काशीपञ्चकम्

                तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून माणसाला हवा असलेला चित्तप्रसाद म्हणजेच मनःशाती मिळते का?  त्याच्या मनाला हवं असलेलं समाधान मिळविण्यासाठी त्याने कितीही तीर्थक्षेत्रे पालथी घातली तरी त्याला ते मिळेलच असे नाही. मनात वैराग्य निर्माण झाले की ज्ञान अपसूकच त्याच्यामागे येतेच. ज्ञान झाले की वेगळी तीर्थक्षेत्रेही शोधायला लागत नाहीत. सारा देहच पवित्र काशीक्षेत्र होतो. 

 

              श्री एकनाथ महाराज म्हणतात - 

 

हृदयस्थ असोनी का रे फिरसी वायां । दीप आणि छाया जया परी

आत्म-तीर्थीं सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजे नाहीं

 

एका जनार्दनी मनासी आवरी । मग तू संसारी धन्य होसी 

काशी हा शब्द काश् ह्या संस्कृत क्रियापदापासून झाला आहे. काश् म्हणजे चमकणे, प्रकाशित होणे. पूर्वी असंख्य विद्वान काशीत रहात असत. त्यंच्या विद्वत्तेच्या तेजाने काशी जणु प्रकाशमान झाली आहे असे वाटे.

              

 

   (वृत्त – उपजाती / इंद्रमाला)

( अक्षरे -11, गण - ज  त  ज ग ग / त त ज ग ग )

 मनोनिवृत्तिः परमोपशान्ति: । सा तीर्थवर्या मणिकर्णिका च ।

ज्ञानप्रवाहा विमलादिगङ्गा । सा काशिकाहं निजबोधरूपा।।1

 

संकल्प सारे हृदिचे निमाले । वैराग्य चित्ती उदयास आले

चित्तास व्यापूनि उरेच शांती । तीर्थात शुद्धा मणिकर्णिका ही।।1.1

 

वाहे  मनी पावन ज्ञान धारा । मंदाकिनी ही विमला पवित्रा

ब्रह्मस्वरूपी उरलोच मी हा । काशीच झालो निज बोध होता।।1.2

 

यस्यामिदं कल्पितमिन्द्रजालं । चराचरं  भाति मनोविलासम्

 सच्चित्सुखैका परमात्मरूपा । सा काशिकाहं निजबोधरूपा ।।2

 

हे विश्व सारे मज चित्र वाटे  । जे जादुगारे सहजीच केले

वा कल्पना मानसिचीच रम्या । स्वप्नातली वा  दुनियाचि मिथ्या।।2.1

 

काष्ठास अग्नी करिताचि स्पर्श । होतेचि अग्नी त्यजुनी स्वभाव

वा बिंदु होतोचि विशाल सिंधू । जेंव्हा पडे सिंधु मधेचि बिंदु।।2.2

 

तैसाचि सच्चित् सुख स्पर्श होता ।  ज्ञाता च मी, ज्ञान झालो समस्ता

ब्रह्मस्वरूपी उरलोच मी हा । काशीच झालो निज बोध होता।।2.3  

 

कोशेषु पञ्चस्वधिराजमाना । बुद्धिर्भवानी प्रतिदेहगेहम् ।

साक्षी शिव सर्वगतोऽन्तरात्मा ।  सा काशिकाहं निजबोधरूपा ।।3

ही स्थूल काया पहिलाच कोष । संबोधती अन्नमयी चि त्यास

आहे दुजा प्राणमयी च कोष । तृतीय तो कोष मनोमयीच।।3.1

 

विज्ञान आनंदमयी चि दोन । होतीच सारे मिळुनीच पाच

जन्मासी जो येत असे चि जीव । या पंच कोशे असतोचि युक्त।।3.2

 

बुद्धी विराजे नित पंचकोषी । साक्षात ती अन्नपूर्णा भवानी

सर्वेंद्रियांचा व्यवहार-साक्षी । आत्माच देही शिव शंभु रूपी।।3.3

 

हा बोध चित्ती घडताच माझ्या । मी चित्स्वरूपी उरलोच आता

ब्रह्मस्वरूपी उरलोच मी हा । काशीच झालो परमा पवित्रा ।।3.4

 

काश्यां हि काशते काशी । काशी सर्वप्रकाशिका ।

सा काशी विदिता येन  । तेन प्राप्ता हि काशिका।।4

 

क्षेत्रात क्षेत्र हे काशी । तीर्थक्षेत्रात श्रेष्ठची

तेजस्वी तेजसांमधे । ज्ञानदायीच काशि ही।।4.1

 

तैसाचि शुद्ध आत्मा हा । काशीहून न अन्यची

देतोचि सत्य ज्ञानाला । विश्व सारे प्रकाशवी।।4.2

 

बोधस्वरूप  काशी ही । घेई जाणून जो कुणी

त्यासीच लाभते काशी । पोचे तो काशिकापदी।।4.3

 

(वृत्त - स्रग्धरा, अक्षरे - 21  गण - म र भ न य य य ,यति - 7 7 7)

 

काशीक्षेत्रं शरीरं त्रिभुवनजननी व्यापिनी ज्ञानगङ्गा

भक्तिः श्रद्धा गयेयं निजगुरुचरणध्यानयोगः प्रयागः ।

विश्वेशोऽयं तुरीयः सकलजनमनःसाक्षिभूतोऽन्तरात्मा

देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्ततीर्थमन्यत्किमस्ति।। 5 

 

  झाली कायाच काशी, अति पुनित अशी, तेवता ब्रह्मज्ञान

चित्तामध्ये गुरूची अविरत स्मरतो पाउले हा प्रयाग

विश्वाला व्यापिते जी त्रिभुवन जननी ज्ञानगंगा सदैव

वाहे बोधामृताची सतत हृदि अती जाह्नवी ही पवित्र ।।5.1

 

चित्ती भक्ती अनन्या; मनि अढळ वसे  नित्य निष्ठा गया ही

विश्वाच्या या क्रियांना अगणित असुनी सूर्य जैसाच साक्षी

तैसा जो अंतरात्मा सकल जन मनी साक्षिभावेच राही

तोची विश्वेश माझ्या हृदि  वसत असे तूर्यवस्था धरोनी।।5.2

 

तीर्थांचे तीर्थ झालो; अति पुनित असा देह हा ज्ञानरूपी

देहामध्येच माझ्या वसति सकल हे देव तीर्थादिकेही

शोधू आता कशाला विमल नव नवी व्यर्थ तीर्थे दुजी मी

आता ना अन्य तीर्थे मजविण मजला जाहलो मीच काशी।।5.3

 

काशीपञ्चक स्तोत्र रम्य असुदे माझ्या मराठीतही

ऐसी आस अरुंधतीच धरता श्री शंकरे मानिली

आला धावुन कार्य सिद्ध करण्या माझ्यासवे श्रीहरी

गोस्वामी मज दावतीच अवघे सौंदर्य शब्दातुनी।।6

------------------------

खरनाम संवत्सर चैत्र कृ. अष्टमी, 25 एप्रिल 2011 सोमवार

 

 

 

 

3 comments:

  1. अतिशय सुंदर...! केवळ काव्यनुवादच नाही, तर विषय व्यवस्थित समजावूनही सांगितला अनुवादातून...! मनापासून धन्यवाद अरुंधती..! स्तोत्रातील इतका अवघड विषय सहज सोपा करून दिलास...!

    ReplyDelete
  2. सहज सुंदर भावानुवाद.

    ReplyDelete