।। वेदसारशिवस्तव ।।

Image result for free download images of lord shiva

वेदांनी केलेल्या शंकराच्या वर्णनाचे सारस्वरूप असे हे स्तोत्र आहे. शंकराचे केलेले सुंदर वर्णन आणि सतत तोंडात घोळत राहील अशा भाषेमुळे हे स्तोत्र मनाला स्पर्शून जाते.

(वृत्तभुजंगप्रयात, अक्षरे -12, गण , यति- 6,6.)

पशूनां पतिं पापनाशं परेशं
गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम्।
जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं
महादेवमेकं स्मरामि स्मरारिम् ।।1

(पति - मालक, स्वामी,प्रभु, शासक;  पशूनां पतिः  पशुपति  सर्व जीवसृष्टिचा पालक ; कृत्तिम् चर्म)

सुखे जोचि सांभाळितो जीवसृष्टी। असे भूतमात्रांस त्राताच जोची
करी दूर दुर्भाग्य वा दुष्टबुद्धी महादेव तो श्रेष्ठ कैवल्यमूर्ति।।1.1

जयाला स्मरावे सदा भक्तिभावे जयाच्या स्वरूपा मनी आठवावे।
कटी नेसला चर्म तेही गजाचे जटातून गंगा खळाळे खळाळे।।1.2

करी कामदेवास जो भस्म क्रोधे त्रिनेत्रीच जो आपुल्या दृष्टिपाते
अशा एक विश्वात्मकासीच प्रेमे मनी चिंतितो  विश्वरूपा शिवाते।।1.3



महेशं सुरेशं सुरारातिनाशं
विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्।
विरूपाक्षमिद्वर्कवह्नित्रिनेत्रं
सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवत्रम्।।2

असे सर्वव्यापी असे ईशस्वामी करी नाश वा दंडितो देवद्रोही
असे शक्तिशाली परी संयमीही जगाचा असे एक तो एक स्वामी।।2.1

मुखे पाच ज्याची ; चिताभस्म गात्री शशी सूर्य अग्नी असा जो त्रिनेत्री
समाधान तृप्ती हृदी नित्य राही अशा श्रेष्ठ देवास मी पूजितोची ।।2.2



गिरीशं गणेशं गले नीलवर्णं
गवेंद्राधिरूढं गणातीतरूपम्।
भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं
भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।। 3

(गणातीत किंवा गुणातीत - ह्या दोन्ही पाठभेदांचे अर्थ समाविष्ट आहेत.)

गिरिश्रेष्ठ-कैलास प्रासाद ज्यासी। गणाध्यक्ष सार्या गणांचाचि स्वामी
विष प्राशुनी कंठ तो नीलवर्णी। असे वाहना नंदिची खास स्वारी।।3.1

जरा जन्म मृत्यू अनंतास नाही। रजो तामसी सत्त्व या पार जोची
गणांचाच स्वामी गणांपार ख्याती। स्वयंभू गणातीत जो तेजरूपी।॥3.2

असे दिव्यज्ञानप्रकाशस्वरूपी। पुरे विश्व त्यातून आकार घेई
उमानाथ लावी चिताभस्म अंगी अशा थोर पंचानना पूजितो मी।।3.3



शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले
महेशान शूलिन् जटाजूटधारिन्
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।।4

अहो पार्वतीनाथ कल्याणमूर्ती। जटाजूटधारी अहो चन्द्रमौळी
दिशा दाहि आधीन ज्यांच्या असेची असे सर्व दिग्पाल सेवी तुम्हासी।।4.1

महादेव विश्वात्मका विश्वरूपा असे पूर्ण हे विश्व तूची अनीशा
त्रिशूलाधरे शंकरा पूर्णरूपा। प्रसन्न प्रभो व्हा; प्रसन्न प्रभो व्हा  ।।4.2

परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं
निरीहं निराकारमोङ्कारवेद्यम्।
यतो जायते पाल्यते येन विश्वं
तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।।5

असे मूळ तू बीज तू कारणादि तुझ्यातून हे विश्व आकार घेई
परेशा असे मुख्य तू या जगाचा असे तूचि स्वामी असे तूचि कर्ता।।5.1

निराकार कूटस्थ तू निश्चला बा। नसे मोह इच्छा क्रिया वा तुला बा
तुझे ज्ञान ओङ्कार-मंत्रेचि होते। असे तूचि ओङ्कार हे विश्वनाथा।।5.2

तुझ्यातून साकारते विश्व सारे। तयाच्या करी पालना तू प्रभू रे
विरे विश्व ज्या ईश रूपात सारे। नमस्कार ईशास त्या नम्रभावे।।5.3



 भूमिर्न चापो वह्निर्न वायु-
र्न चाकाशमास्ते तन्द्रा निद्रा
 ग्रीष्मो शीतं देशो वेषो
 यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे।।6

नसे भूमि वा आप वा तेज तूची। नसे वायु आकाश तू व्योमकेशी
नसे तूचि तंद्रा नसे तूचि निद्रा। नसे कोणताही ऋतू तूचि देवा।। 6.1

नसे कोणता देश वा वेश ल्याला। आकार विश्वात्मकासी तुला ह्या
नसे मूर्ति ज्याची त्रिमूर्ति अशा ह्या तुला वंदितो वंदितो मीच देवा।।6.2

अजं शाश्वतं कारणं कारणानां
शिवं केवलं भासकं भासकानाम्।
तुरीयं तमःपारमाद्यन्तहीनं
प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम्।।7

नसे जन्म मृत्यू शिवा शाश्वता या। अजन्मा चिरस्थायि तू नित्यरूपा
असे तूचि प्रारंभ सार्या कृतिंचा। असे कारणांचाचि उद्देश्य सार्या।।7.1

असे तेज तू दीप्तिचे मूर्तिमंत। प्रकाशास देसीच तूची प्रकाश
असे एक जे तत्त्व जे तत्त्व थोर। असे ब्रह्म ते ब्रह्म तू निर्विकल्प।।7.2

नसे स्थूल तू सूक्ष्म वा कारणादि। नसे जागृती स्वप्न वा तू सुषुप्ति
तुला आदि ना अंत ना रे अनंता। असे तूचि कल्याणरूपी शिवा बा।।7.3

लया जाय अज्ञान तू तेथ राही जिथे नांदते ज्ञान ज्योतिस्वरूपी
नसे द्वैत ज्या पावना पुण्यश्लोका नमस्कार अद्वैतरूपा तुझ्या त्या 7.4



नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते
नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य
नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य।।8

असे विश्व सारे तुझे रूप साचे प्रभो विश्वरूपा नमस्ते नमस्ते
असे ज्ञान चैतन्य संतोष तू रे। चिदानंदरूपा नमस्ते नमस्ते।।8.1

कळे देव जो ध्यान वा चिंतनाने। तपोगम्य ईशा नमस्ते नमस्ते
श्रुतिंना कळे रूप ज्याचे खरे ते श्रुतिज्ञानगम्या नमस्ते  नमस्ते।।8.2



प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ
महादेव शम्भो महेश त्रिनेत्र।
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे
त्वदन्यो वरेण्यो मान्यो गण्यः।।9

त्रिशूलाधरे हे प्रभो विश्वनाथा। महादेव शंभो महेशा त्रिनेत्रा
तुझा राग जाळी अनंगा समूळा विनाशी `पुरे' तीनही विश्वनाथा।।9.1

उठे ना तुझ्या चित्ति संकल्प देवा   उमावल्लभा पार्वतीशा अनीशा
सदा सौम्य मौनी सदा शांत धीरा। प्रशान्ता प्रसन्ना  कृपाशील देवा।।9.2

तुझ्यावीण कोणी रुचेना पटेना। कुणी देवता देव माझ्या मनाला 
असे मी तुझा रे असे तूच माझा नसे अन्य ते देव लेखीच माझ्या।।9.3

(वृत्त - वसंततिलका, अक्षरे- 14, गण- )

 शम्भो महेश करुणामय शूलपाणे
गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्
काशीपते करुणया जगदेतदेक-
स्त्वं हंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।।10

शंभो महेश करुणालय शूलपाणे
वाराणसीपुरपते  गिरिजेश्वरा हे
आहे अपार करुणा हृदयी तुझ्या रे
साकारले जगत हे तुझिया कृपेने।।10.1

ऐसी अलौकिक कृती करु तूच जाणे
कारुण्यसिंधु शिव एकचि तू प्रभू रे
संसार दुःख, भवसागर ताप नाशी
उत्पत्ति स्थैर्य लय हे सहजीच खेळी।।10.2



त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे
त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश
लिङ्गात्मकं हर चराचरविश्वरूपिन्।।11

(लिङ्गम्  लयं गच्छति इति लिङ्गम्।  हे जग तुमच्यात विलीन होते म्हणून जगाला लिंग म्हणतात. किंवा लीनं अर्थं गमयति इति लिङ्गम्। लीन म्हणजे परम सूक्ष्म असे जे तुम्ही त्या तुमची कल्पना जगावरूनच घेता येते.)

विश्वासि जन्म दिधला भव विश्वनाथा
 त्याचेचि पालन करी मृड तू समर्था
ब्रह्माण्ड घेसि उदरी लयकाल येता
होतेचि लीन जग हे स्वरुपी तुझ्या या।।11.1

सामावला असशि तू जगि सूक्ष्मरूपा
विश्वात्मका तुज प्रणामचि लिंगरूपा।।11.2

--------------


  22 ऑगस्ट 2012


 Image result for free download images of lord shiva

No comments:

Post a Comment