काकोलूकीयम्

॥ काकोलूकीयम् ॥

1

            माझ्या बालमित्रांनो, खूप खूप वर्षांपूर्वी विष्णुशर्मा नावाचे थोर ऋषि होऊन गेले. त्यांनी `पंचतंत्र' या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केली. त्याच पंचतंत्रातील `काकोलूकीयम् ' ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. काक म्हणजे कावळे आणि उलूक म्हणजे घुबड. अशी ही काक आणि उलूकांची गोष्ट म्हणजे पंचतंत्रातील तिसरं तंत्र काकोलूकीयम् . कुत्रा आणि मांजर किंवा मुंगूस आणि साप हे प्राणी जसे एकमेकांचे जन्मजात शत्रू आहेत त्याच प्रमाणे कावळे आणि घुबड या पक्ष्यांमध्येही फार पूर्वीपासून हाडवैर आहे. त्याचीच ही कथा. ह्या कथेची सुरवात एका श्लोकानेच होते.

होताची शत्रू परि मित्र झाला । विश्वास त्याचा कधि ना धरावा
पहा मुलांनो घुबडांसवे ही । जाळी गुहा काक कुटीलतेनी

                    मुलांनो जो एकेकाळी आपला कट्टर शत्रू होता असा माणूस अचानक आपल्यासोबत मैत्री करण्यासाठी पुढे आला तर त्याच्यावर कधीही विश्वास ठेऊ नये. कारण कावळे आणि घुबड यांच्यात हाडवैर असतांनाही एका कावळ्यावर विश्वास ठेवल्याने  घुबडांची कशी वाताहात झाली  ते ह्या गोष्टीत आपण पाहू.
  दक्षिण भारतात चेन्नाई-शहराजवळ एक महिलारोप्य नावाचं गावं होतं.  त्या गावाच्या वेशीबाहेरच एक खूप खूप मोठ्ठ वडाचं झाड होतं. त्याला अनेक फांद्या होत्या. फांद्यांवर अगणित पाने होती. असंख्य लांब लांब पारंब्यांनी तर ते झाड, दाढी वाढलेल्या, तपश्चर्येला बसलेल्या एखाद्या तपस्वी ऋषिमुनीसारखं दिसे. विपुल अशा लाल लाल फळांनी ते झाड बहरून गेलेलं असे. ती फळं खाण्यासाठी त्या झाडावर कावळ्यांची पुष्कळ  गर्दी होई. बघता बघता कावळयांनी त्याच झाडावर खूप घरटी बांधली. त्या झाडावर कावळ्यांचं एक गावच वसलं. मेघवर्ण हा त्या कावळ्यांचा राजा होता.
              तेथून जवळच असलेल्या डोंगरगुहांमधे घुबडांची मोठी वसाहत होती. घुबड रात्री वावरणारा शिकारी पक्षी तर कावळा दिवसा उडणारा. रोज रात्री कावळे झोपी गेले की घुबडांचा राजा `अरिमर्दन' कावळ्यांची वस्ती असलेल्या झाडाभोवती आपल्या सैन्यासह छापे टाकत असे. झोपलेल्या बेसावध कावळयांची शिकार करत असे. बघता बघता कावळ्यांची संख्या रोडावत चालली. कावळ्यांचा राजा मेघवर्ण विचारात पडला. तो विचार करू लागला,  - ``काय करावे बरे?''

व्याधी असो शत्रु असो लहान । दुर्लक्षिता त्या बनतो महान
कायाच होई अति क्षीण रोगे । शत्रूमुळे राज्यहि कोसळे ते॥

व्याधी असो शत्रु असो नवीन । त्वरीत त्यासी करणे उपाय
बलाढ्य राज्ये मिळती धुळीस । रोगी मरे, ना करिता उपाय॥

               रोग असो वा शत्रू! वेळच्या वेळी काळजी घ्यायलाच पाहिजे. एखादा दुर्धर रोग झालेला माणूसही वेळच्यावेळी औषध घेऊन आणि पथ्य पाळून बरा होऊ शकतो.  पण एखादा बलवान माणूसही साध्या आजाराकडे दुर्लक्ष करू लागला तर तो रोग हळूहळू त्याच्या शरीराला पोखरत त्याच्या मृत्यूचे कारणही होऊ शकतो. त्याचप्रमाणे शत्रू छोटासा असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. नाहीतर तो बलाढ्य राज्यही बघता बघता गिळंकृत करतो.''
                   असा विचार करून, दुस र्‍याच दिवशी राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना आणि सचिवांना बोलावून एक सभा घेतली. राजा म्हणाला - `` मित्रांनो आपला शत्रू फार भयंकर आहेच, पण हुशार आणि चलाखही आहे. आपल्या न कळत तो शीघ्रगतीने येतो. रात्रीच्या अंधारात आपल्याला दिसत नाही हे जाणून, तो आपल्यावर रात्रीच हल्ले करतो. आपल्याला त्याची चाहूल लागे लागेपर्यंत पसारही होतो. आपल्याला मात्र त्याची काहीच माहिती मिळत नाही. आता आपण काय उपाय करणे उचित आहे हे सर्वांनी विचार करून मला लवकरात लवकर सांगावे. ''
              मेघवर्णाचे पाच मंत्री होते. उज्जीवी, संजीवी, अनुजीवी, प्रजीवी आणि चिरंजीवी. सारे मंत्री राजाला वंदन करून म्हणाले,  ``राजन्, महाराजांनी सभा घेऊन आम्हाला हे विचारलं हे योग्यच आहे. कारण,-

नाही विचारे अथवा विचारे । सल्ला जरी मंत्रिगणांस भूप
कर्तव्य आहे परि सेवकांचे । राजास द्यावे मत योग्य तेच॥

सांगे न जो शब्द कधी हिताचे। सार्‍या प्रजेचे हित साधणारे
        मंत्री असे तो जरि गोडबोल्या । साक्षात शत्रू घरभेदि जाणा॥

मंत्र्यांनी सदोदित सजग राहून, सर्व होणा र्‍या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन राजाला सल्ला देणे हे मंत्र्यांचे कर्तव्यच आहे. ते त्यांनी योग्य प्रकारे केले नाही तर ते कितीही गोड बोलणारे असले तरी राजाचे आणि राज्याचे शत्रूच समजावे. जरी राजाने सल्ला विचारला नसेल तरी त्याच्या मंत्र्यांनी त्याला सल्ला देणं हे फार आवश्यक आहे. आणि सल्ला विचारल्यावर तर योग्य सल्ला देणं हे मंत्र्याचे कर्तव्यच आहे.   हे राजन्, एकांतात मंत्र्यांबरोबर चर्चा करून ह्या आपत्तीतून आपण कसे बाहेर पडू ह्याचा योग्य  निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.''
क्रमशः 
------------------------------------------
                        
2

              माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला आठवतच असेल की,  मागच्या कथेत मंत्र्यांनी राजा मेघवर्णला असा सल्ला दिला की  ''हे राजन्, एकांतात तू प्रत्येक मंत्र्याला त्याचे मत विचारावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा.'' त्याप्रमाणे राजाने उज्जीवीला प्रथम विचारले, ``मंत्रीमहोदय अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे? '' उज्जीवी म्हणाला -`` हे राजा शत्रू कितीही नीचपणे वागणारा पण बलवान असेल तर आपल्याला त्याच्याबरोबर तह करणेच उचित आहे. कारण आपले प्राण सुरक्षित राहिले तरच आपण राज्य सुरक्षित ठेऊ शकू. आपल्यावर उलूकांनी अनेकवेळा स्वार्‍या केल्या आहेत आणि प्रत्येकवेळी तेच जिंकले आहेत. आपण त्यांच्याशी समोरासमोर लढाई केली तर आपला विजय अनिश्चित आहे. माणसाने नदीसारखं असावं –

चढावरी ना चढते कधीही । नदी, तशी वृत्ति मनी धरावी
येता परी काळ सुयोग्य ऐसा  । समूळ उच्चाटन ध्येय ठेवा
ऐसीच दे मात रिपूस जोची । वाढे तयाची नित राज्यलक्ष्मी।।


राजा, नदी कधी उलट्या दिशेने प्रवास करत नाही. पण खाली जातांनाही ती पर्वत फोडत मार्ग शोधते. माणसाने तसे नम्र राहून सुयोग्यवेळेची वाट पहाणे आवश्यक आहे. त्यानेच आपला विनाश टळेल. अशा राजाला राज्यलक्ष्मी कधीही सोडून जात नाही. शिवाय शक्तिमान शत्रूशी लढतांना आपलाच सर्वनाश ओढवू शकतो कारण-

संग्राम तो तुल्यबळात व्हावा । बलिष्ठ संगे न अशक्त योद्धा
धोंड्यावरी आपटिता घटाला । जाई फुटोनी घट मृत्तिकेचा॥''

                म्हणून विजयाची आशा नसेल आणि मित्रता होण्यासाठी साम, दाम आणि भेद हे तिनही उपाय हरले असतील तरच शत्रूबरोबर युद्ध करणे उचित आहे. अन्यथा हे राजन शत्रूबरोबर मित्रता करणे हेच योग्य आहे.
                हे राजा, बलाढ्य शत्रू समवेत युद्ध योग्य नाही तसेच आपल्याशी तुल्यबळ असलेल्या शत्रूबरोबरही युद्ध योग्य नाही. कारण दोन मातीचे घट जसे एकमेकांवर आपटल्यावर फुटून जातात तसे दोन तुल्यबल शत्रूही एकमेकांबरोबर लढून नष्ट पावतात.

फुटून जाती घट मृत्तिकेचे । एकावरी एकचि आपटोनी
तैसेच शत्रू समशक्ति दोन्ही । युद्धात झुंजोनि विनष्ट होती॥

 अजूनही एक गोष्ट तुला सांगतो. हे भूपती, युद्धामधून तीन गोष्टींची प्राप्ती होते. भूमी, धन अथवा मित्र. ह्या तीनही गोष्टींपैकी एकही मिळणार नसेल तर युद्ध हे न केलेलेच बरे. एखादा डोंगर पोखरून सिंहाने उंदराची शिकार केली तर त्याचे पोटही भरत नाही आणि डोंगर पोखरण्यामुळे त्याची नखेही तुटतात. त्याचे सामर्थ्य व्यर्थ जाते. त्याचप्रमाणे युद्धातून काही ठोस गोष्टींची प्राप्ती झाली नाही तर आपले नुकसानच नुकसान आहे.
युद्धातुनी तीन फळेच येती । जमीन, सन्मित्र, सुवर्ण हेची
जरी न लाभे लढुनीच काही । उंदीर लाभे गिरि  पोखरूनी ''

              मुलांनो काकराज मेघवर्णाला त्याच्या उज्जीवी नावाच्या मंत्र्याने तह करायचा सल्ला दिला आता बाकीचे मंत्री काय सांगत आहेत तेही पाहू.
             ``महाराज, घुबडांनी आपल्याला वारंवार पराजित केलेलं आहे. आता जर आपण त्यांच्याकडे संधीचा प्रस्ताव पाठविला तर ते आपल्याला वाट्टेल तशा अटी घालून ज्यास्तच त्रास देतील.'' संजीवी म्हणाला, ``शिवाय आपला शत्रू स्वभावतःच लबाड आहे. विश्वासघातकी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण आहे. कारण संधीचे नियम तोडून कधी तो फसवून आपला घात करेल हे सांगताच येत नाही. महाराज पाणी उकळत  जरी असलं तरी ते अग्नीला विझविण्याचच काम करतं. म्हटलच आहे - 

चाड ना सत्य धर्माची । तो नसे योग्य संधीसी
संधी-नियम तोडूनी । करे विश्वासघातही॥

जेंव्हा युद्ध अनिवार्य असेल तेंव्हा संधी न करणे हेच उत्तम. युद्धाला घाबरून पळून जाणारा भेकड त्याच्या कचखाऊ वृत्तीमुळे नाश पावतो. कचखाऊ आणि दयाळू राजाला प्रजासुद्धा गवताप्रमाणे तुच्छ मानते. त्याउलट जो राजा कठोर कारवाई करण्यास मागेपुढे बघत नाही, शत्रूही त्याला शरण येतो. आपला शत्रू बलवान असला तरी अजेय नाही. जो शत्रू सैन्यशक्तीने मारण्यास अवध्य आहे त्याला मायेने फसवूनही मारता येते. किचकाला भीमाने असेच मारले होते.''
                  संजीवी निकराच्या युद्धाचा प्रस्ताव पुढे ठेवत असतांनाच काकराज मेघवर्णचा  तिसरा मंत्री अनुजीवी पुढे आला आणि म्हणाला, ``महाराज सध्यातरी पलायन हाच एक योग्य उपाय मला दिसत आहे. पलायन दोन प्रकारे उपयोगी आहे. आत्मरक्षण आणि विजयाच्या इच्छेने लपून छपून शत्रूवर हल्ला करण्यासाठी आपल्याला पलायनच उपयोगी पडेल. कारण, सावजावर निकराचा हल्ला करण्यापूर्वी सिंहही थोडेसे अंतर मागे सरकतो. टक्कर देण्यापूर्वी मेंढाही मागे येऊन मग ईर्षेने पळत जाऊन टक्कर देतो.
येतसे थोडका मागे। झेप घेण्यास सिंहही
द्यावया झुंज ये मागे । मेंढा; चकवी शत्रूसी

त्यामुळे, महाराज सध्यातरी पलायन हाच योग्य मार्ग आहे.`` आपले विचार सांगून झाल्यावर अनुजीवी नम्रपणे खाली मान घालून उभा राहिला.
``महाराज, संधी (तह), विग्रह(लढाई), यान(पलायन) ह्या सर्व गोष्टी मला अमान्य आहेत.'' प्रजीवी बोलू लागला.  ``एकदा का आपण आपली जागा सोडली की तेथे परत येणं अशक्यच समजा. आपण आपला गड सैन्य, शस्त्र, अन्न, धान्य यांनी सुसज्जित करून, आपल्या मित्र पक्षांनाही आपल्या मदतीसाठी येथे बोलवावे. युद्धाला कृतनिश्चय अशी आपण झुंज दिली पाहिजे. कारण,

राहुनी नक्र स्वस्थानी । गजेंद्रा नेइ खेचुनी
सोडिता नक्र स्वस्थाना ।  दाविते भय श्वानही ॥

मगर जेंव्हा स्वतःला योग्य असलेल्या स्थानावर म्हणजे पाण्यात असते तेंव्हा तिच्यात हत्तीलाही खेचून घेण्याची ताकद असते. तीच मगर जर पाण्याबाहेर आली तर रस्त्यावरची भटकी कुत्रीही तिच्यावर भुंकून भुकून तिला त्रस्त करतात. विषारी दात काढलेला साप, न माजणारा हत्ती, आणि आपले राज्य सोडून पळून गेलेला राजा अलगद शत्रूच्या हातात येतात.
      वार्‍याच्या झंझावातापुढे एकटा दुकटा वृक्ष उन्मळू पडतो पण ओळीने जवळ जवळ लावलेले वृक्ष तग धरून राहतात. आपण आपल्या सर्व सामर्थ्याने आपल्याच किल्यात राहून शत्रूशी लढण्याला `आसन' असे म्हणतात.''
क्रमशः
---------------------------------------



3

               मित्रांनो, आत्तापर्यंत उज्जीवी, संजीवी, अनुजीवी, प्रजीवीने राजाला दिलेले वेगवेगळे सल्ले आपण पाहिले. प्रत्येकाचे वेगवेगळे अभिप्राय ऐकून राजा मेघवर्ण आपल्या पाचव्या मंत्र्याकडे चिरंजीवीकडे वळला. मंत्रीवर आपला काय अभिप्राय असेल तोही कथन करा.
``महाराज, मी संश्रय ह्या पाचव्या तंत्राचा अवलंब करावा असे सुचवितो. निर्वात जागी ठेवलेला दिवाही लगेचच विझून जावा तसा पराक्रमी, तेजस्वी समर्थ माणूसही असहाय्य झाल्यावर काहीही करू शकत नाही. मित्रहीन राजा पराजित होतो.

सोलता साल साळीचे  । भात ना उगवे कधी
सोडून जनसंपर्का । कार्य ना साधते कधी॥

   अनेकांशी असलेली मैत्री कायम लाभदायक होते. खास करून आपल्या स्वजनांशी केलेली मैत्री अधिक लाभदायक होते. ज्याप्रमाणे तांदुळाचं टरफल काढून टाकलं तर तांदूळ कधीही उगवत नाही त्याप्रमाणे आपल्या बांधवांशी फटकून वागल्याने  आपलीच हानी होते. आपण आपल्या स्वजातीयांचा जनाधार मिळविला पाहिजे. आपल्याला जर जनाधारच मिळाला नाही तर आपला पाडाव नक्की आहे. कारण,

वनास जाळण्या वारा । साथ देईच अग्निला
विझवी दीपज्योतीसी । मित्र कोठून निर्बला ॥

आपण येथेच राहून शक्तिमान अशा व्यक्तिंचाही सहयोग मिळविला पाहिजे. आपण आपला बळकट दुर्ग सोडला तर कोणीही आपल्याला सहाय्य करायला पुढे येणार नाही. आपण येथेच राहून शक्तिमान अशा व्यक्तिंचा सहयोग मिळविला तर आपला विजय निश्चित आहे.  कारण मोठ्या लोकांचा संपर्क  उन्नती घडवून आणतो. हाराच्या योगाने दोराही देवाच्या गळ्यात विराजमान होतो. फुलामधे असलेला कीटक फुलाबरोबर देवाच्या डोक्यावर विराजमान होतो. कमळाच्या पानावर पडलेलं पाणी मोत्यासारखं चमकायला लागतं.

मोतीच वाटे जलबिंदु सान । जो पद्मपत्रीच विराजमान
महाजनांचा सहवास नित्य । देई प्रतिष्ठा अपमानितांस॥

                   बालमित्रांनो अशा प्रकारे शत्रूपासून बचाव होण्यासाठी मेघवर्णराजाला त्याच्या पाचही मंत्र्यांनी वेगवेगळे उपाय सांगितले. उज्जीवीने  शत्रूसोबत संधी करावी असे सुचविले. तर संजीवीने लढायचा निर्धार केला. अनुजीवीने पळून जाऊन योग्य वेळी हल्ला करायचा मार्ग सुचविला तर प्रजीवीने बाहेरून दुस र्‍याची मदत घेऊन आपल्याच गडात पाय रोवून उभे राहण्याचा निश्चय  सांगितला. चिरंजीवीने दुस र्‍या बलवान मित्राच्या आश्रयाने शत्रूचा मुकाबला करण्याचा सल्ला दिला तो आपण पाहिला.           


               अशा प्रकारे मेघवर्णाने आपल्या मंत्र्यांची मते जाणून घेतली. थोडा विचार करून तो स्थिरजीवी या वयोवृद्ध मंत्र्याकडे गेला. स्थिरजीवी दीर्घदृष्टी, राजनीतीतज्ज्ञ होता. मेघवर्णाच्या वडिलांपासूनचा एकनिष्ठ मंत्रीही होता. विनम्रपणे राजाने त्याला सर्व हकिगत कथन केली.                       
           स्थिरजीवी म्हणाला, `` बाळा तुला तुझ्या मंत्र्यांनी योग्य तेच सल्ले दिले आहेत. पण आत्ताची परिस्थिती `द्वैधीभावा'ची आहे. सर्व नीतींचा अतीशय कुटीलपणे एकत्रित वापर म्हणजेच द्वैधीभाव.  स्वतः पूर्ण सावध राहून शत्रूला विविध प्रलोभने दाखवून प्रथम त्याच्या हृदयात पूर्णतया विश्वास उत्पन्न केला की शत्रूला मारायला वेळ लागत नाही.''  ``बरोबर आहे काका. पण राहून राहून मला एक प्रश्न सतावतो आहे.'' ``असा कुठला प्रश्न तुझ्या मनात आहे? निःशंकपणे तो तू मला विचार.‍'' स्थिरजीवीने राजाचे मनोगत जाणण्याच्या हेतूने विचारले. मेघवर्ण म्हणाला `` काका प्रथम मला सांगा, कावळ्यांचे आणि घुबडांचे एवढे हाडवैर का?''
           ``अगदी योग्य प्रश्न विचारलास बाळा. दोन घराण्यातील असो अथवा दोन शेजारी देशातील असो; बहुतेक हाडवैरांची बीजं ही इतिहासात मिळतात. काक आणि उलूकांच्या भांडणाची कारणेही आपल्या पूर्वजांच्या वैराच्या इतिहासाताच दडलेली आहे. त्यामुळे आपला इतिहास समजाऊन घेणे ही राजासाठी खूपच आवश्यक गोष्ट आहे. सांगतो ऐक.''
                   ``खूप जुनी गोष्ट आहे.  एकदा हंस, बगळे, पोपट, चातक, कोकीळ कबूतर , कोंबडे असे बरेच पक्षी एकत्र आले. सर्व पक्ष्यांच्या प्रमुखांनी सभा भरवली. अतीव दुःखाने आणि खिन्न अंतःकरणाने सर्व जण म्हणू लागले की, गरूड आपला राजा असला तरी तो विष्णूबरोबरच सदानकदा राहतो. शिकारी आमची शिकार करतो किंवा आम्हाला पकडून घेऊन जातो, पण आमच्या राजाला आमच्या रक्षणासाठी वेळच नाही. जशी एखादि नौका नावाड्याविना हेलकावे खात बुडून जाते तसेच राजाविना राज्यही  नाश पावते.

नौका बुडे नाविक ज्यास नाही । साम्राज्य राजाविण नष्ट होई॥

शेवटी सर्वांच्या सहमतीने नवीन राजासाठी घुबडाचे नाव सुचविले गेले. घुबडाच्या राज्याभिषेकाची तयारीही सुरू झाली. पवित्र मंत्र म्हटले जाऊ लागले. घुबड आणि त्याची पत्नी राज्याभिषेकाची आतुरतेने वाट बघत असतांनाच कुठुनतरी उडत एक कावळा तेथे येऊन दाखल झाला. `` मित्रांनो, आपण येथे एवढ्या मोठ्या संख्येने का जमला आहात? येथे हा कुठला समारंभ साजरा केला जात आहे? '' कावळ्याने प्रश्न केला.
              सर्व पक्ष्यांनी विचार केला की प्राण्यांमधे जसा कोल्हा धूर्त असतो तसा आपल्या पक्ष्यांमधे कावळा फार विचारी आणि धूर्त आहे. त्याचेही मत जाणून घ्यावे. सर्व पक्षी म्हणाले, `` महाशय! पक्ष्यांचा कोणीच वाली उरला नाही म्हणून आम्ही उलूकराजांना आमचा राजा बनविण्याचं निश्चित केलं आहे. आपणही आमच्या या प्रस्तावाला संमती द्यावी.''  उपहासाने हासत कावळा म्हणाला, ``मित्रांनो तुमच्याकडे मोर, हंस, चक्रवाक, कोकीळ पोपट, बदक असे  कितीतरी पक्षी राजेपदासाठी योग्य असतांना ह्या वाकड्या नाकाच्या, कुरूप चेहर्‍याच्या, स्वभावतःच रौद्र असलेल्या आणि दिवसा आंधळ्या असलेल्या पक्ष्याला राजा बनविण्याची तुम्हा सर्वांना कोठून दुर्बुद्धी सुचली? आपण सगळे दिवसा उडणारे पक्षी आहोत. ह्या दिवसा आंधळ्या असलेल्या घुबडाला राजा केल्यास आपल्याला दिवसा कोण मदत करणार. मी तुमच्या मताशी असहमत आहे. मी तुमच्या प्रस्तावाला सम्मती देऊ शकत नाही.''
                  ``शिवाय एका राज्यासाठी एकापेक्षा दोन राजे कधीही योग्य नाहीत. जो पर्यंत आकाशात एकच सूर्य आहे तोवरच तो सुखदायक आहे. असे अनेक सूर्य जर आकाशात उगवायला लागले तर आपल्याला ते तापदायक होतील. गरूडराज साक्षात विष्णूचे वाहन म्हणून नियुक्त आहेत. गरूड आपला राजा आहे ह्या कल्पनेनेच अनेकांना आपल्याकडे भुवई उचलून बघायची सुद्धा हिम्मत होत नाही. मोठ्या माणसाच्या नुसत्या नावानेच सामान्यांची कामे होतात. गरूडाच्या नावानेच आपल्याला अनेक जण मदत करतील.  चंद्राच्या नुसत्या नाव घेण्यानेच पूर्वी ससे आरण्यात सुखाने राहू लागले.''
पक्ष्यांनी विचारलं, ``वायसराज ते कसं काय?''
 ``सांगतो.'' कावळा म्हणाला.
-----------------------------------------
क्रमशः 
4
ससा आणि हत्तींच्या कळपाची कथा

         मित्रांनो, घुबडाला राजा करू नये असं कावळ्याने ठामपणे सर्व पक्ष्यांना सांगितलं. कावळा म्हणाला, राजा जर प्रतापवान असेल, त्याचं कुळ जर महान असेल तर त्याच्या नावानेच इतर शत्रू तुमच्याकडे वाकड्या नजरेनेही पाहू शकत नाहीत. चंद्राच्या नुसत्या नावाच्या महात्म्याने  एका सशाने आपल्या सार्‍या बांधवांना कसं वाचवलं हे तो सांगू लागला. -
          एका जंगलात हत्तींचा एक कळप राहत होता. चतुर्दंत नावाचा एक  भला मोठा हत्ती ह्या कळपाचा मुख्य होता. एकावर्षी पाऊस न पडल्यामुळे भयंकर दुष्काळ पडला. सगळ्या रानावनातील नद्या, तळी सुकून गेली. सारे हत्ती चतुर्दंताकडे जाऊन म्हणाले, `` महाराज, तहानेने अतीशय व्याकूळ होऊन आपली अनेक पिल्ले मरायला टेकली आहेत. पाणी पाणी करत कित्येकांनी प्राणही सोडले. आता आपल्याला पाण्याचा दुसरा एखादा तलाव शोधून काढायला लागेल.''
           थोडा विचार करून चतुर्दंत म्हणाला, `` एका निर्जन स्थळी सपाटीवरच एक विशाल सरोवर आहे. त्याच्यात भूमिगत असे पाण्याचे स्रोत असल्याने त्याचं पाणी कधीच आटत नाही. आपण सगळे तिकडेच जाऊ. राजाची आज्ञा होताच सगळ्या हत्तींच्या कळपाने सरोवराच्या दिशेने प्रस्थान केलं. पाच दिवस पाच रात्री चालून गेल्यावर सारेजण त्या सरोवरापर्यंत पोचले. सरोवर पाहून आनंदित झालेले हत्ती सरोवराच्या पाण्यात शिरून मस्तपैकी डुंबत आपला शीण घालवू लागले. छोटी पिल्ले एकमेकांवर पाणी उडवून दंगामस्ती करू लागली. तलावाभोवती असलेल्या हिरवळीवर पळू लागली. त्या जलाशयासभोवती असलेल्या मऊशार मातीत अनेक सशांची बिळे होती. हत्तींच्या ह्या मनमानी कारभारामुळे सशांची अनेक बिळं फुटून गेली. कित्येक ससे आणि सशांची पिल्लं हत्तीच्या पायदळी येऊन मरून गेले. काही अर्धमेले झाले.
हत्ती निघून गेल्यावर निराधार झालेले, हात,पाय तुटलेले, रक्ताने माखलेले, बिळं फुटून ज्यांची पिल्लं मरण पावली आहेत असे सगळे ससे एकत्र आले. ते अत्यंत शोकाकूल झाले होते.  त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले,`` ह्या हत्तींच्या रूपाने आपला सर्वनाश ओढवला आहे. हे हत्ती रोज रोज येथे येऊन  येथील जलाशयाचं पाणीही आटून जाईल, आणि रोज रोज येथे हिंडल्याने त्यांच्या पायाने आपली बिळे नष्ट होतील. आपण ही मरून जाऊ. खरोखरच,

स्वर्गास धाडी गज स्पर्शमात्रे । फुत्कार टाकूनचि सर्प मारे
हासून दे भूपति प्राणदंडा । लबाड सत्कार करून मोठा॥

आता आपल्याला जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे.'' सशांपैकी एकजण म्हणाला  ``आपली जागा कितीही सुंदर, धनधान्याने समृद्ध असली तरी अशा भयंकर संकटाच्यावेळी ही जागा सोडून येथून पळून जाणेच श्रेयस्कर आहे.'' त्यावर दुसरा म्हणाला, `` छे छे आपल्या पूर्वजांपासून आपण येथे राहत आहोत. हे स्थान सोडणे शक्य नाही. आपण काहीतरी उपाय करून ह्या हत्तीच्या कळपाला घाबरवून येथून हुसकावून लावायला पाहिजे. बिनविषारी साप सुद्धा फणा काढून फुत्कारल्यावर त्याच्याजवळ जाण्यास कोणी धजावत नाही.'' त्याचे बोलणे ऐकून इतर ससे म्हणाले, ''खरं आहे. आपल्याकडे त्यांना त्रस्त करण्याचा एक उपाय आहे. आपला राजा विजयदत्त हा चंद्रबिंबावरच राहतो. आपण आपल्या राजातर्फे एक खोटाच दूत हत्तींकडे पाठवू. जो त्यांना सांगेल की, `हे सरोवर चंद्रमहाराजंचं आहे. त्यांचे कुटुंबीय ह्या सरोवराच्या भोवताली राहतात. ह्या सरोवरात येऊन तुम्ही चंद्रमहाराजांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ नका.' कदाचित ह्या सांगण्यावर विश्वास ठेऊन गजदळ निघून जाईल. पण त्यासाठी आपल्याला एका अतीशय चांगल्या दूताची गरज आहे.

नीतीत पारंगत निस्पृही जो । सर्वांस वाटेचि हवा हवा जो
स्वभाव ज्याचा उमदा असोनी । जाणे दुज्याच्याच मनोगतासी
अमोघ वक्तृत्त्व रिपूस जिंकी । तो दूतची कार्य तडीस नेई॥''

त्यावर अनेकजण म्हणाले, ``आपल्याकडे लंबकर्ण नावाचा हुशार ससा आहे त्याला पाठवावे.'' अजून एकजण बोलला, ``तो चतुर वक्ता आहे आणि दूत म्हणून पाठविण्यास योग्य आहे.'' बाकीचेही ससे म्हणाले ``हाच योग्य उपाय आहे.''
दुस र्‍याच दिवशी लंबकर्ण गजराजाकडे गेला. तेथील एका उंच टेकडीवर चढून सर्व हत्तीना म्हणाला, ``अरे दुष्टांनो, चंद्रामा ज्या जलात स्नान करतो त्या सरोवराची तुम्ही बिनदिक्कत नासधूस करत आहात. ताबडतोब येथून निघून जा. त्यावर गजराज चतुर्दंताने आश्चर्याने त्याला विचारले, ``तू कोण आहेस?'' त्यावर अत्यंत आत्मविश्वासाने तो म्हणाला, `` मी लंबकर्ण नावाचा ससा आहे. मी चंद्रबिंबावर राहतो. भगवान चंद्रमहाराजांनी मला दूत म्हणून तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्हाला माहितच आहे की दूत हा राजाचे मुख असतो. त्यामुळेच तो काहीही बोलला तरी अवध्य असतो.'' त्याचे ते बोलणे ऐकून गजराज म्हणाला, ``ठीक आहे पण तुमच्या चंद्रमहाराजांचं म्हणणं तरी काय आहे?'' ससा म्हणाला, `` चंद्रमहाराजांनी कळविलं आहे की काल पासून तुम्ही अगणित सशांची हत्या केली आहे. ज्या सरोवरात कालपासून तुम्ही गोंधळ घातला आहे त्या सरोवराच्या परिसरात माझे कुटुंबीय राहतात. विना विलंब हे सरोवर सोडून दुसरीकडे निघून जा.''
त्याचे ते भाषण ऐकून आश्चर्याने गजेंद्र म्हणाला, `` काय तुझा स्वामी स्वतः भगवान चंद्र आहेत? कुठे आहेत ते? ''
ससा म्हणाला, ``आपण असंख्य सशांची हत्या केल्याने, बाकीच्या सशांना आश्वस्त करण्यासाठी ते जलाशयात येऊन बसले आहेत. आणि त्यांनी मला दूत बनवून तुमच्याकडे पाठविले आहे.''
गजेंद्र म्हणाला, ``जर असं असेल तर मलाही त्यांचे दर्शन घडेल काय?''
``जरूर !  आपण एकट्याने माझ्याबरोबर येऊन चंद्रमहाराजांचे दर्शन घ्यावे.''
हत्तीला सरोवरापशी नेऊन जळात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब दाखवून लंबकर्ण म्हणाला, `` हे बघा आमचे महाराज पाण्यात समाधिस्त बसले आहेत. त्यांची समाधी भंग करू नका. शांतपणे त्यांना नमस्कार करून येथून निघून जा. तुमच्या बोलण्याने जर त्यांची समाधी भंग पावली तर ते तुमच्यावर रागवून तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत.'' भयभीत होऊन चंद्रबिंबाला प्रणाम करून गजराज तेथून निघून गेला. आपल्या सर्व कळपासह हत्ती दुस र्‍या वनात निघून गेल्यावर सर्व ससे लंबकर्णाची वाहव्वा करत आनंदाने त्याच सरोवराकाठी राहू लागले.
क्रमशः 



5
 माझ्या बालमित्रांनो,
मोठ्या माणसाचे नाव घेतल्याने सामान्य माणूसही कसा तरून जातो हे आपण मागच्या वेळच्या ससा आणी हत्तींच्या गोष्टीतून पाहिलं.
लंबकर्ण नावाच्या सशांच्या दूताने अति बलवान हत्तींच्या कळपालाही कसं घालवून दिलं हे आपल्याला आठवतच असेल. ही गज आणि सशांची गोष्ट कावळ्याने आपल्या पक्षी मित्रांना सांगून गरूडच पक्ष्यांचा राजा म्हणून कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिलं. सर्व पक्षीही ``गरूडच आमचा राजा आहे. तोच राजा होण्यास योग्य आहे'' असं म्हणू लागले. कावळा म्हणाला, '' माझ्या पक्षीमित्रांनो, अजूनही एक गोष्ट आहे. श्रेष्ठ राजा हितकर, कल्याणकारी असतो. त्या     उलट नीच, दुष्टबुद्धी, आळशी, व्यसनी, विश्वासघाती, पाठीमागे निंदा करणारा माणूस कधीही राजा म्हणून स्वीकारण्यास योग्य नसतो. अशा क्षुद्र राजाकडून न्यायाच्या बदल्यात अन्यायच पदरात पडतो. अशाच एका क्षुद्रवृत्तीच्या राजाने न्याय मागायला आलेल्या चिमणी आणि ससा दोघांनाही ठार मारलं.''
``मित्रा वायसा अजून ही काय कथा आहे? सर्व पक्ष्यांनी कुतुहलाने विचारल. ''सांगतो'' कावळा म्हणाला.
कधीकाळी एका सुंदर वृक्षावर मी राहत होतो. त्याच वृक्षाच्या ढोलीत कपिंजल नावाचा एक चिमणा राहत असे. रोज सूर्योदयाला उदरनिर्वाहासाठी आम्ही बाहेर जात असू आणि  सूर्यास्ताच्यावेळेला परत त्याच झाडावर येत असू.  परत आलो की खूप गप्पा गोष्टी करता करता कधी दाट काळोख पडे हे कळतच नसे. रोज पाहिलेल्या आश्चर्यकारक गोष्टी एकमेकांना सांगता सांगता आमचा वेळ सुखाने जात असे. एकदा नवीन धान्य येण्याचा काळ होता. चिमणा सकाळीच आपल्या सवंगड्यांसमवेत जिथे धान्याची खूप शेतं होती त्या प्रदेशात उडून गेला. रात्र झाली तरी कपिंजल आला नाही हे पाहून मी खूप दुःखी झालो.त्याच्या वियोगाने मला चैन पडेना. दोन तीन दिवस उलटले तरीही कपिंजल आला नाही हे पाहून मला वारंवार त्याची आठवण येऊ लागली. वाईट वाईट विचार मनात येऊ लागले. फासेपारध्याच्या जाळ्यात तर कपिंजल अडकला नाही? किंवा गोफणीचा दगड लागून तो मरण तर पावला नसेल? जर सर्व कुशल असतं तर तो माझ्यावाचून इतके दिवस असा बाहेर राहिला नसता. विचार करता करता खूप दिवस लोटले. एक दिवस सूर्यास्ताच्यावेळेस एक  `शीघ्रगती' नावाचा ससा आसरा शोधत वृक्षाजवळ आला. कपिंजलाची ढोली रिकामी पाहून त्याने ढोलीत उडी मारली आणि  रात्रभर तेथेच मुक्काम केला. कपिंजलाच्या जाण्याच्या दुःखाने मीही निराश झालो होतो. त्यामुळे मीही त्या सशाला आडवलं नाही. थोड्याच दिवसात आपलच घर समजून ससा सुखाने त्या ढोलीत राहू लागला.
        खूप दिवस गेले. इकडे कपिंजल भाताच्या शेतात आपल्या सोबत्यांबरोबर तांदूळ खाऊन मस्त  धष्टपुष्ट झाला. आता त्याला आपल्या ढोलीची आठवण झाली. तो परत आला. खरं आहे, जे सुख माणसाला आपल्या दरिद्री देशात, गावात आणि घरात मिळतं ते त्याला स्वर्गातही मिळत नाही.

दरिद्रि गावी निज मायदेशी । राहून साध्या पडक्या घरीही।
जे सौख्य लाभे नरास चित्ती । लाभे न ते सौख्य कधीच स्वर्गी ॥

असो! परत आल्यावर आपल्या ढोलीत अनोळखी सशाला राहतांना पाहून  त्याला फटकारून तो म्हणाला `` ए सशा हे माझं घर आहे. तू माझ्या घरात कसा काय घुसलास? तात्काळ माझं घर सोडून निघून जा. ''
ससा म्हणाला,`` विनाकारण माझ्याशी भांडू नकोस. हे तुझं नव्हे तर माझं घर आहे. विहीर, तलाव, देवालय आणि वृक्षावर जोपर्यंत तुम्ही राहता, तोपर्यंतच तुमचा हक्क असतो. एकदा का ते स्थान सोडलं की तुमचा हक्कही संपतो. पशुपक्ष्यांनी एकदा आपली जागा सोडली की त्यांचा त्या जागेवरचा अधिकार संपतो.''
कपिंजल म्हणाला, ``तुला जर धर्मशास्त्रामधे एवढा विश्वास असेल तर चल आपण गंगेकाठी जाऊन एखाद्या चांगल्या धर्मशास्त्र जाणकाराकडे जाऊन आपला निवाडा करायला सांगू''.
             त्यांचा हा संवाद झाडामागे लपलेला `तीक्ष्णदंत' नावाचा एक बोका ऐकत होता. लगेचच तो बोका गंगा नदीच्या किनार्‍यावर जाऊन पोचला. हातात दर्भ घेऊन एका पायावर उभे राहून दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर करून सूर्याकडे बघत तो जोरजोरात उपदेश करू लागला. `` हा सर्व संसार असार आहे. जीवन क्षणभंगुर आहे. आपल्याला हव्याहव्याशा वाटणार्‍या गोष्टी अनित्य आहेत. संसार म्हणजे माया आहे. - -- -''
तो पर्यंत ससा आणि चिमणाही तेथे पोचले. काय होईल ह्या कुतुहलाने  मीही त्यांच्यामागे गंगेकाठी जाऊन पोचलो. ससा म्हणाला, ``अरे येथे कोणीतरी धर्मात्मा,तपस्वी बसलेला दिसत आहे. चल आपण त्यालाच विचारू.'' चिमणा म्हणाला ``हा तर आपला स्वाभाविक शत्रू आहे. त्याला लांबूनच विचारू नाहीतर तो आपल्यावरच झडप घालेल.''
दोघांनीही त्याला लांबूनच त्यांच्यातील सर्व वाद- विवाद कथन करून न्याय देण्याची विनंती केली.
त्यावर बोका म्हणाला, `` राम! राम! राम! राम! तुम्ही अशाप्रकारे भांडण करणं अनुचित आहे. अहिंसा हाच खरा धर्म आहे. पशुंना बळी देणं हे जेवढं क्रौर्य आहे तेवढंच झाडं तोडणंही पापाचरणच आहे. इतकच काय पण मुंगी, किडे, डास ह्यांना मारणं सुद्धा पाप आहे. हे सर्व पाप करून जर कोणी स्वर्गात जात असेल तर नरकात कोण जात असेल? मी आता फळं कंदमुळं खाऊनच माझी उपजीवीका चालवतो. या मुलांनो या. मी तुम्हाला खाणार नाही. मी आता वृद्ध झालो आहे. मला नीट ऐकूही येत नाही. माझ्या मांडीवर बसून माझ्या कानात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सांगा. न्याय शास्त्रात असं म्हटलच आहे की जो योग्य न्याय करत नाही तो स्वतः पापाचा भागिदार बनून नरकात जातो.'' बोक्यावर विश्वास ठेऊन चिमणा आणि ससा दोघेही त्याच्या मांडीवर जाऊन बसताच बोक्याने एकाचवेळी दोघांनाही आपल्या पंजाने दाबून ठार मारलं.
गोष्ट सांगून झाल्यावर कावळा म्हणाला, ``म्हणून मित्रांनो मी सांगतो, क्षुद्र, लोभी आणि नैसर्गिकपणे जो आपला शत्रु आहे त्याला राजा बनवू नये असा राजा लाभला तर आपला विनाश नक्की आहे. रात्री शिकार करून पोट भरणारा आणि दिवसा अंध म्हणजेच दिवांध असलेला हा  उलूक आपल्याला मदत तर करणार नाहीच पण नस्ती डोकेदुखीच होईल.'' कावळ्याचं  हे म्हणणं सर्व पक्ष्यांना पटलं. घुबड पक्ष्यांचा राजा होण्यास योग्य नाही हे लक्षात येताच सर्व पक्षी बघता बघता उडून गेले.  राज्याभिषेकाच्या लालसेने पत्नीसमवेत एक घुबडच काय ते तेथे उरले. घुबडाचा राज्याभिषेक रद्द झाला. एका कावळ्यामुळे घुबडाचा झालेला हा भयंकर अपमान घुबडाला जिव्हारी लागला. तेंव्हापासून कावळे आणि घुबडांचं वैर सुरू झालं.  6
                  काकराज मेघवर्णाला कावळे आणि घुबडांच्या हाडवैराची गोष्ट स्थिरजीवीने यथासांग वर्णन करून सांगितली. पूर्वापार चालत आलेल्या या वैराचं कारण समजल्यावर थोडावेळ मेघवर्णही स्तब्ध राहिला. आणि मग म्हणाला, ``अस्स! म्हणजे हे वैर कधीही न संपणारच आहे. त्याचवेळी घुबडे निशाचर आहेत हे लक्षात घेऊन तो स्थिरजीवीला म्हणाला,``काका  आता ह्या परिस्थितीत आपल्याला काय करायला पाहिजे? आपला शत्रू कुठे राहतो हेही मला माहित नाही. मग त्याच्या तृटी आपल्याला  कशा कळणार? '' 
स्थिरजीवी म्हणाला, `` मी त्यांच्या राहण्याच्या जागेचाच नाही तर त्याच्या न्यूनांचाही छडा लावीन. माझे गुप्तचर हे काम करतील. कारण

जाणते गाय वासाने । द्विज वेदसहाय्याने
राजा गुप्तचरांद्वारे । जनसामान्य चक्षुने॥

एखाद्या गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिये उपयोगी पडतात. ह्याच ज्ञानेद्रियांच्या सहाय्याने सामान्य माणूस आपल्या अवतीभोवतीचं जग जाणून घेतो. डोळ्यांनी त्याला जे दिसतं त्याला तो जग समजतो. पण जे दिसतं तसं नसतं. त्याही पलिकडचं जग  जाणून घेता यायला पाहिजे. गायीला वासाने बर्‍याच गोष्टीचे चांगले ज्ञान होऊ शकते. वेदांच्या अध्ययनाने विद्वानांना ब्रह्मज्ञान होऊ शकते. तर कुठे काय पाणी मुरते आहे ह्याचे ज्ञान राजाला त्याच्या गुप्तचरांमार्फत होते.
राजाने शत्रुराज्यात तसेच स्वतःच्या राज्यातही विविध विभागांचे काम पहाणार्‍या मुख्य व्यक्तिंवर म्हणजेच मंत्री, सेनापती, कोषाध्यक्ष, सभाध्यक्ष, पायदळप्रमुख, सीमापाल, तसेच राजाच्या जवळ वावरणार्‍या लोकांवर गुप्तचर ठेवायला पाहिजेत. गुप्तचरांच्या मुख्यावरही पाळत पाहिजे. राज्याच्या विभिन्न विभागंची कामे उत्तम झाली नाहीत तर राजाचा विनाश होतो. जर सर्व विभागांची कामे उत्तम झाली तर राजाची भरभराट होते.
बालमित्रांनो! गुप्तचरांचे महत्त्व सांगतांना स्थिरजीवी राजाला म्हणाला, ज्याप्रमाणे जमिनीच्या खाली न दिसणा र्‍या पाण्यापर्यंत पोचण्यासाठी शहाणा माणूस हळू हळू जमिन खणून जमिनीच्या पोटात पायर्‍या तयार करत पाण्यापर्यंत जाऊन पोचतो. त्याप्रमाणे शत्रूच्याच अधिकार्‍यांच्या सहाय्याने गुप्तचर शत्रूच्या गुप्त गोष्टींचा माग काढतो.
खोलखोल जमिनीत । काढण्या पाणी अदृश्य
जिना बनवि चाणाक्ष । विहीर एक बनवुनी॥
तसे दक्ष गुप्तचर । शत्रुच्या अधिका र्‍यांच्या
सहाय्ये जाणती सारे । गुप्त गोष्टीच शत्रुच्या॥

माझ्या बालमित्रांनो स्थिरजीवी हा नुसता वयोवृद्ध मंत्री नव्हता तर ज्ञानवृद्धही होता. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने पाहिले होते स्थिरजीवी म्हणाला , `` राजा! साम, दाम, दंड आणि भेद ह्यापेक्षा वेगळा आणि संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय ह्या सर्वांहून  अतिशय कुटिल असा सहावा  उपाय मी वापरणार आहे. नीतीशास्त्रानुसार जो माणूस अनेक प्रकारच्या चातुर्याने युक्त असतो, जो वेगवेगळे उपाय योजण्यात अतीशय निष्णात असतो, अशा धूर्ताला कोणालाही ठगवणं फारस अवघड काम नाही. बोकड घेऊन जाणा र्‍या एका ब्राह्मणाला काही हुशार चोरांनी असचं फसवलं होतं.''
``ते कस काय काका?'' मेघवर्णाने विचारल.
स्थिरजीवीने पुढील कथा सांगण्यास प्रारंभ केला. -
               एका गावात मित्रशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला त्याच्या यजमानासाठी एक यज्ञ करायचा होता. यज्ञात बळी देण्यासाठी त्याला एक पशू हवा होता. म्हणून तो शेजारच्याच नगरात राहणा र्‍या त्याच्या यजमानाकडे गेला. त्याने त्याला एक पशू देण्यासाठी विनंती केली. यजमानानेही त्याला एक धष्टपुष्ट बोकड दिला.  त्या बोकडाला घेऊन तो घरी परत येऊ लागला. बोकड चांगला पुष्ट असल्याने लांबवरचे अंतर चालतांना दमून गेला आणि बिथरून इकडे तिकडे पळू लागला.  शेवटी त्याला खांद्यावर टाकून ब्राह्मण झपाझप घराकडे चालू लागला. रात्र होण्यापूर्वी त्याला बरेच अंतर चालून जायचं होतं. त्याचवेळी तीन धूर्त चोरांची नजर ह्या ब्राह्मणाकडे गेली. बरेच दिवस काहीही न मिळाल्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या त्या तिघांची दृष्टी त्या धष्टपुष्ट बोकडावर पडली. `` आपण जर कसही करून या ब्राह्मणाला फसवलं तर आज हे बोकड आपल्याला मिळेल आणि ते खाऊन आपण आपली भूक भागवू शकू.'' असा तिघांनीही विचार केला. त्याप्रमाणे
तिघांपैकी एकजण वेश बदलून दुस र्‍या रस्त्याने ब्राह्मणाच्या पुढे जाऊन म्हणाला, `` अरे तू तर बालअग्निहोत्री दिसतोस आणि अपवित्र अशा कुत्र्याला खांद्यावर घेऊन चालला आहेस?''
ब्राह्मण रागावून म्हणाला, `` काय आंधळा आहेस की काय? यज्ञाच्या पशूला तू कुत्रा म्हणतोयस?''
पहिला चोर म्हणाला, `` असे रागवू नका. आपल्याला पाहिजे ते करा. मला तुमच्या यज्ञाशी आणि यज्ञाच्या पशूशी काय कर्तव्य? कुत्रा पाहिजे तर कुत्रा बळी द्या ! ''
थोडं अंतर चालून गेल्यावर दुसरा चोर वेष पालटून हजरच होता. ब्राह्मणाला पाहून तो म्हणाला, `` छे! छे!! हा तर अगदि अनर्थ झाला. आपलं आवडतं वासरू मेलं म्हणून कोणी त्याला असं खांद्यावर घेऊन फिरत नाही. शेवटी मुडदा तो मुडदाच!''
 त्या दुस र्‍या धूर्त चोराचं बोलणं ऐकून ब्राह्मण क्रोधाने लाल झाला. आणि म्हणाला, `` अरे तूही आंधळा आहेस की काय? यज्ञाच्या पशूला मेलेलं वासरू म्हणत आहेस?
दूसरा धूर्त म्हणाला, `` माफ करा महाराज अज्ञानाने मी काहीतरी चुकून बोलून गेलो. आपल्याला जे उचित वाटेल ते करा.''
आता काळोख पडत चालला होता आणि खांद्यावरच्या पशूचा भारही ब्राह्मणाला त्रासदायक वाटू लागला होता. त्याचवेळी तिसरा चोर वेश पालटून त्याच्या रस्त्यात आला आणि त्याला म्हणाला, `` शीऽऽशीऽऽशीऽऽशी!!!!!! न कळत जरी गाढवाला हात लागला तर डोक्यावरून अंघोळ करायला पाहिजे. ब्राह्मणमहाराज, आपण गाढवाला वाहून नेतांना कोणी बघण्यापूर्वीच ह्या गाढवाला इथेच फेकून द्या.'' आता मात्र ब्राह्मणाला खरोखरच वाटु लागलं की, आपल्या खांद्यावरील पशू दरवेळी वेगवेगळं रूप घेणारं कोणी पिशाच्च तर नाही? त्याशिवाय माझ्या खांद्यावरचा भार वाढत असल्यासारखं मला वाटलं नसतं. भयाने त्याने त्या बोकडाला तिथेच टाकून घराकडे पलायन केलं. इकडेमात्र तिनही चोरांनी बोकडावर यथेच्छ ताव मारला.
             वरील गोष्ट सांगून झाल्यावर स्थिरजीवी वायसराज मेघवर्णाला म्हणाला, ''चतुर आणि बुद्धिमान माणसे कोणालाही फसवू शकतात. नवीन नोकरांच्या विनयशील वागणुकीने, घरी आलेल्या अनोळखी माणसाच्या बोलण्याने, स्त्रीयांच्या अश्रूंमुळे, आणि धूर्त लोकांच्या फसव्या बोलण्याने फसला नाही असा एकही व्यक्ती मला माहित नाही.''
पाहोनी अति नम्र सेवक नवा, विश्वास ना ठेवला
एकोनी मधुबोल ते अतिथिचे, नाहीच जो पोळला॥

होई ना विचलीत अश्रु बघुनी डोळ्यात नारीचिया
धूर्तांनी कधिही न ज्या ठकविले, ऐसा न मी पाहिला ॥
क्रमशः 
---------------------------------------------------------

7
माझ्या बालमित्रांनो,
वायसराज मेघवर्ण आणि त्याचा कुळपरंपरेने आलेला वृद्ध, चाणाक्ष मंत्री स्थिरजीवी यांनी घुबडांना कसा शह द्यावा ह्याबद्दल बरीच चर्चा केली. स्थिरजीवीने द्वैधीभाव या अतीशय कुटिलनीतीने शत्रूचा पाडाव करण्याचा सल्ला दिला. कुटिल डावांने विद्वान व चाणाक्ष माणसाला सुद्धा कसे फसविता येते, हे दाखवून देण्यासाठी त्याने तीन चोर आणि पशू घेऊन जाणार्‍या ब्राह्मणाची गोष्टही सांगितली. हे आपण मागच्या अंकात पाहिलं.
           गोष्ट पूर्ण झाल्यावर स्थिरजीवी म्हणाला, ``अजूनही लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. एक बलवान व्यक्ति प्रचंड जनसमुदायाला तोंड देण्यास कधीच पुरी पडत नाही. जनसमुदायाचा आदर करावाच लागतो. अतीशय दुर्बळांचा जरी समुदाय असला तरी एका बलवानाला तो भारी ठरू शकतो. खूप जणांना विरोध करू नये. एका सशक्त सर्पाला क्षुद्र मुंग्याही खाऊन टाकू शकतात.''
`` ते कस काय मंत्रीवर?'' मेघवर्णाने प्रश्न केला.
स्थिरजीवी सांगू लागला, -
                     प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी खूप मार्ग  असलेल्या एका वारुळात एक अतिदर्प नावाचा महा भयंकर साप राहत होता. एकदा वारुळातून बाहेर पडतांना तो एका छोट्याशा भोकातून बाहेर पडला. छोट्या भोकातून बाहेर पडतांना, बेडूक खाऊन पुष्ट झालेल्या त्या सापाला अंग घासलं जाऊन जराशी इजा झाली. त्याच्या खरचटलेल्या जखमेतून थोडसं रक्त आलं. त्या रक्ताचा वास जवळच हिंडणा र्‍या मुंग्यांना आला आणि बघता बघता हजारोंच्या संख्येमध्ये मुंग्या एकत्र झाल्या. सापाला झालेली जखम मुंग्यांनी अजून खोल आणि मोठी केली. वेदनांनी तडफडणारा सर्प किती मुंग्यांना मारू शकणार? शेवटी सर्व मुंग्यांनी त्याच्या शरीराची जणु काही चाळणीच करून टाकली. आणि साप मरून गेला.''
``म्हणून सांगतो जनसमूहाचा नेहमीच आदर केला पाहिजे. हे राजा, आपल्याही शत्रूच्या बाबतीत मला काही सांगायचे आहे. मी जे सांगतो ते नीट ऐकून आपण पुढील पावले उचलावीत.''
          `` तू मला शत्रूपक्षाला मिळालेला घरभेदी म्हणून घोषित कर. सर्वांसमक्ष अत्यंत कठोर शब्दात माझी कानउघाडणी कर. त्यामुळे शत्रुपक्षाच्या गुप्तचरांना तू मला पदच्च्युत केलं आहेस हे पटेल. कुठून तरी रक्त मागवून घे. ते माझ्या अंगावर ओतून, मला इथेच ह्या वडाच्या झाडाखाली टाकून सहपरिवार सर्व वायसपरिवारांसह ऋष्यमूक पर्वतावर निघून जा. इकडे मी शत्रूला विश्वासात घेऊन शत्रूच्या तळाचा छडा लावीन. त्याच्या सर्व गुप्त गोष्टी जाणून घेईन. दिवसा आपल्या शत्रूला दिसत नाही. हे लक्षात घेऊन दिवसाच त्यांना ठार मारीन. माझ्या माहितीप्रमाणे शत्रू गुहेत राहत असल्याने पळून जाण्यासाठी त्यांच्या तळाला दुसरा गुप्त दरवाजा नाही. पलायनासाठी गुप्तद्वार नसलेले दुर्ग,किंवा तळ म्हणजे तुरुंगच समजावे.
             हे राजा, ज्या प्रमाणे प्रजेचं पालन हे राजाचं कर्तव्य आहे त्याप्रमाणेच योग्यवेळी प्रजाजनांना आदेश देऊन त्याच्याकडून कामे करवून घ्यायचा अधिकारही राजाला आहे. राजाने कर्तव्यपालनात कसूर करू नये त्याप्रमाणे अधिकाराच्या अम्मलबजावणीतही कसूर करू नये. ज्या सेवकांना आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे वाढविलं असेल त्यांना संकटसमयी राज्याच्या रक्षणार्थ,  यज्ञाच्या तयारीसाठी जमविलेल्या समिधाप्रमाणे युद्धासाठी सुसज्ज केलं पाहिजे. किंबहुना ह्या एकमेव दिवसासाठी राजाने आपल्या सैन्याची, आपल्या सेवकांची, आपल्या प्राणाप्रमाणे काळजी घेऊन, त्यांचं योग्य पालनपोषण करून, मनात थोडाही मोह वा करुणा न ठेवता त्यांना युद्धाच्या आगीत अर्पण केले पाहिजे.

ज्या सेवकांसी अति काळजीने । प्राणासमा वाढविलेचि प्रेमे
निर्मोह होऊन तयां त्यजावे  । युद्धाग्निमध्ये समिधेप्रमाणे॥''

आता तू माझ्याबद्दल आदर, प्रेम, करुणा काहीही दाखविणे उचित नाही. जसे सांगितले तसेच वाग.''
           ठरल्याप्रमाणे सर्वांच्या देखत राजाने अतीशय वाईट शब्दात स्थिरजीवीची निर्भर्त्सना करायला सुरवात केली. ते पाहून राजाचे सेवक स्थिरजीवीला मारायला पुढे सरसावले. त्यांना आवरीत राजा म्हणाला ``तुम्ही राहू द्या. मीच ह्या नीचाकडे बघून घेतो.'' त्याला खाली पाडून त्याच्या उरावर बसून त्याला आपल्या चोचीने रक्तबंबाळ केल्याचा अभिनय करत कोणालाही कळणार नाही अशाप्रकारे मागवून घेतलेले रक्त त्याच्या अंगावर ओतून त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आपल्या परिवारासह तो ऋष्यमूक पर्वतावर निघून गेला.
             त्याचवेळी गुप्तपणे तेथे उपस्थित असलेल्या घुबडांच्या गुप्तचराने कृकालिकाने काकराज मेघवर्णाच्या आणि मंत्रीवर स्थिरजीवीच्या भांडणाची कथा आणि त्यानंतर मेघवर्णाच्या सहपरिवार पलायनाची हकिगत अरिमर्दन या घुबडराजाला सागितली. ती ऐकून उलूकराज म्हणाला, ``त्वरा करा. त्वरा करा. शत्रू परिचित स्थान सोडून अपरिचित स्थानी पळून जात असतांना निर्बळ असतो. असा पळून जाणारा शत्रू फार पुण्यानेच मिळतो. शत्रू पळून जात असतांना त्यांच्यात दोन दोष, दोन कमतरता तयार होतात. एक तर तो आपलं स्थान सोडून पलायन करत असतो. त्यामुळे स्वस्थानाहून मिळणारी मदत त्याला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अपरिचित ठिकाणी जात असतो त्यामुळे तेथून मदत कशी आणि कुठून मिळेल ह्या बाबतीत तो पूर्णज्ञानी नसतो. अशावेळी समय साधून जर आसरा-रहित शत्रूवर स्वारी केली तर दोन्ही बाजूने मदत न मिळाल्याने तो आपल्या सहज ताब्यात येऊ शकतो.''

तुटेचि आधारच मागचाही । सहाय्य लाभे न पुढेहि काही
पलायनी दोष असेची दोन ।  येईच शत्रू सहजी मुठीत

बघता बघता सर्व उलूकसैन्य वटवृक्षापाशी येऊन पोचलं. सर्वांना प्रोत्साहन देत अरिमर्दनाने सर्व वृक्षाला आपल्या सैन्याचा वेढा दिला. जेंव्हा त्यांना तेथे एकही कावळा नजरेस पडला नाही, तेंव्हा तो अत्यंत प्रसन्न मनाने झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर जाऊन बसला. आपल्या सैनिकांना आदेश देत म्हणाला, ``हे सर्व कावळे कुठल्या वाटेने पळून गेले आहेत ते शोधू काढा. ते त्यांच्या दुसर्‍या झाडाचा आश्रय घेण्यापूर्वीच त्यांचा पाठलाग करून त्यांना मारून टाका.''

जरी मिळे आश्रय थोडकाही । हाती न लागेचि रिपू कधीही
सुसज्ज दुर्गात प्रविष्ट होता । अवध्य होई प्रतिस्पर्धकाला॥
क्रमशः

8

बालमित्रांनो, कावळ्यांच्या पलायनानंतर उलूकराज अरिमर्दनाने वटवृक्षाचा ताबा घेतला. त्याने आपल्या सैन्याला पळून जाणा र्‍या कावळ्यांचा पाठलाग करायची आज्ञा दिली. त्याचवेळी झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचा बहाणा करणार्‍या स्थिरजीवीने विचार केला, ``जर शत्रू माझा वृत्तांत ऐकल्याशिवायच  इथून निघून गेला. तर माझा काय उपयोग?''  एखाद्या कामाचा आरंभ न करणं हे पहिलं बुद्धीलक्षण आहे तर प्रारंभ केलेलं काम पूर्ण करणं हे दुसरं बुद्धीलक्षण आहे.

घेऊ नये कार्य करावयासी । तडीस न्यावे जरी घेतलेची
सोडून देतोचि अपूर्ण कार्य । नाही कधी तो  नर बुद्धिमंत॥

कह्णत कह्णत क्षीण आवाजात तो बोलू लागला. त्याच्या त्या कह्णण्याच्या आवाजाने सर्व  घुबडे त्याला ठार मा र्‍ण्यासाठी धावून गेली.
 – ``अरे कोणी आहे का रे----- ? मी मेघवर्णाचा मंत्री स्थिरजीवी. माझी काय ही दशा बनवलीए त्या मेघवर्णानी बघा! कुणीतरी राजा अरिमर्दनाला जाऊन सांगा. मला त्याला ब र्‍याच गोष्टी सांगायच्या आहेत.''
                      तोपर्यंत अरिमर्दनाच्या काही सेवकांनी  रक्ताच्या थारोळ्यात कह्णत पडलेल्या स्थिरजीवीची कहाणी अरिमर्दनला येऊन सांगितली. आश्चर्यचकित होत त्याचक्षणी अरिमर्दन स्थिरजीवीला भेटायला आला, आणि म्हणाला,``आपली ही अशी अवस्था कशी झाली?''
``काय सांगू महाराज! आपण आमच्या असंख्य कावळ्यांना मारले. शोकाने आणि रागाने बेभान झालेला मेघवर्ण सर्व कावळ्यांना घेऊन आपल्यावर चालून जाण्यासाठी सज्ज झाला. मी त्याला खूप समजावले.

ज्योतीवरी झेप पतंग घेता । घेतो जसा मृत्युचि ओढवूनी
बलाढ्यशत्रूसमवेत तैसा  । जो झुंजतो तोचि विनष्ट होई॥

वारंवार मी त्याला आपल्यासमवेत  तह करण्याचा सल्ला दिला. त्याला समजावूनही सांगितले की, -
बलिष्ठ शत्रूसमवेत कोणी । घ्यावे न ते वैरच ओढवूनी
सर्वस्व द्यावे परि प्राण रक्षी । लाभेच श्री, प्राण पुन्हा न येती॥

पण दुराचारी लोकांनी त्याचे कान फुंकले. माझ्यावरच क्रुद्ध होऊन, मला पक्षपाती आणि शत्रूचा हस्तक ठरवून त्या दुष्टबुद्धी मेघवर्णाने माझी अशी दशा केली. मला जरा उडता यायला लागलं की, मी तुम्हाला मेघवर्णाच्या नवीन वस्तीचे ठिकाण दाखवीन आणि त्याला ठार करून माझा बदला घेईन.''
     अरिमर्दनाच्या वडिल आणि आजोबांपासून चालत आलेले अरिमर्दनाचे पाच मंत्री होते. रक्ताक्ष, क्रूराक्ष, दिप्ताक्ष, वक्रनास आणि प्रकारकर्ण त्यावेळी सारेजण तेथे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर  त्याने विचारविनिमय करायला सुरवात केली. ``शत्रूचा अत्यंत प्रबळ मंत्री जखमी अवस्थेत आपल्या हाती आला आहे.  आपण काय कारवं असं आपल्याला वाटतं?'' अरिमर्दनाने आपल्या पाचही मंत्र्यांना उद्देशून प्रश्न विचारला.
``महाराज, विचार कसला करता! शत्रू दुर्बळ असला तरी त्याला ठार मारणेच उचित '' रक्ताक्ष म्हणाला. शत्रू जखमी, दुर्बळ आहे म्हणून त्याला दया दाखविण्याची काहीच गरज नाही. एकदा का तो सशक्त झाला तर आपल्याला तो आवरणार नाही. महाराज शत्रूला दुर्बळ करायची ही चालून आलेली संधी परत परत आपल्याला मिळणार नाही.

संधि स्वतः येउन एकवेळा । ठोठाविते दार प्रतीक्षकाचे ।
ती वेळ गेली जरि आळसाने । अशी सुसंधी कधिही न लाभे॥

``महाराज , शत्रूच्या ह्या मंत्र्याला ठार मारण्याने विनासायास आपले राज्य निष्कंटक होईल.''  रक्ताक्षने दिलेला सल्ला ऐकून अरिमर्दनाने  क्रूराक्षकडे बघत त्याला विचारले, ``मंत्रीमहोदय, आपले काय म्हणणे आहे?''
``छे छे शरण आलेल्याचा वध करणे उचित नाही ''  क्रूराक्ष म्हणाला. त्यातून हा  तर जखमी आणि दुर्बळ आहे. त्याला त्याच्या राजाने निर्दयपणे मारून टाकून दिले आहे. त्याच्या राजाने त्याला योग्य तो सन्मान दिला नाही. हा विचार करून आपण त्याला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. आणि त्याच्या प्राणांचे रक्षण करायला पाहिजे. ते आपल्या हिताचेच ठरेल.''
अरिमर्दनाने सहेतुक दीप्ताक्षकडे बघता दीप्ताक्ष म्हणाला,
``महाराज कधी कधी  आपलं अहित करणारा शत्रूसुद्धा आपली मदत करू शकतो. कोणीही कायमचा मित्रही नसतो आणि कोणीही कायमचा शत्रूही नसतो. शत्रूने अपमानित करून हाकलवून दिलेला आणि आपल्याला शरण आलेला माणूस आपण त्याच्यावर केलेले उपकार स्मरून आपल्याला मदतच करेल.
दीप्ताक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर अरिमर्दनाने वक्रनासाला त्याचाही अभिप्राय विचारला.
वक्रनास म्हणाला, महाराज हा अवध्य आहे. शिवाय शत्रू कधी कधी आपल्या कल्याणाचे कामही करू शकतो. कारण शत्रूंना आपापसात झुंजवत ठेऊन त्यांचा दोघांचाही परस्परच नाश होऊ शकतो. हाच आपल्याला शत्रूच्या गुप्त गोष्टी सांगून आपल्याला त्याच्यापर्यंत पोचण्यास मदत करू शकतो. त्याला मारणे उचित नाही. हा अनेक प्रकारे आपल्याला उपयोगी पडू शकेल.'' दीप्ताक्ष क्रूराक्षशी सहमत होत म्हणाला.
अरिमर्दनाने आता प्राकारकर्णलाही त्याचे काय मत आहे असे विचारता
प्राकारकर्ण म्हणाला, `` महाराज हा अवध्य तर नक्कीच आहे. कदाचित ह्याला मदत करण्यामुळे कावळे आणि घुबडांमधे मैत्रीही होऊ शकते. कावळ्यांमधे आणि घुबडांमधे मैत्री झालीच तर आपले पिढ्यानुपिढ्या असलेले वैर संपून आपण सर्वजण शांततामय जीवन जगु शकू.''
प्राकारकर्णचे विचार सागून झाल्यावर अरिमर्दनालाही त्यांचे विचार पटले. आणि स्थिरजीवीला आश्रय देण्याचा त्याने निश्चय केला.               रक्ताक्षने सर्वांनाच समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. पण रक्ताक्षशी कोणीच सहमत नव्हते. शेवटी मनोमन हसून  तो म्हणाला, ``  खेदाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी महाराजांना अयोग्य सल्ला देऊन स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला आहे.'' सर्व मत्र्यांवरून  आपली नजर फिरवत सर्व मंत्र्याना उद्देशून रक्ताक्ष म्हणाला, ``आपण सर्वांनी स्वतःच्या मुळावरच घाव घालून घेतला आहे. आता आपला विनाश निश्चित आहे.''
जे हित सोडून अहिताचाच सल्ला देतात, त्यांना बुद्धिमान माणसाने शत्रूच समजायला पाहिजे.

होताचि सूर्याेदय नाश पावे । अंधारजाळे घनदाट जैसे
तैसेच मंत्री बुडवीच राज्ये । देऊन राजास अयोग्य सल्ले॥

रक्ताक्षच्या जीव तोडून सांगण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सर्वजण स्थिरजीवीला उचलून घुबडांच्या गुहेत घेऊन  जायला लागले. त्यावेळी स्थिरजीवी म्हणाला, ``महाराज माझ्या सारख्या अकिंचन, दरिद्रयाचा आपल्याला काय उपयोग? माझं रक्षण करून  आपल्याला तरी काय लाभ होणार? त्यापेक्षा आत्ताच मी अग्निप्रवेश करून माझं जीवन समाप्त करतो. महाराज कृपा करून मला अग्नी प्रदान करा, आणि माझा उद्धार करा.''
त्याच्या मनातील कुटील भाव बरोबर ओळखून रक्ताक्षने त्याला विचारले, ``आपल्या अग्नीप्रवेशाचे कारण?''
स्थिरजीवी म्हणाला, `` मी तुमचा पक्ष घेतल्यामुळे  मेघवर्णाने माझी ही अशी दुर्दशा केली आहे. ह्याचा बदला घेण्यासाठीच मी पुढच्या जन्मी घुबडांच्या योनीत जन्म घेईन. मेघवर्णाच्या समूळ नाशानेच माझ्या आत्म्याला शांती लाभेल. ''
``तू महा कुटील आहेस स्थिरजीवी!'' रक्ताक्ष म्हणाला. कपटीपणाने बोलण्यात तुझा हात कोणीही धरू शकणार नाही. तू उलूकयोनीत जन्म घेतलास तरी तुझं कावळ्याचच कुळ तला उत्तम वाटेल.''
 रक्ताक्ष आपल्या सहकार्‍यांकडे वळून म्हणाला,`` विनाशकाले विपरीत बुद्धी  म्हणजेच विनाशकाळी बुद्धीही फिरते ''

------------------------------------------
9
              माझ्या बालमित्रांनो मागच्यावेळेस आपण पहिलं की, अरिमर्दनाच्या हितचिंतक अशा रक्ताक्ष या मंत्र्यांने राजाला वारंवार  सावध करायचा प्रयत्न करूनही सर्वांनीच त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. स्थिरजीवीने अग्निप्रवेशाची इच्छा व्यक्त केली. त्याचे कारण रक्ताक्षने विचारता तो म्हणाला, ``पुढच्या जन्मी उलूकयोनीत जन्म घेऊन मी माझा प्रतिशोध पूर्ण करीन.'' त्यावर रक्ताक्ष उपहासाने म्हणाला, ``उलूकयोनीत जन्म घेऊन सुद्धा तू कावळ्यांच्याच कुळाचे गोडवे गाशील. अशीच एक गोष्ट तुला सांगतो.'' रक्ताक्ष सांगू लागला,
       हिमालयाच्या एका विशाल कड्यावरून कोसळणार्‍या जाह्नवी नदीच्या धबधब्याच्या जवळ एक सुंदर जागा होती. स्वच्छ, सुंदर नीतळ पाणी कड्यावरून कोसळतांना त्याचा धीरगंभीर ध्वनी आसमंतात घुमत राहे. खाली वाहणा र्‍या नदीत विविधरंगी तरंग चमकतांना दिसत. तेथेच काही ऋषिमुनींचे आश्रम होते. अतीशय कठोर नियम पाळणा र्‍या या ऋषिंमधेच ऋषि याज्ञवल्क्यही होते. ते तेथील आश्रमांचे कुलगुरू होते.
           एक दिवस ते सूर्योदयाच्यावेळी नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य देत होते. त्याचवेळी एक ससाण्याच्या चोचीतून सुटलेलं एक छोटं उंदराचं पिल्लु त्यांच्या हातात पडलं. त्यांनी त्याला एका पानावर ठेऊन दिलं, आणि परत स्नान करून, अर्घ्य देऊन ते परत आले. घाबरलेलं ते उंदराचं पिल्लु अजूनही पानावर बसलेलं पाहून त्यांनी आपल्या तपोबलाने तिला एका मुलीचं रूप दिलं. तिला घेऊन ते घरी आले. मुलबाळ नसल्याने दुःखी असलेल्या आपल्या पत्नीला बोलावून ते म्हणाले, `` हीच आपली मुलगी समजून हिचच पालनपोषण कर.''
                 अत्यंत लाडात वाढलेली ती कन्या हळु हळु मोठी होऊ लागली. बघता बघता विवाहायोग्य झाली. आपल्या मुलीकडे बघत याज्ञवल्क्यांची पत्नी म्हणाली, `` अहो आपली ही मुलगी आता उपवर झाली आहे. तिच्यासाठी योग्य वर शोधायला पाहिजे.'' ऋषि म्हणाले , `` बरोबर आहे. हिच्यासाठी मी अनुरूप वर शोधीन. जर तुला मान्य असेल तर मी आत्ताच प्रत्यक्ष भगवान सूर्याला बोलावून त्यांच्यासोबत हिचा विवाह करून देईन.'' आनंदाने पत्नी म्हणाली, `` ही तर भाग्याचीच गोष्ट आहे.'' तात्काळ आपल्या तपोबलाने ऋषींनी सूर्याला बोलावलं. सूर्य येताच त्यांनी आपल्या लाडक्या मुलीला बोलावून विचारलं, `` मुली तुला हा पति आवडला का? '' मुलगी म्हणाली, `` बाबा हा तर फारच दाहक आहे. तुम्ही माझ्यासाठी दुसरा वर शोधा.''
                मुनीवर सूर्याला म्हणाले, '' तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे?'' ``मुनीवर मला ढग झाकोळून टाकतो. ढगच माझ्याहून श्रेष्ठ आहे.'' ऋषीमहाराजांनी तात्काळ ढगास आवाहन करून बोलावून घेतलं. ढग येताच मुनी म्हणाले, ``मुली तुला हा पति पसंत आहे का?'' नाक मुरडून मुलगी म्हणाली, `` हा काळा आणि अवाढव्य! नको नको. तुम्ही मला दुसरा चांगला नवरा शोधा.''
                 मुनी महाराजांनी ढगाला विचारलं, `` तुझ्याहून श्रेष्ठ कोण आहे? '' ढग नम्रपणे म्हणाला, `` ऋषिवर वारा मला सारखा इकडे तिकडे पळवतो आणि छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याहूनही श्रेष्ठ आहे.'' ``ठीक आहे.'' मुनी म्हणाले. त्यांनी वा र्‍याला आवाहन करताच वायु त्याच्यापुढे उपस्थित झाला. ``मुली हा वारा तुला योग्य वाटतो का?'' त्यांनी मुलीला प्रश्न केला. `` बाबा हा फारच चंचल आहे ह्याच्याहून कोणी श्रेष्ठ असेल तर बघा.''
 ऋषिवरांनी वा र्‍याला विचारलं, `` तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे?''. वारा लगेचच उत्तरला, `` महाराज माझ्यापेक्षा पर्वत श्रेष्ठ आहे. तो मला आडवतो. मला हलू देत नाही. ऋषिंनी पर्वताला बोलावल्यावर ऋषिकन्या म्हणाली, ``हा ओबडधोबड, आळशी नवरा मला नको गं बाई!''
          ऋषींनी पर्वतालाही त्याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे ही विचारणा केली. पर्वत म्हणाला, ``तपस्वीमहाराज उंदीर माझ्यामधे बिळं करून मला जेरीस आणतात. सगळीकडून मला कुरतडून, खोदून माझा जीव अगदि नकोनकोसा करतात. मुलीसाठी मूषकमहाराजांना ऋषींनी आमंत्रण दिलं. उंदीररावांना पाहून मुलगी हरखून गेली. ``हाच मला योग्य वर आहे. ह्याच्याबरोबरच मी आनंदाने संसार करू शकेन. ती म्हणाली ,``हे ऋषीवर मला परत उंदीरच करा. मला हा माझा पति म्हणून पसंत आहे.''
 गोष्ट सांगून झाल्यावर रक्ताक्ष म्हणाला ``अशा प्रकारे माणूस झालेल्या उंदरीने सुद्धा सूर्य, मेघ, वायू, पर्वत ह्या सर्वांना सोडून उंदराच्याच गळ्यात माळ घातली.'' मग स्थिरजीवीला उद्देशून तो म्हणाला. ``हे कुटील स्थिरजीवी, पुढचा जन्म घेऊनही तू वायसांचाच हितचिंतक असशील.''
                   रक्ताक्षच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देत घुबडे स्थिरजीवीला आपल्या गुहेत घेऊन आली. मनातल्या मनात हसत स्थिरजीवी म्हणाला `` राजा!, ज्या एकनिष्ठ, हितैषी रक्ताक्षने मला मारून टाकण्याचा सल्ला तुला दिला तो एकटाच नीतीज्ञ आहे.'' किल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचल्यावर अरिमर्दनाने आपल्या सर्व सेवकांना सांगितले की, ``हा आपला हितैषी आहे ह्याची चांगली काळजी घ्या.'' सावध असलेल्या स्थिरजीवीने विचार केला ``जर मी किल्याच्या आत गेलो, तर माझ्या प्रत्येक हालचालींवर ह्यांची बारीक नजर राहून हे सावधान होतील. मला किल्याच्या दरवाजावरच राहिले पाहिजे.''  तो म्हणाला, `` महाराज, मी आपला सेवक ह्या दरवाजापाशीच ठीक आहे. रोज आपण येता जाता, आपल्या चरणांची धूळ लागून मी पवित्र होईन. येथेच मी आपली सेवा करत राहीन.'' `` ठीक आहे.'' राजा म्हणाला. रोज थोड्या थोड्या काटक्या आणून स्थिरजीवीने गुहेच्या तोंडाशीच घरटे बनविण्याचा उद्योग सुरू केला. स्थिरजीवीचा हा उद्योग रक्ताक्षच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
                          घुबडांच्या भाग्याचे फासे उलटे पडल्याने रक्ताक्षच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. राजाच्या कृपेने रोज पोटभर मांस खाऊन स्थिरजीवी एखाद्या मोरासारखा बलवान झाला.   स्थिरजीवीची अशाप्रकारे ठेवलेली बडदास्त पाहून रक्ताक्षने एकेदिवशी आपल्या अनुयायांना आणि सेवकांना गुप्तपणे बोलावून सांगितलं - ``जोपर्यंत हा राजा योग्य रीतिने वागत होता तोपर्यंत, त्याचं राज्यही सुरक्षित होतं. एका अनुभवी कुलपरंपरेने आलेल्या मंत्र्याने राजाला जेवढं समजावून सांगायला पाहिजे तेवढं मी त्याला समजावलं. परिणामांची कल्पनाही दिली. परंतु माझ्यावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाही. मला वाटतं आपण ही गुहा सोडून दुस र्‍या पर्वताचा आश्रय घेणच उचित होईल. जो माणूस आपल्या दीर्घदृष्टीने भविष्यात घडणा र्‍या गोष्टींचा अंदाज घेत वर्तमानातील कार्य करतो तोच नंतर प्रशंसेस पात्र ठरतो. जो अविचाराने पुढील गोष्टींचा विचार न करताच काम करतो, तो फक्त कष्टांचा धनी होतो. सर्वांच्या निंदेस पात्र ठरतो. ह्या वनातच माझं आयुष्य गेलं पण अजूनही मी गुहा बोलतांना ऐकलं नाही.''
रक्ताक्षाच्या अनुयायांनी विचारलं
``गुहेची वाणी!  ती कसली?''
क्रमशः 
10

माझ्या बालमित्रांनो,
मागच्यावेळेस आपण पाहिलं की, उलूकराज अरिमर्दनाचा मंत्री रक्ताक्ष याने वारंवार अरिमर्दनाला सावध करूनही अरिमर्दनाने त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून स्थिरजीवीला आश्रय दिला. ते पाहून रक्ताक्ष आपल्या अनुयायांना आणि सेवकांना म्हणाला. ``ह्या राजाचा विनाश आता जवळ आला आहे. जो व्यक्ती भविष्याचा विचार करून वागत नाही तो नष्ट पावतो. ह्या वनात राहून मी म्हातारा झालो पण अजूनपर्यंत गुहेचे बोल मी कधी ऐकले नाही.''
``गुहेचे बोल? ते कसले?'' अनुयायांनी विचारले.
रक्ताक्ष सांगू लागला, -
एका वनात एक खरनखर नावाचा सिंह राहत होता. एक दिवस भूकेने व्याकूळ होऊन तो भक्ष्याच्या शोधात हिंडत होता. पण दिवसभर हिंडूनही त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्ताच्या सुमाराला हिंडत असता त्याला एक गुहा दिसली. तो त्या गुहेत शिरला. त्याने विचार केला रात्री कोणी ना कोणी प्राणी ह्या गुहेत आश्रयाला येईल. मी इथेच लपून बसतो.
तेवढ्यात त्या गुहेत राहणारा दधिपुच्छ नावाचा कोल्हा तेथे आला. गुहेच्या तोंडापाशी आल्या आल्याच त्याला सिंहाच्या पावलांचे ठसे दृष्टीस पडले. आत जाणारे पावलांचे ठसे दिसत होते, परंतु बाहेर पडणारे पावलांचे ठसे काही दिसत नव्हते.  त्याने विचार केला, ``आता मी मेलोच. ह्या गुहेत नक्कीच सिंह गेलेला आहे. पण तो परत बाहेर आला किंवा नाही हे कसं काय कळणार?''
            थोडावेळ थांबून त्याने विचार केला आणि त्याने हाक मारली, `` गुहे! अग गुहे!!'' आतल्या हालचालीचा कानोसा घेत तो थोडावेळ थांबला. काहीही आवाज येत नाही हे पाहून तो परत म्हणाला,  ``अरेच्या! असं विपरीत कसं झालं? हे गुहे आपण केलेला ठराव तू विसरलीस का? मी बाहेरून आलो की तुला हाका मारणार आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तूही मला हाक मारणार हे ठरलं असतांनाही तू मला प्रतिसाद का देत नाहीस? तुला कोणाची भीती तर वाटत नाही? तू मला हाक मारली नाहीस तर मी येथून निघून जाईन.''
आत लपलेल्या सिंहाने विचार केला, ``खरोखरच नेहमी हाक मारणा र्‍या ह्या गुहेला आज काय बरं झालं असेल? माझ्या येण्यामुळे ती घाबरली तर नसेल? ते ही खरं आहे म्हणा! घाबरलेल्या माणसाच्या हालचाली थांबून तो पुतळ्यासारखा स्तब्ध होऊन जातो. भयाने त्याच्या मुखातून शब्दही उमटत नाहीत.''

होतो भयाने थरकाप ऐसा । मुखातुनी शब्दहि तो फुटेना
काटा उभा राहतसेच अंगी । जिवंत व्यक्ती पुतळाच होई॥

``आता ही गुहा जर ह्या कोल्हयाच्या हाक मारण्याला प्रतिसाद देत नसेल तर मीच त्याला प्रतिसाद देतो त्यामुळे तो निःशंकपणे गुहेत येईल आणि मला आयतेच भोजनही मिळेल.''
सिंहाच्या गर्जनेचा आवाज ऐकून कोल्हा पळत सुटला. पळता पळता तो म्हणाला,

झालोच मी वृद्ध वनात याची । नाही गुहेचा रव ऐकला मी
जे कार्य केले समजून चित्ती । त्याने न होई कधि शोक चित्ती॥

 ही गोष्ट सांगून झाल्यावर रक्ताक्ष आपल्या अनुयायांना म्हणाला, ``कुठलेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.
अविचाराने महाराजांना चुकीचा सल्ला देऊन आपल्या पायांवर धोंडा पाडून घेणारे मंत्री मूर्ख आहेत. माझा योग्य सल्ला धुडकावून लावून आपल्या मूर्ख मंत्र्यांवर विश्वास ठेऊन ह्या अत्यंत घातक अशा स्थिरजीवीला येथे आणणारे महाराज त्याहून मूर्ख आहेत. आणि ह्या मूर्खांना सल्ला देणारा मी त्याहून अधिक मूर्ख आहे. मला वाटते येथे सर्व मूर्खांचेच राज्य आहे. आपल्या कार्याच्या परिणामाचा विचार न करता कार्य केले तर फक्त पश्चात्तापच नशिबी येतो. ''
        पुढे होणार्‍या परिणामांचा विचार करून गुहा सोडणे हेच इष्ट आहे हे जाणून रक्ताक्ष सहपरिवार गुहा सोडून निघून गेला.
           अरिमर्दनाचा एकमेव दूरदर्शी मंत्री  रक्ताक्ष निघून गेल्यावर स्थिरजीवीही निर्धास्त झाला. मनाशीच हसून तो विचार करू लागला की, ``रक्ताक्षाचं येथून निघून जाणं माझ्या दृष्टीने फारच हितकारक आहे. तोच एकटा दूरदर्शी होता. बाकी सारे मूर्ख आहेत. आता माझा खेळ अजून सोपा झाला. ह्या सर्वांना आता मी सहज मारू शकेन.''  अरिमर्दनाला अयोग्य सल्ला देणारे मंत्री पाहून विस्मयाने विचारपूर्वक तो म्हणाला, ``भाग्य प्रतिकूल झाले की असेच होते. जो आपल्याला कल्याणाचा मार्ग दाखवत असेल तोच शत्रू वाटतो. त्याचाच आपण तिरस्कार करतो. त्यालाच मारण्याच्या कारवाया करायला लागतो आणि जो लबाड, धूर्त आणि अविश्वसनीय असेल, तोच अति जवळचा वाटू लागतो. अशावेळी शुभ गोष्टी अशुभ वाटायला लागतात. आणि कल्याणकारी गोष्टी पाप! ज्या राजाकडे असे विश्वासू, दीर्घदृष्टीचे मंत्री नाहीत त्यांचा सहज पराभव होतो. असे अयोग्य सल्ला देणारे हे मंत्रीरूपातले शत्रूच मानायला हवेत.

शत्रूच वाटे अति गाढ मित्र । मित्रास शत्रू समजेचि उग्र
होताचि सारे प्रतिकूल भाग्य । होते मनाचीच स्थिती विचित्र॥

           ह्या मूर्खांचा आता मी सहज पाडाव करू शकेन.'' असा विचार करून गुहेच्या तोंडाशीच केलेल्या  आपल्या घरट्यात रोज अजून थोड्या थोड्या काटक्या आणून गुहा जाळण्याच्या इराद्याने तो घरट्याचा आकार वाढवू लागला. गुहेच्या तोंडाशीच पर्याप्त काड्यांचा संचय झाल्यावर एक दिवस सूर्योदयाच्यावेळी सर्व घुबडे झोपलेली असतांना तो शीघ्रतेने मेघवर्णराजाकडे आला.
              स्थिरजीवीला पाहून अत्यंत आनंदित झालेल्या मेघवर्णाने विचारले, `` काका तुम्ही ठीक तर आहात ना? इतके दिवस काय काय झालं ते मला सविस्तर सांगा.'' स्थिरजीवी म्हणाला, ``ही वेळ हे सारं सांगण्याची नाही.मी सांगतो ते नीट ऐक. मी शत्रूची गुहा पूर्ण जळून जाण्यास योग्य बनविली आहे. आता तुम्ही सर्वजण एकएक जळती काडी आणून ती लवकरात लवकर गुहेच्या तोंडाशीच बनविलेल्या घरट्यात नेऊन टाका. त्यामुळे शत्रू कुंभीपाक नरकात होणा र्‍या यातना सोसत, तडफडत मरून जाईल. त्वरा करा''
येता कृतीचे फळ ते समीप । त्वरा करावी करुनी शिकस्त
केला जरी स्वल्प कुणी विलंब । तो काळ घेतो पिउनी रसास॥''
क्रमशः 
-----------------------------------------------
                                11

माझ्या बालमित्रांनो,
अशा प्रकारे स्थिरजीवीने शत्रूच्या गुहेच्या तोंडाशीच आपले भले मोठे घरटे तयार करून शत्रूची गुहा जळून जाण्यास योग्य केली. तो कावळायांचा राजा मेघवर्ण याच्याकडे आला, आणि त्याने प्रत्येक कावळ्याला एक जळती काडी आणून त्या घरट्यात नेऊन टाकायला सांगितली.
                स्थिरजीवीने सांगितल्याप्रमाणे मेघवर्णासहित सर्व कावळ्यांनी एकएक जळती काडी गुहेच्या दारशी असलेल्या घरट्यात नेऊन टाकायला सुरवात केली. बघता बघता आग भडकली. आगीच्या धूराने आणि आगीच्या ज्वाळांनी होरपळून जाणारे, दिवसा आंधळे असलेले सारे घुबड आता रक्ताक्षचा कळकळीचा उपदेश आठवू लागले. स्थिरजीवीला दूषणे देऊ लागले. आणि स्वतःच्याच मूर्खपणाचा धिःक्कार करू लागले. गुहेला बाहेर पडण्यासाठी अजून कुठलीच वाट नसल्याने  माठात/कुंभात शिजवलेल्या अन्नाप्रमाणे अरिमर्दनासह सर्व घुबड जळून भस्म झाले.
        आपल्या संपूर्ण शत्रूंचा नायनाट झाल्यावर मेघवर्ण परत आपल्या प्रजाजनांसह आपल्या वटवृक्षावर राहण्यास गेला. दरबारात आपल्या सिंहासनावर बसून मोठ्या नम्रतेने त्याने स्थिरजीवीला विचारले, ``काका, इतके दिवस आपण शत्रूंच्या राज्यात एकटेच कसे राहिलात हे जाणून घेण्याची आम्हाला सर्वांनाच फार उत्सुकता आहे. एकवेळ चितेत उडी घेऊन प्राणत्याग सोपा पण शत्रूच्या संपर्कात एक क्षण देखील राहणे कठीण आहे.''
             हसून स्थिरजीवी म्हणाला, `` हे राजा भविष्यात आपल्याला मिळणार्‍या फळाच्या आशेनेच सर्व कष्ट विसरले जातात. पुढे येणार्‍या पीकाच्या आशेनेच शेतकरी शेतात अतीशय काबाडकष्ट  करतो. जमिन नांगरून पेरणी करतो. पाणी देतो. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पिकाची राखणही करतो.''
          ``संकटकाळी जे जे उपाय हिताचे असतील ते सर्व कौशल्याने योजले पाहिजेत. हा उपाय काय अगदिच साधा आहे म्हणून त्याला कमी लेखू नये. संकटाचा सामना करतांना गांडीवधारी अर्जुनालाही हातात बांगड्या भरून स्त्रीवेश घ्यायला लागला होता. कठोर संकटसमयी बलवान माणसानेसुद्धा काळापुढे नमते घेऊन योग्य वेळेची वाट बघत सावधतेने रहावे. सर्व काही माहीत असूनही डोळे झाक करून आणि मौन बाळगून वेळ पडली तर तुच्छ किंवा दुष्ट लोकांच्या संगतीत राहून हलकीसलकी कामे करण्यातही खेद अथवा संकोच मानू नये.''
स्थिरजीवी मेघवर्णाला म्हणाला, -
'' राजा, काही गोष्टी कालसापेक्ष असतात. त्यासाठी वाटच पहावी लागते. झाडाला पाणी, खत वेळेवर द्यायचे काम आपण नियमीत करू शकतो. पण त्याला फुले येण्यासाठी वसंतऋतुपर्यंत वाटच पहायला लागते. त्याप्रमाणे एखाद्या कार्यात सफलता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह, धैर्य आदि गुण जरी तुमच्याकडे असले तरी, भाग्यानी मिळणार्‍या गोष्टींसाठी तुमच्या उत्साहाला, तेजस्वीपणाला, शौर्याला आवर घालून योग्य वेळेची वाट बघणे हेच धैर्य आहे. इंद्र, कुबेर, यम असे एकाहून एक महाप्रतापी भाऊ असतांनाही धर्मराजाला विराटाकडे चाकरी करायलाच लागली होती.''
                    मेघवर्ण स्थिरजीवीला उद्देशून म्हणाला, `` मंत्रीवर शत्रूबरोबर इतका काळ राहणं हे तलवारीच्या धारेवर चालण्याप्रमाणे खडतर आहे.''
``बरोबर आहे महाराज. पण इतका मूर्खांचा गोंधळ मी प्रथमच पाहिला आणि रक्ताक्ष सारखा बुद्धिमान, चतुर, नीतीज्ञ, अजोड बुद्धिमत्ता असलेला मंत्रीही मी प्रथमच पाहिला. मला बघताक्षणीच त्याला माझ्या हृदयातील प्रतिशोधाची आग  तात्काळ जाणवली. त्याला बरोबर माहित होते की,

शत्रूकडून आलेला । नर विश्वासू ना कदा
शत्रुचे हित साधाया । गुप्तचर असे महा।।

त्याचप्रमाणे राजा बेसावध असतांना शत्रूकडील माणूस कसा कधी घात करल हे सांगता येत नाही.

बैसता, झोपता, राजा । वाहनातून जातांना
खान-पान प्रसंगी हा । शत्रू घात करी सदा

रक्ताक्षला ह्या सर्व गोष्टींचे तात्काळ आकलन झाले पण त्या मूर्खांना त्याचा उपदेश पटला नाही.
          राजा! संकटसमयी माणसाने खास करून राजाने आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरामुळेच आपल्याला धर्म, अर्थ आणि काम ह्या तीनही गोष्टी प्राप्त होतात. रोग कुठल्या कुपथ्य करणार्‍या माणसाला त्रास देत नाही? अयोग्य सल्ले देणार्‍या मंत्र्यावरच विश्वास ठेवणार्‍या राजाला काळही माफ करत नाही. हे राजा, लक्ष्मी कोणालाच गर्विष्ठ बनू देत नाही. कारण गर्विष्ठ आणि अयोग्य मार्गावर जाणार्‍याचा विनाश ओढविल्याशिवाय राहत नाही.
लोभी माणसाची कीर्ति नष्ट होते. दुष्ट माणसाची मैत्री नष्ट होते. आळशी क्रियाहीन माणसाचे कुळ नष्ट होते. धनलोभाने स्वधर्म नष्ट होतो. (स्वधर्म म्हणजे हाती घेतलेलं योग्य काम) व्यसनाने विद्या आणि शक्ती दोन्हीही नष्ट होतात. तर कृपण माणसापासून सुख पळून जाते.
महाराज, मी शत्रूच्या सहवासात राहून खरोखरच असीधारा व्रत (तलवारीच्या धारेवर चालण्याचे) अनुभवून आलो आहे. अशावेळी  अपमानही पुरस्काराप्रमाणे समजावा लागतो.

अपेक्षा नच मानाची । उपेक्षी अपमानही
ध्येय ठेऊन पुढती । विवेकी कार्य साधती ॥

आवश्यकता पडल्यास कृष्णसर्पाने बेडकांना जसे स्वतःच्या पाठीवर बसवून फिरवले तसे शत्रूला पाठीवर बसवून त्याचे ओझेही वाहून न्यावे लागते.'' सर्वांनी विचारले, ``ही काय गोष्ट आहे काका?''
स्थिरजीवीने गोष्ट सांगायला सुरवात केली.  - 
 ``वरुणाद्रि नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी मंदविष नावाचा एक म्हातारा साप राहत होता. ``काय केलं म्हणजे मला सहज भोजन मिळू शकेल?'' असा विचार करून  तो एका तलावाकाठी येऊन उगीचच अस्वस्थपणे इकडे तिकडे येरझारा घालू लागला. त्याचा अस्वस्थपणा पाहून तळ्याच्या काठावरील एका बेडकाने न राहून त्याला विचारले, `` मामू काय पहिल्यासारखे तुम्ही तुमच्या भोजनासाठी काही प्रयत्न करतांना दिसत नाही.''
                अतीशय दुःखी चेहर्‍याने मंदविष म्हणाला, ``मला अभाग्याला आता थोडंसुद्धा खाण्याची इच्छा उरली नाही. कारण काही दिवसांपूर्वीच एका संध्याकाळी तलावाकाठी एक बेडूक पाहून मी त्या बेडकाचा पाठलाग करीत असतांनाच, तेथे बसून ध्यान करणार्‍या ऋषिंच्या सामानात तो बेडूक लपला. आणि मला कळायच्या आत तेथून पसारही झाला. मी मात्र तो बेडूक तेथेच आहे हे समजून त्या सामानापाशीच घोटाळत राहिलो. प्रत्यक्षात ते सामान नसून ऋषिमहाराजांचा लहान मुलगा तिथे झोपला होता. तो हालला आणि त्याच्या पायाचा अंगठा पांघरुणातून बाहेर आला. बेडूक समजून मी त्याला चावा घेतला. माझ्या कृत्याने संतापलेल्या आणि शोकात बुडून गेलेल्या ऋषिमहाराजांनी मला शाप दिला. ``कुठचाही अपराध नसतांनाही तू  माझ्या मुलाचा घात केलास. आजपासून तू बेडकांचे वाहन होशील. मगच तुला भोजन मिळेल.'' बेडकांनी ही गोष्ट त्यांचा राजा जलपाद याला जाऊन सांगितली. ही अद्भुत गोष्ट ऐकून जलपाद अत्यंत प्रसन्न झाला आणि आश्चर्याने सापाला बघण्यासाठी पाण्याबाहेर आला. सापाच्या फण्यावर बसून इकडे तिकडे फिरायला लागला. बाकी बेडूकही त्याच्या अंगावर बसून जणुकाही मेट्रोत बसल्याची मजा अनुभवायला लागले. ज्यांना त्याच्या अंगावर बसायची संधी मिळाली नाही ते त्याच्यामागून उड्या मारायला आणि पळायला लागले. मंदविषही विविध प्रकारच्या चाली चालून बेडकांना प्रसन्न करु लागला.
                    दुसर्‍या दिवशीमात्र मंदविषाची मंद चाल पाहून जलपादाने त्याचे कारण विचारले. तो म्हणाला, ``महाराज मला काहीच खायला न मिळाल्याने मी  थकलो आहे.''  जलपाद म्हणाला, ``मित्रा, तू आमच्यातले काही म्हातारे अशक्त बेडूक खाऊन तुझी भूक भागव.'' ``हे राजा ऋषिंनीही मला हाच शाप दिला होता. मी तुझा ऋणी आहे'' असे बोलून रोज जलपादाला आपल्या फण्यावरून फिरविण्याच्या बदल्यात मंदविषानी रुचकर अशा बेडकांवर ताव मारायला सुरवात केली. अशा प्रकारे आपण आपल्याच कुळाचा विनाश करत आहोत हे त्या मूर्ख जलपाद या बेडकांच्या राजाला कळलेसुद्धा नाही.
 क्रमशः 
12

           मंदविषसर्पाच्या फण्यावर बसून आपल्याला मजेत फिरता यावे ह्या क्षुद्र हव्यासापोटी जलपाद या बेडकांच्या राजाने मंदविष या सर्पाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या कुळाचा कसा सर्वनाश ओढवून घेतला, ही कहाणी राजाला सांगून स्थिरजीवी  राजा मेघवर्णाला म्हणाला, ``जशाप्रकारे मंदविषाने बेडकांचा नायनाट केला तसाच मी घुबडांचा नाश केला आहे. महाराज,

दावाग्नी जाळी वृक्षांसी । क्षति मूळांसी ना करी
मृदु शीतल वायूने । वृक्ष उन्मळती भुवी॥

जंगलात भडकलेला वणवा वृक्षांना जाळून टाकतो. पण तो त्यांच्या मुळांना इजा करू शकत नाही. पण थंड आणि मृदु वाटणा र्‍या वार्‍याने मात्र झाडं मूळासकट उन्मळून पडतात. अर्थात युद्धाने शत्रूचा समूळ नाश होत नाही. कुटील अशा बुद्धीनेच शत्रूचा समूळ निःपात होतो.''
               ``काका, आपण म्हणाला ते पूर्ण सत्य आहे. पण सर्वच लोक संकटांचा सामना करू शकत नाहीत. आपल्यासारख्या महान व्यक्ती कितीही संकटे आली तरी आपले कार्य अर्धवट सोडून देत नाहीत. अनेक प्रकारच्या नीती हीच त्यांची भूषणे असतात. एखादे हाती घेतलेले कार्य तडीस जाई पर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत.

आरंभ ना करिति विघ्नभयेचि क्षुद्र
माघार मध्यमचि घे बघताची विघ्न।
वर्षाव तो घडुनही शिरि संकटांचा
तो श्रेष्ठ ना डगमगे; करि पूर्ण कामा॥

आपण आपल्या बुद्धिमत्तेनी माझ्या सर्व शत्रूंचा पुरता बोमोड करून हे राज्य निष्कंटक बनविले आहे. खरेच आहे की

व्याधी, रिपू, कर्जचि, अग्नि यांचे।
समूळ उच्चाटन सौख्य देते॥''

स्थिरजीवी म्हणाला, ``महाराज, भाग्यवान मी नाही आपण आहात. आपण कार्याचा प्रारंभ केला आणि ते कार्य तडीस गेले. केवळ पराक्रमाने काम साधता येत नाही. जे काम विचार आणि बुद्धिपूर्वक केले जाते तेच विजय देणारे ठरते.

शत्रू न संपे कधि शस्त्रयोगे
बुद्धी करे नाश समूळतेने।
काया पडे ती जरि आयुधेची
प्रज्ञा विनाशी कुळ, कीर्ति, लक्ष्मी॥

महाराज, शत्रूचा बुद्धिभेद केल्याने जे साध्य होते ते लढाईनेही साध्य होत नाही. जेंव्हा एखाद्या व्यक्तीचे भाग्य अनुकूल असेल, त्याची उन्नती होणार असेल तेंव्हा, त्याची बुद्धी चांगली कामे करण्यासाठी प्रवृत्त होते. त्याची स्मरणशक्ती तीव्र होते. त्याने केलेले तर्क प्रत्यक्षात येतांना दिसायला लागतात. त्याचे चित्त प्रसन्न राहून उन्नतीच्या दिशेने विचार करू लागते आणि सर्व कामे उत्तमप्रकारे करण्याची त्याची आवडही वाढू लागते.
विरक्त, विद्वान आणि धैर्यशाली लोकांच्या सहवासात  राहण्याने माणूस गुणी होतो. त्याला लक्ष्मी प्राप्त होते. अशाच नीतीमान, धैर्यशाली माणसांना राज्यप्राप्तीही होते.'
                 बालमित्रांनो, स्थिरजीवीच्या बोलण्यावर कावळ्यांचा राजा मेघवर्ण विचार करू लगला.  `जे बुद्धीने साध्य होते ते लढाईनेही साध्य होत नाही. विवेकी, विद्वान आणि निस्वार्थ माणसाच्या संगतीत राहिल्याने माणूस गुणी होतो. हेच खरे.'
 मेघवर्ण त्याचा कुलपरंपरागत असलेला मंत्री स्थिरजीवी याला म्हणाला, ``काका,  नीतीशास्त्र खरोखरच महान आहे. नीतीशास्त्राच्या योग्य वापरानेच  घुबडांचा राजा अरिमर्दन आणि त्याचे मंत्री तुमच्यावर विश्वास ठेऊ लागले. त्यांचे गुप्त भेद त्यांनीच तुमच्यासमोर उघड केले. आणि नाश ओढवून घेतला. खरं आहे वनात जाऊन विशालकाय वृक्षांची पूजा करून मगच त्यांना तोडतात.''
स्थिरजीवी म्हणाला,
``हे कार्यतर काय अगदिच सोपे आहे. मी हे तर सहज चुटकीसरशी करून दाखवीन. ह्या विषयात अजून लक्ष घालायची काहीही जरुरी नाही अशा मोठ्या मोठ्या बाता मारून जे काळाची आणि कार्याची उपेक्षा करतात त्याच्या नशीबी पश्चात्ताप आणि दुःखच वाट्याला येते. महाराज, आपण शत्रूरहित झाल्याने आता आपल्याला शांत झोप लागेल.''
शिवाय,
जे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्यांच्या आशीर्वाद, शुभकामना  यांची आवश्यकता असते, जे काम कठोर परिश्रमाने साध्य होते, जे काम करण्यासाठी साहस, धैर्य या गुणांची आवश्यकता असते, ते काम पूर्ण होईपर्यंत मानी, साहसी आणि पराक्रमी व्यक्तिंच्या मनाला शांतता लाभत नाही. हे काम पूर्ण झाल्याने माझं मन अगदि शांत शांत झालं आहे. हे राजा!, आता प्रजेचे हित डोळ्यासमोर ठेऊन तू राज्य कर.

धरे गुणांसी, करि दोष दूरी । देई प्रतिष्ठाच गुणी जनांसी
त्या भूपतीसी नित राज्यलक्ष्मी । प्रसन्न चित्ते धरि आश्रयासी॥

हे राजा, ह्या राज्यलक्ष्मीच्या प्राप्त होण्याने गर्विष्ठ होऊन स्वतःवर संकटे मात्र ओढवून घेऊ नकोस. ज्याच्या मनात गुणांबद्दल आदर असतो,चांगल्या सेवकांची ज्याला कदर असते, जो संकटे येण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करतो, व्यसनांपासून दूर राहतो, तोच राज्यलक्ष्मीचा चिरकाळ उपभोग घेऊ शकतो. राजन्! मी राजा आहे आता मी कसेही वागू शकतो ह्या भ्रमात मात्र राहू नकोस. राजाच्या सर्व विभूती आळवावरच्या पाण्याप्रमाणे कधीच राजाला चिकटून राहत नाहीत. त्या संपर्कहीन असतात. राज्यलक्ष्मी पार्‍याप्रमाणे चंचल आहे. ती हातात येत नाही. शर्थीचे प्रयत्न करूनही तिला बांधून ठेवता येत नाही. वानरजातीप्रमाणे ती अस्थिरबुद्धी असते. वार्‍याप्रमाणे चंचल असते. दुष्टांच्या मैत्रीसारखी ती तुमचा नाश करून त्वरित तुम्हाला असहाय्य स्थितीत सोडून जाते. जहाल नागाने चावा घेतल्यावर त्याचा उपचार करणे जसे अवघड असते त्याप्रमाणे राज्यलक्ष्मीची बाधा झाल्यास त्याचा उपचारही कठीण असतो. बुडबुड्यासारखी ती क्षणभंगूर असते, तर स्वप्नात मिळालेल्या धनासारखी ती क्षणात विनष्ट होते.

राज्याभिषेकासमयीच माथी । जलासवे वर्षति संकटेही
नाना उपायांसह सज्ज राही । हे भूपते संकट-मोचनासी

 हे राजा, राज्याभिषेकाच्यावेळी सोन्याच्या घटातून डोक्यावर जलाभिषेक होत असतांनाच पाण्यासोबत संकटेही कोसळत असतात. ह्याचा विचार करून सर्व संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज रहा.
तसेच, हे राजन् संकटे कोणालाही सोडत नाहीत. राजा राम असो, राजा नल असो, पांडव असोत राजा बळी असो किंवा रावण असो. आपत्तिंसाठी अगम्य असा देश वा माणूस कोणीही नाही. प्रत्येक माणसाला आपल्या नशिबात असलेल्या संकटांना तोंड द्यावेच लागते.
 महाराज माजावर आलेल्या हत्तीचे कान जसे सतत मागे पुढे हालत असतात त्याप्रमाणे लक्ष्मी चंचल आहे. तसेच,

टोकावरीच बांबूच्या । चढे तो ये धरेवरी
यशाच्या शिखरी तैसा । स्थिर ना राहतो कुणी ॥

 बांबूच्या टोकावर चढल्यावर जसा बांबू ओझ्याने वाकतो. आणि टोकावर बसलेला लगेच जमिनीवर येतो तसे यशाच्या शिखरावरही कोणी सतत टिकून राहू शकत नाही. राजन!, हे लक्षात घेऊन न्यायनिष्ठ होऊन प्रजेचा सांभाळ कर.''
मुलांनो, प्रत्यक्ष लढाई न लढताही जिंकलेल्या लढाईची ही गोष्ट काकोलूकीयम्  अशी पूर्ण झाली.

----------------------------------------------------------
समाप्त