11.1

जातसे सात अश्वांच्या । सप्तसप्ती45 रथातुनी

तेजस्वी किरणांनी हा । मरीची46 शोभतो नभी ।। 11.2

तिमिरोन्मथना47ने ह्या । भेदावे तमजाल हे

तेजःपुंज प्रभेने ह्या । रोजचे कार्य त्या असे ।। 11.3

करे कल्याण शंभू48 हा । विश्वाचे ह्या निरंतरी

मोक्ष देईच भक्तांसी । त्वष्टा49 संहारि विश्वही ।। 11.4

स्वजीवनास शिंपुनी । देई जीवनदान हा

जीववी जीवसृष्टीला । मार्तंडक50 चि हा महा ।। 11. 5

पसारा किरणांचा हा । पिसार्‍यासम वागवी

येता जाता दिमाखाने । आकाशी अंशुमान51 ची ।। 11.6

 

हिरण्यगर्भः52 शिशिर53स्तपनो54 भास्करो55 रविः56

अग्निगर्भो57ऽदितेः पुत्रः58 शङ्खः59 शिशिरनाशनः60।।12

हिरण्यगर्भ52 हा ब्रह्मा । खजिना कांचनी महा

सुखवी जगता सार्‍या । हाची शिशिर53 मानसा।।12.1

देई ऊब जगा सार्‍या। उन्हे देतीच उष्णता

ग्रीष्मात पोळतो सार्‍या । जीवा तपन54 हा महा।।12.2

सर्वांहूनहि तेजस्वी  । आहे भास्कर55  थोर हा

स्तुतिपात्र रवी56 आहे । सर्वांना एकमेव हा।।12.3

मूर्तिमंत असे अग्नी । अग्निगर्भ57 प्रचंड हा

आनंदयात्रि हा शंख59 । आनंद देतसे जगा।।12.4

थंडीसी दूर सारोनी। देतसे ऊब उष्णता

अदिती-पुत्र58 हा मोठा। नित्य शिशिरनाशना60।।12.5


व्योमनाथ61स्तमोभेदी62 ऋग्यजुःसामपारगः63

घनावृष्टि 64रपां मित्रो65 विन्ध्यवीथीप्लवङ्गमः66।।13

हाचि सम्राट ह्या सार्‍या । गगनाचा असे पहा

व्योमनाथ61 तमोभेदी62 अंधारा नाशितो पुरा।।13.1

ऋग् यजु साम वेदांना। पार ह्याचा कळेचिना63

थोरवी ये न वर्णाया । जयाची निगमांस या।।13.2

निर्मितो मेघ आकाशी। वृष्टीही करितोचि हा64

जलचक्रचि निर्मूनी । करी जलनियोजना65।।13.3

विंध्यपर्वतरांगांचा । प्रशस्त पथ साजिरा

पूर्व-पश्चिम सांधूनी । तयार होतसेचि हा ।। 13.4

मार्गावरून त्या जाई । पूर्व-पश्चिम भास्कर

म्हणून म्हणती त्यासी । विन्ध्यावीथीप्लवंगम ।। 13.5


आतपी67 मण्डली68 मृत्युः69 पिङ्गलः70 सर्वतापनः71

कवि72र्विश्वो73 महातेजा74 रक्तः75सर्वभवोद्भवः76।।14

प्रचंड आतपी67ने ह्या । हाय हाय करे धरा

व्याकूळ जीवसृष्टी ही । उष्णतेने असहय ह्या ।।14.1

प्रकाश किरणांचा हा। तेजोगोल चि मंडली68

साक्षात मृत्यु69 रूपाने । नित्य वावरतो भुवी।।14.2

सोनेरी पिंगला70 हाची । तापवीत असे क्षिति71

कवी72 त्रिकालदर्शी हा । विस्तारे विश्वरूपची73।।14.3

प्रकाशे दिव्य तेजाने । महातेजा74 नभात हा

