उपदेशपञ्चकम्


              उपदेशपंचकम् ह्या स्तोत्राला हनुमान चालिसाप्रमाणे शंकरचालिसा किंवा उपदेश चालिसा म्हणता येईल. पाच श्लोक, प्रत्येक श्लोकाचे चार चरण, प्रत्येक चरणात माणसाने कसे वागावे ह्या संदर्भात दोन सूचना अशा एकंदर चाळीस सूचना श्री शंकराचार्यांनी केल्या आहेत. सहाव्या श्लोकात फलश्रुती असून वरील चाळीस गोष्टींचे पालन करणार्याला संसाराच्या कटकटींचा त्रास होत नाही. त्यापासून होणारे मनस्ताप, दुःख हे त्याला छळत नाहीत. त्याचे मन सदैव प्रसन्न राहते. असे आश्वासन जगद्गुरु शंकराचार्यांनी दिले आहे.
उपदेशपञ्चकम्

(वृत्त शार्दूलविक्रीडितअक्षरे-19, गण - )

वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां
तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम्
पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसंधीयता-
मात्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात्तूर्णं विनिर्गम्यताम् ।।1

अपचिति - नाश,व्यय,पापांचे प्रायश्चित  तूर्ण - त्वरेने

अभ्यासी श्रुति वेद शास्त्र वचनेतैसी कृती आचरी
कर्मे अर्पण ईश्वरा पदि करी, सोडी फलेच्छा पुरी।
दोषांनी परिपूर्ण ती भवसुखे, गुंतू नको त्यातची
दोषांसी करुनीच दूर अवघ्या, दुर्वर्तना आवरी।।1.1

सायासे करणेचि प्राप्त मनुजा त्या आत्मबोधासची
हे माझे घर, आप्तमित्र म्हणणे सोडून दे सत्वरी ।
देई टाकुन सर्प कात सहजी सांभाळितो ना तिसी
माघारी सुगंध ये परतुनी जाता फुला सोडुनी॥1.2

जाई सोडुन पर्वतास सरिता मागे येते कधी
जैसी राख जाळते, जळतसे अग्नीमधे घालुनी ।
तैसा तूचि अलिप्त हो सहज रे साक्षीपणे वागुनी
होता प्राप्तचि आत्मबोध तुजला होईल आत्मोन्नती।।1.3


सङ्गः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां
शान्त्यादिः  परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यताम्।
सद्विद्वानुपसृत्यतां प्रतिदिनं तत्पादुका सेव्यतां
ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरोवाक्यं समाकर्ण्यताम् ।।2

अक्षर  अविनाशी, अनश्वर  परिचीयताम्- अभ्यास करावा, प्राप्त करावे

सेवी सज्जन; जा अनन्य शरणा ईशास त्या निश्चिती
शांती, आर्जव, त्याग, प्रेम, विनया जोडी गुणा आवडी ।
दुःखाने भरलेचि कर्मफल ते इच्छा त्याची धरी
प्रज्ञावंत, महंत, सात्विकचि जे त्यांच्या रहा संगती।। 2.1

जाओनी शरणा अनन्य गतिने सेवा तयांची करी
सेवोनी चरणारविंद गुरुचे सप्रेम रात्रंदिनी
द्यावे अक्षर ब्रह्म एक मजलाही याचना त्यां करी
वेदांती कथिली सुनीति-वचने एकाग्र ऐका तुम्ही।। 2.2


वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिर:पक्षः समाश्रीयतां
दुस्तर्कात्सु विरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसंधीयताम्
ब्रह्मास्मीति विभाव्यतामहरहर्गर्वः परित्यज्यताम्
देहेऽहंमतिरुज्झ्यतां बुधजनैर्वादः परित्यज्यताम् ।।3

`सोऽहं' या वचनास चिंतुनि मनी वेदाश्रया सोडि ना
सारी दूर कुतर्क तो; अनुसरी सन्मार्ग वेदातला ।
आहे व्यापक ब्रह्मरूप नित मी जाणी; करी गर्व ना
देहाच्या विषयी `अहं ' मनि नसो टाळी विवादा सदा।। 3


क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां
स्वाद्वन्नं  तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम्
शीतोष्णादि विषह्यतां तु वृथा वाक्यं समुच्चार्यता-
मौदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् ।।4

आहे भूकचि रोग हे समजुनी, व्याधीस या नाशण्या
भिक्षा हा उपचार त्यास बरवा सेवीच तो अल्पसा ।
मिष्टान्नी लव हाव ना कधि धरी; मागू नये ती पुन्हा
दैवाने तुज प्राप्त त्यात मनुजा संतुष्ट तू रे रहा।।4.1

हानी, लाभ, विषाद, मोद  मिळता भोगीत जा सर्वची
थंडी, ऊनचि, कोसळे जल कधी त्याची तमा ना करी।
तोंडाची कधि वाफ ना दवडणे बोले वृथा ना कधी
अन्याये कधि पक्षपात करी राही तटस्थापरी।।4.2

लोकांनी करणे कृपा मजवरी आणू नये मानसी
व्हावे वर्तन हातुनी सुखदसे जे सज्जना तोषवी ।
जिव्हारी अति लागतील असले बोलू नको शब्द ही
मूर्ति प्रेमळ ही तुझी स्मितमुखी संतोष देवो जनी ।।4.3


एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां
पूर्णात्मा सुसमीक्ष्यतां जगदिदं तद्वाधितं दृश्यताम्
प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितबलान्नाप्युतरैः श्लिष्यतां
प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम् ।।5

आस्  बसणे ; प्राक्  पहिल्यांदा, जेवढे शक्य असेल तेवढे  प्रारब्ध  भाग्य, नियती

एकांती बसुनी सुखे मन करी त्या आत्मतत्वी स्थिरा
आत्म्याची अनुभूति लोपवि जगा आत्मा उरे तत्वता। 
सर्पाभास निमेचि रज्जु दिसता तैसेचि ये प्रत्यया
विश्वाकारचि व्यापुनी उरतसे  ते तत्त्व ये दर्शना।।5.1

जाळी संचित कर्म सर्व पहिले ज्ञानाग्नि मध्ये नरा
सारे कर्म अलिप्त राहुन करी;  तू बंधनी गुंत ना। 
जे भाग्यात असेल भोग सगळे; त्यातूनि ना मुक्तता
चिद्रूपी मन लीन पूर्ण करिरे; आनंद तोची खरा।।5.2


( वृत्त  वसंततिलका, अक्षरे  14, गण   )

यः श्लोकपञ्चकमिदं पठते मनुष्यः
सञ्चिन्तयत्यनुदिनं स्थिरतामुपेत्य।
तस्याशु संसृतिदवानलतीव्रघोर-
ताप: प्रशान्तिमुपयाति चितिप्रसादात् ।।6

हे पाच श्लोक म्हणता दररोज कोणी
ठेवोनि शांत मन जो करि चिंतनासी
संसार-ताप-वणवा अति घोर त्याचा
होईल खाक जळुनी निज बोध होता।।6

वृत्त शार्दूलविक्रीडित ) 
आई बाप अरुंधतीस मिळता श्री शंकराचार्य हे
त्यांचा हा उपदेश थोर मजला साठा धनाचा गमे
तोची मी उघडून दावित असे सर्वांस आनंदुनी
घ्या हो घ्या उपदेशरूप धन हे जे सौख्यदायी अती।।7
-----------------

खर नाम संवत्सर,फाल्गुन शु. 2 (रामकृष्ण जयंती) 23 फेब्रु. 2012




3 comments:

  1. खूपच सुंदर , नेमका अनुवाद...! धन्यवाद अरुंधती....!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद जी! ह्या स्तोत्राचा काही भाग arundhatipraveendixit.com ह्या वेबसाईटवर श्राव्य ह्या सदरात ऐकता येईल.

      Delete