शक्रादिकृता देवीस्तुतिः (श्रीदुर्गासप्तशती,4)

Image result for pictures of mahishasura mardini

                               सर्व मनुष्यमात्रांमध्ये सर्व सद्गुण पुरेपुर भरलेले असतात. परंतु ते सुप्त रूपात असतात. पुढे येणार्‍या छोट्या मोठ्या प्रसंगास सामोरे जातांना प्रसंगोपात्त काही गुण प्रकर्षाने जागृत होतात. काही वेळा अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प साध्य करतांना अथवा महान संकटांना तोंड देतांना मात्र ह्या सर्व सद्गुणांची एकजूट होते. एकवटलेल्या ह्या गुणांमधून एक असीम निर्धार निर्माण होतो; आणि हाच निर्धार कुठल्याही परिस्थितीवर विजय मिळविण्याचे आत्मबल देऊन जातो. ही ताकद, ही शक्ती मग मानवीय न राहता एक दैवी शक्ती ह्या स्वरुपात काम करायला लागते. ध्येय, ध्यान, ध्याता, किंवा ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही त्रिपुटी एक होउन जाते. आणि मग संकट हे संकट उरतच नाही. बाधा बाधा उरतच नाहीत. मार्गातील संकट ही आव्हानं होतात. आणि आव्हानं ही आश्वासक संधीमधे बदलत जातात; आणि संधीचं रूपांतर कल्याणकारी गोष्टींच्या प्राप्तीने संपन्न होतं.
             महिषासुराबरोबर लढतांना सर्व देवांचा वारंवार पराभव होत असतांनाच सर्व देवांच्या पराक्रमातून, तेजातून एक प्रचंड ताकद, महान शक्ती प्रकट झाली; जिच्या नुसत्या हुंकारानेच महिषासुराचा निःपात झाला. त्याच आत्मबलास एका मूर्त स्वरूपात म्हणजेच महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपण पहात असलो तरी ही महिषासुर मर्दिनी ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्येकाच्या हृदयात विवेकरूपाने राहणारी सद्गुणांची ताकदच होय!


श्री गणेशाय नमः।

श्री गणेशाला वंदन असो

ऋषिरुवाच ॥1-

ऋषि म्हणाले ॥1-


(वृत्त- वसंततिलका,अक्षरे 14, गण- त भ ज ज ग ग, यति- पाद)

शक्रादयः सुरगणा निहतेऽतिवीर्ये । तस्मिन् दुरात्मनि सुरारिबले च देव्या।
तां तुष्टुवुः प्रणतिनम्रशिरोधरासां । वाग्भिः प्रहर्षपुलकोद्गमचारुदेहाः।।2

उन्मत्त दैत्य महिषासुर दुष्ट पापी  ।  सैन्यासहीत वधिता रणचंडिकेनी
पाहून अद्भुत पराक्रम अंबिकेचा  ।  झालेचि हर्षित मनी सुर श्रेष्ठ तेंव्हा।।2.1

त्यांचेच देह कमनीय विलोभनीय ।  रोमांचिता पुलकिता दिसती सुरेख
देवीपुढे झुकवुनी निज मस्तकांना ।  इंद्रादि देव सगळे करिती प्रशंसा।।2.2



देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या । निःशेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां । भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः।।3

’व्यापून विश्व सगळे निजशक्तिने जी ।  राहेचि ‘आत्मबल’रूप चराचरीही
सामर्थ्य तेज अवघ्या जणु देवतांचे ।  झाले जणू प्रकट ज्या जगदंबरूपे।।3.1

देवीस ज्या सुर मुनी नित वंदिताती।  कल्याण ती नित करो जगदंब मूर्ती
आम्ही सदा शरण माय तुला भवानी । पायी तुझ्याच प्रणिपात असो सदाची।।3.2



यस्याः प्रभावमतुलं भगवाननन्तो । ब्रह्मा हरश्च न हि वक्तुमलं बलं च।
सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय । नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु।।4

( परिपालन - चांगल्या प्रकारे सांभाळ,भरण, पोषण, संवर्धन )

सामर्थ्य अद्भुत जिचे बघुनीच होती ।  ते मंत्रमुग्ध सगळे सुरवृंद चित्ती
कोशात शब्द न मिळे स्तविण्या जिलाची । ब्रह्मा, महेश, हरिलाच सुयोग्य काही।।4.1

सांभाळ ती नित करो भुवनत्रयाचा। त्यांच्या करो भरण, पोषण, वर्धनाला
सार्‍या अमंगल भयप्रद भावनांचा । निःपात ती नित करो जगदंब आता।।4.2



या श्रीः स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मीः । पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः।
श्रद्धां सतां कुलजनप्रभवस्य लज्जा । तां त्वां नताः स्म परिपालय देवि विश्वम्।।5

( सुकृतिन् परोपकारी,सदाचारी,सद्गुणसंपन्न,पवित्रात्मा,धर्मात्मा,भाग्यशाली। श्री धन,दौलत,समृद्धि,सौभाग्य,ऐश्वर्य, गौरव,महिमा लक्ष्मी । कृतधी दूरदर्शी, विद्वान,बुद्धिमान, शिक्षित। )

देवी सदा वसतसे सुजनां घरी जी । ऐश्वर्य, भाग्य,धन दौलत, श्रीस्वरूपी
दारिद्र्य,दुःख बनुनी दुरितांसवे जी । देवी निरंतर वसे अति कष्टदायी।।5.1

विद्वान-चित्ति वसतेचि विवेकरूपी । श्रद्धा स्वरूप वसते नित संतचित्ती
लज्जा बनून वरते नित जी  कुलीना । पायी असो नमन त्या जगदंबिकेला।।5.2

माते करी भरण पोषण ह्या जगाचे । माते करी सतत रक्षण ह्या जगाचे।।5.3



किं वर्णयाम तव रूपमचिन्त्यमेतत् । किं चातिवीर्यमसुरक्षयकारि भूरि।
किं चाहवेषु चरितानि तवाति यानि । सर्वेषु देव्यसुरदेवगणादिकेषु।।6

( अचिन्त्य - समजण्याच्या पलिकडे, विचार कक्षेच्या बाहेर । आहव -  संग्राम, लढाई, युद्ध । )

बुद्धीस ना उलगडे तव रूप देवी । त्याचेचि वर्णन कसे करणेचि आम्ही
तू दुष्ट दैत्य वधिले अति दंभधारी । ऐसा पराक्रम तुझा न कळे कुणासी।।6.1

युद्धात जे प्रकटले तव शौर्य अंगी। सार्‍याचि देवगण वा असुरां समोरी
अत्यंत अद्भुत पराक्रम हा तुझाची । त्याचेचि वर्णन कसे करणेचि आम्ही।।6.2

Image result for pictures of mahishasura mardini

हेतुः समस्तजगतां त्रिगुणापि दोषैर्न ज्ञायसे हरिहरादिभिरप्यपारा।
सर्वाश्रियाखिलमिदं जगदंशभूतमव्याकृता हि परमा प्रकृतिस्त्वमाद्या।।7

तू माय कारण असे जग निर्मितीचे । सामावले तुजमधे त्रिगुणादि सारे
ह्या सत्व, राजस, तमोगुण आश्रयाने । लागे न दोष तुजला लवमात्र तो गे।।7.1

माते स्वरूप तव हे न कळे कुणासी  । जाणे न विष्णु भगवान महेश्वरादि
आधार तूचि जगता; तव आश्रयाने, चाले चराचरचि हे सुरळीत सारे।।7.2

हे विश्व अंश तव गे जगदंबिके हे । माते अविकृत पराप्रकृती च तू गे।।7.3



यस्याः समस्तसुरता समुदीरणेन । तृप्तिं प्रयाति सकलेषु मखेषु देवि।
स्वाहासि वै पितृगणस्य च तृप्तिहेतुरुच्चार्यसे त्वमत एव जनैः स्वधा च।।8

उच्चारिता विमल नाम तुझेच यज्ञी । हे तोषतीच सगळे सुरवृंद यज्ञी
तृप्ती मिळे तुजमुळे नित देवतांना ।  ह्या कारणेचि तुजला म्हणतीच स्वाहा।।8.1

तृप्ती मिळे तुजमुळे पितरांस यज्ञी । देवी!, स्वधा म्हणति गे म्हणुनी तुलाची।।8.2



या मुक्तिहेतुरविचिन्त्यमहाव्रताच । अभ्यास्यसे सुनियतेन्द्रियतत्त्वसारैः।
मोक्षार्थिभिर्मुनिभिरस्तसमस्तदोषैर्विद्याऽसि सा भगवती परमा हि देवी।।9

( महाव्रतिन् -  अत्यंत धर्मनिष्ठ, महान धर्मकृत्य पालक । प्राणैरपि हितावृत्तिरद्रोहो व्याजवर्जनम् , 
आत्मनीवप्रियाधानमेतन्मैत्रीमहाव्रतम्। )

तू माय, साधन असे मिळण्यास मुक्ती । तू धर्म पालन करी नियमानुसारी
हेची महाव्रत तुझे नित आचरीसी। ‘आज्ञा प्रमाण म्हणती’ तव इंद्रिये ही।।9.1

ते ब्रह्मतत्त्व हृदयी तव नित्य राहे । ना दोष एकहि तुला चिकटे कधी गे
सारे मुमुक्षु भजती तुज चंडिके हे।  ‘विद्या परा प्रकृति’ तू जगदंबिके हे।।9.2



शब्दात्मिका सुविमलर्ग्यजुषां निधानमुद्गीथरम्यपदपाठवतां च साम्नाम्
देवी त्रयी भगवती भवभावनाय । वार्ता च सर्वजगतां परमार्तिहन्त्री।।10

तू शब्दरूप जननी अति निर्मलाचे। ऋग्वेद, साम, यजुसी दृढ स्थैर्य देसी
ठेवूनि रूप जननी तव मध्यवर्ती । हा सामवेद अति सुस्वर जन्म घेई।।10.1

निर्माण तूचि करिसी जग हेचि सारे । सांभाळ ही करिसि तू अति प्रेम भावे
आहेस माय धरणी, उपजीविका तू। अन्नस्वरूप प्रकटे धरणीतुनी तू ।।10.2

तू दैन्य दुःख हरसी जननी सदा गे। देशी सुखे सकल जीवजगास तू गे।। 10.3



मेधासि देवि विदिताखिलशास्त्रसारा । दुर्गाऽसि दुर्गभवसागरनौरसङ्गा।
श्रीः कैटभारिहृदयैककृताधिवासा । गौरि त्वमेव शशिमौलिकृतप्रतिष्ठा।।11

शास्त्रांमधील अति गर्भित अर्थ दावी । मेधा विचक्षण अशी असशीच तू ती
संसार-बंध-विरहीत ‘असंग-रूपी’ । नौकाचि तूच, भवसागर पार नेसी।।11.1

जो कैटभास वधुनी करि मुक्त पृथ्वी । त्याची मुकुंद-हृदयी कमलाच तूची
सन्मानपूर्वक जिला शिव हा स्विकारी । गौरीच तू असशि त्या शशिशेखराची।।11.2



ईषत्सहासममलं परिपूर्णचन्द्रबिम्बानुकारिकनकोत्तमकान्तिकान्तम्।
अत्यद्भुतं प्रहृतमाप्तरुषा तथापि । वक्त्रं विलोक्य सहसा महिषासुरेण।।12

शोभेचि मंदस्मित लोभस हे तुझेची । चंद्रासमा मुख तुझे सुखवी जगासी।
कोपे कसा नच कळे बघुनी तयासी। उन्मत्त दुष्ट महिषासुर दैत्य पापी।।12.1

कैसा प्रहार करण्या धजलाच तोची । पाहूनही वदन र्निमळ हे तुझेची
ही गोष्ट अद्भुत गमे न पटे मनासी ।  त्याहून अद्भुत परी पुढची कहाणी।।12.2



दृष्ट्वा तु देवि कुपितं भृकुटीकरालमुद्यच्छशाङ्कसदृशच्छवि यन्न सद्यः
प्राणान् मुमोच महिषस्तदतीव चित्रं कैर्जीव्यते हि कुपितान्तकदर्शनेन।।13

अत्यंत क्रोधवश हे मुख लाल होता। बिंबाकृती शशिसमा उदयाचलीच्या
क्रोधे तुझी चढविता भुवईच तू ही । कैसा न दुष्ट महिषासुर प्राण त्यागी।।13.1

जेंव्हा कृतांत अति क्रोधित ये समोरी। राहील का कधि जिवंतचि जीव कोणी।।13.2

Image result for pictures of mahishasura mardini

देवि प्रसीद परमाभवती भवाय । सद्यो विनाशयसि कोपवती कुलानि
विज्ञातमेतदधुनैव यदस्तमेतन्नीतं बलं सुविपुलं महिषासुरस्य।।14

झालेचि ज्ञात मजला परि  हेचि माते । येतेचि विश्व उदया तव सुप्रसादे
होतो विनाश सहजी तुज क्रोध येता । कित्येक दुष्ट अपवित्र कुळा कुळांचा।।14.1

होता बलाढ्य महिषासुर तो जरी गे । सामर्थ्य-सैन्य-बलहीन तयास केले।।14.2



ते सम्मता जनपदेषु धनानि तेषां । तेषां यशांसि न च सीदति धर्मवर्गः
धन्यास्तएव निभृतात्मजभृत्यदारा । येषां सदाभ्युदयदा भवती प्रसन्ना।।15

आरूढ भाग्यशिखरी जन तेचि होती। राही कृपा नित जयांवर गे तुझी ही
सन्मान उच्च यश त्या मिळतेच लक्ष्मी । ना तो स्वधर्म विसरे नच खंड पाडी।।15.1

तो पुत्र,पत्नि,ऋजु सेवक,मित्र युक्ता। भोगे अबाधित सुखे नच ओहटि त्या।।15.2



धर्म्याणि देवि सकलानि सदैव कर्माण्यत्यादृत प्रतिदिनं सुकृती करोति।
स्वर्गं प्रयाति च ततो भवतीप्रसादाल्लोकत्रयेऽपि फलदा ननु देवि तेन।।16

तू धैर्य देसि सुभगे नित सज्जनांना । धर्मानुसार करण्या निज वर्तनाला
ऐसेचि प्राप्त करुनी बहु पुण्य जन्मी। जाती सुखे जनचि ते नित स्वर्ग लोकी।।16.1

लोकी तिन्ही तव दया सकलांवरी ही । माते करी सकल पूर्ति मनोरथांची।।16.2



दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः । स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
दारिद्य्रदुःखभयहारिणि का त्वदन्या । सर्वोपकारकरणाय सदार्द्र चित्ता।।17

केले जरी स्मरण गे तव एकवेळा । हे सर्व जीव करिसी भय-दुःख-मुक्ता
होतीच स्वस्थ तव चिंतन जे करोनी। त्यांना अतीव शुभ बुद्धिहि तूच देसी।।17.1

दारिद्य्र दुःख भय दूर करोनि सारे । विश्वावरीच करण्या उपकार सारे
नाही कुणी तळमळे तुजवीण माते । नाही दयार्द्र कुणिही तुजवाचुनी गे।।17.2



एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते । कुर्वन्तु  नाम नरकाय चिराय पापम्।
संग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु । मत्वेति नूनमहितान्विनिहंसि देवी।।18

व्हावे चि मुक्त जग दैत्य-छळातुनी ह्या । लाभो चिरंतन सुखे जगतास पूर्णा
ऐसे जरी तुज गमे जगदंबिके हे । दुष्टांस ना विसरते करुणा तुझी गे।।18.1

पापे कितीकचि करो जरि दैत्य मोठी । चित्ती धरून जरि आसहि रौरवाची
त्यांना रणी वधितसे धरुनीच हेतू । त्याचे घडो मरणही जणु स्वर्गसेतू।।18.2



दृष्ट्वैव  किं न भवती प्रकरोति भस्म । सर्वासुरानरिषु यत्प्रहिणोषि शस्त्रम्।
लोकान्प्रयान्तु रिपवोऽपि हि शस्त्रपूता । इत्थं मतिर्भवति तेष्वहितेषु साध्वी।।19

हे माय सांग मजसी तव दृष्टिक्षेपे । तू भस्म का न करिसी खल दैत्य सारे ?
‘होवो पवित्र सगळे मम शस्त्र स्पर्शे । लाभो तयांस अति उत्तम लोक सारे’।।19.1

ऐसे विचार अति उत्तम हे तुझेची । कारुण्यमूर्ति तुजला अति शोभताती।।19.2



खड्गप्रभानिकरविस्फुरणैस्तथोग्रैः । शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणाम्।
यन्नागता विलयमंशुमदिन्दुखण्डयोग्याननं तव विलोकयतां तदेतत्।।20

सूर्यासमान तळपे तव खड्ग माते । जाई त्रिशूळ तव हा उजळून तेजे
ऐसे भयावह असे जरि तेज त्यांचे । त्याने न दैत्यगण हेचि दिपून गेले।।20.1

चंद्रासमान तव शीतल ह्या मुखाचे। पाहून तेज सगळे खल स्तब्ध झाले।।20.2

Image result for pictures of mahishasura mardini

दुर्वृत्तवृत्तशमनं तव देवि शीलं । रूपं तथैतदविचिन्त्यमतुल्यमन्यैः।
वीर्यं च हन्तृहृतदेवपराक्रमाणां । वैरिष्वपि प्रकटितैव दया त्वयेत्थम्।।21


तू दुष्टभाव हरसी खल दुर्जनांचे। देवी तुझ्या सुखद शीतल सुस्वभावे
कोणासवे न तुलना करताचि येते। आहे विलक्षण असे तव रूप माते ।।21.1

हे अद्वितीय तव रूप कसे कळावे । जाणून त्यास हृदयात कसेचि घ्यावे
देवी अतुल्य तव साहस शक्तिने गे । नाशी रणी असुर कर्दनकाळ मोठे।।21.2

ज्या राक्षसांस  बघुनी अति क्रूरकर्मा। गेला पराक्रम लया सुर देवतांचा
वैर्‍यांसमोर असल्या अति पापकर्मा ।  माते क्षमा प्रकटली हृदयी तुझ्या गा।।21.3



केनोपमा भवतु तेऽस्य पराक्रमस्य । रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र
चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा । त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि।।22

कैसीच होय तुलना तव साहसाची। आहे तुझ्यासमचि एकचि तू भवानी
अत्यंत लोभस तुझा मुखचंद्रमा हा । कापे परी असुर हे बघुनीच त्याला।।22.1

आहे तुझे हृदय कोमल हे दयाळू । कर्तव्यनिष्ठुर परी समरांगणी तू
सार्‍याचि या त्रिभुवनी न दिसे कुणाला । ऐसा विरोध हृदयी इतुका कुणाच्या।।22.2



त्रैलोक्यमेतदखिलं रिपुनाशनेन । त्रातं त्वयासमरमूर्धनि तेऽपि हत्वा।
नीता दिवं रिपुगणा भयमप्यपास्त-मस्माकमुन्मदसुरारिभवं नमस्ते।।23

माते रणीच वधिले खल दुष्ट सारे। त्रैलोक्य हे सकलची भयमुक्त केले
तू स्वर्ग द्वार उघडी खल दुर्जनांसी। माते तुलाचि नमितो अतिआदरे मी।।23



शूलेन  पाहि नो देवि पाहि खड्गेन चाम्बिके।
घण्टास्वनेन नः पाहि च्यापज्यानिःस्वनेन च।।24

रक्षावे देवि आम्हासी । कृपावंतचि होऊनी
 शूळ,खड्ग धनुष्याने। घण्टेचा करुनि ध्वनी
टंकार करुनिया मोठा । धनु-रज्जूच ओढुनी।।24



प्राच्यां रक्ष प्रतीच्यां च चण्डिके रक्ष दक्षिणे।
भ्रामणेनात्मशूलस्य चोत्तरस्यां तथैश्वरि।।25

संरक्षण करी देवी। पूर्व,पश्चिम बाजुनी
तारी दक्षिण बाजूनी । राखी उत्तर बाजुनी।।25.1

चक्राकार त्रिशूळासी । सवेग फिरवी करी
रक्षावे हे महा देवी । आम्हासी सर्वबाजुनी।।25.2



सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते।
यानि चात्यन्तघोराणि तै रक्षास्मांस्तथा भुवम्।।26

त्रैलोक्यात असे जी जी। सौम्य सौम्य रूपे तुझी
त्या त्या रूपात रक्षावे। आम्हासी भुवनेश्वरी।।26.1

आहेत घोर जी रूपे । उग्र घोर भयंकरी
ती तुझी सर्व रूपेही। करो रक्षण सत्वरी।।26.2




खड्गशूलगदादीनि यानि चास्त्राणि तेऽम्बिके
करपल्लवसङ्गीनि तैरस्मान् रक्ष सर्वतः।।27

 नित्य सज्ज असे देवी । शस्त्रास्त्रे धरुनी करी
खड्ग, शूळ, गदा, आदि। शोभे ह्या कोमला करी
त्या तुझ्या अस्त्र शस्त्रांनी । आम्हासी रक्षिणे भुवी '' ।।27


ऋषिरुवाच॥28

ऋषि म्हणाले ॥28-

एवं स्तुता सुरैर्दिव्यैः कुसुमैर्नंदनोद्भवैः।
 अर्चिता जगतां धात्री तथा गंधानुलेपनैः।।29

 अशा प्रकारे देवांनी । प्रशंसा करीता मुखी
उटि सुगंधी लावोनी । मातेसी चंदनादिची।।29.1

सुगंधी पुष्पे स्वर्गीची। देवेंद्राच्या वनातली
वाहिली पायी मातेच्या । विधिवत् तिज पूजुनी।।29.2



भक्त्या समस्तैस्त्रिदशैर्दिव्यैर्धूपैः सुधूपिता।
प्राह प्रसादसुमुखी समस्तान्प्रणतान्सुरान्।।30

अत्यंत भक्तिभावाने। धूपदीपादि लावुनी
अभिवादन मातेसी । करिता सुरश्रेष्ठची
प्रसन्न होऊनी बोले । जगाची जननीच ही।।30


देव्युवाच॥31-

देवी म्हणाली॥31-

व्रियतां त्रिदशाः सर्वे यदस्मत्तोऽभिवाञ्छितम्।।32

“बोला हे सर्व देवांनो। कामना काय ती मनी” ॥32


देवा ऊचुः॥33 -

देव म्हणाले॥33 -


भगवत्या कृतं सर्वं न किञ्चिदवशिष्यते।
यदयं निहतः शत्रुरस्माकं महिषासुरः।।34

“इच्छिलेले पुरे केले । कार्य सर्व तू अंबिके
अपूर्ण काही ना राहे । कार्य अर्ध्यात जे सुटे।।34.1

महिषासुर दैत्यासी। मारुनी समरांगणी
मुक्त केलेस आम्हासी । माते तू संकटातुनी”।।34.2

Image result for images of goddess

यदि  चापि वरो देयत्स्वयाऽस्माकं महेश्वरि
संस्मृताऽसंस्मृता त्वं नो हिंसेथाः परमापदः।।35

“तरिही तुजला वाटे। वर द्यावा असे जरी
तरी हे मागणे देवी।  आहे एक तुझ्या पदी।।35.1

वारंवार तुला यावा । माते  आठव आमुचा
येतील संकटे जेंव्हा । नाश त्यांचा करी तदा।।35.2

मृत्यूचे नच वाटावे । भय आम्हासी अंबिके
भयात भय हे मोठे । खोटे त्यासीच तू करे”।।35.3



यश्च मर्त्यः स्तवैरेभिस्त्वां स्तोष्यत्यमलानने।
तस्य वित्तर्द्धिविभवैर्धनदारादिसंपदाम्।।36

वृद्धयेऽस्मत्प्रसन्ना त्वं भवेथाः सर्वदाम्बिके।।37

“जे जीव मर्त्यलोकीचे । स्तोत्र गाऊन हे तुझे
प्रसन्न वदने देवी। प्रशंसा करती तुझी।।
ऐश्वर्य त्यांस द्यावे गे । विवेकधन ही तसे
गुणी पत्नी, तया द्यावी। संपत्ती धन सर्व गे”।।36,37

Image result for pictures of mahishasura mardini



ऋषिरूवाच॥38 -

मुनिवर म्हणाले॥38 -

इति प्रसादिता देवैर्जगतोऽर्थे तथात्मनः।
तथैत्युक्त्वा भद्रकाली बभूवांतर्हिता नृप।।39

हे राजा! भद्रकालीची । देवांनी करिता स्तुती
अशाप्रकारे विश्वाच्या । देवांच्या मदतीस ही॥--
संतोषली भद्रकाली । प्रसन्न बहु जाहली
‘घडावे वाटते जे जे । ते ते होईल पूर्णची’।।
आश्वासन दिले ऐसे । देवांना वर देऊनी
अदृष्य जाहली देवी । भद्रकालीच नंतरी ॥39


इत्येत्कथितं  भूप संभूता सा यथा पुरा।
देवी देवशरीरेभ्यो जगत्त्रयहितैषिणी।।40

कथिली तुजला राजा ।  गोष्ट प्राचीन मी खरी
देवांच्या शरिरातूनी । देवी ही प्रकटे कशी
त्रैलोक्याच्या हितासाठी । चंडिकारूप धारिणी॥40



पुनश्च गौरीदेहात्सा समुद्भूता यथाऽभवत्।
वधाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयोः।।41
रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी।
तच्छृणुष्व मयाख्यातं यथावत्कथयामि ते।।42



प्रकटली पुन्हा कैसी । गौरीदेहातुनीच ती
वधिण्या दुष्ट दैत्यांसी । तैसे शुंभनिशुंभ ही॥41--

त्रैलोक्याच्या रक्षणासी । सहाय्यास सुरांसही
कथा ही घडली जैसी । तैसी कथियली च मी
ऐकावी लक्ष देवोनी । भूपती ती कथा तुम्ही।।42

र्‍हीम् ॐ।।

इति शक्रादिकृता देवीस्तुतिः संपूर्णा।।

अशी इंद्रादि देवांनी केलेली देवीची स्तुती पूर्ण झाली.

अरुंधतीने केलेला शक्रादिकृता देवीस्तुतिः चा अनुवाद सम्पन्न झाला


ॐ तत् सत्

--------------------------------------------------------------- Image result for pictures of mahishasura mardini

भाद्रपद कृष्ण अष्टमी /27सप्टेंबर,2013



No comments:

Post a Comment