वैराग्यपञ्चकम्

 

।। वैराग्यपञ्चकम् ।।

                      ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन गुणांची जोडी फार अलौकिक आहे. ज्ञानाच्या समुद्रात जेवढं खोल जावं तेवढा वैराग्याचा तळ स्पष्ट दिसायला लागतो. ज्ञान दाखवता येत नाही पण माणसाच्या प्रत्येक कृतीतून ते प्रकट होत राहते. ज्याप्रमाणे झाडाचा टवटवीतपणा पाहिला की झाडाची मुळे पाण्यापर्यंत पोचल्याची ग्वाही देतात; ज्याप्रमाणे फुलांनी बहरून आलेले वृक्षवेली वसंत आल्याची दवंडी देतात त्याप्रमाणे संसाराबद्दल प्रकट होणारी माणसाची अनासक्ती आणि वैराग्य पाहून त्याला ज्ञान झाले आहे हे वेगळे सांगायला लागत नाही.

ज्ञानाची तेजस्विता वैराग्यासोबत येणारी आगतिकता, केविलवाणेपणा, दैन्य आणि लाचारी पूर्ण जाळून टाकते. वैराग्याला लखलखित कान्ति प्राप्त करून देते. मग तो बैरागी मस्तक उंच करून सार्‍या जगाला खड्या स्वरात विचारतो, ``समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे?’’ जणु शिवाला शक्ति प्राप्त व्हावी त्याप्रमाणे तो मुनी समर्थ होतो. पैसा, खोटी प्रतिष्ठा ह्यामागे लागून स्वाभिमान, देशाभिमान, स्वत्त्व सार्‍याचा त्याग करणार्‍या विवेकशून्य माणसाला जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य विचारतात –

 

 (वृत्त - पृथ्वी , अक्षरे- 17, गण-   ग)

शिलं किमनलं भवेदनलमौदरं बाधितुं

पय: प्रसृतिपूरकं किमु धारकं सारसम्।

अयत्नमलमल्पकं पथि पटच्चरं कच्चरं

भजन्ति विबुधा मुधा अहह कुक्षित: कुक्षित:।।1


(शिलम् - शेतात कापणीनंतर खाली पडलेले धान्य वेचणे । प्रसृति: - ओंजळ,मुठभर। धारक: - जलपात्र, कर्जदार । कच्चर - दुष्ट,नीच,अधम। कुक्षि - पोट,।  मुधा- व्यर्थ, निष्प्रयोजन, निरर्थक। पट्टच्चरम् - चिंध्या,जुने फाटके कपडे) कुक्षितः कुक्षितः या दोन शब्दांवरचा श्लेष सर्वांना समजणार नाही असं वाटल्यावरून तो स्पष्ट करीत आहे. कुक्षि = पोट; कुक्षि + तस् प्रत्यय, कुक्षितः = पोटामुळे, पोटासाठी. दुसरा अर्थ - कु = पृथ्वी, क्षित् = राज्य करणारा, कुक्षितः हे द्वितीया बहुवचन,  भजति या क्रियापदाचे कर्म;)

 

6:11 PM (3 hours ago)


 

जरी कृषक कापणी करुन धान्य गोळा करी

तरीहि उरतीच जे कण तिथेचि ते वेचुनी

भरेल नच पोट का सहज  सेवुनी धान्य ते

शमेल नच काय तो जठर-अग्नि त्याच्यामुळे।।1.1

जरी सलिल ओंजळीभर मिळे तलावातले

तहान शमवू शके नचचि का तृषार्ताचि ते

मिळे जरि जुने-पुराण कपडे पथी टाकले

पुरे न पडती कसे तनुचि राखण्या लाज ते।।1.2

कळे न तरिही कसे अति हुशार विद्वानही

धनाढ्य नृपतीपदी विकति स्वाभिमानासही

उगा उदर-पूरणा बनुनि दीन लाचारची

पदी नृपतिच्या शिरे नमविती अरेरे किती।।1.3

 

                   श्रीमंतांची मर्जी सांभाळणे म्हणजे आळवावरच पाणी. कधी  आणि कुठल्या छोट्याशा कारणाने मर्जी खफा होईल हे सांगता येतं का? अशा श्रीमंतांनी माझ्यावर मेहेरनजर करावी म्हणून त्यांच्या दारी तिष्ठत उभं राहण्याची कृती अत्यंत लाचार आहे. मला ती मान्यच नाही. घनंजयाच्या रथाचं भूषण असलेला प्रत्यक्ष श्रीकृष्ण मला लाभलेला सम्पत्तीचा अनमोल ठेवा असतांना कुठल्यातरी विक्षिप्त,  तर्‍हेवाईक धनिकासमोर मी हात कशाला पसरू?

 कबीरही म्हणतात,

मन लागो मेरो यार फकिरी में।

जो सुख पावो रामभजनमें

वो सुख नाही अमिरी में ।।

         ह्या ईश्वराने मला चारी दिशांची जहागिरी बहाल केली असतांना राजे रजवाड्यांसमोर मी अगतिकतेने हात काय म्हणून पसरावा?

हाथ में खूंडी, बगल में सोटा

चारो दिशा जागिरी में।।

         अहो! ज्याने आपल्या भक्तासाठी त्याचं सारथी होणंही स्वीकारलं, तो गोविन्द हेच खरं शाश्वत धन आहे. त्या गोविन्दालाच मी शरण जाईन.



(वृत्त - उपेंद्रवज्रा, अक्षरे- 11, गण -ज  ग)

दुरीश्वरद्वारबहिर्वितर्दिकादुरासिकायै रचितोऽयमञ्जलि:

यदञ्जनाभं निरपायमस्ति नो धनञ्जयस्यन्दनभूषणं धनम्।।2

(दुरीश्वर – दुष्ट राजे ; वितर्दिका – घराच्या अंगणाच्या बाहेर बनवलेला ओटा किंवा व्हरांडा ; निरपाय – दुष्टता रहित, क्षयरहित, अनश्वर, अमोघ, अचूक )

खोळंबुनी तिष्ठत राहणे ते । मदांध त्या भूपतिच्याच द्वारी

सदा मनी आतुर भेटिसाठी। अशा कृतीसी ‘कर जोडले’ मी।।2.1

धनंजयाचा रथ भूषवी जे । असेचि जे शाश्वत ना  उणावे

कृष्णस्वरूपी धन लाभता हे । भरून पावे मन पूर्ण माझे।।2.2

 

              अहो, गर्भश्रीमंत, ऐश्वर्यसम्पन्न माणसाची पत्नी कोणाकडे भीक मागेल काय? ज्याचा स्वामी तिन्ही जगांचा जगजेठी आहे त्याच्या सेवकला  कशाची ददात पडेल काय? वनात फुललेली फुलं एकतर देवाच्या मस्तकी तरी चढतात नाहीतर रानातच सुकून जातात. मनस्वी माणूसही तसाच असतो. मी त्या ऐश्वर्यसम्पन्न जगन्नाथाचा सेवक आहे. एखादा फुटका काचेचा मणि मिळावा म्हणून कुठल्यातरी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या, धनाचा माज चढलेल्या नवश्रीमंतासमोर लाचारीने, दीनवाणेपणाने मी हातापाया पडावं हे कधी शक्य होईल काय? खरं सांगतो, ``जो सुख पावो रामभजन में। सो सुख नाही अमीरी में।।’’

              

 ( वृत्त -इंद्रवज्रा, अक्षरे - 11, गण - त ग )

काचाय नीचं कमनीयवाचा

मोचाफलस्वादमुचा याचे

दयाकुचेले धनदत्कुचेले

स्थितेऽकुचेले श्रितमाकुचेले।।3

(काचाय - काचेसाठी।  मोचाफल -  केळ।  कुचेल -  फाटके जुने कपडे)

भिक्षा मिळाया फुटक्या मण्याची

मी दैन्यवाणा अति बापुडाची

लाचारिने का पसरू करांसी

धनाढ्य गर्विष्ठ जनांसमोरी।।3.1

कशास गाऊ बहु गोडवे ते

केळासमा साखर पेरणीचे

ज्याच्या पुढे तुच्छ कुबेर वाटे

सिंधू दयेचा जणु थेंब भासे, ।।3.2

ऐसा जगन्नाथ मला मिळाला

लक्ष्मीपती पृथ्विपती मिळाला

चिंतामणी हा मज लाभता ची

मागू कशा भीक कुणापुढेही।।3.3

 

                 एका राजाच्या वैभवशाली राजसभेबाहेर एक अशक्त दरिद्री माणूस बसत असे. राजसभेत येणारे जाणारे त्याला जो काही पै पैसा देत त्यावर त्याचे उदरभरण होत असे. राजा रोज त्याच्या भव्य सिंहासनावर बसून त्याचे निरीक्षण करत असे. एकदा राजाने त्या माणसाला सभेत बोलवून सर्वांसमक्ष आपल्या औदार्याचे प्रदर्शन करत मोठ्या मानभावीपणे विचारले `` तुला काय हवे ते  मागून घे. मी ह्या नगरीचा प्रत्यक्ष राजा आहे. तू म्हणशील ते तुला देईन.’’ त्यावर हसून तो दरिद्री म्हणाला, ``राजा माझी अवस्था तर तू रोजच बघतो आहेस. ती पाहूनही मला काय पाहिजे हे तुला कळत नसेल तर तू राजा म्हणवून घ्यायला योग्य नाहीस. मी फुकट तुझ्यापुढे तोंड कशाला वेंगाडू?’’

                      ह्या असीम पृथ्वीच्या कोपर्‍यात कुठेतरी नखभर जागेचा ``मी राजा आहे राजा आहे’’ असा  स्वतःचा उदो उदो करून घेणार्‍या तथाकथित सम्राटापुढे कसल्या तरी क्षुद्र गोष्टींची भीक मागायची? छे छे त्यात धन्यता कुठली ?  असेल तर दीनताच आहे. दीनवत्सल दयार्द्र श्रीहरीचे तसे नाही. आपल्या लाडक्या सुदाम्याला त्याने काही मागायला लावून आणि मी काही देतो आहे असे दाखवून लाचार होऊ दिले नाही. जो सर्वशक्तिमान महायोगेश्वर कृष्णनाथाचा सेवक आहे, त्या कुठल्याही मानी  माणसाच्या तोंडातून `` अहो मला द्या’’ असे प्रार्थना करणारे लाचार शब्द येणार नाहीत. अशा शब्दांना मुखातून बाहेर पडायची थोडी जरी इच्छा झालीच तर त्या शब्दांना पाठीशी घालून मुखातून बाहेर जाण्यासाठी आधी प्राण पुढे येतील.

न क्वचिच्च बहिर्यान्ति मानिनां प्रार्थनागिरः ।

यदि निर्यातुमिच्छन्ति तदा प्राणपुरःसराः ।।

             

(वृत्त -शार्दूलविक्रीडित, अक्षरे- 19, गण-   ग)

क्षोणीकोणशतांशपालनखलद्दुर्वारगर्वानल-

क्षुभ्यत्क्षुद्रनरेन्द्रचाटुरचनां धन्यां मन्यामहे।

देवं सेवितुमेव निश्चिनुमहे योसौ दयालु: पुरा

धानामुष्टिमुचे कुचेलमुनये धत्ते स्म वित्तेशताम्।।4

 

पृथ्वीच्या तुकड्यावरीच कुठल्या कोठे न कोठेतरी

होता प्राप्तचि राज्य ते नखभरी पृथ्वीशतांशावरी

सत्तेने  मदमत्त ताठर  बने गर्विष्ठ जो भूपती

त्याचे गौरवगान व्यर्थ करणे ना धन्यता यातची।।4.1

 

अंगी वस्त्र नसे जयास नशिबी ऐशा सुदाम्यासही

            पोह्यांच्या बदल्यात त्या मुठभरी, प्रेमेचि आलिंगुनी           

देई वैभव सौख्य थोर जगिचे जोची कुबेरापरी

विश्वेशा झणि त्या धरीन हृदयी; निर्धार केला मनी।।4.2

 

                     धनिकाची चाकरी एखाद्या वानरीसारखी माणसाला धनिकाच्या मनाप्रमाणे  नाचायला लावते. धनिकाच्या इच्छेप्रमाणे वागता वागता जीवनही संपून जाते. प्रत्यक्ष शिवशंभूची सेवा करण्यासाठी त्या चंद्रमौलीच्या मस्तकावर विराजमान झालेल्या त्या शुभ्रभानू म्हणवून घेणार्‍या त्या चंद्राची अवस्था बघा ! क्षीण होत होत एका रेघेसारखा (सुलेखा) रूपात तो शिल्लक राहिला आहे.

                      बरे! ज्या धनाच्या हव्यासाने हा देहही पणाला लावावा त्या धनाची तरी काय शाश्वती? लक्ष्मी तरंगांसारखी चंचल आहे. आज आहे उद्या नाही. मग मी त्या धनासाठी  एवढी तडफड का करावी?

                      म्हणून मी जे कधीही माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही अशा श्रीरंगाच्या चरणी शरण जातो. ज्या मुकुंदाच्या चरणावर मन अर्पण केलं की सार्‍या काळज्यांचं ओझं तो कायम त्याच्या खांद्यावर वाहतो; ज्या गोवर्धनगिरीधारीने सार्‍या गोकुळाचं रक्षण केलं, जो त्याच्या भक्तांना त्याच्या दर्शनानेच  अपरिमित आनंद देतो ते मुकुंदधन मला लाभले आहे. अजून मला काही काही नको.

 

 (वृत्त -पृथ्वी, अक्षरे 17,  गण -ज  ग)

शरीरपतनावधिप्रभुनिषेवणापादना-

दविन्धनधनञ्जयप्रशमदं धनं दन्धनम्।

धनञ्जयविवर्धनं धनमुदूढगोवर्धनं

सुसाधनमबाधनं सुमनसां समाराधनम्।।5

(यति म्हणजे म्हणतांनाचा थोडासा विश्राम कळण्यासाठी ते अक्षर BOLD केले आहे )

करीत जरि चाकरी झिजविली तनू साजिरी

मिळे विभव सौख्यही तरिहि घेतसे प्राणही

नसेचि परि शाश्वती क्षणभरी धनाचीच या

तरंग लय पावती तशिच श्री असे चंचला।।5.1

 

रणी बनुन सारथी, सतत राहुनी पाठिशी

जयी घडविला धनंजय महान योद्धा भुवी

महेंद्र मनि ताठला; अतिव गर्व त्या जाहला

धडा शिकविला तया लवचि गर्व ना ठेवला।।5.2

 

करी सकल गोकुळा मुदित; देतसे आसरा

करांगुलिवरी धरी उचलुनीच गोर्वधना

सदा सुजन पूजिती चरण ज्या हरीचे हृदी

जयास नित वंदिती सकल देव अत्यादरी।।5.3

 

मिळे सहजि अर्पिता मनधनास जो सत्वरी

विकार नच पावतो नचचि पावतो नाश ही

असेचि मज लाभले धन महान माझ्या हृदी

मुकुंद धन ते खरे शरण मी तयाच्या पदी।।5.4

 

करून अनुवाद हा मजसि सौख्य झाले बहु

म्हणूनचि अरुंधती विनविते अती आदरू

सुजाण रसिका धरी क्षणभरी हृदी पञ्चका

सरून मन-दैन्य हे झणि समर्थ होसी नरा।।6

-      - - - - - - - - -- - - - - - - - - - - -

आषाढ आमावस्या दीपपूजा 6 ऑगस्ट2013

No comments:

Post a Comment