(चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् / मोहमुद्गरस्तोत्रम्)


               एकदा काशी तीर्थक्षेत्री असता श्री आद्य शंकराचार्य पहाटेच स्नान करण्यास गंगेवर जात असतांना  त्यांना जवळच्या पाठशाळेतून ``डुकृञ् करणे -- डुकृञ् करणे-- डुकृञ् करणे हे पाणीनीचे व्याकरण सूत्र कोणी तरी घोकत असल्याचे ऐकू आले. आवाज एका वृद्धाचा वाटत होता. ह्या वयात व्याकरणाची सूत्र घोकावी हे जरा विसंगत वाटत होते. श्री शंकराचार्य स्नान करून परत आले तरी तो वृद्ध तेच सूत्र घोकत होता. वयानुसार स्मरणशक्ती क्षीण झाल्याने  ते सूत्र त्याच्या स्मरणात रहात नव्हते. डुकृञ् करणे ह्या पाणीनीच्या सूत्राचा अर्थ कृ हे क्रियापद / धातू (संस्कृतमधे क्रियापदाला धातू म्हणतात.) उभय वचनी  आहे. ते परस्मैपदी आणि आत्मनैपदी दोन्ही प्रकारे चालते. वापरले जाते.

स्मृती क्षीण  झालेल्या वृद्धाने आता व्याकरणाचा अभ्यास करण्याऐवजी त्याला ज्याने खरोखरीच आत्मशांती, आत्मानंद मिळेल याचा प्रयत्न करावा असे आचार्यांना वाटले. त्याला पाहून अत्यंत प्रेमाने, त्याच्याविषयीच्या आपुलकीने आचार्यांचे मन भरून आले. त्यांनी त्या वृद्धाला चर्पट पञ्जरी ह्या स्तोत्रातून मोठा गोड आणि सहज पटेल असा उपदेश केला.

             चर्पटपञ्जरी म्हणजे खमंग खाद्य. हे बुद्धीला सहजपणे आवडेल असे दिलेले खमंग खाद्य आहे.    



ज्या पद्याची रचना मात्रागणांनी समजते त्यास जाति म्हणतात. जाति मधे 64 मात्रांच्या प्रकारास स्कंधक म्हणतात. वरील स्तोत्र मात्रासमक -पादाकुलक छंदातील आहे. याचे चार चरण असतात. प्रत्येक चरणात सोळा मात्रा असतात. पादाकुलकात 8 व्या मात्रेवर यति (थांबा ) असतो.
मी केलेल्या मराठी भाषांतरात मात्र थोडा बदल करून 1 आणि 3 ह्या चरणांमधे 16 तर 2 आणि ह्या चरणांमधे 14 मात्रा आहेत.
               

चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् / मोहमुद्गरस्तोत्रम्

(छंद - मात्रासमक - पादाकुलकमात्रा - 16, 16, 16, 16 = 64)

दिनमपि रजनी सायं प्रात:

शिशिरवसन्तौ पुनरायात:।

काल: क्रीडति गच्छत्यायु:

तदपि न मुञ्चत्याशावायु:।।1

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते

प्राप्ते संनिहिते मरणे न हि नहि रक्षति डुकृञ् करणे।।1


(मात्रा - 16,14,16,14) 

दिवसानंतर सांज चि येई    सांज सरोनी ये रजनी

शिशिर सरोनी वसंत येई    थांबे ना ऋतुचक्र गती।।

खेळ असा काळाचा रंगे    सरते जीवन त्या संगे

आशा दावी स्वप्न जिवाला ।  मिथ्या असुनी ना भंगे।।1

हरि गोविंदा वद गोविंदा जप गोविंदा भ्रांतमती

ठाके मरण पुढ्यातचि तेंव्हा ‘ डुकृञ् करणे’ काय करी।।ध्रु0


अग्रे वह्नि: पृष्ठे भानू

रात्रौ चुबुकसमर्पितजानु:

करतलभिक्षा तरुतलवासस्

तदपि न मुञ्चत्याशापाश:।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते

प्राप्ते संनिहिते मरणे न हि नहि रक्षति डुकृञ् करणे।। ।।2

चुबुक- हनुवटी । जानु - गुडघा । चुबुकसमर्पितजानु: - गुडघ्यावर हनुवटी टेकवून किंवा गुडघ्यात डोके घालून बसणे.।

पुढती राही शेकोटी ती  । पाठीसी तो भानु असे

टेकुनि हनुवटि गुडघ्यावरती । उदासवाणी रात सरे

 भिक्षा खाया ओंजळ केवळ ।  तरुतळि त्या विश्राम असे

तरिहि तयाला सोडत नाही । आशापाश चि चिवट असे

हरि गोविंदा वद गोविंदा जप गोविंदा भ्रांतमती

ठाके मरण पुढ्यातचि तेंव्हा ‘ डुकृञ् करणे’ काय करी।।।।2

 

यावद्वित्तोपार्जनसक्त:

तावन्निजपरिवारोरक्त:।

पश्चाद्धावति जर्जरदेहे

वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे।। भज0।।3

 

जोवर मिळवी पैसा अडका । तोवर नाते घट्ट असे

उसवत जाई वीण तयाची  । जेंव्हा आवक मंदावे

क्षीणचि होता देह खरोखर । पुसती ना तुजसी घरचे

मरोचि लवकर म्हातारा हा ।  नवस बोलती रोज नवे।।3

हरि गोविंदा - - -।धृ0


जटिलो मुण्डी लुञ्चित केशः

काषायाम्बरबहुकृतवेष:।

पश्यन्नपि च न पश्यति मूढ

उदरनिमित्तं बहुकृतवेष:।। भज0।।4

जटिल- जटा ।  लुञ्चित केश: -केसांचे मुंडन करणे ।

डोक्यावरती जटा बांधिसी    अथवा मुंडन पूर्ण करी

अंगावरती वस्त्रे भगवी । सोंग  सजे बहु खास अती

उदर भराया नाना क्लृप्त्या । सांग नरा तू का करिशी

पाहुनि सारे काणाडोळा  । का करिसी तू मूढमती।।4

हरि गोविंदा - - -।धृ0

 

भगवद्गीता किंचिदधीता

गङ्गाजललवकणिका पीता

सकृदपि यस्य मुरारिसमर्चा

तस्य यम: किं कुरुते चर्चाम्।।5

 

मनापासुनी भगवद्गीता    थोडिशी जरि तू शिकली

श्रद्धापूर्वक गंगा जल ते । प्राशन केले लवभरची

मनापासुनी पूजियला हरि    एकवेळ जरि प्रेमानी

चर्चा करण्या तव नामाची । यम नितची कचरेल मनी।।5

हरि गोविंदा - - -।धृ0


अङ्गं गलितं पलितं मुण्डं

दशनविहीनं जातं तुण्डम्।

वृद्धो याति गृहीत्वा दण्डं

तदपि न मुञ्चत्याशापिण्डम्।। भज0।।6

अंगामध्ये त्राण न उरला । लकवा भरला देहासी

दंतोपंत चि उठुनिहि गेले । केसहि पिकले वा गळती

हाती काठी घेउन येई ।  लटपट लटपट वृद्ध फिरे

आशेच्या परि तंतूने तो । संसारासी घट्ट धरे।।6

हरि गोविंदा - - -।धृ0


बालस्तावत्क्रीडासक्त:

तरुणस्तावत्तरुणीरक्त:।

वृद्धस्तावच्चिन्तामग्न:

परे ब्रह्मणि कोऽपि न लग्न:।।भज0।।7

बाळपणीचा काळ सुखाचा । खेळामध्ये तो संपे

सळसळतेची तरुणरक्त ते ।  मोह वनाची सफर करे।।

संध्याछाया भिववी हृदया । चिंता निशिदिनि पोखरते

सरते आयू परी न कोणी। ब्रह्म कळाया आस धरे।।7

हरि गोविंदा - - -।धृ0


पुनरपि जननं पुनरपि मरणं

पुनरपि जननीजठरे शयनम्।

इह संसारे खलु दुस्तारे

कृपयापारे पाहि मुरारे ।।भज0।।8

पुन्हा पुन्हा हे जन्मा येणे  । पुन्हा पुन्हा हे मरण छळे

पुन्हा पुन्हा आईच्या उदरी । नित्य नव्याने जन्म मिळे

खडतर ऐशा संसारातुन । पार करी मज कृष्ण हरे

त्राता नाही तुझ्या वाचुनी । जन्मावरती जन्म सरे।।8

हरि गोविंदा - - -।धृ0


पुनरपि रजनी पुनरपि दिवस:

पुनरपि पक्ष: पुनरपि मास:।

पुनरप्ययनं पुनरपि वर्षं

तदपि न मुञ्चत्याशामर्षम्।।भज0।।9

अयन- दक्षिणायन  किंवा उत्तरायण असा सहा महिन्यांचा समुदाय

रात्रींमागुन उलटति रात्री । दिवसामागुन दिवस किती

पक्ष,मास,ऋतु अयनांनंतर । वर्षांची कोणा गणती

आयुष्याचा सरे काळ तरि । आशा वेली पालवली

मोह,मत्सराच्या भ्रांतीने । आग मनाची ना शमली।।9

हरि गोविंदा - - -।धृ0

 

वयसि गते क: कामविकार:

शुष्के नीरे क: कासार:।

नष्टे द्रव्ये क: परिवारो

ज्ञाते तत्त्वे क: संसार:।।भज0।।10

 

वय सरल्यावर सार्‍या सार्‍या ।   कामविकारा अर्थ नसे

ठक्क कोरड्या सरोवराचा । काय असे उपयोग बरे?

संपुष्टातचि येता धन ते    निज परिवार हि व्यर्थ असे

जाणुन घेता ब्रह्म खरोखर । संसाराचे भय हि नसे।।10

हरि गोविंदा - - -।धृ0


नारीस्तनभरनाभीदेशं

दृष्ट्वा मिथ्या मोहावेशम्।

एतन्मांसवसादिविकारं

मनसि विचारय वारं वारम्।।भज0।।11

 

स्त्री देहावर भाळुन चिंतन। सतत मानसी तू करिसी

मोह जयाचा पडला तुजला । रक्त मांस नुसती चरबी

तू समजावी हृदया ऐसे । वारंवार विचार करी

शाश्वत आहे जगतामध्ये। एकचि तो जगदीश हरी।।11

हरि गोविंदा - - -।धृ0


कस्त्वं कोऽहं कुत आयात:

का मे जननी को मे तात:।

इति परिभावय सर्वमसारं

विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्।।भज0।।12

प्रश्न विचारी   तूचि मनाला । कोणचि मीआलो कुठुनी ?

कोण असे मम माय तात ते । असार याची संसारी

स्वप्नसदृशी जग हे सारे    मोहाने दिसुनी येते

स्वप्न संपुनी  जागे होता । आज दिसे ते उद्या नसे।।12

हरि गोविंदा - - -।धृ0


गेयं गीता नामसहस्रं

ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्।

नेयं सज्जनसङ्गे चित्तं

देयं दीनजनाय च वित्तम् ।।भज0।।13

अजस्र - अनवरत, सतत,अविच्छिन्न

रोज म्हणावी गीता सुंदर  । नाम  सहस्रा वा न चुके

चित्ती आठव रूप मनोहर    पुन्हा पुन्हा ते श्रीहरिचे

साठवि ना तू धनसंपत्ती । गोरगरीबा वाटुन दे

संतसज्जनांच्या संगे तू । घालवि वेळ सदैव सुखे।।13

हरि गोविंदा - - -।धृ0

 

यावज्जीवो निवसति देहे

कुशलं तावत्पृच्छति गेहे।

गतवति वायौ देहापाये

भार्या बिभ्यति तस्मिन्काये ।।भज0।।14

प्राण करी संचारचि देही । तोवर बहु अलबेल असे

काय हवे वा नको विचारी । घरचे पुसती कुशल बरे।।

प्राण सोडुनी जाई तेंव्हा । निर्जिव पाहुन ती काया

थर थर भीतीने कापे ती। घाबरून जाई जाया।।14

हरि गोविंदा - - -।धृ0


सुखत: क्रियते रामाभोग:

पश्चाद्धन्त शरीरे रोग:।

यद्यपि लोके मरणं शरणं

तदपि न मुञ्चति पापाचरणम्।।भज0।।15

गोडचि वाटे संगति स्त्रीची । रोगाने जरि देह सडे

मरणापुढती टेकवि गुडघे । सुटका ह्यातुन काहि नसे

पापाचरणी रुची न संपे    दुष्कर्मचि ना तुज सोडे

साथ तयाची सदा करुनि का ।  झिजवी देहा तूचि बरे।।15

हरि गोविंदा - - -।धृ0

 

रथ्याकर्पटविरचितकन्थ:

पुण्यापुण्यविवर्जितपन्थ:।

नाहं  न त्वं  नायं लोक-

स्तदपि किमर्थं क्रियते शोक:।। भज0।।16

चिंध्या जोडुन वस्त्र करीसी । पाप पुण्य ही वर्ज तुसी

मिथ्या आहे तू मी सारे ।  जग हे मिथ्या’ तू म्हणसी

सांग तरी हा शोक कशाचा?  वैराग्याचे ढोंग करी

जाणुन घे तू चित्तामध्ये । वेड्या एकचि एक हरी।।16

हरि गोविंदा - - -।धृ0


कुरुते गङ्गा सागरगमनं

व्रतपरिपालनमथवा दानम्।

ज्ञानविहीन: सर्वमतेन

मुक्तिं न भजति जन्मशतेन।। भज।। 17

तीर्थाटन जरि नियमित करिशी ।  गंगा सिंधू स्नानहि ते

व्रते आचरी नाना सारी    दाने नाना देत असे

झाले नाही ज्ञान परी तुज   ‘ब्रह्म सत्य ते मीच असे

सर्व करोनी मिळे न मुक्ती । जन्म किती जरि घालविले।।17

हरि गोविंदा वद गोविंदा वद गोविंदा भ्रांतमती

ठाके मरण पुढ्यातचि तेंव्हा ‘घोकंपट्टी’ काय करी।।धृ0


भक्तजनांना कळण्यासाठी । सुगम मराठी मध्ये ही

अरुंधतीने चर्पटपंजरि । रसिका अनुवादित केली

सरळ शब्द हे सोपे सोपे । भाव-अमृते भरलेले

सुजन जनांना सुखविल निश्चित । मनास माझ्या वाटतसे।।

---------------------------------------------------------

श्रावण शुद्ध प्रतिपदा, 7 ऑगस्ट, 2013

 






8 comments:

  1. Enjoyed your translation.reading the original reminded me of Sir teaching us the same in Pathshala.
    Ujjwala

    ReplyDelete
  2. kindly translate vedokta shri sukta,purush sukta and rudra ashtadhyayi
    to puranokta sanskrut stotras (puranokta type),and also marathi samashloki
    - very good translation to chant in marathi

    ReplyDelete
  3. Really wonderful. Translation . Thank you so much. Lord Krishna Bless you.

    ReplyDelete
  4. While searching the Shloka
    अग्रे वन्हिः I came across this anuvad parijatha very nicely translated.

    ReplyDelete
  5. कृपया दुक्रुञ करणे हे सूत्र जरा विस्तृत पणे मांडावे . छान अनुवाद!

    ReplyDelete
  6. सहज पाहता पाहता चरपटपनजरिका चा हा अनुवाद पाहिलं/ वाचला. अनुवाद उत्कृष्ट आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. व्वा! अतिशय सुरेख अनुवाद. मी या स्तोत्रावर नेहमीच चिंतन करतो पण असे समर्पक मराठी सुचले नव्हते.

    ReplyDelete