माणिकासम हा लाल । रक्तवर्णी75 दिसे प्रभा  ।।14.4

निर्मिण्या सर्व विश्वाला । सूर्य कारण एक हा

म्हणुनी वदती त्यासी । लोक सर्वभवोद्भवा76 ।।14.5


नक्षत्रग्रहताराणामधिपो77 विश्वभावन78

तेजसामपि तेजस्वी79 द्वादशात्मन्80 नमोऽस्तुते ।।15

नक्षत्र ग्रह तार्‍याचा । स्वामी श्रेष्ठचि एक हा77

रक्षिण्या जग हे सारे। कटिबद्ध असे पहा78।।15.1 

तेजस्वी तेजसांमध्ये। एक सूर्य असे महा79

जयासी देऊनी बारा । नावे गौरविले तया80।।15.2

विशेषणेच त्याची ही। वर्णिती गुण वैभवा

अशा ह्या सूर्य देवासी । नमस्कार असो सदा।।15.3


नमः पूर्वाय गिरये81 । पश्चिमायाद्रये नमः82

ज्योतिर्गणानां पतये83। दिनाधिपतये84 नमः।।16

नमस्कार असो माझा । पूर्वेच्या देवते तुला81

पश्चिमेच्याच देवा रे। वंदितो तुज मी सदा82।।16.1

स्वामी जो ग्रह तार्‍यांचा83। देवा त्या वंदितो तुला

दिवसाचा असे स्वामी । वंदितो त्या दिवाकरा84।।16.2



जयाय85 जयभद्राय86 हर्यश्वाय87 नमो नमः

नमो नमः सहस्रांशो88 आदित्याय89 नमो नमः।।17

जयाच्या विजयाचा हो । डंका वाजे सदा भुवी

कल्याणास्तव सर्वांच्या । ज्याचा विजय निश्चिती ।। 17.1

जयाला जयभद्राला । त्याची ह्या नमितोच मी

ऐश्वर्य वसुधेसी दे । हर्यश्वा नमितोच मी ।। 17.2

प्रभामंडल तेजस्वी । उधळी किरणप्रभा

सहस्रांशुस88 त्या आहे। प्रभाती नित वंदना।।17.3

अदिती जी असे माता । देवांचीच पवित्र त्या

अदिती पुत्र आदित्या89 । असो नमन हे तुला।।17.4



 Image result for free download photographs of sunrise


नम उग्राय90 वीराय91 सारङ्गाय92 नमो नमः

 नमः पद्मप्रबोधाय93 प्रचण्डाय94 नमोऽस्तु ते।।18

( सारङ्ग -रंगबिरंगी, वेगानी जाणारा )

अत्यंत उग्र90 तेजस्वी। प्रभा प्रखर फाकली

प्रचंड94 शक्तिशाली91 जो। वंदितो देव तोच मी।।18.1

प्रभावळ जया शोभे । सप्तरंगी सुरम्य ही

क्रमितो पथ जो  वेगे । सारंगा92 नमितो तुसी।।18.2

स्पर्शुनी किरणांनी जो। जागवी कमलां प्रति

पद्मप्रबोध93 देवासी । आदरे वंदितोच मी ।।18.3


Image result for free download photographs of sunrise Image result for free download images of  pond of lotus



ब्रह्मेशानाच्युतेशाय95 सूराय96आदित्य97वर्चसे98

भास्वते99 सर्वभक्षाय100 रौद्राय वपुषे101 नमः।।19

( वर्चस् प्रकाश,कांति,आभा । सूर - सूर्य, बुद्धिमान, विद्वान )

ब्रह्मा, विष्णू, शिवाचा जो । स्वामी एकचि ह्या जगी95

सत्ता चालेच सूर्याची । ब्रह्मांडावर सर्वही ।। 19.1

ब्रह्माण्ड नायका सूरा96सुर96 जो देवतासमा

 नमस्कार असो त्याची । सूरासीच पुन्हा पुन्हा ।। 19.2

तेजःपुंज असे वर्चस् । शक्तिशाली प्रतापवान्

भास्वता हाचि तेजस्वी । प्रकाशवी दहा दिशा ।। 19.3

अत्यंत रौद्र रूपाने । सर्वभक्षीच काळ हा

अदितीच्याच पुत्रा त्या । नमस्कार असो सदा ।। 19.4

Image result for free download photographs of sunrise 


तमोघ्नाय102 हिमघ्नाय103 शत्रुघ्नाया104मितात्मने105

कृतघ्नघ्नाय106 देवाय108 ज्योतिषां पतये107 नम:।।20

अंधारा दूर सारी जो । नष्ट अज्ञान जो करी102

शैत्य हारी उष्णतेने । हिमाचे राज्य जो हरी103।।20.1

निर्दाळी दुष्ट शत्रुंना104। विस्तारा याचि ना मिति105

अप्रमेय कळेना हा । गुणधर्म च व्याप्ति ही105।।20.2

निप्पात करितो जोची । कृतघ्नांचाच ह्या जगी106

नक्षत्र ग्रह तार्‍याचा । स्वामी हाचि असे नभी107।।20.3

ज्योतिर्विज्ञान सिद्धांता । हाच आधार मानिती107

अशा ह्या सूर्यदेवासी108 । भावे वंदन मी करी।।20.4


तप्तचामीकराभाय109 हरये110 विश्वकर्मणे111

नमस्तमोऽभिनिघ्नाय112 रुचये113 लोकसाक्षिणे114।।21

मुशीत घालिता सोने । तेजस्वी दिसते जसे

तप्त सोन्याप्रमाणे हा । तेजोगोल नभी दिसे109।।21.1

हरी अज्ञान जीवांचे । हरि110 हा ज्ञान देतसे

देई ना ठाव अंधारा । अज्ञाना ठाव ना उरे ।।21.2

विशाल विश्व हा सारे । विश्वकर्मा111रचीतसे

प्रकाश रूप जो राही113 । उजळी जगता पुरे112।।21.3

क्रिया ज्या घडती लोकी। साक्षी त्यासचि जो असे114

सूर्या त्रैलोक्यसाक्षी ह्या । वंदितो अति आदरे ।।21.4


 Image result for free download photographs of sunrise

नाशयत्येष वै भूतं115 । तदेव सृजति प्रभुः116

पायत्येष117 तपत्येष118 वर्षत्येष119 गभस्तिभिः।।22

पायति – शोषून घेणे, सुकवणे, कोरडे करणे मूळ क्रियापद/धातू पै (भ्वादि परस्मैपदी) )

जन्म घेती जगी प्राणी । नाश त्यांचा करी115 रवी

करे निर्माण सृष्टीसी । सूर्यदेव निरंतरी116।। 22.1

सांभाळी जीवसृष्टीला । प्रभु हा सर्वतोपरी

स्वामीच सर्व सृष्टीचा । चालवे जग सर्वही ।। 22.2

करुनी तप्त ही पृथ्वी । उष्णतेने स्वतःचिया

आटवी जलसाठ्यांसी । करे शुष्क धरेस ह्या ।। 22.3

फिरुनी नवमेघांसी । करे निर्माण सूर्य हा

भिजवी जलवर्षावे । वसुधेसचि हा पुन्हा ।। 22.4

किरणे फाकती त्याची। पिसार्‍यासम ही पहा

प्रभावानेच त्याच्या ह्या । घटना घडतीच ह्या ।। 22.5

शक्तिशाली गभस्तीला । नमस्कार असो सदा ।। 22.6


Image result for free download photographs of sunrise 

एष सुप्तेषु जागर्ति120 भूतेषु परिनिष्ठितः121

एष चैवाग्निहोत्रं122 च फलं चैवाग्निहोत्रिणाम्123।।23

(परिनिष्ठा – पूर्ण ज्ञान, पूर्ण परिचय, पूर्ण निष्पत्ति, चरम सीमा. परिनिष्ठित - पूर्ण कुशल, सुनिश्चित )

अग्नितत्त्वाचियारूपे । सर्व भूतात हा दिसे

झोपलेल्या शरीरीही । जागा नित्य दिसे दिसे120।।23.1

दक्ष राही कमालीचा । चालवी व्यवहार हे

प्रत्येक भूतमात्रांचे । काटेकोरपणे असे121 ।।23.2

टिकवी अग्नितत्त्वासी । अग्निहोत्रचि हा असे122

 फळही अग्निहोत्राचे123 । सूर्यनारायण असे।।23.3


देवाश्च124 क्रतवश्चैव125 क्रतूनां फलमेव च126

यानि कृत्यानि लोकेषु127 सर्वेषु परमप्रभुः128।।24

यज्ञांची देवता सार्‍या124। सविता एकची असे

यज्ञ सारे125, फळे त्यांची126 । सर्वकाही च   सूर्य हे।।24.1

क्रिया ज्या घडती लोकी। थांबती ना कधी कधी127

तयांचे फळ देण्यासी । समर्थ एकटा रवी128।।24.2



एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च

कीर्तयन्पुरुषः कश्चिन्नावसीदति राघव।।25

राघवा येतसे जेव्हा । विपत्ती, कष्ट,संकटे

कष्टसाध्य असो रामा। मार्ग दुर्गम तो पुढे।।25.1

भयाने ग्रासिले जेंव्हा । करावे काय ना कळे

अशावेळीच सूर्याची । स्तुति गाता फळ मिळे।।25.2

दुःख त्याचे पळे दूरी । उदासी ना उरे हृदि

उत्साहाचा घडे मोठा । लाभ त्यासी हितकरी”।।25.3



 Image result for free download photographs of sunrise

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम्
एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयष्यसि।।26

एकाग्र करुनी चित्ता रामा तू आठवी रवी
नियंता जगताचा हा शक्तिमान जगत्पति।।

जपुनीआदित्यहृदया तीनवेळाच अंतरी
राघवा पूजी आदित्या जगन्नाथास त्या हृदि।।

करशील असे तूची। राघवा सांगतो तुसी
वरेल विजयश्री ही निश्चयाने तुला युधी।।




अस्मिन्क्षणे महाबाहो रावणं त्वं जयिष्यसि
एवमुक्त्वा ततोऽगस्त्यो जगाम यथागतम्।।27

 ह्याक्षणी हे महाबाहो शक्य आहे तुलाचि हे
रावणा वधण्याचे हे स्वप्न सत्यात आणणे।।27.1

रामास बोलुनी ऐसे। अगस्ति ऋषि थोर ते
जसे आले तसे गेले क्षण एक थांबले।।27.2

Image result for free download images of  suryadev 


एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत् तदा।
धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्  ।।28

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्
त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्  ।।29

रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्।
सर्वयत्नेन महता वधे तस्य धृतोऽभवत्  ।।30

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः।
निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति  ।।31

ऐकुनी स्तोत्र हे सारे। अगस्तींच्या मुखातुनी
निमाला शोक रामाचा चिंता ही ना उरे मनी।।

केले ग्रहण स्तोत्रासी। प्रसन्न होऊनी मनी
देदिप्यमान सूर्यासी। भावे जोडुन अंजुली।।

तीन आचमने घेई। तीन वेळा जपे स्तुती
पाहुनी सूर्यदेवासी राम संतोषला मनी।।

पेलुनी आत्मविश्वासे धनु कोदंड ते भले
रावणाच्याच डोळ्यांसी डोळे त्याने भिडविले।।

उत्साह संचरे अंगी दृढसंकल्प तो दिसे
विजयाच्याच ईर्षेने। राम सरसावे पुढे ।।

संकल्प दृढ तो केला। रावणासी वधीन मी
आवेश थोर तो होता राघवाच्याच अंतरी।।

पाहुनी निश्चयासी त्या। प्रसन्न जाहले तयी
उभे होते समुही जे देवतांच्या मधे रवी।।

निशाचरास त्यावेळी। लंकाधीशास त्या बळी
महापापीच दैत्यासी। उन्मत्तासीच त्याक्षणी।।

काळ आला गिळायासी। रावणासीच पाहुनी
बोलले रामचंद्रासी सूर्यदेवचि त्याक्षणी।।

जाऊनी जवळ रामाच्या।रघुनंदन श्रीपती,
नुर्धरा महावीरा रामा आता त्वरा करी।। 28,29,30,31

इति श्री वाल्मीकीरामायणेऽगस्त्यप्रोक्तमादित्यहृदयस्तोत्रं सम्पूर्णम् ।
असे श्री वाल्मीकी रामायणातील अगस्ती ऋषींनी सांगितलेले आदित्य-हृदय स्तोत्र समाप्त झाले.

Image result for picture of lord Shri Ram and Agasti Image result for picture of lord Shri Ram and AgastiImage result for picture of lord Shri Ram and Agasti
---------------------



रथसप्तमी। 6 फेब्रुवारी 2014


2 comments: