पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

 


                      शिवमहिम्न स्तोत्र हे अतिशय प्राचीन स्तोत्र समजले जाते. त्याचा काल ठरवितांना मात्र अनेकांची अनेक मते आहेत. हे स्तोत्र लिहीणारा पुष्पदंत कोण? ह्याविषयीही अनेक कथा, उपकथा प्रचलित आहेत. ह्या सर्व कथांपैकी जी सर्वात ज्यास्त प्रसिद्ध आहे ती अशी -

                           पुष्पदंत नावाचा एक शिवभक्त गंधर्व राजा होता. रोज शिवपूजेसाठी बाहु नावच्या राजाच्या रमणीय उद्यानातील सुंदर सुंदर फुले तो अदृष्यरूपात येऊन चोरून  आकाशमार्गाने निघून जात असे. रोज रोज आपल्या उद्यानातील फुले तोडली गेलेली पाहून राजा नेहमी क्रुद्ध होत असे. ह्या मायावी गंधर्वाला अडविण्यासाठी त्याने एक उपाय योजला. त्याने बागभर सर्वत्र श्री शिवाचे निर्माल्य पसरून ठेवले. अदृष्य रूपात ह्या शिवाच्या निर्माल्यावरून चालत गेल्याने पुष्पदंताचे पुण्य संपले. पुष्पदंताची मायावी ताकद संपुष्टात आली. तो पकडला गेला. राजाच्या बंदिगृहात असतांना ह्या शिवउपासकाने आपले दुःख दूर व्हावे या हेतूने शिवाची स्तुती रचण्यास आरंभ केला. तेच हे शिव महिम्न. ह्या स्तोत्रात आलेल्या महिम्न ह्या शब्दामुळे त्याला शिवमहिम्न स्तोत्र म्हटले जाते. पुष्पदंताने मात्र धूर्जटिस्तोत्र असा याचा उल्लेख केलेला आहे.

                       ह्या स्तोत्रात असलेल्या 43 श्लोकांपैकी 32 श्लोक हे पुष्पदंताचे आहेत. बाकी श्लोक फलश्रुती अथवा नंतर त्यात आले आहेत.

पुष्पांच्या अपहाराचे प्रायःश्चित्त म्हणुन जणु काही या कवीने हा 32 श्लोकांचा श्लोकपुष्पहार देवास अर्पिला आहे. असं म्हणतात की गळ्यातील कंठा अथवा रुद्राक्षमाला ही 32 रुद्राक्ष अथवा 32 मणी, मोती, इत्यादि वापरून केलेली असते.

                 आपल्या मुखातील दातांची संख्या ही 32च असते. हे स्तोत्र म्हणजे श्री पुष्पदन्त मुखपङ्जनिर्गत (पुष्पदंताच्या मुखरूपी कमळातून बाहेर पडलेले) किंवा कंण्ठस्थित (कंठात माळेप्रमाणे शोभणारे) आहे. दंत हा उल्लेख 32 ही संख्यादर्शक आहे. त्यावरून ह्या कवीचे नावच पुष्पदंत किंवा कुसुमदशन असे रूढ झाले आहे. ह्या स्तोत्रामुळे पुष्पदंताच्या मनातील

दुःख, कष्टांची जाणीव संपून गेली आणि त्यास शिवलोक प्राप्त झाला.

 ह्या सर्व गोष्टी आणि अनुमाना व्यतिरिक्त ह्या स्तोत्राकडे पाहिल्यास हे एक उच्च कोटीचे तत्वज्ञान आणि उच्च कोटीचा साहित्यिक दर्जा असलेले स्तोत्र आहे. अनेक सिद्ध स्तोत्रांमध्ये शिवमहिम्नाचीही गणना होते.


पुष्पदन्त उवाच -

पुष्पदन्त म्हणाला -

                         ।। ॐ नमः शिवाय ।।

(वृत्त  शिखरिणी , अक्षरे -17, गण - य म न स भ ल ग, यति -6,11)

महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसदृशी

स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिर:।

अथावाच्य: सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्

ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद: परिकर:।।1 

अन्वयार्थ -  हे हर! हे दुःख हरण करणार्‍या ईश्वरा यदि ते महिम्नः परं पारं अविदुषः स्तुतिः असदृशी, - जर आपल्या अपार महिम्याचा पैल तीर न जाणणार्‍यांनी केलेली आपली स्तुती अनुचित असेल, तत् ब्रह्मादीनाम् अपि गिरः त्वयि अवसन्नाः । - तर ब्रह्मादिंची वाणीही आपली स्तुती करण्यास योग्य नाही.( कारण त्यांनाही आपल्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले नाही.) अथ स्वमतिपरिणामावधि गृणन् सर्वः अवाच्यः । - म्हणून आपल्या आपल्या मतिनुसार केलेल्या कोणाच्या स्तुतीला वाईट म्हणू नये. (अतः) मम अपि स्तोत्रे एष परिकरः निरपवादः । - म्हणून माझा ही हा स्तोत्र रचण्याचा उपक्रम निष्कलंक आहे. ।।1

( महिम्न- महिमा.गौरव,यश ; परिकर: - आरंभ, उपक्रम ; अपवाद - निंदा, कलंक ) 

नसे सीमा काही हर तव गुणाब्धीस अखिला

कसे जाणावे ते मग तव अमर्याद स्वरुपा

कळोनी ना येता शिव तव असामान्य महिमा

कुणी सामान्याने तव गुण प्रशंसाचि करिता ।।1.1


अनाठायी वाटे अनुचितच हास्यास्पद जरी

तरी ब्रह्मादिंची स्तुतिहि नच पूर्णत्व मिळवी

म्हणोनी केली मी स्तुति मतिस साजेलच अशी

प्रयत्नांसी त्याची सफळ म्हणणे हे उचितची।।1.2 


अतीत: पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयो-

रतद्व्यावृत्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि।

 कस्य स्तोतव्य: कतिविधगुण: कस्य विषय:

पदे त्वर्वाचीने पतति न मन: कस्य न वच:।।2

अन्वयार्थ -   तव महिमा च वाङ्मनसयोः पन्थानं अतीतः च। - आपला महिमा वाणी आणि मन या दोघांच्या मार्गापलिकडे आहे. अगम्य आहे. यं श्रुतिः अपि – ज्याचे वेद देखील अतद्व्यावृत्या चकितं हे नव्हे’ या पद्धतीने भीत भीत अभिधत्ते - वर्णन करतात कतिविधगुणः? -  त्याचे गुण किती व कसे आहेत?  सः - तो महिमा कस्य स्तोव्यः? - कोणाला स्तुती करता येण्यासारखा आहे? कस्य विषयःकोणाचा विषय होणार आहे? तु - परंतु अर्वाचिने पदे – तुझ्या नव्या अवताराकडे (सगुणरूपाकडे) कस्य मनः – कोणाचे मन कस्य वचः - कोणाची वाणी न पतति - वळणार नाही बरे? ।।2 

( अतीत -  मन आणि वाणीला समजण्याच्या पलिकडे  अतद्व्यावृत्ति - ‘ हे नव्हे या पद्धतीनेअर्वाचीन - नवीन, अधुनिक, विरोधाभास दाखविणारे )

मनाच्या वाणीच्या अति पलिकडे सद्गुण तुझे

तयांसी वर्णाया सकल पडती शब्दहि फिके

स्वरूपा पाहोनी भयचकित हे वेद म्हणती

कळेना आम्हा तू शरण तुज आलो सुरपती।।2.1


जगी आहे जे जे नच असशि ते तूच कधिही

अशी वेदांनीही महति कथिली नेतिम्हणुनी

कसे अव्यक्ताशी जुळति मम धागे हृदयिचे

मनाला व्यक्ताची भुरळ अति स्वाभाविक पडे।।2.2


कळे सर्वांना हे तव सगुण साकार रुपडे

जटाधारी त्याची नित शिवपदी हे मन जडे

मनाला वाचेला विषयचि दुजा ना उरतसे

गुणांसी वर्णाया मन, हृदय, वाणी न थकते।।2.3


नदी वाहे मोठी झुळझुळ जरी ती जवळुनी

तृषार्ताची तृष्णा जल शमविते ओंजळभरी

न येई कामासी अमित कुठली वस्तु कधिही

कराया कामासी परिमितचि सामग्रि बरवी।।2.4




मधुस्फीता वाच: परमममृतं निर्मितवत-

स्तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम्।

मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवत:

पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता।।3


अन्वयार्थ -   हे ब्रह्मन्! - हे ब्रह्म देवा, परमं अमृतं निर्मितवतः - श्रेष्ठ असे अमृत निर्माण करणार्‍या (यस्य) वाचः मधुस्फीताः - ज्याची वाणी माधुर्ययुक्त आहे तव - तुझ्या बाबतीत सुरगुरोः अपि वाक् - ब्रह्मदेवाची वाणी देखील किं विसमयपदं ? आश्चर्यकाराक आहे काय? हे पुरमथन! -  हे तीन पुरे नष्ट करणार्‍या ईश्वरा भवतः गुण-कथन-पुण्येन – तुझ्या गुणांचे वर्णन केल्याने लाभणार्‍या पुण्याने मम तु एतां वाणीं पुनामि - माझी ही वाणी पवित्र व्हावी. इति अर्थे - या साठी अस्मिन् बुद्धिः व्यवसिता ।  – माझी ही बुद्धी योजली आहे. ।।3

        ( स्फीत -  प्रचुर, पर्याप्त, विस्तृत ; मधुस्फीता -अमृताने ,माधुर्याने भरलेली, संपृक्त)

परब्रहमा कैसी मधुर तव वाणी अनुपमा

तुझ्या शब्दा शब्दातुन निथळते अमृत अहा

 अहो निर्मियेले सुमधुर तुम्ही वेद सकला

कशी ह्या वाणीची सुरगुरुसवे होय तुलना? ।। 3.1

 

विधात्याची वाणी कितिहि असली गोड तरिही

तिच्या माधुर्याचा तुजसिच अचंबा नच मनी

तुझ्या वाणीची का सर कधि कुणा येइल कशी

तुझ्यासंगे त्यांची नचचि तुलना शक्य कधिही।।3.2


गुणांच्या ऐश्वर्या पुढति न टिके जेथ कुणिही

करावी तेथे मी स्तुति तवचि हे धाडस अती

कळे हेची सारे त्रिपुरहर बा चित्ति मजसी

परी या बुद्धीला शिव-महतिची आवड अती ।। 3.3

 

शिवा होवो वाणी अमल विमला निर्मल अती

तुझे गाता गाता गुण सकल ही आस मनिची

असे हा बुद्धीचा मम निखळ हेतू समज तू

चरित्रासी गावे सुखद तव जाणी मम मनू ।। 3.4



तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्

त्रयी वस्तुव्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु।

अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं

विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः ।।4


अन्वयार्थ -   हे वरद, - हे वरदायका यत् तव – जे तुझे जगदुदय-रक्षा- प्रलयकृत् – जगाची निर्मिती, रक्षण व नाश करणारे त्रयी वस्तु -  तीनही वेदांचा विषय असलेले तिसृषु गुणभिन्नासु – तीन वेगवेगळ्या गुणांमध्ये तनषु व्यस्तम् – शरीरामधे विभागलेले ऐश्वर्यं -  वैभव आहे (तद् ऐश्वर्यं ) विहन्तुं – त्या वैभवाचा नाश करण्यासाठी  इह एके जडधियः – काही मंद बुद्धीचे लोक अस्मिन् (विषये) अभव्यानां रमणीयां, ( वस्तुतश्च) अरमणीं , व्याक्रोशीं विदधत । -अभद्र अशोभनीय पण काही क्षुद्र लोकांना आवडणारी कर्कश्श आरडाओरड करत असतात. ।। 4


प्रभो विश्वेशा हो!  त्रिगुण तव सत्वादि तम हे

भरोनी मूर्तीतें  हर, हरि,विधाता प्रकटले

जगाची उत्पत्ती, स्थिति, विलय हेची घडविणे

तयांच्या हातांनी सहज; तव सामर्थ्य इतुके।।4.1

 

तुझ्या ह्या ऐश्वर्या करिसिच विभाजीत सहजी

विभागूनी ठेवी हर हरि विधीच्याच शरिरी

तिन्ही वेदांनीही सतत कथिले हे मत जरी

तरी खंडाया ते गहजब अडाणी बहु करी।।4.2


विधाने मांडोनी जळजळित प्रक्षोभक महा

करोनी कांगावा मुदित करती नास्तिक जना

तयामध्ये नाही लवभरही औचित्य कुठले

सुखावे ती दुष्टा ; सुजन-हृदया ती दुखविते।।4.3



किमीहः  किं कायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं

किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च

अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरदुःस्थो हतधियः

कुतर्कोऽयं कांश्चिन्मुखरयति मोहाय जगतः।।5


अन्वयार्थ -   स धाता – तो परमेश्वर खलु किमीहः – खरोखर कुठल्या इच्छेने किंकायः, -  कुठल्या शरीराने किमुपायः, - कुठल्या साधनांनी, किमाधारः, - कुठ्या आधारावर किमुपादानः, - कुठल्या सामग्रीने त्रिभुवनं सृजति – त्रिभुवनाची निर्मिती करतो इति अयं- अशा प्रकारे अतर्क्यैश्वर्ये त्वयि-  ज्याच्या एश्वर्याचा तर्क करणेही अशक्य आहे अशा तुझ्याविषयी अनवसरदुःस्थः – निराधार हणकस  कुतर्कः – तर्कदुष्ट विचार जगतः मोहाय – जगाला मिहित करण्यासाठी कांश्चित् हतधियः मुखरति । -  ब्रह्मदेव काही मूर्खांना बोलायला लावतो. ।। 5


( उपादान  कारण, प्रयोजन, आधार , एखादि वस्तू बनविण्याची सामग्री । )

जरी ईशाने या जग घडविले हेचि सगळे

कशापासूनी हो? जग घडविण्या साधन कुठे?

नसे ज्यासी काया जगत बनवे तोचि कसले

कशासाठी सारे करुन सगळे व्यर्थ शिणणे।।5.1


कृती ईशाचीही जरि मन विचारांपलिकडे

तरी मूढांची ही बडबड वृथा मोहित करे

न घेता जाणोनी तव गुणमहत्त्वास लवही

कुतर्का ना सोडी सकलचि निराधार असुनी।।5.2


करी ब्रह्मा जेंव्हा जगत नव निर्माण सगळे

जना -समान्यांच्या हृदि उमटण्या सम्भ्रम नवे

कधी मूढांनाही हिणकस कुतर्कांसचि असे

वदाया लावे तो भ्रमित करण्यासी जगत हे ।।5.3





अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगता-

मधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति।

अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरो

यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे।।6


अन्वयार्थ -   अमरवर! हे देवश्रेष्ठा अवयवन्तोऽपि लोकाः किं अजन्मानः? – अवयव असलेला जीव लोक अथवा परिपूर्ण असलेले त्रैलोक्य हे जन्मरहित असेल काय?( नक्कीच इतकी परिपूर्ण कृती कुणी कौशल्याने करण्यावाचून आपोआप तयार होणार नाहीत. भले तो कर्ता आपल्याला दिसत जरी नसला तरी ) किं भवविधिः जगतां अधिष्ठातारं अनादृत्य भवति? – काय ह्या सर्व सृष्टी क्रिया जगताच्या अधिष्ठाता /कर्त्याच्या विना संभव आहेत का?  अनीशः कः भुवनजनने परिकरः कुर्याद् वा? – कोणी ईश्वराचे अस्तित्त्व न मानता (कुणाच्याही शिवाय) सृष्टीची निर्मिती होते काय? यतः इमे मन्दाः त्वां प्रति संशरेत। - म्हणून हे काही मूर्ख लोक तुझ्याविषयी संशय घेतात. ।।6


असे सर्वांगाने त्रिभुवन परीपूर्ण सगळे

घडे सृष्टीमध्ये नियम अनुसारी सकल हे

जगाची उत्पत्ती स्थिति लय घडे नित्यनियमे

विना कर्ता का हे सुरळितचि चालेल जग हे ।। 6.1

 

असे ज्यांना काया अवयवयुता तेचि सगळे

कसे येती जन्मा जर कुणि कर्ता नच असे

नसे त्रैलोक्याला जरि कुणि नियंता सुरवरा

कसे चालावे हे जगत नियमाने प्रतिदिना ।। 6.2

 

परी अज्ञानी हे विपरितमती मान्य न करी

कुतर्काने झाले कलुषित यांचे मन अती

दुजा कोणी ईशाविण जरि करे सृष्टि सगळी

तयाची सामग्री विशदचि करावे स्वरुप ही ।। 6.3

 

पुरावा ना देता बडबड वृथा तेच करती

नसे शंकांना त्या उचित लव आधार वचनी

तुझ्या ह्या अस्तित्वा कळुन म्हणती ना उचितची

असे हे अज्ञानी जन बहु  अभागीच जगती ।। 6.4

 


त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति

प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च।

रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषां

नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव।।7


अन्वयार्थ -   त्रयी, - (ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद असे) तीन वेद, सांख्यं – कपिलप्रणित सांख्यशास्त्र, योगः – ( पतंजलीचे) योगशास्त्र, पशुपतिमतं – पाशुपत मत, वैष्णवं – वैष्णव मत इति प्रभिन्ने प्रस्थाने – असे निरनिराळे धर्माचे पंथ`` परं इदं’’ ``अदः पथ्यं’’ इति च रूचीनां वैचित्र्यात्- `` हे मत श्रेष्ठ आहे, हे मत हितकर आहे’’ असे निरनिराळ्या आवडीप्रमाणे ऋजु-कुटिल नाना-पथ-जुषां – सरळ व कठीण अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार्‍या पुरुषांच्या बाबतीत नृणां एकः गम्यः त्वम् असि – तूच एकमेव अंतिम उद्दिष्ट आहेस , पयसां अर्णवः इव, । -पाण्याचे गम्यस्थान जसे समुद्र असते. ।। 7


जसे मेघातूनी जल बरसलेले चहुकडे

धरे नाना वाटा परि जलधिला जाउन मिळे

तसे शास्त्रांचेही विविध असती पंथचि भले

असो वेदांचे ते गहन मत वा सांख्य मत ते।।7.1


कुणी या योगाची महति बहु सांगे लगबगे

कुणी पूजी विष्णू , कुणि अनुसरे शैवमत हे

गमे सर्वांनाही मम मतचि सर्वोत्तम असे

असे सर्वांहूनी हितकरचि सोपे सरळ हे।।7.2


असो सोपा वा तो अति जटिलही मार्ग कुठला

असो काटेरी वा सुगम लघु  आह्लादकचि वा 

रुची ज्याला जैसी अनुसरति तैसे जनचि हे

परी अंती सारे तव निकट येतीच पथ  हे।।7.3





महोक्षः खट्वाङ्गं  परशुरजिनं भस्म फणिनः

कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम्।

सुरास्तां तामृद्धिं दधति च भवद्भ्रूप्रणिहितां

 हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णां भ्रमयति।।8


अन्वयार्थ  -   हे वरद! हे वरदायक शंकरा, महोक्षः – भलामोठा नंदिबैल अथवा वृद्ध नंदी, खट्वाड्गं – त्रिशूळ किंवा खाटेचा पाय, परशुः - परशु, अजिनं- मृगचर्म , भस्मः – भस्म, विभूती, फणिनः – नाग-साप, कपालं च -  आणि कवटी , इति इयत् तव तन्त्रोपकरणम् – अशी एवढी तुझी (संसारपयोगी) साधने आहेत, (परं) सुराः तु – पण इंद्रादि देव सुद्धा भवद्भ्रूप्रणिहितां – आपल्या नुसत्या भुवईच्या उंचावण्याने/ हालचालीने तां तां ऋद्धिं दधति। - ती ती सिद्धि, समृद्धी प्राप्त करून घेतात. स्वात्मारामं विषयमृगतृष्णा न हि भ्रमयति । - आत्मानंदात मग्न असणार्‍यास विषयांचे मृगजळ मोहाने भुलवत नाही. ।। 8

 

(प्रणिहित  समर्पित,सुपूर्द,उपलब्ध रुंड -  माणसाचे धडाविना मस्तक)

 

न शोभे नंदी हा तुजसिच शिवा वृद्ध किति हा

तुझ्या या काठीला जडवि नर-रुंडास प्रभु का

कटी-वस्त्रासाठी जवळ गजचर्माविण दुजे

नसे काही शंभो तुज जवळ भस्माविण दुजे।।8.1


तुझ्या हाती शोभे नर-कवटि ही खंडपरशु

विषारी नागांनी तव सकल वेढीयलि तनु

तुझ्या संसाराचा रथ निरत चालो म्हणुन बा

असे का सामग्री अनुपमचि ही दिव्य सकला।। 8.2


शिवा शंभो तुम्ही लव उचलिता एक भुवई

इशार्‍याने त्याची  सुरवरचि होती बहु धनी

परी पाहू जाता तव विभव संपत्ति सगळी

कळे  आत्मज्ञानी नच विषयतृष्णेस भुलती।।8.3




ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं

परो ध्रौव्याध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये।

समस्तेऽप्येतस्मिन्पुरमथन तैर्विस्मित इव

स्तुवञ्जिह्वेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता।।9


अन्वयार्थ -   हे पुरमथन! – त्रिपुरांचा नाश करणार्‍या शंकरा, कश्चित् सर्वं (जगत्) ध्रुवं गदति – कोणी हे सर्व जग नित्य, शाश्वत, चिरकाळ टिकणारे आहे असे म्हणतो , अपरः तु इदं सकलं अध्रुवं इति गदति – तर दुसरा कोणी हे जग नश्वर आहे असे म्हणतो, परः समस्ते अपि एतस्मिन् जगति ध्रौव्य-अध्रौव्ये व्यस्तविषये (इति) गदति। - तर (आणखी) दुसरा या सपूर्ण जगतामधे शाश्वत आणि नश्वर अशा भिन्न धर्मिय वस्तु आहेत असे म्हणतो तैः विस्मितः इव (अहं) – या भिन्न मतांनी गोंधळून गेलेल्या मला त्वां स्तुवन् न खलु जिह्वेमि – तुझी स्तुती करतांना लाज वाटत नाही. ननु खलु मुखरता धृष्टा । - खरोखर माझी वाचाळता/ बडबड  हे धाडसच आहे. ।। 9


जगी शास्त्रज्ञांची बहु मत चढाओढचि दिसे

कुणी सांगे हेची जगत सगळे नित्यचि असे

कुणी सांगे आहे क्षणिक जग हे जे दिसतसे

अनित्या-नित्याची सरमिसळ झाली कुणि म्हणे।।9.1


मतांचा ऐसा हा बहु गलबला होय तरिही

यशोगाथा गाता समरसचि होऊन तव ही

मनासी वाटेना  अविनयचि हा रे मम असे

शिवा औद्धत्याचे नच निडर वाचाळपण हे।।9.2


तवैश्वर्यं यत्नाद्यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः

परिच्छेत्तुं यातावनलमनलस्कन्धवपुषः।

ततो भक्तिश्रद्धाभरगुरुगृणद्भ्यां गिरिश यत्

स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति।।10

अन्वयार्थ -   हे गिरीश! – हे कैलासपती,  यत् अनलस्कंधवपुषः तव ऐश्वर्यं –अग्नीप्रमाणे तेजस्वी शरीर हे जे तुझे ऐश्वर्य आहे, (तत्) परिच्छेत्तुं – त्याचे अनुमान करण्यासाठी उपरि विरिञ्चिः अधः हरिः (च गतौ) – ब्रह्मदेव वर तर विष्णू खाली गेला । यत्नात् यातौ अनलम् । - पण त्यांचे प्रयत्न कमी पडले. ततः ताभ्यां भक्ति-श्रद्धा-भर-गुरू-गृणद्भ्याम् स्वयं तस्थे। - नंतर अतिशय भक्ती आणि श्रद्धा यांच्या योगे (त्यांनी) स्तुती केल्याने ते (ऐश्वर्य) स्वतःच प्रकट झाले. किं तव अनुवृत्तिः न फलति? – तुझी सेवा काय फळ देणार नाही ? ( सर्व काही देईल.) ।। 10

(परिच्छेत्तुम् -– परिमाण ठरविण्यास,तोलण्यास, अनुमान बांधण्यास,यथार्थ रूपाने जाणून घेण्यास)

 

तुझे हे तेजस्वी स्वरुप जणु अग्नी सम असे

असे पावित्र्याने अति विमलतेनेचि भरले

असे त्याची व्याप्ती सकल अनुमाना पलिकडे

कुणाचे चालेना तुजपुढति काही तिळभरे।।10.1


तुझ्या या व्याप्तीच्या सकल अनुमानास करण्या

विधाता गेला तो वर वर अती ऊंच बहु हा

हरी पाताळी या तुजसि किति शोधून थकला

तुझ्या रूपाचा ना क्षणभर किनारा गवसला।।10.2


परी श्रद्धा भक्ती धरुन हृदयी  ते तव पदी

शिवा आले जेव्हा शरण तुजसी नम्र वचनी

धरोनी ते विश्वात्मक स्वरुप तेव्हा प्रकटसी

शिवा कैसी होई तव चरणसेवा विफळ ती।।10.3


अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं

दशास्यो यद् बाहूनभृत रणकण्डूपरवशान्।

शिरःपद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहबलेः

स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम्।।11

अन्वयार्थ -   हे त्रिपुरहर! – हे तिनही पुरांचा नाश करणार्‍या शंकरा, यद् दशास्यः - रावणाने जे  अवैर व्यतिकरं त्रिभुवनम् अयत्नात् आपाद्य – वैरी नसलेले त्रिभुवनाचे राज्य प्रयत्न न करता प्राप्त करून रणकण्डू परवशान् बाहून् अभृत् – युद्धाची खुमखुमी न जिरलेले बाहू धारण केले (तत्) शिरः पद्म- श्रेणी –रचित चरणाम्भोरुह बलेः – (ते तुझ्या) चरणरूपी कमलावर आपल्या मस्तकरूपी कमलांची माळ अर्पण केल्याचे  स्थिरयाः त्वद्भक्तेः विस्फूर्जितम् । - तुझ्या विषयीच्या स्थिर अशा भक्तीचे फळ आहे. ।। 11


जराही युद्धाची नच शमविता कंड मनिची

प्रयत्नावाचोनी अलगद अनायास सहजी

घडे राज्यप्राप्ती त्रिभुवन-धनाची दशमुखा

कशा होत्या त्याच्या फुरफुरत युद्धासचि भुजा।।11.1


शिवा त्याची भक्ती दृढ,अढळ होती तव पदी

तुझ्या भक्तीपायी विसरुनचि तो जाय तनुसी

स्वहस्ते कापूनी शिरकमल एकेक  करुनी

शिरोमाला केली चरणकमळी अर्पण तुसी।।11.2


नऊ ती कापूनी शिरचि उरलेले नमवुनी

शिरे दाही वाही दशमुखचि गंगाधरपदी

प्रभावे भक्तीच्या वर मिळवि लंकेश मनिचे

न साधे भक्तीने जगति उरते कायचि असे ।।11.3



अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं

बलात् कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः।

अलभ्या पातालेऽप्यलसचलिताङ्गुष्ठशिरसि

प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः।।12

अन्वय – त्वदधिवसतौ कैलासे अपि – तुझ्या वसतिस्थानावर कैलासावर देखील त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं – तुझ्या सेवेमुळे प्राप्त झालेले (वीस) बाहूंचे जंगल बलात् विक्रमयतः अमुष्य – बळजबरीने वापरू इच्छिणारया या (रावणाला)  अलसचलितांगुष्ठशिरसि (सति) त्वयि  - तू सहज हलवलेल्या पायाच्या अंगठ्याच्या टोकाने  पाताले अपि प्रतिष्ठा अलभ्या आसीत् ।- पाताळातसुद्धा जागा मिळाली नाही.  ध्रुवं उपचितः अपि खलः मुह्यति । - खरोखर , (ऐश्वर्य) प्राप्त  झालेला दुष्ट देखील मोहात पडतो. ।। 12

अमुष्य – (अदस् )-अशाचा,

अशा या लंकेशा कुठुनि मनि दुर्बुद्धि सुचली

कृपेची ठेवी ना तिळभरहि जाणीव हृदयी

विषारी खोडांचे वन जणुचि माजे चहुकडे

मदोन्मत्ताचे त्या शिवशिवत होते कर तसे ।।12.1


कृतघ्नाने त्याच्या पसरुन पुर्‍या वीसहि भुजा

तुझे कैलासीचे घर हलविले रे गदगदा

परी गौरीशा तू हसुन सहजी दाबुन जरा

पदाच्या बोटाने तयि सुलभ पाताळ दिधला।।12.2


स्मरे ना जो केल्या अमित उपकारांस कधिही

तया पाताळीही नच मिळतसे शांति हृदयी

पडे पापाच्या तो गहन चिखलाते असुर हा

रुते मोहामध्ये धन,बल मिळोनी खल पुन्हा।।12.3



यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सती-

मधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः।

 तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयो-

र्न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनति:।।13


अन्वयार्थ – हे वरद! – हे वरदायक शंकरा! परिजनविधेय त्रिभुवनः बाणः – त्रिभुवनाला सेवक बनवणार्‍या बाणासुराने  सुत्राम्णः - इंद्राचे परमोच्यैः अपि सतीम् ऋद्धिम् – फार मोठे असलेले वैभव देखील यद् अधः चक्रे । - जे खाली (म्हणजे पृथ्वीवर) खेचले त्वत् चरणयोः वरिवसितरि तत् चित्रं न । - (ते) तुझ्या चरणांवर विनम्र होणार्‍याच्या बाबतीत आश्चर्यकारक नाही.  ते अपि त्वयि अपि शिरसः अवनतिः - तुझ्या ठिकाणी केलेली मस्तकाची नम्रता कस्य उन्नत्यै न भवति?- कोणाच्या उन्नतीला कारणीभूत होणार नाही? ( सर्वांच्याच उन्नतीला कारणीभूत  होईल.) ।। 13


शिवा! बाणाने त्या त्रिभुवनचि जिंकून सगळे

बळाने सर्वांसी बघ बनविले दास पदिचे

तयाने इंद्राचे बहु विभव ऐश्वर्य अवघे

बळाने खेचूनी अवनिवर नेलेच पुरते ।।13.1

 

जगासंगे वागे अति अधमतेने असुर हा

उभारीले त्याने अवनिवर स्वर्गासचि दुज्या

बघोनी बाणाचे धन विभव ऐश्वर्य जगती

अती लज्जेने तो नजर उचलेना सुरपती ।।13.2

 

कृपापारावारा! सकल जगताधार शिव हे

मला आश्चर्याचे तयि न दिसते  कारण कुठे

तुझ्या पायी येता शरण, मिळते काय न जगी

विराजे ना कैसा नर कुणिहि तो उच्च शिखरी।।13.3




अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा-

विधेयस्याऽऽसीद्यस्त्रिनयनविषं संहृतवतः।

 कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो

विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः।।14


अन्वय – हे त्रिनयन! – हे त्रिनयन शंकरा! अकाण्ड ब्रह्माण्ड क्षयचकित देवासुर कृपा विधेयस्य- आकस्मिकपणे सार्‍या विश्वाचा विनाश होईल म्हणून घाबरलेल्या देव आणि राक्षस यांच्यावर कृपा करणार्‍या विषं संहृतवतः – आणि विष प्राशन करणार्‍या तव कण्ठे यः कल्माषः आसीद् – तुझ्या गळ्यावर काळानिळा डाग आहे सः तव कण्ठे  श्रियं कुरुते न किम्? – तो तुझ्या गळ्याचे भूषण  बनला नाही काय? अहो! भुवन-भय-भङ्ग- व्यसनिनः विकारः अपि श्लाघ्यः । - अहो, विश्वाची भीती नष्ट करण्याचे व्यसन असणार्‍यांचा कलंक / दोष देखील प्रशंसनीय असतो. ।। 14

अकाण्ड - आकस्मिक

 

शिवा जेव्हा आले जलधि-मथनातून वरती

महा ज्वाळांसंगे उसळतचि हालाहल भुवी

बघोनी तेव्हा ते जहर मरणाहून कडवे

जिवाच्या आकांते भयचकित झालेचि सगळे।। 14.1


अवेळी ब्रह्मांडा विष करिल का भस्म सहजी

विचाराने ऐशा गडबडुन गेलेचि हृदयी

अशावेळी चित्ती तव बहु दया ही उपजली

दिला देवा-दैत्या सदयहृदया धीर समयी।।14.2


विषासी प्राशी तू जरि जळजळे कंठ तव हा

तुझ्या या कंठासी जहर बनवी नीलचि शिवा

परी त्या डागाने खुलुन दिसतो कंठ तव हा

कलंकाची शोभा जणु तुज अलंकारचि समा।।14.3


भयापासूनी जो सकल जगता मुक्तचि करी

तयांच्या दोषांसी गुण समजती लोक जगती।।14.4

 

असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे

निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः।

 पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्

स्मरः स्मर्तव्यात्मा नहि वशिषु पथ्यः परिभवः।।15


अन्वयार्थ – हे ईश, हे ईश्वरा यस्य विशाखाः सदेवा सुर नरे जगति – ज्याचे बाण या जगातील देव, असुर वा मानव यांच्यावर पडले असता असिद्धार्थाः न निवर्तन्ते - निष्फळ होऊन परतत नाहीत नित्य जयिनः – नेहमी जय पावतात. सः स्मरः त्वाम् इतर साधारणं सुरं पश्यन् - तुझ्याकडे इतर साधारण देवांप्रमाणे पाहणारा तो मदन स्मर्तव्यात्मा अभूत – नामशेष झाला. हि – कारण, वशिषु परिभवः – इंद्रिय निग्रही लोकांचा तिरस्कार पथ्यः न भवति – हितकारक असत नाही. ।। 15


सुरांना दैत्यांना मदन करितो  विद्ध सहजी

शरांच्या वर्षावे अखिल नर घायाळ जगती

तयाच्या बाणांसी अपयश न माहीत कधिही

तया वाटे माझ्यासम नच दुजा विश्वविजयी।।15.1


मदाने ताठूनी तुजसि सुरसामान्य धरुनी

शरासी सोडीता तुजवर शिवा लक्ष्य करुनी

तया जाळीले तू नयन तिसरा तो उघडुनी

तयाच्या अस्तित्त्वा सहज मिटवी भस्म करुनी।।15.2


जयाच्या चित्ताचा दृढतम मनोनिग्रह असे

छळे त्यासी जोची निज मरण आमंत्रित करे।।15.3




महीपादाघाताद्व्रजति सहसा संशयपदं

पदं विष्णोर्भ्राम्यद्भुजपरिघरुग्णग्रहगणम्।

मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा

जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता।।16

अन्वयार्थ – हे ईश, - हे परमेश्वरा, त्वं जगद्रक्षायै नटसि- जगाच्या रक्षणासाठी आपण नृत्य करता. (परंतु) पादाघातात् मही – पृथ्वी तुझ्या चरणांच्या आघातानी सहसा संशयपदं व्रजति – (आपण राहतो की नाही) अशा संकटात सापडते. भ्राम्यद् भुज परिघ रुग्ण ग्रहगणम् विष्णोः पदम् संशयपदं व्रजति; - (तर) सतत फिरणारया आपल्या बलिष्ठ बाहूंच्या प्रहाराने नक्षत्र, ग्रह, तारे आणि हे आकाशही पीडीत होते. द्यौः  अनिभृतजटाताडिततटा मुहुः दौस्थ्यं य़ाति (च)– आणि आपल्या अस्ताव्यस्त विखुरलेल्या जटांच्या तडाख्याने स्वर्गाचीही वारंवार दुर्दशा होते. ननु विभुता वामा एव – खरोखर मोठेपण/ प्रभुत्त्व मोठे त्रसदायकच असते. ।। 16

जगाच्या कल्याणा कृति तवचि प्रत्येक असते

जगासी सा र्‍या या परि भिववि हे तांडव कसे?

महेशा जेंव्हा तू भयद करिसी तांडव भुवी

तुझ्या मुद्रांनी या थरथरचि कापे जगतही।।16.1


पदाघाताने त्या डळमळित होईच अवनी

जणू वाटे मोठा प्रलय गिळतो का धरणिसी

तुझ्या ह्या बाहूंची धडक बसुनी नृत्यसमयी

नभीची नक्षत्रे तुटुन पडती ही विखरुनी।।16.2


शिवा जेंव्हा घेसी कितिक गिरक्या नृत्यसमयी

जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची

उडे केसांचा हा विपुल तव संभार भवती

तडाख्याने त्यांच्या भयचकित होई सुरपुरी।।16.3


महासत्ता ऐसी शिव शिवचि हाती गवसता

मला सांगा का हो हृदय बनते निर्दय शिवा

कृती कल्याणाची, परि न कळते ही तव मुळी

प्रभो सामर्थ्याची उचित असुनी  दुःखद कृती।।16.4

 

वियद्व्यापी तारागणगुणितफेनोद्गमरुचिः

प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते।

जगद् द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमि-

त्यनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः।।17

अन्वयार्थ – वियद्व्यापी यः वाराप्रवाहः आकाशला व्यापून टाकणारा, हा आकाशगंगेचा (मंदाकिनीचा) प्रवाह तारागण-गुणित- फेनोद्गमरुचिः – तार्‍यांच्या समुदायाने जो फेसाळला आहे वाटून त्याची शोभा वाढली आहे ते शिरसि पृषद्-लघु-दृष्टः – तुझ्या मस्तकावर बिंदुपेक्षाही लहान दिसतो. तेन जगत् जलधिवलयं द्वीपसारं कृतं (इति) दृश्यते । पण त्याच प्रवाहाने हे जग समुद्राने घेरलेले छोटेसे सप्तद्वीपा इतके उरले आहे असे वाटते ( अगस्तीऋषींनी सप्त समुद्र पिऊन टाकल्यावर भागिरथीच्या जलामुळेच सारे समुद्र भरले असे म्हणतात) अनेन तव दिव्यं धृतमहिम वपुः उन्नेयम् । - ह्यावरून तुझ्या दिव्य शरीराच्या प्रचंड व्यापत्तीचे जरा अनुमान करता येऊन तुझा महिमा केवढा आहे ह्याची जाणीव होते. ।। 17

( पृषत् –- पाणी किंवा द्रव पदार्थाचा थेंब अलघु - विस्तीर्ण ; - -विर्स्तीण अशी गंगा थेंबा एवढी छोटी दिसते)

नभी नक्षत्रे ही ग्रह विपुल तारे चमकता

गमे ही आकाशी अति धवल फेसाळ सरिता

तशी गंगा पृथ्वीवर जणुचि आकाशसरिता

जगाला वेढूनी जग बनविते द्वीप-सदृशा।।17.1


जलौघाची व्याप्ती मजसि गमते विस्मयकरी

परी ती गंगाही तव शिरि दिसे थेंब टिकली

तुझ्या या व्याप्तीच्या  सहज  अनुमानासि करण्या

असे हा छोटासा परि गहन दृष्टांतचि शिवा।।17.2


कसा विश्वामध्ये भरुन उरलासीच पुरता

कळे हे सर्वांना बघुनि तव या दिव्य तनुला

करोनी तर्कासी लव कळतसे व्याप तव हा

तुझ्या व्याप्तीचा हा अनुभव असे दिव्यचि शिवा।।17.3

 

रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो

रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिः शर इति।

दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधि-

र्विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः।।18

अन्वयार्थ – रथः क्षोणी पृथ्वी हा रथ, शतधृतिः यन्ता – ब्रह्मदेव हा सारथी अगेन्द्रः धनुः – श्रेष्ठ मेरू पर्वत हे धनुष्य, रथाङ्गे चन्द्रार्कौ - सूर्य आणि चंद्र ही दोन रथाची चाके रथचरणपाणिः शरः – रथाचे चाक म्हणजे सुदर्शन चक्र हाती असलेला विष्णू हा बाण. इति त्रिपुर-तृण दिधक्षोः ते – त्रिपुररूपी गवताच्यापात्याला जाळण्या साठी तुझा कः अयम् आडम्बरविधिः- केवढा हा साधन सामग्रीचा खटाटोप? वधेयैः क्रीडन्त्यः- साधनाबरोबर क्रीडा करणार्‍या प्रभुधियः – सत्ताधारी लोकांची बुद्धी न खलु परतन्त्रा – परतंत्र नसते हे खरे आहे. ।। 18

जसे का अग्नीने सहज गवता राख करणे

तसे होते सोपे तुजसि त्रिपुरा नष्ट करणे

परी तुम्ही शंभो रथ करविला या अवनिचा

विधात्यासी योजी सुलभ तव सारथ्य करण्या।।18.1


रथाच्या चाकांसी अति सहज जोडी शशि रवी

सुमेरू शैलाचे धनु कणखरी पेलुन धरी

तयासी लावीला शर म्हणुन लक्ष्मीपति हरी

समारंभाचा ह्या मजसि न कळे हेतु लवही।।18.2


तुझ्या या बुद्धीचा मज नच कळे ठाव कुठला

तुझ्या तंत्राने तू जगत सगळे खेळवि शिवा

मनी इच्छा येता मरत नव्हता का त्रिपुर बा

परी माया सारी रचुन खल का खेळवि असा।।18.3

 

हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयो-

र्यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।

गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा

त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्।।19

अन्वयार्थ – हे त्रिपुरहर! – हे त्रिपुरांचा नाश करणार्‍या शंकरा, हरिः ते पदयोः साहस्रं कमलबलिम् आधाय – विष्णू तुझ्या चरणांवर एक हजार कमळे घेऊन वहात असता, तस्मिन् एकोने (सति) यत्– त्यामधे एक कमी पडलेले दिसताच, (त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी जे आपणच लपवून ठेवले होते) निजं नेत्रकमलं उदहरत् – त्याने आपला कमलसदृश डोळा काढून वाहिला. (संख्या पूर्ण करण्यासाठी)) असौ भक्त्युद्रेकः चक्रवपुषा परिणतिम् गतः – ही उत्कट भक्ती सुदर्शन चक्राच्या रूपाने फळाला येऊन त्रयाणां जगताम् रक्षायै (सः) जागर्ति - तो/विष्णू त्रिभुवनाच्या रक्षणासाठी सदैव जागृत असतो.) ।। 19


सहस्रा पद्मांनी करिन तव पूजाहरि म्हणे

परी त्यासी तेंव्हा कमल पडले एकचि उणे

त्वरेने त्यावेळी स्वनयन सरोजास हरि हा

शराच्या पात्याने उखडुन करी अर्पण तुला ।।19.1


हरीच्या भक्तीची अति चरम सीमाच जणु ही

जगाच्या उद्धारा विलसत करी चक्र बनुनी।।19.2

( विष्णूने केलेली ही अशी पूजा पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने त्यास सुदर्शन चक्र दिले ज्याने तो त्रिभुवनाचा सहज सांभाळ करतो.)

 

क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां

क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते।

अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदानप्रतिभुवं

श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः।।20


अन्वयार्थ – क्रतौ सुप्ते – यज्ञ पूर्ण झाला तरी फलयोगे त्वं जाग्रत् असि। - त्याचे फळ देण्याविषयी तू जागृत असतोस. प्रध्वस्तं कर्म – नष्ट झालेल्या कर्माचे फळ पुरुषाराधनमृते क्व फलति? – ईश्वराच्या आराधनेवाचून प्राप्त होते काय? अतः क्रतुषु फलदानं प्रतिभुवम् – म्हणून यज्ञाचे फळ देण्याबाबत (तू) जामीन आहेस.  त्वां संप्रेक्ष्य -  असे जाणून श्रुतौ श्रद्धां बद्धा – वेदांवर दृढ विश्वास ठेवून जनः  कर्मसु कृतपरिकरः – लोक नेटाने काम करायचा प्रयत्न करतात. ।। 20 


जिथे पोचायाचे तिथवरचि जाता पथिक रे

उरेना पायांसी क्षणभर जसे काम कुठले

तसे पूर्णत्वासी जंव जंवचि ये यज्ञ सगळे

उरेना कर्मासी तसुभरहि अस्तित्व कुठले।।20.1


नसे ज्या कर्माला जगति लव अस्तित्व कुठले

अशा त्या कर्माचे कुठुनिच मिळावे फळ कसे

तुझे भक्तीभावे परि विनित आराधन फळे

फळे देसी शंभो नित सकल तू जागृतपणे।।20.2


म्हणोनी श्रद्धा ही  अढळ धरुनी वेदवचनी

करी कर्मे सारी तुजवर विसंबूनचि गुणी।।20.3


क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृता-

मृषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुरगणाः।

क्रतुभ्रेषस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो

ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचाराय हि मखाः।।21


अन्वयार्थ – हे शरणद- हे आश्रय देणार्‍या शंकरा, क्रियादक्षः तनुभृताम् अधीशः दक्षः क्रतुपतिः – यज्ञ कर्मामधे प्रवीण असणारा व सर्व शरीरधारी प्राण्यांचा स्वामी असणारा दक्ष हा यज्ञकर्ता होता. ऋषीणाम् आर्त्त्विज्यं – ऋषी हे त्या यज्ञातील ऋत्विज / उपाध्याय होते. सुरगणाः सदस्याः – सारे देव  सभासद होते. (तथापि) – (असे असतांनाही) ऋतुफलविधान- व्यसनिनः  त्वत्तः क्रतुभ्रेषः – यज्ञाचे फळ देण्याची आवड असणार्‍या तुझ्याकडूनच (दक्षाच्या) यज्ञाचा नाश झाला. हि श्रद्धा विधुरं मखाः – कारण श्रद्धा न ठेवता केलेले यज्ञभाग क्रतुः अभिचाराय (भवन्ति) । - यज्ञ करणार्‍यांच्या नाशास कारणीभूत होतात. ।। 21


प्रजा जो सांभाळी अति कुशलतेनेच सहजी

स्वये झाला यज्ञी क्रतुपतिच तो दक्ष तरिही

त्रिकाळा जाणे जो मुनिवर  भृगू ऋत्विज जरी

जरी यज्ञी होते सुरवर उपस्थीत अतिथी।।21.1


शिवा आहे तूची सकल जगता आश्रय जरी

जनां देण्यासी तू क्रतुफल असे तत्पर अती

परी यज्ञा तूची कुपित हृदये ध्वस्त करिसी

विना श्रद्धा कैसे सुफळ घडवी कार्य कधिही।।21.2

 

प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं

गतं रोहिद्भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा।

धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं

त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः।।22


अन्वयार्थ – हे नाथ – हे जगन्नायका अमूम्  अभिकम् प्रजानाथं रोहिद्भूतां स्वां दुहितरं  हा कामातुर ब्रह्मदेव लज्जेने हरिणीचे रूप घेतलेल्या आपल्या कन्येमागे ऋषस्य वपुषा रिरमयिषुम् – प्रसभं गतः । (स्वतः) हरणाचे रूप धारण करून तिला बळजबरीने भोगण्याच्या इच्छेने गेला (असताना) सपन्नाकृतं त्रसन्तं दिवं गतम् अपि – शरीरात बाण शिरल्याने त्रस्त होऊन स्वर्ग लोकात गेल्यावर देखील धनुष्य धारण करणार्‍या तुझा (व्याघ्ररूपाने) मृगाच्या मागे लागणारा उत्साह त्याला अद्याप सोडत नाही. ।। 22


कधी एके काळी अघटित अशी गोष्ट घडली

सुकन्या संध्येचे अति रुचिर लावण्य बघुनी

स्वकन्या आहे ही मनि विसरुनी कामुक अती

विधाता धावे हा धरुनि अभिलाषा मनि तिची।।22.1


भयाने लज्जेने  पळत सुटली ती मृगरुपी

तिच्यापाठी ब्रह्मा मृग बनुन धावे निरतची

विधात्याचे ऐसे बघुन अति निर्लज्जपण ते

शिवा आलासी तू मदत करण्या धावुन तिथे।।22.2


किराता! विश्वेशा!! करुन धनुसी सज्ज समयी

पिनाका जोडीता शिव-शरचि घे वेध सहजी

विधात्याच्या अंगी तव शर बसे खोल रुतुनी

पळे ब्रह्मा स्वर्गी धरुन रुतलेला शर उरी।।22.3


नभी पाहू जाता अजुन दिसते दृष्य नयनी

मृगामागे जाई शर बनुनि आर्द्राहि गगनी।।22.4

(आकाशात मृग नक्षत्राच्या पोटात बाणासारखे घुसलेले आर्द्रा नक्षत्र दिसते  त्यावरून ही कल्पना घेतली आहे. मृगनक्षत्र म्हणजे ब्रह्मा आणि आर्दानक्षत्र म्हणजे ब्रह्मदेवाच्या पोटात रुतलेला बाण)

 

स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्

पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि।

यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटना 

दवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः।।23


अन्वय – हे वरद,- हे वरदायी शंकरा, स्वलावण्याशंसा - स्वतःच्या लावण्याच्या गर्वाने धृत-धनुषम् पुष्पायुधं – हाती धनुष्य घेतलेल्या मदनाला  पुरः तृणवत् अह्नाय प्लुष्टं दृष्ट्वा अपि – आपल्या समक्ष त्वरित गवताप्रमाणे जाळून टाकलेले पाहून देखील  यदि देवी- जर देवी पार्वती हे यमनिरत – हे यम नियमादि अष्टांग योग प्रवीण महादेवा देहार्ध घटनात् – तिला आपल्या शरीराच्या अर्ध्या भागात नित्य स्थान देण्यामुळे  त्वां स्रैणं  अवैति – जर आपल्याला स्त्री लंपट समजत असेल तर  बत अद्धा युवतयः मुग्धाः सन्ति ।- अहो खरोखर तरुण स्त्रिया भोळसर असतात. ।। 23


असे सौंदर्याचा परम पुतळा मीच जगती

शिवालाही माझ्या चुणु दिसु दे पुष्पधनुची

अशा ह्या वृत्तीने धनु उचलताची मदन हा

तया जाळीले तू  गवत जळते त्यासम शिवा।।23.1


प्रसंगासी ह्याची लव न स्मरता चित्ति  गिरिजा

शिवाची अर्धांगी म्हणुन जवळी स्थान मिळता

म्हणे झाला शंभू शिव मजवरी लुब्ध पुरता

तपश्चर्येचा हा विजय मम आहेच सगळा।।23.2


परी गौरीचा हा समज मनिचा पोकळ अती

युवा नारी सार्‍या जगति बहु भोळ्याच असती

जया अंगी सारे यम-नियम हे पूर्ण भिनले

कसे व्हावे त्याचे विचलित जराही हृदय हे।।23.3


करे सृष्टीचेही नियमनचि जो योग्य रितिने

तयाला जिंकाया कधि कुणि धजावेलचि कसे।।23.4

 

श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचरा-

श्चिताभस्मालेप: स्रगपि नृकरोटीपरिकर:।

अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं

तथापि स्मर्तॄणां  वरद परमं मङ्गलमसि।।24


अन्वयार्थ – हे स्मरहर! हे मदनाचे प्राण हरण करणार्‍या शिवा, तव स्मशानेषु आक्रीडा – तुझा स्मशानातील संचार, लीला, (पार्वतीसमवेत) खेळ पिशाचाः सहचराः – भूत पिशाच्चासारखे सोबती, साथीदार चिता भस्मालेप स्रक् नृ जळत्या चितेच्या  भस्माचा शरीराला लावलेला लेप स्रग् नृ करोटि परिकरः – माणसांच्या मुंडक्यांची गळ्यात घातलेली माळ एवं अखिलं तव शीलं अमङ्गलं नाम भवतु – असे तुझे चारित्र्य  अमंगल, ओंगळवाणे असले तरी असू देत भले तथा अपि वरद, स्मर्तॄणां परमम् मङ्गलम् असि -  तरी देखिल हे वरदायका तुझे नित्य स्मरण करणार्‍यांना (भक्तांना) तू सदैव मङ्गलच वाटतोस. ( कारण तू सदैव त्यांचे कल्याणच करतोस.) ।। 24


शिवा गौरीसंगे बसुनिच स्मशानात सहजी

जुगारासी खेळी जनन मरणाच्या सततची

पिशाच्चांची दाटी तुज भवति झाली कितिक ही

तयांसंगे शंभो अविरत कसा तूचि वससी?।।24.1


अति क्रोधाने तू मदन अवघा भस्म करुनी

चिताभस्माने त्या तनुवर तुझ्या लेप चढवी

नरांच्या रुंडांची अति भयद माला रुळत ही

तुझ्या कंठी शंभो अशुभ अति दुर्भाग्यप्रद ही।।24.2


नसे मांगल्यासी तिळभर ही जागा तुजकडे

परी मांगल्याचे प्रतिक तव मूर्ती दिसतसे

महादेवा जे जे स्मरण करती हे हृदि तुझे

तयांना देसी तू नित सकल सौभाग्य सगळे।।24.3

(रुंडमाला  माणसाच्या मुंडक्यांची माळा)

 

मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुत:

प्रहृष्यद्रोमाण: प्रमदसलिलोत्सङ्गितदृश:।

यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्ज्यामृतमये

दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान्।।25

अन्वयार्थ – मनः प्रत्यक् चित्ते सविधं अवधाय – ( बाह्य विषयांकडे धाव घेणार्‍या) मनाला यम नियमादींनी विधिपूर्वक अंतर्मुख करून आत्त मरुतः - प्राणायामद्वारा श्वास नियंत्रित करून प्रहृषत् रोमाणः – अत्यानंदाने शरीरावर रोमांच उठल्यामुळे प्रमदसलिलोत्संगितदृशः यमिनः -  आनंदाश्रुंनी डोळे भरून आलेले योगी यद् आलोक्य – ज्याचे अवलोकन करून, पाहून अमृतमये हृदे इव निमज्य – जणु अमृताच्या डोहात डुंबतात. तद् किमपि अन्तस्थत्त्वम् दधति -  जी काही अवर्णनीय स्थिती प्राप्त करून घेतात तत् भवान किल – ते तत्त्व म्हणजे खरोखर तूच आहेस. ।। 25

करी प्राणायामे नियमनचि त्या वायु गतिचे

मुनी पाळूनी हे यम-नियम शास्त्रोक्त रितिने

मनाला ठेवीती  हृदयकमळी आणुन सुखे

जिवाचे आत्म्याचे मिलन समयी त्या घडतसे।।25.1


परब्रह्मासी त्या अनुभवुन आनंदमयची

समुद्री सौख्याच्या नित विहरती अमृतमयी

सुखाच्या अश्रूंनी नयनकमले गाल भिजती

घडे रोमांचांनी पुलकितचि काया पुनरपि।।25.2


घडे सौख्याचा जो परिचय तयांना सुखमयी

परब्रह्माची जी प्रचिति हृदयासी उमगली

तुझ्या रूपाची ही अमल अनुभूती मज गमे

असे तेजस्वी तू अमलचि परब्रह्म शिव हे।।25.3


त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवह-

स्त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च।

परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं

 विद्मस्तत्तत्त्वं  वयमिह तु यत्त्वं न भवसि।।26

अन्वयार्थ  – त्वम् अर्कः- तू सूर्य आहेस. त्वं सोमः – तू चंद्र आहेस. त्वं पवनः – तू वारा आहेस. त्वं हुतावहः – तू अग्नी आहेस. त्वम् आपः तू पाणी आहेस. त्वं व्योम - तू आकाश आहेस. त्वं धरणिः - तू पृथ्वी आहेस. त्वम् आत्मा च असि – तू आत्मा आहेस. इति च एवं परिच्छिन्नां गिरं त्वयि परिणताः विभ्रतु – असे ज्ञानी लोक भले तुझ्याविषयी मर्यादित भाषा योजू देत. इह तु वयं – परंतु आम्ही मात्र यत् त्वं न भवसि – तू ज्यात नाहीस तत् तत्त्वं न विद्मः । - ते तत्त्व जाणत नाही. ।। 26


शशी, भानू , अग्नी, पवन, असशी तू गगन ही

असे तूची आत्मा, सलिल, असशी तूच अवनी

अशी  विद्वानांनी कितिक अनुमाने कथियली

तुझ्या व्याप्तीची ही अति उथळ मर्यादित जरी ।।26.1


वदो कोणी काही वरवरच भाषा उथळ ही

अमर्यादासी का नियम कधि मर्यादित करी

न तू ज्याच्यामध्ये भरुन उरला पूर्णपणि रे

न ठावे आम्हासी जगति असले तत्त्व कुठले।।26.2

 

त्रयीं तिस्रोवृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा-

नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृतिः।

तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभि:

समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमितिपदम्।।27

अन्वयार्थ – हे शरणद! -  हे शरणदाता, त्रयीम् (ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद) हे तीन वेद, तिस्रः वृत्तीः – ( जागृती, स्वप्नदर्शन आणि गाढ निद्रा ) या तीन अवस्था, त्रिभुवनम् – (स्वर्ग, मृत्यू पाताळ ) हे तीन लोक, त्रीन् अपि सुरान् – (ब्रह्मा, विष्णू, महेश) हे तीनही देव, अकाराद्यैः  त्रिभिः वर्णैः अभिदधत् – ( अकार, उकार मकार / अ उ म ) या तीन वर्णांनी दर्शविणारे, तीर्ण

 विकृति- विकार रहित, अणुभिः ध्वनभिः अवरुन्धानम् – अत्यंत सूक्ष्म ध्वनींनी बनलेले ते तुरीय धाम ॐ इति पदम् – तुझे तुरीय ( म्हणजे तीन वर्णांपलिकडचे ) निवासस्थान जे ॐ हे पद आहे  ते त्वां - तुझ्या (शिवाच्या)  समस्तं व्यस्तं गृणाति – तुझे स्वरूप समुदाय रूपाने व व्यक्तिरूपाने कथन करते. ।। 27


यजुः, ऋग्, सामादि निगमचि उभे ज्या धरुन हे

घडे, राही, जाई जगतचि जयांच्या कृतिमुळे

हरि, ब्रह्मा, शंभू सुरवर तिन्ही सक्षम भले

तयांचे आहे जे सबळचि अधिष्ठान पद जे।।27.1 -


दशा स्वप्नांची वा शयन अथवा जागृति असे

अवस्था या तीन्ही कथन करिते एक पद जे

असो भूलोकासी, नरकपुरि वा स्वर्ग पुरि हे

तिन्हीही लोकांना पद नितचि जे दर्शवितसे।।27.2 -


जयासी  केव्हाही बदल अथवा विकृति नसे

तिन्ही वर्णांनी या , , चि अशा जे बनतसे

घडे सूक्ष्माहूनी अति अतिच जे सूक्ष्म ध्वनिने

तिन्ही वर्णांच्याही अति पलिकडे स्थान जयिचे।।27.3


असे ओंकाराचे अढळ पद तुर्याचि चवथे

जिथे दीनाधारा नित वससि ओंकार पद ते

तुझे सर्वव्यापी अपरिमित दावी स्वरुप हे

तुझे मांडी व्यक्तस्वरुप दुसरे स्पष्टपणि ते।।27.4

 

भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहां-

स्तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम्।

अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि

प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते।।28

अन्वयार्थ – हे देव! -  हे ईश्वरा, भवः शर्वः पशुपति अथ उग्रः (तथा) महान् सहित देवः (महादेवः) भीम ईशानौ इति यद् इदं अभिधानाष्टकम् – हे ईश्वरा, भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र महेव, भीम आणि ईशान हे जे तुझ्या आठ नावांचे अष्टक आहे, अमुष्मिन् – या मधील प्रत्येकं श्रुतिः अपि विचरति – यातील प्रत्येक पदात वेदाचा संचार आहे अस्मै प्रियाय धाम्ने – त्या परंधाम स्वरूपम्हणजेच परमात्मस्वरूप असलेल्या भवते – तुला  (अहं) प्रवहित नमस्यः अस्मि – मी प्रवाहाप्रमाणे मंत्रस्वरूप (आठही नावांच्या सामुहिक उच्चाराने)  नमस्कार करत आहे. ।। 28


तुझी शर्वा, रुद्रा, पशुपति, महादेव  धरुनी

अती उग्रा, भीमा असति भव, ईशानच अशी

प्रभो नावे आठी जगति नित कल्याणकर जी

तयांमध्ये सारे निगम नित संचार करिती ।।28.1


अशा हे विश्वेशा परमपदरूपा तुज नमो

तुझ्या पायी राहो अति चपळ माझे मन प्रभो।।28.2

(निगम- वेद)

 

नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो

नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः।

नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमो

नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः।।29

अन्वयार्थ – हे प्रिय दव - हे निर्जन वनात विहार करण्याची आवड असलेल्या शिवा, नेदिष्ठाय दविष्ठाय च ते नमः – अत्यंत निकटवर्ती आणि अत्यंत दूरवर्ती असलेल्या आपल्याला नमस्कार! क्षोदिष्ठाय महिष्ठाय  च ते नमः – अत्यंत सूक्ष्म रूप आसलेल्या आणि अत्यंत महत्तर रूप असलेल्या त्या रुपांस नमस्कार! हे त्रिनयन – हे त्रिनेत्रधारी, हे स्मरहरहे त्रिनेत्रधारी, मदनाला जाळून टाकणार्‍या शंकरा, वर्षिष्ठाय यविष्ठाय च ते नमः - वृद्ध, अतीशय पुरातन आणि अतीव युवा, नवयुवक रूपाला नमस्कार!! सर्वस्मै ते नमः – सर्वरूप आपल्याला नमस्कार !! तद् इदम् इति सर्वाय/ शर्वाय च नमः - हे सर्वही तोच (परमात्मा) आहे हे सर्व जाणून आपल्याला नमस्कार (काही ठिकाणी पाठभेद असून सर्व एवजी शर्व असे आहे. म्हणून सर्व जगताचा नाश करणार्‍या शंकरास नमस्कार!!) ।। 29

(प्रियदव! – हे निर्जन वनात विहार करण्याची आवड असलेल्या शिवानेदिष्ठ – अत्यंत निकटवर्ति  दविष्ठ -  अत्यंत दूर स्मरहर -  मदनान्तक क्षोदिष्ठ – अत्यंत सूक्ष्म महिष्ठ  महत्तर वर्षिष्ठ वृद्ध, अतीशय पुरातन ; यविष्ठ – अतीव युवा, नवयुवक शर्व -  सर्वांचा नाश करणारा )

 

वनी एकांताची हृदि अतुल ज्या आवड असे

सदा राहे माझ्या निकट परि जो दूरचि गमे

महा क्रोधाने जो सहज मदना राखचि करी

मनापासूनी मी नमन करितो त्या शिवपदी।।29.1


असे सूक्ष्माहूनी अतिशयचि जो सूक्ष्म मतिसी

तरी व्यापूनिया जगभर उरे अंगुळभरी

कपाळी अग्नीचा नयन तिसरा ज्या भयकरी

मनापासूनी मी नमन करितो त्या शिवपदी।।29.2


जुना सर्वांहूनी अतिशय वयोवृद्ध असुनी

जया तारुण्याचा बहर सरतो नाचि कधिही

कळेना गात्रांसी परि मतिस जोची कळतसे

दिसे सर्वांमध्ये नित भरुन अस्तित्त्व जयिचे।।29.3


रवी एकावेळी जळि निरनिराळ्या दिसतसे

तसा तूची शंभो मज दिसतसे ह्या जगति रे

तरंगांमध्येही जलधि भरुनी जो उरतसे

पटामध्ये जैसा भरुन उरला कापुस असे।।29.4


तसे ह्या विश्वाच्या जडणघडणीतून दिसते

अहो विश्वेशा हो स्वरुप तुमचे सर्व विणले

तुझ्या ह्या रूपासी मम नमन विश्वात्मक प्रभो

तुम्ही या विश्वाचे सकलचि अधिष्ठान शिव हो ।।29.5

 

(वृत्त  हरिणी, अक्षरे  17, गण - न स म र स ल ग, यति -6,4,7)

बहुलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः

प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः

जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः

प्रमहसि दे निस्रैगुण्ये शिवाय नमो नमः ।।30

अन्वयार्थ – विश्व उत्पत्तौ – विश्वाची निर्मिती करतांना बहलरजसे / बहुलरजसे – रजो गुणाचे अधिक्य असलेल्या  भवाय नमोनमः – ब्रह्मदेवस्वरूप शिवाला नमस्कार असो. तत्संहारे – त्याच्या / सृष्टीच्या संहारासाठी प्रबल तमसे तमोगुणाचे प्राबल्य असलेल्या हराय- (रुद्रस्वरूप)शिवाला नमोनमः नमस्कार असो. जनसुखकृते – प्रजाजनांच्या सुखासाठी सत्त्वोद्रिक्तौ सत्त्वगुणाचे प्राबल्य धारण करणार्‍या  मृडाय (विष्णुस्वरूप) महादेवाला नमोनमः नमस्कार असो. प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये - अत्यंत तेजस्वी व तीनही गुणांच्या पलिकडील पद धारण करणार्‍या शिवाय नमोनमः – शिवशंकराला नमस्कार असो. ।। 30

प्रमा -  प्रत्यक्ष ज्ञान, यथार्थ ज्ञान

(ज्या अक्षरावर यति आहे म्हणजे थांबावे लागते ते अक्षर अधोरेखित आहे)

अमुप धरुनी अंगी तोची रजोगुण तो महा

अखिल जग हे साकाराया प्रजापति जाहला

रजगुणयुता हेची आहे स्वरूप तुझे शिवा

नमन करितो त्याची रूपा भवा तुज मी पुन्हा।।30.1


सकल जग हे संहाराया तमोगुण तो हवा

हर हर धरी अंगी त्यासी विनाश चि साधण्या

तमगुणयुता हेची आहे स्वरूप तुझे शिवा

नमन करितो  त्याची रूपा हरा तुज मी पुन्हा।।30.2


जगत सगळे सांभाळाया जगा सुख द्यावया

सुखद गुण हा अंगीकारी हरी हृदयी सदा

शिव तव असे सत्वाचे हे स्वरूपचि निर्मला

नमन करितो त्याची रूपा मृडा तुज मी पुन्हा।।30.3


असुनि इतुके तूची राही धरूनचि निर्गुणा

करिसि परि तू कल्याणासी शिवा जगताचिया

मजसि मिळण्या मोक्षाचा तो प्रकाशचि ज्ञानदा

नमन करितो त्या कल्याणी शिवा तव पावला।।30.4

 


(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

कृशपरिणति चेतः क्लेशवश्यं क्व चेदं

क्व च तव गुणसीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः।

इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद्

वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम्।।31

अन्वयार्थ – हे वरद!हे वरदायी शंकरा, कृश परिणति क्लेशवश्यं च इदं चेतः क्व? – माझे अतिशय तोकडे (अल्पमति )  व रागद्वेशादि क्लेशांना बळी पडलेले मन कुणीकडे  ? तव च गुणसीमा उल्लंघिनी शश्वद् ऋद्धिः क्व! आणि तुझे सर्व सीमा ओलांडून जाणारे शाश्वत असे ऐश्वर्य कोठे? इति चकितं माम् – या विचारामुळे भयभीत झालेल्या मला अमन्दिकृत्य -बळजबरीने (स्तुती करण्यास) प्रवृत्त करून भक्तिः – तुझ्या भक्तीने ते चरणयोः – तुझ्या चरणावर  वाक्य-पुष्पोपहारं वाक्यरूपी पुष्पहाराची पूजा आधात् – अर्पण करायला लावली. ।। 31

(ज्या अक्षरावर यति आहे म्हणजे थांबावे लागते ते अक्षर अधोरेखित आहे)

कमकुवत कुठे हे चित्त माझेच कोते

बुडुन मद अहंकारात घेईच गोते

विषय बघुन नाना काम त्याचा बळावे

भुलुनचि अडके ते मोहरूपी गळाते।।31.1


परि तवचि गुणांना पार नाही शिवा हे

अपरिमित गुणांचा सागरू तूचि कोठे

दिसत नच किनारा माझिया क्षीण नेत्रा

भयचकित मनाने पाहि ऐश्वर्य शर्वा।।31.2


शिव शिव शिव माझे चित्त व्याकूळ हेची

चरण-कमल पूजा कंठनीला तुझी ही

करवुन नित घे वाक्यरूपी फुलांनी

मजकडुन शिवा हे  भक्तिने स्फूर्तिनेही ।।31.3

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे

सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी।

लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं

तदपि तव गुणानामीश पारं न याति।।32

अन्वयार्थ – हे ईश!हे ईश्वरा, असितगिरिसमं कज्जलं – काळ्या पर्वता एवढे काजळ जर सिन्धुपात्रे स्यात् - समुद्राएवढ्या भांड्यात कालवून शाई बनवली. सुरतरुवर-शाखा लेखनी स्यात्- कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी तयार केली, पत्रम् उर्वी स्यात् – आणि पृथ्वीएवढ्या कागदावर गृहीत्वा – (हे सारे साहित्य) घेऊन यदि शारदा सार्वकालं लिखति – (साक्षात) देवी सरस्वती सतत (जरी) लिहित राहिली – तदपि तव गुणानां पारं न याति । - तरी देखील तुझ्या गुणांच्या पलिकडच्या किनार्‍याला तिला पोचता येणार नाही. (तिलाही तुझ्या समग्र गुणांचे वर्णन करता येणार नाही.)

मिसळुनि जळि मेरू-पर्वताकार काळी

बनवुन कुणि शाई सागराच्याच पात्री

अखिलचि वसुधा ही भूर्जपत्रेच केली

कलम म्हणुनि हाती घेतली कल्पवल्ली।।32.1


सतत लिहित राहे शारदांबा जरी ही

शिव महति कधीही पूर्ण होणार नाही।।32.2

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

असुरसुरमुनीन्द्रैरर्चितस्येन्दुमौले-

र्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।

सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो

रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार।।33

अन्वयार्थ – सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः – सर्व (शिव भक्तात) श्रेष्ठ असलेल्या पुष्पदन्त नामक गंधर्वाने  असुर सुर मुनिन्द्रैः – राक्षस, इंद्रादि देव व ऋषीमुनिंनी अर्चितस्य आराधना केलेल्या, निर्गुणस्य इन्दुमौलेः ईश्वरस्य- निर्गुण निराकार ईश्वराचा/शिवाचा, ग्रथित गुण महिम्नः –  सांगितलेला / ग्रंथबद्ध केलेला गुणांचा महिमा एतत् रुचिरं स्तोत्रं अलघुवृत्तैः चकार। - ह्या अत्यंत रसाळ स्तोत्रात (शिखरिणी ह्या 17 अक्षरांच्या) मोठ्या वृत्तात श्लोकबद्ध केला.

( गण- अनुयायीग्रथ  लिहून ठेवणे,संकलित करणे। )

 

धवल शशिकला ज्या भूषवी मस्तकासी

सकल गुण जयाच्या आश्रये राहताती

गुणमय असुनी जो निर्गुणाचीच मूर्ती

असुर, सुर, मुनी हे नित्य ज्या वंदिताती ।।33.1


अमल विमल ऐशा विश्वरूपी शिवाची

सकल शिव स्तुती जी सांगती वेद चारी

अखिल शिव स्वरूपा ग्रंथबद्धा करोनी

सकल स्वरुप तेची धूर्जटीचे स्मरोनी 33.2

 

सकल शिवगणांच्या अग्रणी किन्नरानी

कुसुमदशननामे छंदबद्धा करोनी

मधु मधुर स्तुती ती मुक्तकंठे शिवाची

रुचिर शिखरिणी ह्या दीर्घ वृत्तात केली ।।33.3


 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्

पठति परम भक्त्या शुद्धचित्तः पुमान्यः।

 भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र

प्रचुरतरधनायुः पुत्रवान्कीर्तिमांश्च।।34

अन्वय – यः शुद्धचित्तः पुमान् अहरहरः धूर्जटेः एतत् अनवद्यं स्तोत्रं परमभक्त्या पठति सः शिवलोके रुद्रतुल्यः भवति,  तथा अत्र प्रचुरतरधनायुः पुत्रवान् कीर्तिमान् च (भवति)  ,

 जो माणूस अत्यंत शुद्ध मनाने अत्यंत भक्तिभावाने हे पवित्र शिवस्तोत्र / धूर्जटी स्तोत्र रोज वाचेल तो शिवलोकात शिवतुल्य होईल आणि इथे ह्या इहलोकात त्याला सर्व प्रकारची साधनसंपत्ती, आयु, सन्तान आणि किर्ती प्राप्त होईल. 

अति पुनित स्तुती ही जो म्हणे शंकराची

विमल मन करोनी भक्तिभावे सदाही

शिवसम शिवलोकी मान त्या सर्व देती

विपुल विभव लाभे दीर्घ आयुष्य त्यासी ।।34.1


यश अनुपम लाभे भूतळी श्रेष्ठ त्यासी

सुखविति इहलोकी पुत्र पुत्री तयासी ।। 34.2

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः।

अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्।।35

अन्वय – महेशात्  न अपरः देवः, महिम्नः न अपरा स्तुतिः, अघोरात् न अपरः मन्त्रः, गुरोः परं तत्त्व न अस्ति ।

महेशाहून दुसरा (श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून दुसरी (श्रेष्ठ) स्तुती/ स्तोत्र नाही. (ॐ नमः शिवाय । )  ह्या अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरूहून ( शिवाहून) श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.

(अघोरमंत्र – ॐ नमः शिवाय । )

 

महेशा सारखा कोणी  । देव नाही दुजा कुणी

महिम्नावाचुनी नाही । स्तोत्र उत्कृष्ट एकही

मंत्र नाही दुजा काही । अघोराहून श्रेष्ठची

नाही नाही गुरूहूनी । श्रेष्ठ तत्वचि या जगी।।35




दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।

महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम्।।36

अन्वयार्थ – दीक्षा, दानं, तपः, तीर्थं, ज्ञानं, यागादिकाः क्रियाः (एते सर्वे) महिम्नस्तवपाठस्य षोडशीं कलां न अर्हन्ति

घेतलेला उपदेश, दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, ग्रंथांमधून मिळालेले ज्ञान, यज्ञ होमादि कर्मे ह्या सार्‍या गोष्टी महिम्न स्तोत्राच्या पाठाच्या सोळाव्या अंशाइतक्याही योग्यतेच्या नाहीत.

( कला म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा ह्या 15 कला आणि सोळावी आमावास्या. सोळाव्या कलेएवढी ही योग्यता नसणे म्हणजे, आमावस्येबरोबर सुद्धा तुलना होऊ शकणार नाही म्हणजे, थोडीही योग्यता नसणे.  )


जैशा दावी कला सोळा आकाशी तो कलानिधी

नाही त्याच्या कलेची ही शोभा तार्‍यास एकही

तैसी दीक्षाच मंत्रांची वा ती दाने यथाविधी

तीर्थक्षेत्रे, तपश्चर्या, ज्ञानप्राप्तीच पूर्ण ती - -


केले वा यज्ञ मोठे ते, धर्मकार्येच सर्वही

नाही त्यांसी महिम्नाच्या अंशाची थोरवी परी।।36

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः

शिशुशशिधरमौलेर्देवदेवस्य दासः।

 खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्

स्तवनमिदमकार्षीद्दिव्यदिव्यं महिम्नः।।37

अन्वयार्थ – कुसुमदशन नामा सर्व गन्धर्वराजः – कुसुमदशन म्हणजेच पुष्पदंत नावाचा सर्व गंधर्वांचा राजा शिशु-शशीधर-मौलेः – लहानशी चंद्रकोर डोक्यावर धारण करणार्‍या देवदेवस्य दासः (आसीत्) – देवांचा देव म्हणजे महादेवाचा दास होता. सः किल अस्य रोषात् – तो खरोखर त्याच्या (शंकराच्या) रोषाने, रागाने निज महिम्नः भ्रष्टः – स्वतःच्या कीर्तीपासून भ्रष्ट/ च्युत झाला. सः इदं महिम्नः दिव्य दिव्यं स्तवनं आकर्षीत् – तेव्हा त्याने ह्या दिव्य स्तोत्राची (धूर्जटीस्तोत्र किंवा शिवमहिम्नची) रचना केली.

बहुत समय पूर्वी एक गंधर्वराजा

कुसुमदशननामे जो प्रसिद्धीस आला

असुनि शिवपदांचा दास तो पुष्पदंत

बहुत तयि शिवाचा ओढवीलाचि रोष।।37.1


धुळित मिळुन गेले सर्व ऐश्वर्य त्याचे

म्हणुन शिवमहिम्नातो रचे भक्तिभावे

फिरुन शिव तयाला जाहला हो प्रसन्न

सकल विभव त्याचे लाभले त्या फिरून।।37.2


(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं

पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः।

व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः

स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम्।।38

अन्वयार्थ  – यदि मनुष्यः प्रांजलिः अनन्यचेताः (भूत्वा) – जर अनन्य भावाने विनम्र होऊन/ कपाळाला अंजली लावून  सुरवर-मुनि-पूज्यं – देव आणि मुनी ह्यांनी पूजन केलेल्या, स्वर्ग मोक्षैकहेतुं– स्वर्ग आणि मोक्षाचं एकमेव साधन. (इदं स्तोत्रं) पठति, अशा ह्या स्तोत्रचे पठण करतात, (तर्हि) किन्नरैः स्तूयमानः (सः ) – किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवसमीपं व्रजति – शिवाच्या जवळ पोचतो. शिवलोकास प्राप्त होतो. पुष्पदन्तप्रणीतम् इदं स्तवनं अमोघम् (अस्ति) । - पुष्पदन्ताद्वारे केलेले हे स्तोत्र कधीही निष्फळ ठरत नाही. ।।38

स्तुति अनुपम केली पुष्पदंतेच जी ही

सकल मुनिजनांना देवतांना रुचे ती

मिळवुन सहजी दे ती नरा  मोक्षमुक्ती

सहज उघडिते ही स्वर्ग द्वारा त्वरेनी।।38.1


स्तुति मधुर म्हणे जो जोडुनी हात कोणी

धरुन हृदि शिवासी नित्य एकाग्र चित्ती

अनुभवत स्तुति-पुष्पे थोर या किन्नरांची

शिव समिप सदाही जातसे पुण्यदेही ।।38.2

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम्।

अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम्।।39

अन्वयार्थ – इदम् पुण्यं,अनौपम्यं मनोहारि शिवम् , -  हे पवित्र, अनुपम, मनाला आनंदित करणारे, कल्याणकारक गन्धर्वभाषितं ईश्वरवर्णनम् स्तोत्रम् आसमाप्तम् – गंधर्वांने गायलेले शिवाचे स्तोत्र समाप्त झाले. ।। 39

आरंभापासून त्याच्या । अंतापर्यंत सर्व हे

गंधर्व पुष्पदंताचे । स्तोत्र पावन हे असे

अद्वितीय मनोहारी । हृद्य सुंदर स्तोत्र हे

विश्ववंद्य शिवाचे त्या । ज्यात वर्णन गुंफिले।।39

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः।

अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः।।40

अन्वयार्थ – इति एषा वाङ्मयी पूजा – अशी ही वाङ्मयरूपी पूजा श्रीमत् शंकर-पादयोः अर्पिता – भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. तेन देवेशः सदाशिवः मे प्रियताम् – त्या योगे देवाधिदेव शंकर माझ्यावर संतुष्ट होवोत. ।।40

सर्वश्रेष्ठ शिवा पायी । शब्दपुष्पांजली अशी

अर्पिली पुष्पदंताने। पूजा ही वाङ्मयी जशी

तीच आळविता मीही । देवा संतुष्ट व्हा तुम्ही

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर।

यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः।।41

अन्वयार्थ – हे महादेव! तव तत्त्वं न जानामि । -  हे महादेवा मला तुझे खरे स्वरूप ज्ञात नाही. (त्वं) कीदृशः असि -  तू कसा आहेस?  हे महादेव! यादृशः असि – देवा तू जसा आहेस  तादृशः नमो नमः । तशा तुझ्या स्वरूपाला माझा वारंवार नमस्कार असो. ।। 41

जाणितो ना महेशा मी । विश्वरूपास या तुझ्या

जसा आहेस त्या तैशा । रूपासी वंदितो शिवा।।41

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।

सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते।।42

अन्वयार्थ – यः नरः एककालं, द्विकालं, त्रिकालं वा (इदं स्तोत्रं) पठेत् – जो पुरूष (दिवसातून) एकवेळा, दोन वेळा वा तीन वेळा या स्तोत्राचे पठण करील (सः) सर्व पाप विनिर्मुक्तः – तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोके महीयते – शिवलोकी ख्यातनाम होईल. ।। 42

एकदा दोनदा किंवा । तीनदा दिवसातुनी

स्तुति ही म्हणता कोणी । पाप जाई लया झणी

शिवलोकी सदा राही ।  पुण्यात्मा तो सदासुखी।।42

 

(वृत्त  वसंततिलका, अक्षरे-14, गण  त भ ज ज ग ग, यति  पाद)

 

श्रीपुष्पदन्तमुखपङ्कजनिर्गतेन 

स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण।

कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन

सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः।।43

अन्वयार्थ – श्री पुष्पदन्त – मुखपंकज निर्गतेन – श्री पुषपदंताच्या मुखकमलातून निघालेल्या किल्मिश हरेण हरप्रियेण स्तोत्रेण कण्ठस्थेन -  पापांचा नाश करणार्‍या व शिवाला प्रिय असणार्‍या स्तोत्राला जो मुखोद्गत करील समाहितेन पठितेन- व एकाग्र चित्ताने पठण करील भूतपतिः महेशः सुप्रीणितः भवति – त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल ।।43  

(समाहित  लीन, एकनिष्ठ)

 

श्री पुष्पदंत करिता स्तुति शंकराची

त्याच्या प्रफुल्ल कमलासम या मुखानी

जे स्तोत्र दिव्य प्रकटे बहु पुण्यदायी

देईच ते परिमलासम मोद लोकी।।43.1


कंठस्थ त्यास करुनी म्हणताच कोणी

एकाग्र चित्त करुनी बहु नम्रतेनी

ते पाप दूर करिते , रुचते शिवासी

त्याच्यावरी पशुपती करितो कृपेसी।।43.2

------------------------------------------------------------

।। ॐ नमः शिवाय ।।

ॐ तत् सत्


(विजय नाम संवत्सर, मार्गशीर्ष अमावस्या 1 जानेवारी 2014 )




खाली दिलेल्या लिंक्सवर ते ते श्लोक विश्लेषणासहित उपलब्ध आहेत.


श्लोक 1-10


 श्लोक 11 ते 20 


श्लोक 21 ते 30 


श्लोक 31 ते 43 


संपूर्ण महिम्न  ( विश्लेषणाशिवाय)












No comments:

Post a Comment