श्री सरस्वतीस्तोत्रम्

श्री सरस्वतीस्तोत्रम् (प्रस्तावना)

Image result for Devi saraswati free download pictures

          नितांत सुंदर असे हे सरस्वतीस्तोत्र आहे. ह्या स्तोत्रात सरस्वतीच्या कोमल, सुंदर अशा पावलांचं वर्णन केलं आहे. छिद्रे असलेल्या मातीच्या घटात दिवा ठेवला की दिवा दिसत नसला तरी सर्व छिद्रातून दिव्याचा प्रकाश बाहेर डोकावत राहतो; त्याप्रमाणे ह्या स्तोत्राचा कवी अज्ञात असला तरी त्याने हृदयापासून केलेली ही स्तुती शब्दाशब्दातून व्यक्त होत आहे. देवी सरस्वतीच्या चरणकमलांवर माझं मन राहो आणि तिच्या पदी मी सतत नतमस्तक असो ह्या व्यतिरिक्त कुठच्याही प्रकारचं कुठलही मागणं देवीकडे न मागता केलेले हे सरस्वतीच्या पावलांचे वर्णन म्हणजे एक उत्तम काव्य आहे. सरस्वती प्रत्यक्ष ज्याच्या जिह्वेवर वसली आहे अशा ह्या अनाम सरस्वतीभक्ताला सादर प्रणाम करून तोटक वृत्तातील ह्या स्तोत्राचा भावानुवाद आपल्यापुढे ठेवते.


Image result for free download pictures of goddess Saraswati
श्री सरस्वतीस्तोत्रम्
(वृत्त  तोटक, अक्षरे-12, गण- , यति- पाद.)

रविरुद्रपितामहविष्णुनुतं  हरिचन्दनकुङ्कुमपङ्कयुतम्।
मुनिवृन्दगजेन्द्रसमानयुतं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।1

(हरिचंदन -  रक्तचंदन किंवा पिवळे चंदन)

शिव, विष्णु, प्रजापति, सूर्य, शशी जननी अति नम्र तुझ्या चरणी
हरिचंदन-कुंकुमयुक्त उटी पदपंकज हे तव भूषविती।।1.1
रमतात मुनींद्र गजेंद्र पदी झुकते मम मस्तक त्या चरणी
शरणागत देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणावरती।।1.2



शशिशुद्धसुधाहिमधामयुतं  शरदम्बरबिम्बसमानकरम्
बहुरत्नमनोहरकान्तियुतं। तव नौमि सरस्वति पादयुगम्।।2

शरदातिल शुभ्र सुधांशु जसा। मधु अमृत शिंपित जाय जसा
अति शुभ्र हिमावर चंद्रप्रभा अति दिव्य दिसे उजळीच जगा।।2.1
अथवा शरदातिल नील नभी दवबिंदुतुनी झिरपे शशी
बहुमोल सुरत्न-लडींवरुनी परिवर्तित हो किरणेच जशी ।।2.2
गमती पदयुग्म तसे  जननि। सुखदायक उज्ज्वल कांतिमती
नतमस्तक देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणावरती।।2.3


Image result for lotus feet of goddess lakshmi

कनकाब्जविभूषितभूतिभवं  भवभावविभाषितभिन्नपदम्
प्रभुचित्तसमाहितसाधुपदं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।3

मणिकांचनकांति सरोज किती तव भूषविती पद रम्य अती
जगतासचि भूषण श्रेष्ठ अति तव नाजुक नाजुक पाय किती।।3.1
पदवर्णन हे करण्यास्तवची अति भिन्न मते कथितीच मुनी
परि भिन्न मतातुन एक दिसे पदपल्लव हे तव हृद्य असे।।3.2
रमतेच प्रजापति-चित्त जिथे। शुभ सत्य असे शिव पाय तुझे
नतमस्तक त्या सुकुमार पदी नित देवि सरस्वति मी सहजी।।3.3



भवसागरमज्जनभीतिनुतं  प्रतिपादितसन्ततिकारमिदम्
विमलादिकशुद्धविशुद्धपदं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।4

भवसिंधु करी विचलीत मना सुखरूप तयातुन उद्धरण्या
जननी धरि भक्त तुझ्याच पदा। सुख-संतति-संपति -दायक या।।4.1
तव निर्मळ शुद्ध पवित्र अती। मृदु कोमल नाजुक ह्याच पदी
नतमस्तक देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणांवरती।।4.2

मतिहीनजनाश्रयपादमिदं  सकलागमभाषितभिन्नपदम्।
परिपूरितविश्वमनेकभवं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।5

पद हे तव आश्रय मूढ जना नित देत असेचि विवेक तयां
किति वर्णिति या चरणांसि तुझ्या ।। मत मांडिति वेद अनेकविधा।।5.1
जग व्यापुनही  उरती तव हे पदपल्लव पावन सुंदर गे
शरणागत देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणांवरती।।5.2



परिपूर्णमनोरथधामनिधिं परमार्थविचारविवेकविधिम्।
सुरयोषितसेवितपादतलं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।6

परिपूर्ण मनोरथ होय जिथे सुखसागर तो तव शुभ्र पदे
परब्रह्म अलौकिक जेथ मिळे मिळतोचि विवेक नितांत जिथे।।6
पदपंकज सेविति तेचि तुझे विबुधा-रमणी अति प्रेमभरे
नतमस्तक देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणांवरती।।6



सुरमौलिमणिद्युतिशुभ्रकरं  विषयादिमहाभयवर्णहरम्।
निजकान्तिविलेपितचन्द्रशिवं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।7

नतमस्तक देवचि होति पदी मुकुटातिल रत्न चि त्या समयी - -
चमकून प्रभा अति शुभ्र अशी मनमोहक पाय तुझे उजळी।।7.1
भवदुःख समूळचि नष्ट करी पदपंकज मंगल हे जननी
जरि शुभ्र असेच शशी तरिही दिसतो अति मंद तुझ्यापुढती।। 7.2
जणु लोपतसे शिवतेज महा बघुनी पदपंकज दिव्य अभा
शरणागत देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणांवरती।। 7.3



गुणनैककुलं स्थितिभीतपदं गुणगौरवगर्वितसत्यपदम्
कमलोदरकोमलपादतलं  तव नौमि सरस्वति पादयुगम्।।8

गुण सर्व स्थिरावति पायि तुझ्या। पदयुग्म तुझे नित आश्रय त्या
स्वगुणे अति श्रेष्ठ पदी चढती पदपंकज हे तव ब्रह्मपदी।।8.1
पद हे ढळो अति उच्चतमा। म्हणुनीच असे हुरहूर जया
कुणिही धरणे अभिमान असे अति श्रेष्ठचि स्थान जयास मिळे  ।।8.2
पदपंकज हे तव दिव्य असे। अति पावन सत्य सरस्वति गे
कमलातिल आतिल कोमल हे मृदु, कोमल केसर सुंदरसे - - -।।8.3
सुकुमार तसे पदयुग्म तुझे  जणु नाजुक नाजुक पद्मदळे
नतमस्तक देवि सरस्वति मी सुकुमार तुझ्या चरणावरती।।8.4




-----------------------------------------


कार्तिक शुद्ध एकादशी, 13 नोव्हेंबर, 2013





1 comment:

  1. Hello, thanks for posting this stotra. Would you have the translation into English? Thank you

    ReplyDelete