।। #श्रीगणपतिस्मरणम् ।।


Image result for lord ganesha free download photos

                      हाती घेतलेले सत्कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणुन श्री गणेशाचे स्तवन, पूजन करण्याचा प्रघात आहे. अनुवाद पारिजात ह्या पुस्तकाचा आरंभ करतांनाही श्री आद्यशंकराचार्य लिखित एका सुरेख अशा गणेश स्मरणाच्या सुबोध भावानुवादाने आपण सुरवात करु या. 

                         ह्या एकाच श्लोकात असलेल्या यमक, अनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे गणेशस्मरण प्रत्यक्षात स्मरणात राहण्यास सुद्धा सुंदर आणि सोपे झाले आहे.

(वृत्त - भुजंगप्रयात, अक्षरे -12, गण - य य य य)

गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं

चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डम्

लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं

शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्।।

 

( दान – दानोदक, हत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा द्रव; शौण्ड – कुशल, दक्ष, तरबेज; लस् – चमकणे; कान्डम् खण्ड, अंश, तुकडाशिवप्रेमपिण्ड् –प्रेमाने महटले जाते की माझा पोटचा गोळा आहे त्याप्रमाणे शिवाचा लाडका पोटचा गोळा. वक्रतुण्ड – दुष्ट प्रवृत्तिचे, खल प्रवृत्तिचे लोक. त्यांना तुडवतो, नष्ट करतो तो वक्रतुण्ड )

 

गणेशा गुणेशा तुला पूजितो मी । तुझे सुंदरा रूप चित्ती स्मरे मी

शिरी पाझरे त्याच दानोदकानी। सुवासीक ओलेति गंडस्थले ही।।1.1

 

किती भृंग झुंडी तिथे गुंजताती । रसास्वाद घेवोनि  ते लुब्ध होती

झुले सोंड तालात मोही मनासी । कटीबद्ध तू रक्षिण्या या जगासी।।1.2

 

सुळा एक शोभे तुझा हस्तिदंती । करी तूच निःपात आपत्तिचा ही

शिवाचा असे लाडका पुत्र तूची। करी दुष्ट संहार विघ्नेश मूर्ती।।1.3

----------------------------------------

 

#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad
#लेखणीअरुंधतीची-