जीवनमुक्तानन्दलहरी


प्रस्तावना - जीवनमुक्तानन्दलहरी


                           योगी, मुनी, साधू, म्हटले की आपल्या मनात भगवे कपडे, जटा, भस्म, टिळे, माळा, तोंडावर अतिशय रूक्ष भाव असा कोणीतरी साधू-बैरागी उभा राहतो.

                              शंकराचार्यांना अभिप्रेत असलेला  मुनी मात्र मनन, चिंतन, अभ्यासाने प्रगल्भ असून अतिशय संवेदनाशील आहे. मीठ जसे आपले काठिण्य विसरून पाण्यात सहजपणे मिसळून जाते तसा हा योगी स्वतःचे स्वत्त्व विसरून समाजात मिसळूनही गेला आहे. मुलात मूल आणि विद्वानात विद्वान असलेला हा मुनी सगळ्यांनाच हवाहवासा आहे कारण त्याला स्वत:चा कुठलाच स्वार्थ उरलेला नाही. सद्गुरूंनी  केलेल्या उपदेशाने त्याचे सर्व संभ्रम, विकल्प दूर झाले आहेत. चिखलात उगवलेले कमळ चिखलापासून पूर्ण वेगळे असते त्याला चिखलाचा अंश ही चिकटलेला नसतो. तसा हा मुनी संसारात राहूनही संसाराच्या ओझ्याने दबूनही गेलेला नाही किंवा दुःखी कष्टीही नाही.

जीवनमुक्तानन्दलहरी

 (वृत्त – शिखरिणी, अक्षरे-17, गण-य म न स भ ल ग ,यति-6,11)


पुरे पौरान्पश्यन्नरयुवतिनामाकृतिमयान्

सुवेशास्वर्णालंकरणकलितांश्चित्रसदृशान् 

स्वयं साक्षी द्रष्टेत्यपिच कलयंस्तैः सह रमन्

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः ।।1

( कलित- धारण करणे )

सुवर्णालंकारे नटुनि, वसने लेवुन नवी

गमे चित्राऐसी नगर नर नारी सुबकशी

बघे त्यांना ज्ञानी जणु विविध आकार भवती

रमे साक्षीभावे परि न पडतो गुंतुन कधी।।1.1


जला स्पर्शूनीही किरण भिजती ना कधि जसे

न ये जाळ्यामध्ये सलिल कधि वा ओढुनि बळे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।। 1.2


वने वृक्षान्पश्यन्दलफलभरान्नम्रसुशिखान्

घनच्छायाच्छन्नान्बहुलकलकूजद्विजगणान्।

भजन्घस्रे रात्राववनितलतल्पैकशयनो

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।। 2

( घस्र- पीडादायी )

वनी पाहे वेली सघन तरु तोही चहुकडे

सुपर्णा शाखांनी  कुसुम कलिकांनी बहरले

फळांच्या भाराने झुकुनि अति गेलेचि विनये

थवे पक्षांचेही मधु मधुर  गाती सुखभरे।।2.1


बघे शोभा त्यांची फिरुनि दिवसा त्या घनवनी

परी भूमीशय्या करि न मुनिसी क्षुब्ध हृदयी

गुरूबोधे ज्याच्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।2.2


कदाचिप्रासादे क्वचिदपि च सौधे च धवले

कदा काले शैले क्वचिदपि च कूलेषु सरिताम्।

कुटीरे दान्तानां मुनिजनवराणामपि वसन्

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।3


(दान्त – ज्यांनी इंद्रियांचे दमन केले आहे असे मुनी,उदार,नियंत्रित,त्यक्त ) 


रमे प्रासादी हा कधि  धवल त्या राजसदनी

चुन्याची छोटीशी गृह सदनिका त्यास सुखवी

कधी आनंदाने मुनिवर गिरीकंदर फिरे

महात्म्यासी त्या वा सुजल सरिता तीरचि रुचे।।3.1


अती धैर्याने जे दमन करिती इंद्रिय मना

मुनिश्रेष्ठांच्या त्या कुटित करि वास्तव्य मुनि वा

गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।3.2


क्वचिद्बालैः सार्धं करतलजतालैश्च हसितैः

क्वचिद्वै तारुण्याङ्कितचतुरनार्या सह रमन्।

क्वचिद् वृद्धैश्चिन्ताकुलितहृदयैश्चापिविलपन्

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।4


मुलांमध्ये तोही हसुनि कधि टाळ्या पिटतसे

करी गप्पा-गोष्टी  चतुर तरुणींच्या कधि सवे

सवे वृद्धांच्याही समरस विलापा करितसे

रमे सर्वांसंगे परि कमलपत्रासम असे।।4.1


नदीच्या पात्रासी वळण दिसते; ते जळि नसे

रवी स्पर्शे हाता परि किरण ये ना मुठिमधे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।4.2


कदाचिद्विद्वद्भिर्विविदिषुभिरत्यन्तनिरतैः
कदाचित्काव्यालंकृतिरसरसालैः कविवरैः।

कदाचित्सत्तर्कैरनुमितिपरैस्तार्किकवरैर्-

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।5


अती जिज्ञासू जे बहुविषय पारंगत असे

अशा विद्वानांच्या सह करित चर्चा मुनि दिसे

कविश्रेष्ठांसंगे अनुभवित काव्यामृत निके

रसालंकाराचा मधु मधुर आस्वाद कधि घे।।5.1


करोनी सत्तर्का करुनि अनुमानेचि सहजी

करोनी वादासी सुखवि सगळे तार्किक मनी

कवी मी! जिज्ञासू! कधि न मिरवी ज्ञान अपुले

जसा भाला हाती असुनि पुतळा दर्प न करे।।5.2


जरी वाहे वारा परि न अभिमाना धरितसे

सहस्रा धारांनी सुखवि जग मी मेघ न म्हणे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।5.3


कदा ध्यानाभ्यासैः क्वचिदपि सपर्या विकसितैः

सुगन्धैः सत्पुष्पैः क्वचिदपि दलैरेव विमलैः।

प्रकुर्वन् देवस्य प्रमुदितमनाः संस्तुतिपरो

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।6

( सपर्या - पूजा, अर्चना )
रमे ध्यानामध्ये करुनि मन एकाग्र सहजी

करे आनंदाने भजन कधि ईशास स्मरुनी

सुगंधी द्रव्ये वा विकसित फुले बिल्व तुलसी

करोनी पूजार्चा प्रभुचरणि तो अर्पण करी।।6.1


तरी कर्तव्यासी विमुख दिसतो ना मुनि कधी

उपेक्षा कर्माची नच करितसे तुच्छ म्हणुनी

गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।6.2


शिवायाः शम्भोर्वा क्वचिदपि च विष्णोरपि कदा

गणाध्यक्षस्यापि प्रकटतपनस्यापि च कदा।

पठन्वै नामालिं नयनरचितानन्दसलिलो

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।7


भजे विष्णूसी तो कधि शिव भवानीस भजतो

गणेशासी पूजी कधि नमन सूर्यासि करितो

सहस्रानामाचे पठण करिता गद्गद स्वरे

भिजे प्रेमाश्रुंनी मुनिवरचि तो  भान विसरे।।7.1


परी ना चित्ती त्या हरि हर असा भेद उपजे

तया सर्वांठायी भरुनि उरला ईशचि दिसे

गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।7.2


कदा गङ्गाम्भोभिः क्वचिदपि च कूपोत्थितजलैः

क्वचित्कासारोत्थैः क्वचिदपि सदुष्णैश्च शिशिरैः।

भजन् स्नानं भूत्या क्वचिदपि च कर्पूरनिभया

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।8

(निभ- समान)

मिळो स्नानासी त्या पुनित जल ते भागिरथिचे

तळ्याचे कूपाचे जलहि मुनिसी त्या सुखविते

कधी कर्पूराच्या सम धवल भस्मे तनुवरी

तमा शीतोष्णाची विचलित करे त्या न कधिही।।8.1


क्रियांचे साक्षी जे सदन सुख दुःखे न स्मरते

तसा योगी राहे अविचल;तया खेद न सुखे

गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।8.2


कदाचिज्जागर्त्या विषयकरणैः संव्यवहरन्

कदाचित्स्वप्नस्थानपि च विषयानेव च भजन्।

कदाचित्सौषुप्तं सुखमनुभवन्नेव सततं

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।9


करी कर्मे सारी अति कुशलतेने दिनभरी

कधी स्वप्नामध्ये सुख अनुभवी  दु;खहि कधी

सुषुप्तीमध्येही मुनि अनुभवे आत्मसुखची

अवस्थांनी तीन्ही विचलित न होई मुनि कधी।।9.1


सुखाच्या उर्मी वा छळिति न तया खेद कधिही

जणू भासे मेरू अविचल उभा वादळ जळी

गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले ।।9.2


कदाप्याशावासाः क्वचिदपि च दिव्याम्बरधरः

क्वचित्पञ्चास्योत्थां त्वचमपि दधानः कटितटे।

मनस्वी निःशङ्: सुजनहृदयानन्दजनको

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।10


( मनस्वी- बुद्धिमान,प्रज्ञावान,दृढसंकल्प,उच्चात्मा,उदार)

असो ऊंची वस्त्रेवसन भगवे  वा तनुवरी

लपेटे चर्मे वा कटिस; परि त्या दुःख न मनी

निवाराया लज्जा वसनचि मिळो त्यास न तरी

भयाने होईना मुनिवरचि तो  कातर कधी।।10.1


 झरा आनंदाचा  सुखवि सुजनांचे हृदय ही

नभी राहोनीया सुखवि  जलधीला जंव शशी

गुरूबोधे ज्याचे मन उजळुनी जाय पुरते

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।10.2


कदाचित्सत्त्वस्थः क्वचिदपि रजोवृत्तियुगतस्

तमोवृत्तिः क्वापि त्रितयरहितः क्वापि च पुनः।

कदाचित्संसारी श्रुतिपथविहारी क्वचिदहो

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।11


करी कर्मे तोही त्रिगुण युत आवश्यक अशी

दिसे त्याची वृत्ती कधि तम, रजो, सात्विक अशी

महात्मा होई तो पुनरपि गुणातीत सहजी

विवेकाच्या मार्गावरुन ढळतो ना कधि मुनी।। 11.1


गृहस्थाधर्माचे सहज गतिने  पालन करी

श्रुती वेदांचे वा मुनिवर अनुष्ठानहि करी

गुरूबोधे ज्याचे मन उजळुनी जाय पुरते

 कधी मोहाने तो विचलित न होई पळभरे।।11.2


कदाचिन्मौनस्थः क्ववचिदपि च वाग्वादनिरतः

कदाचित्स्वानन्दे हसति रभसा त्यक्तवचनः।

कदाचिल्लोकानां व्यवहृतिसमालोकनपरो

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।12


बसे शांतीने तो कधि धरुनिया मौनव्रतची

कधी वाणी त्याची सहज बरसे अमृतमयी

कधी संवादासी सहज गतिने सोडुनि मधे

मुनी स्वानंदाते रमुनि हसतो  निर्मळपणे।।12.1


कधी लोकांचेही सकल  निरखी आचरण ते

स्वभावाचे पैलू  विविध टिपतो सूक्ष्म सगळे

गुरूबोधे ज्याचे मन निवळले; संभ्रम फिटे

कधी मोहामध्ये मन गुरफटे त्या न मुनिचे।।12.2


कदाचिच्छक्तीनां विकचमुखपद्मेषु कवलान्

क्षिपंस्तासां क्वापि स्वयमपि च गृह्णन्स्वमुखतः।

तदद्वैतं रूपं निजपरविहीनं प्रकटयन्

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।13


कधी अंबेच्याही विकसितचि पद्मासम मुखी

मुनी प्रेमानंदे भरवि तिजला घास अधरी

कधी खाई तोची तिज भरविलेला कवल ही

मुनी पूर्णत्वाने विलिनमन हो अद्वयपणी।।13.1


अशा अद्वैताचे घडवि सहजी दर्शन जना

लया जाई जेथे त्रिपुटि; उरते द्वैत न जरा

जळी राही जैसे जळ मिसळुनी ते जळपणे

प्रभा सूर्याची वा विलग सवित्याहून चि नसे।।13.2


गुरूबोधे तैसे जयि मनि  न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।13.3


क्वचिच्छैवैः सार्धं क्वचिदपि च शाक्तैः सह रमन्

कदा विष्णोर्भक्तैः क्वचिदपि च सौरैः सह वसन्।

कदाचिद्गाणेशैर्गतसकलभेदोऽद्वयतया

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।14


कधी शैवांसंगे कधि मुनि रमे शाक्त जनिही

कधी भानूभक्तांसह कधि दिसे वैष्णवजनी

गणेशाच्या भक्तांसह स्तवित लंबोदर मुखी

दिसे आत्मज्ञानी; हृदयि धरितो भेद न मुळी।।14.1


गुरूबोधे ज्याचे मन उजळुनी जाय पुरते

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।14.2


निराकारं क्वापि क्वचिदपि च साकारममलं

निजं शैवं रूपं विविधगुणभेदेन बहुधा।

कदाश्चर्यं पश्यन् किमिदमिति हृष्यन्नपि कदा

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।15


उपास्यासी  पाहे कधि मुनि निराकार स्वरुपी

कधी पाही त्यासी सगुण नटले विश्वस्वरुपी

कधी आश्चर्याने, कधि बघतसे मौज जणु ही

अभेदाने पाहे सगुण अथवा निर्गुण मनी ।।15.1


गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।15.2


कदा द्वैतं पश्यन्नखिलमपि सत्यं शिवमयं

महावाक्यार्थानामवगतिसमभ्यासवशतः।

गतद्वैताभास शिव शिव शिवेत्येव विलपन्

मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः।।16


पसारा विश्वाचा कधि बघतसे द्वैत म्हणुनी

परी जाणे चित्ती जगत सगळे सत्य शिवची

असे ब्रह्माचे ते स्वरुप अविनाशी सकलही

प्रतीतीला येई जरि विविधतेने पुनरपि।।16.1


फुले पाने फांद्या, तरुवर परी एक बरवा

तरंगाची दाटी; परि जलधि तो एक सगळा

असे या न्यायाने सकल जग हे मीच सगळे

असे चित्शक्ती मी परम शिव चैतन्यचि भले।।16.2


अहं ब्रह्मास्मिहे वचन नित अभ्यासुन हृदि

तयाच्या अर्थाचे अनुसरण तो नित्यचि करी

मनीच्या द्वैताचे निरसन जयाचेचि घडले

स्मरे ईशासी तो शिव शिव महादेव चि वदे।।16.3


गुरूबोधाने ज्या मनि लव न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।16.4


इमां मुक्तावस्थां परमशिवसंस्थां गुरुकृपा-

सुधापाङ्गावाप्यां सहजसुखवाप्यामनुदिनम्।

मुहुर्मज्जन् मज्जन् भजति सुकृतैश्चेन्नरवरस्

तदा त्यागी योगी कविरिति वदन्तीह कवयः।।17


मिळे कैवल्याचे अढळपद ज्याची स्थितिमुळे

अशी मुक्तावस्था परमशिव कल्याण करिते

मिळे पुण्यात्म्यासी गुरुवर कृपारूप स्थिति ही

सदा सौख्याची गे अनुपम सुधा पुष्करिणि ती।। 17.1


करे जो स्नानासी प्रतिदिनच त्या पावन जळी

कवी त्यागी योगी’ बुधजन तयासीच वदती ।।17.2



 (वृत्त-मंदाक्रांता, अक्षरे -17, गण-म भ न त त ग ग)


मौने मौनी गुणिनि गुणवान् पण्डिते पण्डितश्च

दीने दीनसुखिनि सुखवान् भोगिनी प्राप्तभोग।

मूर्खे मूर्खो युवतिषु युवा वाग्मिनि प्रौढवाग्मी

धन्यः कोऽपि त्रिभुवनजयी योऽवधूतेऽवधूतः।।18


(धन्य – धन दान देणारा,धनी,सौभाग्यशाली,भाग्यवान,महाभाग,श्रेष्ठ,गुणवान)


ठेवी मौना मुनिवरचि तो मौनधारी जनी त्या
सन्नीतीच्या गुणिजनसवे सद्गुणी शोभतो हा

विद्वानांच्या चतुर समुदायीच विद्वान मोठा

दुःखी कष्टी जनि दिसतसे शोकसंतप्त आत्मा।।18.1


त्यांच्या संगे समरसचि तो दीन दीनात  होई 

श्रीमंतांच्या सुभग समुदायी दिसे राव कोणी

संतोषाची अविरत स्त्रवे चित्ति निस्यंदिनी त्या

वाटे सौख्ये अनुभवुनि  हा  तृप्तकामा चि  झाला।।18.2


मूर्खांमध्ये नच  प्रकटवी  ज्ञानभांडार त्याचे

स्वत्त्वासी तो लपवि सहजी मूर्ख मूर्खात वाटे

उत्साहाने सळसळतसे तो युवा घोळक्यात

तारुण्याला जणु मिळतसे प्रेरणा ह्या मुळेच।।18.3


ज्ञानाभ्यासे जणुचि सविता ज्ञानवृद्धांमधेही

वक्त्यांमध्ये उठुनि दिसतो हाचि वाचस्पती ही

वैराग्याच्या नभि चमकतो शुक्र तारा जणू हा

योग्यांचाही मुकुटमणि हा त्यक्तकामाचि झाला।।18.4


शोधूनी हे त्रिभुवन मिळे ना महाभाग ऐसा

मुक्तात्मा तो  त्रिभुवनजयी धन्य झाला जगी या।।18.5


---------------------------------------


(नंदन नाम संवत्सर, अधिक भाद्रपद शुक्ल चतुर्थी, 21 ऑगस्ट 2012 )





No comments:

Post a Comment