गणपती एक संकल्पना

।।    श्री गणेशाय नम ।।
गणपती एक संकल्पना

Image result for lord ganesh images


                       हाती घेतलेले सत्कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून कुठल्याही चांगल्या कामाची सुरवात आपण श्री गणेशाचे स्तवन, पूजन, अर्चन करून मगच करतोशिव आणि पार्वती ह्यांचा हा लाडका बाळ.

                        अनादि आणि अनंत काळ ह्या सार्या विश्वात अनेक उलथापालथी सुरू आहेत. अनेक तारे उदयाला येतात. अनेक नाश पावतात. कुठे पृथ्वीसारख्या ग्रहाची निर्मिती होऊन त्यावर सजीव सृष्टी जन्माला येते. आपलं सारं सारं आयुष्य वेचून कोणी पृथ्वीच्या निर्मितीचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात. उत्तराच्या जवळ पोचल्याच्या आनंदात असतांनाच एक नवीन कलाटणी मिळते. आणि अचानक कुठले तरी नवीन प्रश्न वाकुल्या दाखवत समोर येतात आणि नवीन मार्ग, नवीन आव्हानं समोर उभी ठाकतात. प्रत्येकजण आपापल्या परीनी अर्थ लावत असतो. आपलं जीवन पुढे पुढे जात असतांनाही आपल्या उगमाकडे जायची मनाची ओढही थांबत नाही. जो पर्यंत विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडत नाही तो पर्यंत मन ही स्वस्थ बसत नाही.

            अध्यात्मातही ह्या प्रश्नाची उकल करायचा प्रयत्न केला गेला आहे.     अध्यात्माच्या सिध्दांताप्रमाणे ह्या सर्व विश्वात शाश्वत असलेली म्हणजे कायम स्वरूपी टिकून असलेली एकमेव गोष्ट म्हणजेबदल’! सतत काही तरी नवनिर्मिती होत असतेच आणि सतत कुठली ना कुठली गोष्ट नष्ट होत असते. विनाश आणि उत्पत्ती ह्या दोन क्रिया वेगवेगळ्या नसून एकाच क्रियेचे दोन अभिन्न भाग आहेत. एक तारा लय होत असतांना दुसरा तारा आकाराला येत असतो. नदी वाहतांना एकीकडे पर्वतावरील मोठमोठ्या खडकांना फोडून त्यांची धूप  करत असतांनाच दुसरीकडे तिच्यामुळे वाहून आलेल्या मातीची भर दुसरीकडे घालून एक सुपीक खोरेही बनवीत असते. संहार आणि नवनिर्मिती ह्या अनादि कालापासून चालत आलेल्या दोन अभिन्न शाक्तिंचं प्रतिक म्हणजे शिव पार्वती. सार्या विश्वाची , सार्या सृष्टीची निर्मिती करणारी देवता म्हणजे पार्वती तर  सृष्टीच्या संहाराचं प्रतिक म्हणजे शंकर. अर्धनारीश्वर!

                         विश्वात्मक उदाहरण सर्वांनाच पेलवेल असं नाही म्हणुन अजुन सोपं करुन सांगितलेलं उदाहरण - - पार्वती ही पर्वतराज हिमालयाची कन्या- - एका नदीचं प्रतिकतर शिव म्हणजे निसर्ग! सर्व वैश्विक नियमकेवढी  सुंदर प्रतिकं! एखादं सुंदर नर्तन बघत रहावं अशी ह्या दोघांची अथक चालू असलेली कृती आपल्याला आपलं भान विसरून जायला लावते. किंवा स्वतचं मीपण विसरल्याशिवाय ह्या निसर्गाकडे अनिमेषपणे बघताच येत नाही. नवनिर्मितीची देवता एखादं सुंदर फूल निर्माण करत असो अथवा हे संपूर्ण सुंदर विश्वत्या सगळ्याला लाभलेली लय पाहून देवी पावर्ती मनमोहक नृत्य करत असल्याची अनुभूती  येऊन हृदयाच्या ताराही झंकारायला लागतात. त्या तालावर मन डोलायला लागतं. हेच पार्वतीच लास्य नृत्य! तशीच विनाशाला सुद्धा श्वास रोधून धरायला लावणारी एक लय आहे. जेवढी नवनिर्मिती ही सुखावह असते तेवढाच विनाशही कल्याणकारीच असतो. तो उचित असूनही भयद आणि दुःखद वाटतो. शिव महिम्नामधे पुष्पदंत गंधर्वानी ह्याचं फारच चपखल वर्णन केलं आहे.

महीपादाघाताद्व्रजति सहसा संशयपदं

पदं विष्णोर्भ्राम्यद्भुजपरिघरुग्णग्रहगणम्।

मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा

जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता।।16


जगाच्या कल्याणा कृति तवचि प्रत्येक असते

जगासी सार्या या परि भिववि हे तांडव कसे?

करी जेंव्हा शंभो समरसुन तू तांडव भुवी

तुझ्या मुद्रांनी या थरथरचि कापे जगतही।।16.1


पदाघाताने त्या डळमळित होईच अवनी

जणू वाटे मोठा प्रलय गिळतो का धरणिसी

तुझ्या ह्या बाहूंची धडक बसुनी नृत्यसमयी

नभीची नक्षत्रे तुटुन पडती ही विखरुनी।।16.2


शिवा जेंव्हा घेसी कितिक गिरक्या नृत्यसमयी

जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची

उडे केसांचा हा विपुल घन संभार भवती

तडाख्याने त्यांच्या भयचकित होई सुरपुरी।।16.3

कृती कल्याणाची, परि कळते ही तव मुळी

प्रभो सामर्थ्याची उचित असुनी  दुःखद कृती।।16.4


विनाश आणि उत्पत्ती ह्यांचा सुवर्णमध्य साधून दोन्हीचाही तोल सांभाळत, निर्माण झालेली अलौकीक कृती  म्हणजे गणेश. शिवाच्या स्तंभित करणार्या सामर्थ्यवान पण विनाशकारी  तांडव नृत्याचं अद्याक्षरतातर पार्वतीच्या नवनिर्मितीच्या  मनमोहक लास्य नृत्याचं आद्याक्षरलाघेऊन तयार झालेला शब्द ताल! ह्या तालावर अखंड आणि आनंदानी नाचणारा गणपती हा संकटांवर मात करणार्या नवनिर्माण, नवचैतन्य, प्रचंड उर्जा, उत्साह यांचा प्रतिक! आणि म्हणुनच सतत बालरूपात असलेला हया गणेशाचं गणेशपञ्चरत्नम्मधे श्री आद्यशंकराचार्य त्याचं वर्णन करतात.

भजे पुराणवारणम् ( श्लोक 4) म्हणजेच

जुने करीच नित्य नष्ट   आदितत्व तू सदा

प्रणाम मी करी तुला  उमा-महेश-नंदना।।

अगदी कितीही काळ एखादी गोष्ट जतन करु म्हटलं तरी 3-4 हजार वर्षापर्यंत फारफार तर टिकेल. बहुधा इतिहास सुद्धा मागे जाऊन जाऊन खूप काही सांगू शकत नाही. कारण काळरूपी गणेशजुने जाऊ द्या मरणा लागूनम्हणत भूतकाळ गुंडाळत आणि भविष्यकाळ उलगडत जातो.

              पार्वतीनी आपल्या अंगाच्या मळापासून तयार केलेला म्हणजे अपवित्रा पासून तयार केलेला हा पवित्र बाळ. पर्वतावरून वाहून आणलेल्या गाळाचा पर्वतपुत्री  - - पार्वतीनी - - नदीनी केलेला हा बाळ - - गणपती. शिवरूप  निसर्गाला पाहवला नाही. त्यानी त्याचाही संहार केला. मानवानी प्रयत्नांची पराकाष्ठा करून बनविलेलल्या कित्येक कृती निसर्ग ओठावरून जीभ फिरवावी तितक्या सहज चाटुन घेतो. त्याचीच तर ही गोष्ट.       

               पण पार्वतीच्या हट्टापुढे ह्या निर्सगरूप शिवाचही ही चाललं नाही. खरच माणूस कधी गप्प बसतो का? कितीही नुकसान झालं, निसर्गाने, परिस्थितीने त्याला नेस्तनाबूत केलं तरी तो परत परत राखरांगोळी झालेल्या आयुष्यातून उभा राहतो आणि पूवीपेक्षा अजुन कणखर बनतो. फिनिक्स पक्षासारख राखेतूनही उठतो आणि भरारी घेतो. पार्वतीनी केला होता तसा बाळ नाही मिळाला परत तिला. पण नवीन विचारांची धारा सोंडेच्या रूपानी जोडताच बाळ जिवंत झाला. बुद्धी आणि अनुभव ही दोन गंडस्थळे लाभून बाळ सुंदरही दिसायला लागला. कृतीला दृढ संकल्पाचे आणि सत्तर्काचे(योग्य अनुमानाचे) अजून दोन हात जोडताच चार हात त्या बाळाला लाभले. त्याची ताकद द्विगुणीत झाली. अतीशय सूक्ष्म विचार करू शकणारे आणि वर्तमानाच्या पलिकडे डोकावणारे डोळे ह्या गणपतीला मिळाले. सृष्टीतला सूक्ष्मातिसूक्ष्म बदल ऐकण्यासाठी सतत मागे पुढे भूत-वर्तमानात हलणारे कान मिळाले. आणि सर्वात सुंदर असा विवेकाचा मोदक शिव पार्वतीनी म्हणजेच सृजन आणि संहार ह्या मातापित्यांनी त्याच्या हाती ठेवला. योग्य अयोग्याचा सतत विचार करणारा हा बाळ  शिव पार्वतीच्या अंकावर  आरूढ झाला.

         अपवित्रापासून निर्माण झालेल्या ह्या पवित्र बालकाप्रमाणेच कुठल्याही कामाची सुरवात ही भव्य दिव्य नसते. परीपूर्णही नसते. त्यात अनेक कमतरता, चुका राहून गेलेल्या असतात. गीतेत (18व्या अध्याय श्लोक 48) सांगितल्याप्रमाणे


सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि त्यजेत्

सर्वारम्भा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः।।


अग्नी तरी पेटल्या पेटल्या कुठे तेजस्वी असतो पेटतांना तोही धुराने झाकोळलेलाच असतो. कुठल्याही कामाची सुरवात दोषयुक्तच असते त्याच्यावर अनेक प्रकारचं संस्करण झाल्यानंतरच त्यातून एक परिपूर्ण कलाकृती तयार होते. म्हणूनच काम करायला सुरवातच करु नये असं अजिबात नाही. काम करायला सुरवात केली की हळु हळु त्यात सुधारणा होत जाते. एका छोट्याशा गढूळ निर्झराची पवित्र गंगा नदी तयार होते. म्हणुनच कामाची सुरवात कितीही दोषयुक्त असली तरी तेच काम तुला तारून नेईल असं सांगणार्या गणेशाला प्रत्येक कामाच्या सुरवातीला आपण वंदन करतो. कितीही संकट आली तरी त्यातूनही मार्ग काढायची उमेद मिळवतो.

                                  पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश या  पंचमहाभूतांपासून तयार झालेला हा बाळ गणेश! ह्या पंचमहाभूतांमधे जी तत्त्व आहेत ती बघता असं दिसून येतं की त्यांचे गुणधर्म हे पूर्णपणे  एकमेकांविरुद्ध आहेत. मातीला जल विरघळवून टाकतं. जलाला अग्नी आटवतो. अग्नीला वारा विझवतो. वारा आकाशात विलीन होतो.आणि सर्व वस्तुंमधे राहूनही आकाश अलिप्तच राहतं. पण तरीसुद्धा ही प्रचंड शक्तिशाली पंचमहाभूतं एकत्र येऊन अवयव असलेल्या शरीरांची- - - एका जीवसृष्टीची निर्मिती करतात. अशा प्रचंड विरोधाभासातून निर्माण झालेली एक अद्वितीय कलाकृती गणेशाच्या रूपानी आपल्यासमोर उभी राहिली भूतलावर असलेल्या सर्व भूतगणांचा स्वामी अशी ओळख या गणेशाला मिळाली.

                              हा कृतीशील गणेशच आपल्या मनातील लोभ, मोह, क्रोध, भय, भीती, अहंकार, दर्प, हे सर्व विसंवादी सूर किंवा महाभयंकर असुर म्हणुया हवं तर ! त्यांच्याशी चिवटपणे झुंझ देऊन त्यांचा नाश  करु शकतो. एकदा ह्या षड्रिपूंना जिंकून घेतलं की यम नियमानी वागणार्या मानवास हा विघ्नहर्ता गणेश सर्व विघ्नांमधून सुरळीतपणे पैलतीरी पोचवेल ह्यात शंकाच नाही.

---------------------------




1 comment: