।। श्री पाण्डुरङ्गाष्टकम् ।।

      
Image result for lord Panduranga free downloadImage result for lord Panduranga free download
                     श्री आद्य शंकराचार्य  आपल्या दिग्विजय यात्रेच्यावेळी महाराष्ट्रातील पंढरपूर क्षेत्री आल्याचा उल्लेख चिद्विलासयतींच्या `शंकरविजय ' या ग्रंथात आढळतो. आचार्यांचे अवतार कार्य सहाव्या ते सातव्या शतकात मानले जाते. यावरून तेंव्हाही पंढरपूर हे एक महान तीर्थक्षेत्र होते असे दिसते.
                  श्री आद्य शंकराचार्यांनी श्री विठ्ठलाचे केलेले वर्णन वाचून विठ्ठलाची मूर्ती मनाच्या गाभार्यात उभी राहते. भुजंगप्रयात वृत्तात असलेले हे अत्यंत प्रासादिक स्तोत्र मनात ठसल्याशिवाय रहत नाही. मनाचे श्लोक ही रामदासांनी ह्याच वृत्तात रचलेले आहेत.

                  सावळ्या विठ्ठलाच्या अंगावर गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ बसून त्याचा देह पांढुरका दिसत आहे म्हणून विठ्ठलाला पांडुरंग म्हणतात. पुंडलिकाची वाट बघत कमरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या ह्या पांडुरंगाचे वर्णन आचार्यानी किती सुंदर केले आहे ते पाहू या

(वृत्त- भुजंगप्रयात, अक्षरे 12, गण - )

महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।

समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।।1

तटी भीवरेच्या वसे पंढरी जी। जिथे नांदते ब्रह्मविद्या सुखानी
तिथे श्रेष्ठ संतामहंतां सवेची। विठू भक्तभोळाच धावून येई।।1.1

तयाच्या मनी लागली ओढ  मोठी। कधी भेटतो पुंडलीकास या मी
 युगामागुनी लोटली ही युगेची। तरी पाहतो वाट हा वाळवंटी।।1.2

कसा तोषवू पुंडलीकास माझ्या। प्रतीक्षा करी पंढरीचाच राणा
असे मेघ जो अमृता वर्षणारा नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।1.3
तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्

वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।2

जसा मेघ संपृक्त झाला जलानी लकाके तयातून सौदामिनी ही
 तसा शोभतो हा विठू नीलवर्णी। कटी शुभ्र वस्त्रा झळाळी विजेची।।2.1

रमेच्या मनी रम्य मूर्ती जयाची। मना मोहवी देव चैतन्यमूर्ति
अती साजिरी पावले एकजैसी। विठू ठेवि वीटेवरी योग्यरीती।।2.2

जया पाहता पापणी ही ढळेना। फिका मोक्ष वाटे, मिळे सौख्य जीवा
नमस्कार त्या पंढरीच्याच राया। नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।2.3
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्॥3

कटी ठेविले हात हे दर्शवाया कटी एवढा खोल सिंधू भवाचा
असे भक्त माझा, तरी पैलतीरा। सुखे पोचवीतो नसे कष्ट त्याला।।3.1

दिशा नाभिची दर्शवीतीच बोटे भवाहून ब्रह्मा असे चार बोटे
असा मोक्ष सोपा करी जोचि भक्ता। नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।3.2
स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम्।

शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।4

(केयूर – बाजुबंद किंवा मुकुट; वरं - श्रेष्ठ ) 

प्रभा दिव्य कंठी दिसे कौस्तुभाची। भुजा बाजुबंदासवे शोभताती
शिवाच्या प्रतीका धरे आदरानी शिरोभूषणा मानुनी मस्तकी ही।।4.1

असे श्रीपती श्रेष्ठ कल्याणकारी पिता ह्या जगाचा सदा शांतमूर्ती
जयाच्या हृदी राहते नित्य लक्ष्मी नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपी।।4.2

( पाण्डुरंगाचा मुकुट बारकाईने पाहिल्यास तो मुकुट नसून शिवलिंग आहे असे दिसून येईल. म्हणजेच शिवाला सतत त्याने मस्तकी धरले आहे.)
शरच्चंद्रबिम्बाननंचारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गम्।

जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।5

जरी शारदी पौर्णिमेचा सुधांशु उणावे कलांनी तयाचा प्रकाशु
म्हणोनी तुला पाहता खिन्न होई। म्हणे कोण माझ्याहुनी चित्तवेधी।।5.1

हळू स्पर्शती कुंडले गोड गाली जरा हालता रत्नज्योती प्रकाशी
प्रकाशात रांगोळिच्या सप्तरंगी तुझे थोर लावण्य मोहे मनासी।।5.2

तुझे ओठ जास्वंदिच्या पाकळ्याची। गमे केशरी हा रवी सुप्रभाती
तुझे नेत्र आकर्ण पद्मासमाची। तुला वंदितो तूचि ब्रह्मस्वरूपी।।5.3
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः।

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।6

( बर्ह - मोरपीसे,पिसारा; अवतंसम् - आभूषण,हार,कर्णभूषणे,मुकुट किंवा अलंकाराचे काम करणारी कोणतीही वस्तू )

शिरोभूषणाची दिसे दिव्य आभा हिर्याच्या प्रभेने दिशा रंगल्या या
मनोहारि ह्या विठ्ठला पूजिण्याला उभे देव ते घेउनी रत्नमाला।।6.1

लवे तीन जागी  दिसे देखणा हा। गळा घालितो मोरनक्षीच कंठा
शिरी मोरपीसे मुखा भूषवी ज्या। नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।6.2
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम्।

गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।7

( विभुं-शक्तिशाली,  समर्थ, योग्य, सर्वव्यापक, राजा, स्वामी, शासक, ब्रह्मा, विष्णु, महेशआत्मा, काळ।
चरतं -विहरणारादुरंतम् - अंतहीन, अनंत, ज्याच्या पार जाणे कठीण आहे असा. )

प्रभो! वेणुचा तूच मंजूळ आत्मा। भरोनी सदा राहतो पूर्ण विश्वा
करी तूच सर्वत्र संचार देवा नसे तू अशी पाहिली मी जागा।।7.1

तुझ्या पैलतीरा कुणी पाहिले ना अनंता अमर्याद तू अंतहीना
स्वये गोप झाला, गुरे राखी कान्हा। सुखावून गायी फुटे त्यांसी पान्हा।।7.2

कसा मंद हासे पिसे लावतो गे। उभ्या गोप-गोपी हरे भान त्यांचे
असे तूच आत्मा असे तूच शास्ता तुला वंदितो विठ्ठला ब्रह्मरूपा।।7.3
अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्।

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।8

( अजं-ज्याला जन्म नाही तोपरं- उच्चतम,परमात्मा ,मोक्ष; एकं- अनुपम,बेजोड तुरीय- आत्म्याची चौथी अवस्था जेथे आत्मा परमात्म्यात लीन होतोकैवल्य  मोक्ष। )

अहो विठ्ठला रुक्मिणीप्राणदाता तुम्हा जन्म ना, मृत्युची कोण वार्ता
घटाकाश आकाश ना भेद ऐसा। तुम्ही स्थान ते अद्वितीया तुरीया।।8.1

असे दीनबंधू सदा सुप्रसन्ना। पळे दुःख ते पाहता श्रीमुखाला
जया वंदिती देव ही देवता या नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।8.2
स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या नित्यम्

भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति।।9

म्हणे पुण्यदायी स्तुती विठ्ठलाची। कुणी भक्तिभावेच एकाग्र चित्ती

भवाब्धी तरोनी तया अंतकाळी। हरी देतसे दीर्घ वैकुंठ प्राप्ती।।9

11 जुलै 2011, खर नाम सवत्सर, आषाढ, देवशयनी एकादशी.1 comment:


 1. Arundhati Dixit
  10:42 PM (11 hours ago)

  to purushottam
  मनःपूर्वक धन्यवाद !

  On Wed, Jun 21, 2017 at 6:03 PM, purushottam nagarkar wrote:
  Boxbe purushottam nagarkar (pnagarkar2016@gmail.com) added themselves to your Guest List | Remove them | Block them

  काल सहजच आपण केलेला पांडुरंगाचा अनुवाद गवसला।खूपच छान!भक्तीचा ओलावा स्रवतो आहे त्यातून.सारीच प्राजक्तसुमने आल्हादक!धन्यवाद।मोठे काम केलेय आपण..

  ReplyDelete